99th All India Marathi Natya Sammelan in Nagpur will be held in Nagpur

 1. 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या आयोजनाचा मान नागपूरला मिळाला आहे. 22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान हे संमेलन रंगणार आहे.
 2. संमेलनाच्या आयोजनासाठी प्रस्ताव सादर केलेल्या राज्यातील सात इच्छुक संस्था आणि शाखांनी माघार घेतल्यामुळे लातूर व नागपूर या दोन पैकी कुठल्या स्थळावर शिक्कामोर्तब होणार? याकडे नाट्यवर्तुळाचे लक्ष लागले होते.
 3. अखेर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची मायभूमी असलेल्या नागपूर या स्थळाला गुरूवारी हिरवा कंदिल दाखविला.
 4. आगामी ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या आयोजनासाठी नागपूर, महाबळेश्वर, चिपळूण, पिंपरी चिंचवड, उस्मानाबाद, कोल्हापूर, लातूर, नाशिक आणि सोलापूर अशा राज्यभरातील इच्छुक संस्था आणि शाखांकडून तब्बल ९ निमंत्रणे आल्याने संमेलनाला काहीसे ‘अच्छे दिन’ आले होते.
 5. मात्र पुढील वर्षीचा निवडणुकीचा हंगाम पाहता सात संस्था आणि शाखांनी प्रस्ताव मागे घेतल्यामुळे केवळ लातूर आणि नागपूर या दोन स्थळांचा विचार होणार आहे.
 6. संमेलन आयोजनाच्या शर्यतीत असलेल्या लातूरकरांनीच दुष्काळाची पार्श्वभूमी पाहता प्रस्ताव मागे घेतल्यामुळे नागपूरकरांना संमेलन आयोजनाचा मान मिळाला असल्याचे समजते. नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
 7. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची ही मायभूमी आहे.
 8. नागपूरकरांना संमेलनाचा मान मिळाल्यामुळे निवडणुकीच्या हंगामात संमेलनातच राजकीय शक्तीप्रदर्शन करण्याची संधी चालून आली आहे.
 9. यातच मध्यवर्ती नाट्य परिषदेला संमेलनाचा दर्जाही टिकवून ठेवायचा आहे, या दोन्ही गोष्टी या आयोजनातून साध्य होणार असल्याची कुजबुज ऐकायला मिळत आहे.
 10. विशेष म्हणजे, यंदाचे साहित्य आणि नाट्य संमेलन दोन्हीही विदर्भात होत आहे. त्यामुळे साहित्य आणि नाट्य या दोन्हींचा आस्वाद विदर्भवासियांना घेता येणार आहे.


Aurangabad district is leading in district investment

 1. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या  (डीएमआयसी)  माध्यमातून  देशात उभारण्यात येत असलेल्या चार औद्योगिक शहरांमध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद गुंतवणुकीच्या बाबतीत अग्रेसर ठरले आहे.
 2. आतापर्यंत 50 भूखंड वितरणाच्या माध्यमातून 3600 कोटींची गुंतवणूक पटकाविण्यात शेंद्रा येथील औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी यशस्वी ठरली आहे.
 3. ‘डीएमआयसी’च्या माध्यमातून या दोन शहरांदरम्यान चार औद्योगिक क्षेत्रांच्या उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे.
 4. यामध्ये ग्रेटर नोयडा (दिल्ली), उज्जैन (मध्य प्रदेश), ढोलेरा (गुजरात), शेंद्रा-बिडकीन (महाराष्ट्र) या ठिकाणी औद्योगिक शहरे उभारण्याचे काम तीन ते चार वर्षांपासून सुरू आहे.
 5. यादरम्यान पहिल्या टप्प्यातील कामे हाती घेऊन उद्योगांना आमंत्रित करण्याचा सिलसिला सुरू झाला.
 6. या आवाहनांना प्रतिसाद देत औरंगाबादलगत अस्तित्वात आलेल्या शेंद्रा येथील औद्योगिक शहराला गुंतवणुकीसाठी पसंती दिली आहे.
 7. ‘डीएमआयसी’च्या तिन्ही शहरांना भूखंड वितरणाचा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.
  1. उज्जैनच्या विक्रम उद्योगपुरीमध्ये दोन (भूखंडांचे क्षेत्रफळ – 160,030 चौ.मी.),
  2. गुजरातची ढोलेरा इंडस्ट्रियल सिटी (भूखंडांचे क्षेत्रफळ – 161,874 चौ.मी.)
  3. ग्रेटर नोएडा (भूखंडांचे क्षेत्रफळ – 554,406 चौ.मी.) येथे प्रत्येकी तीन,
  4. औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी (ऑरिक) मध्ये 507,164 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या 50 भूखंडांची वितरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे.


