steve ditko

स्टीव्ह डिटको


3403   01-Aug-2018, Wed

काही काल्पनिक व्यक्तिरेखाही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊन जातात, त्यापैकी एक ‘स्पायडरमॅन’! कॉमिक बुकच्या- चित्रकथांच्या माध्यमातून स्पायडरमॅन जगात सर्वाच्या मनावर कोरला गेला. या व्यक्तिरेखेची निर्मिती करणाऱ्यांपैकी एक असलेले स्टीव्ह डिटको यांचे अलीकडेच निधन झाले. आबालवृद्धांच्या मनात ठसलेल्या या व्यक्तिरेखेची मूळ कल्पना स्टॅन ली यांची, पण त्या स्पायडरमॅनला सदेह रूप दिले ते डिटको यांनीच. त्याआधीही कॉमिक पुस्तकांमध्ये पात्रांचे तपशीलवार चित्रण करणारे कलाकार म्हणून डिटको यांची ओळख होती.

डिटको यांचा जन्म पेनसिल्वानियातील जॉन्सटाऊनचा. लहानपणापासूनच त्यांना कॉमिक्सची आवड होती. त्यांच्या काळात ‘बॅटमन’, ‘द स्पिरिट’ या कॉमिक्समुळे त्यांची घडण झाली. १९४५ मध्ये शाळा पूर्ण केल्यानंतर त्यांना लष्कराच्या वृत्तपत्रांसाठी कॉमिक स्ट्रिप्स काढण्याचे काम मिळाले. नंतर त्यांनी बॅटमनचे कलाकार जेरी रॉबिन्सन यांच्या हाताखाली न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेतले. त्यातूनच त्यांची ओळख ‘माव्‍‌र्हल कॉमिक्स’चे स्टॅन ली व कलाकार जॅक किर्बी यांच्याशी झाली. ‘माव्‍‌र्हल’मध्येच त्यांनी स्पायडरमॅन साकारला. १९६२ मध्ये ‘अमेझिंग फॅण्टसी’च्या अंकात स्पायडरमॅनची छबी पहिल्यांदा झळकली. त्यानंतर १९६३ मध्ये ‘माव्‍‌र्हल कॉमिक्स’ने ‘अमेझिंग स्पायडरमॅन’ ही स्वतंत्र मालिकाच आणली. स्पायडरमॅनने ३६० दशलक्ष पुस्तकांचा विक्रम केला आहे. त्यानंतर डिटको यांनी ‘डॉक्टर स्ट्रेंज’ हे पात्र निर्माण केले, पण तोवर ते ‘माव्‍‌र्हल कॉमिक्स’मधून वेगळे झाले होते. त्यानंतर त्यांनी स्क्विर्ल गर्ल, मिस्टर ए, कॅप्टन अ‍ॅटम या पात्रांची निर्मिती केली. ‘शार्लटन कॉमिक्स’साठी त्यांनी काही काळ काम केले व नंतर ‘माव्‍‌र्हल’चा प्रतिस्पर्धी असलेल्या ‘डीसी कॉमिक्स’मध्ये १९६८ मध्ये ते रुजू झाले. तिथे त्यांनी क्रीपरची निर्मिती केली. ती बॅटमनची छोटी खलनायकी आवृत्ती होती. २०१७ पर्यंत ती चित्रे ‘डीसी कंटिन्युइटी’मध्ये प्रसिद्ध होत होती.

डिटको यांचे आयुष्य अगदी बंदिस्त होते. त्यांनी कधी मुलाखती दिल्या नाहीत किंवा जाहीर कार्यक्रम घेतले नाहीत. अतिशय नम्र असे त्यांचे व्यक्तित्व. त्यांनी प्रत्येकाच्या मनात दडलेला नायक ‘स्पायडरमॅन’च्या रूपाने चित्ररूपात प्रकट केला. ‘माव्‍‌र्हल कॉमिक्स’ने जी सांस्कृतिक क्रांती केली त्याचे मूळ स्पायडरमॅनच होते. नंतर स्पायडरमॅनची हीच व्यक्तिरेखा- डिटको यांनी ठरवलेल्या अंगकाठी, चेहरामोहरा आणि वेशभूषेनुसारच-  चित्रपट, टीव्ही शो अशी सगळीकडे वापरली गेली. डिटको यांचा समावेश नंतर १९९४ मध्ये ‘विल इसनर हॉल ऑफ फेम’मध्ये करण्यात आला. डिटको यांच्या निधनाने एक अनोखा कॉमिक्स कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.

hanan hameed

हनन हमीद


6820   31-Jul-2018, Tue

 

प्रसिद्धीची बदलती तंत्रे आणि अतिरेकी धार्मिकतेने पांघरलेला सोशल मीडियाचा नवा बुरखा यामुळे किती सामाजिक उत्पात होऊ शकतात याची एक झलक केरळमधील हनन हमीद हिला भोगाव्या लागलेल्या मानसिक यातनांमुळे दिसली. हनन हमीद ही केरळमधील कोचीनजीकच्या मंडवाना या गावात राहणारी स्वतःचे भविष्य घडवू पाहणारी तरूणी. काडीमोड घेतलेली आई आणि धाकटा भाऊ यांच्यासह राहणारी आणि महाविद्यालयीन शिक्षण घेता घेता घरखर्चाला हातभार लावण्यास धडपडत असलेली.

