एमपीएससी मंत्र : मनुष्यबळ विकासातील संकल्पना व घटक

mpsc notes

3209   27-May-2017, Sat

जगाच्या लोकसंख्येपकी एकूण १६% लोक भारतात राहातात व भारताच्या लोकसंख्येचा भाग हा ‘तरुण’ गटात मोडतो. यादृष्टीने भारताची लोकसंख्या ही समस्या नसून तिच्याकडे Demographic Dividend म्हणून पाहण्याकडे कल वाढत आहे.

या Demographic Dividend चा लाभ देशाला व्हावा यासाठी या लोकसंख्येचे कुशल मनुष्य बळामध्ये रूपांतर होणे आवश्यक आहे. यादृष्टीने मानवी संसाधन विकास ही देशाच्या प्रगतीसाठीची मूलभूत आवश्यकता ठरते. या व पुढील लेखांमध्ये ‘मानवी संसाधन विकास’ घटकाच्या अभ्यासाबाबत चर्चा करण्यात येत आहे.

या घटकातील मूळ संकल्पना आहे मनुष्यबळाच्या विकास. मनुष्यबळाची कल्पना आधी समजून घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने ‘उत्पादक व कुशल मनुष्यबळ’ ही संकल्पना लक्षात घ्यावी – ‘कार्यकारी’ लोकसंख्या म्हणजे मनुष्यबळ असे सर्वसाधारणपणे म्हणता येईल. यासाठी आधी ‘लोकसंख्येची’ वैशिष्टय़े समजून घ्यायला हवीत. जनगणना २०११अहवालाचा अभ्यास कशाप्रकारे करावा याची चर्चा यापूर्वीच करण्यात आली आहे.

देशाची व महाराष्ट्राची सन २००१ची जनगणनासुद्धा यादृष्टीने महत्त्वाची आहे. वेगवेगळ्या मुद्दय़ांबाबत सन २००१ व २०११च्या स्थितीची तुलना करणारे प्रश्न विचारण्यात आले आहेत. सन २००१ व २०११ च्या तुलनेचे टेबल तयार केल्यास ते लक्षात ठेवणे सोपे होईल. रोजगाराबाबतच्या संकल्पना, व्याख्या समजून घ्यायला हव्यात. मागे चर्चा केल्याप्रमाणे त्यांच्या तथ्यात्मक बाबी, आकडेवारी व टक्केवारीचा अभ्यास केलेला असल्यास विश्लेषणात्मक अभ्यासामध्ये मदत होते.

मनुष्यबळ विकासासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध असणे ही आवश्यक गोष्ट आहे. ग्रामीण विकासाच्या विविध योजनांच्या माध्यमातून व शासनाच्या विविध विभागांकडून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. यातील सुविधा व मानवी जीवनासाठी आवश्यक बाबी यांच्यापासून वंचित राहिल्यास लोकसंख्येचे मानवी संसाधनामध्ये रूपांतर होण्यास मर्यादा येतात. या दृष्टीने SECC(सामाजिक, आíथक व जातिगत जनगणना)ची आकडेवारी अत्यंत महत्त्वाची आहे. यातील आपोआप समावेशाचे, आपोआप वगळण्याचे तसेच या दोन निकषांव्यतिरिक्त ठरविण्यात आलेले वंचिततेचे निकष हे मनुष्यबळ विकासाच्या मार्गातील समस्यांच्या रूपात अभ्यासणे आवश्यक आहेत.

या जनगणना अहवालातील या सर्व निकषांबाबतची शहरी, ग्रामीण व एकत्रित अशी महत्त्वाची आकडेवारी तसेच देशाची व महाराष्ट्राची आकडेवारी/ टक्केवारी पहावी.

मनुष्यबळ विकासाची गरज व आवश्यकता ही देशाच्या तसेच वैयक्तिक दृष्टिकोनातूनही पहाणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमामध्ये मनुष्यबळ विकासाचे चार मुद्दे समाविष्ट करण्यात आले  आहेत – शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, आरोग्य व ग्रामीण विकास. या मुद्दय़ांच्या तयारीबाबतची चर्चा टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे.

