richard dsouza

रिचर्ड डिसूझा


4111   07-Aug-2018, Tue

तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र व विज्ञान अशा अगदी वेगळ्या शाखांमध्ये एकाच वेळी पारंगत असणे ही तशी दुर्लभ गोष्ट, पण गोव्याचे खगोल वैज्ञानिक रिचर्ड डिसूझा यांच्याकडे ती आहे! अलीकडेच मिशिगन विद्यापीठाच्या दोन संशोधकांनी असा शोध लावला की, आपल्या आकाशगंगेला एक भावंड होते. ती एक दीर्घिकाच होती, पण तिला शेजारच्या अँड्रोमीडा म्हणजे देवयानी या दीर्घिकेने २ अब्ज वर्षांपूर्वी गिळले. या संशोधनात रिचर्ड डिसूझा यांचा मोठा वाटा आहे. हा शोधनिबंध नुकताच ‘नेचर अ‍ॅस्ट्रॉनॉमी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला. दीर्घिका, त्यांचा जन्म, गुरुत्वीय बलाने होणारी ओढाताण, एकमेकांशी टकरी असा सगळा प्रवास या शोधनिबंधात मांडला आहे. देवयानीने इतर अनेक लहान दीर्घिका गिळल्या आहेत.

संगणक सादृशीकरणाच्या माध्यमातून डिसूझा यांनी ती गिळली गेल्याचे स्पष्ट केले. जी दीर्घिका (गॅलॅक्सी) देवयानीने गिळली तिचे नाव ‘एम ३२ पी’. या शोधाला वेगळा अर्थही आहे, तो म्हणजे जेव्हा दोन दीर्घिकांची टक्कर होते तेव्हा त्याचा उरलेल्या दीर्घिकांच्या रचनेवर परिणाम होतो तसा तो आपल्या आकाशगंगेवर झाला असावा.

डिसूझा यांचे कुटुंब गोव्यात असले तरी रिचर्ड यांचा जन्म पुण्याचा. काही काळ कुवेतमध्ये राहून, १९९० मध्ये ते गोव्याला आले. मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून त्यांनी भौतिकशास्त्रात बीएस्सी, तर जर्मनीच्या हायडेलबर्ग विद्यापीठातून त्यांनी एमएस्सी केले. पुण्यात परत येऊन त्यांनी तत्त्वज्ञान व धर्मशास्त्रात पदवी घेतली. लुडविग मॅक्सिमिलन विद्यापीठातून त्यांनी खगोलशास्त्रात डॉक्टरेट केली. आता मिशिगन विद्यापीठात डॉक्टरेटनंतरचे संशोधन ते करीत आहेत त्यातच त्यांनी हा शोध लावला आहे. दीर्घिका, त्यांची वाढ, विलीनीकरण यावर डिसूझा यांचे संशोधन  आहे. सहा महिन्यांत हे संशोधन केल्याचे ते सांगतात. टक्कर वा विलीनीकरणानंतर दीर्घिकांच्या मूळ चकत्या कुठल्या बदलांतून गेल्या असाव्यात याचा अभ्यास यातून पुढे करता येईल. देवयानी व एम ३२ पी या दीर्घिकांच्या विलीनीकरणानंतर आता काही अब्ज वर्षांनी ‘मॅग्लानिक क्लाऊड’ या दीर्घिकेस गिळल्यानंतरही आपली आकाशगंगा सहीसलामत राहील असा याचा अर्थ आहे.

धर्मशास्त्र व तत्त्वज्ञान यांच्या अभ्यासातून विचारात व्यापकता आली, असे डिसूझा यांचे मत आहे. पुणे, बंगळूरु येथे खगोलशास्त्रातील सैद्धांतिक  अभ्यासावर भर आहे; पण निरीक्षणात्मक संशोधनासाठी मोठी गुंतवणूक करावी लागेल, असे ते सांगतात. धर्मशास्त्र, विज्ञान, तत्त्वज्ञान यांची गल्लत न करताही काम करता येते हे त्यांनी दाखवून दिले आहे.

lawyer gita mittal

न्या. गीता मित्तल


6038   06-Aug-2018, Mon

जम्मू-काश्मीरमध्ये अनेकदा संवेदनशील विषय न्यायव्यवस्थेपुढे निवाडय़ासाठी येत असतात, त्यामुळे तेथील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती होणे हे तसे आव्हानात्मकच. त्यात या न्यायालयात प्रथमच महिलेची मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांचे नाव आहे न्या. गीता मित्तल.

१९५८ मध्ये दिल्लीत एका सुशिक्षित कुटुंबात गीता मित्तल यांचा जन्म झाला. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी एलएलबी केले. २००४ मध्ये त्यांची दिल्ली उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. त्याआधी त्यांनी १९८१ पासून अनेक न्यायालयांत वकिली केली. २००८ मध्ये त्यांनी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या कार्यकारी मंडळाचे संचालकपद स्वीकारले.

