Loksatta_  Sexual Harassment Complaint Against Cji Ranjan Gogoi

सरन्यायाधीश चुकलेच..!


8172   23-Apr-2019, Tue

एका महिलेने अत्यंत सविस्तरपणे, शपथपत्रावर तिला सोसाव्या लागलेल्या परिस्थितीचा वृत्तांत कथन केला असेल तर त्याची शहानिशा करणे हाच एक मार्ग उरतो..

‘‘न्यायालयाच्या विश्वासार्हतेस बाहेरून धोका नाही, असलाच तर तो आतून आहे’’, असे उद्गार गुवाहाटी उच्च न्यायालयात २००६ साली एक निकाल देताना न्या. रंजन गोगोई यांनी काढले. आज ते सरन्यायाधीश असताना त्यांच्याच उद्गारांची आठवण करून देण्याची वेळ संबंधितांवर यावी हा दुर्दैवी योगायोग. न्या. गोगोई यांच्या विरोधात न्यायालयातीलच एका कनिष्ठ महिला कर्मचाऱ्याने असभ्य वर्तनाचे, विनयभंगाचे आरोप केले असून त्यास सरन्यायाधीशांकडून मिळालेला प्रतिसाद हा त्यांच्याविषयी आदर वाढवणारा आहे, असे म्हणता येणार नाही. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता त्याबाबत साधकबाधक ऊहापोह होणे आवश्यक ठरते. सरन्यायाधीशांच्या कार्यालयातील या कथित पीडित महिलेने न्यायपालिकेच्या सर्व २२ न्यायाधीशांना आपल्या तक्रारीची प्रत प्रतिज्ञापत्राच्या स्वरूपात पाठवली आणि ती माध्यमांहाती गेल्याने याचा बभ्रा झाला. त्यानंतर या प्रकरणाची तातडीने दखल घेत शनिवारी सकाळी सरन्यायाधीशांनी न्यायालयाचे विशेष सत्र भरवले.

तेथूनच या प्रकरणातील दुटप्पी वर्तनाची सुरुवात होते. जनहितासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याखेरीज आपण कोणत्याही प्रकरणाची अशी विशेष सुनावणी घेणार नाही, असे न्या. गोगोई यांनीच सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्यानंतर स्पष्ट केले होते. तरीही त्यांनी याप्रकरणी अशी विशेष सुनावणी घेतली. त्यांच्यावर स्वत:वर आरोप झाला म्हणून लगेच विशेष पीठासमोर सुनावणी, यात जनहित ते काय? अन्य कोणत्याही वरिष्ठ सरकारी उच्चपदस्थावर असा आरोप झाल्यास सदर प्रकरण कसे हाताळायचे याचे काही नियम घालून देण्यात आले आहेत. त्यानुसार लैंगिक अत्याचार प्रकरणात चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या विशेष समितीकडे अशी प्रकरणे सुपूर्द केली जातात. सरन्यायाधीशांनी देखील तसेच करावयास हवे होते. परंतु प्रत्यक्षात न्यायालयाच्या महासचिवाकडून माध्यमांना या विशेष सत्राचा निरोप दिला गेला आणि ‘न्यायालयीन स्वातंत्र्याच्या अनुषंगाने काही राष्ट्रीय महत्त्वाच्या’ प्रश्नांसंदर्भात सरन्यायाधीश सुनावणी घेणार असल्याचे सांगितले गेले. सरन्यायाधीशांवर महिला कर्मचाऱ्याचे आरोप हा राष्ट्रीय प्रश्न? असे आरोप झाले म्हणून न्यायालयाच्या स्वातंत्र्यासमोर कसे काय आव्हान निर्माण होते?

ते तसे होते असे वादासाठी मानले तरी सरन्यायाधीशांकडून या प्रकरणाची हाताळणी जितक्या गांभीर्याने व्हायला हवी तितक्या गांभीर्याने निश्चितच झाली नाही. पहिली गोष्ट म्हणजे खुद्द सरन्यायाधीशांवर आरोप असताना त्यांनीच या आरोपांची वासलात लावण्यासाठीच्या न्यायपीठाची निवड केली. न्यायपीठ ठरवणे हा त्यांचाच अधिकार हे मान्य. पण स्वत:वर आरोप असताना तरी त्यांनी हा अधिकार काही काळापुरता तरी बाजूला ठेवण्यास हरकत नव्हती. त्यांनी तसे केले नाही. या प्रकरणाच्या सुनावणीस स्वत: उपस्थित न राहता ज्येष्ठता यादीतील दुसऱ्या क्रमांकाच्या न्यायाधीशास हे प्रकरण हाताळू देण्याची निरपेक्षता त्यांनी दाखवायला हवी होती. तसेच या पीठासमोर काही याचिका नव्हती, काही कोणती कागदपत्रे नव्हती, काही विशिष्ट मागणीही करण्यात आलेली नव्हती आणि दुसऱ्या बाजूचा काही कोणता वकीलही नव्हता. तरीही या प्रकरणावर सुनावणी? म्हणजे माझ्याविरोधातील प्रकरण मीच उपस्थित करणार, कोणी त्यावर सुनावणी घ्यावी हे मीच सांगणार आणि त्याचा निकालही मीच देणार हे कसे? त्याहून कहर म्हणजे ही बाब सुनावणीस घेता यावी यासाठी त्यांनी सरकारी अधिवक्त्याकरवी ती उपस्थित करवली. त्यांनी ती आनंदाने केली. वास्तविक सरकार हा न्यायालयासमोरील सर्वात मोठा वादी वा प्रतिवादी आहे. असे असताना सरकारच्या प्रतिनिधीलाच आपल्याविरोधातील प्रकरण उपस्थित करण्यास सांगणे हे न्यायालयीन संकेतांत कसे बसते?

या अशा अर्धन्यायिक वातावरणात या तिघांच्या पीठाने या प्रकरणावर एकतर्फी सुनावणी घेऊन निकाल दिला. पण निकालपत्रावर स्वाक्षऱ्या मात्र फक्त दोन न्यायाधीशांच्याच. सरन्यायाधीश या पीठाचे प्रमुख म्हणून बसले तर खरे. पण त्यांनी निकालपत्रावर स्वाक्षरी केली नाही. याचा अर्थ कसा लावायचा? यास निवाडा झाला असे कसे म्हणणार? असे एकतर्फीच भाष्य करायचे होते तर सरन्यायाधीशांनी पत्रकार परिषद घ्यायची. नाही तरी गेल्या वर्षी जानेवारीत सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेण्याचे अभूतपूर्व पाऊल उचलणाऱ्यांत न्या. गोगोई यांचाही समावेश होता. म्हणजे त्यांना पत्रकार परिषदेचे वावडे आहे, असे नाही. तरीही त्यांनी सदर महिलेने केलेल्या आरोपांना फेटाळून लावण्यासाठी न्यायालयीन मार्ग निवडला.

