यूपीएससी : नियोजनाचे महत्त्व

 Preparation for UPSC: Importance of Planning

7145   19-Jun-2018, Tue

यूपीएससी परीक्षेतील तीन टप्पे, व्यापक अभ्यासक्रम, त्यासाठी वाचायची अनेक संदर्भपुस्तके आणि किमान एक वर्षभराचा सातत्यपूर्ण अभ्यास या वैशिष्टय़ांमुळे नियोजित तयारीशिवाय दुसरा मार्ग नाही. परीक्षेचे स्वरूप व व्याप्ती लक्षात घेऊन अभ्यास आणि वेळेचे नियोजन करणे अत्यावश्यक ठरते. किंबहुना पद्धतशीरपणे केलेले नियोजन आणि त्याची प्रभावी अंमलबजावणीच या परीक्षेचा मार्ग सुकर करू शकते.

अर्थात, नियोजनाचा विचार करताना काही महत्त्वपूर्ण मुद्दे लक्षात घेणे गरजेचे ठरते. त्यातील पहिली बाब म्हणजे आपण कोणत्या वर्षी परीक्षा देणार आहोत हे ठरवून त्याआधी किमान एक वर्ष अभ्यासास सुरुवात करावी लागेल. त्यापेक्षा जास्त वेळ उपलब्ध असेल तर त्याप्रमाणे दीर्घकालीन नियोजन आखता येईल.

दुसरी बाब म्हणजे परीक्षेपूर्वी एक वर्ष आधी सुरू करायचा अभ्यास हा शक्यतो पूर्णवेळ स्वरूपाचा असावा. म्हणजे या परीक्षेच्या तयारीच्या पहिल्या वर्षभरात पूर्णपणे परीक्षेच्या या अभ्यासावरच लक्ष केंद्रित करावे. अन्यथा या परीक्षेच्या तयारीस योग्य न्याय देता येणार नाही.

अभ्यासाचे वर्ष निश्चित झाल्यावर हाती घ्यावयाची तिसरी बाब म्हणजे प्राथमिक तयारी. मुख्य परीक्षेच्या अभ्यासाचे सखोल व सविस्तर वेळापत्रक तयार करावे. त्या अंतर्गत मुख्य परीक्षेसाठी साधारणत: सात-आठ महिने, तर पूर्वपरीक्षेसाठी चार महिन्यांचा कालावधी निर्धारित करावा.

चौथी बाब म्हणजे मुख्य परीक्षेसाठी राखीव आठ महिन्यांचा आणि पूर्वपरीक्षेसाठी राखीव चार महिन्यांच्या कालखंडाचे विषय, अभ्यासक्रमानुसार सखोल नियोजन करावे. यात कोणता विषय आधी घ्यायचा, त्यास किती वेळ द्यायचा, त्यानंतर कोणता विषय व त्याचा अभ्यासक्रम अभ्यासून होईल या पद्धतीने वेळेची विभागणी करावी.

पाचवी बाब म्हणजे दैनंदिन आणि आठवडाभराचे नियोजन बनवावे. यात दररोज एक अथवा दोन विषय अभ्यासायचे की आठवडा तीन-तीन दिवसांत विभागून त्या तीन दिवसांत सुरुवातीला एक आणि नंतर एक असे दोन विषय अभ्यासायचे हे ठरवावे. म्हणजे दिवस विभागून अथवा आठवडा विभागून विषयांचा अभ्यास करता येतो. त्याखेरीज वर्तमानपत्रांच्या वाचनासाठी दररोज दोन तासांचा कालावधी निर्धारित करणे महत्त्वाचे आहे.

त्याखेरीज नियतकालिके आणि भारत वार्षकिीसारख्या चालू घडामोडीवरील संदर्भाच्या वाचनासाठी (एकंदर चालू घडामोडीसाठी) वर्तमानपत्रांच्या वेळेशिवाय आठवडय़ातील एक दिवस राखीव ठेवावा. अन्यथा मासिके आणि वार्षिकीसारख्या संदर्भपुस्तकांचे वाचन करणे अवघड जाईल.

नियोजन प्रक्रियेतील पुढील बाब म्हणजे केलेल्या अभ्यासाची व्यवस्थितपणे उजळणी होईल, याची खबरदारी होय. अनेक विषय, विविध पुस्तके आणि वर्तमानपत्रे-नियतकालिकांचे वाचन करायचे असल्यामुळे अभ्यासून झालेला विषय किमान दोन वेळा तरी पुन्हा वाचला गेला पाहिजे, याची काळजी घ्यावी.

मुख्य परीक्षा आणि पूर्वपरीक्षेत उजळणीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण त्याशिवाय अभ्यासात नेमकेपणा, अचूकता, प्रभावीपणा याची हमी देता येणार नाही. म्हणूनच पुरेशा उजळणीद्वारे अभ्यासाचे मजबुतीकरण करण्यावर भर द्यावा.

परीक्षेच्या स्वरूपानुसार त्या त्या टप्प्यात सराव चाचण्या सोडवण्यासाठी वेळ राखीव ठेवणे निर्णायक ठरते. सराव चाचण्यांद्वारेच त्या त्या टप्प्यासाठी आवश्यक क्षमता व कौशल्ये विकसित करता येतात. आपल्या तयारीतील कच्चे दुवे शोधून त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करता येतात आणि अभ्यासात परीक्षाभिमुखतेची हमी देता येते. त्यामुळे जसजसा अभ्यास पूर्ण होत जाईल, त्याप्रमाणे प्रारंभी विभागावर आणि नंतर संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित सराव चाचण्या सोडवाव्यात, परीक्षेसाठी आवश्यक वेळेचे नियोजन आणि आपल्या उत्तरातील नेमकेपणा, अचूकता आणि प्रभावीपणा यात टप्प्याटप्प्याने सुधारणा करण्यावर भर द्यावा.

अभ्यासाचे नियोजन करताना मुख्य परीक्षेच्या तयारीनेच आपल्या अभ्यासाची सुरुवात करावी. त्यानंतरच पूर्वपरीक्षेचा अभ्यास करावा. आपल्या अभ्यासात कोणत्याही एका विषयाला अनावश्यक जास्त वेळ किंवा कमी वेळ देणे शक्यतो टाळावे. त्या विषयाचे परीक्षेतील महत्त्व, अभ्यासक्रम, त्यासाठी वाचायची संदर्भपुस्तके आणि संबंधित विषयासंदर्भातील आपली स्थिती लक्षात घेऊनच प्रत्येक विषयास पुरेशा प्रमाणात वेळ निर्धारित करावा. म्हणजेच अतिशय व्यावसायिकपणे अभ्यासाचे नियोजन करणे गरजेचे ठरते.

त्याचप्रमाणे कोणत्याही विषयाचा अभ्यास सुरू केल्यानंतर प्रारंभी तो विषय समजून घेण्यावर भर द्यावा. त्यादृष्टीने विचार करता संबंधित विषयातील संकल्पना आणि कळीचे मुद्दे याच्या आकलनावर भर द्यावा. हे करताना आपल्या वाचनात जी विपुल माहिती सापडते ती अधोरेखित करावी, त्यावर प्रक्रिया करून मुद्दय़ांच्या स्वरूपात मांडून ठेवावी. मात्र पहिल्या वाचनावेळीच ती लक्षात राहिली पाहिजे असा अट्टहास धरू नये.

कारण प्रथम संकल्पना, विचार, कळीचे मुद्दे आणि अंतिमत: माहिती अशा क्रमाने अभ्यास करावा. माहिती प्रधान भाग एकदा वाचल्यानंतर लक्षात राहिलच असे नाही. त्याशिवाय परीक्षा जसजशी जवळ येईल त्या काळात अशा माहितीचे उजळणीद्वारा मजबुतीकरण करता येते. प्रारंभीच कोणत्याही विषयातील माहितीच्या जंजाळात न अडकता संबंधित विषयाचे आकलन करण्यावर भर द्यावा.

एका बाजूला संकल्पनात्मक स्पष्टीकरणानंतरच पुढील अभ्यास करावा आणि दुसऱ्या बाजूला माहितीप्रधान भागाच्या अभ्यासाची उजळणीद्वारा विशेष काळजी घ्यावी. त्याशिवाय प्रत्येक विषयाशी संबंधित चालू घडामोडीची तयारी समांतरपणे सुरू ठेवावी. उपरोक्त परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे वर्तमानपत्रे, नियतकालिके, वार्षकिी इ.च्या वाचनाद्वारे अभ्यासक्रमाशी संबंधित समकालीन आयामाची आपल्या तयारीत पुरेशा प्रमाणात दखल घेतली जात आहे हे पाहावे.

