
2286 24-Jun-2018, Sun
- स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (सिपरी) अहवालानुसार भारत, चीन आणि पाकिस्तान या देशांनी गेल्या वर्षभरात अण्वस्त्रांच्या संख्येत वाढ केली असल्याची आकडेवारी समोर आली आहे.
- आशियातील या तीन प्रमुख देशांनी गेल्या वर्षभरात अण्वस्त्र यंत्रणा अधिक सुसज्ज केली असून अण्वस्त्रांच्या संख्येतही वाढ केली आहे.
- सध्या हे तिन्ही देश अत्याधुनिक आणि लहान अण्वस्त्रांच्या विकासावर भर देत असल्याचे सिपरीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
- गेल्या वर्षी चीनकडे असणाऱ्या अण्वस्त्रांची संख्या २७० इतकी आहे. आता ती वाढून २८० वर पोहोचली आहे.
- भारताकडे सध्याच्या घडीला १३०-१४० अण्वस्त्र असून पाकिस्तानकडे असलेल्या अण्वस्त्रांची संख्या १४०-१५० इतकी आहे. अण्वस्त्रांच्या संख्येचा विचार केल्यास पाकिस्तान आत्ताही भारताच्या पुढे आहे.
- गेल्या वर्षभरात या तिन्ही देशांनी त्यांच्या अण्वस्त्रांच्या ताफ्यात प्रत्येकी १० अण्वस्त्रांनी वाढ केली आहे. मात्र यातील कोणतेही अण्वस्त्र डागण्यासाठी क्षेपणास्त्रात लावण्यात आलेले नाही.
- आशिया खंडात अण्वस्त्र स्पर्धा सुरू असताना पाश्चिमात्य देशांमध्ये मात्र स्थिरता आहे, असे निरीक्षण सिपरीने नोंदवले आहे.
- अण्वस्त्रांच्या बाबतीत संपन्न असलेल्या देशांनी आपल्याकडील अण्वस्त्रांच्या संख्येत कपात केली किंवा स्थिर ठेवली आहे.
- या अहवालानुसार, जागतिक शक्ती असलेले देश अण्वस्त्रांची संख्या कमी करत असले तरी त्यांचे आधुनिकीकरण आणि मारक क्षमता वाढवित आहेत.
- अमेरिकेने अण्वस्त्रांची संख्या ६,८०० हून ६,४८० केली आहे. तर रशियानेही अण्वस्त्रांची संख्या ७,०००हून कमी करुन ६,८५० केली आहे.
- जगभरातील अण्वस्त्र संपन्न देशांकडे सद्यस्थितीला १४,४६५ अण्वस्त्र आहेत. गेल्या वर्षी हा आकडा १४,९३५ इतका होता. यातील ९२ टक्के अण्वस्त्रे फक्त अमेरिका आणि रशियाकडे आहेत.