बरे, तो निवडला तो निवडला पण या महिलेच्या तक्रारीवर भाष्य करताना न्या. गोगोई यांनी जे नतिक चऱ्हाट लावले ते तर निव्वळ अनावश्यक आणि भंपक होते. ‘माझ्या बँक खात्यात किती पसे आहेत, मी किती प्रामाणिकपणे न्यायदानाचे काम केले आणि आता माझ्या वाटय़ास असा आरोप यावा’, वगरे ‘हेचि फळ काय मम तपाला..’ छापाचा त्रागा देशाच्या सरन्यायाधीशाने केला. त्याचा या प्रकरणाशी काय संबंध? बँकेत खात्यावर कमी पसे आहेत म्हणजे ते चारित्र्यवान असे काही समीकरण आहे काय? आणि मुद्दा न्या. गोगोई यांनी भ्रष्टाचार केला अथवा काय, हा नाही. तेव्हा आपल्या बँक खात्यास चव्हाटय़ावर मांडण्याचे मुळातच काहीही कारण नाही. ‘माझ्यावर असे आरोप होणे हा न्यायालयीन स्वातंत्र्यावर घाला आहे’, असेही त्यांचे म्हणणे. ते असमर्थनीय आहे. कारण त्यांच्यावरचे आरोप हे न्या. गोगोई यांच्या सरन्यायाधीशपदाशी संबंधित नाहीत.

तर ते कोणत्याही अधिकारपदस्थ ‘पुरुषा’बाबत होऊ शकतात असे आहेत. आपल्या अधिकारपदाचा वापर करून सदर पुरुषाने.. म्हणजे न्या. गोगोई यांनी.. तक्रारदार महिलेशी तिच्या इच्छेविरोधात शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केला किंवा काय, हा यातील मुद्दा. ही तक्रार सरन्यायाधीशपदावरील व्यक्तीबाबत झाली आहे, ही बाब अलाहिदा. अशा वेळी अशा आरोपांची शहानिशा करण्यासाठी अन्य पुरुषांना उपलब्ध असलेला मार्गच न्या. गोगोई यांनीही निवडायला हवा होता. सरन्यायाधीशपदावरील पुरुषासाठी काही वेगळे विशेषाधिकार नाहीत, हे त्यांना अर्थातच माहीत असणार. तरीही त्यांनी तो निवडला नाही. हे सर्वथा अयोग्य.

शेवटचा मुद्दा त्यांनी या प्रकरणात माध्यमांना दिलेल्या सल्ल्याचा. ‘देशात पंतप्रधान आणि सरन्यायाधीश ही अत्यंत शक्तिमान कार्यालये आहेत. हे आरोप म्हणजे सरन्यायाधीशांच्या कार्यालयाच्या अधिकारांवर गदा आणण्याचा प्रयत्न आहे’ असे न्या. गोगोई म्हणतात. या विधानाचा अर्थ काय? त्यांच्या कार्यालयातील एका महिलेने अत्यंत सविस्तरपणे, शपथपत्रावर तिला सोसाव्या लागलेल्या परिस्थितीचा वृत्तांत कथन केला असेल तर त्याची शहानिशा करणे हाच एक मार्ग उरतो. तो सोडून आपल्या अधिकारावर अतिक्रमण वगरे भाषा कशासाठी? त्याने काय साध्य होणार? याच अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने माध्यमांना देखील हे प्रकरण जपून आणि काळजीपूर्वक हाताळण्याचा सल्ला दिला. तोदेखील अनाठायी म्हणावा लागेल. ही बाब जर न्यायाधीशांना इतकी नाजूक वाटत होती तर त्यांनी तसा आदेश द्यायला हवा होता, नुसता सल्ला का? आदेश दिला असता तर सर्व मुद्दे नोंदले तरी गेले असते.

आपल्याकडे इतक्या मोठय़ा आणि महत्त्वाच्या पदाबाबत असा प्रकार घडल्याचा इतिहास नाही. परंतु देशातील एकाही व्यक्ती अथवा माध्यमाने सरन्यायाधीशांविरोधात करण्यात आलेल्या आरोपांच्या वैधतेबाबत काहीही भाष्य अथवा टिप्पणी केलेली नाही. ते आरोप खोटे ठरोत अशीच अनेकांची भावना असेल. पण ते तसे ठरण्यासाठीची प्रक्रिया तरी पूर्ण व्हायला हवी. या प्रक्रियेच्या अभावी या आरोपांना निराधार अणि असत्य ठरवणे हे नसर्गिक न्यायतत्त्वास तिलांजली देणारे आहे. ‘स्वत:च स्वत:चा न्याय केला जाऊ नये’ आणि ‘दुसरी बाजूही ऐकली जावी,’ ही दोन न्यायप्रक्रियेतील मूलभूत तत्त्वे. या तत्त्वांचा आदर करून त्याप्रमाणे मार्गक्रमण करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाकडूनच त्यांची पायमल्ली होणे योग्य नाही. तसे झाल्यास घातक पायंडा पडेल. तेव्हा सरन्यायाधीश तुम्ही चुकत आहात..!

david-fabricius-1880128/

अदृश्य होणारा तारा


2287   22-Apr-2019, Mon

इ.स. १५९६ सालच्या ऑगस्ट महिन्यातली गोष्ट. डेव्हिड फॅब्रिशियस हा डच हौशी खगोलज्ञ एका ग्रहाच्या मार्गक्रमणाची नोंद करत होता. त्यासाठी तो तिमिगल तारकासमूहातील एक तारा स्थान ओळखण्यासाठी संदर्भ म्हणून वापरत होता. निरीक्षणाच्या काळात या ताऱ्याचे तेज तीन आठवडय़ांत अडीच पटींनी वाढले असल्याचे त्याला आढळले. त्यानंतर या ताऱ्याचे तेज कमी होत होत हा तारा अखेर ऑक्टोबर महिन्यात दिसेनासा झाला. १५९७ सालच्या फेब्रुवारी महिन्यात हा तारा पुन्हा दिसायला लागला. त्यानंतर अनेक खगोलज्ञांना, तेज कमी-जास्त होणाऱ्या या वैशिष्टय़पूर्ण ताऱ्याने अधूनमधून दर्शन दिले.

जोहान होलवार्दा या डच खगोलज्ञाने १६३८ साली या ताऱ्याच्या तेजस्वितेच्या कमी-जास्त होण्याच्या चक्राचा कालावधी मोजला. हा कालावधी अकरा महिने भरला. निश्चितपणे नोंदला गेलेला, हा पहिलाच तेज बदलणारा म्हणजे ‘रूपविकारी’ तारा ठरला. योहान्नस हेवेलियस या जर्मन खगोलज्ञाने १६४२ साली या ताऱ्याला नाव दिले – मीरा. म्हणजे ‘आश्चर्यजनक.’ आपण शोधलेल्या या ताऱ्याला मिळालेली ही मान्यता पाहण्यास फॅब्रिशियस मात्र हयात नव्हता! या ताऱ्याचे कमाल तेज हे किमान तेजापेक्षा तब्बल पंधराशे पटींनी अधिक असते. या ताऱ्याच्या तेजातील हा मोठा बदल, या ताऱ्याच्या सतत होणाऱ्या आकुंचन-प्रसरणामुळे होत असल्याचा शोध कालांतराने लागला. आज इतर अनेक प्रकारचे रूपविकारी तारे माहीत झाले असले तरी, मीरा ताऱ्याच्या गटातील रूपविकारी तारे हे त्यांच्या तेजस्वितेतील मोठय़ा बदलामुळे वैशिष्टय़पूर्ण ठरले आहेत.

