प्रभावी संवादशैली

effective communication style important for interview

1177   17-Aug-2019, Sat

स्पर्धा परीक्षांच्या मुलाखतीत विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना  तुमचे विचार आणि दृष्टिकोन यांसोबत तुम्ही किती प्रभावीपणे तुमचे म्हणणे मांडता यांवर मुलाखतीतील यश अवलंबून असते.


कौन सी बात कहाँ कैसी कही जाती है
ये तरीका हो तो हर बात सुनी जाती है


उर्दू शायर वसीम बरेलवी यांच्या या दोन ओळींच्या शायरीतून संवादकौशल्याचे महत्त्व पुरते स्पष्ट होते. उमेदवाराचा अभ्यास, व्यासंग, संपादन केलेले ज्ञान, माहिती कितीही चांगली असली तरी ती माहिती, ज्ञान मुलाखत मंडळासमोर मांडण्याची शैली प्रभावी नसेल तर अपेक्षित परिणाम साधता येत नाही. प्रभावी अभिव्यक्तीद्वारे अपेक्षित परिणाम साधला जातो. अर्थात अभ्यास तोकडा असेल तर नुसत्या प्रभावी शैलीद्वारे काहीही साध्य होणार नाही, हेही तितकेच खरे, कारण मुलाखत ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाची चाचणी आहे.  याद्वारे तुमचा अभ्यास आणि ज्ञानसंपन्नता तपासली जाणार आहे, पण प्रभावी संवादकौशल्याशिवाय ‘प्रभावी व्यक्तिमत्त्वाची’ ओळख पूर्ण होत नाही. मुलाखतीदरम्यान उमेदवार उत्तर ‘काय’ देतो याला जितके महत्त्व आहे, तितकेच ते तो ‘कसे’ मांडतो यालाही आहे. तुमचे शब्द हे तुमच्या विचारांचा आरसा असतात. उत्तम अभ्यासाला, प्रभावी संवादकौशल्याची जोड असेल तर यश नक्की मिळते.
प्रश्नाचे उत्तर देताना..


मुलाखतीद्वारे उमेदवाराचे वाक्चातुर्य (Speech Manerism) मानसिक सतर्कता (Mental firmness) या गुणांची पारख उमेदवाराच्या उत्तरांतून मुलाखत मंडळाचे सदस्य करत असतात. प्रभावी संवादकौशल्यात वाक्कौशल्य आणि श्रवणकौशल्य या दोन्ही बाबींचा समावेश होतो. आपले उत्तर देण्यापूर्वी अथवा मत व्यक्त करण्यापूर्वी मुलाखत मंडळाचा प्रश्न नीट ऐकून घेणे, समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. शांतपणे प्रश्न ऐकून घेत उत्तर द्यायला सुरुवात करावी. प्रश्न विचारला जात असताना मध्येच बोलणे, मुलाखत मंडळ सदस्यांचे बोलणे थांबवणे, प्रश्न अर्धवट ऐकून उत्तर द्यायला सुरुवात करणे हे सर्व टाळावे. प्रश्न ऐकल्यानंतर, मुलाखत मंडळाला कोणते उत्तर अपेक्षित आहे, याचा विचार करून प्रश्नाला अनुरूप असे संक्षिप्त उत्तर  द्यावे. बोलताना लय बिघडू देऊ नका, खूप विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. काही वेळा उमेदवाराला विचारलेल्या प्रश्नाचा रोख कळत नाही, त्यामुळे उत्तर देणे कठीण होते. अशा वेळेस नम्रतेने पुन्हा प्रश्न जाणून घ्यावा. उत्तरातील महत्त्वाचा भाग, प्रश्नानुरूप सुरुवातीला मांडावा. उत्तर पूर्ण करतानाही योग्य पद्धत अनुसरावी. उत्तर संपल्याचे व्यवस्थित निदर्शनास आणून द्यावे. माहिती अपूर्ण असू शकते, पण उत्तर पूर्ण असायला हवे.
 

मानसिक दृढतेचे मूल्यांकन
उमेदवाराची विचारांची बठक किती पक्की आहे, तो आपल्या विचारांप्रति किती प्रामाणिक आणि ठाम राहतो, याची चाचपणी मुलाखतीद्वारे केली जाते. मुलाखत मंडळाचा सदस्य एखाद्या विषयावर आपले मत व्यक्त करून, याविषयी तुम्हाला काय वाटते, तुमचे मत काय, असे उमेदवाराला विचारतात. अशा वेळी उमेदवाराने डोळे झाकून त्यांच्या मताशी सहमती दर्शवणे बंधनकारक नसते किंवा मुलाखत मंडळाच्या मताशी विरोधी मत मांडूनच आपली छाप पाडता येते, असेही नाही. मुलाखत मंडळाच्या मतावर उमेदवाराने आपले सुसंगत, संतुलित आणि प्रभावी मत व्यक्त करायला हवे. उदाहरणार्थ- दयामरण, समलंगिकता, लिव्ह इन रिलेशनशिप यांसारख्या संवेदनशील मुद्दय़ांवर उमेदवारांना त्यांचे मत विचारले जाऊ शकते किंवा सर्वोच्च न्यायालयाने, अथवा उच्च न्यायालयाने एखाद्या सामाजिक विषयावर दिलेल्या निर्णयाबाबत तुमचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. अशा वेळी तुमचा दृष्टिकोन आणि विचार स्पष्ट असायला हवेत.
गतवर्षी राज्यसेवा परीक्षेच्या मुलाखतीत एका उमेदवाराला प्रश्न विचारला गेला होता- शेतकऱ्यांच्या आत्महत्यांविषयी एका लोकप्रिय दैनिकात अग्रलेख प्रसिद्ध झाला होता, त्याविषयी तुम्हाला कल्पना आहे का? उमेदवाराने ‘हो सर!’ म्हणून लगेचच त्या अग्रलेखाचे शीर्षकही सांगितले. उमेदवाराची सतर्कता आणि चालू घडामोडींविषयीची जाण पाहता नंतरची दहा मिनिटांची मुलाखत त्या एकाच विषयावर रंगली.
मुलाखत मंडळाचे सदस्य तुमच्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन अंगीकारत असतील अथवा असहमती दर्शवत असतील तर लगेचच तुमचे मत बदलू नका. नम्रपणे तुमचे मत मांडण्याचा प्रयत्न करा. नम्र असावे, पण शरणागत वृत्ती नसावी. ‘तुमचे बरोबर आहे, पण याही दृष्टीने विचार करता येईल’ अशी वाक्यरचना करून मुद्दा वेगळ्या शब्दांत मांडता येईल. पण कोणत्याही परिस्थितीत अडेलपणा करू नका. वाद घालू नका.
व्यक्तित्वमूलक चाचणीच्या माध्यमातून उमेदवाराचा हजरजबाबीपणा तपासला जातो. काही हलकेफुलके उमेदवाराच्या कल्पकतेला वाव देणारे, साधे प्रश्नही विचारले जातात. पण अशा प्रश्नांना सामोरे जाताना सावधानता बाळगली पाहिजे. सतर्क राहून उत्तरे दिली पाहिजेत. ‘जर तुम्हाला एका दिवसासाठी मुख्यमंत्रीपद मिळाले तर..?’ ‘एक दिवसासाठी तुम्हाला जिल्हाधिकारी पद मिळाले तर..?’ ‘कुशल प्रशासक कसा असावा?’, ‘परमेश्वराने तुम्हाला वरदान मागायला सांगितले तर तुम्ही काय मागाल?’ अशा प्रकारचे प्रश्न विचारून मुलाखत मंडळाचे सदस्य तुम्हाला कल्पनाविश्वात भराऱ्या मारण्यासाठी अवकाश उपलब्ध करून देतात. पण उमेदवारांनी या प्रश्नांची वस्तुनिष्ठ उत्तरे द्यायला हवी.
मुलाखत म्हणजे ‘ग्रिलिंग सेशन’ नव्हे किंवा वाद-विवादाचे, खंडनाचे व्यासपीठ नव्हे. प्रभावी संवादाद्वारे स्वत:ची मते, विचार स्पष्टपणे मांडून प्रशासकीय सेवांच्या दालनात प्रवेश करण्याची एक संधी आहे.