आरोग्य

या घटकामध्ये पोषण, स्वच्छता, रोगनिवारण व नियंत्रण तसेच आरोग्य सुविधा या मुद्दय़ांचा विचार आवश्यक आहे. हा घटक अभ्यासताना जीवशास्त्राचाही अभ्यास असणे उपयुक्त ठरते. जीवशास्त्रामधील पोषण व रोगनिवारण या घटकांचा व्यवस्थित अभ्यास गरजेचा आहे. मानवी वाढीसाठी आवश्यक असलेली पोषक खनिजे, व्हिटॉमिन्स इत्यादींची गरज, स्त्रोत, त्यांच्या अभावाने होणारे रोग यांच्या नोट्स टेबलध्ये घेता येतील. याव्यतिरिक्त महत्त्वाचे संसर्गजन्य, साथीचे रोग त्यांची कारणे, लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, उपचार व असल्यास त्यांच्या निवारणासाठीच्या शासकीय योजना व त्यांचे स्वरूप अशा सर्व मुद्दय़ांच्या अनुषंगाने अभ्यासायला हवेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, आशा, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, उषा, इंद्रधनुष्य अभियान इत्यादींचा बारकाईने अभ्यास आवश्यक आहे. स्वच्छतेसंबंधीची सद्यस्थिती, आर्थिक पाहणी अहवालामधून पाहता येईल.

यादृष्टीने ‘स्वच्छ भारत योजना’ महाराष्ट्रातील ‘संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता योजना’, ‘निर्मल ग्राम योजना’ इत्यादींचा आढावा मागील लेखांमध्ये सांगितल्याप्रमाणे घेणे आवश्यक आहे. महिला व बालकांचे आरोग्य व पोषणाचे महत्त्व, त्याबाबतचे विविध अहवाल व आकडेवारी समजून घ्यायला हवी. मागील लेखामध्ये चर्चा केल्याप्रमाणे माता मृत्यूदर, अर्भक व बालमृत्यूदर इत्यादी तथ्यात्मक बाबींचा आढावा आर्थिक पाहणी अहवालामधून घ्यायला हवा. माता-बालकांच्या आरोग्यविषयीच्या विविध योजनांचा अभ्यास आवश्यक आहे.

एमपीएससी मंत्र : मानवी हक्क  (भाग ३)

एमपीएससी मंत्र : मानवी हक्क  (भाग ३)

4414   25-May-2017, Thu

अभ्यासक्रमामध्ये काही व्यक्तिगट स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहेत व त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण समस्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. महिला, बालके, युवक, वृद्ध, अपंग व्यक्ती, सामाजिकदृष्टय़ा मागास प्रवर्ग, आदीम जमाती, कामगार व आपत्तीग्रस्त/ प्रकल्पग्रस्त व्यक्ती असे हे व्यक्ती गट आहेत. या व्यक्तिगटांची वैशिष्टय़े व त्यांच्याशी संबंधित महत्त्वाच्या संकल्पना, व्याख्या इत्यादी व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर या व्यक्तिगटांच्या समस्यांचा मुद्देसूद अभ्यास सुरू करायला हवा. सामाजिकदृष्टया मागास प्रवर्गामध्ये अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), भटक्या / विमुक्त जमाती (VJ/NT), इतर मागास प्रवर्ग (OBC) या सामाजिक घटकांचा स्वतंत्र व समांतरपणे अभ्यास आवश्यक आहे. या सामाजिक घटकांबाबत राज्यघटनेमध्ये असलेल्या तरतुदींचा नोट्समध्ये समावेश करावा व हे संदर्भ इतर विश्लेषणात्मक मुद्यांचा अभ्यास करताना नेहमी लक्षात ठेवावेत.

या प्रत्येक व्यक्तिगटासाठी शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक इत्यादी प्रकारच्या समस्यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. या प्रत्येक प्रकारासाठी समस्येचे स्वरूप, कारणे, परिणाम, उपाय, संबंधित संस्था, संघटना, आयोग, राबविण्यात येणाऱ्या योजना असे पलू पहायला हवेत. समस्यांची कारणे व परिणामांबाबत आवश्यक अभ्यासाबाहेरचे वाचन स्वतचे विश्लेषण, चिंतन असा अभ्यास आवश्यक आहे.

उपायांचा विचार करताना विविध कायदे, शासकीय योजना, आंतरराष्ट्रीय संस्था व त्यांचे प्रस्ताव तसेच घोषणा व करार यांचा समावेश करायला हवा. शासकीय योजनांचा अभ्यास करताना पुढील मुद्दे विचारात घ्यावेत.

*   शिफारस करणारा आयोग / समिती

*   योजनेचा उद्देश

*   योजनेबाबतचा कायदा

*   पंचवार्षकि योजना

*   योजनेचा कालावधी

*   योजनेचे स्वरूप व बारकावे

*   लाभार्थ्यांचे निकष

*   खर्चाची विभागणी

*   अंमलबजावणी यंत्रणा

*   योजनेचे मूल्यमापन.

