booming-sale-of-cars-bikes-hit-public-transport-system

लाख दुखों की एक दवा..


2601   05-Sep-2018, Wed

कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोणत्याही शहराच्या विकासाला फार मोठा हातभार लावत असते; परंतु त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्याने अनेक प्रश्न उभे राहतात. भारतातील सगळ्या मोठय़ा शहरांची ही व्यथा आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम आणि कार्यक्षम असेल, तर कुणीही आपला जीव धोक्यात घालून स्वत:च्या वाहनाने प्रवास करण्याचे धैर्य दाखवणार नाही; परंतु गेल्या २५ वर्षांत देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील बसच्या फे ऱ्यांमध्ये प्रचंड घट झालेली दिसते.

१९९४ मध्ये देशातील या व्यवस्थेत प्रवासी वाहतूक करणाऱ्या फे ऱ्या ६० ते ८० टक्के एवढय़ा होत्या. त्या आता २५ ते ३५ टक्क्यांपर्यंत कमी झाल्या आहेत. याचा अर्थ शहरांत खासगी वाहनांचा वापर प्रचंड वाढला आहे. गेल्या चार वर्षांत खासगी दुचाकी वाहनांची टक्केवारी १४ टक्क्यांवरून १८.५ टक्क्यांवर गेली आहे. याच चार वर्षांत देशभर सार्वजनिक वाहतुकीच्या बसगाडय़ांचे प्रमाण मात्र ०.२ टक्के एवढेच राहिले. रस्त्यांवर प्रचंड वाहने येणे, हे वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण असते. या कोंडीमुळे रस्त्यांची अवस्था जेवढी बिकट होते, त्याहूनही अधिक प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होतो.

गेल्या काही दशकांपासून रस्त्यांचे रुंदीकरण जवळपास ठप्प झाल्यासारखे आहे. रुंदीकरणाला पर्याय म्हणून जागोजागी उड्डाणपूल बांधण्याचा सपाटा गेल्या काही वर्षांत सुरू झाला. तरीही त्याने प्रश्न सुटला नाहीच. उलट अधिक जटिल झाला. खासगी वाहननिर्मिती उद्योगाला या काळात प्रचंड चालना मिळाली हे खरे असले, तरीही त्यामुळे कोणत्याही शहराचे अधिक भले झाले नाही. सरकारी धोरणांमधील गोंधळ या सगळ्यास कारणीभूत आहे.

बहुतेक ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही फायद्यातील व्यवस्था असत नाही. त्यासाठी अन्य व्यवस्थांचा पाठिंबा आवश्यक असतो. प्रत्यक्षात सगळ्याच शहरांमध्ये या व्यवस्था खड्डय़ात कशा राहतील, याकडेच राज्यकर्त्यांनी लक्ष दिल्याने, त्यांची धन झाली; पण शहरांमधील बकालपणात कमालीची भर पडली.

खासगी वाहन खरेदीला प्रोत्साहन देणाऱ्या बँकांच्या योजना आणि त्याच्याशी जोडलेला प्रतिष्ठेचा मुद्दा यामुळे वाहनांच्या संख्येत मोठीच भर पडली. पुण्यासारख्या शहरात दरडोई दीड वाहन आहे. चंदिगढमध्ये हे प्रमाण अधिक आहे. एके काळी कार्यक्षमतेसाठी प्रसिद्ध असलेली मुंबईची बेस्ट बससेवा आता अतिशय हलाखीच्या स्थितीत आहे, याचे कारण राज्यकर्ते येथे गांभीर्याने पाहातच नाहीत.

छोटय़ा शहरांमध्ये तर अशी व्यवस्था मोडकळीस आलेली आहे. अधिक वाहने म्हणजे इंधनाचा अधिक वापर, परिणामी परकीय चलनावर ताण, हे सूत्र न कळण्याएवढे राज्यकर्ते अजाण नाहीत. मात्र खासगी वाहनांना प्रोत्साहन देऊन सार्वजनिक व्यवस्था मोडकळीस आणण्यास तेच जबाबदार आहेत. अनेक प्रगत देशांमध्ये, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हा विकासाचा कणा मानला जातो. तेथे खासगी वाहनांवर मोठय़ा प्रमाणात करांचा बोजा टाकला जातो. वाहनतळांमध्येही जास्त शुल्क आकारले जाते.

खासगी वाहने कमी व्हावीत, यासाठी अशा धोरणांची भारतात अधिक आवश्यकता आहे. गेल्या चार वर्षांत दुचाकी व चारचाकी वाहनांच्या संख्येत आठ ते दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे एका पाहणीत आढळले. हे चित्र भयावह आहे. वाहतूक कोंडी, इंधनाचा अतिरेकी वापर, वाहनतळांच्या अभावाने रस्त्यांवर स्थायी राहणारी वाहने, प्रदूषण या सगळ्या प्रश्नांवर एकच उत्तर असू शकते. ‘लाख दुखों की एक दवा’ असलेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अधिक लक्ष केंद्रित केले गेले नाही, तर देशातील शहरांची अवस्था अतिशय हलाखीची होईल.

poors sweetness in asian games

गरिबीचे गोडवे


4085   01-Sep-2018, Sat

आर्थिक स्तर आणि खेळांतील कामगिरी यांचा संबंध जोडण्याचा उतावीळपणा करण्यापेक्षा, खेळांचे प्रशासन आणि सुविधा, मदत यांकडे पाहायला हवे..

दारिद्रय़ आणि खेळातील प्रावीण्य यांतील संबंधांचे बऱ्याचदा भोळसटपणे उदात्तीकरण होते. सध्या जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये भारतीय खेळाडूंना अ‍ॅथलेटिक्समध्ये जे घवघवीत यश मिळाले, त्याबाबतही हे असे सुरू झाले आहे. यात पदके मिळवणाऱ्यांतील अनेक खेळाडू आर्थिक विपन्नावस्थेतून दिवस काढत आहेत. त्यामुळे त्यांच्या यशाचे विशेष कौतुक करायलाच हवे, यात शंका नाही. परंतु ते करताना त्यांच्या दारिद्रय़ाच्या कोडकौतुकाची काही गरज नाही. दारिद्रय़ आणि खेळांतील प्रावीण्य यांचा संबंध असता तर जवळपास प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धात अमेरिकी खेळाडू पदकांची लयलूट करते ना. तसेच टेनिसमधील आंद्रे आगासी, जगज्जेता रॉजर फेडरर, आपला अभिनव बिंद्रा आदी अनेक तर उत्तम आर्थिक स्थितीतून आलेले खेळाडू. तेव्हा गरिबी आणि खेळाडूंची कामगिरी यांच्याविषयी उगाचच रम्य भावना बाळगण्याचे काही कारण नाही. मग ताज्या जकार्ता स्पर्धातील काही भारतीय खेळाडूंची विपन्नावस्था आणि त्यांची कामगिरी यांचा संबंध कसा लावणार?