२०१३ मध्ये नवी दिल्लीच्या दी इंडियन लॉ इन्स्टिटय़ूट या संस्थेच्या प्रशासकीय समितीवर त्यांची नियुक्ती झाली. लैंगिक गुन्हेगारी मार्गदर्शक तत्त्वे अंमलबजावणी समितीवर काम करतानाच त्यांनी दिल्लीतील कनिष्ठ न्यायालयात जिवास धोका असलेल्या साक्षीदारांसाठी न्यायालयीन प्रकल्प सुरू केला. त्यासाठी वेगळ्या प्रकारची न्यायालये सुरू केली. भारतातील असे पहिले न्यायालय त्यांच्या प्रयत्नातून २०१२ मध्ये दिल्लीत सुरू झाले.

न्यायालयीन कामाशी निगडित अनेक समित्यांवर त्यांनी काम केले. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणुकीविरोधातील समितीच्या त्या सदस्य होत्या. अंतर्गत स्थलांतरित व्यक्तींना निवाऱ्याचा अधिकार, दंगलग्रस्तांना नुकसानभरपाई, लष्करातील महिलेस विवाहाचा अधिकार, निमलष्करी दलात लैंगिक  कमतरता असलेल्या व्यक्तीची नेमणूक, डीएनए तपासणीच्या आधारे लैंगिक गुन्ह्य़ांचा निवाडा, गर्भवती राहिल्याने महिलेस पुढील सेवेतून काढण्यास प्रतिबंध असे महत्त्वाचे निकाल त्यांनी दिले. २०१२च्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर न्या. जे.एस. वर्मा समितीच्या अहवालात वीरेंदर विरुद्ध सरकार या खटल्यात न्या. मित्तल यांनी दिलेला निकाल हाच मुख्य आधार होता.

न्या. गीता मित्तल यांची कामगिरी शाळेत असल्यापासूनच चमकदार होती, त्यांना राष्ट्रपतींचे प्रशस्तिपत्र मिळाले होते. व्हॉलिबॉलमध्ये त्यांनी दिल्लीचे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केले होते. त्यामुळे नेतृत्वाचे गुण त्यांच्यात तेव्हापासून दिसत होते. अमेरिकेत त्यांनी जागतिक परिसंस्था व संवर्धनाचे प्रशिक्षण घेतले. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व चतुरस्र आहे. २०१८ मध्ये त्यांना  नारीशक्ती पुरस्कार मिळाला होता. आव्हानांचे संधीत रूपांतर करण्याची त्यांची हातोटी वेगळीच आहे, त्यामुळे जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात त्यांची झालेली नेमणूकही त्यांच्या निकालांनी गौरवास्पद ठरेल यात शंका नाही.

ramapada chowdhury

रमापद चौधुरी


5874   04-Aug-2018, Sat

‘एक दिन अचानक’ (१९९०) हा मृणाल सेन यांचा चित्रपट, तर त्याच वर्षीचा ‘एक डॉक्टर की मौत’ हा तपन सिन्हा दिग्दर्शित चित्रपट. याखेरीज द्विपेर नाम तिरंग (१९६३), एख्खोनि (१९७०), पिकनिक (१९७२), बनपलाशिर पदाबलि (१९७३), जे जेखाने दांडिए (१९७४), खारिज (१९८२) असे विविध दिग्दर्शकांचे बंगाली चित्रपट.. हे सगळे चित्रपट रमापद चौधुरी यांच्या कादंबऱ्यांवरून बेतलेले होते. त्यांच्या इतक्या कादंबऱ्यांवर चित्रपट कसे काय झाले? काय एवढे निराळेपण होते त्यांच्या लिखाणात?

‘मी माझ्या काळाच्या आणि मध्यमवर्गाच्या गोष्टी कादंबऱ्यांतून मांडतो’ हे रमापद यांचे उद्गार नीट समजून घेतले, तर त्यांच्या लिखाणाचे निराळेपणही कळेल. कादंबरी हा साहित्यप्रकार त्यांना मुळातून कळला होता, कादंबरी म्हणजे खूप जास्त पानांची कथा नव्हे. कादंबरीने काळाचा आणि पात्रांचा पट मांडायचा असतो, याची जाण त्यांनी ‘प्रथम प्रहर’ या १९५४ साली प्रकाशित झालेल्या, पण त्याआधीच लिहिलेल्या पहिल्या कादंबरीपासूनच दाखवली होती.  ही कादंबरी रेल्वेने घडवलेल्या सामाजिक परिवर्तनाबद्दल आहे! रमापद यांच्या घडत्या वयाशी तिचा संबंध आहे.

बंगालातल्या खरगपूर शहरात १९२२ साली ते जन्मले, तेव्हापासून ते १९३९ साली मॅट्रिक पास होईपर्यंत  रेल्वे-कारखान्याने आणि नागपूर-बंगाल रेल्वेने घडवलेल्या बदलांचे ते साक्षीदार होते. ‘खरगपूर त्या काळातच ‘मिनि इंडिया’ झालं होतं. कॉस्मोपॉलिटन झालं होतं’ हा बदल आणि त्यातून येणारे ताणतणाव त्यांनी तरुण वयात टिपले. पण पुढल्या ‘बीज’ या कादंबरीपासून, मध्यमवर्गाचा विचार त्यांनी अधिक साकल्याने केला.

