Card image cap

18 Jul 2020


कृषी सेवा परीक्षा चालू घडामोडी आणि संगणक तंत्रज्ञान

महाराष्ट्र कृषी सेवा पूर्वपरीक्षेमधील ‘चालू घडामोडी’ आणि ‘संगणक तंत्रज्ञान’ या घटकांची तयारी कशा प्रकारे करावी याबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

चालू घडामोडी

 •   साधारणपणे परीक्षा कालावधीपूर्वीच्या आठ ते दीड महिना अशा कालावधीतील घडामोडींवर आधारित प्रश्न विचारण्यात आलेले आहेत.
 •  राज्यव्यवस्थेशी संबंधित चालू घडामोडींबाबत घटनात्मक तरतुदी, तशी प्रत्यक्ष तरतूद नसल्यास कायदेशीर बाजू समजून घेणे आवश्यक आहे. चर्चेतील विधेयके आणि कायदे यांमधील तरतुदी बारकाईने समजून घ्याव्या आणि यासाठी मूळ दस्तावेज वाचणे हाच उत्तम पर्याय आहे.
 •   व्यक्तिविशेष, शासकीय योजना यांबाबत नेमकेपणाने व शक्यतो बहुविधानी प्रश्न विचारण्यात आले आहेत.
 • चर्चेतील व्यक्ती, निधन, नेमणुका, आपापल्या क्षेत्रात वैशिष्टय़पूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्तींबाबत त्यांचे कार्यक्षेत्र, वैशिष्टय़पूर्ण कामगिरी, नियुक्त्या, बढती असल्यास महत्त्वाच्या पदावरील निवड, प्राप्त पुरस्कार यांचा आढावा घ्यायला हवा. त्यांचे कार्य, संस्था, पुस्तके, प्रसिद्ध विधाने यांची जास्तीतजास्त माहिती करून घेणे आवश्यक आहे.
 • मागील पाच ते सात वर्षांमधील शासकीय योजनांचे उद्दिष्ट, सुरू झालेले वर्ष, तरतुदी, लाभार्थ्यांचे निकष, अंमलबजावणी यंत्रणा, असल्यास अपवाद, असल्यास कालमर्यादेतील उद्दिष्टे यांचे टेबल करावे.
 •  चित्रपट, संगीत, पत्रकारिता, प्रशासन, संशोधन, शैक्षणिक क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त व्यक्ती माहीत असाव्यात. भारतातील व्यक्तींना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले असल्यास त्यांच्याबाबतची अतिरिक्त माहिती असणे आवश्यक आहे. पद्म पुरस्कारप्राप्त व्यक्ती व त्यांचे कार्यक्षेत्र, शौर्य पुरस्कारप्राप्त व्यक्ती माहीत असाव्यात.
 • महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार, राज्य स्तरावरील महत्त्वाची संमेलने यांची माहिती असायला हवी.
 •   भारताचे शेजारी देशांशी असलेले विवाद किंवा नवे संयुक्त प्रकल्प, करार यांचा परिपूर्ण आढावा घेणे आवश्यक आहे. यामध्ये संबंधित प्रकल्पाचे भौगोलिक स्थान, संबंधित सीमावर्ती राज्य, प्रकल्पाचा फायदा, असल्यास त्याबाबतचे चर्चेतील मुद्दे यांचा आढावा घ्यावा.
 •  संरक्षण घटकामध्ये भारत व इतर देशांचा संयुक्त युद्धाभ्यास यांचे कोष्टक पाठच करावे. दरवर्षी अभ्यासाचे ठिकाण आणि कालावधी अद्ययावत करणे इतकाच उजळणीचा भाग मग शिल्लक राहतो. भारतातील शस्त्रास्त्रे व संरक्षण यंत्रणा यांचे नाव, प्रकार, वैशिष्टय़, वापर, विकसित करणारी संस्था, असल्यास अद्ययावत चाचणीचे परिणाम या मुद्दय़ांची टिप्पणे काढावीत.
 •  उपग्रह प्रक्षेपण यंत्रणा व भारताने प्रक्षेपित केलेले उपग्रह, अवकाश अभियाने यांची अद्ययावत माहिती बारकाव्यासहित करून घ्यावी.
 •   महत्त्वाच्या खेळांचे विश्वचषक, ऑलिम्पिक, आशियाई स्पर्धा, इतर महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, त्यातील विक्रम, भारत / महाराष्ट्र यांची कामगिरी यांचा आढावा घ्यायला हवा.
 • चर्चेतील महत्त्वाची पुस्तके व त्यांचे लेखक, चर्चेतील लेखकांबाबतच्या महत्त्वाच्या बाबी तसेच साहित्य क्षेत्रातील महत्त्वाचे पुरस्कार व विजेते यांची टिप्पणे काढणे आवश्यक आहे.
 •  आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे निर्देशांक/ अहवाल व त्यातील भारताचे अद्ययावत व मागील वर्षीचे स्थान, प्रकाशित करणारी संघटना, महत्त्वाच्या निर्देशांकांचे निकष हे मुद्दे लक्षात घ्यावेत.
 •  केंद्रीय व राज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदी माहीत असायला हव्यात. आíथक विकास दर, बँक दर, जीएसटी, आíथक क्षेत्रातील नवे निर्णय, जीडीपी, जीएनपी यांची अद्ययावत माहिती असायला हवी.
 •  
 • संगणक व माहिती तंत्रज्ञान
 • संगणक व माहिती तंत्रज्ञान या घटकाचा विस्तृत अभ्यासक्रम दिलेला असला तरी आजवर या घटकावर एक ते दोन प्रश्न विचारलेले दिसतात. मात्र कोणत्याही एका घटकाची प्रश्नसंख्या निश्चित नसल्याने पुढे या घटकावरचे
 •  प्रश्न वाढूही शकतात. त्यामुळे याचा किमान आढावा आणि तयारी आवश्यक आहे. या घटकाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे – वेगवेगळ्या क्षेत्रांतील संगणकाचा वापर 2     संधी आणि मर्यादा