तो असा की आर्थिकदृष्टय़ा हलाखीतून आलेले खेळाडू जिवाची बाजी करून स्पर्धात उतरतात. कारण त्यांचे मागे जाण्याचे दोर कापलेले असतात आणि जगण्याच्या अनेक आघाडय़ांवर सुरू असलेल्या संघर्षांत त्यांना खेळाच्या मदानावरील पराभवाची भर घालायची नसते. या स्पर्धातील हिमा दास, स्वप्ना बर्मन आदी खेळाडूंनी आपल्याला यश मिळाले तर त्याद्वारे मिळालेल्या पशावर आपले घर चालणार आहे, नाही तर उपासमारीस तोंड द्यावे लागणार आहे अशी भावना व्यक्त केली. तीत त्यांच्या यशाचे कटू वास्तव आहे. परंतु हे यांच्याच बाबत झाले वा होते असे नाही.  भारताच्या अ‍ॅथलेटिक्स क्षेत्राचा नावलौकिक आजपर्यंत ज्यांनी उंचावला आहे, अशा मिल्खा सिंग, पी. टी. उषा, कविता राऊत, ललिता बाबर आदी अनेक आंतरराष्ट्रीय धावपटूंची आर्थिक परिस्थिती बेताची वा वाईटच होती. त्यामुळे त्यांना किती कष्टातून पुढे यावे लागले याची कल्पना येऊ शकते. भारताची सुवर्णकन्या उषा ही केरळमधील पायोली या खेडय़ातून पुढे आलेली. तीच गोष्ट कविता राऊतची. ती नाशिक जिल्ह्यातील सावरपाडा या आदिवासी परिसरातील. जागतिक स्तरावर कीर्तिमान कामगिरी करणारे उसेन बोल्ट, शेली अ‍ॅन फ्रेझर या जमेकाच्या धावपटूंनाही हलाखीतून अ‍ॅथलेटिक्स करिअर करावे लागले आहे. आशियाई क्रीडा स्पध्रेत सुवर्णपदक मिळविणारी स्वप्ना बर्मन हिचे वडील सायकलरिक्षा चालवितात. गेले अनेक महिने ते मोठय़ा आजारामुळे अंथरुणास खिळून आहेत. साहजिकच स्वप्ना हिला घरचा आर्थिक भारही सोसावा लागतो. हेप्टॅथलॉनसारख्या खेळात धावणे, फेकी व उडय़ा आदी सात क्रीडा प्रकारांचा समावेश असतो. त्यामुळे सर्वच क्रीडा प्रकारांचा सराव तिला करावा लागतो. तिच्या दोन्ही पायांना सहा बोटे आहेत. शस्त्रक्रिया करून घेण्याचा तिला सल्ला देण्यात आला होता. मात्र त्यासाठी लागणारा खर्च करणे तिला जड वाटले. त्यामुळे या अडथळ्यासही ती आत्मविश्वासाने सामोरी गेली. हिमा दास हिचे वडील शेतकरी आहेत. जेमतेम दैनंदिन गुजराण होईल एवढेच त्यांना शेतीद्वारे उत्पन्न मिळते. अ‍ॅथलेटिक्सच्या स्पर्धात्मक करिअरसाठी हिमा हिला तिच्या गावापासून दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या गुवाहाटी येथे राहावे लागले. स्वप्ना, हिमा, मनजीतसिंग, जॉन्सन जिन्सन आदी सर्वच पदक विजेत्या खेळाडूंपुढे आर्थिक अडचणी होत्या. पूर्वीही त्या होत्याच. आता त्यात काहीसा बदल झाला आहे.

याचे कारण खेळाडूंना पाठबळ देणारी व्यवस्था. क्रीडा खात्याचे मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड हे स्वत: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नेमबाज. त्यांनी क्रीडा खात्याचे मंत्रिपद हाती आल्यावर ऑलिम्पिक पदक व्यासपीठ या योजनेंतर्गत नपुण्यवान खेळाडूंना आर्थिक सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेतला. पूर्वी खेळाडूंना विविध स्पर्धासाठी मदत मिळविताना अनेक अडचणी येत असत. अनेक वेळा खेळाडू स्पर्धा संपवून आल्यानंतरच ही मदत मिळत असे. राठोड यांनी खेळाडूंची ही अडचण दूर करण्यासाठी खेळाडूंना त्यांच्या खात्यात थेट शिष्यवृत्ती व आर्थिक मदत देण्याची व्यवस्था केली. आर्थिक निधीच्या मार्गातील ‘दलाल’ त्यांनी दूर केले. केवळ खेळाडू नव्हे तर त्यांच्याकरिता नियुक्त केलेल्या मदतनीसांनाही  मानधन देण्याची व्यवस्था केली. खेळाडूंच्या सराव व स्पर्धामधील सहभागाबाबत सविस्तर माहिती घेऊन त्यानुसार खेळाडूंचा परदेश प्रवास सुकर झाला. परदेशी प्रशिक्षक, फिजिओ, क्रीडा मानसतज्ज्ञ यांच्यासाठीही शासनाकडून आर्थिक पाठबळ मिळाले. शासनाच्या बरोबरीने अनेक विश्वस्त संस्थाही खेळाडूंना भरपूर साह्य करीत आहेत. प्रकाश पदुकोण, गीत सेठी आदी ज्येष्ठ खेळाडूंनी एकत्र येऊन ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट ही संस्था सुरू केली. ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट, मित्तल ट्रस्ट, लक्ष्य फाउंडेशन आदी अनेक विश्वस्त संस्था गेली दहा-बारा वष्रे ऑलिम्पिक व अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या गरजू खेळाडूंना मदत करीत असतात. आंधळेपणाने मदत न करता खरोखरीच या खेळाडूकडे पदक मिळविण्याची गुणवत्ता आहे की नाही याची चाचपणी केली जाते. या संस्था शारीरिक प्रशिक्षण, क्रीडा मानसतज्ज्ञ यांचीही नियुक्ती करीत असतात. वेळोवेळी खेळाडूंच्या कामगिरीचाही आढावा घेतला जात असतो. भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला हे स्वत: ऑलिम्पिक स्पध्रेत सहभागी झालेले धावपटू असल्यामुळे कोणत्या खेळाडूंना कोणते प्रशिक्षक पाहिजेत, परदेशात कोणत्या ठिकाणी या खेळाडूंना स्पर्धात्मक सराव होणार आहे आदी गोष्टींचा अभ्यास करूनच त्यांनी खेळाडूंच्या मदतीसाठी विविध कंपन्या व केंद्रीय क्रीडा मंत्रालयास प्रस्ताव दिले. रोजीरोटीचा प्रश्न सुटला तर मानसिक दडपण दूर होते हे लक्षात घेऊनच नपुण्यवान खेळाडूंना नोकरीची संधी निर्माण करून देण्यासाठी अ‍ॅथलेटिक्स महासंघाने पुढाकार घेतला आहे.