‘बीज’मध्ये परागंदा होणारा संशोधक-प्राध्यापक, त्याच्याविषयी प्रवादांची राळ उठवणारे लोक, त्याला शोधणारे लोक.. या साऱ्यातून सामाजिक प्रवृत्तींचा पट त्यांनी उभारला. ‘लज्जा’ (१९६० च्या दशकातील याच कादंबरीवर मृणाल सेन यांचा ‘एक दिन अचानक’ आधारित आहे), किंवा ‘खारिज’मधूनही, नायक आणि नायिका केंद्रस्थानी असले तरी परिघावरल्या पात्रांनाही निर्णायक महत्त्व देणारा कथागोफ त्यांनी विणला.

‘‘दोन मित्र. दोघेही गरीब तरुण, पण मेहनती. पुढे यापैकी एक होतो राष्ट्रपती. दुसराही करतो प्रगती; पण स्वत:चं ऐसपैस घर आणि सुखवस्तू कुटुंब असण्यापुरती. कमावत्या काळात दोघे दुरावतात. उतारवयात राष्ट्रपतीपद मिळाल्यावर, पहिल्याला येते दुसऱ्याची आठवण. तो जातो मित्राच्या घरी , स्वत:ची खासगी पण लांबलचक मोटारगाडी घेऊन.. मित्र कुठेय? सकाळपासून बाहेर पडलाय, घरचेही वाट पाहतात.. गाडी जाते निघून. मग तासाभरानं हा परत येतो घरी. ‘रस्त्यावर फुलांचा सडा पडला होता.. वेचत वेचत गेलो पुढं, म्हणून झाला उशीर..’ म्हणत नेहमीसारखं हसतो. घरचे सर्द.’’ यासारख्या नाटय़मय प्रसंगांतून (कादंबरी : छाद), साध्याही विषयांतील मोठा आशय त्यांनी दाखवून दिला.पण बहुतेक कादंबऱ्या या एक-दोघा पात्रांवर केंद्रित नव्हत्याच. अनेक पात्रे, त्यांची आयुष्ये एकेका कादंबरीतून चौधुरींनी मांडली.

‘बाडी बदले जाए’ या अशाच बहुपेडी कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार (१९८८) मिळाला. हा चौधुरींना मिळालेला राष्ट्रीय स्तरावरचा एकमेव पुरस्कार. पश्चिम बंगालमधील सरकारे बदलली, तरी राज्यस्तरीय महत्त्वाचे तीन पुरस्कार त्यांना मिळाले. स्वत्व जपण्याच्या सवयीमुळे कदाचित आणखी पुरस्कार मिळाले नाहीत. नव्वदीपर्यंत कणखर राहूनच चौधुरी निवर्तले.

anil sahasrabudhe

अनिल सहस्रबुद्धे


4722   04-Aug-2018, Sat

अभ्यासूवृत्ती, संशोधन यांना प्रयत्नांचे, मेहनतीचे पाठबळ देणाऱ्या व्यक्ती अधिक यशस्वी होतात. प्रा. अनिल दत्तात्रय सहस्रबुद्धे हे अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) अध्यक्षपदी त्यांची नुकतीच फेरनिवड झाली. तंत्रशिक्षणाच्या अभ्यासाचा दर्जा सुधारणे, त्या संस्थांमध्ये समन्वय ठेवणे हे या परिषदेचे एक प्रमुख काम. अशा या महत्त्वाच्या संस्थेची धुरा योग्य व्यक्तीच्या हाती आहे, त्यामुळे भावी पिढीच्या दृष्टीने हे एक आशादायक चित्र आहे.