मुलाखत - राजस छंद

 Interview - Rajas verses

12873   04-Jun-2018, Mon

मुलाखतीची तयारी करताना तुम्ही निगुतीने जपलेली आवड तुमचा फार मोठा फायदा करून देऊ शकते. फक्त त्या आवडीकडे तटस्थपणे पाहता आले पाहिजे.

पोस्टाची तिकिटे - छंदांचा राजा

तिकिटांचे संकलन (philately) हा एक ज्ञान समृद्ध करणारा छंद मानला जातो. भारतासारख्या देशात एखादी गोष्ट स्टॅम्पवर येणे म्हणजे ती गोष्ट एकप्रकारे अधिकृत होणे असाही होतो. विविध सरकारी योजनांचा प्रचार या प्रकारे केला जातो. 

तिकिटांवरच्या चित्रांमुळे आपल्याला त्या देशाचा निसर्ग, सामाजिक-राजकीय स्थिती, सांस्कृतिक वैशिष्ट्ये यांची माहिती मिळते. यात प्रश्न असे असू शकतात, पोस्टाची तिकिटे हा प्रकार कालबाहय झाला आहे का? हा छंदाला 'छंदांचा राजा' असे का म्हणतात? माय स्टॅम्प योजनेबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? पोस्ट विभाग या छंदाला कसे प्रोत्साहित करते?


बागकाम

बागकाम हा विरंगुळा देणारा व त्याचवेळी मानसिक शांती देणारा छंद मानला जातो. प्रश्न - तुम्ही कोणत्या प्रकारचे बागकाम करता, सेंद्रीय की असेंद्रीय? घरच्या घरी कुंडीत की बागेमध्ये? झाडांचा औषधी उपयोग काय? तुमच्या भागात आढळणारी झाडे, परदेशातून भारतात आलेले वृक्ष? बागकामातून उत्पन्न मिळू शकते का? शेती हेही बागकामाच आहे का?

नाणी संकलन

सध्याच्या नोटाबंदीनंतर जुनी नाणी व नोटा यांच्याबद्दल कुतुहल निर्माण झाले आहे. पुढील प्रश्नांची अपेक्षा करता येईल. हा छंद कसा लागला? कधी सुरू केला? खर्चिक छंद आहे का? नाणी व नोटा यातून काय कळते? खरी व खोटी नाणी यातील फरक कसा ओळखायचा? तुमच्याकडील सर्वात जुने व नवे नाणे कोणते? नाणी व नोटा कालबाह्य होतील असे वाटते का?

पक्षीनिरीक्षण

भारतासारख्या जैवविविधता असलेल्या देशात पक्षीनिरीक्षण करणे हा एक आनंददायी व त्याचवेळी निसर्गाविषयी आकलनात भर टाकणारा छंद आहे. हा छंद पर्यावरणपूरक, आरोग्याला चांगला व कमी खर्चात जोपासण्यासारखा आहे.

सध्या स्वस्त होत जाणाऱ्या कॅमेरांमुळे या छंदाला मोठ्या प्रमाणावर पाठिराखे मिळत आहेत. पक्षांची रंगसंगती, पक्षांचे स्थलांतर व त्यातून कळणारी त्यांची जीवनप्रणाली यावर प्रश्न येऊ शकतात. सलीम अली यांचे भारतीय पक्षांबद्दलचे अनेक आवृत्या निघालेले पुस्तक डोळ्यांखालून घालून ठेवायला हवे.

पर्यटन

पर्यटन या छंदात नव्या जगाचा शोध, निरुद्देश भटकणे, पायी, सायलकलवरून, बाइकवरून केलेली भटकंती, देशातील किंवा परदेशातील ऐतिहासिक स्थळे, निसर्गवाचन यांचा समावेश होऊ शकतो. प्रवासाची आवड नोंदवली असल्यास ज्या ठिकाणाला तुम्ही भेट दिली त्या ठिकाणचे ऐतिहासिक, पर्यावरणीय, सांस्कृतिक, आर्थिक इत्यादी महत्त्व यावर माहिती मिळवायला हवी.

प्रसिद्ध प्रवासी जसे युआन स्तंग किंवा इब्न बतूता याच्या प्रवासाची माहिती घेऊन ठेवायला हवी. यात पुढील प्रश्न अपेक्षित आहेत. कुठल्या ठिकाणाला नुकतीच भेट दिली होती? तेथे काय पाहिले? तुमचा सर्वात चांगला व सर्वात वाईट अनुभव कोणता होता? भारतीय पर्यटनाच्या समस्या, तुम्ही जर पर्यटन सचिव असला तर पर्यटनाला चालना देण्यासाठी कोणते उपाय कराल? प्रवास केल्याने दृष्टिकोन व्यापक होतो काय? देश समजून घेण्यासाठी त्याच्याबद्दल वाचणे चांगले की तो बघणे चांगले?

कोडी सोडवणे

सुडोकू, क्रॉसवर्ड, काकुरो, लूप, क्यूब, जिगसॉ पझल अशी अनेक प्रकारची कोडी आज तरुण उत्साहाने सोडवतात. कोडी सोडवणे हा एक मेंदूला आव्हान देऊन तरतरी आणणारा खेळ आहे. कमी वेळात कोडी सोडवून दाखवणे तर खास कौशल्य मानले जाते. कोडी सोडवण्यासाठी त्या गोष्टीचा विविध पैलूंनी वेध घ्यावा लागतो. आपोआपच प्रत्येक गोष्टीचे अनेक पैलू लक्षात घ्यायची सवय लागते. यात पुढील प्रश्न येऊ शकतात. कोडी सोडवणे हा बुद्धीचा भाग आहे की सवयीचा? कोडी सोडवल्याने खऱ्या जीवनातील कोडी सोडवायला मदत होऊ शकते का? उदाहरण द्या? काही खास भारतीय कोडी आहेत का?

इतर काही छंद असू शकतात जसे मेहंदीचे रेखाटन, प्रेरणादायी वाक्ये जमवणे, घर साफ करणे, गोष्ट रंगवून सांगणे इत्यादी.

 

मुलाखतीचे गुणांकन

 Interview Rating

2035   04-Jun-2018, Mon

खलबतखाना

पॅनल चार ते पाच जणांचे बनलेले असते. चेअरमन मुलाखतीची सूत्रे हाती ठेवतो. उमेदवार मुलाखत देऊन गेल्यावर पॅनल मेंबर चर्चा करतात व उमेदवाराबद्दल त्यांचे काय मत झाले ते मांडतात. त्यानुसार चेअरमन गुण नोंदवतो.