त्यामुळेच भारताला यंदा अ‍ॅथलेटिक्सने तारले आहे. बाकी बऱ्याच स्पर्धात आपला आनंदच आहे. कबड्डी हा आपल्यासाठी सुवर्णपदकाचा हुकमी खेळ. पण तिथे आपण अगदी नव्या संघांकडूनही हरलो. हॉकीचेही तेच झाले. मलेशियाविरोधात खेळताना तर बरा खेळणारा आपला संघ संशयास्पदरीत्या कच खाता झाला आणि जिंकत आलेला सामना हरवून बसला. म्हणजे एका बाजूने आपले अ‍ॅथलेटिक्समधले खेळाडू त्यातल्या त्यात बरी कामगिरी नोंदवीत असताना आपल्या अन्य खेळाडूंची कामगिरी फारच सुमार झाली. ज्या खेळांत आपण पराभूत झालो त्यातील खेळाडू काही धनाढय़ वर्गातील आहेत असे नाही. पण तरीही ते हरलेच. तेव्हा आर्थिक स्तर आणि खेळांतील कामगिरी यांचा संबंध जोडण्याचा उतावीळपणा करण्यात काही शहाणपण नाही.

याचे कारण आपल्याकडे आधीच ‘धट्टीकट्टी गरिबी, लुळीपांगळी श्रीमंती’ अशी दळभद्री वचने संस्कृतीत रुतून बसलेली आहेत. वास्तविक ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे त्यांना प्रगतीची संधी आपली व्यवस्था नाकारते याचा आपणास खेद हवा. ते राहिले दूर. उलट आपण त्यांच्या गरिबीचे उदात्तीकरण करतो. यात लबाडी आहे. ती आशियाई स्पर्धासारख्या तुलनेने कमी स्पर्धात्मकतेत खपून जाते. पण ऑलिम्पिक स्पर्धात पदके जिंकायची तर या सगळ्यावर पुरून उरणारी गुणवत्ता लागते. ती गाठण्याचा प्रयत्न करायला हवा. आशियाई विजेत्या खेळाडूंच्या गरिबीचे गोडवे गात बसणे फार शहाणपणाचे नाही.

abhay kumar

अभय कुमार


2973   01-Sep-2018, Sat

जगभर फिरून आल्यानंतरच आपल्या जन्मभूमीचे खरे महत्त्व कळते. राजनैतिक अधिकारी व कवी अभय कु मार यांनी अनेक देशांमध्ये काम केल्यानंतर घेतलेला हा अनुभव. त्यांची ओळख राजनैतिक अधिकारी म्हणून फारशी नसली तरी कवी म्हणून नक्कीच आहे. नुकतेच त्यांच्या कवितांचे वॉशिंग्टन डीसी येथे ‘लायब्ररी ऑफ काँग्रेस’ येथे ध्वनिमुद्रण करण्यात आले. हा मान मिळालेले ते पहिले भारतीय कवी. ‘दी पोएट्री अ‍ॅण्ड पोएट’ मालिकेत त्यांच्या या कवितांचा समावेश करण्यात आला आहे. या ध्वनिमुद्रणात आतापर्यंत १९९७ पासून रॉबर्ट हास, रिचर्ड ब्लांको, इव्हान बोलॅण्ड, बिली कॉलिन्स, रिटा डव्ह, लुईस ग्लक, डोनल हॉल, टेरान्स हेस, टेड कुसर, फिलीप लीव्हाइन, व्ही.एस मेरविन, नोमी शिहाबा ने, रॉबर्ट पिनस्की, चार्ल्स सिमिक, नताशा ट्रेथवे, मोनका युन, ट्रॅसी स्मिथ यांच्या कवितांचा समावेश झाला आहे.

अभयकु मार यांची अलीकडची वॉशिंग्टन भेट गाजली, ती तेथील ‘बसबॉइज’ या पुस्तकांच्या दुकानात झालेल्या काव्यवाचनाने. तेथे इंद्रन, अमृतनायगम, सिमॉन शुचॅट यांच्यासमवेत त्यांनी काव्यवाचन केले. त्यांच्या कवितांचा समावेश किमान साठ आंतरराष्ट्रीय साहित्य नियतकालिकांत झाला आहे. ‘द सिडक्शन ऑफ दिल्ली’ (२०१४), ‘द एट आइड लॉर्ड ऑफ काठमांडू ’ (२०१७),‘ द प्रॉफेसी ऑफ ब्राझिलिया’ (२०१८)  हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘अर्थ अँथेम’ हे त्यांचे काव्यगीत तीस भाषांत अनुवादित झाले असून ‘नॅशनल थिएटर ऑफ ब्राझिलिया’ या संस्थेने त्याची संगीतमय रचना तयार केली. त्यात व्हायोलिनवादक डॉ. एल. सुब्रमणियम यांनी संगीत दिले असून कविता कृष्णमूर्ती यांनी ते गायले आहे. ‘कॅपिटल्स अ‍ॅण्ड १०० ग्रेट इंडियन पोएट्स’ या पुस्तकाचे ते संपादक आहेत. २०१३ मध्ये त्यांना सार्कचा साहित्य पुरस्कार मिळाला. ‘पोएट्री साल्झबर्ग रिव्हय़ू’, ‘आशिया लिटररी रिव्हय़ू’ या नियतकालिकांत त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले.

अभयकुमार हे मूळ बिहारचे. १९८० मध्ये नालंदा जिल्हय़ात एका लहानशा खेडय़ात जन्मलेला प्राथमिक शिक्षकाचा हा मुलगा जेव्हा दिल्लीत आला तेव्हा तेथील संस्कृती त्याच्यासाठी वेगळी होती.  इंग्रजीचा गंध नव्हता, पण दोन वर्षांत त्यांनी इंग्रजीवर प्रभुत्व मिळवले. पदवीसाठी त्यांनी भूगोलाचा अभ्यास केला, पण नंतर ते साहित्याकडे वळले. वयाच्या विशीत त्यांनी ‘रिव्हर व्हॅली टू सिलिकॉन व्हॅली-स्टोरी ऑफ थ्री जनरेशन्स ऑफ अ‍ॅन इंडियन फॅमिली’ हे आठवणीपर पुस्तक लिहिले. मध्यमवर्गीय कुटुंबाचा सगळा जीवनपट यातून सामोरा येतो. परराष्ट्र सेवेची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची पहिली नेमणूक थेट मॉस्कोत झाली. ते नुसते लेखकच नाहीत तर चित्रकारही आहेत.