इतिहासकारांत एक मोठी उत्सुकता आहे ती ही की, या तिमिगल तारकासमूहातील मीरा ताऱ्याची नोंद प्राचीन काळी केली गेली आहे का? तो दिसला असण्याची शक्यता काही इतिहासकार व्यक्त करतात. इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात होऊन गेलेल्या हिप्पार्कसने सर्वात पहिला आकाशाचा नकाशा बनवला होता. परंतु हा नकाशा तसेच त्याचे मूळ लेखन कालौघात नष्ट झाल्यामुळे, त्याने स्वत: हा तारा पाहिला होता की नाही, हे प्रत्यक्ष कळण्यास मार्ग नाही. परंतु हिप्पार्कसचा पूर्वसुरी असणारा, इ.स.पूर्व चवथ्या शतकात होऊन गेलेला ग्रीक खगोलज्ञ अराटस याच्या निरीक्षणांवर हिप्पार्कस याने केलेले भाष्य मात्र उपलब्ध आहे. हिप्पार्कसच्या या भाष्यात अराटसने हा तारा बघितल्याचा उल्लेख आहे.

notre-dame-cathedral-fire-1880141/

‘नोत्र दाम’ची शोकांतिका


3642   22-Apr-2019, Mon

सुमारे ८०० वर्षांच्या संघर्षमय इतिहासाची साक्ष देणारी आणि अनेक मानवनिर्मित संकटे झेललेली पॅरिसमधील जागतिक वारसा वास्तू गेल्या आठवडय़ात आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ज्वाळांनी वेढलेले ‘नोत्र दाम’ चर्चचे संग्रहालय पाहून जग हळहळले.

एकटय़ा फ्रान्सचाच नव्हे, युरोप-अमेरिकेचा सांस्कृतिक ठेवा असलेल्या या संग्रहालयाने युद्धे आणि महायुद्धेही अनुभवली. त्यांचा दाह सोसला. परंतु त्याचा फ्रेंच गॉथिक शैलीतील बांधकामाचा तटून उभा राहिला. ए-ाा पाऊंड, अर्नेस्ट हेमिंगवे यांच्यासह अनेक दिग्गज साहित्यिक याच वास्तूच्या सावलीत फ्रेंच संस्कृतीचे प्रतीक बनले. प्रसिद्ध फ्रेंच साहित्यिक व्हिक्टर ह्य़ूगो यांनी ‘नोत्र दाम’वर हंचबॅक ऑफ नोत्र दाम ही कादंबरी (१८३१) लिहून त्याच्या जतनाकडे लक्ष वेधले. हा सगळा इतिहास आगीच्या निमित्ताने ‘बीबीसी’च्या ऑनलाइन आवृत्तीत प्रसिद्ध करण्यात आला आहे.

‘नोत्र दाम’ला लागलेल्या आगीच्या ज्वाळा गगनाला भिडल्या असतानाच त्याच्या पुनर्बाधणीसाठी देणग्या जाहीर होऊ लागल्या. त्या जाहीर करण्याची स्पर्धाच अब्जाधीशांमध्ये सुरू झाली. काही तासांत एक अब्ज डॉलर्स जमा झाले. परंतु अब्जाधीशांच्या देणग्यांवरून वादही उद्भवला आहे. याबाबतचा वृत्तांत ‘वॉशिंग्टन पोस्ट’, ‘यूएसए टुडे’सह अनेक वृत्तपत्रांनी ठळकपणे प्रसिद्ध केला आहे. त्यात फ्रान्समधील ‘यलो व्हेस्ट’ चळवळीचे प्रमुख इनग्रिड लिव्हावसिअर आणि कामगारनेते फिलीप मार्टिनेझ यांच्याबरोबरच अन्य नेत्यांच्या आक्षेपांचे दाखले देण्यात आले आहेत. ‘ते जर ‘नोत्र दाम’साठी अब्जावधी डॉलर देऊ  शकत असतील तर सामाजिक संकटात मदत करण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत, असे कारण त्यांनी देऊ  नये,’ हे मार्टिनेझ यांचे म्हणने ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने प्रसिद्ध केले आहे. कर वाचवण्यासाठी उद्योगपती देणग्या देतायत, त्यांनी प्रथम कर भरावा, अशी मागणी काही जण करीत आहेत. परंतु आपण कर वाचवण्यासाठी देणग्या देत नसल्याचे काही उद्योगपतींनी स्पष्ट केले आहे. त्याची नोंदही या वृत्तांतात घेण्यात आली आहे. काहींनी पॅरिसमधल्या गरिबांच्या उत्थानासाठी आणि बेघरांना घरे बांधून देण्यासाठीही मदतीची मागणी केली आहे. तर गरिबांना मदत आणि ‘नोत्र दाम’ची पुनर्बाधणी यांची तुलना होऊ  शकत नसल्याचे काहींचे म्हणणे आहे. अशा दोन्ही बाजू मांडण्याचा प्रयत्न या वृत्तांतांमध्ये केला आहे.

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ‘नोत्र दाम’ची पुनर्बाधणी पाच वर्षांत करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या राजकीय विरोधकांनीही हे काम २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी पूर्ण करण्याची मागणी केली आहे. परंतु या कामाला दशकभरही लागू शकते, असे वास्तुशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर आतापर्यंत जमा झालेल्या सुमारे एक अब्ज डॉलरच्या देणग्या त्यासाठी पुरेशा नाहीत. त्यासाठी दोन-तीन अब्ज डॉलर लागणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. शिवाय या वास्तूची पुनर्बाधणी करताना आधुनिकता आणि सांस्कृतिक वारसा यांच्यातील संतुलन साधण्याचा प्रश्न हाही वादाचा मुद्दा बनला असल्याकडे ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने लक्ष वेधले आहे. परंतु सध्या वादापेक्षा वास्तूच्या सौंदर्याचे किती आणि कुठे नुकसान झाले आहे, याचा आढावा घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

‘नोत्र दाम’च्या आगीमागील नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सरकारी यंत्रणा करीत आहेत. आग लावण्यात आली की लागली, याचा शोध सुरू असतानाच कर्मठ ख्रिस्ती माध्यमांनी आणि शेकडो संकेतस्थळांनी दुसऱ्या टोकाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी आगीला ‘दैवी कोप’ म्हटले आहे. सध्या ‘नोत्र दाम’चा दैवी न्याय, अशा एका सार्वत्रिक कर्मठ प्रतिक्रियेची चलती आहे. काहींनी हे दहशतवादी कृत्य असल्याचा संशयही व्यक्त केला आहे. या सर्व प्रतिक्रियांचे विश्लेषण करण्याचा आणि त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न वॉशिंग्टन पोस्टने लेखात केला आहे.