पॅनलमधील एक सदस्य उमेदवाराच्या शारीरिक हालचाली, आत्मविश्वास यांच्यावर लक्ष केंद्रित करतो. तो मानसशास्त्रीय पद्धतीने मुलाखत पाहतो. गुण देताना त्याचेही मत विचारात घेतले जाते. गुण निश्चिती सार्वमताने होत असली तरी चेअरमनचा निर्णय अंतिम असतो.

प्रथम तुज पाहता

पहिली अगदी मूलभूत गोष्ट पहिली जाते ती म्हणजे व्यावसायिकता. त्यात कपडे कसे व कोणते आहेत, चेहऱ्यावरील हावभाव, शरीराची भाषा व दृष्टीसंपर्क (eye contact) हे सर्व बघितले जाते. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट म्हणतात ते या टप्प्याला उद्देशूनच. जर चेहऱ्यावर तुच्छपणा असला, शरीर जडावलेले असले, बेंगरूळ अवतार असला व डोळे आकाशाकडे बघत असतील तर पॅनलचे मत सुरुवातीलाच नकारात्मक बनते. मग ते मत उलटे फिरवणे कठीण होते.

गुणांचे वर्गीकरण

मुलाखत २७५ गुणांची आहे. त्याचे वर्गीकरण ११ निकषांवर करता येईल. प्रत्येक निकषाला २५ गुण पकडता येतील. (११X२५ = २७५) वेगवेगळे निकष (parameters) वापरले की एखाद्याच गुणावर बहाल होऊन गुण देण्याची चूक टाळता येते. शेवटी समग्र व्यक्तिमत्व निवडायचे असते. मात्र, ती समग्रता वेगवेगळ्या भागात वाटून बघावी लागते.

३६० अंशातून उमेदवाराच्या व्यक्तिमत्वाची चिकित्सा केली जाते. बौद्धिक गुण- टीकात्मक विचारशक्ती. यात समोरच्याचे ऐकून घेण्याचे कौशल्य, तार्किकता, पुराव्यांसह कारणे देण्याची तयारी, तथ्यांवरील पकड, एखादा आयोग, अहवाल, आंतरराष्ट्रीय संस्था यांचा संदर्भ देण्याची क्षमता बघितली जाते.

सामाजिक पैलू व मूळचा झरा (originality)- यात खुलेपणा, दुहेरी संभाषण करण्याचे कौशल्य, मान्यताप्राप्त विचारमांडणी (चंद्रावर माणूस गेलाच नव्हता, ती नासाची बतावणी होती, असा प्रकार नको) आतला आवाज ऐकण्याची क्षमता म्हणजेच जाणीव व नेणीव यांच्यातील संवाद व समतोल.

चालू घडामोडींमध्ये रस- उमेदवार आपल्या गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील, राज्यातील, देशातील व आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या घटनाक्रमाशी समरस झाला आहे का, हे सर्व स्तर तो एकमेकांना जोडून बघतो का हे बघितले जाते.

मेंदूचा तल्लखपणा- यामध्ये विचलित न होणे व एखाद्या मुद्द्यावर, चर्चेवर फोकस कायम ठेवण्याची क्षमता बघितली जाते. आकलनशक्तीचे कौशल्य- एखाद्या मुद्द्याला समकक्ष असे दुवे शोधून दाखवणे. (lateral linking) उदा. गांधी, लिंकन व फाळणी स्पष्ट आणि तार्किक अभिव्यक्ती- उमेदवाराची विचारप्रक्रिया स्पष्ट आहे की नाही ते यात बघितले जाते.

निर्णय देण्यातला समतोल (balance of judgement) उमेदवाराचे मत कोणत्याही एका बाजूला जरुरीपेक्षा जास्त झुकता कामा नये. तेव्हा पूर्वग्रहविरहित मत बनवता येते की नाही हे बघितले जाते. विविध गोष्टींतील आवड व त्यांची खोली (उदा. सर्फिंगचा छंद) सामाजिक अभिसरण व नेतृत्वाचे गुण- प्रशासकीय अधिकारी हा सरकारी यंत्रणेचे नेतृत्व करीत असतो.  

त्याच्या हाताखालील व समोर येणारे लोक यांच्याबाबत त्याला निवडीची संधी नसते. (खासगी क्षेत्रात निदान कंपनी बदलता येते) अशावेळी आंतरव्यक्ती कौशल्य व सगळ्यांमध्ये (व्यक्ती व गट) मिसळून काम करून घ्यायचे कसब पणाला लागते. बौद्धिक व नैतिक समग्रता- हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. उमेदवाराची स्वतःची अशी नैतिक मूल्ये आहेत की नाहीत व तो त्यांचे प्रत्यक्ष आचरण करतो आहे की नाही हे पॅनल शोधत असते. शैक्षणिक पार्श्वभूमी व उमेदवाराकडे माहिती व अनुभव आहे का हेही बघितले जाते.

पॅनल व उमेदवार

panel and candidate

2346   03-Jun-2018, Sun

 

लोकसेवा आयोगातील पॅनल सदस्य व उमेदवार यांच्यातील संवाद रंगला, (chemistry) तर मुलाखत दोन्ही बाजूने एक समृद्ध करणारा अनुभव ठरतो. जर तसे झाले नाही, तर मुलाखत फसते.

दोन पिढ्यांतील संवाद

दोन पिढ्या समोरासमोर येतात, तेव्हा जुन्या पिढीतल्या प्रत्येकाला वाटत असते की नव्या पिढीने अजिबात उथळ असू नये. अभ्यासू, कष्टाळू आणि विनम्र असावे. त्यांची नवीन काही शिकण्याची तयारी असावी, यशाचे शॉटकट्स त्यांनी वापरू नयेत आणि त्यांचा मूल्यांवरचा विश्वास कधी भंग पावू नये. जुनी पिढी परस्परांकडे पाहताना सर्वसाधारणपणे जेवढी साशंक नसते, तेवढी ती मूल्यांच्या संदर्भात नव्या पिढीबद्दल साशंक असते. तर दुसरीकडे, प्रत्येक नव्या पिढीला आधीच्या पिढीच्या अनेक श्रद्धा, विश्वास, संकेत, परंपरा मान्य नसतात. अशी पिढीमधील दरी व त्यातून निर्माण होणारा संघर्ष पूर्वापार चालत आला आहे.

छेद आडवा- उभा

इंटरव्ह्यूसाठी इंटरव्ह्यू घेणाऱ्या पॅनेलकडे एक असेसमेन्ट शीट असते. गुणांकन पत्रिका म्हणूया. पॅनेलचे मेंबर त्यावर लगेच गुण लिहिण्याची घाई कारीत नाहीत. ते इंटरव्ह्यू सुरू असताना एका कागदावर टिपणे काढतात, काही खुणेचे शब्द लिहितात किंवा चक्क खुणा काढतात. उदाहरणार्थ चूक, बरोबर, शंका, अंडरलाईन, वर्तुळ, इत्यादी. कधी कधी रंगीत पेनांचा वापरही करतात. म्हणजे हिरवा, लाल, काळा इत्यादी. याचे कारण गुणांकन पत्रिकेमध्ये गुण लिहिताना त्यांना इंटरव्ह्यूमधल्या ठळक घटना चटकन आठवतात आणि गुण देणे सोपे जाते. पॅनेल मेंबर त्यांचे टिपणे काढण्याचे काम करत असतील, तर त्याने कदापि विचलीत होऊ नका. तुम्ही - ज्यांचं लक्ष तुमच्याकडे आहे, त्यांच्याकडे बघून बोलत राहा. त्या गुणांकन पत्रिकेत डोकावून बघायची गरज नाही.