भल्या पहाटे उठून, मासळीबाजारातून मासे खरेदी करायचे आणि सकाळचे कॉलेज झाले की मासे विकायला बसायचे, हा तिचा परिपाठ. शिक्षणासाठी पैसे कमावत असतानाच चित्रपटात अभिनय करण्याचे स्वप्नही ती पाहात असे. तिची धडपड आणि आस्था पाहून एका दैनिकाने याची बातमी केली. त्यानंतर सोशल मीडियावरही तिचे कौतुक होऊ लागले. बातमी वाचूनच अरूण गोपी नामक एका दिग्दर्शकाने तिला चित्रपटात भूमिका देऊ केली आणि सगळे बिनसले.

हल्ली माहिती आणि जाहिरात यातील फरक संपल्याचाही हा परिणाम म्हणाला लागेल. तिच्याविषयीची बातमी हा चित्रपटाच्या प्रसिध्दीचा एक भाग होता, असे समजून तिच्यावर टीका सुरू झाली. डोक्यावर आच्छादन न घेताच मासे विकायला बसली, यावरूनही तिला लक्ष्य केले गेले आणि तिला घराबाहेर पडणे अशक्य झाले.

आधीच्या कौतुकाचे रुपांतर क्षणात टीकेच्या भडीमारात झाले. अखेर मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्यावर सोशल मीडियावरील हल्लेखोरांचा बंदोबस्त केला गेला. हनन या हल्ल्याने थोडी विचलित झाली असली तरी तिने आपला निश्चय मात्र ढळू दिलेला नाही. केरळसारख्या मातृप्रधान व्यवस्थेतही एका तरूणीला हे सगळे सहन करावे लागत असेल तर अन्यत्र कशी स्थिती असेल, याचा विचारही करवत नाही. 

sonam wangchuk

सोनम वांगचुक


6898   31-Jul-2018, Tue

‘थ्री इडियट्स’ या राजकुमार हिराणीकृत चित्रपटातील फुनसुख वांगडूच्या प्रेमात प्रत्येक प्रेक्षक पडला. ही चाकोरीबाहेरची, जगावेगळे प्रयोग करणारी व्यक्तिरेखा साकारली होती आमिर खानने; पण खरोखरच असा माणूस आपल्यात आहे – त्यांचे नाव सोनम वांगचुक. त्यांना नुकताच मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘वास्तवातले फुनसुख वांगडू’ ही तुलना खरे तर वांगचुक नम्रपणे नाकारतात. शिक्षणव्यवस्थेत आंतरबाह्य़ बदलाची एक वेगळी कल्पना सोनम वांगचुक यांनी मनीमानसी बाळगली.

त्यांचा जन्म जम्मू-काश्मीरमधील लेह जिल्ह्य़ातील अलचीमधील एका गावचा. त्यांचे वडील सोनम वांगयाल हे राजकारणी. नंतर राज्य सरकारमध्ये मंत्रीही झाले. सोनम यांच्या खेडेगावात शाळा नसल्याने आईच त्यांची शिक्षक. वयाच्या नवव्या वर्षांपर्यंत ते मातृभाषेतून शिकले. नंतर श्रीनगरला गेल्यानंतर त्यांना भाषेच्या अडचणी जाणवू लागल्या. त्यामुळे शिक्षणही भरकटू लागले हे पाहून ते दिल्लीला आले, तेथे त्यांनी केंद्रीय विद्यालयात प्रवेश घेतला. लडाखच्या इतर मुलांवर परकीय भाषा लादली जात असताना भलत्याच भाषेतून शिकण्याच्या शिक्षेतून वांगचुक मुक्त झाले. १९८७ मध्ये त्यांनी श्रीनगरमधील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून मेकॅनिकल इंजिनीयरिंगमध्ये बी. टेक्. पदवी घेतली. नंतर दोन वर्षे फ्रान्समध्ये जाऊन मातीच्या बांधकामांचे धडे क्राटेरे स्कूल ऑफ आर्किटेक्चर या संस्थेतून घेतले. खरा प्रश्न असतो शिक्षण संपल्यानंतरचा. वांगचुक यांनी त्यांचे भाऊ व इतर पाच जणांसमवेत १९८८ मध्ये ‘एज्युकेशनल अ‍ॅण्ड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख’ ही संस्था सुरू केली. विद्यापीठातील शिक्षण संपल्यानंतर विद्यार्थी खेडय़ातील मुलांना शिकवायला येऊ लागले.