सेंट पीट्सबर्ग, नवी दिल्ली, पॅरिस येथे त्यांच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. मगाही, हिंदी, इंग्रजी, रशियन, नेपाळी  या भाषा त्यांना येतात. संस्कृत, स्पॅनिश भाषा चांगल्या समजतात, त्याचा फायदा त्यांना वैचारिक संपन्नता वाढवण्यासाठी झाला. सध्या ते ब्राझीलमध्ये राजनैतिक अधिकारी आहेत. त्यांनी परराष्ट्र सेवेच्या माध्यमातून देशोदेशीच्या कवींना वेगळ्या माध्यमांतून एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. ‘वुई आर हय़ूमन्स, द अर्थ इज अवर होम’ या त्यांच्या पृथ्वीगीताचे अंतिम वाक्य जागतिकीकरणानंतर जगाशी आपल्या बदललेल्या नात्याची अनुभूती देते.

DR. AVINASH SUPE

डॉ. अविनाश सुपे


5134   31-Aug-2018, Fri

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून अविरत रुग्णोपचारासाठी झटतानाच आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा खजिना वैद्यकीय क्षेत्रातील पुढील पिढय़ा घडविण्यासाठी मुक्तपणे वाटणारे डॉ. अविनाश सुपे हे एक अद्भुत रसायन म्हणावे लागेल. सध्या डॉ. सुपे हे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता व पालिकेच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या असाधारण योगदानाबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या डॉ. बी. सी. रॉय पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.

डॉ. सुपे हे गेल्या तीन दशकांहून अधिक काळ मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापनाचे काम करीत आहेत. केईएममधून पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर टाटा सोशल सायन्सेसमधून रुग्णालय व्यवस्थापनाची पदव्युत्तर पदवी घेतली. अमेरिकेतील शिकागो येथील इलिनॉयस विद्यापीठातून मास्टर्स इन हेल्थ प्रोफेशन एज्युकेशनची पदवी प्राप्त केली. सर्जिकल गॅस्ट्रोएंट्रॉलॉजीतील तज्ज्ञ असलेल्या डॉ. सुपे यांच्याच पुढाकारातून केईएम रुग्णालयात लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेची सुरुवात करण्यात आली. केवळ वैद्यकीय विद्यार्थ्यांचेच नव्हे तर व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांचेही ते अत्यंत आवडते शिक्षक असून त्यांची आतापर्यंत पाच पुस्तके, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये २६२ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. याशिवाय जगभरातील परिषदांमध्ये ३७० हून अधिक वेळा गॅस्ट्रोएंट्रॉलॉजी विषयावर त्यांनी सादरीकरण केले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील नेतृत्व निर्माण करणाऱ्या अमेरिकेतील ‘फिमर’या संस्थेतून २००२ मध्ये फेलोशिप घेतल्यानंतर त्यांची असाधारण गुणवत्ता लक्षात घेऊन ‘फिमर’ संस्थेने त्यांच्यावर आशियात वैद्यकीय क्षेत्रातील नेतृत्व घडविण्याची जबाबदारी सोपवली होती. पालिका रुग्णालये ही प्रामुख्याने गोरगरीब रुग्णांसाठी असली तरी येथे येणाऱ्या गरीब रुग्णांना अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे यासाठी  ते कायम आग्रही राहिले.

मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या माध्यमातून देशातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय अभ्यासक्रम तयार करण्यातही त्यांचे मोलाचे योगदान आहे. आधी केले मग सांगितले ही वृत्ती असलेल्या डॉ. सुपे यांनी आतापर्यंत १२० वेळा स्वत: रक्तदान केले असून यासाठी केंद्र सरकारचा शतकवीर रक्तदाता हा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. डॉ. सुपे यांनी आपले निसर्ग व वन्यजीव क्षेत्रातील छंद फोटोग्राफीच्या माध्यमातून जपले असून फोटोग्राफीतील त्यांची कामगिरी लक्षात घेऊन ‘फोटोग्राफी सोसायटी ऑफ इंडिया’ने त्यांना सन्माननीय सदस्यत्वही बहाल केले आहे.

dr.G satish reddy  drdo

डॉ. जी.सतीश रेड्डी


5382   30-Aug-2018, Thu

देशाच्या संरक्षणसिद्धतेशी निगडित असलेली संरक्षण संशोधन व विकास संस्था ही देशातील एक नामांकित संस्था. माजी राष्ट्रपती व वैज्ञानिक ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासह अनेकांनी ती घडवण्यात मोठे योगदान दिले आहे. लष्करी संशोधन व विकास ही उद्दिष्टे साध्य करणाऱ्या या संस्थेच्या प्रमुखपदी नुकतीच ‘रॉकेटमॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेले वैज्ञानिक डॉ. जी. सतीश रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता ते आधीचे अध्यक्ष एस. ख्रिस्तोफर यांच्याकडून सूत्रे स्वीकारतील. त्यांचा कार्यकाल दोन वर्षांचा राहणार असल्याने अल्पावधीत त्यांना नेतृत्वाचा ठसा उमटवण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.

संरक्षण संशोधन व विज्ञान क्षेत्रात डॉ. रेड्डी यांचे नाव कुणालाच अपरिचित नाही. देशाचा क्षेपणास्त्र कार्यक्रम पुढे नेण्यात ज्यांनी आतापर्यंत मोठी कामगिरी केली त्यात त्यांचा समावेश आहे. डॉ. रेड्डी यांचा जन्म आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्य़ात महिमलारू येथे झाला. ते जवाहरलाल नेहरू तंत्रज्ञान विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असून तेथून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार अभियांत्रिकीत पदवी घेतली. दिशादर्शन विज्ञानात त्यांची तज्ज्ञता असून भारतीय क्षेपणास्त्र प्रणालीत त्यांनी अग्नि ५ या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीत मोठी भूमिका पार पाडली होती.

सध्या ते ए.पी.जे. अब्दुल कलाम क्षेपणास्त्र संकुलाचे नेतृत्व करीत होते. संरक्षण संशोधन व विकास प्रयोगशाळेचे ते संचालक होते. क्षेपणास्त्रांसाठी वेगवेगळ्या प्रणाली विकसित करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमातही रेड्डी यांचा मोठा वाटा होता. त्याच वेळी त्यांची संरक्षणमंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून नेमणूक झाली होती व यापुढेही ते पद त्यांच्याकडे राहणारच आहे. लंडनच्या रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ नॅव्हिगेशन या संस्थेची फेलोशिप मिळालेले ते देशातील पहिले संरक्षण वैज्ञानिक आहेत. त्याच संस्थेचे रजतपदक त्यांना २०१५ मध्ये मिळाले होते.

