nobel winning scientist arvid carlsson

डॉ. अरविड कार्लसन


10032   09-Jul-2018, Mon

पार्किन्सन म्हणजे कंपवाताच्या रोगावर अजूनही इलाज सापडलेला नाही. त्यावर थोडेबहुत नियंत्रण ठेवता येईल अशी औषधे आहेत इतकेच. या औषधांमुळे काही प्रमाणात हा रोग नियंत्रित राहतो. या रोगावरील औषधे ज्यांच्या संशोधनातून तयार झाली अशा वैज्ञानिकांपैकी एक म्हणजे डॉ. अरविड कार्लसन. ते स्वीडिश वैज्ञानिक होते. त्यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना कंपवातावरील संशोधनासाठी नोबेलही मिळाले होते.

डॉ. कार्लसन यांचे संशोधन १९५० मध्ये मेंदूतील डोपॅमाइन या रसायनापासून सुरू झाले. त्या काळात डोपॅमाइनचे महत्त्व फारसे समजलेले नव्हते, पण हाच चेतासंवेदक एका न्यूरॉनकडून दुसऱ्या न्यूरॉनकडे संदेश पाठवत असतो. कार्लसन यांनी डोपॅमाइन हे मेंदूच्या बॅसल गँगलिया भागात असते हे प्रथम सांगितले. हाच भाग शरीराच्या हालचाली नियंत्रित करीत असतो. डोपॅमाइन कमी झाले की शारीरिक हालचाली मंद होतात. त्यातूनच एल डोपा या औषधाचा शोध लागला, त्यामुळे मेंदूत डोपॅमाइन वाढवले जाते. कार्लसन यांनी हे सगळे प्रयोग सशांवर केले होते.

मेंदूतील संदेशवहनाचे गूढ शोधणाऱ्या डॉ. कार्लसन यांना इ.स. २००० मध्ये डॉ. एरिक कांडेल व डॉ. पॉल ग्रीनगार्ड यांच्यासमवेत नोबेल देण्यात आले.

स्वीडनमधील ल्युंड शहरात ते लहानाचे मोठे  झाले. त्यांची आई एमए झालेली होती. आईचा सामाजिक संशोधनाचा वारसा मुलाने विज्ञानात पुढे नेताना जगातील असंख्य लोकांचे आयुष्य अवघड करून टाकणाऱ्या पार्किन्सनवर संशोधन केले. दोन भाऊ मानव विद्या शाखेकडेच वळले असताना डॉ. कार्लसन यांनी बौद्धिक बंडखोरी करून वैद्यकशास्त्राचा मार्ग निवडला.  दुसऱ्या महायुद्धावेळी ते जर्मनीला गेले, तेथे अनेक ज्यू कैद्यांची मनाची अवस्था पाहून त्यांना आश्चर्य वाटले होते. नंतर १९५१ मध्ये कार्लसन वैद्यकीय डॉक्टर झाले व फार्माकॉलॉजीत डॉक्टरेटही पूर्ण केली. डॉक्टरकी व संशोधन यात त्यांनी संशोधन निवडले. नंतर अमेरिकेत बर्नार्ड ब्रॉडी या फार्माकॉलॉजिस्टच्या प्रयोगशाळेत त्यांनी जे संशोधन केले ते त्यांना नोबेलपर्यंत घेऊन गेले.

ब्रॉडी यांच्यामुळेच मी घडलो, असे कार्लसन यांनी नमूद केले आहे. ते अमेरिकेतून मायदेशी आले व नंतर एल डोपा औषधाचे प्रयोग केले, ते यशस्वी ठरले. कार्लसन हे गोथेनबर्ग विद्यापीठात प्राध्यापक होते. रॉयल स्वीडिश विज्ञान अकादमीचे सदस्य बनले. १९८४ मध्ये त्यांना जपानचा पुरस्कार मिळाला होता. त्यांनी शोधलेले एल डोपा हे औषध आजही कंपवातावर मोठय़ा प्रमाणात वापरले जात आहे, इतके त्यांचे संशोधन शाश्वत राहिले.

gst

वळणावळणाची वाट


6637   08-Jul-2018, Sun

देशभरातील विविध अप्रत्यक्ष कर व अन्य उपकर रद्द करून करसंकलनात व करप्रणालीत आमूलाग्र बदल घडविणाऱ्या दीर्घकाल प्रतिक्षित जीएसटीच्या (वस्तू व सेवाकर) अंमलबजावणीला एक जुलैला एक वर्ष पूर्ण झाले. आधीच्या सरकारच्या काळात प्रस्थावित या करप्रस्तावाची योजना विद्यमान सरकारच्या कालखंडात झाली. या कराच्या अंमलबजावणीची विविध अडचणींनी भरलेली पहिल्या वर्षाची वळणावळणाची वाट काही संपलेली नाही.

या करप्रणालीतील तरतुदी आणि त्याच्या अंमलबजावणीतील अडचणी यांचा एकत्रित आढावा घेतल्यास तो एक कटुगोड असाच म्हणायला हवा. एक देश एक कर अशी आकर्षक घोषणा करणाऱ्या या घोषणावंत सरकारने जीएसटीत केलेली अविचारी तरतूद आणि अंमलबजावणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या अभावाची न घेतलेली दखल यामुळे प्रारंभीचा प्रवास खूपच अडथळ्यांचा, गोंधळाचा आणि हताशेचा होता. केवळ व्यापारी आणि उद्योजक यांच्या पातळीवरच हे गोंधळ आणि हताशा नव्हती तर सरकारपातळीवरही तितकीच होती. दररोज निघणाऱ्या सुधारक परिपत्रके आणि घोषणांनी या गोंधळात भरच पडली. महिन्याला किती परतावे भरावेत, आंतरराज्यासाठी किती आणि कोणी भरावेत किंवा भरू नयेत, या कराच्या जाळ्यात कोण आहे आणि कोण नाही याबाबतचा संभ्रम देशातील उद्योगव्यापाऱ्यांपेक्षाही अर्थखात्याच्या बाजूने अधिक होता.

या कराच्या अंमलबजावणीचा इव्हेंट मोठा करण्याच्या नादात या छोट्या गोष्टी राहून गेलेल्या असू शकतात. तथापि, आता एक वर्ष पूर्ण होताना प्रारंभीचा हा गोंधळ बऱ्याच प्रमाणात दूर झाला आणि केंद्रीय अर्थखात्यालाही वस्तुस्थितीचा अंदाज आला असे संपूर्णपणे सुखद नसले तरी निःश्वासाचे चित्र नक्कीच आहे. निदान जीएसटीच्या अंमलापासून त्याच्या यशस्वितेबद्दल असलेल्या शंकांना विश्रांती मिळाली आहे. करांचे टप्पे, कर टप्पे लागू होणारी क्षेत्रे आणि उत्पादने यात सुरळीतपणा आला आहे. जकातनाके बंद झाल्याने मालवाहतुकीच्या वाहनांच्या लांबलचक रांगा गायब झाल्याने मालवाहतुकीला लागणाऱ्या वेळेत बचत होते आहे. कोणी किती वेळा परतावे भरावेत आदी गोंधळ संपले नसले तरी तो विषय पूर्वीइतका मोठा नाही, इथपत प्रगती झालेली आहे. या करप्रणालीच्या फायद्याबाबत कोणाला शंका नव्हती. असलीच तर अंमलबजावणीतील अस्थिरतेमुळे निर्माण झाली होती. ती दूर करण्याऐवजी सरकारने तीत भर घातल्याने गोष्टी गुंतागुंतीच्या झाल्या. एक देश एक कर म्हटले तरी त्याचे टप्पे विविध असल्याने त्यात भविष्यकाळात अजून सुधारणांना वाव आहे. तसेच, या कराशिवाय अन्य कोणतेही कर लागू होणार नाहीत असे अपेक्षित असताना आणि सरकारनेही असे आश्वासन दिले असताना, सरकारने उपकर लावणे काही थांबवले नाही. यात सर्वच व्यावसायिक आस्थापनांना करपरतावे भरण्यासाठी अंतर्भूत करून घेण्यात आल्याने करदाते वाढले आणि ते साहजिक आहे. तथापि, अद्याप अपेक्षित प्रमाणात कर जमा होत नाही हे वास्तवही दुर्लक्ष करता येणार नाही. कर भविष्यात वाढू शकतो असे आशादायक उद्गार काढण्याऐवजी त्यासाठी सुलभीकरणातून लाभ हे तत्त्व लागू होणे आवश्यक आहे. कारण भारतात करविषयक कायद्याचे पालन करण्यापेक्षा तो चुकवणे अधिक सोपे किंवा सोयीचे आहे.