एरवी ९५ टक्के लडाखी मुले परीक्षांमध्ये नापास होत असत, ती आता उत्तीर्ण होऊ लागली. १९९४ पासून वांगचुक यांनी ‘ऑपरेशन न्यू होप’ हा शैक्षणिक कार्यक्रम राबवला. सौरशक्तीवर चालणाऱ्या शाळा वांगचुक यांनी पर्यावरणस्नेही पद्धतीने तयार केल्या. उणे तीस अंश तापमानात लडाख, नेपाळ व सिक्किममध्ये त्यांनी सुरू केलेल्या शाळा उबदार राहू लागल्या.

२००५ मध्ये वांगचुक यांची मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राष्ट्रीय प्राथमिक शिक्षण मंडळावर निवड केली. वांगचुक यांनी ‘आइस स्तुपा’ नावाची कृत्रिम हिमनदीही तयार केली आहे.

त्यात हिवाळ्यात पाण्याचे प्रवाह बर्फाच्या स्वरूपात गोठतात व उन्हाळ्यात वितळतात, त्यातून शेतीला पाणी मिळते. लडाखमध्ये त्यांनी २०१६ मध्ये ‘फार्मस्टे लडाख’ हा कार्यक्रम सुरू केला. त्यात पर्यटक लडाखमधील स्थानिक कुटुंबांबरोबर जीवन शिक्षण घेत राहतात. त्यांना २०१६ मध्ये सामाजिक उद्योजकतेसाठी प्रतिष्ठेचा ‘रोलेक्स पुरस्कार’ मिळाला होता.

dr.bharat vatwani

डॉ. भरत वाटवाणी


6498   30-Jul-2018, Mon

रस्त्यावरून जाताना आपल्याला अनेकदा कळकट कपडे, दाढीचे खुंट वाढलेल्या अवतारातील काही लोक दिसतात, पण आपण ते त्यांचे प्राक्तनच असे म्हणून दखलही न घेता सहजपणे नजर वळवून निघून जातो. एक माणूस मात्र याला अपवाद होता. त्याने असेच एकदा एका तरुण माणसाला रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारातील घाण पाणी पिताना पाहिले. हे बघून दुसरा कुणीही किळस आल्याने दुर्लक्ष करून निघून गेला असता, पण या माणसाचे हृदय मात्र हे बघून पिळवटले. त्याने त्या तरुणाला ताब्यात घेऊन त्याला इतरांप्रमाणेच व्यवस्थित केले. या सहृदय माणसाचे नाव डॉ. भरत वाटवाणी. बोरिवलीत वास्तव्य असलेले डॉ. वाटवाणी हे सामाजिक कार्यकर्ते व मनोविकारतज्ज्ञ आहेत. त्यांना समाजसेवेतील नोबेल मानला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.

डॉ. वाटवाणी यांनी वर उल्लेख केलेल्या त्या तरुणाला बरे केले. त्याची विचारपूस केल्यावर कळले की, तो तरुण मुलगा हा बीएस्सी पदवीधर होता. त्याचे वडील आंध्र प्रदेशात मोठे अधिकारी होते. असे अनेक लोक केवळ मानसिक दुरवस्थेमुळे पथभ्रष्ट होतात, त्यांच्या घरातले त्यांना विचारत नाहीत. ज्यांना कुणाचा आधार नाही अशा रस्त्यावर बेवारस भटकणाऱ्या अनेकांचा आधारवड म्हणजे डॉ. वाटवाणी. त्यांचा जन्म कोलकात्याचा. वडिलांबरोबर ते मुंबईत आले. एमबीबीएस झाले. नंतर मनोविकारातील पदविका घेतली, त्यामुळेच मनोरुग्णांच्या सेवेचा मार्ग प्रशस्त झाला. एरवी कुणालाही नको असलेल्या लोकांचा स्वीकार करण्याला फार मोठे मानसिक धैर्य, मानवतेविषयी आस्था लागते. ती त्यांच्यात ओतप्रोत भरलेली आहे.

वयाच्या साठीत असलेले वाटवाणी व त्यांच्या पत्नी डॉ. स्मिता यांनी एकूण सात हजार मनोविकारग्रस्त बेवारस व्यक्तींना बरे करून त्यांना पुन्हा कुटुंबात स्थान मिळवून दिले. कर्जतला त्यांनी श्रद्धा पुनर्वसन केंद्र सुरू केले असून तेथे एका वेळी अडीचशे तरी असे लोक उपचारासाठी असतात. १९८९ मध्ये त्यांनी ही संस्था सुरू केली. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, नेपाळ, बांगलादेशातील अशा लोकांना त्यांच्या सेवेचा लाभ झाला आहे. डॉ. वाटवाणी यांना मिळालेल्या पुरस्काराने स्किझोफ्रेनिया व इतर मनोविकारांनी ग्रस्त असलेल्या बेवारस लोकांची व्यथाही समाजापुढे आली आहे. त्यांच्या एकटय़ाच्या प्रयत्नातून हा प्रश्न सुटणार नाही, कारण भारतात किमान असे १० लाख लोक मनोविकारग्रस्त होऊन बेवारस झाले आहेत. त्यासाठी स्किझोफ्रेनियाविषयी जागृती तर हवीच, पण त्यांना मदत करण्यासाठी सामाजिक चळवळ उभी राहायला हवी.