Bala Rafiq Shaikh win title of Maharashtra Kesari

 1. गुणांच्या जोरावर बुलडाण्याच्या बाला रफिक शेखने गतविजेता अभिजित कटकेला पराभूत केले. सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्यात अभिजितला अपयश आले. 11-3 अशा गुणाने त्याने अभिजितला पराभूत केले.
 2. लढतीच्या सुरुवातीलाच अभिजितने एक गुणांची कमाई केली होती. आक्रमक सुरुवातीमुळे सामना अटीतटीचा होईल असे वाटले होते.
 3. परंतु, नंतर बाला रफिकने ताकदीच्या आणि अनुभवाच्या जोरावर गुणांची वसुली केली. बालारफीने आक्रमक धोरण स्वीकारल्यानंतर अभिजितला पुनरागनाची संधीच लाभली नाही.
 4. बुलडाण्याचा बाला रफिक पुण्यातील हनुमान आखाड्याचा मल्ल आहे. बाला रफिकने उपांत्य फेरीत रत्नागिरीच्या संतोष दोरवडला पराभूत केले. तर अभिजितने सोलापूरच्या रवींद्रला चीतपट केले होते.
 5. तसेच बाला रफिक शेखने तिसऱ्या प्रयत्नात महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले होते.
 6. बाला रफिकने मानाची गदा पटकावल्यानंतर त्याचे 65 वर्षीय वडील आझम शेख यांना आनंदाश्रू आवरणे कठीण झाले होते.
 7. त्यांना हा आनंद शब्दात सांगता येत नव्हता. अत्यंत भावुक होऊन त्यांनी मुलाच्या विजयी उत्सव साजरा केला.