डिजिटलीकरणामुळे तसे होणार नाही, हा भ्रम आहे हेही एव्हाना सगळ्यांना कळून चुकले आहे. त्यामुळे सरकारला या बाबतीत करभरणा लाभदायक ठरण्यासाठी तसे वातावरण निर्माण करण्यावर भर हवा. कारण या डिजिटलीकरणाचा गैरफायदाही घेतला जात असल्याचे खुद्द जीएसटी अधिकाऱ्यांनीच मान्य केले आहे. काही व्यावसायिकांनी मालपुरवठा न करता खोटी बिले सादर करून इनपुट टॅक्स क्रेडिटपोटी हजारो कोटी रुपयांची वसुली केल्याचे उघड झाले आहे. खरा आकडा याहून अधिक असल्याची भीतीही आहे. त्यासाठीच्या दुरुस्त्या करतानाच जीएसटी कर विवरणपत्रांचे अधिक सुलभीकरण होणे आवश्यक आहे. त्याद्वारे व्यावसायिकांचा त्रास कमी होणे महत्वाचे आहे, कारण तसे झाले तरच करसंकलन वाढेल.

दरमहा एक कोटी रुपयाच्या करसंकलनाचे लक्ष्य अद्याप गाठले गेलेले नाही. या पार्श्वभूमीवर त्या सुलभीकरणावर भर द्यावा लागेल. पुढील वर्षाच्या पहिल्या दिवसापासून जीएसटी विवरणपत्राचे नवे अर्ज अंमलात येतील, अशी अपेक्षा आहे. तसेच, पेट्रोल व डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याविषयीचा प्रश्नही सरकारने हाती घेतलेला नाही. त्यामुळे एक आदर्श करप्रणाली होण्यासाठी जीएसटीचा प्रवास काही संपलेला नाही. मात्र पुढच्या वर्षी तो अधिक सुरळीत असेल, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. 

safety of investment

गुंतवणूक करताना टाळावयाच्या चुका


14238   08-Jul-2018, Sun

तुमच्या दीर्घकालीन गुंतवणुकीचे यश तुमचे ‘आतील शत्रू’ आणि ‘भावनिक सापळे’ यांच्यावर तुम्ही कशाप्रकारे नियंत्रण मिळवता त्यावर अवलंबून आहे. आनंदाची बातमी ही की, प्राध्यापक डॅन एरियली यांनी ‘प्रेडिक्टेबली इररॅशनल’ या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे माणसांची वागणूक ही सूचकपणे असंमजस असते. एकदा का आपण हे ‘आतील शत्रू’ ओळखले की त्यांचा सामना करण्याचा मार्गही आपण शोधू शकतो. विचारपूर्वक निर्णय घेणारा गुंतवणूकदार या सूचक असमंजस वागणुकीवर मात करून कुठल्याही गोंधळात विचलित न होता हुशारीने निर्णय घेतो आणि इतरांच्या ‘वागणुकीतील असमतोलाचा’ फायदा उठवतो.

एक महत्त्वाचा आतील शत्रू म्हणजे ‘फाजील आत्मविश्वास.’ वारंवार आपण आपली क्षमता, ज्ञान आणि कौशल्य यांना अतिमहत्त्वाचे समजतो. २४ तास चालणाऱ्या बातम्यांच्या वाहिन्या पाहून आणि त्यावरील ‘तज्ज्ञांना’ ऐकून आपण स्वत:लाच तज्ज्ञ समजू लागतो आणि कुठलाही सखोल विचार न करता गुंतवणुकीचे निर्णय घेतो. आपण असा विचार करायला लागतो की आपण दैनंदिन किमतीमधील चढ-उताराचा अजूक अंदाज वर्तवू व त्यानुसार गुंतवणूक करू. अतिआत्मविश्वासामुळे खूप जास्त ट्रेडिंग होते व चुकीचे गुंतवणुकीचे निर्णय घेतले जातात. यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत शून्याधारित दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज आहे. गुंतवणूकदाराला इतके हुशार असायला हवे की चांगला परतावा देणारी त्याची गुंतवणूक लगेच विकायची नाही आणि तोटा देणारी गुंतवणूक जास्त काळ टिकवून ठेवायची नाही.

आणखी एक महत्त्वाचे, भावनिक सापळा आपल्याला टाळायला हवा. ‘कळपासोबत चालणे’ आपल्याला टाळता यायला हवे. स्वत:च्या ज्ञानाव्यतिरिक्त लोक मोठय़ा समूहाच्या कृतीचे अनुकरण करायला लागतात. मोठय़ा प्रमाणावर असलेल्या सामाजिक मर्यादांमुळे प्रत्यक्षात असलेली किंमत आणि मूल्य यामध्ये मोठा फरक राहू शकतो. कळपासारख्या या वागणुकीमुळे एखाद्या समभागासाठी नफ्याची मोठी संधी निर्माण होऊ  शकते. मात्र सामूहिक असमंजसतेचा लाभ ठरावीक समभाग किंवा बाजारासाठी उठविणे कठीण असते. आपल्यापैकी बहुतांश लोकांना कळपाचा हिस्सा बनण्याची मोठी इच्छा असते, स्वतंत्रपणे उभे राहणे हे सोपे नाही. मात्र जर आपण आपल्या या वागणुकीवर नियंत्रण मिळवू शकतो तर आपल्या गुंतवणुकीपासून चांगला परतावा मिळू शकतो. वॉरेन बफे यासंदर्भात सांगतात, ‘जेव्हा इतर लोक हावरट असतात तेव्हा आम्ही घाबरून राहण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा इतर लोक घाबरून असतात तेव्हा आम्ही हावरट राहण्याचा प्रयत्न करतो.’ हे प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्या भावनांवर मोठय़ा प्रमाणात नियंत्रण मिळविण्याची गरज आहे.

