1. कोल्हापूरजवळील जयसिंगपूर येथे २२ ते २४ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या २२व्या अखिल भारतीय मराठी जैन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डोंबिवलीतील प्रथितयश लेखिका लीला शहा यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे हा डोंबिवलीकरांचा विशेष सन्मान असल्याचे बोलले जात आहे.
  2. महाराष्ट्र जैन साहित्य परिषद लक्ष्मीसेन महाराज यांच्यातर्फे जैन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शहा यांची निवड करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. समितीचे श्रीधर हिरवडे, डी.ए. पाटील, रावसाहेब पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. त्यांनी हा निर्णय शहा यांना कळवला आहे.
  3. शहा यांचा जन्म १९३५ मध्ये झाला. त्यांची मातृभाषा ही गुजराती असली तरी त्यांच्या सात पिढ्यांचा संपर्क हा मराठीशी आहे. त्यामुळे त्यांचे मराठी भाषेतून विपुल लेखन झाले आहे. शहा यांनी पहिली कविता १९५३ मध्ये लिहिली. त्यांनी लिहिलेली अल्बर्ट श्वाईट्झर, राजेंद्र सिंह आणि कविता पर्यावरणाच्या आणि नवं विचाराच्या या पुस्तकांना राज्य सरकारचे साहित्य पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी लिहिलेल्या ‘प्रकाश यात्रा’ या पुस्तकाला जैन साहित्याचा पुरस्कार मिळाला आहे. त्याची प्रस्तावना ज्येष्ठ साहित्यिक विजय तेंडुलकर यांनी लिहिली होती. १९८३ मध्ये त्यांचा खरा साहित्य लेखन प्रवास सुरू झाला.
  4. त्यांचे पुस्तक लिहून प्रसिद्ध होण्यास १९८८ साल उजाडले. त्यांनी लिहिलेल्या ‘गीत ज्ञानेश्वर’ या पुस्तकास कुसुमाग्रज यांनी प्रस्तावना लिहिली होती. त्यांच्या ‘बाईच्या डायऱ्या’ या पुस्तकाच्या २०० प्रति हातोहात खपल्या आहेत. त्याला वाचकवर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कथा, कविता आणि सांगीतिक शोध निबंध शहा यांनी लिहिले आहेत.
  5. जैन साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद यापूर्वी सुरेखा शहा व शरयू दप्तरी यांनी भूषवले आहे. त्यांच्यानंतर शहा यांना हा बहुमान मिळाला आहे. जैन साहित्य मराठीतून लिहिणारे चांगले लेखक आहेत. जैन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शहा यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच त्यांची निवड केल्याबद्दल निवड समितीचे आभार मानले आहेत.


  1. भारताच्या महम्मद अनास व निर्मला शेरॉन यांनी अनुक्रमे पुरुष व महिला विभागात ४०० मीटर धावण्याची शर्यत जिंकली आणि २२व्या आशियाई मैदानी स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केली. पाठोपाठ अजय कुमार व पी.यू.चित्रा यांनी अनुक्रमे पुरुष व महिला विभागात १५०० मीटर धावण्याची शर्यतजिंकली. भारतीय धावपटूंनी एकंदर सुवर्णपदकांची कमाई करीत आपले वर्चस्व सिद्ध केले. भारताने आतापर्यंत सहा सुवर्ण, दोन रौप्य व सहा कांस्य अशी चौदा पदके मिळवली आहेत आणि पदक तालिकेत अव्वल स्थान राखले आहे.
  2. राजीव आरोकियाने पुरुषांच्या ४०० मीटर शर्यतीत रौप्यपदक मिळवले, तर जिस्ना मॅथ्यूने महिलांच्या विभागात याच शर्यतीत अनुक्रमे कांस्यपदकाची कमाई केली. लिंग निदान चाचणीचे दडपण असलेल्या द्युती चंदने १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक मिळवले.
  3. २१ वर्षीय निर्मलाने ४०० मीटरचे अंतर ५२.०१ सेकंदांत पार केले. जिस्नाने हे अंतर ५३.३२ सेकंदांत पूर्ण केले. व्हिएतनामच्या क्वाच थेईला रौप्यपदक मिळाले. भारताच्या एम.आर.पुवम्माला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या ४०० मीटर अंतराची शर्यत महम्मदने ४५.७७ सेकंदांत जिंकली. त्याचाच सहकारी आरोकियाने रुपेरी कामगिरी करताना हे अंतर ४६.१४ सेकंदांत पूर्ण केले.


Top