इंडियन नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनीयरिंग, कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया, एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया, इन्स्टिटय़ूशन ऑफ इंजिनीयरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी (ब्रिटन), अमेरिकन इन्स्टिटय़ूट ऑफ एरोनॉटिक्स अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रोनॉटिक्स या संस्थांचे ते मानद सदस्य आहेत.

आयईआय (इंडिया) आयईईई (यूएसए) या संस्थांचा संयुक्त पुरस्कारही त्यांना अभियांत्रिकीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी देण्यात आला होता. होमी भाभा स्मृती पुरस्कार, विश्वेश्वरय्या पुरस्कार, असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले आहेत. मध्यंतरी क्षेपणास्त्रनिर्मिती कार्यक्रमात काहीशी शिथिलता आली होती, ती दूर करण्यावर ते जास्त भर देतील अशी अपेक्षा आहे.

s k arora

एस. के. अरोरा


6040   29-Aug-2018, Wed

तंबाखूसेवन, धूम्रपान हे व्यसन सर्वच वयोगटांत व समाजाच्या सर्व थरांत आढळते. त्यातून तोंडाचा व फुप्फुसाचा कर्करोग बळावतो हे माहीत असतानाही ही जोखीम लोक घेत असतात. प्रत्येक अर्थसंकल्पात सिगारेटवरील कर वाढवला, तंबाखू व सिगारेटच्या पाकिटावर धोक्याचे इशारे चित्ररूपात ठळकपणे छापले, तरीही त्याचा फार मोठा परिणाम होताना दिसत नाही. पण दिल्लीतील आरोग्य खात्याचे अधिकारी एस. के. अरोरा यांनी वेगवेगळ्या माध्यमांतून तंबाखूचे सेवन व धूम्रपान यावर नियंत्रण मिळवले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा तंबाखूविरोधी दिनाचा २०१७ मधील पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.

एखाद्या सरकारी अधिकाऱ्याने एकांडय़ा शिलेदारासारखे प्रयत्न करून मिळवलेले हे यश नक्कीच उल्लेखनीय. त्यांच्या प्रयत्नांतून दिल्लीत धूम्रपानाचे प्रमाण ३५ टक्क्यांनी कमी झाले आहे. अरोरा हे दिल्लीच्या आरोग्य खात्यात अतिरिक्त संचालक आहेत. भारताच्या या तंबाखूविरोधी मोहिमेतील कामगिरीचा विचार करता त्यात दिल्लीची कामगिरी उजवी ठरली. भारतभरात धूम्रपानाचे प्रमाण तुलनेत २३ टक्के कमी झाले असताना दिल्लीत ते जास्त म्हणजे ३५ टक्क्यांनी कमी झाले आहे. यात गेल्या सहा वर्षांत दिल्लीत तंबाखूचा वापर ६.५ टक्क्यांनी कमी झाला आहे. उर्वरित भारतात गुटख्याचे प्रमाण १७ टक्के कमी झाले असताना दिल्लीत मात्र अरोरा व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांतून ते ६३ टक्के कमी झाले आहे.

यशाची कारणे सांगताना अरोरा म्हणतात की, दिल्लीत तंबाखू व सिगारेटच्या छुप्या जाहिरातींवरही नियंत्रण ठेवले आहे. तंबाखूविरोधी लढा हा विद्यार्थी, पालक व शिक्षक या पातळ्यांवर सुरू झाला पाहिजे. त्यासाठी त्यांनी सीबीएसई व एनसीईआरटी यांना पत्रे पाठवून तंबाखू नियंत्रणाचे पाठ अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यास सांगितले. सहावी ते बारावी या वयोगटातच मुलांना तंबाखूविरोधी धडे दिले तर ते परिणामकारक ठरते असा त्यांचा अनुभव आहे. रुग्णालये, शाळा, सरकारी कार्यालये येथे त्यांनी तंबाखूविरोधी मोहीम जोरात राबवली. त्यांच्याच प्रयत्नांतून तंबाखू कंपन्या व त्यांच्या उत्पादनांच्या जाहिराती करणारे अभिनेते यांना नोटिसा देण्यात आल्या. दिल्लीतील हुक्का पार्लरवर त्यांनी कठोर कारवाई केलीच; शिवाय ई-सिगारेटवरही बंदी घातली. ई-सिगारेटवर एक आंतरराष्ट्रीय प्रदर्शन होणार होते, तेही त्यांनी हाणून पाडले.

विशेष म्हणजे दक्षिण व आग्नेय आशियातून अरोरा हे एकमेव विजेते आहेत. इतर राज्यांसाठी त्यांची ही कामगिरी मार्गदर्शक अशीच आहे.

neil simon

नील सायमन


6216   28-Aug-2018, Tue

‘‘नाटक तर आपणही लिहू शकू, असं प्रत्येकाला वाटतं.. आयुष्यात आपल्यावर कोणकोणते प्रसंग आले, हे कुणीही लिहू शकतं.. पण आयुष्याचा प्रत्येक क्षण समजून घेऊन लिहिलं, तर नाटक लिहून होतं.’’ किंवा ‘‘मला जगणं आवडतं. समस्या माझ्याही आयुष्यात आहेत, पण जगणं हा (समस्यांवरचा) सर्वोत्तम उपाय आहे.’’ अशा साध्यासुध्या, पण प्रभावित करणाऱ्या नाटय़मय वाक्यांचे बादशहा होते नील सायमन! पण साध्या जगण्यावर प्रेम करणाऱ्या आणि प्रभावी शब्दांमधून ते मांडणाऱ्या एखाद्या लेखकास लोकांचे किती प्रेम मिळू शकते, याचे उदाहरण म्हणजे त्यांचे जगणे. त्यांची मृत्युवार्ता भारतीय वेळेनुसार सोमवारी सकाळी आली. ज्यावर सायमन यांनी प्रेम केले, ते जगणे त्यांच्यासाठी संपले.