sargio marchionne

सर्गियो मार्कियोनी


8324   28-Jul-2018, Sat

आजवर जगातल्या फार थोडय़ा मोटार कंपन्या तोटा आणि कर्जाच्या गर्तेत सापडल्यानंतर त्यातून सहीसलामत बाहेर पडू शकल्या. पुन्हा असे कर्ज काही हजार कोटींच्या घरात असल्यास या कंपन्या पुन्हा स्थिरस्थावर होणे म्हणजे एक चमत्कारच ठरतो. अशी अद्भुत घटना काही वर्षांपूर्वी आधी फियाट आणि नंतर क्रायस्लर कंपनीच्या बाबतीत घडली. ती दोनदा साध्य करून दाखवली सर्गियो मार्कियोनी यांनी. फियाट-क्रायस्लर कंपनीचे हे माजी सीईओ नुकतेच निवर्तले.

२००४ मध्ये त्यांनी प्रथम फियाट कंपनीचे मुख्य कार्यकारी पद स्वीकारले. इटलीतील प्रतिष्ठित अग्नेली कुटुंबाबाहेर प्रथमच एखाद्याला अशी संधी मिळत होती. मार्कियोनी यांनी अल्पावधीतच फियाट कंपनीला तोटय़ाच्या फेऱ्यातून बाहेर काढले. फियाट- ५०० या चिमुकल्या मोटारीला त्यांनी नव्याने बाजारात आणले. फियाट कंपनीसाठी ती अत्यंत लाभदायी खेळी ठरली. २००८ मध्ये मंदीसदृश परिस्थितीमुळे अमेरिकेतली क्रायस्लर मोटार कंपनी डबघाईला आली. काही वर्षांपूर्वी झालेले डायमलर बेन्झ कंपनीबरोबर क्रायस्लरचे विलीनीकरण अपयशी ठरू लागले होते. त्यांनी फियाटला मदतीसाठी पुकारले. त्यातून बनलेल्या फियाट-क्रायस्लर कंपनीची जबाबदारीही मार्कियोनी यांच्याकडे आली. क्रायस्लर कंपनीचे कर्मचारी भेदरले होते. मार्कियोनी यांनी त्यांना पहिल्याच भेटीत आश्वस्त केले. मी तुम्हाला पाहतो आहे आणि माझ्यासाठी तुम्ही महत्त्वाचे आहात, हे त्यांचे शब्द लाखमोलाचे ठरले.

फियाटप्रमाणेच क्रायस्लरलाही नवी ऊर्जा मिळाली. मार्कियोनी यांचे नेतृत्व आणि मोक्याच्या पदांवर (लीडरशिप टीम) योग्य माणसे नेमण्याची त्यांची क्षमता फियाट-क्रायस्लरला नव्या वाटेवर घेऊन गेली. ते साच्यातले सीईओ नव्हते. कधीही सुटात वावरले नाहीत. काळा स्वेटर घालूनच कंपनीत यायचे किंवा कॉन्फरन्सला उपस्थित राहायचे. आपल्या कंपनीच्या मोटारींची परखड चिकित्सा जाहीरपणे करायचे. काही वेळा टीकाही करायचे. उगीच आपल्या कंपनीने कशी जगावेगळी मोटार बनवली आहे वगैरे अभिनिवेश नाही. कर्मचाऱ्यांशी बोलायचे. इलेक्ट्रिक मोटारींचे सार्वत्रिक गुणगान सुरू असताना, असल्या मोटारी बनवायला महाग असतात आणि त्यांना अजूनही निश्चित, शाश्वत अशी बाजारपेठ नाही हे त्यांनीच पहिल्यांदा बोलून दाखवले. मार्कियोनी यांना भारताविषयी प्रेम आणि रतन टाटांविषयी नितान्त आदर होता. फियाट कंपनीने टाटांच्या सहकार्याने भारतात बस्तान मांडण्याचा प्रयत्न केला.