‘नोत्र दाम’ हानीच्या सर्वेक्षणास आणखी आठवडाभर लागण्याची शक्यता आहे. परंतु जसजशी सर्वेक्षणाची माहिती बाहेर येत आहे, तसतसे कॅथलिक नागरिक, कला इतिहासप्रेमी आणि मधुमक्षीकाप्रेमींचे चेहरे उजळत आहेत. त्यांच्या मनातील भावना एबीसी न्यूज आणि बीबीसीच्या ऑनलाइन वृत्तांतात टिपण्यात आल्या आहेत. ‘नोत्र दाम’मधील कलावास्तूच्या हानीचे प्रमाण कमी आहे. मधमाशांच्या वसाहतीही वाचल्या आहेत. एवढय़ा मोठय़ा आगीतूनही ‘नोत्र दाम’चे चिमुकले रहिवासी बचावले आहेत. आगीत सुमारे दोन लाख मधमाशा नष्ट झाल्याचे प्राथमिक वृत्त होते, परंतु त्यांची गुणगुण कानांना सुखावत आहे, असे ‘बीबीसी’च्या वृत्तांतात म्हटले आहे. त्यांचा जीव वाचणं हा एक चमत्कारच असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.

donald-trump-mueller-report-1880137/

संशयास्पद निर्दोषत्व!


4216   22-Apr-2019, Mon

इंग्रजीत एक वचन आहे : अ‍ॅबसेन्स ऑफ एव्हिडन्स इज नॉट एव्हिडन्स ऑफ अ‍ॅबसेन्स. कित्येकदा एखादी गोष्ट आढळली नाही ही बाब, ती गोष्ट अस्तित्वात नसल्याचा पुरावा ठरू शकत नाही! अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या, अध्यक्षपदाचा प्रचार ते व्हाइट हाऊस या मार्गातील अनेक कथित गैरप्रकारांचा धांडोळा घेणारा बहुप्रतीक्षित आणि आता बहुचर्चित ‘रॉबर्ट म्युलर अहवाल’ संपादित स्वरूपात प्रकाशित झाल्यानंतर त्याला उपरोल्लेखित वचन लागू पडते. अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प जिंकावेत यासाठी त्यांच्या प्रचार यंत्रणेने रशियन (सरकारी व बिगरसरकारी) मंडळींशी संधान बांधले का आणि त्यांचे कथित साटेलोटे पडताळण्यासाठी झालेल्या तपासात तोवर अध्यक्ष बनलेले ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला का, या दोन प्रमुख मुद्दय़ांवर ४४८ पानी म्युलर अहवालात भर देण्यात आला.

रशियन हस्तक्षेप झाला हे म्युलर सिद्ध करू शकले. रशिया व ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांचे उद्दिष्ट (ट्रम्प यांचा विजय) एकच होते, हे तर स्पष्टच होते. मात्र, रशियन आणि ट्रम्प यांच्या यंत्रणांचे या बाबतीत संगनमत होते, हे म्युलर नेमकेपणे सिद्ध करू शकले नाहीत. त्याचप्रमाणे, या प्रकरणाशी संबंधित झालेल्या तपासात आणि पर्यायाने न्यायप्रक्रियेत अमेरिकेचे अध्यक्ष या नात्याने ट्रम्प यांनी ‘गुन्हेगारी स्वरूपाचा हस्तक्षेप’ केला का, याविषयीदेखीलठोस पुरावे म्युलर यांना आढळले नाहीत. मात्र या बाबतीत संशयाला जागा असल्याचे त्यांनी अनेक ठिकाणी नमूद केले आहे. त्यांचे एक विधान पुरेसे सूचक आहे, ते असे- इतक्या सखोल तपासानंतर आमची अशी खात्री पटली असती, की अध्यक्षांनी खरोखरच न्यायप्रक्रियेत हस्तक्षेप केलेला नाही, तर आम्ही नक्कीच तसे म्हटले असते. पण असा निष्कर्ष आम्हाला काढता येत नाही!

म्युलर अहवालातील या संदिग्धतेला ट्रम्प यांनी व्यक्तिगत विजय मानला आणि स्वतच स्वतला निर्दोष ठरवून टाकले हे त्यांच्या एकूण स्वभावाशी आणि कार्यपद्धतीशी सुसंगतच होते. रशियन हस्तक्षेपाविषयी चौकशी करण्यासाठी विशेष वकिलांची (रॉबर्ट म्युलर) नियुक्ती झाल्याचे समजताच ट्रम्प कशा प्रकारे हादरले, हेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात अमेरिकेचे अ‍ॅटर्नी जनरल विल्यम बार यांनी म्युलर अहवालाचा चार पानी सारांश प्रसिद्ध केला आणि त्यात ट्रम्प यांच्याविरोधात पुरेसे पुरावे नसल्याचे त्यांनी जाहीर केले होते.

त्या सारांशापेक्षा परवा प्रकाशित झालेला संपादित अहवाल फार वेगळा नसेल, हे अपेक्षित होते. तरीही काही बाबी गंभीर आहेत आणि अमेरिकेतील लोकशाही व्यवस्थेविषयी चाड असलेल्यांसाठी त्या चिंताजनक ठरतात. रशियन हस्तक्षेपाचा मुद्दा सर्वात धोक्याचा ठरतो. व्लादिमीर पुतीन यांचे सरकार आणि रशियातील सरकारधार्जिण्या कंपन्यांनी, व्यक्तींनी २०१६ मध्ये झालेल्या अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जनमतावर प्रभाव टाकण्यासाठी आणि ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांची ई-मेल्स हॅक करून त्यांच्या प्रचारात गोंधळ उडवून देण्यासाठी काय काय केले, याची साद्यंत माहिती अहवालात आहे.

ट्रम्प दोषी आहेत वा निर्दोष आहेत यापेक्षाही आजवर जी बाब केवळ गावगप्पांमध्ये चर्चिली जायची, तिचे पुरावेच म्युलर यांनी मांडले ही बाब अमेरिकी नागरिकांना हादरवणारी आहे. भविष्यात अशा किती निवडणुकांमध्ये रशियन किंवा बाह्य़शक्तींचा हस्तक्षेप होऊ शकतो आणि तो कसा रोखायचा याविषयीच्या मंथनात ट्रम्प यांनीही सहभागी होणे गरजेचे आहे. त्याऐवजी ‘संगनमत नाही’ आणि ‘हस्तक्षेप नाही’ (नो कोल्युजन, नो ऑब्स्ट्रक्शन) इतके शब्द वापरत स्वतची पाठ थोपटून घेणारे ट्रम्प, रोम जळत असताना फिडलवादनात मग्न असलेल्या निरोपेक्षा वेगळे नाहीत!

म्युलर यांच्यामार्फत चौकशी सुरू असताना ट्रम्प यांनी त्यांच्या तत्कालीन अ‍ॅटर्नी जनरलपासून व्हाइट हाऊस आणि विधि खात्यातील अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष धमकावले. खुद्द म्युलर यांच्याकडून ही चौकशी पूर्ण होऊ नये यासाठी विविध उपाय शोधले. अध्यक्षांची थेट चौकशी सुरू नाही असे जाहीर करण्याविषयी त्यांनी काही अधिकाऱ्यांना हुकूम दिले. जे अधिकारी बधले नाहीत, त्यांची जाहीर निर्भर्त्सना करण्यापर्यंत ट्रम्प यांची मजल गेली होती. हे सगळे करण्याऐवजी ट्रम्प गप्प बसले असते, तर किमान न्यायप्रक्रियेत हस्तक्षेप केल्याच्या संशयातून त्यांची सुटका झाली असती. पण म्युलर तपास सुरू झाल्यापासूनच काही तरी उघडकीस येणार ही भीती त्यांच्या मनात पक्की बसली होती. असे काही उघडकीस आलेले नसले, तरी अमेरिकेचा पहिला ‘संशयास्पद’ अध्यक्ष यावर म्युलर अहवालातून शिक्कामोर्तब मात्र नक्कीच झालेले आहे.

artificial-intelligence-and-human-conversation-1880127/

कृत्रिम प्रज्ञा आणि मानवी संभाषण


3034   22-Apr-2019, Mon

कृत्रिम बुद्धिमत्तेला मानवी संभाषण यायला हवे. ही शक्यता काही दशके दूर वाटली तरी अशक्य नक्कीच नाही.