सहस्रबुद्धे हे मूळचे कर्नाटकचे. हुबळीतील महाविद्यालयातून त्यांनी तंत्रशिक्षण व अभियांत्रिकीची पदवी १९८० मध्ये घेतली. तेव्हा ते सुवर्णपदकाचे मानकरी ठरले होते. त्यानंतर बेंगळुरुच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’मधून त्यांनी डॉक्टरेट मिळवली. १९८३ मध्ये  इंडियन इस्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये वैज्ञानिक अधिकारी म्हणून त्यांनी कारकीर्दीला सुरुवात केली. काही महिन्यांनी ते टाटा कन्सल्टन्सीमध्ये रुजू झाले. एकंदर ३१ वर्षांच्या देदीप्यमान कारकीर्दीत त्यांनी शैक्षणिक तसेच संशोधन व महत्त्वाच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यानंतर अरुणाचल प्रदेशातील इटानगर, गुवाहाटी त्याचबरोबर पुण्यातील नामांकित अशा ‘कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग’ येथे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. विविध ठिकाणी काम करताना नावीन्याचा ध्यास हे त्यांच्या कामाचे सूत्र राहिले. त्यांच्या कामाची दखल घेऊन  विविध तज्ज्ञ समित्यांवरही त्यांना काम करण्याची संधी मिळाली. त्यात प्रामुख्याने संशोधनाचे पायाभूत स्तरावर काम करणारी संस्था असेल किंवा विद्यापीठ अनुदान आयोगासारख्या महत्त्वपूर्ण संस्थांचा समावेश आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील विकासाबाबतचे योगदान तसेच उद्योगप्रवणतेला चालना देणारे उपक्रम राबविल्याबद्दल  ‘प्राज’ उद्योगाकडून त्यांना गौरवण्यात आले आहे. अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जा सुधारणे त्याचबरोबर या क्षेत्रातील अपप्रवृत्तींना आळा घालणे हे महत्त्वाचे आव्हान सहस्रबुद्धे यांच्यापुढे आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून राज्यातील विविध खासगी महाविद्यालयांत हजारो जागा रिक्त राहत असल्याने अनेक महाविद्यालये बंद पडली वा बंद पडण्याच्या मार्गवर आहेत. यासाठी विविध क्षेत्रांतील कंपन्यांना कशा प्रकारचे मनुष्यबळ हवे आहे याचा विचार करून नवनवीन अभ्यासक्रम व विषय सुरू करण्यावर आता भर द्यावा लागणार आहे.

burton richter

बर्टन रिश्टर


5288   02-Aug-2018, Thu

भौतिकशास्त्रातील कणभौतिकी शाखेने आतापर्यंत विश्वाच्या उत्पत्तीचे कोडे उलगडण्याच्या दिशेने मोठी वाटचाल केली आहे. त्यात युरोपातील सर्न प्रयोगात हिग्ज बोसॉनसारखे गुणधर्म असलेला कण शोधण्यापर्यंत आपण मजल मारली, पण यात पायाभूत काम फार पूर्वीपासून सुरू झाले. त्यात अणूतील एकेक उपकणांचा शोध लागत गेला. बर्टन रिश्टर या भौतिकशास्त्रज्ञाचाही यात मोठा वाटा होता.

१९७६ मध्ये चार्म क्वार्क नावाच्या नव्या अणू उपकणांचा शोध लागला होता, त्यात रिश्टर यांचे संशोधन महत्त्वाचे ठरले. त्यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार विभागून मिळाला होता. आपले विश्व ज्या द्रव्याचे बनलेले आहे त्याच्या आकलनात या शोधाने मोठी भर टाकली होती. द्रव्याचा अधिक सखोल अभ्यास यात शक्य झाला. अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठात ते प्रदीर्घ काळ प्राध्यापक होते.

सरकारच्या विज्ञान धोरणांवर सकारात्मक उद्दिष्टांसाठी प्रभाव टाकण्याचे काम केले, त्यातूनच त्यांनी हवामान बदलांच्या अलीकडे चर्चेत असलेल्या प्रश्नावर पुस्तकही लिहिले होते. स्टॅनफर्डमधील उच्च ऊर्जा कण त्वरणक व प्रगत कण शोधक अशा दोन यंत्राची रचना, उभारणी व नवीन कणांच्या शोधातील योगदान एवढी मोठी कामगिरी त्यांनी केली.

१० नोव्हेंबर १९७४ रोजी त्यांनी भौतिकशास्त्रात मूलभूत संशोधन करताना अशा एका कणाचे अस्तित्व शोधून काढले ज्याचे गुणधर्म वेगळे होते. त्याला नंतर ‘चार्म क्वार्क’ असे नाव देण्यात आले. या कणांच्या शोधातून द्रव्याच्या रचनेविषयी नवीन सिद्धांताला त्यामुळे पाठबळ मिळण्यास मदत झाली. त्या वेळी त्यांनी या कणाचा लावलेला शोध नोव्हेंबर क्रांती म्हणून ओळखला गेला होता. त्याच वेळी मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीचे भौतिकशास्त्रज्ञ सॅम्युअल सी. सी. टिंग यांनीही हेच गुणधर्म असलेल्या कणाचे संशोधन केले होते. रिश्टर व टिंग यांना १९७६ मध्ये या शोधासाठी नोबेल मिळाले.

रिश्टर यांचा जन्म न्यूयॉर्कमधला. वडील कपडा कामगार, आई गृहिणी. तो दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता,  त्यामुळे नेहमीच दिवे मालवले जात (ब्लॅकआऊ ट). त्यात डोक्यावरचे आकाश स्वच्छ दिसायचे. त्यातून त्यांच्यात आकाशगंगा व विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण झाले. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून पीएच.डी. केल्यानंतर ते स्टॅनफर्डमध्ये प्राध्यापक झाले. तेथील ऊर्जा प्रयोगशाळेचे नेतृत्व केले. २०१४ मध्ये त्यांना अमेरिकेतील प्रतिष्ठेचे विज्ञान पदक मिळाले होते. अनेक विज्ञान संस्थांचे ते मानद सदस्यही होते. त्यांच्या निधनाने विश्वाच्या व अणूच्या अंतरंगात डोकावणारा एक प्रतिभाशाली वैज्ञानिक काळाच्या पडद्याआड गेला आहे.