मार्कियोनी आणि रतन टाटा या मैत्रीचे शिल्पकार होते. ही मोहीम फसली पण मैत्री टिकली. प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास हे टाटांचे गुण अनुकरणीय आहेत. राष्ट्रउभारणीप्रति टाटांची निष्ठा तर वंदनीय आहे, असे मार्कियोनी नेहमी सांगत. फियाट कंपनीचे उत्कृष्ट इंजिन उपलब्ध असतानाही टाटांनी देशी बनावटीचे इंजिन विकसित केले नि यशस्वीरीत्या वापरून दाखवले याचे मार्कियोनी यांना विलक्षण कौतुक वाटे. त्यांनी  सतत नवीन उपायांचा, धोरणांचा विचार केला. डोळे नि कान उघडे ठेवावेत आणि चुका सुधारता येत नसतील तर किमान स्वीकारण्याचा मोठेपणा दाखवावा हा त्यांचा जीवनविषयक सोपा, सरळ सिद्धान्त होता.

dr.rajendra shinde

डॉ. राजेंद्र शिंदे


3615   28-Jul-2018, Sat

अहमदनगर जिल्ह्य़ातील पुणतांबा येथील मराठी माध्यमाच्या, सरकारी शाळेत शिक्षण घेतलेले डॉ. राजेंद्र शिंदे हे फक्त मुंबईच नाही तर देशभर ख्याती असलेल्या प्रतिष्ठित सेंट झेविअर्स महाविद्यालयाचे प्राचार्य झाले आहेत. काही प्रमाणात धार्मिक पगडा असलेल्या झेविअर्सच्या इतिहासात दीडशे वर्षांत पहिल्यांदाच बिगरख्रिस्ती प्राचार्याची नेमणूक झाली आहे. विद्यार्थिदशेपासून नाळ जुळलेल्या महाविद्यालयाचे प्राचार्य होण्याचे भाग्य मिळालेल्यांपैकी डॉ. शिंदे आहेत.

इंग्रज राजवटीत ख्रिश्चन मिशनऱ्यांनी सुरू केलेल्या सेंट झेविअर्स महाविद्यालयाची ओळखही आंग्ल भाषीच. मुंबईची भव्यता, त्यात इंग्रजी ओळख असलेले महाविद्यालय या कल्पनेचाही मराठी, मध्यमवर्गीय घरातील मुलाला बाऊ  वाटावा अशा काळात डॉ. शिंदे यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईची निवड केली. डॉ. शिंदे हे मूळचे वणीचे. वडील श्रीरामपूर येथे स्टेशन मास्तर म्हणून कार्यरत असल्यामुळे पुणतांबा येथील शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. झेविअर्सशी संलग्न असलेल्या वांद्रे येथील कनिष्ठ महाविद्यालयात त्यांनी अकरावीत प्रवेश घेतला. मुळातच निसर्गावर प्रेम करणाऱ्या शिंदे यांनी पदवी अभ्यासक्रमासाठी वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र आणि रसायनशास्त्र हे विषय घेऊन १९८० मध्ये झेविअर्समध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. वनस्पतींशी नाते जोडत, त्यांच्याशी संवाद साधत त्यांचा प्रवास सुरू झाला.

पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर महाविद्यालयातील वनस्पती संग्रहालयचे अभिरक्षक म्हणून त्यांनी काम सुरू केले. हे काम करीत असतानाच वनस्पतिशास्त्रात पीएच.डी.ही केली. आजपावेतो, जवळपास ३५ वर्षे विद्यार्थ्यांना घडवण्याचे व्रत त्यांनी घेतले आहे. पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांनी निसर्गाची भाषा शिकावी यासाठी झटणारे, विद्यार्थ्यांमधील कुतूहलाला संशोधनाची वाट दाखवणारे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक अशी त्यांची ख्याती आहे. टॅक्सनॉमी हा त्यांचा संशोधनाचा विषय आहे. औषधी वनस्पती, वनस्पतींची नावे यासाठी त्यांनी विशेष काम केले आहे.

सामान्य माणसाला तुलनेने किचकट वाटणारा वनस्पतिशास्त्रासारखा विषय सोपा करून सांगण्यात त्यांची हातोटी आहे. अध्यापन, संशोधनाइतकीच त्यांची प्रशासकीय पकडही पक्की आहे. झेविअर्समध्ये परीक्षा विभाग, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी समन्वय यांसह सात वर्षे उपप्राचार्यपदाची धुराही त्यांनी लीलया सांभाळली. महाविद्यालयाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षांत, विद्यापीठ म्हणून मान्यता मिळण्याकडे वाटचाल सुरू असलेल्या झेविअर्सला नवी ओळख मिळवून देण्यासाठी समर्थ नेतृत्व डॉ. शिंदे यांच्या रूपाने लाभले आहे.

tahira safdar

ताहिरा सफदर


6420   26-Jul-2018, Thu

पाकिस्तानसारख्या धर्मसत्ताक व पुराणमतवादी देशात एखाद्या महत्त्वाच्या पदावर महिलेची नेमणूक होणे हे तसे अप्रूपच. तेथील कुठल्याच क्षेत्रामध्ये महिला फारशा आघाडीवर दिसत नाहीत. असे असताना नुकतीच एका महिलेची नेमणूक चाकोरीबाहेर जाऊन करण्यात आली. तेथील न्यायक्षेत्रात महिला तुलनेने कमीच, त्यातही त्यांना उच्च पद मिळणे तर दूरच; अशा परिस्थितीत पहिल्यांदाच बलुचिस्तान उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी ताहिरा सफदर यांची नेमणूक करण्यात आली आहे.