मानवी बुद्धिमत्तेचा सर्वात सुंदर आविष्कार कुठला हे ठरवायचे झाल्यास ‘संवाद व भाषेला’ पहिल्या पाचमध्ये नक्कीच स्थान मिळावे. जगात साधारणपणे सात हजार भाषा वापरात असून सर्वात जास्त बोलली जाते अनुक्रमे चिनी मॅनडरीन, स्पॅनिश, इंग्लिश, फ्रेंच, अरेबिक, हिंदी, बंगाली, रशियन, जपानी, जर्मन इत्यादी. आपल्या देशात तर बघायलाच नको. एकंदर २२ प्रमुख भाषा व ७८० बोलीभाषा वापरात आहेत.

पण भाषा हा तितकाच क्लिष्ट विषय. त्यात व्याकरण, वाक्प्रचार, म्हणी, गद्य-पद्य, औपचारिक-अनौपचारिक, उपहास-चेष्टा, भाषांतर व प्रादेशिक छटा असे अनेक पदर. परत मग विविध प्रकारचे उच्चार आणि शेवटी आकलन. गणितातला तरबेज गडी भाषेच्या विषयात फारशी रुची नसल्यामुळे म्हणा, अगदीच काठावर पास होतोय. तीच गत भाषेची आवड असलेल्यांची. ते बिचारे गणितात एकदम जेमतेम, असे चित्र शालेय जीवनात आपण बरेचदा अनुभवले असेल. पण मशीनला भाषा शिकवायची असल्यास? शून्य व एक अशी फक्त ‘बायनरी’ भाषाच समजणारा बिचारा संगणक. त्याने वरील सर्व क्लिष्ट ज्ञान, त्यातील बारकावे शिकून आपल्याशी माणसाप्रमाणे बोलावे, परत अनुभवातून प्रगतीही करावी ही अपेक्षा. आधी लिहिल्याप्रमाणे एआयचा (कृत्रिम प्रज्ञा) ‘आयक्यू’ सध्या फक्त एका सहा वर्षांच्या मुलाइतकाच प्रगत झालाय, मग त्याने एका प्रौढ मनुष्यासारखे ऐकावे, बोलावे ही शक्यता काही दशके दूर वाटली तरी अशक्य नक्कीच नाहीय. तेव्हा आजचे सदर ‘कॉन्व्हर्सेशनल एआय’ म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून मानवी संभाषण या विषयावर.

कितीही किचकट असले तरी कृत्रिम बुद्धिमत्तेला मानवी संभाषण यायलाच हवे, पण एआय गणिती संख्याशास्त्रावर आधारित तर नैसर्गिक भाषेत सूत्र, समीकरणांचा लवलेशही नाही. मग कसं काय कोडं सोडवायचं? उत्तर फारच सोप आहे – ‘अनुभवातून, उदाहरणातून, आधीच्या डेटातून’.  सुरुवातीला एकाच भाषेवर लक्ष केंद्रित करू. म्हणूनच या एआयप्रणाली सर्वत्र उपलब्ध असलेला मानवी भाषांसंबंधी डेटा वापरून शिकतात. जसे शब्दकोश, वर्तमानपत्रे, पुस्तके, इंटरनेटवरील संबंधित मजकूर तसेच ऑडिओ डेटा म्हणजे भाषणे, उच्चार, भाषांतर इत्यादी.

‘नॅच्युरल लँगवेज प्रोसेसिंग व स्पीच’ या एआयच्या प्रमुख शाखा असून त्यातील उपशाखा आहेत. १) नॅच्युरल लँग्वेज अंडरस्टँडिंग (आकलन). २) नॅच्युरल लँग्वेज जनरेशन (निर्माण). ३) कंटेंट एक्स्ट्रॅक्शन (मजकूर शोधणे). ४) सेंटिमेंट अनॅलिटिक्स (अभिप्राय). ५) क्लासिफिकेशन (वर्गीकरण). ६) स्पीच टू टेक्स्ट (ध्वनी ते शब्द). ७) टेक्स्ट टू स्पीच (शब्द ते ध्वनी). ८) ट्रान्सलेशन (भाषांतर). हे झाले शास्त्रीय वर्गीकरण. व्यावसायिक वापरासाठी हल्ली सहज उपलब्ध असेलेले प्रॉडक्ट्स, ज्यातील बरेच ‘व्हच्र्युअल एजंट्स’ तुम्ही कळत-नकळत वापरलेही असतील. ते पुढीलप्रमाणे –

१) चॅट-बॉट : मर्यादित स्वरूपात, ठरलेल्या विषयांवर लिखित संभाषण, चॅट माध्यमातून.

२) ईमेल-बॉट : ठरवून दिलेल्या विषयांवर नवीन ईमेल पाठवणे, आलेल्या ईमेल्सना उत्तर किंवा त्यांचे ग्राहक सेवा अर्जामध्ये ‘ऑटोमॅटिक’ रूपांतर.

३) व्हॉइस-बॉट : यात एक प्रकार ठरलेल्या विषयांवर शाब्दिक संभाषण, वरील चॅट-बॉटचा ध्वनी आविष्कार. दुसरा प्रकार म्हणजे अ‍ॅमेझॉन अलेक्सा, गुगल असिस्टंट, अ‍ॅपल सिरी वगैरे स्मार्ट व्हॉइस सव्‍‌र्हिसेस.

४) ट्रान्सलेशन-बॉट : लिखित वा बोललेल्या शब्दांचे भाषांतर.

५) सेंटिमेंट-अनॅलिटिक्स व क्लासिफिकेशन : संभाषण ऐकून वा मजकूर वाचून त्यातील ठरावीक शब्दांवरून भावना, अभिप्राय शोधणे.

६) कंटेंट-बॉट : यात एक प्रकारे संभाषण ऐकून वा मजकूर वाचून सारांश काढणे, महत्त्वाचे शब्द शोधणे. दुसरा प्रकार त्याविरुद्ध, दिलेल्या विषयावर मजकूर निर्माण करणे, बोलून दाखवणे.

काही प्रत्यक्ष वापरात असलेली निवडक उदाहरणे व किस्से.