कधी कधी मुलाखत १० ते १५ मिनिटात संपू शकते किंवा कधी कधी चांगली तासभर लांबते. पण त्यातून काहीच सिद्ध होत नाही. लवकर संपली, म्हणजे कमीच गुण मिळणार व लांबली म्हणजे चांगले गुण पडणार, असा आडाखा बांधता येत नाही.

काहीवेळा पॅनल मुलाखतीबाबत गंभीर नाही असे वाटू शकते. प्रशांत गावंडे जो आता महसूल सेवेत आहे, त्याचा अनुभव सांगण्यासारखा आहे. तो पॅनल असलेल्या केबिनमध्ये गेला. पॅनल सामोसे व इतर पदार्थ खाण्यात मश्गुल होते. क्रिकेटवर त्यांची आपापसात चर्चा चालली होती. ती चर्चा व तो मूड तसाच ठेवत त्यांनी मुलाखत चालू केली व थोड्याच वेळात संपवली. प्रशांत निराश झाला. आपली मुलाखत झाली की नाही, असे त्याला वाटायला लागले. तो महाराष्ट्र सदनात परत आला, तर त्याचा रुम पार्टनर त्याच्या तासभर रंगलेल्या मुलाखतीचे रसभरीत वर्णन करत होता. हे तर प्रशांतला अजूनच खचवणारे होते. पण शेवटी गुणांमध्ये प्रशांतनेच बाजी मारली. याचा अर्थ पॅनलने गंभीरपणे मुलाखत घेतली आहे की नाही, हे ठरवणे उमेदवाराचे कामच नाही. त्याचे काम मुलाखत गांभीर्याने घेणे एवढेच आहे.


साक्षेप
 
मुलाखत घेणारे चटकन निष्कर्ष काढणे टाळतात. खूप तटस्थपणे आणि काटेकोरपणे त्यांचे गुणांकन चालू असते. पॅनेलवर बसलेल्या लोकांना इंटरव्ह्यूतून केवळ अर्ध्या तासात - तेही नेमके प्रश्न विचारून योग्य माहिती घ्यायची असते. उमेदवाराच्या कोणत्याही बाबीचा प्रभाव ते स्वतःवर पाडू देत नाहीत, मात्र त्याची ते नोंद घेतात. त्यामुळे आपण मुलाखत गाजवून सोडू, अशी कल्पना ठेवणे चुकीचे ठरेल. अगदी सामान्य वाटणाऱ्या मुलाखतींना चांगले गुण मिळाले आहेत.

मुलाखतीसाठी आवश्यक गुणवैशिष्टय़े

The necessary qualifications for the interview

2220   28-May-2018, Mon

विद्यार्थी मित्र-मत्रिणींनो मुलाखतीविषयक आजच्या या समारोपाच्या लेखात ‘व्यक्तिमत्त्व चाचणी’साठी कोणत्या गुणवैशिष्टय़े व क्षमतांची आवश्यकता भासते याची चर्चा करणार आहोत.

मुलाखत म्हणजेच व्यक्तिमत्त्व चाचणीत स्वत:चे व्यक्तिगत जीवन, समाज आणि प्रशासनाविषयीचे उमेदवाराचे आकलन महत्त्वाचे ठरते. अर्थात या घटकांविषयीची जाण व भान अत्यंत स्पष्ट असले पाहिजे. संकल्पना, तथ्ये-माहिती, आकडेवारी इ. महत्त्वपूर्ण बाबतीत संदिग्धता वा डळमळीतपणा असू नये. आकलन व विचारातील स्पष्टता ही मुलाखतीसाठी आवश्यक मूलभूत गुणवैशिष्टय़े ठरतात.

मुलाखतीत विचारलेल्या कोणत्याही बाबींसदर्भातील स्वत:चे आकलन उमेदवाराने आत्मविश्वासपूर्वक मांडणे हा एका अर्थी मुलाखतप्रक्रियेचा गाभा आहे. किंबहुना मुलाखत कक्षात प्रवेश केल्यापासून ते मुलाखतीचा समारोप करून कक्षातून बाहेर पडेपर्यंतच्या संपूर्ण संवादप्रक्रियेत आत्मविश्वासाने प्रतिसाद देणे अपेक्षित असते.

मुलाखतीसाठी आवश्यक घटकांची व्यवस्थित तयारी आणि पुरेशा मॉक इंटरव्ह्यूद्वारा संवादाची सवय याआधारे आत्मविश्वासाची हमी देता येईल.

निर्णयक्षमता ही मुलाखतीसाठी आवश्यक आणखी एक महत्त्वाची क्षमता होय. विचारलेल्या प्रश्नासंबंधी उमेदवाराचे आकलन काय व कसे आहे, आणि संबंधित मुद्दय़ाचा सारासार विचार करून प्राप्त परिस्थितीत निर्णय घेता येतो का, याची चाचणी विविध प्रश्नांद्वारे केली जाते.

समाजवास्तवाचे वाचन जेवढे सूक्ष्म तेवढी निर्णयक्षमता प्रगल्भ होण्याची शक्यता जास्त हे लक्षात घेऊन त्यादृष्टीने प्रयत्न हाती घ्यावेत. मुलाखत मंडळ काही वेळा थेट परिस्थितीजन्य प्रश्न विचारून उमेदवाराची निर्णयक्षमता तपासण्याचा प्रयत्न करते. अशा स्थितीत दिलेल्या परिस्थितीचा योग्य विचार करून समर्पक निर्णय घेण्याची क्षमता सादर करणे जरुरीचे ठरते.

तसेच उमेदवाराकडे व्यापक, समग्र दृष्टी, आहे की नाही याचीही खातरजमा केली जाते. एखाद्या महत्त्वाचा प्रश्न वा मुद्दय़ासंबंधी मत वा भूमिका मांडताना त्याचा व्यापक व समग्रपणे विचार केलेला असावा.

संबंधित मुद्दय़ाची पाश्र्वभूमी, सद्यस्थिती, कारणमीमांसा, त्याविषयी विविध मतप्रवाह, परिणाम, अशा व्यापक दृष्टीने पहावे. कोणताही प्रश्न सुटा सुटा करून न पाहता त्याचे इतर क्षेत्राशी असणारे संबंध बारकाईने अभ्यासावेत.

समाजातील भिन्न स्तर व घटकांचा विचार करताना भावी प्रशासक म्हणून उमेदवाराकडून व्यक्तिनिष्ठतेऐवजी वस्तुनिष्ठता आणि निपक्षपातीपणाची अपेक्षा असते.