State Level Award for Koyna Bhawan for Excellent Dam Management

 1. महाराष्ट्रातील “कोयना धरण” हे मोठ्या व महत्वाच्या धरणांपैकी एक धरण आहे. सह्याद्री पर्वतरांगेत असलेल्या महाबळेश्वर येथुन उगम पावणाऱ्या कोयना नदीवर सन १९५४ ते १९६४ या कालावधीमध्ये हे धरण बांधण्यात आले आहे.
 2. या धरणातील पाणी जलविद्युत निर्मितीसाठी तसेच सिंचनासाठी वापरण्यात येत असून जलविद्युत प्रकल्पाची स्थापित विद्युत निर्मिती क्षमता १९६० मेगावॅट एवढी आहे.
 3. धरणातून होणाऱ्या उर्जा निर्मितीमुळे आपल्या राज्यामध्ये औद्योगिक विकास होण्यास हातभार लागला आहे. त्यामुळेच या धरणाला “महाराष्ट्राची भाग्यरेषा” असे म्हटले जाते.
 4. “केंद्रिय सिंचन आणि उर्जा मंडळ” (Central Board Of Irrigation And Power ) या संस्थेने सन २०१८ सालचा “उत्कृष्ट धरण व्यवस्थापनासाठीचा” देशपातळीवरचा पुरस्कार कोयना धरणास जाहीर केला आहे.
 5. या संस्थेमार्फत १९२७ पासून जल आणि विद्युत क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या विभागांना / संस्थांना गौरविण्यात येत आहे. 
 6. कोयना धरणाची लांबी ८०७ मीटर असून उंची १०३ मीटर आहे. धरणाची पाणीसाठवण क्षमता २९८१ दलघमी (१०५ टीएमसी) एवढी आहे.
 7. या धरणामुळे ८९२ वर्ग किलोमीटर क्षेत्रावर पसरलेला जलाशय निर्माण झाला असून त्याला “शिवाजीसागर” या नावाने ओळखले जाते.
 8. धरणातून पूराचे पाणी सोडण्यासाठी ६ वक्राकार दरवाजे बसविण्यात आले असून या धरणामुळे पूरनियंत्रण होण्यास हातभार लागला आहे. 
 9. दि. १० डिसेंवर १९६७ रोजी कोयनानगर येथे ६.३ रिक्टर क्षमतेचा भुकंप झाल्यामुळे कोयना धरणाला तडे गेले होते.
 10. तेव्हापासून  राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर “जलाशय प्रेरित भूकंप” (Reservoir Induced Seismicity) वर संशोधनास सुरुवात झाली आहे.
 11. सन १९६८ मध्ये धरणास पडलेल्या भेगा ग्राऊटिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बुजविण्यात आल्या होत्या. त्यानंतर सन १९७३ मध्ये या धरणाचा अपरिवाह (non-overflow) भागाचे तर सन २००६ मध्ये परिवाह (overflow) भागाचे मजबुतीकरणाचे काम करण्यात आले होते. अशा प्रकारे धरण पुर्णपणे भुकंपरोधीत करण्यात आले आहे.
 12. धरणाचे बांधकाम होऊन आता ५५ वर्ष झाले आहेत तर कोयना भुकंपाला देखील ५० वर्ष झाले आहेत.
 13. केंद्रिय सिंचन आणि उर्जा मंडळामार्फत कोयना धरणास देण्यात आलेला पुरस्कार हा गेल्या ५० वर्षात धरणाची निगा उत्कृष्ट पध्दतीने राखल्याने (Best Maintained functional Project for more than 50 years) देण्यात आला आहे. 
 14. धरणाचा इतिहास -
  1. १९ व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच या धरणाच्या सर्व्हेक्षणाला सुरुवात झाली होती.
  2. १९१८ नंतर पहिले जागतिक महायुध्द संपल्यानंतर टाटा कंपनीने कोयना प्रकल्प बांधण्यासाठी सर्व्हेक्षण सुरु केले. मात्र त्यानंतर १९२८ च्या जागतिक मंदीमुळे हा प्रकल्प रेंगाळला.
  3. १९४७ साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प हाती घ्यायचे ठरवले. त्यासाठी सन १९५१ मद्ये कोयना धरण विभाग सुरु करण्यात आला.
  4. सन १९५३ मध्ये प्रकल्पास मान्यता मिळाली आणि सन १९५४ मध्ये बांधकामास सुरुवात झाली. धरणाचे बांधकाम १९६४ मध्ये पूर्ण करण्यात आले.
  5. या प्रकल्पांतर्गत चार धरणे बांधण्यात आली आहेत. त्यापैकी कोयना धरण आणि कोळकेवाडी धरण ही दोन मोठी धरणे आहेत. कोयना धरणातील पाण्याचा वापर करून पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील विद्युतनिर्मिती केंद्रांद्वारे उर्जा निर्मिती करण्यात येते. त्यासाठी बोगद्याद्वारे पाणी जलविदुत केंद्रामध्ये आणले जाते.
  6. या तीनही टप्प्यातून जलविद्युत निर्मिती झाल्यानंतर बाहेर पडणारे पाणी कोळकेवाडी धरणात साठवले जाते. त्यानंतर कोळकेवाडी धरणातील पाणी तिसऱ्या टप्प्यातील जलविद्युत केंद्रात उर्जा निर्मिती करिता वापरले जाते. त्यानंतर हे पाणी  वशिष्टी नदीद्वारे अरबी समुद्राला जाऊन मिळते. 
  7. या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे या प्रकल्पातील पाणी जलविद्युत निर्मितीसाठी वापरण्यासाठी दोन वेळा (सन २००२ मध्ये व सन २०१५ मध्ये) लेक टॅपिंग करण्यात आले व हा देशातीलच नव्हे तर अशिया खंडातील पहिलाच प्रयोग होता व दोन्ही लेक टॅप यशस्वी झाले आहेत.
  8. केंद्रिय सिंचन आणि उर्जा मंडळामार्फत सन २०१८ सालचा “उत्कृष्ट धरण व्यवस्थापनासाठीचा” देशपातळीवरचा पुरस्कार कोयना धरणाला जाहीर होणे ही आपल्या राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. 