१) गौरव एका टेलिकॉम कंपनीच्या ग्राहक सेवा शाखेत कामाला आहे. कंपनीच्या ग्राहकांना फोन, ईमेल, चॅट माध्यमातून विविध माहिती पुरविणे, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे, नवीन ऑर्डर वा तक्रार नोंदवून घेणे, नवीन प्रॉडक्ट्सचे मार्केटिंग अशी सेवा तो व त्याचे हजारो सहकारी पुरवीत असतात. जागतिक सरासरीनुसार ३०-४० टक्के वेळा यातील माहिती व संभाषण अत्यंत सोपे, एकाच प्रकारचे असते. जसे माझी बिल रक्कम किती? वायफाय बंद आहे, वगैरे. यातील बरेच ट्रॅफिक हल्ली रोबोटिक ‘व्हच्र्युअल एजंट्सकडे’ वळविले जाते, ज्याला ‘डीफ्लेक्शन’ म्हणतात. हे बॉट प्राथमिक कामे स्वत: पूर्ण करून गरज पडल्यास किंवा ग्राहकाने मागणी केल्यास ‘मानवी एजंट्सकडे’ फोन, चॅट हस्तांतरित करतात, ज्याला ‘वॉर्म-ट्रान्सफर’ म्हणतात. कंपनीला फायदा खर्च, गुणवत्ता व उपलब्धता आणि ग्राहकांना लगेचच सेवा मिळाल्यामुळे वेळ वाया जाणे, अचूक व योग्य माहिती कधीही, कुठेही मिळवता येणे इत्यादी. पण मुख्य म्हणजे कंपनीचा सेवा पुरविण्याचा काही प्रमाणात वाचलेला खर्च, व्यावसायिक स्पर्धेमुळे काही टक्के तरी, ग्राहकांपर्यंत सुटीच्या रूपात पोहोचतोय. पण गौरवसारख्या कर्मचाऱ्यांचे काय, हा प्रश्न आहेच. एक तर बॉट फक्त प्राथमिक २०-३० टक्के कामेच सध्या ‘ऑटोमेट’ करू शकतात. दुसरे गौरवसारखे अनुभवी कर्मचारी, नवीन किंवा नाराज ग्राहकांना वैयक्तिक चर्चेसाठी जास्त वेळ देऊ  शकतात, ज्याने सर्वाचाच फायदा होतो. ज्या कंपन्यांना ग्राहक सेवेसाठी प्रचंड प्रमाणात मनुष्यबळ लागते त्यांना एक उपयुक्त सुविधा या बॉट्सने निर्माण केली. तुम्ही पण प्रयत्न करा पुढील संकेतस्थळी जाऊन. तिथे उजवीकडे सर्वात खाली एक ‘चॅट आयकॉन’ दिसेल. त्यावर क्लिक करा. (https://www.airtel.in/help/).

२) अनोळख्या ठिकाणी आपण रस्ता चुकलोय आणि तिथली भाषा येत नाही. हल्ली मोबाइल अ‍ॅपवर ‘लँग्वेज ट्रान्सलेटर’ उपलब्ध असतात. व्हॉइस व टेक्स्ट माध्यमात. गरजेला कामी पडणारी व प्राथमिक स्वरूपाची कामचलाऊ सुविधा मिळते, तीही फुकट. (https://translate.google.com/)

३) एका जागतिक बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात दिवसाला लाखो ईमेल्स येतात, तितकेच फोन कॉल, चॅट. काही साधारण माहिती मागणारे, काही नवीन प्रॉडक्ट, ऑर्डरविषयी चौकशी वगैरे. पण यातील काही टक्के कॉल वा ईमेल अत्यंत नाराज, चिडलेले, सोडून जाऊ  शकणाऱ्या ग्राहकांचे असू शकतात. साहजिकच अशा ग्राहकांना वेगळ्या पद्धतीने हाताळण्याची गरज असते. सेंटिमेंट-अनॅलिटिक्स व क्लासिफिकेशन वापरून अशी संभाषणे वेगळी करता येतात. त्यातील ठरावीक शब्दांवरून. परत हीच मंडळी समाजमाध्यमांवर बँकेबद्दल नकारात्मक टिप्पणी तर पोस्ट करीत नाहीत ना यावरही हे बॉट्स देखरेख ठेवून असतात. मग हे काम वेगळ्या टीमकडे दिले जाते.

४) सध्या निवडणुका सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी एका प्रसिद्ध वृत्तपत्रात सत्ताधारी पक्षाच्या सर्वात मोठय़ा नेत्याने २०१९ मध्ये केलेली सर्व भाषणे व त्यातील सर्वाधिक वापरलेल्या शब्दांचा उतरत्या क्रमाने आलेख, त्याचबरोबर बाजूला असाच आलेख २०१४ मधला दाखवून अत्यंत सुंदररीत्या दोन निवडणुकांमधील बदललेले विषय, मुद्दय़ांबद्दल भाष्य केले होते. ही सर्व भाषणे जर १०० हून अधिक धरली, सरासरी एक भाषण एक तास आणि एक मिनिटात दीडशे शब्द (जागतिक सरासरी) तरी आपण नऊ  लाख शब्द ऐकून, त्यातील ठरावीक शब्द वेगळे काढून, मग शेवटी त्यांचा आलेख वगैरे बनविणे किती किचकट व वेळखाऊ  काम असेल? परत रोज नवीन भाषण, म्हणजे परत रोज ‘रीपीट’. इथे कामी येते स्पीच अनॅलिटिक्स. सर्वप्रथम ‘व्हॉइस’ क्लिप्सना लिखित शब्दांमध्ये रूपांतरित केले जाते, ‘स्पीच टू टेक्स्ट’ एआयप्रणाली वापरून. पुढची पायरी ‘कीवर्ड’ सर्च करून कुठले शब्द किती वेळा उच्चारले अशी माहिती. मग त्यावरून ‘डेटा व्हिज्युअलायझेशन’ म्हणजे हाती आलेल्या माहितीचा प्रदर्शनीय अहवाल बनविणे. ज्यात आलेख, सारांश वगैरे आले. पुढील संकेतस्थळ पाहा-  (https://wordcounter.net/)

५) हल्ली सर्रास वापरत असलेले न्यूज अ‍ॅप ‘कंटेंट ऑटोमेशन’ नामक एआय प्रणालीचा वापर करून विविध स्रोतांतून बातम्या गोळा करतात व पूर्ण स्वयंचलित पद्धतीने प्रत्येक बातमीचा सारांश बनवितात, जो आपल्याला अ‍ॅपमध्ये सादर होतो.

उदाहरणार्थ (https://inshorts.com/).

‘रॅपिड६०’ नामक एआय प्रणाली, मिळवलेली प्रत्येक बातमी काटछाट करून केवळ ‘साठ शब्द आणि एक सूचक फोटो’ अशा छोटय़ा रूपात सादर करते.  ‘नॅच्युरल लँग्वेज प्रोसेसिंग व स्पीच’ मध्ये आजपर्यंत सर्वात जास्त संशोधन, गुंतवणूक झाली आहे. जगातील प्रमुख पाच तंत्रज्ञान कंपन्यांचे स्वत:चे असे स्मार्ट व्हॉइस सव्‍‌र्हिसेस ब्रँड आहेत. अमेझॉन- अलेक्सा, गुगल- असिस्टंट, अ‍ॅपल- सिरी, मायक्रोसॉफ्ट- कोर्टाना, फेसबुक- अजून प्रतीक्षेत. अजून एक कंपनी ज्याबद्दल आवर्जून लिहावेसे वाटते ती म्हणजे ‘आयबीएम’. यांच्या ‘मिस् डीबेटर’बद्दल आपण पूर्वीच्या सदरात बघितलेच आहे. तिने ‘कृत्रिम संभाषण’ एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवलंय. अर्थात अजून बरीच मजल मारायची आहे पुढच्या दोन दशकांत. जोपर्यंत एआय एनएलपीप्रणाली ‘टुरिंग टेस्ट’ पास नाही होत तोपर्यंत तरी आपण या बॉट्सना बाळबोधच म्हणू, संभाषणचातुर्यात.