सायमन हे अट्टल अमेरिकी. मॅनहॅटनमध्ये जन्मले. तिथेच थोडेफार शिकले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात देशसेवा वगैरेही केली प्रथेप्रमाणे. नंतर नोकरीचा प्रश्न आला. त्यांच्या बंधूंमुळे त्यांना नभोवाणी आणि चित्रवाणीवर संवादलेखनाचे काम मिळाले. तेव्हाच्या त्या लुटुपुटु हशा-टाळ्यांच्या जगात उणेपुरे दशकभर काढल्यावर सायमन खऱ्या परीक्षेला- रंगभूमीला- सामोरे गेले आणि पहिल्याच प्रयत्नात विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. ‘कम ब्लो युअर हॉर्न’ (१९६१) हे त्यांचे पहिले नाटक. याचे ६८० हून अधिक प्रयोग झाले आहेत. त्यानंतर त्यांनी ३० नाटके लिहिली आणि गेल्या ५० वर्षांत सातत्याने सायमन यांच्या नाटकांचे प्रयोग न्यू यॉर्क रंगमंचावर वा चित्रवाणीवर सुरू राहिले. न्यू यॉर्कचा ‘ब्रॉडवे’ हा लहानमोठी ४० नाटय़गृहे असलेला भाग जनप्रिय नाटकांसाठी प्रसिद्ध. तेथील चार नाटय़गृहांत एकाच वेळी सायमन यांच्या नाटकांचे खेळ होताहेत, असेही १९६८-६९ मध्ये घडले. विशेष म्हणजे, बदलत्या काळातही त्यांची लोकप्रियता अबाधित राहिली.

याचे कारण, स्वत:चा प्रेक्षकवर्ग सायमन यांना पक्का माहीत होता. अट्टल अमेरिकी, गौरवर्णीय, कुटुंबवत्सल.. किंवा व्यक्तिकेंद्रीपणामुळे कुटुंबच हरवूनसुद्धा कुटुंबवत्सलपणाचे कढ काढणारे प्रेक्षक. त्यांच्यासाठी लिहिता-लिहिता, सायमन यांना नात्यांचा सूर गवसला. अमेरिकी नाटकांना दिले जाणारे ‘टोनी पुरस्कार’ तीनदा आणि १९७५ साली ‘टोनी कारकीर्द गौरव’, अमेरिकन रायटर्स गिल्डतर्फेही चार वार्षिक बक्षिसांनंतर कारकीर्द गौरव, १९९१ सालच्या ‘लॉस्ट इन याँकर्स’ या नाटकासाठी ‘पुलित्झर पुरस्कार’, ‘द ऑड कपल’सह अनेक नाटकांवर चित्रपट निघून संवाद सायमन यांचेच असल्याने चारदा ‘ऑस्कर’साठी नामांकन.. १९६४ सालीच नाटकाचे चित्रपट हक्क विकून पावणेदोन लाख डॉलरची कमाई.. अशी समृद्धी सायमन यांना लाभली; पण अमेरिकी कुटुंबजीवनातील अस्वस्थेतेचे भाष्यकार म्हणूनच ते ओळखले जातील.

john mccain

जॉन मॅक्केन


3610   27-Aug-2018, Mon

जॉन मॅक्केन हे अमेरिकेच्या राजकारणातील एक वेगळे रसायन होते. त्यामुळेच त्यांच्या जाण्याने तेथील लोकशाही मूल्यांचा खंदा पुरस्कर्ता, लढवय्या राजकारणी गेल्याचे शल्य कुणालाही वाटल्यावाचून राहणार नाही. जॉन मॅक्केन यांची अ‍ॅरिझोनातून पहिल्यांदा १९८६ मध्ये सिनेटर म्हणून निवड झाली. शेवटपर्यंत ते सिनेटर होते इतका लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास होता. २००८ मध्ये अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचा बराक ओबामा यांनी पराभव केला होता. जय-पराजय हे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे नव्हते. प्रसंगी स्वपक्षाच्या विरोधात जाऊन मते मांडली. हे करण्यासाठी जे धाडस लागते ते त्यांच्याकडे होते, त्यामुळेच अमेरिकी राजकारणाची सुसंस्कृत परंपरा त्यांनी आणखी उंचीवर नेऊन ठेवली होती.

त्यांची कारकीर्दही नौदलातूनच सुरू झाली. अमेरिकेच्या प्रभावशाली सिनेटर्सपैकी एक असलेले मॅक्केन हे भारतमित्र होते. त्यामुळेच त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या २०१६ मधील अमेरिका भेटीवेळी सीएनएनसाठी लिहिलेल्या संपादकीयात एरवी मोजक्या मित्रदेशांना जवळ करणाऱ्या अमेरिकेने भारताला वेगळे स्थान दिल्याचे कौतुक केले होते. व्हिएतनाम युद्धात त्यांचे विमान पाडण्यात आले व नंतर त्यांना कैद करून छळ करण्यात आला. पाच वर्षे ते व्हिएतनाममध्ये तुरुंगात होते, ओबामा यांच्याविरोधातील लढतीच्या वेळी एका महिलेने प्रचाराच्या वेळी ओबामा हे ‘अरब’ आहेत, असे म्हटले होते, त्या वेळी त्यांनी तिच्या हातातला ध्वनिक्षेपक घेऊन ते अतिशय सभ्य, पण काही मूलभूत मुद्दय़ांवर आमच्या पक्षाशी मतभेद असलेले अमेरिकी नागरिक असल्याचे सांगितले होते. ओबामा यांच्या विजयानंतर त्याचे ऐतिहासिक महत्त्व समर्थकांसमोर सांगण्याची दिलदारीही त्यांच्याकडे होती.

रिपब्लिकन पक्षाने ओबामा हेल्थकेअर रद्द करण्यासाठी खूप प्रयत्न केल्यानंतरही मॅक्केन यांनी मात्र स्वपक्षाविरोधात मतदान केले होते. मॅक्केन यांनी ट्रम्प यांना कसून विरोध केला होता, कारण त्यांचा अर्धवटपणाचा राष्ट्रवादी बाणा त्यांना कधीच पसंत नव्हता. ट्रम्प यांना तर ते काटय़ासारखे न सलते तरच नवल. मॅक्केन यांनी ट्रम्प यांच्या स्थलांतर धोरणाला विरोध क रताना चुकीच्या धोरणांनी अमेरिका महान होणार नाही हे ठणकावून सांगितले होते. मृत्यू कोणाला टळत नसतो. जीवनात महत्त्वाची असते ती सभ्यता व चारित्र्य, त्यामुळेच आपण सुखी किंवा दु:खी बनतो, असे त्यांनीच एका पुस्तकात म्हटले आहे. गेल्या उन्हाळ्यातच त्यांना मेंदूचा कर्करोग झाल्याचे निदान झाले, पण तरी ते खचले नाहीत. त्यांच्या रूपाने सत्यवचनी राजकारणी व रोनाल्ड रेगन यांच्या राजकीय क्रांतीचा पाईक असलेला निष्ठावान रिपब्लिकन नेता गमावला आहे.