शेवटची बाब म्हणजे या परीक्षेच्या तयारीसाठी नियोजन गरजेचे आहे यात शंका नाही. मात्र आपण आखलेले नियोजन हे ताठर स्वरूपाचे असू नये, तर त्यात लवचीकता असावी. प्रत्यक्ष तयारी करताना विचारात न घेतलेले मुद्दे लक्षात आल्यास त्यानुसार बदल करण्यासाठी नियोजनात लवचीकता हवी. मात्र ते अतिलवचीक दराऐवजी, आठवडय़ास बदलणारेही असू नये. थोडक्यात, आपले नियोजन व्यावहारिक असावे याची खबरदारी घ्यावी.

एनसीईआरटी: कधी आणि किती?

ncert in upsc exam

9322   17-Jun-2018, Sun

एनसीईआरटी आणि यूपीएसससीची परीक्षा म्हणजे अगदी गहिरं नातं. एनसीईआरटीचा गंडा बांधल्याशिवाय स्पर्धा परीक्षा देणे तसे कठीणच. त्याविषयीची काही माहिती घेऊया.

नमन:-
एनसीईआरटी म्हणजे National Council for Education Research and Training. ही संस्था म्हणजे भारताच्या शिक्षणक्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था आहे. केंद्र व राज्य सरकारांना शिक्षणविषयक धोरणे ठरविण्यासाठी सल्ला देणे व सहाय्य करणे हे या संस्थेचे मुख्य कार्य. या संस्थेतर्फे प्रकाशित होणारी पुस्तके केंद्र सरकारच्या Central Board of Secondary Education (CBSE) या संस्थेच्या शाळांमध्ये क्रमिक पुस्तके म्हणून वापरली जातात आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षेला बसणारे विद्यार्थी त्याचा सगळ्यात जास्त वापर करतात. सोपी व सुलभ भाषा व प्रचंड संशोधन करून तयार केलेले अभ्यास साहित्य यामुळे ही पुस्तके ज्ञानाचा अमूल्य ठेवा आहेत. ही सर्व पुस्तके ncert.nic.in/ या वेबसाइट वर उपलब्ध आहेत. ती डाउनलोड करून वाचता येतात तसेच NCERT या app वरदेखील ती उपलब्ध आहेत.

स्पर्धा परीक्षेतील महत्त्व:-
स्पर्धा परीक्षेत या पुस्तकांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुख्यत: संकल्पना समजून घेण्यासाठी तर या पुस्तकांना पर्याय नाही. स्पर्धा परीक्षेत विविध विद्याशाखेच्या विद्यार्थांचा समावेश असतो. त्यामुळे एखाद्या अभियंत्याला अर्थशास्त्रातील संकल्पना समजून घ्यायची असेल, तर ही पुस्तके वरदान ठरतात. तसेच एखाद्या इतिहासाच्या विद्यार्थ्याला इतिहासातीलच एखादी घटना समजून घ्यायची असेल, तरीसुद्धा पुस्तके नक्कीच कामास येतात. परीक्षांमधील अनेक प्रश्नदेखील त्यातूनच विचारण्यात आलेले आढळले आहे. म्हणून या पुस्तकांचे खूप महत्त्व आहे. मात्र या पुस्तकांतूनच प्रश्न येतील, या भ्रमात राहू नये. तेव्हा एकदा का स्पर्धा परीक्षा देण्याचे ठरवले की, सगळ्यात आधी अभ्यासक्रम वाचावा आणि त्यानुसार आपण पुस्तकांची यादी तयार करताना त्या त्या विषयाचे कितव्या वर्गाचे पुस्तक वाचणार आहोत हे ठरवावे.

नवीन की जुने?
नवीन आवृत्ती वाचावी की जुनी (२००६च्या आधी की नंतर) हा सर्व स्पर्धकांना भेडसावणारा प्रश्न आहे. कारण या दोन्ही आवृत्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. या प्रश्नाला अनेक मतांतरे असू शकतात. पण इतिहासासाठी जुन्या आवृत्या जास्त उत्तम आहेत. भूगोलासाठी शक्यतो नवीन आवृत्या वाचाव्यात, कारण त्यातील माहिती ही ताजी असते. अर्थशास्त्रालादेखील तोच नियम लागू होतो. विज्ञान विषयाची मात्र कुठलीही वाचली, तरी काही हरकत नाही. तसेच कला व साहित्य या विषयासाठीही कोणत्याही आवृत्तीचे वाचले, तरी हरकत नाही

समज व गैरसमज:-
या पुस्तकांबद्दल अनेक समज व गैरसमजदेखील आहेत. गेल्या काही वर्षात या पुस्तकांचे महत्त्व वाढले आहे, यात शंका नाही. काही जण या पुस्तकांना अवास्तव महत्त्व देतात. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, ही पुस्तके फक्त पाया रचण्यासाठी असतात. कळस मात्र क्रमिक किंवा मुख्य पुस्तकांनीच चढवावा लागतो. ही पुस्तके परीक्षेच्या उत्तम तयारीसाठी नक्कीच सहाय्यभूत ठरतात. पण तेच सर्वस्व नाहीत. हल्ली अनेक प्रकाशक गोषवारा स्वरूपातदेखील पुस्तके छापतात. इंटरनेटवरदेखील ही पुस्तके उपलब्ध आहेत. मात्र या क्षणिक मोहात पडू नये. कारण मुख्य साहित्य वाचले नसेल, तर गोषवारादेखील समजत नाहीत आणि त्यात अनेक महत्त्वाचे मुद्दे सुटण्याची दाट शक्यता असते. तेव्हा या फंदात न पडलेले बरे. जुन्याच आवृत्याच उत्तम, असादेखील एक मतप्रवाह नेहमी बघायला मिळतो. आणि ती आवृत्ती मिळवण्याचा आटापिटा केला जातो. ज्याने फक्त वेळ आणि ऊर्जा खर्च होते. तेव्हा आपला वैकल्पिक विषय कोणता, उपलब्ध वेळ किती, या निकषांवर किती पुस्तके आपण वाचणार आहोत, हे ठरवावे.

राज्यसेवेचा अभ्यासक्रमदेखील यूपीएससीच्या समकक्ष झाला आहे. त्यामुळे आता राज्यसेवेलादेखील महाराष्ट्र बोर्डाचे पुस्तक वाचून भागणार नाही. तेव्हा एकूणच स्पर्धा परीक्षेच्या यशापयशात या पुस्तकांचा मोठा वाटा आहे, ही गोष्ट पक्की ध्यानात असू द्यावी.

 