लेखक टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसमध्ये साहाय्यक उपाध्यक्ष आणि सध्या अ‍ॅनालिटिक्स आणि इनसाइट्सच्या यूएसए सेंटरचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

loksatta-editorial-on-jet-airways-crisis-1878363/

सरकारी समाराधना


2434   21-Apr-2019, Sun

उद्योग मरतो. पण उद्योगपतींचे बाळसे तसूभरही कमी होत नाही.. उद्योग बँकांच्या गळ्यात मारला जातो. हेच ‘जेट’चे झाले..

हवाई वाहतूक जगात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या आपल्या देशात मृत पावणाऱ्या विमान कंपन्यांचाही वेग सर्वाधिक असावा यास काय म्हणावे? औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने नीचांक गाठलेला, बँकांच्या कर्जाचे डोंगर हाताबाहेर गेलेले, अनेक कंपन्यांचे प्रवर्तक दिवाळखोरीच्या मार्गावर आणि तरीही भांडवली बाजाराचा निर्देशांक चढाच, हे कसे? या अशा विसंवादाने भरलेल्या आणि या विषयी पूर्णपणे अनभिज्ञता दाखवणाऱ्या आपल्या देशात त्यामुळे जेट ही दुसऱ्या क्रमांकाची हवाई वाहतूक कंपनी अखेर बंद पडली याचे आश्चर्य वाटून घ्यावे काय? ही बंदावस्था तात्पुरती आहे असे कंपनीतर्फे सांगितले गेले. पण आपल्या देशाच्या इतिहासात तात्पुरती बंद पडलेली विमान कंपनी पुन्हा जिवंत झाल्याचा एकही दाखला नाही.

या इतिहासास आपण अपवाद आहोत असे जेटने सिद्ध केल्यास ते कौतुकास्पद ठरेल. पण त्या कंपनीच्या आर्थिक अवस्थेकडे नजर जरी टाकली तरी असे होणे किती अवघड आहे, हे जाणवेल. आता या सगळ्याचे शवविच्छेदन सुरू होईल पण या कंपनीत चाकरी करणाऱ्या साडेसोळा हजार जणांच्या कुटुंबांचे काय याविषयी चकार शब्ददेखील कोणी काढणार नाही. परंतु कर्मचाऱ्यांना आणि धनकोंना होरपळून टाकणाऱ्या या उन्हाळ्यात या जेट नाटय़ाचे सूत्रधार, कंपनीचे प्रवर्तक नरेश गोयल आणि कुटुंबीय हे किंग फिशरचा प्रवर्तक विजय मल्या याच्याप्रमाणे लंडनमधल्या सुखद वातावरणात निवांत असतील. कारण ते ब्रिटिश नागरिक आहेत आणि आता जेट ही त्यांची डोकेदुखी नाही. ती त्यांनी कधीच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गळ्यात मारली आहे.

हे जेटचे झेंगट स्टेट बँकेला आपल्या गळ्यात घ्यावे लागले कारण या बँकेचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज या कंपनीत अडकले आहेत. म्हणजे आता ते सोडवणे ही बँकेची जबाबदारी. कंपनीचे अध्यक्ष गोयल काखा वर करून निवांत आहेत. हे पैसे सोडवायचे तर जेटसाठी नवा कोणी तारणहार लागणार. तो शोधण्याचा प्रयत्न खरे तर गोयल यांनी करायला हवा. पण त्यांचे म्हणणे मी हा प्रयत्न करायचा तर विमान कंपनी चालू ठेवा. ती ठेवायची तर आणखी १५०० कोटी रुपये द्या. ते द्यायला आपल्या बँका तयार नाहीत. ते योग्यच. कारण असा पसा देणे म्हणजे संचित तोटा वाढवत नेणे. जेटचा गेल्या काही महिन्यांतील दिवसाचा तोटा २१ कोटी रुपये इतका आहे. यावरून ती किती अव्यावसायिक पद्धतीने चालवली जात होती ते लक्षात येईल.

ती आणखी चालवू दिली असती तर तोटाच तेवढा वाढला असता. बँकांनी अधिक निधीस नकार दिल्याने ते टळेल. पण त्यामुळे या उद्योगपती म्हणवणाऱ्या व्यापारी इसमाने आपली ही २५ वर्षांची कंपनी सरळ बंद केली. जेट हे माझे लाडके अपत्य असे गोयल म्हणतात. लाडक्याबाबत त्यांचे हे असे वर्तन. आता गोयल यांचे हे मृतवत अपत्य वाचवणे वा न वाचल्यास त्याचे पुढे काही करणे ही सर्व डोकेदुखी स्टेट बँकेची. बँकेने त्या दिशेने काहीही केले नाही तर या इतक्या प्रचंड कर्जावर पाणी सोडावे लागणार आणि काही करायला जावे तर या कंपनीसाठी नवा गुंतवणूकदार शोधावा लागणार. तो मिळाला तरी बँकेला विचारणार : इतक्या कर्जासकट मी ही कंपनी का घ्यावी? म्हणजे मग बँकेला कर्जाचा काही वाटा सोडून द्यावा लागणार.

आर्थिक परिभाषेत यास हेअरकट असे म्हणतात. म्हणजे काहीही झाले तरी हजामत होणार ती बँकांचीच. विजय मल्या यांची किंगफिशर एअरलाइन बुडाली तेव्हाही बँकांनाच स्वतचे कर्ज असेच तासून घ्यावे लागले. हे झाले विमान कंपन्यांचे. त्याखेरीज असे असंख्य उद्योग दाखवून देता येतील की त्यांनी राम म्हटला आणि बँकांना घोर लागला.

कुडमुडी भांडवलशाही म्हणतात ती हीच. याचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे उद्योग मरतो. पण उद्योगपतींचे बाळसे तसूभरही कमी होत नाही. यातील संतापजनक बाब म्हणजे इतक्या प्रकरणांत हात पोळून घेतल्यानंतरही आपल्याकडच्या परिस्थितीत एका पचीही सुधारणा नाही. या निर्लज्जावस्थेचे जेट हे ताजे प्रतीक. गेल्या वर्षांपासून या कंपनीची परिस्थिती तोळामासा आहे, याची जाणीव अनेक वित्तसंस्थांना होती आणि तशी ती करूनही दिली जात होती. तरीही या कंपनीने चांगली वर्षांवर्षांची आगाऊ तिकीट विक्री केली. या तिकीट विक्रीतून तब्बल ३,५०० कोटी रुपये जेटने गोळा केले. ते जमा होत असताना आपले दुकान उद्या सुरू राहणार आहे की नाही याची चिंता कंपनीला भेडसावत होती. तरीही आगाऊ तिकीट विक्री केली गेली. परिणामी ज्यांनी ज्यांनी जेटवर भरवसा ठेवून आपल्या सुट्टय़ा आदी प्रवासांची नोंदणी केली ते सगळे आता लटकले. याचा साधा अर्थ असा की डोक्यावर असलेल्या प्रचंड कर्जाव्यतिरिक्त जेटला आपल्या ग्राहकांचे हे आगाऊ घेतलेले ३,५०० कोटी रुपये परत करावे लागणार आहेत. याच्या जोडीला सहा महिन्यांहून अधिक काळ थकलेले कर्मचाऱ्यांचे वेतन-भत्ते लक्षात घेतले तर जेटसमोरील संकटांचा डोंगर किती अवाढव्य आहे, हे कळेल.