uri avnery

युरी अव्हेन्री 


4805   25-Aug-2018, Sat

‘छळाकडून बळाकडे’ असा प्रवास केलेल्या इस्रायलबद्दल अनेकांना कुतूहलयुक्त कौतुक असते. मात्र हिटलरी छळातून मुक्त होऊन राष्ट्र म्हणून बळ कमावल्यानंतरही इस्रायलने पॅलेस्टाईन व गाझा किनारपट्टीतील लोकांचा छळच आरंभला, हेही उघड आहे. इस्रायलच्या निर्मितीपासून पॅलेस्टिनी लोकांवर झालेल्या अत्याचारापर्यंतच्या कहाण्या जगभरातील लेखकांनी जगासमोर आणल्या आहेत. इस्रायलने पॅलेस्टिनी लोकांचा इतिहास बदलून टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना अमेरिका-इंग्लंडसारख्या बडय़ा देशांनी मदत केली, हेही अनेक पुस्तकांतून वाचायला मिळाले आहे. या लेखकांपैकी एक युरी अव्हेन्री हे इस्रायलमधील एक नावाजलेले पत्रकार, राजकीय नेते आणि लेखक होते.  स्वतंत्र पॅलेस्टाईनला मान्यता द्यावी या मताचे ते कट्टर समर्थक होते. त्यांनी स्वदेश- स्वधर्माचा रोष पत्करून सत्याची बाजू लावून धरली.

हेल्मट ऑस्टरमन हे त्यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म जर्मन ज्यू कुटुंबात झाला.नंतर ते ब्रिटिशांचा अंमल असलेल्या पॅलेस्टाईनमध्ये ते स्थलांतरित झाले. हिटलर तेव्हा नुकताच सत्तेवर आला होता. तेव्हा हेल्मट यांनी आपले नाव बदलून युरी असे ठेवले. नंतर ते लष्करात दाखल झाले. १९४८ च्या अरब-इस्रायल युद्धात त्यांनी भाग घेतला. लिखाणाची आवड असल्याने ते युद्धभूमीवरून ‘हारेत्झ’या दैनिकासाठी लिखाणही करत. या सर्व वार्तापत्रांचे ‘इन द फील्ड्स ऑफ फिलिस्तिया’ या नावाने पुस्तकही निघाले. १९५० मध्ये युरी व त्यांच्या तिघा मित्रांनी ‘हाओलम हाझे’ हे साप्ताहिक सुरू केले. अत्यंत स्पष्ट आणि परखड लिखाण ते करत असल्याने त्यांचा स्तंभ लोकप्रिय झाला होता. या लिखाणातून त्यांच्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ला झाला. त्यांच्या कार्यालयावर बॉम्ब फेकण्यात आले. एका गुंडाने त्यांच्यावर चाकूहल्ला करून त्यांच्या हाताची बोटे तोडण्यात आली. अशी अनेक अनेक संकटे आली तरी पत्रकारितेचा धर्म त्यांनी सोडला नाही.

युरी यांनी आपली राजकीय कारकीर्द ज्यूवादी- झायोनिस्ट चळवळीतून सुरू केली. भूमिगत राहून ब्रिटिश आणि पॅलेस्टिनी अरबांशी संघर्ष करणारी ही चळवळ होती. मात्र नंतर या चळवळीने इतरांवर दहशत बसविणारी, अन्याय्य हत्या करून जमीन ओरबाडण्याची कृत्ये सुरू झाल्याने ते या चळवळीतून बाहेर पडले. इस्रायलने १९८२ मध्ये लेबनॉनवर आक्रमण केले तेव्हा त्यांनी पॅलेस्टिनी मुक्ती संघटनेचे अध्यक्ष यासर अराफत यांची भेट घेऊन वाद ओढवून घेतला होता. १९९३ मध्ये युरी यांनी ‘गुश शॅलोम’ ही शांती आघाडी स्थापन केली. 

इस्रायलमध्ये उजव्या आणि कट्टर धर्माध पक्षांचा जोर वाढत असताना युरी यांनी नेहमी धर्मनिरपेक्षता आणि शांततेचाच पुरस्कार केला. हमास तसेच गाझा पट्टीतील पुरोगामी पॅलेस्टिनी गटांशीही बोलणी करण्यात काहीही गैर नाही हेच ते सांगत असत.  ते दोन वेळा पार्लमेंटवरही निवडून गेले. द सोल्जर्स टेल- द ब्लडी, इस्रायल विदाऊट झायोनिझम, माय फ्रेंड, द एनिमी ही त्यांची काही गाजलेली पुस्तके. कायम शांततेचा पुरस्कार करणारे अव्हेन्री गेल्या सोमवारी निवर्तले, पण त्याआधी त्यांनी आपल्या साप्ताहिकातील स्तंभ लिहून पूर्ण केला होता.

 upsc physical geography

यूपीएससीची तयारी : प्राकृतिक भूगोल


5639   23-Aug-2018, Thu

मागील लेखामध्ये भूगोलाच्या प्रश्नांचे विश्लेषण आपण पाहिले. आजच्या लेखामध्ये आपण भूगोल या विषयातील प्राकृतिक भूगोल या घटकाची परीक्षेच्या दृष्टीने तयारी कशी करावी याबाबत माहिती घेणार आहोत.

प्राकृतिक भूगोल या घटकावर २०१३ मध्ये ४; २०१४ मध्ये ५; २०१५ मध्ये ६; २०१६ मध्ये ५; आणि २०१७ मध्ये ४ प्रश्न विचारण्यात आले होते.

अभ्यासाक्रमामध्ये भारत व जगाचा भूगोल असे नमूद केलेले आहे म्हणून प्राकृतिक भूगोलाची तयारी करताना जगाचा प्राकृतिक भूगोल आणि भारताचा प्राकृतिक भूगोल अशी सर्वसाधारण विभागणी करावी लागते. या विषयाचे परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासाचे नियोजन करताना सर्वप्रथम या विषयातील घटकाची माहिती असणे आवश्यक असते. प्राकृतिक भूगोलामध्ये मुखत्वे भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र, जैविक भूगोल आणि पर्यावरणीय भूगोल यांसारख्या घटकांचा समावेश होतो. या सर्व घटकांचे मूलभूत अर्थात पारंपरिक ज्ञान सर्वप्रथम अभ्यासावे लागते. वर नमूद केलेल्या घटकासंबंधी अभ्यासाव्या लागणाऱ्या संकल्पना, त्यांची वैशिष्टय़े याची माहिती सर्वप्रथम असणे आवश्यक ठरते.

२०१३ ते २०१७ दरम्यान घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षांमध्ये या घटकावर विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांची थोडक्यात चर्चा करणार आहोत.