steve ditko

स्टीव्ह डिटको


3415   01-Aug-2018, Wed

काही काल्पनिक व्यक्तिरेखाही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊन जातात, त्यापैकी एक ‘स्पायडरमॅन’! कॉमिक बुकच्या- चित्रकथांच्या माध्यमातून स्पायडरमॅन जगात सर्वाच्या मनावर कोरला गेला. या व्यक्तिरेखेची निर्मिती करणाऱ्यांपैकी एक असलेले स्टीव्ह डिटको यांचे अलीकडेच निधन झाले. आबालवृद्धांच्या मनात ठसलेल्या या व्यक्तिरेखेची मूळ कल्पना स्टॅन ली यांची, पण त्या स्पायडरमॅनला सदेह रूप दिले ते डिटको यांनीच. त्याआधीही कॉमिक पुस्तकांमध्ये पात्रांचे तपशीलवार चित्रण करणारे कलाकार म्हणून डिटको यांची ओळख होती.

डिटको यांचा जन्म पेनसिल्वानियातील जॉन्सटाऊनचा. लहानपणापासूनच त्यांना कॉमिक्सची आवड होती. त्यांच्या काळात ‘बॅटमन’, ‘द स्पिरिट’ या कॉमिक्समुळे त्यांची घडण झाली. १९४५ मध्ये शाळा पूर्ण केल्यानंतर त्यांना लष्कराच्या वृत्तपत्रांसाठी कॉमिक स्ट्रिप्स काढण्याचे काम मिळाले. नंतर त्यांनी बॅटमनचे कलाकार जेरी रॉबिन्सन यांच्या हाताखाली न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेतले. त्यातूनच त्यांची ओळख ‘माव्‍‌र्हल कॉमिक्स’चे स्टॅन ली व कलाकार जॅक किर्बी यांच्याशी झाली. ‘माव्‍‌र्हल’मध्येच त्यांनी स्पायडरमॅन साकारला. १९६२ मध्ये ‘अमेझिंग फॅण्टसी’च्या अंकात स्पायडरमॅनची छबी पहिल्यांदा झळकली. त्यानंतर १९६३ मध्ये ‘माव्‍‌र्हल कॉमिक्स’ने ‘अमेझिंग स्पायडरमॅन’ ही स्वतंत्र मालिकाच आणली. स्पायडरमॅनने ३६० दशलक्ष पुस्तकांचा विक्रम केला आहे. त्यानंतर डिटको यांनी ‘डॉक्टर स्ट्रेंज’ हे पात्र निर्माण केले, पण तोवर ते ‘माव्‍‌र्हल कॉमिक्स’मधून वेगळे झाले होते. त्यानंतर त्यांनी स्क्विर्ल गर्ल, मिस्टर ए, कॅप्टन अ‍ॅटम या पात्रांची निर्मिती केली. ‘शार्लटन कॉमिक्स’साठी त्यांनी काही काळ काम केले व नंतर ‘माव्‍‌र्हल’चा प्रतिस्पर्धी असलेल्या ‘डीसी कॉमिक्स’मध्ये १९६८ मध्ये ते रुजू झाले. तिथे त्यांनी क्रीपरची निर्मिती केली. ती बॅटमनची छोटी खलनायकी आवृत्ती होती. २०१७ पर्यंत ती चित्रे ‘डीसी कंटिन्युइटी’मध्ये प्रसिद्ध होत होती.

डिटको यांचे आयुष्य अगदी बंदिस्त होते. त्यांनी कधी मुलाखती दिल्या नाहीत किंवा जाहीर कार्यक्रम घेतले नाहीत. अतिशय नम्र असे त्यांचे व्यक्तित्व. त्यांनी प्रत्येकाच्या मनात दडलेला नायक ‘स्पायडरमॅन’च्या रूपाने चित्ररूपात प्रकट केला. ‘माव्‍‌र्हल कॉमिक्स’ने जी सांस्कृतिक क्रांती केली त्याचे मूळ स्पायडरमॅनच होते. नंतर स्पायडरमॅनची हीच व्यक्तिरेखा- डिटको यांनी ठरवलेल्या अंगकाठी, चेहरामोहरा आणि वेशभूषेनुसारच-  चित्रपट, टीव्ही शो अशी सगळीकडे वापरली गेली. डिटको यांचा समावेश नंतर १९९४ मध्ये ‘विल इसनर हॉल ऑफ फेम’मध्ये करण्यात आला. डिटको यांच्या निधनाने एक अनोखा कॉमिक्स कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.

hanan hameed

हनन हमीद


6821   31-Jul-2018, Tue

 

प्रसिद्धीची बदलती तंत्रे आणि अतिरेकी धार्मिकतेने पांघरलेला सोशल मीडियाचा नवा बुरखा यामुळे किती सामाजिक उत्पात होऊ शकतात याची एक झलक केरळमधील हनन हमीद हिला भोगाव्या लागलेल्या मानसिक यातनांमुळे दिसली. हनन हमीद ही केरळमधील कोचीनजीकच्या मंडवाना या गावात राहणारी स्वतःचे भविष्य घडवू पाहणारी तरूणी. काडीमोड घेतलेली आई आणि धाकटा भाऊ यांच्यासह राहणारी आणि महाविद्यालयीन शिक्षण घेता घेता घरखर्चाला हातभार लावण्यास धडपडत असलेली.