संशोधनातून असे आढळून आले आहे की, वागणुकीतील चुकांमुळे गुंतवणुकीवरील परतावा १० ते ७५ टक्कय़ांपर्यंत कमी होऊ शकतो. हे टाळण्यासाठी तुम्हाला काय करण्याची गरज आहे? एका शब्दात हे सांगता येईल, शिस्त. प्रत्येकाला नेहमीच स्मार्ट होण्यावर लक्ष देण्याची गरज नाही. वॉरेन बफेंनी एकदा सांगितले आहे, ‘तुमच्या आयुष्यात अवघ्या काही गोष्टी तुम्हाला बरोबर करायच्या आहेत, जर तुम्ही खूप गोष्टी चुकीच्या करणार नसाल तर.’ जर तुम्ही मोठी चूक टाळू शकणार असाल तर योग्य निर्णय त्यांची काळजी घेईल.

महत्त्वाचे काय?

’  समभाग विकत घेताना आणि विकताना ‘चेकलिस्ट’ वापरा. ती नेहमी छोटी आणि वाजवी ठेवा

’  गुंतवणुकीपूर्वी आवश्यक ती खबरदारी घ्या. सुरक्षित मार्जिन ठेवा, कधीही अघळपघळ गुंतवणूक करू नका.

’  ‘विकत घ्या आणि सांभाळा’ या धोरणाचा अवलंब करा आणि ठरावीक कालावधीने त्याचा पडताळा करा. जितके कमी तुम्ही बाजारातील चढ-उतार पाहाल आणि तुमचा पोर्टफोलिओ तपासून पाहाल तितके कमी तुम्ही शेअर बाजारातील नैसर्गिक चढ-उतारांमध्ये भावनिकरीत्या निर्णय घ्याल.

’  दीर्घकालीन गुंतवणुकीचा निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. जर तुम्ही एखादा समभाग १० वर्षांसाठी ठेवणार असाल तर एखाद दिवसाचा परतावा गेला तरी फरक पडत नाही. जेव्हा तुम्हाला पॅनिक वातावरण जाणवते तेव्हा आणखी एखादा दिवस वाट पाहा. गुंतवणूक ही दीर्घकालीन दृष्टिकोनातून विचारपूर्वक केली असेल तर चांगल्या परताव्याची संधी नक्की मिळेल आणि भविष्यातही येईल.

’  संपत्तीचे विभाजन योग्यरीतीने करा आणि ठरावीक कालावधीनंतर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये समतोल राखत राहा.

’  नम्र राहा आणि तुमच्या चुकांपासून शिका. जेव्हा तुम्हाला यश मिळते तेव्हा कोणत्या गोष्टींमुळे यश मिळाले ते पाहा आणि कशामुळे नाही मिळाले हेही पडताळा. योगायोगाने मिळालेल्या यशाचे श्रेय घेऊ  नका. अयशस्वी ठरल्यावर ते पटवून देण्याचा प्रयत्न करू नका. त्याहून महत्त्वाचे म्हणजे अपयशातील दुर्दैवाचा भाग आणखी मोठा करून सांगू नका.

yoga education and opportunity

योगशिक्षण आणि संधी


6397   07-Jul-2018, Sat

गेल्या काही वर्षांपासून जून महिन्यात देशात आणि परदेशातही आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात येतो. आरोग्यदायी जीवनासाठी योगसाधना अत्यंत उपयोगी आहे. तणाव दूर करणे, मन:शांती कायम राखणे, प्रकृत्ती उत्तम ठेवणे यासाठी त्याचा उपयोग होतो. त्यामुळे याकडे अधिकाधिक नागरिक वळत आहेत. यामध्ये करिअरचीही चांगली संधी आहे. भारत सरकारने योग प्रशिक्षणास कौशल्यविकास श्रेणीत टाकले आहे. योगगुरू होण्यासाठी चांगल्या संस्थेतून प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. ही संधी मोरारजी देसाई इन्स्टिटय़ूट ऑफ योगमुळे उपलब्ध झाली आहे.

योग शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि उपचार या बाबींशी निगडित असलेली आणि सरकारने स्थापन केलेली ही देशातील महत्त्वाची व आघाडीची संस्था होय. स्वायत्ताप्राप्त असलेली ही संस्था आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. या संस्थेने पुढील पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले आहेत.

बॅचलर ऑफ सायन्स इन योग सायन्स – व्यावसायिक योग प्रशिक्षक निर्मितीसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरावा या दृष्टीने त्याची संरचना करण्यात आली आहे. तीन वर्षे कालावधीचा हा अभ्यासक्रस सहा सत्रांमध्ये विभाजित करण्यात आला आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांना योगप्रशिक्षकासाठी आवश्यक असणारे तंत्र आणि कौशल्य शिकवले जाते. तसेच यासंबंधातील विस्तृत ज्ञान दिले जाते. हा अभ्याकसक्रम नवी दिल्लीस्थित गुरू गोबिंदसिंघ इंद्रप्रस्थ विद्यापीठाशी संलग्नित आहे.

अर्हता- या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांला १२वी विज्ञान परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या तीन विषयांमध्ये सरासरीने किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक. तथापी प्रत्येक विषयामध्ये स्वतंत्ररीत्या उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. राखीव संवर्गातील उमेदवारांसाठी विद्यापीठाच्या नियमानुसार गुणांमध्ये सूट दिली जाते.

वयोमर्यादा- २१ वर्षे.

निवड प्रक्रिया- १२ वीमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाते. या यादीतील निवडक विद्यार्थ्यांना मुलाखत आणि वैद्यकीय चाळणीनंतर अंतिम निवड केली जाते. एकूण ६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नॉनक्रीमी लेअर इतर मागास वर्ग संवर्गासाठी नियमानुसार जागा राखीव ठेवल्या जातात. हा अभ्यासक्रम इंग्रजीतून शिकवला जातो. या अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या २० टक्के विद्यार्थ्यांना वसतिगृहाची व्यवस्था पुरवण्यात येते. यासाठी त्यांना दरमहा ५ हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. या अभ्यासक्रमाचे दरवर्षांचे शुल्क २७ हजार रुपये आहे.

फाउंडेशन कोर्स इन योगिक सायन्स फॅार वेलनेस – हा अभ्यासक्रम १०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना करता येतो.

कालावधी- ५० तास/एक महिना.

शुल्क- २ हजार रुपये.

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश या तत्त्वावर ५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

सर्टिफिकेट कोर्स इन योगासन फॉर हेल्थ प्रमोशन – या अभ्यासक्रमाचा कालावधी ३ महिने. कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम करता येतो. या विद्यार्थ्यांने या संस्थेचा योगविज्ञान विषयातील फाऊंडेशन अभ्यासक्रम वा इतर मान्यताप्राप्त संस्थेतील एक महिने कालावधीचा हा अभ्यासक्रम केलेला असावा. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सोय उपलब्ध करून दिली जात नाही. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश या तत्त्वावर प्रवेश दिला जातो.

अभ्यासक्रमाचे शुल्क-६५०० रुपये.

सर्टिफिकेट कोर्स इन प्राणायम अ‍ॅण्ड मेडिटेशन फॉर हेल्थ प्रमोशन –  या अभ्यासक्रमाचा कालावधी ३ महिने. कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम करता येतो. या विद्यार्थ्यांने या संस्थेचा योग विज्ञान विषयातील फाऊंडेशन अभ्यासक्रम वा इतर मान्यताप्राप्त संस्थेतील एक महिने कालावधीचा हा अभ्यासक्रम केलेला असावा. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सोय उपलब्ध करून दिली जात नाही. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश या तत्त्वावर प्रवेश दिला जातो. हा अंशकालीन अभ्यासक्रम आहे.