मूळ कायदे वाचून त्यातील महत्त्वाच्या तरतुदींच्या नोट्स काढणे बहुविधानी प्रश्न सोडविण्यामध्ये उपयोगी ठरते. या पेपरमधील काही कायदे पेपर २ मध्येही समाविष्ट आहेत. त्यामुळे त्यांचा एकत्रित अभ्यास उपयोगी ठरेल.

शासकीय उपाय तसेच भारत सदस्य असलेल्या आंतरराष्ट्रीय संस्था/ संघटनांचे कार्य हा पायाभूत अभ्यास झाला. या क्षेत्रातील ज्या अशासकीय संस्थांच्या कार्याबाबत राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा/उल्लेख होत असेल त्या संस्थांच्या कार्याची माहिती असणे आवश्यक आहे. मानवी हक्क आणि मानव संसाधन विकास या दोन्ही क्षेत्रांशी संबंधित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार, त्यांचे स्वरूप, पुरस्कार मिळविणाऱ्या व्यक्ती/ संस्था या बाबी पाहणेही आवश्यक आहे.

पेपर ४ मध्ये पंचवार्षकि योजनांचा अभ्यास करताना या व्यक्ती गटांशी संबंधित कार्यक्रम, योजना किंवा धोरणाचा समावेश असेल तर त्या पंचवार्षकि योजनेचा संदर्भ देऊन त्या कार्यक्रम/योजना किंवा धोरणाचा त्या त्या व्यक्तिगटासाठीच्या नोट्समध्ये समावेश करावा.

कुठल्याही सामाजिक व्यक्तिगटामध्ये समाविष्ट नसलेला मात्र विशिष्ट हक्क असणारा एक गट म्हणजे ‘ग्राहक’. यासाठी ग्राहक संरक्षण अधिनियमातील तरतुदींचा अभ्यास आवश्यक आहे. या कायद्याच्या अनुषंगाने ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंच/संस्थांचा अभ्यास पुढील मुद्दय़ांच्या आधारे करावा –

*   संस्थेतील विविध पातळ्या

*   प्रत्येक पातळीवरील मंचाची रचना

*   प्रत्येक पातळीवरील मंचाची कार्यपद्धती

* प्रत्येक पातळीवरील मंचाचे अधिकार, जबाबदाऱ्या, काय्रे इत्यादी.

ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींचा अभ्यास पेपर २ मध्ये करण्यात आलेला असेलच. मात्र नोट्सचा वापर पेपर २ व ३ या दोन्हीसाठी करायला हवा. या संपूर्ण अभ्यासामध्ये प्रत्येक उपघटक / सामाजिक व्यक्तिगटाच्या हक्कांशी / गरजांशी संबंधित चालू घडामोडींचा अभ्यास अत्यंत आवश्यक आहे.

‘मानवी हक्क’ घटकाची संपूर्ण अभ्यासपद्धती मागील लेखांमध्ये विषद करण्यात आली. पुढील लेखांमध्ये’मानव संसाधन विकास’ या उपघटकाच्या अभ्यासाचे धोरण व अभ्यासपद्धती विषयी चर्चा करण्यात येईल.

एमपीएससी मंत्र : मानव संसाधन विकास अभ्यासक्रमाचे विश्लेषण

mpsc mains hrd notes

6720   13-May-2017, Sat

भारतातील मानव संसाधन विकास अभ्यास –

तथ्यात्मक अभ्यास – भारतातील लोकसंख्येची सद्य:स्थिती – संख्यात्मक स्वरूप (आकारमान आणि वाढ – िलग, वय, नागरी आणि ग्रामीण) आणि गुणात्मक स्वरूप (शिक्षण व आरोग्यविषयक), बेरोजगारीचे स्वरूप आणि प्रकार, सेवायोजनाचा कल, विभिन्न विभागांतील व क्षेत्रातील कुशल कामगारांचे मागणी दर.

संकल्पनात्मक अभ्यास – आधुनिक समाजातील मानव संसाधन नियोजनाचे महत्त्व आणि गरज, मानव संसाधन नियोजनामध्ये अंतर्भूत घटक आणि कारणीभूत गोष्टी, मानव संसाधन विकासाशी संबंधित समस्या आणि बाबी, भारतातील बेरोजगारीची समस्या.

पारंपरिक अभ्यास – मनुष्यबळ विकासाकरिता कार्यरत असलेल्या शासकीय आणि स्वयंसेवी संघटना उदा. एनसीईआरटी, एनआयईपीए, विद्यापीठ अनुदान आयोग, मुक्त विद्यापीठे, एआयसीटीई, एनसीटीई, आयटीआय, एनसीव्हीटी, आयएमसी इत्यादी. लोकसंख्याविषयक धोरण आणि २०५० पर्यंतच्या योजना, शासनाचे नोकरीविषयक धोरण, बेरोजगारी आणि न्यून बेरोजगारी कमी करण्यासाठी योजना.