भल्या पहाटे उठून, मासळीबाजारातून मासे खरेदी करायचे आणि सकाळचे कॉलेज झाले की मासे विकायला बसायचे, हा तिचा परिपाठ. शिक्षणासाठी पैसे कमावत असतानाच चित्रपटात अभिनय करण्याचे स्वप्नही ती पाहात असे. तिची धडपड आणि आस्था पाहून एका दैनिकाने याची बातमी केली. त्यानंतर सोशल मीडियावरही तिचे कौतुक होऊ लागले. बातमी वाचूनच अरूण गोपी नामक एका दिग्दर्शकाने तिला चित्रपटात भूमिका देऊ केली आणि सगळे बिनसले.

हल्ली माहिती आणि जाहिरात यातील फरक संपल्याचाही हा परिणाम म्हणाला लागेल. तिच्याविषयीची बातमी हा चित्रपटाच्या प्रसिध्दीचा एक भाग होता, असे समजून तिच्यावर टीका सुरू झाली. डोक्यावर आच्छादन न घेताच मासे विकायला बसली, यावरूनही तिला लक्ष्य केले गेले आणि तिला घराबाहेर पडणे अशक्य झाले.

आधीच्या कौतुकाचे रुपांतर क्षणात टीकेच्या भडीमारात झाले. अखेर मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्यावर सोशल मीडियावरील हल्लेखोरांचा बंदोबस्त केला गेला. हनन या हल्ल्याने थोडी विचलित झाली असली तरी तिने आपला निश्चय मात्र ढळू दिलेला नाही. केरळसारख्या मातृप्रधान व्यवस्थेतही एका तरूणीला हे सगळे सहन करावे लागत असेल तर अन्यत्र कशी स्थिती असेल, याचा विचारही करवत नाही. 

sonam wangchuk

सोनम वांगचुक


6898   31-Jul-2018, Tue

‘थ्री इडियट्स’ या राजकुमार हिराणीकृत चित्रपटातील फुनसुख वांगडूच्या प्रेमात प्रत्येक प्रेक्षक पडला. ही चाकोरीबाहेरची, जगावेगळे प्रयोग करणारी व्यक्तिरेखा साकारली होती आमिर खानने; पण खरोखरच असा माणूस आपल्यात आहे – त्यांचे नाव सोनम वांगचुक. त्यांना नुकताच मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘वास्तवातले फुनसुख वांगडू’ ही तुलना खरे तर वांगचुक नम्रपणे नाकारतात. शिक्षणव्यवस्थेत आंतरबाह्य़ बदलाची एक वेगळी कल्पना सोनम वांगचुक यांनी मनीमानसी बाळगली.

त्यांचा जन्म जम्मू-काश्मीरमधील लेह जिल्ह्य़ातील अलचीमधील एका गावचा. त्यांचे वडील सोनम वांगयाल हे राजकारणी. नंतर राज्य सरकारमध्ये मंत्रीही झाले. सोनम यांच्या खेडेगावात शाळा नसल्याने आईच त्यांची शिक्षक. वयाच्या नवव्या वर्षांपर्यंत ते मातृभाषेतून शिकले. नंतर श्रीनगरला गेल्यानंतर त्यांना भाषेच्या अडचणी जाणवू लागल्या. त्यामुळे शिक्षणही भरकटू लागले हे पाहून ते दिल्लीला आले, तेथे त्यांनी केंद्रीय विद्यालयात प्रवेश घेतला. लडाखच्या इतर मुलांवर परकीय भाषा लादली जात असताना भलत्याच भाषेतून शिकण्याच्या शिक्षेतून वांगचुक मुक्त झाले. १९८७ मध्ये त्यांनी श्रीनगरमधील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून मेकॅनिकल इंजिनीयरिंगमध्ये बी. टेक्. पदवी घेतली. नंतर दोन वर्षे फ्रान्समध्ये जाऊन मातीच्या बांधकामांचे धडे क्राटेरे स्कूल ऑफ आर्किटेक्चर या संस्थेतून घेतले. खरा प्रश्न असतो शिक्षण संपल्यानंतरचा. वांगचुक यांनी त्यांचे भाऊ व इतर पाच जणांसमवेत १९८८ मध्ये ‘एज्युकेशनल अ‍ॅण्ड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख’ ही संस्था सुरू केली. विद्यापीठातील शिक्षण संपल्यानंतर विद्यार्थी खेडय़ातील मुलांना शिकवायला येऊ लागले.