शुल्क-६,५०० रुपये. ५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

germany angela markel

पोकळ प्रगती


11802   07-Jul-2018, Sat

जगातील सर्वच विवेकवाद्यांच्या पीछेहाटीचाच हा काळ, याची खूण जर्मनीतील राजकारण पाहिले असता पटते..

‘‘सामान्य जर्मन नागरिक आपल्या सरकारविरोधात उभा राहात असून वाढती गुन्हेगारी, ढासळती कायदा व सुव्यवस्था याला तो कंटाळला आहे. त्या देशातील वाढते स्थलांतर या सगळ्याच्या मुळाशी आहे’’. वरवर पाहता एखाद्यास ही टीका जर्मनीच्या चॅन्सलर अँगेला मर्केल यांच्या कोणा राजकीय विरोधकाने केली असे वाटू शकेल. पण वास्तव तसे नाही.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा हा ट्वीट. मर्केल यांचे सरकार स्थलांतरितांच्या मुद्दय़ावर कोसळणार असे दिसत असताना अत्यानंदात त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ती अस्थानी ठरली. ट्रम्प आणि मर्केल यांच्यातील तणावपूर्ण संबंध हा जागतिक राजकारणात उघड चच्रेचा विषय झाला असून मर्केल यांचे खमकेपण ट्रम्प यांच्या अर्निबध आचरट राजकारणाच्या वाटेतील महत्त्वाचा अडसर बनून राहिले आहे. मर्केल यांच्या सत्तात्यागात ट्रम्प यांना रस.

वास्तविक हा त्यांचा ट्वीट म्हणजे सरळ सरळ दुसऱ्या देशाच्या कारभारात केलेला हस्तक्षेप आहे. असे करणे अमेरिकेसारख्या देशाच्या अध्यक्षास शोभत नाही. ट्रम्प हे विवेकवादी राजकारणासाठी कधीच प्रसिद्ध नव्हते. परंतु आता ते अधिकाधिक अविवेकी होत असून मर्केल यांच्या संभाव्य गच्छन्तीबाबत असे मत व्यक्त करणे हा त्याचाच एक भाग. ट्रम्प यांचा हा ट्वीट वाया गेला. त्यांची इच्छा होती त्या प्रमाणे मर्केल यांचे सरकार पडले नाही. बाईंनी ते पाडण्याची धमकी देणाऱ्या आपल्या सहयोगी पक्षाशी समझोता केला आणि सरकार वाचवले. हे असे करणे हा संधिसाधूपणा झाला वगरे आपल्याला परिचित अशी टीका त्याबाबत होऊ शकते. पण ती अयोग्य ठरते.

याचे कारण मर्केल यांनी हाती घेतलेले मुद्दे. पश्चिम आशियाच्या वाळवंटातील सीरिया या देशात अनागोंदी माजल्यानंतर अनेकांनी आपापला जीव वाचवण्यासाठी देशत्याग करणे पसंत गेले. हा सीरिया, अफ्रिकेतील लिबिया आदी देश म्हणजे निव्वळ बजबजपुरी आहेत. त्या देशांतील नागरिक केवळ मरण येत नाही म्हणून जिवंत आहेत. ज्यांचे हातपाय धडधाकट आहेत ते जिवावर उदार होतात आणि एखादी होडी पकडून भूमध्य समुद्रात स्वतस झोकून देतात. इटली, ग्रीस, स्पेन अशा एखाद्या देशाच्या किनाऱ्यावर या होडय़ा धडकतात. तिकडे सीरियातील स्थलांतरित शेजारच्या तुर्कीमाग्रे पलीकडच्या बल्गेरिया आदी देशांत घुसून युरोपात प्रवेश मिळवतात. या भूमध्य समुद्री देशांच्या नौदलांना या अशा निर्वासितांच्या होडय़ा वाचवणे हे एक कामच होऊन बसले आहे. एकदा का एखाद्या युरोपीय देशात या विस्थापितांना चंचुप्रवेश मिळाला की युरोपीय संघातील कोणत्याही देशात ते घुसतात. युरोपीय देशांसमोर ही नवीन डोकेदुखी. ती कशी हाताळायची याबाबत या संघातील अनेक देशांत एकमत नाही. बहुतेकांना ही निर्वासितांची ब्याद नको असून अत्यंत निर्दयपणे त्यांना त्यामुळे हाकलून दिले जाते. यातील बहुतेक इस्लाम धर्मीय आहेत. हंगेरी, ऑस्ट्रिया, इटली अशा देशांनी तर त्यामुळे कडकडीत धर्मवादी भूमिका घेतली असून या निर्वासितांना थारा देण्यास बिलकूल नकार दिला आहे. यामुळे युरोपातील अनेक देशांत वंशवादास नव्याने उकळी फुटू लागली असून अनेक देशांनी आपापल्या सीमारेषा आणि किनाऱ्यांवरील बंदोबस्तात कमालीची वाढ केली आहे. हा युरोपीय महासंघाच्या सामाईक बाजारपेठ, परस्परांतील खुल्या सीमा अशा कल्पनांना निर्माण झालेला धोका.

तो दूर करण्याची राजकीय विचारशक्ती आणि आर्थिक ताकद आजमितीस एकच व्यक्ती आणि देश यांनी दाखवली. अँगेला मर्केल ही ती व्यक्ती आणि जर्मनी हा तो देश. मर्केल यांनी संपूर्ण युरोपीय महासंघाचा डोलारा आपल्या एकटय़ाच्या खांद्यावर तोलून धरला. जर्मनीच्या सर्वोच्च सत्तापदी निवडून येण्याची त्यांची ही चौथी खेप. परंतु ती आधीच्या तीन सत्ताकालाप्रमाणे निर्वेध नाही. मर्केल यांच्या ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन या पक्षास स्वच्छ बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे त्यांना अन्य दोन पक्षांचा पाठिंबा घ्यावा लागला.

ख्रिश्चन सोशल युनियन आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी हे त्यांचे दोन आघाडी सदस्य. यातील पहिला हा कडवा उजवा असून दुसरा डावीकडून मार्गक्रमण करण्यासाठी ओळखला जातो. या दोन्हीही पक्षांचे सदस्य मर्केल मंत्रिमंडळात आहेत. यातील ख्रिश्चन सोशल युनियनचे नेते आणि मर्केल मंत्रिमंडळातील देशांतर्गत कारभाराचे मंत्री होर्स्ट सीहोफर यांना मर्केलबाईंचा खुला सीमावाद मंजूर नाही. देशात येणाऱ्या स्थलांतरितांना थांबवण्याचा निर्णय घेतला नाही तर आपण मंत्रिपदाचा राजीनामा देऊ आणि सरकारातून बाहेर पडू असा इशारा त्यांनी दिल्यानंतर मर्केल यांचे सरकार संकटात आले. चच्रेच्या अनेक फेऱ्यांनंतरही सीहोफर यांनी आपला इशारा मागे घेतला नाही. शेवटी सरकार वाचवण्यासाठी मर्केल एक पाऊल मागे गेल्या आणि मधला मार्ग म्हणून जर्मनीच्या सीमेवर स्थलांतरितांच्या तपासणी आदींसाठी स्वतंत्र छावण्या उभारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सर्व बाजूंनी या स्थलांतरितांची तपासणी, चौकशी होईपर्यंत त्यांना या छावण्यांतूनच मुक्काम करावा लागेल आणि देशात प्रवेश दिला जाणार नाही. या चौकशीचा निष्कर्ष अनुकूल नसेल त्यांना पुन्हा हाकलून दिले जाईल.