शिक्षण –

संकल्पनात्मक अभ्यास – मानव संसाधन विकासाचे आणि सामाजिक बदलाचे साधन म्हणून शिक्षणाचा विचार, भारतातील शिक्षण प्रणाली (पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण), मुलींकरिता शिक्षण, सामाजिकदृष्टय़ा व आíथकदृष्टय़ा गरीब वर्ग, अधू, अल्पसंख्य, कौशल्य शोध इत्यादी, शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, शिक्षणाचे व्यवसायिकीकरण, दर्जावाढ, गळतीचे प्रमाण इत्यादी समस्या आणि प्रश्न, ई-अध्ययन, जागतिकीकरण आणि खासगीकरण याचा भारतीय शिक्षणावरील परिणाम.

पारंपरिक अभ्यास – राष्ट्रीय ज्ञान आयोग, राष्ट्रीय उच्च शिक्षण व संशोधन आयोग, आयआयटी, आयआयएम, एनआयटी. अनौपचारिक, औपचारिक आणि प्रौढ शिक्षणाचा प्रसार विनियमन आणि सनियंत्रण करणाऱ्या शासकीय व स्वयंसेवी संस्था, शासनाची शैक्षणिक धोरणे, योजना व कार्यक्रम.

व्यावसायिक शिक्षण –

संकल्पनात्मक अभ्यास – मानव संसाधन विकासाचे साधन म्हणून व्यावसायिक शिक्षणाचा विचार, समस्या, प्रश्न व त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न.

तथ्यात्मक अभ्यास – व्यावसायिक / तंत्र शिक्षण – भारतातील, विशेषत: महाराष्ट्रातील सद्य:स्थिती.

पारंपरिक अभ्यास – शिक्षणप्रणाली व प्रशिक्षण, व्यावसायिक आणि तंत्र शिक्षणाचा प्रसार, विनियमन करणाऱ्या आणि अधिस्वीकृती देणाऱ्या संस्था. शासकीय धोरणे, योजना व कार्यक्रम.

आरोग्य –

संकल्पनात्मक अभ्यास – मानव संसाधन विकासाचा अत्यावश्यक आणि प्रमुख घटक म्हणून आरोग्याचा विचार, जीवनविषयक आकडेवारी, भारतामध्ये आरोग्याशी संबंधित समस्या आणि त्यावर मात करण्यासाठीचे प्रयत्न.

पारंपरिक अभ्यास – भारतामध्ये आरोग्यविषयक काळजी घेणारी यंत्रणा, शासनाची आरोग्यविषयक धोरणे, योजना आणि कार्यक्रम, जननी – बाल सुरक्षा योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान. जागतिक आरोग्य संघटना – उद्देश, रचना, काय्रे व कार्यक्रम.

ग्रामीण विकास –

संकल्पनात्मक अभ्यास – ग्रामपंचायत आणि ग्रामविकासातील पंचायत राज व्यवस्थेची भूमिका, पंचायत राज व्यवस्थेला अधिकार प्रदान करणे.

तथ्यात्मक अभ्यास – ग्रामीण क्षेत्रातील पायाभूत विकास उदा. ऊर्जा, परिवहन, गृहनिर्माण व दळणवळण.

पारंपरिक अभ्यास – जमीन सुधारणा व विकास, ग्रामविकासातील सहकारी संस्थांची भूमिका, ग्रामविकासामध्ये अंतर्भूत असणाऱ्या वित्तीय संस्था, ग्रामीण रोजगार योजना, ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना.

अभ्यास कमी वेळेत व चांगल्या प्रकारे व्हावा या दृष्टीने अभ्यासक्रमातील घटकांची अशी विभागणी केल्यास ती उपयोगी ठरेल. आपला अभ्यास परिणामकारकपणे होण्यासाठी वेगळ्या पद्धतीने त्याचे नियोजनही करता येईल. या विभाजनाचा उपयोग मुद्दे समजून घेण्यासाठी चांगल्या रीतीने होऊ शकतो. संकल्पना आणि मुद्दे नीट समजले की त्यांचे वेगवेगळे आयाम, त्यांचे उपयोजन या बाबी सोप्या होतात. विभाजित अभ्यासक्रमाप्रमाणे अभ्यास कसा करावा याची चर्चा पुढील लेखांमध्ये करण्यात येईल.


Top