'Late Smita Patil Smriti Award 2018' declared to Mukta Barve

 1. स्मिता पाटील यांच्या ३२व्या पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने दुसरा ‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’ जाहीर झाला आहे. 
 2. मराठी भाषेचा ‘उंबरठा’ ओलांडत सशक्त अभिनयाने हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या, तरल आणि संवेदनशील अभिनयाचा आविष्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या ३२व्या पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने दुसरा ‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’ जाहीर झाला आहे.
 3. हा पुरस्कार त्यांच्या सशक्त अभिनयाने गाजलेल्या व ४० वर्ष पूर्ण केलेल्या ‘जैत रे जैत’ या चित्रपटाला जाहीर झाला आहे.
 4. तसेच ‘स्वर्गीय स्मिता पाटील कौतुक पुरस्कार २०१८’ हा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मुंबई पुणे मुंबई-३’ या चित्रपटाची अभिनेत्री मुक्ता बर्वेला प्रदान करण्यात येणार आहे.
 5.  शनिवार, दिनांक १५ डिसेंबर २०१८ला  दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात ‘जैत रे जैत’ चित्रपटाचे दिग्दर्शक जब्बार पटेल, चित्रपटाचे संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, चित्रपटाची निर्माती उषा मंगेशकर आणि चित्रपटात काम केलेले अभिनेते मोहन आगाशे या मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
 6. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
 7. या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये स्मिता पाटीलयांच्या गाजलेल्या ‘जैत रे जैत’ आणि ‘उंबरठा’ चित्रपटांविषयी या सर्व मान्यवरांमध्ये परिसंवाद रंगणार आहे.
 8. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन स्मिता गवाणकर करणार असून पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर स्मिताच्या स्मृतीखातर जीवनगाणीने खास निर्माण केलेला मूर्तीमंत ‘अस्मिता’ हा रसिकमान्य कार्यक्रम सादर केला जाईल.
 9. अर्चना गोरे, सोनाली कर्णिक आणि मंदार आपटे हे गायक कलाकार स्मिता पाटील यांच्या गाजलेल्या ‘जैत रे जैत’ आणि ‘उंबरठा’ या दोन चित्रपटातील गाणी सादर करणार आहेत.
 10. याला संगीत संयोजन आनंद सहस्रबुद्धे यांचे असणार आहे. ‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार’ सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे.
 11.  स्मिता पाटील या प्रतिभावंत कलाकारावर रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं.
 12. तिच्या चित्रपटांना आणि अविस्मरणीय अभिनयाला रसिकांनी मनापासून दाद दिली. तिला पद्मश्रीसहीत अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले.
 13. पहिला ‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१७’ हा जेष्ठ अभिनेत्री रेखा यांना आणि पहिला ‘स्वर्गीय स्मिता पाटील कौतुक पुरस्कार २०१७’ अभिनेत्री अमृता सुभाष यांना देण्यात आला होता.
 14.  रुपेरी पडद्यावर भारतीय स्त्रीची पर्यायी प्रतिमा साकारणारी सक्षम अभिनेत्री म्हणून स्मिता पाटील यांचे चित्रपटसृष्टीच्या इतिहासात वेगळं स्थान आहे.
 15. अल्पायुषी ठरलेल्या स्मिता पाटील यांनी विविध व्यक्तिरेखांच्या संवेदना व त्यांचं व्यक्तिमत्व इतक्या प्रभावीपणे आणि सूक्ष्म बारकाव्यांसह अभिव्यक्त केलं की त्यामुळे पडद्यावरील सौंदर्याच्या रुढ संकल्पना दुय्यम ठरल्या.


Seventh Pay Commission will take effect from January first

 1. मराठा आरक्षणानंतर राज्य सरकारने दुसरा मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी आनंदाची बातमी दिली आहे.
 2. येत्या एक जानेवारी 2019 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे.
 3. विधानपरिषदेत आमदार कपिल पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर उत्तर दिले आहे.
 4. सरकारच्या निर्णयामुळे 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि सहा लाख निवृत्त  कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
 5. केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक जानेवारी 2016 पासून सातवा सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. केंद्राने लागू केला तेव्हापासून राज्यात देखील सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा यासाठी काही  कर्मचारी संघटनांनी आंदोलन केले होते.
 6. त्यावर सरकारने के.पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती.
 7. येत्या 5 डिसेंबरला के.पी. बक्षी समिती अहवाल सादर करणार असून सातवा वेतन आयोग मात्र येत्या एक जानेवारी 2019 लागू करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री केसरकर यांनी सांगितले.


16 percent reservation for Maratha community: Bill in Legislative Assembly unanimously approved

 1. मराठा समाजाला स्वतंत्र 16 टक्के आरक्षण देण्याचं विधेयक महाराष्ट्र विधानसभेत एकमताने मंजूर झालं आहे.
 2. मुख्यमंत्र्यांनी विधान सभेत हे विधेयक मांडल्यानंतर विरोधी पक्षांनी त्याला एकमताने पाठिंबा दिला आहे.
 3. आता हे विधेयक मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत मांडलं आहे.
 4. गुरुवारी सकाळपासूनच संपूर्ण राज्याचे लक्ष याकडे लागून होते.
 5. राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीच्या अहवालातील निष्कर्षांचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी बारा वाजता सभागृहात ठेवला.
 6. यावेळी काही सदस्यांनी 'मराठा समाजाचा विजय असो', अशा घोषणा देण्यात आल्या.