पाकिस्तानातील सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात आतापर्यंत मुख्य न्यायाधीशपदी महिलेची नेमणूक  झाली नव्हती, ती ताहिरा यांच्या रूपात झाली आहे. एक तर ताहिरा यांच्यावर लाहोर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नेमणूक करताना आधीच अन्याय झाला होता. त्याचे परिमार्जन काही प्रमाणात या नेमणुकीने झाले आहे. तो केवळ एका व्यक्तीवरचा अन्याय नव्हता तर महिलांवरचा अन्याय होता हे विसरता येत नाही. त्यामुळेच ताहिरा सफदर यांची नेमणूक ही पाकिस्तानसारख्या इस्लामी देशात लिंगभाव समानतेच्या दिशेने अगदी छोटे पाऊल आहेच हे विसरून चालता येणार नाही. ताहिरा यांचा जन्म क्वेट्टा येथे ५ ऑक्टोबर १९५७ रोजी झाला. बलुचिस्तानात पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून त्यांची १९८२ मध्ये नेमणूक झाली. बलुचिस्तान विद्यापीठातून नंतर त्यांनी उर्दू साहित्यातून पदव्युत्तर पदवी व १९८० मध्ये युनिव्हर्सिटी लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. त्यांची वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश म्हणून १९८७ मध्ये नेमणूक झाली.

नंतर १९९१ मध्ये अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हे पद त्यांच्याकडे आले. १९९८ मध्ये त्यांची बलुचिस्तान सेवा लवादाच्या सदस्यपदी निवड, २००९ मध्ये याच लवादाचे अध्यक्षपद असा त्यांचा प्रवास प्रगतीकडे होत राहिला. नंतर त्यांची नेमणूक २००९ मध्ये उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून झाली व नंतर २०११ मध्ये त्यांना या पदावर कायम करण्यात आले. अलीकडे त्या माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या विरोधातील देशद्रोहाच्या खटल्यातील तीनसदस्यीय पीठाच्या सदस्या होत्या. ३ नोव्हेंबर २००७ रोजी मुशर्रफ यांनी देशातील काही न्यायाधीशांना अटक करून आणीबाणी जाहीर केली होती, त्याबाबतचा हा खटला महत्त्वपूर्ण आहेच, शिवाय त्यातील त्यांची नेमणूकही लक्ष वेधणारी अशीच. पाकिस्तानातील न्यायव्यवस्थेवर आयएसआय व लष्कराचा सतत दबाव वाढला असताना ताहिरा यांचा मार्ग कंटकमय असला तरी त्यांची नियुक्ती तेथील महिलांचे मनोबल वाढवणारी आहे यात शंका नाही.

lakshya sen

लक्ष्य सेन


7427   24-Jul-2018, Tue

घरातूनच बाळकडू मिळाले असले की गुणवान खेळाडूची बालपणापासूनच कशी बहरते, त्याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे भारतीय बॅडमिंटनचा उगवता तारा लक्ष्य सेन. उत्तराखंडच्या अलमोडा जिल्ह्यात १६ ऑगस्ट २००१ साली जन्मलेल्या लक्ष्यचे वडील डी. के. सेन हे राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन प्रशिक्षक आहेत आणि मोठा भाऊ चिराग सेन हादेखील आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू. त्यामुळे पहिली पावलेसुद्धा बॅडमिंटन रॅकेट आणि शटलकॉकच्या सान्निध्यातच त्याने टाकली. दहाव्या वर्षीच तो त्याच्या वयोगटातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये झळकू लागला होता. प्रारंभिक शिक्षण वडिलांकडूनच घेतल्यानंतर त्याला प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकॅडमीत पुढील प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले.

लक्ष्यने २०१६ सालात, म्हणजे वयाच्याही सोळाव्या वर्षांत लक्ष्यने मलेशियाच्या ली झी जियाला हरवून इंडिया इंटरनॅशनलचे विजेतेपद तसेच १९ वर्षांखालील वयोगटासाठीच्या आशियाई कनिष्ठ स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. मात्र, या दोन्ही विजेतेपदांपेक्षा एका अनोख्या पराभवाने त्याच्या अस्तित्वाची दखल बॅडमिंटन जगताने घेतली. न्यूझीलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतला तो सामना होता दोनदा ऑलिम्पिक सुवर्ण विजेता ठरलेल्या चिनी खेळाडू लीन डॅनसमवेत. हा सामना लीन डॅनच जिंकणार असेच सगळ्यांना वाटत होते. मात्र, पहिल्याच गेममध्ये लीनला मागे टाकत लक्ष्यने खळबळ उडवून दिली. पुढचे दोन गेम जिंकून घेत लीनने सामन्यात बाजी मारली, मात्र त्या सामन्यापासून लक्ष्यने जाणकारांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याशिवाय २०१७ साली लक्ष्यने युरेशिया बल्गेरियन खुल्या तर इंडिया इंटरनॅशनलचे विजेतेपद आणि टाटा खुल्या स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावत त्याची घोडदौड कायम राखली.