यूपीएससी: मुख्य परीक्षा विशिष्ट क्षमतांची गरज

UPSC main exam

4108   14-Jun-2018, Thu

 • विद्यार्थी मित्रहो, यूपीएससीसारख्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी सर्वसाधारण क्षमतांबरोबर काही विशिष्ट क्षमतांचा विकास अत्यावश्यक ठरतो. या लेखात त्यातील प्रमुख क्षमतांचा विचार करणार आहोत. व्यापक अर्थाने विचार केल्यास विशिष्ट अभ्यासक्रमावर आधारित कोणत्याही स्पर्धात्मक अथवा बिगर स्पर्धात्मक परीक्षेसाठी पायाभूत म्हणून आवश्यक ठरणारी वाचन व आकलनक्षमता यूपीएससी परीक्षेतही कळीची ठरते.
 • तसे पाहिल्यास कोणत्याही साक्षर व्यक्तीस आपापल्या भाषेतील साहित्य वाचता येतेच. परंतु यूपीएससीसारख्या तीव्र स्पर्धात्मक आणि गतिशील स्वरूपाच्या परीक्षेत संदर्भ साहित्यातील लेखनाचा शब्दार्थाच्या पलीकडे जाऊन त्यामागील व्यापक संदर्भ, त्याचा मथितार्थ व गर्भितार्थ, त्यातून पुढे येणारे संकेत, प्रतीकात्मक अर्थ अशा विभिन्न अंगांनी वाचन-आकलनाची मर्मग्राही पद्धत विकसित करावी लागते. म्हणजे लेखनातून प्रतीत होणारे विविध अर्थ जाणून घेण्याची सवयच अंगी बाणवावी लागते.
 • थोडक्यात कोणत्याही बाबीचे वाचन सखोल, व्यापक आणि चिकित्सक दृष्टिकोनातून केलेले असावे. अशा व्यापक दृष्टीवर आधारित वाचन सवयीमुळे आपल्या आकलनशक्तीचा अपेक्षित विस्तार साधता येतो.
 • उपरोक्त चíचलेल्या वाचन-आकलन प्रक्रियेशी अभिन्नपणे जोडलेली एक महत्त्वाची क्षमता म्हणजे विचारक्षमता होय. यूपीएससी परीक्षेचा अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिका समकालीन आणि गतिशील स्वरूपाचा असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीची कसोटी पाहणाऱ्याच ठरतात. किंबहुना अभ्यासलेल्या घटकावर किती विचार केलेला आहे आणि त्याची चिकित्सा करण्याची क्षमता पुरेशी विकसित झाली आहे किंवा नाही ही बाब पूर्वपरीक्षेपासून मुलाखतीपर्यंतच्या टप्प्यात निर्णायक ठरते.
 • त्यामुळे आपल्या वाचनात येणाऱ्या प्रत्येक संदर्भाचा निष्क्रियपणे स्वीकार न करता त्यातील संकल्पना, माहिती, विश्लेषण याचा कारण-परिणाम संबंध पाहावा आणि ‘एखादी बाब अशीच का आहे’ असा चिकित्सक विचार करावा.
 • प्रभावी लेखनक्षमता (सादरीकरण/लेखी अभिव्यक्ती) ही आणखी एक महत्त्वाची क्षमता होय. यूपीएससी परीक्षेतील मुख्य परीक्षेच्या टप्प्यात या लेखनक्षमतेस अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण एकूण १७५० गुणांची मुख्य परीक्षा ही लेखी स्वरूपाची असून त्यात प्राप्त होणारे गुण विद्यार्थ्यांच्या यशात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. मुख्य परीक्षेत आकलनक्षमता पायाभूत ठरते, यात शंका नाही.
 • परंतु विविध संदर्भाद्वारे विकसित केलेले हे आकलन लेखी उत्तराच्या स्वरूपात सादर करण्याचे कौशल्यही तेवढेच, किंबहुना त्यापेक्षाही महत्त्वाचे ठरते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. लेखनक्षमतेचा आशयात्मक आणि अभिव्यक्ती अशा दोन्ही अंगांनी विचार करावा लागतो. वरील भागात अधोरेखित केलेली वाचन-आकलन-विचारक्षमता लेखनातील आशयात्मक अंगाची काळजी घेईलच. परंतु अभिव्यक्ती म्हणजेच लेखी सादरीकरणाच्या कौशल्याचा स्वतंत्रपणे विचार करणे महत्त्वाचे ठरते. यात व्याकरणदृष्टय़ा योग्य वाक्यरचना, विरामचिन्हांचा अपेक्षित वापर, समर्पक शब्दप्रयोग व पारिभाषिक शब्द, साधी परंतु अर्थवाही भाषा, मांडणीतील सलगता आणि सुसंगती, लेखनातील सुसंघटितपणा, समर्पक पद्धतीने आलेख, आकृत्यांचा वापर, महत्त्वाच्या बाबींना अधोरेखनासारख्या साधनांद्वारे दिलेली दृश्यात्मकता आणि मांडणीतील नेमकेपणा या महत्त्वाच्या घटकांचा समावेश होतो.
 • अलंकारिक आणि क्लिष्ट भाषा म्हणजेच प्रभावी भाषा असा बऱ्याच विद्यार्थ्यांचा समज असतो. परंतु साधी, सुलभ परंतु अर्थवाही भाषा हे तत्त्व यूपीएससीच्या बाबतीतही लागू होते हे लक्षात घ्यावे. अर्थात या कौशल्याचा विकास साधण्यासाठी भरपूर वाचन आणि लेखनाचा नियमित सराव जरुरी ठरतो. नियमित आणि सातत्यपूर्ण लेखन सरावाद्वारेच मुख्य परीक्षेतील प्रश्नांचे निर्धारित शब्दमर्यादेत प्रभावीपणे उत्तर लिहिता येईल.
 • यूपीएससी परीक्षेतील मुलाखत म्हणजेच व्यक्तिमत्त्व चाचणीच्या बाबतीत महत्त्वाची ठरणारी क्षमता म्हणजे संवादकौशल्य होय. मुलाखतीसाठी आवश्यक संवादकौशल्याचाही आशय आणि तोंडी अभिव्यक्ती अशा मुख्य दोन अंगांनी विचार करता येतो. यातील अभिव्यक्ती या दुसऱ्या आयामात आपली देहबोली; भाषा; आवाजाची पातळी, त्यातील चढउतार; योग्य श्रवणक्षमता व बोलण्यातील नेमकेपणा, इ. प्रमुख बाबींचा समावेश होतो. अर्थात बोलण्याच्या सातत्यपूर्ण सरावाद्वारेच प्रभावी अभिव्यक्ती क्षमता विकसित करता येऊ शकते.