Premanand Gajvi presidents of the Marathi Natya Sammelan

 1. 99व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी यांची निवड करण्यात आली आहे.
 2. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
 3. संमेलनाध्यक्षपदासाठी श्रीनिवास भणगे, अशोक समेळ, सुनील साकोळकर ही नावे चर्चेत होती. मात्र प्रेमानंद गज्वी यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.
 4. याची घोषणा 23 नोव्हेंबर रोजी माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या तालीम हॉल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी केली.
 5. 99व्या नाट्य संमेलनाच्या स्थळासाठी परिषदेकडे 12 ठिकाणांहून प्रस्ताव आले.
 6. त्यापैकी नागपूर, लातूर, पिंपरी-चिंचवड या ठिकाणांचा अंतिम टप्प्यात विचार करण्यात आला. वरील ठिकाणांपैकी एक नाव जाहीर होण्याची शक्‍यता आहे.
 7. नाट्य संमेलन समिती या ठिकाणांचा दौरा करून संमेलनाचे अंतिम ठिकाण लवकरच जाहीर करेल.
 8. संमेलन फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान होईल, अशी माहिती प्रसाद कांबळी यांनी दिली.


The Maharashtra government has approved the bill to change the law of adulteration

 1. महाराष्ट्र राज्य सरकारने भेसळ रोखण्यासाठीच्या कायद्याला अधिक कडक करीत त्यात बदल करण्यासाठी नवे विधेयक संमत करण्यात आले आहे.
 2. हे विधेयक भेसळ रोखण्यासाठी व भेसळ करणाऱ्या व्यक्ती, आस्थापना यांच्याविरोधात ‘भारतीय दंड संहिता-1860’च्या कलम 272 व 273 मध्ये सुधारणा करणारे आहे.
 3. दूध किंवा अन्य खाद्यपदार्थांमध्ये भेसळसंबंधी सर्व गुन्हे दखलपात्र आणि अजामीनपात्र ठरविण्यात आले आहेत.
 4. अशा गुन्ह्यांमध्ये दोषीला आजन्म कारावासाची शिक्षा देण्याची कायदेशीर तरतूद करण्यात आली आहे.
 5. दुधात युरिया, ग्लुकोज, चरबी, कॉस्टिक सोडा तसेच गोडेतेलापासून पाण्यापर्यंत तऱ्हे-तऱ्हेची भेसळ होत असल्यामुळे मानवी आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो.


Another mega food park in the state of Maharashtra, Aurangabad

 1. महाराष्ट्रातले दुसरे मेगा फूड पार्क औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यात वाहेगाव आणि धनगांव या गावांमध्ये उभारण्यात आले आहे. 
 2. ‘पैठण मेगा फूड पार्क’साठी 124.52 कोटी रुपये खर्च आला असून ते 102 एकर भूखंडावर उभारण्यात आले आहे.
 3. यामध्ये ड्राय वेअरहाऊस, कोल्ड स्टोरेज, प्रि-कुलिंग, रायपनिंग चेंबर्स, फ्रीझर रुम, अन्न तपासणी प्रयोगशाळा, दुधाचे टँकर्स आदी सुविधा उपलब्ध आहेत.
 4. राज्यातल्या तिसऱ्या मेगा फूड पार्कलाही मंत्रालयाने मंजुरी दिली असून ते वर्धा जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे.
 5. राज्यातले पहिले मेगा फूड पार्क सातारा जिल्ह्यात आहे.
 6. भारत सरकारच्या केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या मेगा फूड पार्क योजनेच्या अंतर्गत प्रत्येक मेगा फूड पार्क प्रकल्पाला 50 कोटी रुपयांपर्यंतचे आर्थिक सहाय्य दिले जात आहे.
 7. मेगा फूड पार्क ही योजना "समूह" पध्दतीवर आधारित आहे. 
 8. पार्कमध्ये विशेषत: पुरवठा साखळीसाठी पायाभूत सुविधा, ज्यामध्ये संकलन केंद्रे, प्राथमिक प्रक्रिया केंद्रे, केंद्रीय प्रक्रिया केंद्रे, शीतसाखळी आणि उद्योजकांसाठी 30-35 पूर्ण विकसित भूखंडासकट अन्नप्रक्रिया उद्योग उभारण्याची सोय असते.
 9. मेगा फूड पार्क प्रकल्प स्पेशल पर्पज व्हेईकल (SPV) द्वारे चालवले जातात, जे कंपनी कायद्यांतर्गत नोंदणीकृत कॉर्पोरेट मंडळ असतात. 


Top