मर्केलबाईंनी हा निर्णय घेतला. पण त्यामुळे दुसऱ्या बाजूचे सोशल डेमोक्रॅट्स बिथरले. या पक्षाचे धोरण स्थलांतरितांना सामावून घेण्याचे. काही प्रमाणात मर्केल यांच्या पक्षाशी जुळणारे. परंतु सत्ता टिकवण्यासाठी आपल्या धोरणांस त्यांना मुरड घालावी लागणार. हा प्रश्न इतक्यापुरताच मर्यादित नाही. जर्मनीच्या बव्हेरिया प्रांतात स्थानिक निवडणुका ऑक्टोबरच्या मध्यास अपेक्षित आहेत. जर्मनीच्या काही नितांतसुंदर प्रदेशांपकी हा एक. ऑस्ट्रिया या देशाच्या सीमेलगत असणाऱ्या या प्रांतात नवनाझीवादी आणि कडवे उजवे मोठय़ा प्रमाणावर वाढू लागले असून त्यांचाही स्थलांतरितांना देशात येऊ देण्यास विरोध आहे. आल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी असा नवा एक पक्ष या प्रांतात जम बसवू लागला असून त्याची ध्येयधोरणे प्रतिगामी म्हणता येतील अशीच आहेत. तरीही या पक्षाचा दिवसागणिक वाढणारा पाठिंबा ही बाब सगळ्यांचीच चिंता वाढवणारी ठरते. हे असे टोकाचे मागास आणि जोडीला नवनाझीवादी हे मिश्रण पुरसे स्फोटक म्हणावे लागेल.

ख्रिश्चन सोशल युनियन या पक्षाची काळजी आहे ती या नव्याने आणि वेगाने विस्तारणाऱ्या पक्षामुळे. एकदा एकाने टोकाची भूमिका घेतली की त्याच मताच्या दुसऱ्यास आपल्या लोकप्रियतेची पातळी राखण्यासाठी आणखी टोक गाठावे लागते. हे सर्वत्र होते. कारण विवेकाचे बोट सोडले की किती अविवेकीपणा करावा यास काहीही धरबंध राहात नाही. म्हणूनच लोकानुनयाच्या खेळात अडकणाऱ्याने पहिले पाऊल टाकण्यापूर्वीच विचार करावा लागतो. जर्मनीतील संबंधितांनी तो केला नाही. परिणामी आता हे दोन पक्ष आपल्याच खेळात अडकले असून मर्केल यांना सत्ता टिकवण्यासाठी संतुलन साधत राहण्याखेरीज पर्याय नाही. तूर्त ते त्यांनी साधले आहे. परंतु त्याच्या स्थिरतेची हमी नाही.

तसे पाहू गेल्यास हा प्रश्न फक्त जर्मनी वा मर्केल यांच्यापुरताच उरलेला नाही. जगातील सर्वच विवेकवाद्यांच्या पीछेहाटीचाच हा काळ असून आधुनिक अशा एकविसाव्या शतकातही जगातील एका मोठय़ा समूहास उभे राहू देईल अशी भूमीच नाही, ही यातील खरी शोकांतिका आहे. या निर्वासितांचा धर्म कोणता यावर त्यांना जगू द्यावयाचे की नाही हे ठरणार असेल तर मानवाने साध्य केलेली प्रगती किती पोकळ आहे हे दिसून येते. मर्केल यांचे सरकार हे केवळ निमित्त.

indian love and confidence

देशप्रेम आणि धाडस

 


9822   05-Jul-2018, Thu

एखाद्या देशाच्या गुप्तचर संघटनांसाठी काम करणारे एजंट कोण असतात, ते आपल्या मोहिमा कशा पार पाडतात, याच्या अनेक कथा-कादंबऱ्या आपण वाचल्यात. आंतरराष्ट्रीय स्तरावर पॉलिटिकल थ्रिलर हा प्रचंड लोकप्रिय असा प्रकार आहे. प्रत्यक्ष युद्ध, राजकीय संघर्ष, बंड, राजकीय हत्यांची षडयंत्र या सत्यघटनांमध्ये काल्पनिक पात्रांची कथा मांडत लिहिल्या जाणाऱ्या उत्कंठावर्धक कादंबऱ्या वाचून एका वेगळ्याच जगात प्रवेश केल्याचा अनुभव घेता येतो. अनेक लेखक स्वतः गुप्तचर संघटना, सैन्यात किंवा अन्य राजनैतिक पदावर असल्याने या यंत्रणांचं कामकाज कसं चालतं याचा अंदाज घेता येतो. शिवाय इतक्या गुप्तपणे कारवाया कशा चालवल्या जातात, त्यात सहभागी होणारी माणसं कोण असतात, असे प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडतात.

भारतात अशा प्रकारचं लिखाण आणि लेखक यांची संख्या दुर्मिळच. परंतु अलीकडेच प्रकाशित झालेल्या 'कॉलिंग सेहमत'ने लक्ष वेधून घेतलंय. हरिंदर सिक्का यांची ही पहिलीच कादंबरी. नौदलातून लेफ्टनंट कमांडर म्हणून निवृत्त झालेल्या सिक्का यांनी कॉलिंग सेहमत लिहिताना सत्यघटनांचा आधार घेतला आहे. राझी या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या मेघना गुलजार दिग्दर्शित सिनेमामुळेही या पुस्तकाविषयी अधिक चर्चा झाली. 

१९७१च्या पार्श्वभूमीवर भारत–पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला. दोन्ही देशांतला तणाव वाढण्याची कारणं भविष्यात मोठं संकट उभं करणार यात शंकाच नव्हती. अशावेळी एका तरुण काश्मिरी मुलीचं पाकिस्तानात लग्न होऊन जाणं, हे एका मोठ्या मिशनचा भाग होता. सेहमत नावाची ही तरुणी आपल्या वडिलांच्या इच्छेखातर पाकिस्तानातील वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याची सून होते. एक सर्वसामान्य मुलगी ते अत्यंत निडर अशी गुप्तहेर बनते, त्याची कहाणी म्हणजे कॉलिंग सेहमत. 

सेहमतचे वडील हे काश्मिरी मुस्लिम तर आई हिंदू आहे. दोघांच्या प्रेमकहाणीत फार खोलवर जरी शिरण्याचा मोह लेखकाने टाळला असला, तरी त्यांच्या प्रेमकथेचे वेगवेगळे पदर अगदी थोडक्या प्रसंगांतून अप्रतिम मांडले आहेत. सेहमतचं दिल्लीच महाविद्यालयीन आयुष्य मांडल्याने सहमतच्या स्वभावाचे कंगोरे समजून घेता येतात. सेहमतचे वडील हिदायत खान हे यशस्वी व्यावसायिक आहेत. त्यांचा व्यवसाय पाकिस्तानही फैलावला आहे. त्यानिमित्ताने ते सीमापार सहज ये-जा करू शकतात. पण त्याहीपेक्षा ते भारताच्या गुप्तचर संघटनेसाठी महत्त्वाच्या नेटवर्कचा हिस्सा असतात. मृत्यू जवळ आल्याचं निदान त्यांच्या आजारपणाच्या लक्षणाने होतं, त्यामुळे पुढची संकटं त्यांना एका निश्चयापर्यंत आणून पोहोचवतात.