मुख्य परीक्षेची तयारी

upsc main exam

2792   12-Jun-2018, Tue

 • विद्यार्थी मित्र-मत्रिणींनो, गेल्या महिन्यात ‘यूपीएससी २०१७’ परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला. त्यात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घेऊन अनेक नव्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला असणार, यात शंका नाही. दुसऱ्या बाजूला मागील आठवडय़ात म्हणजे १८ जूनला (यूपीएससी) पूर्वपरीक्षा देऊन आलेले विद्यार्थीही आता मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी सज्ज झालेले असणार. म्हणूनच या दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून आजपासून यूपीएससी मुख्य परीक्षेची सविस्तर चर्चा करणार आहोत.
 • यूपीएससी परीक्षेतील पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तिन्ही टप्प्यांसाठी अभ्यासक्रमातील विषयांचे पद्धतशीरपणे केलेले ‘आकलन’ ही मूलभूत बाब ठरते यात शंका नाही. तथापि, या परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यात आकलनक्षमतेबरोबरच दुसरी एखादी विशिष्ट क्षमता व कौशल्य अत्यावश्यक ठरते. त्या दृष्टीने विचार करता यूपीएससी मुख्य परीक्षेत लेखनक्षमतेचा विकास केवळ आवश्यकच नाही तर निर्णायकही ठरतो.
 • केंद्र लोकसेवा आयोगाने म्हटल्याप्रमाणे मुख्य परीक्षा ही संपूर्णत: लेखी स्वरूपाची परीक्षा आहे. विद्यार्थ्यांचे पात्र होणे अथवा अपात्र ठरणे हे मुख्य परीक्षेतील गुण आणि मुलाखतीत प्राप्त केलेले गुण यावरच ठरते. मुख्य परीक्षेसाठी १७५० तर मुलाखतीसाठी २७५ गुण निर्धारित केले आहेत.
 • स्वाभाविकच, मुख्य परीक्षा हा अनन्यसाधारण व निर्णायक टप्पा आहे, यात दुमत असण्याचे कारण नाही. त्यामुळे या टप्प्यासाठी आवश्यक लेखनक्षमतेचा विकास करणे अत्यंत जरुरीचे ठरते. मुख्य परीक्षेचे स्वरूप नेमकेपणाणे लक्षात येण्यासाठी तिच्या महत्त्वपूर्ण आयामांचा व वैशिष्टय़ांचा परामर्श घेणे उपयुक्त ठरेल.
 • मुख्य परीक्षेतील प्रत्येक प्रश्नासाठी गुणमर्यादा नमूद केलेली असते. संबंधित प्रश्न किती गुणांसाठी आहे, यानुसारच उत्तर लिहिणे श्रेयस्कर ठरते. एखाद्या घटकाविषयी आपल्याकडे असणारी अतिरिक्त माहिती उत्तरात लिहिणे कटाक्षाने टाळावे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर किती शब्दमर्यादेत लिहायचे आहे, हेदेखील प्रश्नपत्रिकेत नमूद केलेले असते. या शब्दमर्यादेचे भान ठेवूनच उत्तराचा आकार ठरवावा लागतो.
 • मुख्य परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न विविध स्वरूपाचे असतात. स्पष्ट करा, वर्णन करा, उलगडून दाखवा, भाष्य करा, टिप्पणी करा, परीक्षण करा, मूल्यमापन करा, मीमांसा करा, चिकित्सक चर्चा करा, तुम्हास मान्य आहे का, भवितव्य सांगा, उपाययोजनांचा आढावा घ्या. इ अशा कमालीच्या विविध तऱ्हांनी प्रश्न विचारले जातात. त्यामुळे उत्तर लिहिताना संबंधित प्रश्न काळजीपूर्वक वाचून, त्याची मागणी लक्षात घेऊन त्याच्याशी सुसंगत प्रतिपादन तयार करावे लागते.
 • त्यासाठी प्रश्नातील मध्यवर्ती शब्द काय आहे, त्याचा रोख काय आहे हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते. अर्थात, यामध्ये प्रश्न योग्य रीतीने समजून घेण्याची आकलनशक्ती जशी महत्त्वाची ठरते, तसेच त्यानुसार लेखन करण्याची क्षमतादेखील अत्यावश्यक ठरते.
 • निबंधाच्या स्वतंत्र पेपरमध्ये दोन विषयांवर निबंध लिहायचे असतात. या पेपरसाठी आवश्यक लेखनशैली प्राय: वर्णन – स्पष्टीकरण – विश्लेषणात्मक असते. तांत्रिकतेला यात फारसा वाव नसतो. त्यामुळे निबंधाची रचना प्रस्तावनेपासून मुख्य गाभा ते समारोपापर्यंत परिच्छेदाच्या स्वरूपात करून आपल्या प्रतिपादनात सुसूत्रता, सुसंगती, सलगता या बाबींची हमी द्यावी लागते.
 • मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषयांवरील प्रश्नांची उत्तरेदेखील प्राय: निबंधवजा लिहिणे अभिप्रेत असते. म्हणजेच प्रत्येक उत्तर मुद्दय़ांच्या स्वरूपात, तांत्रिकपणे लिहिणे अपेक्षित नसते.
 • त्यातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरे निबंधाप्रमाणे परिच्छेदाच्या स्वरूपात सुरुवातीपासून समारोपापर्यंत सलगता व सुसंगती राखत विकसित करावी लागतात. अर्थात काही वैकल्पिक विषयांमध्ये मुद्दय़ांच्या स्वरूपातील उत्तराची अपेक्षा असते, मात्र वैकल्पिक विषयातील सर्वच प्रश्नांची उत्तरे सामान्य अध्ययनाप्रमाणे मुद्दय़ांच्या स्वरूपात लिहिणे गरजेचे नसते.
 • सामान्य अध्ययनाच्या चार पेपर्सपकी पहिले तीन पेपर निराळ्या स्वरूपाचे (ज्यात विषय, त्याचा अभ्यासक्रम, त्यावर आधारित प्रश्न अशी एक चौकट असते) असतात आणि ‘नतिकता, सचोटी आणि दृष्टिकोन’ हा चौथा पेपर बऱ्याच अंशी भिन्न असतो. पहिल्या तीन पेपरमध्ये अनुक्रमे २५, २० आणि २० तर चौथ्या पेपरमध्ये १४ प्रश्न विचारले जातात.
 • चौथ्या पेपरमध्ये प्रश्नांची संख्या कमी असते. कारण या पेपरचा अभ्यासक्रम आणि त्यावर विचारले जाणारे प्रश्न विद्यार्थ्यांच्या विचारक्षमतेचा पुरेपूर कस पाहणारे असतात. विद्यार्थी अभ्यासक्रमातील संकल्पना आणि विचार यांचे उपयोजन करू शकतो का? आजच्या स्थितीत त्यांचे महत्त्व प्रस्थापित करू शकतो का? परिस्थितीजन्य प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो का? विविध प्रसंग आणि प्रकरणांत कसा निर्णय घेतो? अशा विविध प्रकारे विद्यार्थ्यांची विचारशक्ती तपासली जाते. म्हणूनच सामान्य अध्ययनाचा चौथा पेपर हा विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व आजपर्यंत कसे घडले आहे, याचे मूल्यमापन करू पाहतो. त्यामुळे या पेपरमधील उत्तरे निराळ्या पद्धतीने लिहावी लागतात.
 • एकंदर मुख्य परीक्षेचा विचार करता प्रश्नासाठी निर्धारित गुण, शब्दमर्यादा आणि प्रश्नाचे स्वरूप या बाबी लक्षात घेऊन तीन तासांत संपूर्ण पेपर सोडवणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी लेखनाचे कसब विकसित करावे लागते.

यूपीएससी मानसिक कणखरतेची कसोटी

test of mental strength

6574   06-Jun-2018, Wed

विद्यार्थीहो, आपण गेल्या सुमारे वर्षभरात यूपीएससी पूर्वपरीक्षेपासून ते मुलाखतीपर्यंतच्या शेवटच्या टप्प्याची तयारी कशी करावी याविषयी सविस्तर चर्चा केली. आज प्रस्तुत लेखमालेचा शेवट करताना एका बाजूला विविध क्षमतांची उजळणी तर दुसऱ्या बाजूला या परीक्षेसाठी आवश्यक मानसिकतेविषयी जाणून घेणार आहोत.

एकतर या परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला आपण प्रशासकीय/नागरी सेवा करिअर म्हणून का निवडत आहोत याबाबत स्पष्टता हवी. याचा विचार करता विविध पदावर कार्यरत अधिकारी, त्यांचा अनुभव, नुकतेच यशस्वी ठरलेले विद्यार्थी, मार्गदर्शक यांच्याशी चर्चा करणे अत्यावश्यक ठरते.

त्याचप्रमाणे या परीक्षेचा अभ्यासक्रम, स्वरूप, विविध टप्पे लक्षात घेता या परीक्षांची तयारी जाता जाता ‘टाइमपास’ म्हणून करता येत नाही. कारण या परीक्षेची व्याप्ती आणि स्पर्धा पाहता जाता जाता केलेली तयारी पुरेशी ठरणार नाही हे नक्की! म्हणूनच या परीक्षेची तयारी ही एक गंभीर बाब आहे. त्यासाठी किमान वर्षभर दररोज सुमारे १० तास अभ्यास अत्यावश्यक ठरतो. त्यानंतर मात्र तुम्ही नोकरी सांभाळत या परीक्षेची तयारी करू शकता. थोडक्यात पर्याप्त काळासाठी पूर्ण वेळ करावयाची बाब म्हणूनच या स्पर्धा परीक्षांकडे पाहणे जरुरीचे आहे.

यूपीएससीचे स्वरूप, विविध टप्पे आणि व्यापक अभ्यासक्रम यामुळे नियोजनाची आखणी आणि महत्त्वाचे म्हणजे त्याची योग्य अंमलबजावणी हा घटक या परीक्षेत मध्यवर्ती ठरतो. म्हणूनच आपण या परीक्षेतील कोणत्या टप्प्याचा केव्हा व किती काळ अभ्यास करणार आहोत, अभ्यासक्रमातील कोणत्या घटकाचा अभ्यास करणार आहोत याचे १ वर्ष, ६ महिने, ३ महिने, १५ दिवस, १ आठवडा, १ दिवस व तासांचे असे सखोल व सविस्तर नियोजन करावे. या वेळापत्रकाची आणि नियोजनाची ठरल्याप्रमाणेच अंमलबजावणी व्हावी यावर कटाक्ष ठेवावा.

कधीकधी नियोजनात काही बदल करावे लागतात, तेव्हा त्यामध्ये लवचीकताही राखायला हवी. त्यादृष्टीने प्रत्येक विद्यार्थ्यांने वेळेचे भान ठेवणे अगत्याचे ठरते. एकूणच विद्यार्थ्यांला एक नियोजनबद्ध प्रक्रियाच हाती घ्यावी लागते. सभोवताली वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभने असतात. त्या सर्वाचा त्याग करून विद्यार्थ्यांला अत्यंत निर्धारपूर्वक अभ्यास व वेळेचे नियोजन अमलात आणावे लागते.

