
नॉर्मन मायर्स
699 07-Nov-2019, Thu
पर्यावरणाकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा मानवी जीवनावरही हानीकारक परिणाम होत असतो हे आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत, पण हे धोके काही द्रष्टय़ा वैज्ञानिकांनी आधीच सांगून ठेवले होते त्यापैकी एक म्हणजे नॉर्मन मायर्स. दरवर्षी इंग्लंड किंवा वेल्सच्या आकाराचे जंगल तोडले किंवा जाळले जाते असा अंदाज त्यांनी गणनाअंती व्यक्त केला होता. उपग्रह छायाचित्र तंत्रज्ञानाने हे अंदाज आता अगदी सोपे असले तरी ज्या काळात यातील काहीच नव्हते तेव्हा म्हणजे चाळीस वर्षांपूर्वी मायर्स यांनी हा अंदाज दिला होता. त्यातूनच त्यांचे वेगळेपण दिसून येते. मायर्स यांच्या निधनाने निसर्गाची बाजू ठामपणे मांडणाऱ्या पर्यावरणतज्ज्ञांपैकी एक काळाच्या पडद्याआड गेला आहे. ‘द सिंकिंग आर्क’ हे पुस्तक त्यांनी १९७९ मध्ये लिहिले होते. त्यात मानवी कृत्यांमुळे एका दिवसात प्राणी व वनस्पती यांच्या किती प्रजाती नष्ट होतात याचाही ठोकताळा मांडला होता. तो काहीसा चुकलाही होता, त्यामुळे दर दिवसाला ५० प्रजाती नष्ट होतात हे त्यांनी नंतर मान्य केले होते. पण या हानीची मोजदाद करावीशी वाटणाऱ्या धडपडय़ा पर्यावरणप्रेमींपैकी ते एक होते. त्यानंतर व्हाइट हाऊस, संयुक्त राष्ट्रांच्या संस्था, जागतिक बँक, युरोपीय आयोग, संयुक्त राष्ट्रांची हवामान बदल अभ्यास समिती या संस्थांत त्यांनी वेगवेगळ्या पदांवर काम केले. मानवी संघर्षांमुळेच लोकांवर निर्वासित होण्याची वेळ येते असे नाही, तर नैसर्गिक आपत्ती, हवामान बदल यामुळेही त्यांच्यावर देश सोडण्याची वेळ येते असे मत मांडणारे ते पहिले पर्यावरणतज्ज्ञ. संपूर्ण पृथ्वी ग्रहावर मानवाची अधिसत्ता निर्माण होण्याचा धोकाही त्यांनी मांडला होता, त्यातून त्यांनी ‘अँथ्रॉपोसीन’ ही संकल्पना मांडली. प्रवाहाविरोधी जाणाऱ्या लोकांना जसा विरोध होतो तसाच त्यांना झाला. त्यांचे म्हणणे कुणी मान्य करीत नव्हते, पण कालांतराने एडवर्ड विल्सन, पॉल एरलिश यांच्यासारख्या सागरी जीवशास्त्रज्ञांनी त्यांना पाठिंबा दिला. पर्यावरण क्षेत्रातील नायक म्हणून ‘टाइम’ नियतकालिकाने त्यांचा गौरव केला होता. वीस पुस्तके व ३०० शोधनिबंध त्यांच्या नावावर आहेत. लँकेशायर येथे गरीब कुटुंबात जन्मलेल्या नॉर्मन यांनी ऑक्सफर्डमधून आधुनिक भाषांचे शिक्षण घेतले होते. काही काळ त्यांनी केनयात नोकरी केली, त्यामुळे त्यांना मसाई व स्वाहिली भाषा येत होत्या. तेथे ते वन्यजीव छायाचित्रकार म्हणून प्रसिद्ध होते. चित्त्यांवर त्यांनी बरेच संशोधन केले. किलिमांजारोसह अनेक शिखरे त्यांनी पादाक्रांत केली. निसर्गाच्या कुशीत हसतखेळत बागडणारा एक निसर्गप्रेमी पर्यावरण-अभ्यासक आपण गमावला आहे.