राजकीय पक्ष, त्यांच्या विचारधारा, विशिष्ट कृती कार्यक्रमास असणारे त्यांचे अग्रक्रम याविषयी उमेदवारांकडून तटस्थतेची अपेक्षा बाळगली जाते. सत्तेत कोणत्याही विचाराचा राजकीय पक्ष असला तरी आपली जबाबदारी तटस्थपणे पार पाडण्याचे कठीण काम प्रशासकांकडून अपेक्षित असते. प्रशासक कोणत्याही राजकीय पक्षाशी नव्हे तर संविधानाशी बांधील असतात हा विचार समोर ठेवून आपली भूमिका विकसित करणे महत्त्वाचे ठरते.

दुसऱ्या बाजूला, दुर्बल, वंचित घटकांविषयी संवेदनशील वृत्तीचीही अपेक्षा असते. त्यामुळे तटस्थेचा यांत्रिक अर्थ न घेता. व्यापक जनहित आणि शोषित घटकांविषयी संवेदनशील असणे महत्त्वाचे ठरते.

उमेदवाराकडून समाजातील महत्त्वाच्या समकालीन समस्यांचे जसे व्यापक, समग्र आकलन अपेक्षित असते तसेच त्याची उकल करण्यासाठी उपयुक्त संभाव्य उपाय सुचविण्याची ‘उपायात्मक क्षमता’ ही अभिप्रेत असते.

कोणत्याही प्रश्न वा समस्येचा उपायात्मक विचार करताना प्रथमत: महत्त्वाची ठरते ती बाब म्हणजे विचाराधीन समस्येचे आकलन. हे आकलन जितके वस्तुनिष्ठ, व्यापक व चिकित्सक असेल तेवढे त्यावरील उपायांची दिशा स्पष्ट होण्याची शक्यता अधिक.

तसेच संबंधित समस्येवर आजपर्यंत करण्यात आलेल्या शासकीय, बिगर शासकीय पातळीवरील प्रयत्न-उपायांचे यथायोग्य मूल्यमापन मार्गदर्शक ठरते. अर्थात सुचविण्यात येणारे संभाव्य उपाय अति आदर्शवादी, काल्पनिक असणार नाहीत याची काळजी घ्यावी. उपाय शक्यतेच्या कोटीतील आणि व्यवहार्य असावेत याची खबरदारी घ्यावी.

एखादा मूलग्राही उपाय सुचवावा असे वाटले तरी तो संबंधित प्रश्न-समस्येच्या वास्तविक आकलनाशी असंबंधित असा नसावा. नावीन्यपूर्ण विचार आणि प्रयोगशीलता स्वागतार्ह ठरू शकते परंतु ती समाजवास्तवाच्या योग्य आकलनावर अधिष्ठित असावी.

एकंदर विचार करता मुलाखतीसाठी आवश्यक घटकासंबंधी सुरुवातीपासूनच अभ्यास सुरू करणे, विविध स्रोतांद्वारे आपले आकलन वाढवणे, आवश्यक तेथे समर्पक आकडेवारी वा दाखल्यांचा आधार देणे, त्याविषयी सारासार विचार करणे, त्यातून उपयुक्त टिपणे काढणे, अभिरूप मुलाखतीद्वारा संवादकौशल्याचा विकास करणे या प्रमुख बाबींची नियोजनबद्ध आखणी केल्यास मुलाखतीसाठी उपयुक्त क्षमता व गुणवैशिष्टय़ांचा विकास साधता येईल, यात शंका नाही!

पॅनलपुढील परीक्षा

interview guidance reliable

1882   07-Jan-2018, Sun

पॅनलपुढील परीक्षा


उच्च शिक्षण
तार्किकदृष्या नोकरी देणारी कोणतीही यंत्रणा उच्च शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य देईल, पण दुसरीकडे हेही खरे आहे की उच्च शिक्षणाचा थेट उपयोग नागरी सेवांमध्ये होत नाही. उच्च शिक्षण घेणारे तांत्रिक ज्ञानाकडे झुकलेले असतात, असाही विचार पॅनल करू शकते. तेव्हा जशी उच्च शिक्षण घेतलेली वधू वराकडच्या नातेवाईकांना खटकते, तसे काहीसे हे असते. तेव्हा नुसत्या पदवीधरांपेक्षा उच्च शिक्षण घेणाऱ्यांना जास्त ठामपणे आपले निर्णय पटवून द्यावे लागतात. तुम्ही करिअर का बदलता आहात? हे देशाचे नुकसान नाही का? अशा आरोपांना सामोरे जावे लागते.

अपराधीभाव
यामुळे डॉक्टर, अभियांत्रिकी पदवीधर व उच्च शिक्षण घेणारे हे नेहमी बॅकफूटवर असतात. तुमच्यासाठी सरकार इतका इतका पैसा खर्च करते, आता तुम्ही करिअर बदलून सरकारच्या व नागरिकच्या विश्वासाला तडा देत आहात. तुम्ही इथे तरी टिकून राहाल कशावरून? हे सर्व तुमची निर्णयप्रक्रिया उथळ व आधीचे करिअरचे निर्णय चुकीचे होते हे सिद्ध करत नाही का? पॅनल आरोपांच्या अशा फैरी चालवते. एखादा नवखा खेळाडू असेल तर खरोखरच खचून जातो व त्यालाच स्वतःचे निर्णय चुकल्यासारखे वाटू लागतात. पण हा सर्व चक्रव्यूव्ह भेदता येतो हे लक्षात असू द्या.

  •  


मयसभेतून सुटका
मुळात आयोगाने स्पर्धा परीक्षांसाठी पदवी ही अट ठेवली आहे. डॉक्टर, अभियांत्रिकी याही पदव्या आहेत. तेव्हा करियर बदलण्याचा आरोप खरा नाही. हा आरोप खरा मानायचा तर बी. कॉम, बी. एससी.सकट सर्वच उमेदवार करिअर बदलत आहेत, असे म्हणावे लागेल. डॉक्टरांवर खर्च जास्त होतो हे खरे असले तरी डॉक्टरने फक्त डॉक्टरीच करावी असा याचा अर्थ होत नाही. या तर्काने बी. कॉम करणाऱ्याने अकाऊंटंट किंवा बी. ए. झालेल्यांची प्राध्यापकीच करावी. प्रत्येक पदवी शिक्षणातून ती व्यक्ती काहीना काही शिकलेली असतेच, ज्याचा फायदा अप्रत्यक्षपणे सरकारी अधिकारी म्हणून काम करताना होतच असतो. शिवाय शिक्षण ही एक निरंतर प्रक्रिया आहे. अधिकारी म्हणून कामाला सुरुवात केल्यावरदेखील प्रशिक्षण, अभ्यासक्रम यांना सामोरे जावे लागतेच. तेव्हा पदवी ही शिक्षणाची सुरुवात आहे, शेवट नव्हे असेही म्हणता येईल.

धोबीपछाड
या वादामध्ये उमेदवाराला बाजी मारता येऊ शकते. उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय नागरी सेवा परीक्षा देण्यापूर्वी करिअरसाठी व्यावसायिक पर्याय म्हणून घेतलेला असू शकतो. उच्च शिक्षण कितीही मोठे वाटले तरी नागरी सेवांमध्ये काम करणे ही त्याहून मोठी संधी असते. तेव्हा ट्रॅक बदलण्याचा आरोप खरा नाही. उलट नागरी सेवांमध्ये येण्याचा निर्णय घेऊन करिअर पुढच्या टप्प्यावर नेले आहे असे म्हणता येईल. त्याही पुढे जात असेही म्हणता येईल, चांगले शिक्षण असल्याने करिअरच्या इतर संधीही उपलब्ध होत्या; पण त्या सोडून कमी पगारावर सरकारी नोकरी करायला उमेदवार तयार आहे. यातून हे सिद्ध होते की प्रशासकीय सेवा तो गंभीरपणे घेत आहे. त्यागाचे वलय त्या उमेदवाराला लाभते.