पाकिस्तानात भारताविरोधात मोठी कारवाई होणार असल्याचं समजल्याने ते अस्वस्थ होतात. पण पाकिस्तान नेमकं काय करणार हे समजण्यासाठी त्यांना एक विश्वासू माणूस तिथे जायला हवा, असं वाटतं. त्यामुळेच ते ब्रिगेडियर शेख सईद यांचा मुलगा कॅप्टन इक्बाल याच्याशी सेहमतचा निकाह ठरवून टाकतात. अर्थात दिल्लीत शिकत असलेल्या सेहमतच्या आयुष्यात अभिनव ऊर्फ अॅबी आलेला असतो. पण वडिलांच्या आजारपणाने काश्मीरमध्ये परतलेली सेहमत वडिलांच्या इच्छेखातर विवाहाला तयार होते. हे लग्न म्हणजे तिच्यासाठी एक मोहीमच असते. 

सून म्हणून वावरताना घरातल्यांचा विश्वास संपादन करण्याचं काम करत असतानाच सेहमत प्रत्येक हालचालींवर नजर ठेवून राहते. अर्थात तिच्यावरही संशयाची सुई असते. सेहमत कोणत्याही भावनांना थारा न देता आपलं मिशन कसं पूर्ण करते, त्याची ही कहाणी आहे.
हरिंदर सिक्का यांनी आठ वर्षे मेहनत करून ही कादंबरी लिहिल्याचं समजतंय. त्यांची ही मेहनत या पुस्तकात दिसतेच. त्याचबरोबर सत्य घटना आणि कादंबरी असा मिलाफ करण्यातही त्यांना यश आले आहे. त्याहीपेक्षा ही कादंबरी उत्कंठावर्धक करण्याच्या नादात त्यांनी उगाच कल्पनाविलासात रमण्यात पाने खर्ची घातलेली नाहीत. अशा प्रकारच्या मोहिमांत सहभागी झालेल्या अनसंग हिरोंची दखल घेणं गरजेचं असतं. सिक्का यांचं स्वतः नौदलात असणं आणि त्यांनी सेहमतच्या देशप्रेमाची आणि धाडसाची दखल घेणं म्हणूनच महत्त्वपूर्ण आहे. 

typhoid health

आरोग्यमंत्र: टायफॉइडसाठी आरोग्यतपासण्या


7258   05-Jul-2018, Thu

टायफॉइड हा विषमज्वर, मुदतीचा ताप, आंत्रिक ज्वर अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. टायफॉइडचा ताप हा सर्व वयोगटात आढळून येतो. दूषित अन्न व पाणी यामुळे संक्रमित होणारा ताप 'salmonella Typhi, paratyphoid A B' या जीवाणूंच्या संसर्गामुळे होतो. हा जीवाणू केवळ मानवी शरीरामध्येच राहतो. रुग्णांचे रक्त व आतड्यात तो वाढू लागतो. संसर्गानंतर सहा ते तीस दिवसांत लक्षणे दिसू लागतात. अपूर्ण उपचार, अयोग्य निदान यामुळे काही व्यक्तीच्या शरीरात (आतड्यात) हे जीवाणू राहतात. अशी व्यक्ती 'वाहक' बनते. 

संसर्गित व वाहक व्यक्ती मल, मूत्र याद्वारे जीवाणू बाहेर टाकतात. अशा व्यक्तीने हाताळलेले अन्न खाणे तसेच दूषित पाणी यामुळे विषमज्वर संक्रमित होतो. संसर्गानंतर ताप, अंगदुखी, भूक कमी लागणे ही सर्वसामान्य लक्षणे आहेत. त्याबरोबरच गुलाबी रंगाचे पुरळ येणे, तापाच्या प्रमाणात चढ-उतार, अशक्तपणा ही लक्षणे पहिल्या आठवड्यात दिसतात. दुसऱ्या आठवड्यात थकवा अधिक वाढतो, ग्लानी येते, भूक अतिशय कमी लागते. तिसऱ्या आठवड्यात रक्तस्त्राव, मेंदू ज्वर, न्यूमोनिया होऊ शकतो.

निदान- 

वाइल्ड स्लाइड पद्धती - यात निदान लवकर होते, परंतु चुकीचे निष्कर्ष येण्याची शक्यता जास्त असते. 

वाइल्ड ट्युब पद्धती - या चाचणीचे निष्कर्ष येण्यासाठी १६- २४ तास लागतात. 

ब्लड कल्चर - तापाच्या पहिल्या आठवड्यात निदान होते. 

टायफॉइज आयजी, आयजीएम - या तपासण्या क्रोमॅटोग्राफी, एलिसा या तंत्रज्ञानाचा वापर करून केल्या जातात. 

-आजाराचे विशेष निदान करण्यासाठी लघवी, मलमूत्र, बोनमॅरो कल्चर तपासण्या केल्या जातात. 

उपचार -

टायफॉइडच्या आजारावर प्रभावी प्रतिजैविके उपलब्ध असून गरज भासल्यास रुग्णालयात दाखल करावे लागते. 

टायफॉइडचे लसीकरण - तोंडावाटे व इंजेक्शनच्या स्वरूपात उपलब्ध आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मतानुसार इंजेक्शनच्या माध्यमातून लसीकरण प्रभावी असते. 

टायफॉइड कसा टाळू शकतो? 

१) लसीकरण 

२) स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीची हात, नखे यांची स्वच्छता. 

३) अशुध्द बर्फ खाणे टाळावे 

४) ताजे शिजवलेले अन्न खावे. 

poison test

संशोधन संस्थायण : विषाची परीक्षा


8443   05-Jul-2018, Thu

भारतीय विषविज्ञान संशोधन संस्था, लखनौ

नवाबी शहर या नावाने भारतभर प्रसिद्ध असलेले आणि उत्तर प्रदेश राज्याची राजधानी असलेल्या लखनौ येथे असलेली इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टॉक्सिकॉलॉजी रिसर्च (आयआयटीआर) म्हणजेच भारतीय विषविज्ञान संशोधन संस्था.

विषह्ण हा शब्द म्हणजे तसा धडकीच भरवणारा, पण त्याचे विज्ञानातील महत्त्व मोठे आहे. म्हणूनच त्याविषयी संशोधन करण्यासाठी या संशोधन संस्थेची स्थापना १९६५ साली झाली आहे. तेव्हापासून देशाच्या सेवेमध्ये असणाऱ्या या संस्थेने टॉक्सिकॉलॉजी या विषयामध्ये वैविध्यपूर्ण व अभिनव संशोधन करून त्याचा सर्वसामान्यांपर्यंत प्रसार करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) अनेक संलग्न संशोधन संस्थांप्रमाणे आयआयटीआर हीदेखील सीएसआयआरशी संलग्न संस्था आहे.