यंदा वर्षांरंभीच्या काळात त्याच्या खांद्याची दुखापत बळावल्याने त्याला डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला होता. हा सल्ला शिरोधार्य मानत त्याने खांद्याला तर पूर्ण आराम दिला, पण त्याच काळात आपल्या छातीखालच्या शरीराच्या तंदुरुस्तीवर त्याने विशेष लक्ष केंद्रित केले. त्यामुळे पायाचे, कमरेचे विविध प्रकाराचे व्यायाम करून त्याने शरीराचा खालील भाग भक्कम केल्याचा फायदा त्याला रविवारच्या लढतीत मिळाला. दोन वर्षांपूर्वी ज्या आशियाई कनिष्ठ स्पर्धेत लक्ष्यने कांस्य पटकावले होते, त्याच स्पर्धेत त्याने अग्रमानांकित थायलंडच्या कुनलावुत वितीदसॅम याला पराभूत करून विजेतेपद पटकावत त्याने अजून एक ‘कनिष्ठ’ लक्ष्यपूर्ती केली आहे.

नजीकच्या भविष्यात ऑक्टोबरमध्ये होणारी युवा ऑलिम्पिक स्पर्धा आणि नोव्हेंबरमध्ये होणारी जागतिक कनिष्ठ चॅम्पियनशिप या स्पर्धा त्याचे लक्ष्य राहणार आहेत. तसेच नजीकच्या भविष्यात खुल्या गटातील स्पर्धामध्येही त्याने विजेतेपद पटकावल्यास कुणालाच आश्चर्य वाटणार नाही.

DR.HIMENDRA BHARTI

डॉ. हिमेंदर भारती


4442   23-Jul-2018, Mon

मुंगी अगदी छोटासा कीटक; अतिशय शिस्तबद्ध, सांघिक वृत्ती यासाठी प्रसिद्ध. या मुंग्यांच्या अंगी असलेले अनेक गुण आता संशोधनातून सामोरे आले आहेत. याच मुंग्यांवर गेली वीस वर्षे काम करणारे डॉ. हिमेंदर भारती यांचे नाव मुंग्यांच्या एका प्रजातीला देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

जम्मू काश्मीरमधील पिरपांजाल हिमालयातील पर्वतराजीत शोधण्यात आलेली मुंग्यांची एक प्रजात संशोधन निबंध प्रसिद्ध करण्यापूर्वीच्या प्रक्रियेत त्यांच्याकडे पाठवण्यात आली होती; पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मुंगीला त्यांचेच नाव देण्यात आले आहे. असा बहुमान एखाद्या वैज्ञानिकासाठी देवदुर्लभच. या मुंगीचे नाव आहे लेप्टोजेनीस भारती. डॉ. भारती हे पतियाळातील पंजाब विद्यापीठात प्राणिशास्त्र व पर्यावरण विज्ञान विभागाच्या ‘अँट सिस्टीमॅटिक्स अँड मॉलिक्युलर बायोलॉजी’ या संस्थेत वैज्ञानिक म्हणून काम करतात.

पिरपांजालमध्ये शोधण्यात आलेली मुंगी ११-१२ मि.मी. लांबीची आहे. ती शोधली आहे ‘सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ टेंपरेट हॉर्टिकल्चर’ या श्रीनगरमधील संस्थेचे डॉ. शाहीद अली अकबर यांनी. त्यांचा या मुंगीबाबतचा शोधनिबंध ‘बायोडायव्हर्सिटी डाटा जर्नल’मध्ये प्रसिद्ध झाला. या मुंगीला नाव कुठले द्यायचे, असा प्रश्न पडला तेव्हा त्यांनी डॉ.  भारती यांचे नाव देण्याचे सुचवले व नंतर तो शोधनिबंधही तपासणीसाठी डॉ.भारती यांच्याकडे आला तेव्हा त्यांना या मुंगीच्या प्रजातीस आपलेच नाव देण्यात आल्याचे समजले. नव्या मुंगीचा शोध मॉर्फालॉजी तंत्राने लावण्यात आला. डॉ. हिमेंदर भारती व त्यांच्या विद्यार्थ्यांनी भारतातील मुंग्यांच्या एकूण ७७ नव्या प्रजाती शोधल्या असून त्यातील २२ पश्चिम घाटातील आहेत. त्यांनी आग्नेय आशियातील व्हिएतनाम, मलेशिया व चीन या देशांतील आणखी चार नव्या प्रजाती शोधल्या आहेत.