शिक्षण की माणूस
नागरी सेवांसाठी होणाऱ्या सर्वोच्च मुलाखतीत पॅनल शेवटी काय बघते, शिक्षण की माणूस? तर याचे निर्विवाद उत्तर माणूस हेच आहे. एकप्रकारे पदव्या म्हणजे फक्त कागदाचा तुकडा असतो. त्या तुकड्यापलीकडे असलेला माणूस त्यांना निवडायचा असतो. तेव्हा शिक्षण कमी की जास्त याचा गुणांवर परिणाम होत नाही. त्याचा फार बाऊ न करता आपली बाजू मांडणे चांगले. मग समजा काही निर्णय चुकले असतील तर तेही कबूल करायला हरकत नाही.

मुलाखतीच्या रेषा व रंग

mpsc interviwe practice

1148   07-Jan-2018, Sun

आपल्याशी संबंधित गोष्टींची बाह्यरेखा काढून घेतली पाहिजे. मग त्यात रंग भरणे सोपे जाते. हे करताना मुख्य परीक्षा कशी गेली आहे व कॉल येणार आहे की नाही, हे डोक्यातून काढून टाका.

गोष्टी जन्मांतरीच्या

तुमचा जन्म कुठे झाला, हा एक महत्त्वाचा बिंदू असतो. सचिन शर्मा (रेल्वेसेवेत) याला पॅनेलने गेल्या गेल्या विचारले की, जन्म कुठे झाला. त्याने राजस्थान हे सांगितले. पण मुलाखत राजस्थानवरच सुरू झाली व ट्रॅक बदलेचना. त्याने सांगून पाहायचा प्रयत्न केला की, मी फक्त राजस्थानात जन्मलो, पण सगळे आयुष्य नागपुरात गेले. पण काही उपयोग झाला नाही. त्यावरून जन्मस्थानाची महती लक्षात येईल. तेव्हा जन्म जिथे झाला, ते राज्य व जिल्हा यांची माहिती जमा करणे आवश्यक आहे. त्यात त्या ठिकाणचा भूगोल, इतिहास, राजकारण, विकासाच्या समस्या, विशेष वस्तू वा कला या सर्वांचा समावेश होतो. उदा. जळगाव जिल्हा असेल तर केळी, अहिराणी भाषा, सोनेचांदीचा व्यवसाय इत्यादी. राज्यसेवेची मुलाखत असेल, तर जिल्ह्यात विमानतळ आहे का, इथपासून ते जिल्ह्याचे पालकमंत्री कोण इथवर माहिती जमा करावी लागेल.

बाज की नजर
काही उमेदवारांना असे वाटते की, पॅनल फार खोलात जाणार नाही. पण आयोगाच्या सदस्यांना गृहीत धरण्यात काहीच अर्थ नसतो. त्यांच्याकडे व्यापक अनुभव व वाचन असते. मुंबईचा एक उमेदवार यूपीएससीच्या मुलाखतीला गेला. त्याने मुंबईच्या समस्या, वैशिष्ट्ये यावर बऱ्यापैकी तयारी केली होती. पण तो मुंबईचे उपनगर कुर्ल्याचा असल्याने त्यांनी कुर्ल्याची चर्चा सुरू केली. कुर्ला येथील टेकडी, अतिक्रमणे इत्यादी. तो गडबडला. दिल्लीत येऊन कुर्ल्यावर चर्चा होईल, असे त्याला वाटलेच नव्हते. तेव्हा तुमचा जन्म व राहण्याचे ठिकाण यांचा सखोल अभ्यास करण्याशिवाय पर्याय नाही.

जन्मतारीख व वर्ष
पॅनल ज्या गोष्टींवर हमखास प्रश्न विचारते, त्यापैकी जन्मतारीख व वर्ष यांचा समावेश करता येईल. एकतर तुमचे जन्मवर्ष घटनांनी भरलेले असू शकते. उदा. १९९१. मग त्या वर्षातील भारतातील व जगातील घटना व त्यांचे उमेदवाराला झालेले आकलन यावर चर्चा होऊ शकते. जन्मदिवसदेखील काही महत्त्वाचा राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय दिन आहे का, हे बघून ठेवले पाहिजे. पॅनल तुम्ही त्याच दिवशी व त्याच वर्षी का जन्मलात, हे दोन प्रश्न सोडून यावर कोणतेही प्रश्न विचारू शकते.

स्वतःबद्दल सांगा

पॅनल मुलाखतीला तोंड फोडण्यासाठी सहसा जे सुचवते ते हेच असते की 'स्वतःबद्दल सांगा'. मग पूर्ण नाव, राहण्याचे ठिकाण, शिक्षण, अनुभव इत्यादीबद्दल सांगणे इष्ट. उच्च शिक्षणाचा आवर्जून उल्लेख करावा. उल्लेखनीय कामगिरी जरूर सांगावी, मात्र ती अलीकडची असावी किंवा त्यात सातत्य असावे. अजूनही बोलावे, असे पॅनलचा आग्रह असेल, तर आपली कौटुंबिक पार्श्वभूमी, आईवडील, भावंडे यांच्याबद्दल सांगावे. हे सांगताना कुठलाही वृथा अभिमान (माझे वडील मोठे वकील आहेत) किंवा न्यूनगंड नसावा. (माझे वडील एक साधे शेतकरी आहेत)

तुमचे शिक्षण

यात तुमची शाळा/ कॉलेज/ विद्यापीठ यांचे स्थापना वर्ष, लोगो, महत्त्वाच्या संबंधित व्यक्ती यावर माहिती जमवणे आवश्यक आहे. तुमचे शिक्षण किती झाले आहे, यापेक्षा त्यातून तुम्ही काय शिकलात, हे जाणून घेण्यात पॅनलला रस असतो. त्यामुळे शिक्षण खूप चांगले आहे (आयआयटी) किंवा शिक्षण फार कमी आहे (बीए) अशाप्रकारच्या सापळ्यात अडकू नये. मुलाखतीपर्यंत पोहोचलेले सर्व समान क्षमतेचे मानले जातात. तेव्हा शिक्षणाचा तुम्ही किती व कसा फायदा झाला, यावर लक्ष केंद्रित करणे उत्तम.

प्रशासकीय सेवेत का यायचेय?

mpsc interview guidance

1397   07-Jan-2018, Sun

प्रशासकीय सेवेत का यायचेय?