एरवी ९५ टक्के लडाखी मुले परीक्षांमध्ये नापास होत असत, ती आता उत्तीर्ण होऊ लागली. १९९४ पासून वांगचुक यांनी ‘ऑपरेशन न्यू होप’ हा शैक्षणिक कार्यक्रम राबवला. सौरशक्तीवर चालणाऱ्या शाळा वांगचुक यांनी पर्यावरणस्नेही पद्धतीने तयार केल्या. उणे तीस अंश तापमानात लडाख, नेपाळ व सिक्किममध्ये त्यांनी सुरू केलेल्या शाळा उबदार राहू लागल्या.

२००५ मध्ये वांगचुक यांची मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राष्ट्रीय प्राथमिक शिक्षण मंडळावर निवड केली. वांगचुक यांनी ‘आइस स्तुपा’ नावाची कृत्रिम हिमनदीही तयार केली आहे.

त्यात हिवाळ्यात पाण्याचे प्रवाह बर्फाच्या स्वरूपात गोठतात व उन्हाळ्यात वितळतात, त्यातून शेतीला पाणी मिळते. लडाखमध्ये त्यांनी २०१६ मध्ये ‘फार्मस्टे लडाख’ हा कार्यक्रम सुरू केला. त्यात पर्यटक लडाखमधील स्थानिक कुटुंबांबरोबर जीवन शिक्षण घेत राहतात. त्यांना २०१६ मध्ये सामाजिक उद्योजकतेसाठी प्रतिष्ठेचा ‘रोलेक्स पुरस्कार’ मिळाला होता.

dr.bharat vatwani

डॉ. भरत वाटवाणी


6498   30-Jul-2018, Mon

रस्त्यावरून जाताना आपल्याला अनेकदा कळकट कपडे, दाढीचे खुंट वाढलेल्या अवतारातील काही लोक दिसतात, पण आपण ते त्यांचे प्राक्तनच असे म्हणून दखलही न घेता सहजपणे नजर वळवून निघून जातो. एक माणूस मात्र याला अपवाद होता. त्याने असेच एकदा एका तरुण माणसाला रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारातील घाण पाणी पिताना पाहिले. हे बघून दुसरा कुणीही किळस आल्याने दुर्लक्ष करून निघून गेला असता, पण या माणसाचे हृदय मात्र हे बघून पिळवटले. त्याने त्या तरुणाला ताब्यात घेऊन त्याला इतरांप्रमाणेच व्यवस्थित केले. या सहृदय माणसाचे नाव डॉ. भरत वाटवाणी. बोरिवलीत वास्तव्य असलेले डॉ. वाटवाणी हे सामाजिक कार्यकर्ते व मनोविकारतज्ज्ञ आहेत. त्यांना समाजसेवेतील नोबेल मानला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.

डॉ. वाटवाणी यांनी वर उल्लेख केलेल्या त्या तरुणाला बरे केले. त्याची विचारपूस केल्यावर कळले की, तो तरुण मुलगा हा बीएस्सी पदवीधर होता. त्याचे वडील आंध्र प्रदेशात मोठे अधिकारी होते. असे अनेक लोक केवळ मानसिक दुरवस्थेमुळे पथभ्रष्ट होतात, त्यांच्या घरातले त्यांना विचारत नाहीत. ज्यांना कुणाचा आधार नाही अशा रस्त्यावर बेवारस भटकणाऱ्या अनेकांचा आधारवड म्हणजे डॉ. वाटवाणी. त्यांचा जन्म कोलकात्याचा. वडिलांबरोबर ते मुंबईत आले. एमबीबीएस झाले. नंतर मनोविकारातील पदविका घेतली, त्यामुळेच मनोरुग्णांच्या सेवेचा मार्ग प्रशस्त झाला. एरवी कुणालाही नको असलेल्या लोकांचा स्वीकार करण्याला फार मोठे मानसिक धैर्य, मानवतेविषयी आस्था लागते. ती त्यांच्यात ओतप्रोत भरलेली आहे.

वयाच्या साठीत असलेले वाटवाणी व त्यांच्या पत्नी डॉ. स्मिता यांनी एकूण सात हजार मनोविकारग्रस्त बेवारस व्यक्तींना बरे करून त्यांना पुन्हा कुटुंबात स्थान मिळवून दिले. कर्जतला त्यांनी श्रद्धा पुनर्वसन केंद्र सुरू केले असून तेथे एका वेळी अडीचशे तरी असे लोक उपचारासाठी असतात. १९८९ मध्ये त्यांनी ही संस्था सुरू केली. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, नेपाळ, बांगलादेशातील अशा लोकांना त्यांच्या सेवेचा लाभ झाला आहे. डॉ. वाटवाणी यांना मिळालेल्या पुरस्काराने स्किझोफ्रेनिया व इतर मनोविकारांनी ग्रस्त असलेल्या बेवारस लोकांची व्यथाही समाजापुढे आली आहे. त्यांच्या एकटय़ाच्या प्रयत्नातून हा प्रश्न सुटणार नाही, कारण भारतात किमान असे १० लाख लोक मनोविकारग्रस्त होऊन बेवारस झाले आहेत. त्यासाठी स्किझोफ्रेनियाविषयी जागृती तर हवीच, पण त्यांना मदत करण्यासाठी सामाजिक चळवळ उभी राहायला हवी.