माहिती तंत्रज्ञान – इंटरनेट, ईमेल, ई कॉमर्स, कृषीविषयक माहितीची संकेतस्थळे

 • कृषी क्षेत्रावर भर देऊन ग्रामीण विकास, आरोग्य, शिक्षण, लघुउद्योग, दळणवळण, बँकिंग, व्यापार, प्रशासन अशा क्षेत्रांतील संगणक व माहिती तंत्रज्ञानाच्या वापराचा आढावा घ्यावा. यामध्ये वापराची संधी, त्याचे फायदे, तोटे, अपेक्षित परिणाम, समस्या अशा मुद्दय़ांचा विचार करता येईल.
 • इंटरनेट, ईमेल, ई कॉमर्स या मुद्दय़ांचा अभ्यास करताना आधी मूलभूत बाबी समजून घेऊन मग त्यांचे उपयोजन लक्षात घेणे आवश्यक आहे. इंटरनेट म्हणजे माहितीजालावरील माहिती संप्रेषणाचे घटक समजून घ्यावेत. विस्तारक्षेत्राचा आकार, संप्रेषणाचे माध्यम आणि संप्रेषणाची गती या निकषांच्या आधारे या घटकांचे प्रकार समजून घ्यावेत.
 • ई कॉमर्स ही संकल्पना मुळातून समजून घेऊन तिचा उद्देश, वेगवेगळ्या क्षेत्रांतील वापर, उपयोग यांचा आढावा घ्यावा. E-NAM सारख्या कृषिमाल विक्रीबाबतच्या पोर्टल्सची व्यवस्थित माहिती करून घ्यायला हवी.
 • शासकीय पोर्टलसहित हवामान अंदाज, कृषिमाल विपणन, मृदा, खते, बियाणे, इतर कृषी अवजारे व त्यांच्या वापरपद्धती यांचे प्रशिक्षण, प्रक्रियाकृत कृषिमालाशी संबंधित अशा विविध संकेतस्थळांची माहिती असणे आवश्यक आहे. या संकेतस्थळांचा उद्देश, वापर, उपलब्ध सेवा, माहिती, कार्यपद्धती, फायदे, तोटे, मर्यादा इत्यादी बाबी पाहाव्यात. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य स्तरावरील शासकीय आणि खाजगी संकेतस्थळांची एकत्रित माहिती krishi.net या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यातील महत्त्वाच्या पोर्टल्सची माहिती करून घ्यावी.