पंजाब विद्यापीठात त्यांनी मुंग्यांची संदर्भसूचीच तयार केली असून त्यांच्याकडे भारत व इतर देशांतील मुंग्यांच्या एक हजार प्रजातींचे नमुने आहेत. मूळ संशोधकांनी त्यांना ते दिलेले आहेत, यावरून त्यांच्याविषयी जगभरातील संशोधकांना असलेला आदरही दिसून येतो.  डॉ. हिमेंदर भारती यांचे संशोधन मुंग्यांची जीवनशैली, परिसंस्था, त्यांचे उत्क्रांतीतील स्थान, जंगलांच्या संवर्धनात मुंग्यांची भूमिका असे खूप व्यापक आहे. मुंग्यांच्या अभ्यासाची मिरमेकॉलॉजी नावाची एक शाखा आहे, त्यातील ते अग्रणी संशोधक आहेत.

gopaldas neeraj

गोपालदास नीरज


5782   22-Jul-2018, Sun

देव आनंद यांनी लखनऊतील एका मुशायऱ्यात एका कवीच्या कविता ऐकल्या आणि  त्यांना मुंबईला येण्यास सांगितले. कविता, ग्मज्मला आणि नज्म्म लिहिणे हाच त्यांचा श्वास आणि ध्यास होता.  त्यांचे नाव होते गोपालदास सक्सेना ऊर्फ ‘नीरज’.

नीरज यांचे ‘कारवाँ गुजर गया..’ हे गीत लोकप्रिय नंतर झाले. त्याआधी याच नावाचा त्यांचा काव्यसंग्रह आला होता, जो साठच्या दशकात युवा पिढीत तुफान लोकप्रिय होता. देव आनंदने नीरज यांना सचिनदांकडे नेले. रंगीला या शब्दापासून सुरू होणारे गाणे त्यांना हवे होते. त्यातून नीरज यांनी लिहिले रंगीला रे तेरे रंग में.. हे सदाबहार गाणे; जे ५० वर्षांनंतरही तसेच ताजे टवटवीत वाटते. पुढे मग ए भाय जरा देख के चलो,  बस यही अपराध मैं हर बार करता हूं, पैसे की पहचान यहां,  शोखियों में घोला जाए फूलों का शबाब, दिल आज शायर है ग्मम आज नग्म्मा है, फूलों के रंग से, चूडम्ी नहीं ये मेरा दिल है, लिखे जो खत तुझे,  खिलते हैं गुल यहाँ.. अशी अनेक गीते त्यांनी लिहिली. प्रेम पुजारी, मेरा नाम जोकर, शर्मिली यांसारख्या चित्रपटांतील त्यांची गाणी गाजली तरी हे चित्रपट मात्र तिकीटबारीवर आपटले.  नीरज यांची गाणी घेतली की चित्रपट पडतो, अशी ओरड तेव्हा काहींनी सुरू केली. गीतलेखनाचे तीन मानाचे पुरस्कार मिळाले तरी त्यांना मग काम मिळणे बंदच झाले.

देव आनंदही त्यांना टाळू लागल्याने मग एके दिवशी सरळ बॅग भरून त्यांनी मुंबईला कायमचा रामराम ठोकला आणि इटावा या आपल्या मूळ गावी पुन्हा गेले. जगण्यासाठी त्यांना अनेक नोकऱ्या कराव्या लागल्या. ते सरकारी कार्यालयात टंकलेखक होते तसेच एका दुकानात विक्रेता म्हणूनही त्यांना काम करावे लागले. शेवटी मेरठच्या एका महाविद्यालयात  हिंदीचे प्राध्यापक व नंतर विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले. दर्द दिया है, आसावरी, मुक्तकी, कारवां गुजर गया.. (सर्व काव्यसंग्रह), लिख लिख भेजत पाती (पत्रलेखन), पंत-कला, काव्य और दर्शन (समीक्षा) ही त्यांची ग्रंथसंपदा. पद्मश्री (१९९१) आणि पद्मभूषण (२००७) किताबाने सरकारने त्यांना गौरविले होते.

‘बदन के जिसके शराफत का पैरहन देखा, वो आदमी भी यहाँ हमने बदचलन देखा’ वा ‘जब लगा कक्षाएं न लेने का आरोप’ सारखी ग़जम्ल असो वा ‘मानव होना भाग्य है, कवि होना सौभाग्य है’सारखा दोहा सादर करताना कविसंमेलनात त्यांचाच प्रभाव असायचा. त्यांच्या कवितांमध्ये जीवनविषयक तत्त्वज्ञानाबरोबरच प्रगल्भतेची किनार होती. ‘आज भले कुछ भी कह लो तुम, पर कल विश्व कहेगा सारा, नीरज से पहले गीतों में सबकुछ था पर प्यार नहीं था’ असे आत्मविश्वासाने लिहिणारा कवी हिंदीत तरी सापडणारही नाही.हरिवंशराय बच्चन, ओशो हे त्यांच्या कवितांचे चाहते होते. ओशो यांनी अखेरच्या काळात त्यांना बोलावून त्यांच्याशी दीर्घकाळ संवाद साधला होता.  ९३ वर्षांचे दीर्घ आयुष्य त्यांना मिळाले. गुरुवारी प्रेमाचा हा प्रवासी अनंतात विलीन झाला.


Top