‘भूखंड अपवहन सिद्धांताद्वारे तुम्हाला नेमके काय समजते? याच्या समर्थनार्थ प्रमुख पुराव्यानिशी चर्चा करा.’ (२०१३)

या प्रश्नाचा मुख्य रोख हा भूखंड अपवहन सिद्धांतावर आहे आणि हा प्रश्न योग्य पद्धतीने समजून घेण्यासाठी हा सिद्धांत नेमका काय आहे, त्याची मांडणी कोणी केली आणि यामध्ये नेमक्या कोणत्या प्राकृतिक घडामोडींची चर्चा करण्यात आलेली आहे अशा विविधांगी पलूंचा विचार करून या प्रश्नाचे उत्तर लिहिणे अपेक्षित आहे.

हिमालयातील हिमनद्यांमध्ये होणारी घट आणि भारतीय उपखंडामध्ये जागतिक तापमान वाढीच्या लक्षणाचा संबंध उघड करा. (२०१४)

या प्रश्नाचे आकलन होण्यासाठी हिमनदी म्हणजे काय, तिची निर्मिती कशी होते, या प्रकारच्या नद्या हिमालय पर्वत रांगांमध्येच का आहेत, याची माहिती सर्वप्रथम असणे गरजेचे आहे. या प्रश्नाचा मुख्य कल हा एका विशिष्ट प्रक्रियेशी म्हणजे जागतिक तापमान वाढीशी जोडण्यात आलेला आहे आणि जागतिक तापमान वाढीमुळे या हिमनद्यांमध्ये कशी घट होत आहे याची पुराव्यानिशी चर्चा करून या प्रश्नाचे उत्तर आपणाला लिहावे लागते.

आर्क्टिक समुद्रामध्ये शोधण्यात आलेल्या खनिज तेलाचे आर्थिक महत्त्व काय आहे आणि याचे संभाव्य पर्यावरणीय परिणाम काय असू शकतात. (२०१५)

आर्क्टिक समुद्राचे भौगोलिक स्थान काय आहे आणि याचा पृथ्वीच्या वातावरणावर नेमका काय परिणाम होतो याची सर्वप्रथम माहिती असणे गरजेचे आहे आणि त्यानंतर आर्क्टिक समुद्रातील खनिज तेलाचे आर्थिक महत्त्व हे सद्य:स्थितीमध्ये जगातील विविध देशाची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी होऊ शकतो आणि आर्क्टिक समुद्रावर आधिपत्य असणाऱ्या देशांना याचा होणारा आर्थिक लाभ आणि या खनिज तेलाचे उत्पादन करताना या समुद्रामध्ये केले जाणारे उत्खनन आणि यामुळे येथील प्रदेशाच्या भौगोलिक रचनेत होणारा बदल आणि या बदलांचा येथील पर्यावरणावर होणारा परिणाम अशा विविधांगी बाबींचा एकत्रित विचार केल्याशिवाय या प्रश्नाचे योग्य उत्तर लिहिता येणार नाही.

२०१६ मध्ये या घटकातील, हिमालय पर्वतातील दरडी कोसळण्याचे प्रमाण अधिक आहे, परिणामकारकरीत्या केलेले जमीन आणि पाणी व्यवस्थापन हे मानवी विपत्ती कमी करू शकते, दक्षिण चिनी समुद्राचे भूराजकीय महत्त्व, भारतातील प्रमुख शहरांमधील पुरांची समस्या, भारतातील अंतर्गत जल वाहतूक व समस्या इत्यादीवर प्रश्न विचारण्यात आलेले होते.

२०१७ मध्ये आशिया मान्सून आणि लोकसंख्या संबंध, महासागरीय क्षारतेतील फरकाची कारणे सांगा आणि याच्या बहुआयामी परिणामांची चर्चा करा, कोळसा खाणीच्या विकासासाठी असणारी अपरिहार्यता आणि याचे प्रतिकूल पर्यावरणीय परिणाम असे प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि हे प्रश्न प्राकृतिक भूगोलाची पारंपरिक माहिती आणि चालू घडामोडीचा संबंध जोडून विचारण्यात आलेले होते.

उपरोक्त प्रश्नांचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, पर्यावरण आणि हवामान संबंधित घटकांवर अधिक प्रश्न विचारले गेले आहेत. त्याचबरोबर प्रश्न विचारताना या विषयाचे पारंपरिक ज्ञान, यातील महत्त्वाच्या संकल्पना तसेच यासंबंधी घडणाऱ्या चालू घडामोडींचा एकत्रित वापर केलेला दिसून येतो. यातील बहुतांश प्रश्न भारत व जगाच्या प्राकृतिक घडामोडीच्या पाश्र्वभूमीचा एकत्रित विचार करून विचारण्यात आलेले आहेत. म्हणून प्राकृतिक भूगोलाची संपूर्ण तयारी करण्याबरोबरच चालू घडामोडीचा अभ्यास करावा लागतो. थोडक्यात अभ्यासक्रमामध्ये नमूद घटकाच्या आधारे या प्रश्नांची विभागणी करावी व अभ्यासाची दिशा निर्धारित करावी. त्याचबरोबर महत्त्वाची बाब म्हणजे प्रश्न विचारण्याचा कल हा केव्हाही बदलला जाऊ शकतो त्यामुळे हा घटक र्सवकष आणि सखोल पद्धतीने अभ्यासणे अपरिहार्य ठरते.

संदर्भ साहित्य

या घटकाची मूलभूत माहिती सर्वप्रथम अभ्यासावी. यासाठी आपणाला एनसीईआरटीच्या Fundamentals of Physical Geography (XI), Indian Physical Environment(XI), या क्रमिक पुस्तकांचा आधार घेता येतो ज्यामुळे या विषयाचे सरळ व सोप्या भाषेत आकलन करता येऊ शकेल. या माहितीला विस्तारित करण्यासाठी “Certificate Physical and Human Geography (by Goe Cheng Leong), Fundamentals of Physical Geography (by Majid Husain), India _ Comprehensive Geography ( by D.R. Khullar), World Geograhy (by Majid Husain) या संदर्भ ग्रंथांचा आधार घेता येतो.

या विषयाच्या स्वत:च्या नोट्स तयार कराव्यात तसेच आपली अभ्यासाची तयारी कितपत झालेली आहे हे कळण्यासाठी उत्तर लेखनाचा सराव करावा व मूल्यमापन करून घ्यावे. त्यामुळे यातील उणिवा दूर करून अधिक नेमकेपणाने उत्तर लिहिण्याचा सराव करता येतो व चांगले गुण प्राप्त करता येऊ शकतात. तसेच महत्त्वाची बाब म्हणजे हा घटक आपणाला सामान्य अध्ययनासाठी तयार करायचा आहे याचे भान ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे नोट्स तयार करताना त्यातील समर्पकता आणि महत्त्वाच्या मुद्दय़ांचाच अंतर्भाव करणे अधिक श्रेयस्कर ठरते.


Top