यूपीएससी परीक्षेच्या तयारीतील एक कळीची बाब म्हणजे ‘अभ्यासातील सातत्य’. काही दिवस भरपूर अभ्यास, त्यानंतर खंड अशी मानसिकता उपयोगाची नाही. वेळेचा आलेख हा संतुलितच हवा. हे सातत्य टिकवण्यासाठी विद्यार्थ्यांची जिद्द व चिकाटीच कामी येते. सातत्यपूर्ण व चिकाटीने अभ्यास करून अभ्यास व वेळेचे नियोजन काटेकोरपणे पाळल्यासच या परीक्षेत अनन्यसाधारण ठरणारा ‘आत्मविश्वास’ विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतो.

विद्यार्थ्यांत आत्मविश्वास नसेल तर चांगला अभ्यासदेखील अपुरा ठरतो. या उलट आत्मविश्वासाच्या जोरावर अनेक विद्यार्थी कठीण परिस्थितीतून सहीसलामत यशस्वीपणे बाहेर पडू शकतात. म्हणून अभ्यासाला आत्मविश्वासाची जोड ही हवीच.

यूपीएससीची परीक्षा अनेक टप्प्यांची आहे. त्यात अनेक अभ्यासघटक आहेत. त्यातही चालू घडामोडीचा भाग महत्त्वाचा. त्यामुळे एखादी बाब परीक्षेच्या कोणत्या टप्प्यासाठी (पूर्व, मुख्य वा मुलाखत) तयार करत आहोत याचे भान हवे. त्यामुळे परीक्षेच्या स्वरूपानुरूप अभ्यासाला दिशा द्यावी लागते. वर्तमानपत्रे, मासिके वाचत असताना एखादे लेखन सामान्य अध्ययन, वैकल्पिक विषय, निबंध अथवा मुलाखत यापकी कोणकोणत्या बाबींसाठी उपयुक्त ठरेल याचा सतत विचार करायला हवा. म्हणजेच विद्यार्थ्यांचा अभ्यास हा योग्य दिशेने व नेमकेपणाने होत आहे असे म्हणता येते.

त्यादृष्टीने वेळोवेळी सराव चाचण्या देणे अत्यावश्यक ठरते. त्यातून स्वतच्या तयारीचा दर्जा, पातळी तपासता येते. स्वत:च्या उणिवा शोधून त्यावर मात करता येते. म्हणजेच विद्यार्थ्यांने स्वत:च्या तयारीकडे सजगपणे पाहून त्याचे वेळोवेळी मूल्यांकन करण्यावर भर द्यावा. थोडक्यात सतत सुधारणा व उत्तम तयारी कशी करता येईल याचा ध्यास हवा.

यूपीएससी परीक्षेद्वारा प्रशासक निवडले जातात. या प्रशासकांना निरनिराळ्या प्रकारच्या समस्या हाताळाव्या लागतात. स्वाभाविकच त्यांच्याकडे निर्णयक्षमता ही असलीच पाहिजे. एखाद्या समस्येकडे सर्वागीण पद्धतीने पाहून त्याविषयी समन्यायी, संतुलित निर्णय घ्यावा अशी अपेक्षा असते.

यूपीएससीची मुख्यपरीक्षा व मुलाखतीत विद्यार्थ्यांच्या नेमक्या याच क्षमतेची व कौशल्याची चाचपणी केली जाते. म्हणजे विद्यार्थ्यांला सभोवताली काय चालले आहे याचे भान तर हवेच, मात्र त्याविषयी स्वत:चा एक व्यापक, समन्यायी दृष्टिकोनही हवा. म्हणूनच संपूर्ण परीक्षेच्या तयारीत बंदिस्त पद्धतीने अभ्यास न करता आपली विचारशक्ती सतत सजग व विकसित होत जावी याची काळजी घेणे गरजेचे ठरते. मुख्य परीक्षेतील ‘मत अजमावणारे प्रश्न’, निबंधाचा स्वतंत्र पेपर आणि ‘व्यक्तिमत्त्व चाचणी’ या टप्प्यात ही क्षमता निर्णायक ठरते.

यूपीएससीसारख्या स्पर्धात्मक परीक्षेत पहिल्या प्रयत्नातच यश मिळेल याची खात्री नसते. त्यामुळे दुसऱ्यांदा कधी कधी तिसऱ्या-चौथ्यांदा परीक्षा द्यावी लागते. आपल्या नातेवाईकांच्या, मित्रमंडळीच्या अपेक्षांमुळे आणखीनच दडपण येते. इतर मित्र यात यशस्वी होताना स्वतला मात्र अपयश पदरी आल्याने निराशाजनक विचारही मनात येतात. अशा वेळी अपयशाने खचून न जाता त्याची योग्य ती कारणमीमांसा करणेच उपयुक्त ठरते. म्हणूनच सहनशीलता, उच्च मनोधर्य व ‘संयम’ ही गुणवैशिष्टय़ेच विद्यार्थ्यांच्या मदतीस धावून येतात. उपरोक्त क्षमतांचा विकास करून ती आपल्या व्यक्तिमत्त्वात रुजवणारी कणखर व दृढनिश्चयी मानसिकताच विद्यार्थ्यांना या परीक्षेत अत्यंत उपयुक्त ठरते, असे म्हणता येईल.

सनदी सेवेचे स्वरूप आणि तयारी

civil services formats and preparation

16233   28-May-2018, Mon

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) भारतीय प्रशासनातील उच्चतम सनदी सेवांची पदे भरण्याकरिता दरवर्षी नियमितपणे परीक्षांचे संचालन करते. या सेवेतील विकास, महसूल, पोलीस, परराष्ट्र सेवा अशी विविध पदे; या पदांना दिलेले व्यापक अधिकार, शासकीय सेवेतील कार्यकाळाची शाश्वती, आपल्या अधिकारपदाद्वारे सामाजिक हस्तक्षेप करून सकारात्मक बदल घडवून आणण्याची मनीषा अशा विविध कारणांमुळे संपूर्ण देशभरातून लाखो विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जातात.

प्रशासकीय अथवा सनदी सेवकांची भरती करण्यासाठी केंद्र लोकसेवा आयोगाद्वारे जी परीक्षा आयोजित केली जाते त्या यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचे स्वरूप लक्षात घेणे ही प्राथमिकदृष्टय़ा महत्त्वाची बाब ठरते.

या परीक्षेला स्पर्धात्मक परीक्षा संबोधले जाते आणि ही परीक्षा अनेक अर्थाने इतर परीक्षांपेक्षा निराळी आहे. एकतर आयोगाद्वारे जाहीर केलेल्या पदसंख्येइतकेच विद्यार्थी अंतिम यादीत पात्र ठरवले जातात.

तथापि परीक्षेला अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र ६-७ लाख एवढी असते. परिणामी इतरांच्या तुलनेत प्रभावी पद्धतीने अभ्यास करून अंतिम यादीत नाव येण्यासाठी म्हणजेच अपेक्षित पद प्राप्त होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठाच करावी लागते.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या परीक्षेचे व्यापक स्वरूप. यामध्ये पूर्व, मुख्य आणि मुलाखत असे केवळ तीन टप्पे तर आहेतच पण या परस्परांपासून वेगळे स्वरूप असणाऱ्या तीन भिन्न पायऱ्या आहेत. पूर्व परीक्षा हा प्रारंभीचा टप्पा वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित आणि नकारात्मक गुणपद्धती असणारा आहे.

मुख्य परीक्षा हा दुसरा टप्पा मात्र पूर्णत: लेखी स्वरूपाचा आहे.

त्यात निर्धारित गुण आणि शब्दमर्यादेत विचारलेल्या प्रश्नांची लेखी उत्तरे लिहायची असतात. शेवटी येणारा टप्पा म्हणजे मुलाखत होय. यात उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाचीच जणू चाचणी घेतली जाते.

उपरोक्त तिन्ही टप्पे भिन्न असल्याने त्या त्या टप्प्यासाठी लागणारी गुणवैशिष्टय़े भिन्न ठरतात. परिणामी त्यासाठी विशिष्ट स्वरूपाची अभ्यासपद्धती अवलंबणे गरजेचे ठरते.

या प्रत्येक टप्प्याचे स्वरूप जितक्या लवकर आणि सखोलपणे लक्षात येईल, त्या प्रमाणात विद्यार्थ्यांना अभ्यासाची गुणवत्ता वृिद्धगत करता येईल. त्या दृष्टीने विचार करता आयोगाने निर्धारित केलेला अभ्यासक्रम, मागील ७-८ वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण अत्यंत साहाय्यभूत ठरते.