देशसेवा
या प्रश्नाचे अगदी आदर्श उत्तर म्हणजे ‘मला देशसेवा करायची आहे’. मग पॅनल म्हणते की, मग तुम्ही लष्करात का भरती होत नाही? तिथेतर देशसेवा करायची व देशासाठी प्राण द्यायची थेट संधी आहे. तुम्ही म्हणणार की, देशासाठी जगण्याची गरज आहे. मला एकदा विषय घेऊन त्यावर काम करायला आवडेल. पॅनल म्हणते की, मग तुम्ही एखाद्या बिगर सरकारी संस्थेत (NGO) का काम करत नाही? तिथे एखाद्या विषयावर दीर्घकाळ व सातत्याने काम करायची संधी असते. शिवाय अगदी वीटभट्टीवरचा कामगार जो आपले काम मन लावून करतो, तोही देशभक्तीच करत असतो की. तुम्ही देशसेवा करणार, मग बाकीचे काय करत आहेत? देशसेवा करण्यासाठी पगाराची अपेक्षा का ठेवली आहे?

लोकसेवा

उमेदवार म्हणतो की, मला थेट नागरिकांमध्ये, त्यांच्यासाठी काम करायला आवडेल. हे उत्तर देताना उमेदवारांच्या डोक्यात प्रामुख्याने आय.ए.एस., आय.पी.एस., उपजिल्हाधिकारी अशी लोकाभिमुख पदे असतात. इतर पदांचा नागरिकांशी थेट संपर्क येतोच असे नाही. परराष्ट्र सेवा, लेखा सेवा, महसूल सेवा यांचा नागरिकांशी थेट संबंध येत नाही. त्यांच्याशी थेट संपर्क हाच सेवांमध्ये यायचा निकष असेल तर या बाकीच्या पदांना अग्रक्रम का दिले आहेत? एखादा किराणा दुकान चालवणाराही नागरिकांच्या थेट संपर्कात असतो. मग त्या पर्यायाचा का विचार करत नाही?

मला आव्हान घ्यायला आवडते

प्रशासकीय सेवांमध्ये आव्हान आहे म्हणजे नक्की काय? तुम्ही इथे व्यवस्था बदल (system change) करायला येणार आहेत का? व्यवस्थेचा भाग होऊन व्यवस्था बदल करता येतो? आतापर्यंत जे आत आहेत (म्हणजे पॅनलने) काहीच केलेले नाही का? व्यवस्था बदलायची म्हणजे नक्की काय करायचे? एकटादुकटा अधिकारी ते करू शकतो का? नोकरशहांकडे फक्त गाडीची किल्ली असते व त्यांना ड्राइव्हरचे काम करायचे असते. बाजूला बसलेली राजकीय सत्ता दिशा दाखवते व मागे बसलेले नागरिक गाडीची मालक असतात. मग व्यवस्थाबदल आतून करणे कसे शक्य आहे? आतून व्यवस्था बदलत नाही हे समजल्यावर अरुणा रॉय, अरविंद केजरीवाल, हर्ष मंडार, लोकसत्ताक चळवळीचे जयप्रकाश नारायण हे सरकारी नोकरीचा त्याग करून बाहेर पडले. मग तुम्ही आतमध्ये का येत आहात?

माझे ते स्वप्न आहे

प्रशासकीय सेवांमध्ये येणे हे तुमचे स्वप्न आहे की तुमच्या आईवडिलांचे? स्वप्न व वास्तव यात जमीन आसमानाचा फरक असतो. तो दिसल्यावर तुम्ही राजीनामा देऊन बाहेर पडणार का? वास्तवाच्या उन्हामध्ये स्वप्नांचे दवबिंदू विरघळतात. स्वप्न भंगले की माणूस निराश, चिडचिडा, रागीट बनतो. तो आपले नैराश्य कामावर व इतरांवर आदळआपट करून काढतो. तसे तुम्हीही करणार का? शिवाय स्वप्नांचे काही खरे नसते, ती वयानुसार बदलत जातात. मग प्रशासकीय सेवांमध्ये येणे हे तुमचे सध्याचे स्वप्न आहे असे म्हणायचे का?

माझा गाव(च), माझा देश

मला माझ्या माणसांची स्थिती सुधारायची आहे, हे एक कॉमन उत्तर उमेदवार देतात. माझ्या माणसांची याचा अर्थ वेगवेगळा होऊ शकतो. तुमच्या जातीतील माणसांची? तुमच्या गावातील माणसांची? की तुमच्या कुटुंबीयांची? कोणती स्थिती भौतिक, वित्तीय की बौद्धिक? इतर नागरिक तुमचे नाहीत का? इतर राज्यात, इतर जिल्ह्यात बदली मिळाली की तुम्ही मग तिथली स्थिती सुधारण्यात रस घेणार नाही, असा अर्थ घ्यायचा का?
वरील लेखात २२ प्रश्नचिन्ह आहेत. पॅनल उमेदवाराला कसे घेरते याचे हे उदाहरण ठरावे.

मुलाखतीच्या आधी

mpsc interview guidance

1661   06-Jan-2018, Sat

मुलाखतीच्या आधी सतत स्वतःशी बोलत राहण्याने नकारात्मक विचारणा आणि संशय/शंकांना मनात थारा मिळत नाही. उत्साह हा संसर्गजन्य असतो. तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे लगेच जातो.

 

शेवटचे दोन दिवस

 

शांत राहा, शांत, एकदम शांत. आता चिंतनासाठी वेळ काढा. आता अभिरूप मुलाखती, भेटीगाठी, मोठ्यामोठ्याने वादविवाद थांबवा. आता नवीन काही मिळवत बसण्यापेक्षा जमवलेल्या माहितीचे पृथःकरण, त्या माहितीचे आंतरिकीकरण करणे, उत्तरांची संरचना निश्चित करणे या गोष्टींना प्राधान्य द्यायला हवे. सकाळी किंवा संध्याकाळी मोकळ्या हवेत फेरी मारून येणे चांगले. त्यामुळे चित्तवृत्ती प्रफुल्लित राहतात. जेवण सात्विक पण रुचकर घ्यावे. आता बाकी सर्व विचार बाजूला ठेवून मुलाखतीवर लक्ष एकाग्र करणे चांगले.

 

डी’ डे

 

मुलाखतीच्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी पुरेसा नाश्ता करून घ्या. तो करताना नॅपकिन वापरून कपड्यांवर डाग पडणार नाहीत याची काळजी घ्या. मुलाखतीला कटाक्षाने एखादी गाडी किंवा एखादी रिक्षा वापरलेली बरी. बाइकवरून जाणे टाळा. त्यामुळे कपडे खराब तर होतातच, शिवाय वारा व धुळीमुळे केस विस्कटतात. धुळीमुळे डोळे कचकच करतात. यामुळे आपला अवतार बघण्यासारखा होतो. मग मूड जातो. तुम्हाला दिल्या गेलेल्या वेळेच्या किमान अर्धा तास आधी तुम्ही मुलाखतीच्या ठिकाणी पोहोचणे आवश्यक आहे.

 

डर के आगे जीत है

 

मुलाखतीचा दिवस व दिवसाचा पहिला अर्धा भाग की दुसरा अर्धा भाग हे उमेदवाराला कळवलेले असते. तुम्ही गेल्यागेल्या पहिलीच मुलाखत तुमची असू शकते किंवा त्या अर्धकालातील शेवटचीही असू शकते. बऱ्याच जणांना वाटते की मुलाखत सकाळी लवकर झाली म्हणजे चांगले गुण व उशिरा झाली म्हणजे कमी गुण मिळतात. परंतु, यात काही तथ्य नाही. दोन ते तीन तास वाट बघायची वेळ येऊ शकते. अशावेळी फाशीची शिक्षा झालेल्या कैद्यासारखी अवस्था होते. प्रत्येक क्षण एखाद्या युगासारखा वाटतो. खूप उत्तेजीत वाटत असल्याने उष्मांक भराभर खर्च होतात. मग थोड्या वेळाने शरीर ढिले पडू लागते. उत्साह आटायला लागतो. शरीरावर ताण आला आहे, असे वाटू लागते. हा क्षण कसोटीचा ठरतो. ऊर्जा शेवटपर्यंत टिकवणे गरजेचे असते.