sargio marchionne

सर्गियो मार्कियोनी


8325   28-Jul-2018, Sat

आजवर जगातल्या फार थोडय़ा मोटार कंपन्या तोटा आणि कर्जाच्या गर्तेत सापडल्यानंतर त्यातून सहीसलामत बाहेर पडू शकल्या. पुन्हा असे कर्ज काही हजार कोटींच्या घरात असल्यास या कंपन्या पुन्हा स्थिरस्थावर होणे म्हणजे एक चमत्कारच ठरतो. अशी अद्भुत घटना काही वर्षांपूर्वी आधी फियाट आणि नंतर क्रायस्लर कंपनीच्या बाबतीत घडली. ती दोनदा साध्य करून दाखवली सर्गियो मार्कियोनी यांनी. फियाट-क्रायस्लर कंपनीचे हे माजी सीईओ नुकतेच निवर्तले.

२००४ मध्ये त्यांनी प्रथम फियाट कंपनीचे मुख्य कार्यकारी पद स्वीकारले. इटलीतील प्रतिष्ठित अग्नेली कुटुंबाबाहेर प्रथमच एखाद्याला अशी संधी मिळत होती. मार्कियोनी यांनी अल्पावधीतच फियाट कंपनीला तोटय़ाच्या फेऱ्यातून बाहेर काढले. फियाट- ५०० या चिमुकल्या मोटारीला त्यांनी नव्याने बाजारात आणले. फियाट कंपनीसाठी ती अत्यंत लाभदायी खेळी ठरली. २००८ मध्ये मंदीसदृश परिस्थितीमुळे अमेरिकेतली क्रायस्लर मोटार कंपनी डबघाईला आली. काही वर्षांपूर्वी झालेले डायमलर बेन्झ कंपनीबरोबर क्रायस्लरचे विलीनीकरण अपयशी ठरू लागले होते. त्यांनी फियाटला मदतीसाठी पुकारले. त्यातून बनलेल्या फियाट-क्रायस्लर कंपनीची जबाबदारीही मार्कियोनी यांच्याकडे आली. क्रायस्लर कंपनीचे कर्मचारी भेदरले होते. मार्कियोनी यांनी त्यांना पहिल्याच भेटीत आश्वस्त केले. मी तुम्हाला पाहतो आहे आणि माझ्यासाठी तुम्ही महत्त्वाचे आहात, हे त्यांचे शब्द लाखमोलाचे ठरले.

फियाटप्रमाणेच क्रायस्लरलाही नवी ऊर्जा मिळाली. मार्कियोनी यांचे नेतृत्व आणि मोक्याच्या पदांवर (लीडरशिप टीम) योग्य माणसे नेमण्याची त्यांची क्षमता फियाट-क्रायस्लरला नव्या वाटेवर घेऊन गेली. ते साच्यातले सीईओ नव्हते. कधीही सुटात वावरले नाहीत. काळा स्वेटर घालूनच कंपनीत यायचे किंवा कॉन्फरन्सला उपस्थित राहायचे. आपल्या कंपनीच्या मोटारींची परखड चिकित्सा जाहीरपणे करायचे. काही वेळा टीकाही करायचे. उगीच आपल्या कंपनीने कशी जगावेगळी मोटार बनवली आहे वगैरे अभिनिवेश नाही. कर्मचाऱ्यांशी बोलायचे. इलेक्ट्रिक मोटारींचे सार्वत्रिक गुणगान सुरू असताना, असल्या मोटारी बनवायला महाग असतात आणि त्यांना अजूनही निश्चित, शाश्वत अशी बाजारपेठ नाही हे त्यांनीच पहिल्यांदा बोलून दाखवले. मार्कियोनी यांना भारताविषयी प्रेम आणि रतन टाटांविषयी नितान्त आदर होता. फियाट कंपनीने टाटांच्या सहकार्याने भारतात बस्तान मांडण्याचा प्रयत्न केला.

मार्कियोनी आणि रतन टाटा या मैत्रीचे शिल्पकार होते. ही मोहीम फसली पण मैत्री टिकली. प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास हे टाटांचे गुण अनुकरणीय आहेत. राष्ट्रउभारणीप्रति टाटांची निष्ठा तर वंदनीय आहे, असे मार्कियोनी नेहमी सांगत. फियाट कंपनीचे उत्कृष्ट इंजिन उपलब्ध असतानाही टाटांनी देशी बनावटीचे इंजिन विकसित केले नि यशस्वीरीत्या वापरून दाखवले याचे मार्कियोनी यांना विलक्षण कौतुक वाटे. त्यांनी  सतत नवीन उपायांचा, धोरणांचा विचार केला. डोळे नि कान उघडे ठेवावेत आणि चुका सुधारता येत नसतील तर किमान स्वीकारण्याचा मोठेपणा दाखवावा हा त्यांचा जीवनविषयक सोपा, सरळ सिद्धान्त होता.


Top