सनदी सेवा परीक्षेचे स्वरूप लक्षात घेतल्यास पुढे येणारी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे चालू घडामोडींचा सविस्तर अभ्यास. पूर्वपरीक्षेपासून मुलाखतीपर्यंतच्या सर्वच टप्प्यांत निरनिराळ्या प्रकारच्या चालू घडामोडीवरील प्रश्नांची तयारी करणे अनिवार्य ठरते. त्यासाठी वर्तमानपत्रांचे नियमित वाचन, काही नियतकालिकांचा आणि निवडक संकेतस्थळांचा आधार घ्यावा लागतो. चालू घडामोडींची तयारी करताना माहिती, तथ्ये, आकडेवारी या बाबी महत्त्वाच्या तसेच विश्लेषणात्मक आयामदेखील महत्त्वाचे असतात.

सनदी सेवा परीक्षेचे आणि एक मध्यवर्ती वैशिष्टय़ म्हणजे तिचे गतिशील स्वरूप. आयोगाने निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमावर दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात.

थोडक्यात त्याच अभ्यासक्रमावर विभिन्न प्रकारचे प्रश्न विचारले जातात. विद्यार्थ्यांच्या विचारक्षमतेची कसोटी पाहणारे हे वैशिष्टय़ आहे. म्हणून अभ्यासाच्या सुरुवातीपासूनच उमेदवारांना आपल्या विचारशक्तीचा विशेषत: चिकित्सक विचार क्षमतेचा विकास होईल याकडे लक्ष द्यावे लागते.

अशा रीतीने, सनदी सेवा परीक्षेतील ३ टप्पे, त्यातील विषयांचा अभ्यासक्रम आणि आयोगाच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका या आधारे नागरी सेवा परीक्षेचे स्वरूप योग्य रीतीने समजून घेता येईल. त्या त्या टप्प्याची मागणी आणि गरज लक्षात घेऊन सुसंगत क्षमतांचा विकास करण्यावर लक्ष केंद्रित करता येईल.

यूपीएससीची तयारी : प्रश्नांचा आढावा

UPSC Preparation: Review of the questions

3957   24-May-2018, Thu

आजच्या लेखात आपण या घटकातील शाश्वत विकास, गरिबी, समावेशन, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी नमूद मुद्दय़ांवर गतवर्षीय पूर्व परीक्षांमध्ये (२०११-२०१७) विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांचा आढावा आधी घेऊ या.

गतवर्षीय प्रश्न आणि त्यांचे स्वरूप

२०११ मध्ये खालीलपैकी कोण सरकारच्या सर्वसमावेशक वाढीच्या उद्देशाला साहाय्यकारी ठरू शकते? असा प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि खालील तीन विधाने देण्यात आलेली होती आणि यातील योग्य विधान/विधाने कोणती हे ओळखून पर्याय निवडायचा होता.

१)स्वयंसाहाय्यता बचत गटाचा प्रसार.

२)सूक्ष्म, छोटी आणि मध्यम उपक्रम प्रसार

३)शिक्षणहक्क कायद्याची अंमलबजावणी

स्पष्टीकरण : हा प्रश्न थेट सर्वसमावेशक वाढीशी संबंधित आहे. या प्रश्नाचे स्वरूप जरी वस्तुनिष्ठ वाटत असले तरी सर्वसमावेशक वाढ या धोरणाची योग्य माहिती असल्याखेरीज याचे अचूक उत्तर देणे कठीण जाते.

उपरोक्त सर्व विधाने ही स्वतंत्र स्वरूपाची वाटतात त्यामुळे सर्वसमावेशक वाढ ही संकल्पना नेमकी काय आहे? याचे प्रकार अथवा वैशिष्टय़े कोणती आहेत? यामध्ये सरकारच्या कोणत्या ध्येयधोरणाचा अंतर्भाव होतो? याची मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे. याचे उत्तर ‘वरील सर्व विधाने’ असे आहे. कारण सरकारच्या सर्वसमावेशक वाढीच्या धोरणाचा मुख्य उद्देश समाजातील विकासापासून दूर असलेल्या सामान्य आणि वंचित घटकाचे आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण करणे हा आहे आणि ही तिन्ही विधाने आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण साध्य करण्यासाठी साहाय्यभूत ठरतात.

थोडक्यात सर्वसमावेशक वाढ ही संकल्पना गरिबी निर्मूलन, उत्तम आरोग्य सेवा, सर्वासाठी प्राथमिक शिक्षण तसेच उच्चशिक्षणामध्ये वाढ करणे, कौशल्य विकास, आर्थिक समावेशन, शाश्वत विकास इत्यादीशी संबंधित आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचे आकलन करणे गरजेचे आहे.

२०१२ मध्ये, Oxford Poverty and Human Development Initiative यांनी वठऊढ च्या मदतीने विकसित केलेल्या मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स (Multi Dimensional Poverty Index)  यामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा अंतर्भाव आहे? असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. यासाठी तीन विधाने देण्यात आलेली होती व यातील योग्य विधान/विधाने कोणती याची निवड करून पर्याय निवडायचा होता.

१) घरपोच शिक्षण, आरोग्य, मालमत्ता आणि सेवा यापासून वंचित.

२) राष्ट्रीय स्तरावरील क्रयशक्ती साम्य.

३) राष्ट्रीय स्तरावरील तुटीच्या अर्थसंकल्पाचे प्रमाण आणि स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) वाढीचा दर.

स्पष्टीकरण : या प्रश्नाचे आकलन करताना या निर्देशांकाचे घटक कोणते आहेत, तसेच यासाठी कोणते निकष ठरविण्यात आलेले आहेत, याचबरोबर या निर्देशकांचा मानवी विकास निर्देशांकासोबत काय संबंध आहे इत्यादी महत्त्वाच्या पलूंचा विचार करणे महत्त्वाचे आहे.

या प्रश्नाचे स्वरूप वस्तुनिष्ठ प्रकारात मोडणारे आहे, यामुळे याच्याशी संबंधित माहिती असल्याखेरीज याचे अचूक उत्तर देता येणार नाही. याचे उत्तर ‘विधान पहिले’ हे आहे व तसेच या निर्देशांकामध्ये क्रयशक्ती साम्य, स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) वाढीचा दर इत्यादीचा मोजमाप करण्यासाठी समावेश केला जात नाही.

२०१३ मध्ये, ‘जनसांख्यिकीय लाभांशाचे संपूर्ण फायदे प्राप्त करण्यासाठी, भारताने काय करणे क्रमप्राप्त आहे?’ असा प्रश्न विचारण्यात आलेला होता व यासाठी खालील चार पर्याय देण्यात आलेले होते.

१) कौशल्य विकास प्रसार,

२) अधिक प्रमाणात सामाजिक सुरक्षा योजना सुरू करणे,

३) बालमृत्यू दरामध्ये घट करणे आणि

४) उच्चशिक्षणाचे खासगीकरण करणे

स्पष्टीकरण : सर्वप्रथम या प्रश्नाचे योग्य आकलन होण्यासाठी ‘जनसांख्यिकीय लाभांश’ ही संकल्पना काय आहे याची माहिती असणे गरजेचे आहे. सद्य:स्थितीमध्ये भारत हा जगातील सर्वाधिक तरुण व्यक्तीचा आणि क्रयशक्ती असणारा देश आहे आणि याचा उपयोग देशाच्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त कसा करता येऊ शकतो अशा अनुषंगाने याचे आकलन करणे गरजेचे आहे आणि हे उपलब्ध मनुष्यबळ जर कुशल आणि सुशिक्षित असेल तर याचा अर्थव्यवस्थेला खूप मोठा फायदा होऊ शकतो. म्हणून ‘कौशल्य विकास कार्यक्रमाचा प्रसार’ हे या प्रश्नाचे  योग्य उत्तर आहे.

२०१५ मध्ये, ‘Bio Carbon Fund Initiative for Sustainable Forest Landscape  हा फंड कोण व्यवस्थापित करते,’ आणि  ‘Rio+20 Conference  काय आहे?’ असे दोन प्रश्न विचारण्यात आलेले होते.