 

वाट पाहण्याची कला

 

मुलाखतीच्या आधी मोबाइल, पाकीट, घड्याळ काढून घेतात. त्यामुळे आपल्या वेळेची वाट पाहत शांत बसून राहायला पर्याय नसतो. सतत कार्यमग्न असण्याची सवय असणाऱ्यांना असे दोन-तीन तास नुसते बसून राहणे (तेही आयुष्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगी) जड जाते. काहींचे विचार करून करून डोके जड होते व सर्व ऊर्जा विचार करण्यात खर्ची झाल्याने प्रत्यक्ष मुलाखतीला उत्साह उरलेला नसतो. असे होता कामा नये. नुसती वाट पाहात बसणे ही पण कलाच आहे. इतर उमेदवारांशी गप्पा मारल्या तरी त्यात स्वतःला गुंतवून घ्यायचे नसते.

 

आपका नंबर

 

मुलाखतीच्या हॉलबाहेरच्या घरावर चेअरमन नावाची पाटी लावली असते. मुलाखतीच्या आधी दाराबाहेर एका खुर्चीवर बसवतात. आतमध्ये आधीच्या उमेदवाराची मुलाखत चालू असल्याने दारावर ऑपरेशन थिएटरबाहेर असतो तसा लाल दिवा लागला असतो. (मुलाखत हे एक प्रकारचे व्यक्तिमत्वाचे ऑपरेशन असल्याने हे रूपक तंतोतंत बसते) समोरच चहा ठेवलेला असतो. उगीच टेन्शन घेण्यापेक्षा चहा घेणे बरे.

 

सलामीची चकमक

 

दारावर उभे असताना सगळे आठवत जाते. त्यात सर्वांच्या आपल्याबद्दलच्या अपेक्षा, आपली मेहनत, कुलदैवत इत्यादी. आता आत जायचे आणि सर्व घडाघडा बोलून टाकायचे. आहे काय आणि नाही काय. पण पॅनल अंतर्यामी असते व त्यांना चौकटीतून बाहेर काढून उमेदवाराची तपासणी करायची असते. त्यासाठी पॅनल वेगवेगळ्या युक्त्या वापरते. जसे दारात उभे राहूनही दखलच घेत नाही. इथेच उमेदवाराची सगळी तयारी वितळून पाणीपाणी होते. इतर काही ठेवणीतील चाली म्हणजे उमेदवार चुकला आहे अशी बतावणी करणे व उमेदवाराला बाहेर जाऊन विचारून ये असे सांगणे.

मुलाखत योग

mpsc interviwe practice

1172   06-Jan-2018, Sat

काही उमेदवारांना वारंवार मुलाखत योग येऊनही पद हुलकावणी देत असते. अशावेळी नागरी सेवा, वन सेवा, सीआरपीएफ पदाची मुलाखत अशा वेगवेगळ्या निमित्ताने त्यांची आयोगाच्या पॅनेलशी वरचेवर भेट होते. उमेदवार व पॅनल एकमेकांना ओळखू लागल्याने काम थोडे सोपे होते व थोडे कठीण. सोपे कारण नेहमीच्या सवाल-जबाबाला फाटा देता येतो. कठीण कारण नव्याने एकमेकांचा अंदाज घेऊन मुलाखत पार पडते. उमेदवार एकदा अपयशी ठरला आहे, म्हणजे प्रत्येक वेळी तो अपयशी ठरेल, असे पॅनल धरून चालत नाही व उमेदवाराला आपली बाजू मांडायची पूर्ण संधी देते.

 

डोंगर पोखरून उंदीर

कधी कधी पॅनलमधील एखादा सदस्य गंभीर चेहऱ्याने लांबलचक प्रश्न विचारतो. उदा. ‘स्वातंत्र्य संग्रामात भारतीयांना मोठा संघर्ष करावा लागला. तो संघर्ष फक्त राजकीय न राहता त्याला आर्थिक व सामाजिक पैलूही होते. ब्रिटिशांची भूमिका दुहेरी होती. एकाचवेळी ते स्वतःला सुधारणांचे अग्रदूत मानत होते, पण त्याचवेळी त्यांची वसाहतवादी नीती भारताचे शोषण करीत होती. सहकार्य व संघर्ष यांच्यात समन्वय साधत भारताला वाटचाल करावी लागली. तर मग आजच्या समस्या कोणत्या आहेत?’ इथे एवढ्या अवाढव्य प्रश्नातील ९० टक्के भाग माहितीपर आहे, शेवटचे वाक्य हाच प्रश्न आहे. हे लक्षात घेतले, तर हा सोपा प्रश्न आहे.

 

बी कम्फर्टेबल

मुलाखतीचा हा प्रकार तणावपूर्ण मुलाखतीच्या अगदी उलटा आहे. यात उमेदवारावर कोणताच ताण टाकला जात नाही. उलट पॅनल उमेदवाराला ‘बी कम्फर्टेबल’ असा धीर देते. असे म्हटले की, खरे तर सावधानतेचाच इशारा आहे. कारण हेच लोक कधी उलटतील, हे सांगता येत नाही. एका उमेदवाराला तू इंग्रजीत मुलाखत का देत नाहीस, असे दरडावले. तो म्हणाला की, त्यात पुरेसा कम्फर्टेबल नाही. त्यावर चेअरमन फिस्कारून म्हणाल्या की, आम्ही इथे काही तुझ्या कम्फर्टसाठी जमलेलो नाही.

 

निर्गुण, निराकार

या वेळी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुलाखतीत उमेदवारांना असा अनुभव आला आहे की, पॅनल कोणतीही प्रतिक्रिया दाखवत नाही. उमेदवारांशी वादही घालत नाही. उत्तर चुकले, तरी काहीच न म्हणता पुढचा प्रश्न विचारते. पूरक प्रश्नही फारसे विचारत नाही. जे काही उमेदवार बोलतो, त्यावर सदस्य माना डोलावतात. कदाचित हे ठरवून करत असावेत किंवा काही पॅनल नवीन असल्याने हे होत असावे.

 

सौजन्याचा सापळा

पॅनल अशा प्रकारच्या मुलाखतीत रस आहे की नाही, अशा सीमारेषेवर वावरत असते. या प्रकारच्या मुलाखतीत खूप विचारपूर्वक उत्तरे द्यावी लागतात. समोरून कोणतीच प्रतिक्रिया येत नसल्याने अंदाज येत नाही. पूर्ण अर्धा तास एकतर्फी ऊर्जा, उत्साह टिकवून ठेवावा लागतो. उमेदवार चुकीची दिशा घेऊन वाहवत जाऊ शकतो. अशा वेळी पॅनल तर ब्रेक दाबण्याऐवजी वाहवा करत असते. अशा प्रकारच्या मुलाखती चकवा देणाऱ्या असतात.


Top