 संस्थेविषयी –

‘‘स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या देशाच्या विकासासाठी औद्योगिकीकरण हे आवश्यक आहेच, मात्र त्या वेळी होत असलेल्या जलद औद्योगिकीकरणानंतर त्याचे प्रतिकूल परिणाम हे औद्योगिक कामगारांच्या आरोग्याशी निगडित असतील. तसेच, औद्योगिक क्षेत्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांचा एकूणच सर्वसामान्यांच्या आरोग्य व पर्यावरणावर होणारा परिणाम हा फक्त घातकच नसेल तर निश्चितच देशाच्या सर्वागीण विकासाला खीळ बसवणारा असू शकतो.’’ या सर्व गोष्टींची जाणीव असणारे द्रष्टे संशोधक प्रा. सिब्ते हसन झैदी यांना या सर्व प्रश्नांना संबोधित करण्याची गरज भासू लागली. त्यांच्या पुढाकाराने मग शाश्वत औद्योगिक विकासासाठी धोरणे विकसित व निश्चित करण्यासाठी व या सर्व बाबींचा आवश्यक तो अभ्यास होण्यासाठी आयआयटीआर या संस्थेची स्थापना करण्यात आली. भारतीय विषविज्ञान संशोधन संस्था या संशोधन संस्थेची स्थापना दि. ४ नोव्हेंबर १९६५ रोजी झाली. सुरुवातीला संस्थेचे नाव इंडस्ट्रियल टॉक्सिकॉलॉजी रिसर्च सेंटर असे होते. कालांतराने बदलून ते इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टॉक्सिकॉलॉजी रिसर्च असे करण्यात आले. संस्थेचे मुख्य केंद्र लखनौमध्ये असून दुसरे एक विस्तार केंद्र लखनौ-कानपूर महामार्गावरील घेरू नावाच्या खेडय़ाजवळ आहे. स्थापनेपासूनच संस्थेने पर्यावरण आणि आरोग्य या दोन महत्त्वाच्या क्षेत्रांना संशोधनाच्या माध्यमातून सुरक्षा पुरवणे व औद्योगिक क्षेत्रासाठी आवशयक त्या व्यावसायिक सेवा देणे या हेतूने संशोधन करण्यास सुरुवात केली. संस्थेने टॉक्सिकॉलॉजीमधील मूलभूत व उपयोजित संशोधनास अक्षरश वाहून घेतलेले आहे. संस्थेमध्ये चालत असलेल्या प्रमुख संशोधन विषयांकडे जरी पाहिले तरी हे लक्षात येते.

संशोधनातील योगदान –

टॉक्सिकॉलॉजीमध्ये पाच दशकांहूनही अधिक काळ संशोधन करत असलेली भारतीय विषविज्ञान संशोधन संस्था जागतिक स्तरावर आपली ओळख टिकवून आहे. संस्थेचे टॉक्सिकॉलॉजी या प्रमुख विषयातील एकूण ३,८०० शोधनिबंध आतापर्यंत प्रकाशित झालेले आहेत.

त्यासहितच संस्थेच्या नावावर एकूण २५ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पेटंट्स आहेत. संस्थेकडे जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळा असून तिच्या पायाभूत सुविधा अतिशय उत्तम आहेत. संस्थेने संशोधनातील विविध स्रोत वापरून बायोमार्कर डेव्हलपमेंट, अल्टरनेट टू अ‍ॅनिमल मॉडेल्स, मॅथॅमॅटिकल मॉडेिलग, डिटेक्शन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट मेथड्स फॉर टॉक्सिन्स, इंजिनीअर्ड नॅनोमटेरियल्स, जेनेटिकली मॉडिफाइड प्रोडक्ट्स इत्यादी बाबींमध्ये तंत्रज्ञान विकसित करून कौतुकास्पद पाऊल उचलले आहे.

ओईसीडी, यूएसईपीए, बीआयए आणि आयएसओ इत्यादी संस्थांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आयआयटीआर ही संस्था संशोधनाव्यतिरिक्त सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांमधील उद्योगांना रसायने वा तत्सम उत्पादनांच्या विषारी आणि विश्लेषणात्मक मूल्यांकनाची सेवादेखील बहाल करते. आयआयटीआरमध्ये सध्या संशोधन होत असलेल्या विषयांमध्ये एन्व्हायर्नमेंटल टॉक्सिकॉलॉजी, ग्राउंड अ‍ॅण्ड सरफेस वॉटर पोल्युशन, सेफ्टी असेसमेंट ऑफ फूड अ‍ॅण्ड अ‍ॅडिटिव्ह्ज, टॉक्सिकिटी इव्हॅल्युएशन ऑफ सबस्टन्सेस फॉर ह्युमन यूझ, मायक्रोबियल कंटॅमिनेशन, बायोरेमीडियेशन, हॅझर्ड आयडेंटिफिकेशन अ‍ॅण्ड टॉक्झिकोजिनोमिक्स, इम्युनोटॉक्सिकॉलॉजी, न्यूरोटॉक्सिकॉलॉजी, फूड टॉक्सिकॉलॉजी, एन्व्हायर्नमेंटल मायक्रोबायोलॉजी आणि कार्सनिोजेनिसिस या विषयांचा समावेश आहे. आपल्या या अशा वैविध्यपूर्ण संशोधनामुळेच कदाचित ही संशोधन संस्था भारतातील सर्व संशोधक विद्यार्थ्यांना आकर्षति करते.

 विद्यार्थ्यांसाठी संधी –

सीएसआयआरच्या तत्त्वप्रणालीनुसार आयआयटीआरमध्ये Academy of Scientific & Innovative Research (AcSIR) च्या अंतर्गत पदव्युत्तर, पीएचडी व पोस्ट डॉक्टरल संशोधन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पूर्ण करता येतात. आयआयटीआरने विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर, पीएचडी व पोस्ट डॉक्टरल स्तरावर संशोधन अभ्यासक्रम तयार केलेले आहेत. यामध्ये वर उल्लेख केलेल्या विविध संशोधन विषयांमधील पीएचडी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. दरवर्षी अनेक अभियांत्रिकी व विज्ञान शाखांमधील अनेक विद्यार्थी येथे त्यांचे पदवी, पदव्युत्तर, पीएचडी स्तरावरील संशोधन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी इथे येत असतात.

admiral  jayant nadkarni

अ‍ॅडमिरल जयंत नाडकर्णी


7054   04-Jul-2018, Wed

स्वातंत्र्यानंतर ध्येयवादी व्यक्तींनी भारताला लष्करी पातळीवर सक्षम करण्याच्या उद्देशाने नावीन्यपूर्ण आराखडा, योजना तयार करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नांना अनेकांची साथ मिळाली. या सामूहिक प्रयत्नांमुळे भारतीय नौदल आज निळ्या पाण्यातील नौदल म्हणून नावारूपास येण्याची क्षमता राखून आहे. नौदलाने आपले प्रभुत्व कधीच सिद्ध केले आहे. या वाटचालीत ज्या व्यक्तींचे महत्त्वाचे योगदान लाभले, त्यांत नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल जयंत नाडकर्णी (निवृत्त) यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. त्यांचे नुकतेच निधन झाले.

डिसेंबर १९८७ ते नोव्हेंबर १९९० या कालावधीत त्यांनी नौदलाचे नेतृत्व केले. सैन्य दलात कोणतीही सामग्री वर्षांनुवर्षे विचारविनिमय केल्याशिवाय समाविष्ट होत नाही. नौदलास विशिष्ट सामग्रीची गरज असल्याची कल्पना पुढे येणे, तिची उपयोगिता अन् निकड यावर बरेच मंथन होते. खरेदी प्रक्रियेतील कालापव्यय वेगळाच. याचा विचार केल्यास दोन ते तीन दशकांपूर्वी मांडले गेलेले प्रस्ताव, योजना आणि मुहूर्तमेढ रोवलेले प्रकल्प सध्या प्रत्यक्षात येताना दिसतात. भविष्यातील आव्हाने तत्कालीन नौदल प्रमुखांच्या दूरदृष्टीने जोखली होती.