२०१६ मध्ये रहअअटध् या भारत सरकारच्या उपक्रमावर प्रश्न विचारण्यात आलेला होता व या उपक्रमाचे उद्दिष्ट काय आहे हे दिलेल्या पर्यायातून निवडायचे होते. तसेच २०१७ मध्ये, ‘National Nutrition Mission ची उद्दिष्टे काय आहेत’ असा प्रश्न विचारण्यात आलेला होता.

या घटकावर बहुपर्यायी (टउद) पद्धतीचे प्रश्न अधिक विचारले जातात. या घटकावर विचारण्यात आलेले प्रश्न हे या घटकाचे वस्तुनिष्ठ स्वरूप ग्राह्य धरून विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे या घटकाचे योग्य आकलन करणे आणि संबंधित मुद्दय़ांविषयी वस्तुनिष्ठ माहितीचे संकलन करून अभ्यास करणे अधिक उपयुक्त ठरणारे आहे.

या घटकाची तयारी करण्यासाठी लागणारे संदर्भसाहित्य –

या घटकाची परीक्षाभिमुख तयारी करण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीचे इयत्ता ११वीचे Indian Economic Development  आणि इयत्ता १२ वीचे Macro Economics  ही पुस्तके वाचावीत. ज्यामुळे या घटकाची मूलभूत माहिती आपणाला समजते तसेच या घटकाचा सखोल अभ्यास करण्यासाठी बाजारामध्ये अनेक संदर्भग्रंथ उपलब्ध आहेत, यातील उमा कपिला लिखित  Indian Economy: Economic Development and Policy, दत्त आणि सुंदरम लिखित Indian Economy  हे संदर्भग्रंथ या घटकांचा सखोल अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरतात. तसेच या घटकांशी संबंधित चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी योजना मासिक आणि द िहदू व इंडियन एक्स्प्रेस ही इंग्रजी वर्तमानपत्रे वाचावीत.

यूपीएससी (पूर्वपरीक्षा)- तयारी यूपीएससीची -2

UPSC (Preliminary Examination) - Preparation UPSC-2

10241   22-Mar-2018, Thu

प्रथम एमपीएससीची तयारी करून यूपीएससीची तयारी करावी की फक्त यूपीएससीची तयारी करावी? 

स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या मनात हा संभ्रम असतो. या प्रश्नाचे प्रत्येक तज्ज्ञाचे उत्तर वेगवेगळे असू शकेल. काहींच्या मते, यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी फक्त यूपीएससीची तयारी करावी. त्यांनी एमपीएससीची तयारी करण्यामध्ये वेळ वाया घालवू नये. व्यावहारिक पातळीवर बोलायचे झाले तर या दोन्ही परीक्षा परस्परांना पूरक आहेत. एमपीएससीची तयारी जर यूपीएससीच्या दृष्टिकोनातून केली तर दोन्ही पदांच्या परीक्षेसाठी तयारी होते. जर एखाद्या परीक्षेत अपयशी झालात तर दुसऱ्या परीक्षेच्या माध्यमाद्वारे पर्याय उपलब्ध असतो.


दर वर्षी एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी बसतात. तुलनेने जागांची संख्या कमी असल्याने खूप चांगला अभ्यास करूनही यश प्राप्त होईलच, याची शाश्वती नसते. अशा वेळी दोन्ही परीक्षांची तयारी करत असाल तर दोन्ही परीक्षांमध्ये यश मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करता येतात. ज्यांना यूपीएससीची तयारी करायची आहे त्यांनी यूपीएससीच्या दृष्टिकोनातून एमपीएससीची तयारी करावी. अभ्यासक्रमाचे सखोल विश्लेषण केले तर लक्षात येईल की, दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम सारखाच आहे. फक्त यूपीएससीसाठी एका वैकल्पिक विषयाचा अभ्यास करावा लागतो.
 

यूपीएससी पूर्वपरीक्षेची तयारी : कशी? केव्हापासून?
खरेतर सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी पदवी परीक्षेच्या प्रथम वर्षांपासूनच सुरुवात करावी. पदवी मिळेपर्यंत या परीक्षेसाठी अभ्यासाव्या लागणाऱ्या पुस्तकांचे वाचन होणे आवश्यक आहे. या परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या घटकांची तयारीदेखील या काळात पूर्ण करता येईल. उदा. काही विद्यार्थ्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व नसेल तर या तीन वर्षांच्या काळात इंग्रजीच्या लेखन-वाचनाचा सराव करून त्यावर प्रभुत्व मिळवता येईल. जे विद्यार्थी लिखाणात मागे आहेत, त्यांना लेखनावर काम करता येईल. या परीक्षेसाठी अवांतर वाचन करणे आवश्यक आहे. ते या कालावधीत पूर्ण होऊ शकेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘एनसीईआरटी’ची पाचवी ते बारावीपर्यंतची पुस्तके वाचून काढता येतील. थोडक्यात, या कालावधीत अभ्यासाची पूर्वतयारी केली तर पदवी मिळेपर्यंत जवळपास ८० टक्के अभ्यास आरामात पूर्ण होईल आणि यश मिळण्याची शक्यता वाढेल.
मात्र बऱ्याचदा या परीक्षेची माहिती विद्यार्थ्यांना उशिरा कळते. त्यामुळे अनेकांची या परीक्षेची तयारी पदवीनंतर सुरू होते. या वेळी निराश न होता, ‘जब जागे तब सबेरा’ या नियमानुसार अभ्यासाला सुरुवात करावी.
* ज्यांना तयारीला सुरुवात करायची आहे त्यांनी सर्वप्रथम पाचवी ते दहावीपर्यंतची ‘एनसीईआरटी’ची पुस्तके सविस्तर वाचावीत. हा तयारीचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे.
* यानंतर अभ्यासक्रम समजून घेऊन काही महत्त्वाच्या पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे. उदा. आधुनिक भारताच्या इतिहास- बिपिनचंद्र, स्वातंत्र्योत्तर भारत- बिपिनचंद्र, भारतीय राज्यघटना- एम. लक्ष्मीकांत, भारताचा भूगोल- माजिद हुसन, जिऑग्री थ्रू मॅप- के. सिद्धार्थ, विज्ञान आणि तंत्रज्ञान- विझार्ड पब्लिकेशन तसेच अर्थशास्त्रासाठी सर्वप्रथम अर्थशास्त्राच्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी दत्ता आणि सुंदरम किंवा रमेश सिंग यांची पुस्तके वाचावीत.
* वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन करण्यापेक्षा वर उल्लेख केलेल्या मूलभूत पुस्तकांचे सखोल वाचन तीन ते चार वेळा केल्यास परीक्षार्थीना अधिक फायदा होईल. परीक्षेसंबंधी उपलब्ध असलेले सर्व अभ्याससाहित्य वाचणे आवाक्याच्या पलीकडचे ठरेल. गेल्या दोन वर्षांचे मुख्य परीक्षेचे पेपर पाहिल्यास सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे ज्यांना यूपीएससीची तयारी करायची असेल त्यांनी लिखाणाचा अधिकाधिक सराव करावा.
नोकरी करून यूूपीएससी परीक्षेचा अभ्यास करायला जमेल का?
नोकरी करून यूपीएससी परीक्षा द्यायची असेल तर लक्षात ठेवायचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही स्पर्धापरीक्षा आहे. संपूर्ण देशभरातून या परीक्षेला सुमारे १०-१२ लाख विद्यार्थी बसतात. शक्य असल्यास या परीक्षेच्या तयारीसाठी एक वर्ष पूर्णवेळ अभ्यास करणे आवश्यक आहे. 

सी सॅट पेपर २ चे महत्त्व :-
या पेपरमध्ये जास्त गुण मिळू शकले तरच यूपीएससी पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होता येते, हे लक्षात ठेवावे.