नौदलाची वाढणारी शक्ती हे त्याचे फलित होय. नाडकर्णी यांचा जन्म ५ डिसेंबर १९३१ रोजी झाला. वेलिंग्टनच्या संरक्षण दल-अधिकाऱ्यांसाठी असणाऱ्या महाविद्यालयाचे ते पदवीधर. तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर डफरीन येथून विशेष प्रावीण्य श्रेणीत त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले. मार्च १९४९ रोजी ते ‘रॉयल इंडियन नेव्ही’त दाखल झाले. प्राथमिक प्रशिक्षण ब्रिटिश नौदल महाविद्यालयात झाले. ‘रॉयल इंडियन नेव्ही’च्या ताफ्यातील युद्धनौकांचे प्रशिक्षण त्यांनी घेतले.

नौकानयन आणि दिशादर्शनशास्त्र यात विशेष अभ्यास करून ते पारंगत झाले. नौदलातील चार दशकांच्या सेवेत नाडकर्णी यांनी अनेक महत्त्वपूर्ण पदांची जबाबदारी सांभाळली. त्यामध्ये युद्ध कार्यवाहीसाठी सज्ज असणाऱ्या नौदल तळांसह प्रशिक्षण आणि आस्थापना विभागाचाही अंतर्भाव आहे. आयएनएस तलवार, आयएनएस दिल्ली यासह नौदलाच्या पश्चिम विभागाची धुराही त्यांनी सांभाळली.

गोवा मुक्तिसंग्राम, भारत-पाकिस्तानदरम्यानच्या १९६५ आणि १९७१ च्या युद्धात त्यांचा सहभाग राहिला. सागरी युद्धात आघाडीवर राहणारे नाडकर्णी हे ज्ञानदानातही रमले. नवी दिल्लीच्या राष्ट्रीय संरक्षणशास्त्र महाविद्यालयात मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले. नौदल मुख्यालयात वेगवेगळ्या पदांवर यशस्वीपणे काम केले. पुढे उपप्रमुख आणि प्रमुख म्हणून काम करताना त्यांनी भारतीय नौदलाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

सर्वोत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन नाडकर्णी यांना परम विशिष्ट सेवा पदक, नौसेना पदक आणि विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले. देशाला तब्बल साडेसात हजार कि.मी.हून अधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. भारताचे भौगोलिक स्थान इतके महत्त्वपूर्ण की, जगातील सर्वाधिक व्यग्र अशा जलमार्गावर त्याची नियंत्रण राखण्याची क्षमता आहे. देशाचा जवळपास ९० टक्के व्यापार हा सागरी मार्गाने होतो. सागरी सीमांच्या रक्षणाबरोबर व्यापारी जहाजांचे मार्ग सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी भारतीय नौदलावर आहे. ही जबाबदारी लक्षात घेऊन नियोजनाचे दायित्व नाडकर्णी यांनी प्रभावीपणे पार पाडले.

PRITI TANEJA

प्रीती तनेजा


4209   02-Jul-2018, Mon

इराक, जॉर्डन, रवांडा, कोसोवो येथे त्यांनी मानवी हक्क वार्ताहर म्हणून काम केले.

भारतीय वंशाच्या तरुण लेखिकांपैकी एक म्हणजे प्रीती तनेजा. त्यांच्या ‘वुइ दॅट आर यंग’ या पुस्तकाला नुकताच डेस्मंड एलियट पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार १० हजार पौंडांचा आहे. लेखकाच्या पहिल्या इंग्रजी कादंबरीकरिता हा पुरस्कार दिला जातो.

तनेजा यांच्या या पहिल्याच पुस्तकातील भाषा, एकाच वेळी विविध विषयांची आंतरिक गुंफण वेगळीच म्हणावी अशी आहे. शेक्सपीअरच्या ‘किंग लियर’ या शोकांतिकेवर आधारित ही कादंबरी असली तरी त्यात आताच्या काळातील पाश्र्वभूमी आहे. यातील सगळा परिप्रेक्ष्य दिल्लीतील आहे. प्रीती तनेजा यांचा जन्म इंग्लंडमधला, आईवडील दोघेही भारतीय. त्यांच्या बालपणातील सगळ्या सुट्टय़ा दिल्लीत गेल्या. इराक, जॉर्डन, रवांडा, कोसोवो येथे त्यांनी मानवी हक्क वार्ताहर म्हणून काम केले. त्यांचे लेखन ‘द गार्डियन’ व ‘ओपन डेमोक्रसी’ यातून प्रसिद्ध झाले आहे. वॉरविक विद्यापीठाच्या त्या स्नातक असून २०१४ मध्ये त्यांच्या ‘कुमकुम मल्होत्रा’ या कादंबरीस गेटहाऊस प्रेस न्यू फिक्शन पुरस्कार मिळाला होता.

व्हिज्युअल व्हर्सच्या संपादक व नव्या जगातील तरुण विचारवंत अशी त्यांची ओळख आहे. ‘वुई दॅट आर यंग’ या त्यांच्या कादंबरीत भारतातील राजकारणाबरोबरच नवी दिल्लीपासून काश्मीपर्यंतचा पैस आहे. वसाहतवाद, विषारी पुरुषी मानसिकता, नव्या पिढीचे वयात येणे असे अनेक आयाम गाठणाऱ्या या कादंबरीला झलक प्राइज व फोलिओ प्राइज हे दोन पुरस्कार आधीच मिळाले आहेत.

‘किंग लियर’प्रमाणेच या कादंबरीत तुटलेले संबंध हा मध्यवर्ती विषय ठेवून २०११ मधील भारतामध्ये उभे राहिलेले भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, तणावग्रस्त परिवार यांची पाश्र्वभूमी घेतली आहे. परिवाराचे मुख्य देवराज हे त्यांच्या कंपनीचे नियंत्रण गार्गी, राधा व सीता या तीन मुलींकडे सोपवतात, त्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया व नंतरचा घटनाक्रम त्यात पाहण्यासारखा आहे. ही कादंबरी आता अमेरिका व कॅनडातही प्रसिद्ध होणार आहे; पण त्याआधीच फ्रान्स, डेन्मार्क, इस्रायल व जर्मनी या देशांत त्यांच्या भाषांमध्ये हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.

तनेजा या  इंग्लंडमध्य वंचितांसाठी काम करीत आहेत. ‘लर्निग टुगेदर’च्या माध्यमातून त्या केम्ब्रिज विद्यापीठाच्या जीझस कॉलेजमधील उपक्रमात कैद्यांना लेखनाचे धडे देत आहेत. बेन क्रो यांच्याबरोबर एरा फिल्म्ससाठी काम करताना त्यांनी रवांडातील वांशिक हत्याकांड, नैरोबीच्या झोपडपट्टीतील स्त्रियांचे जीवन, स्थलांतरित कामगारांच्या दर्दभऱ्या कहाण्या त्यांनी जवळून पाहिल्या, त्यामुळे त्यांच्या लेखनाला वास्तव जीवनानुभवांचा स्पर्श असल्याने ते अधिक प्रभावी ठरले आहे.


Top