यूपीएससी (पूर्वपरीक्षा)- तयारी यूपीएससीची

UPSC (Preliminary Examination) - Preparation UPSC

3952   22-Mar-2018, Thu

संघ लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी स्पर्धापरीक्षेच्या माध्यमातून आयएएस,आयपीएस,आयएफएस यांसारख्या किमान १६ प्रकारच्या पदांसाठी परीक्षा घेतली जाते. गेल्या काही वर्षांपासून संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेचा व संघ लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षांचा अभ्यासक्रम सारखा आहे. फरक एवढाच की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना या दोन परीक्षांसाठी स्वतंत्र अभ्यास करावा लागत नाही. एमपीएससीच्या मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पाहिला तर हा अभ्यासक्रम आाि संघ लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम अगदीच भिन्न आहे, असे नाही. मात्र, यूपीएससीचे मुख्य परीक्षेतील पेपर वर्णनात्मक असतात. या दोन्ही परीक्षांची तयारी बरोबरच सुरू केली तर या परीक्षांमध्ये यश मिळवणे सुकर होते. दोन्ही परीक्षांच्या पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम सारखाच आहे. मात्र, यूपीएससी मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप हे वर्णनात्मक असते.

यूपीएससी परीक्षेची तयारी करताना इंग्रजीचा न्यूनगंड :

यूपीएससीची मुख्य परीक्षा आपण मराठीत लिहू शकतो. (इंग्रजी वगळता सर्व प्रश्नपत्रिका) त्यामुळे विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा न्यूनगंड बाळगण्याचे कारण नाही. मुलाखतदेखील मराठीत देता येते. मात्र इंग्रजीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. यूपीएससीची मुख्य परीक्षा मराठीतून देता येत असली तरी ३०० गुणांची एक इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका अनिवार्य असते. एमपीएससी परीक्षेत १०० गुणांची इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका असते. यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत जर अनिवार्य इंग्रजीच्या पेपरात अनुत्तीर्ण झालात, तर इतर पेपर तपासले जात नाहीत. 
एमपीएससीच्या १०० गुणांच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये कमी गुण मिळाले तर अंतिम गुणवत्ता यादीत आपले स्थान प्राप्त करू शकत नाही. त्यासाठी इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करावा. यूपीएससीचे अनेक संदर्भग्रंथ इंग्रजीत असतात. त्यांचे सखोल वाचन होण्यासाठी उत्तम इंग्रजी येणे महत्त्वाचे ठरते. जे विद्यार्थी मराठीत प्रश्नपत्रिका लिहिणार असतील त्यांनीही मराठी दैनिकांबरोबर एक-दोन इंग्रजी दैनिकांचे नियमित वाचन करावे. टी.व्ही.वरील आंतरराष्ट्रीय घडामोडींसंदर्भात जे महत्त्वाचे टॉक शॉ होतात, ते जरूर पाहावेत. 


एमपीएससीची तयारी करून यूपीएससीची तयारी करावी की फक्त यूपीएससीची तयारी करावी?
काही तज्ज्ञांच्या मते, यूपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी फक्त यूपीएससीची तयारी करावी. त्यांनी एमपीएससीची तयारी करण्यामध्ये वेळ वाया घालवू नये. मात्र, व्यावहारिक पातळीवर बोलायचे झाले तर या दोन्ही परीक्षा परस्परांना पूरक आहेत. एमपीएससीची तयारी जर यूपीएससीच्या दृष्टिकोनातून केली तर दोन्ही पदांच्या परीक्षांची तयारी होते. दर वर्षी एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेला लाखो विद्यार्थी बसतात. जागांची संख्या कमी आहे, म्हणून कधी कधी खूप चांगला अभ्यास करूनही काही विद्यार्थ्यांना यश प्राप्त होत नाही. अशा वेळी दोन्ही परीक्षांची तयारी करत असाल तर मनावरचा ताण हा कमी असतो. दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम सारखाच आहे. फक्त यूपीएससीसाठी एका वैकल्पिक विषयाचा अभ्यास करावा लागतो.

यू. पी. एस. सी. : मुख्य परीक्षा व मुलाखत

upsc mains and interview

7371   25-Jan-2018, Thu

मुख्य परीक्षा : 
 

स्वरूप - लेखी परीक्षा : या परीक्षेत पेपरनुसार प्रश्नसंख्या बघून व वेळेचे नियोजन करून पेपर सोडविणे महत्त्वाचे असते. 
प्रश्न संख्या व गुणांचे वितरण : प्रश्नसंख्या व गुणांचे वितरण हे प्रत्यक्षात पेपर हातात आल्यावर विद्यार्थ्यांनी सूचना वाचून त्यानुसार ते लिहिणे अपेक्षित असते. जास्तीत जास्त प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे ठरते. 
मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका अभ्यासणे हितकारक : विद्यार्थ्यांनी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका बघून त्याचे विश्लेषण करणे गरजेचे आहे. त्यातून प्रश्न कसे विचारले जातात याबद्दलची संकल्पना अधिक स्पष्ट होत जाते. 
चालू घडामोडींचे महत्त्व : एकंदर ‘चालू घडामोडी’ या स्पर्धा परीक्षेचा ‘आत्मा’ म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे महत्त्व परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर अनन्यसाधारण असे आहे. मुख्य परीक्षेचा विचार केल्यास चालू घडामोडींचा अभ्यास खूप महत्त्वाची भूमिका बाजवतो. गेल्या ४ वर्षांतील प्रश्नपत्रिका पाहिल्यास चालू घडामोडींचा पगडा दिसून येतो.

वैकल्पिक विषय व त्याचे महत्त्व : एकंदरीत अंतिम गुणवत्ता यादीतील स्थानाचा विचार केल्यास एक बाब समोर येते ही म्हणजे यात ‘सिंहाचा वाटा’ असणारी वैकल्पिक विषयाची भूमिका या विषयात प्रामाणिकपणे अभ्यास केल्यास जास्तीत जास्त गुण मिळवून अंतिम यादीत स्थान पटकावणे सहज शक्य होते. यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत:ची आवड, आकलन व गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा विचार करून वैकल्पिक विषय निवडावा, कारण ५०० गुणांसाठी असणारा वैकल्पिक विषय परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. 
अनिवार्य भाषा पेपर : या पेपरमध्ये किमान २५% म्हणजेच ३०० पैकी ७५ गुण मिळाल्यास उमेदवार पात्र ठरतो. या पेपरचे गुण गुणवत्ता यादीसाठी ग्राह्य धरले जात नाहीत. याचा अर्थ फक्त ७ पेपरचे म्हणजेच ‘१७५०’ गुणांचा विचार करून उमेदवार 
मुलाखतीस पात्र ठरवला जातो. 

लिखाणाचा सराव महत्त्वाचा : विद्यार्थ्यांनी अधिकाधिक लिखाणाचा सराव करणे अपेक्षित असून त्या लिखाणाचे मूल्यमापन करणे गरजेचे ठरते. नियमित सराव केल्यास यशाची खात्री मिळण्याची शक्यता वाढीस लागते.  
 

मुलाखत (गुण २७५) :

लेखी परीक्षेतून मुलाखतीस पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची मुलाखत नवी दिल्ली येथे यू.पी.एस.सी. द्वारे घेतली जाते. मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांने मुख्य परीक्षेच्या वेळी स्वत:बद्दलची यु.पी.एस.सी.ला दिलेली माहिती Detailed Application form (DAF) मध्ये असते. तसेच चालू घडामोडींचा विचारही मुलाखतीसाठी महत्त्वाचा असतो. खरं तर ही ज्ञानासाठी नसून व्यक्तिमत्त्वाची चाचणी असते. कारण विद्यार्थ्याने पूर्व व मुख्य परीक्षा उत्तीर्ण करून ज्ञानाची परीक्षा दिलेली असते. मुलाखतीमध्ये प्रामाणिकपणे उत्तरे देणं अपेक्षित असतं. जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर तस स्पष्ट सांगणेही गरजेचे असते. 
मुलाखतीत मिळणारे गुण व मुख्य परीक्षेतील गुण यांची बेरीज करून अंतिम गुणवत्ता यादी यूपीएससीद्वारे जाहीर केली जाते. पूर्व परीक्षेतील गुणांचा विचार अंतिम गुणवत्ता यादीसाठी केला जात नाही. अशाप्रकारे यूपीएससी परीक्षेतील हे तीन्ही टप्पे एकाच वर्षांत सलगरीत्या यशस्वीपणे पार केल्यास; गुणवत्तेच्या आधारे केंद्र सरकारच्या विविध २४ सेवांपैकी एका सेवेत रुजू होण्याची व आयुष्याला नवे वळण देण्याची संधी विद्यार्थ्याला मिळते.


Top

Whoops, looks like something went wrong.