तो तसा वाढत असताना गोयल आणि कंपूने काहीही केले नाही ही यातील संतापाची बाब. हे गोयल मूळचे एका विमान वाहतूक कंपनीत कारकून. तेथपासून स्वतची कंपनी काढेपर्यंत त्यांचा झालेला प्रवास निर्वविाद कौतुकास्पद. पण हे कौतुक तेथेच संपायला हवे. गोयल यांना त्याचे भान राहिले नाही आणि ते देणाऱ्या व्यवस्था खिशात असल्याने त्यांना ते कोणी आणूनही दिले नाही. वास्तविक ही नोंदणीकृत कंपनी. म्हणजे गोयल यांच्या या कंपनीत लाखो गुंतवणूकदार आहेत. म्हणजे त्यांवर त्यांचाही तितकाच हक्क. पण आपल्याकडे तो केवळ कागदोपत्रीच राहतो. कारण आपण स्थापन केलेली आहे म्हणजे ही कंपनी आपलीच जहागिरी आहे, असाच दृष्टिकोन आपल्याकडे उद्योगपती म्हणवून घेणाऱ्यांचा असतो. नवसाने झालेला आहे म्हणून गद्धेपंचविशीतील पोरास काही कोणी मांडीवर घेऊन बसत नाही. गोयल यांना हे कधीही लक्षात आले नाही.

‘माझी कंपनी, माझी कंपनी’ म्हणून ते ज्यात त्यात लुडबुड करीत राहिले. अशा वेळी बाजारपेठ नियंत्रक, गुंतवणूकदार आदींनी त्यांना सरळ करावयास हवे होते. त्यासाठी आवश्यक ती पाश्चात्त्य अर्थशिस्त आपल्याकडे नाही. एतिहाद या कंपनीने गुंतवणूक केलेली असतानाही अमेरिकी डेल्टा कंपनीशी हे गोयल जेटच्या मालकीसाठी बोलणी करीत होते. जेटचा समभाग दीडशे रुपयांच्या आसपास असतानाही ३०० रुपये दराने तो घेण्याची डेल्टाची तयारी होती. पण गोयल यांना ४०० रुपये प्रतिसमभाग हवे होते. ते देण्यास डेल्टाने नकार दिला. परिणामी तो व्यवहार फिसकटला आणि अंतिमत: जेटमध्ये डेल्टाने गुंतवणूक केलीच नाही. पण ज्यांनी केली होती त्या एतिहादसारख्यांनीही ती काढून घेतली. टाटाही पुन्हा जेटकडे फिरकले नाहीत. कारण गोयल यांचा दुराग्रह.

असे झाल्यावर यात बुडतात ते गुंतवणूकदार, ग्राहक आणि अशा उद्योगांतील कर्मचारी. त्यांची फिकीर कोण करतो? स्वतचा प-पचा खर्च कंपनीकडून वसूल करणारे गोयल यांच्यासारखे अनेक आपल्याकडे विनासायास फोफावतात. कारण उद्योग हा काही एक शिस्तीने, सचोटीने करावयाचा व्यवहार नसून सरकारी खर्चाने चालणारी समाराधना आहे, असेच आपल्याकडे मानले जाते. त्यामुळे उद्योग मरतात. पण उद्योगपती अमरच. गेल्या काही वर्षांत असे ३५ वा अधिक उद्योगपती आपल्या मृत उद्योगांचे मढे बँकांकडे सोडून परदेशात गेले. यावरून परिस्थितीत किती आणि काय सुधारणा झाली ते कळेल. समाराधना सुरूच आहे.

editorial-on-pakistani-prime-minister-imran-khan-modi-government-

अस्वलाच्या गुदगुल्या


1373   21-Apr-2019, Sun

मोदी सरकारचे गोडवे गाऊन पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांना मिळणार काय, हा प्रश्न आहे..

निवडणुकांत पाकिस्तानचा मुद्दा हा आपल्याकडून काढला गेल्यामुळे पाकिस्तानला भारतीय निवडणुकींविषयी भाष्य करण्याची संधी मिळाली. वास्तविक आपल्या पाच वर्षांतील कामगिरीवरच प्रचारात भर ठेवण्यासाठी मोदी सरकारकडे मुद्दे नाहीत असे नाही..

उत्तरायुष्यात निवृत्तिवेतन मिळावे म्हणून काही कोणी स्वातंत्र्यलढय़ात भाग घेत नाही त्याप्रमाणे निवडणुकीत मिरवता यावे म्हणून काही कोणते सरकार शत्रुपक्षावर हल्ला करीत नाही. व्यक्ती आणि सरकार यांनी निदान तसे करणे अपेक्षित आहे. थोडक्यात या दोन्ही क्रिया म्हणजे तत्कालीन परिस्थितीवर व्यक्ती वा सरकार यांची प्रतिक्रिया असते. परिस्थिती भिन्न असती तर प्रतिक्रियाही भिन्न असल्या असत्या. याचा अर्थ स्वतंत्र असतानाही काही कोणी स्वातंत्र्यलढय़ात भाग घेऊ शकणार नाही. त्याचप्रमाणे शत्रुपक्षाकडून काहीच कागाळी घडली नसेल तर कोणतेही सरकार त्या देशावर उगाच वार करणार नाही. हे सत्य. त्याचाच दुसरा अर्थ असा की आपण स्वातंत्र्यलढय़ात भाग घेतला हे व्यक्तीने मिरवायचे नसते आणि आपण शत्रुराष्ट्रास चोख प्रत्युत्तर दिले म्हणून सरकारने आपलीच पाठ थोपटून घ्यायचे नसते. हे एकदा मान्य केले की विद्यमान निवडणूक हंगामात आपल्याकडे पाकिस्तानास दिलेल्या प्रत्युत्तराचा मुद्दा का उपस्थित केला जातो, असा प्रश्न पडणे अैनैसर्गिक, आणि राष्ट्रविरोधीही, मुळीच म्हणता येणार नाही. तो आताच पडायचे कारण म्हणजे या सगळ्या संदर्भात पाकिस्तानची बदलती भूमिका. आपल्या या शेजारी देशाने रविवारी पुन्हा भारताशी चर्चेची तयारी दाखवली, ही बाब लक्षणीय. पाकिस्तानचे भावी परराष्ट्र सचिव सोहेल महंमद यांनी उभय देशांतील संबंध सुधारण्यासाठी काय करता येईल, यावर भाष्य केले आहे.

पुलवामा येथे भारतीय निमलष्करी दलाच्या जवानांवरील निर्घृण हल्ल्यास प्रत्युत्तर म्हणून आपल्या सरकारने पाकिस्तानातील बालाकोट येथे हवाई छापे घातले. म्हणजे बालाकोट ही पुलवामाची प्रतिक्रिया. या प्रतिक्रियेत शत्रुराष्ट्राचे ३५० जण ठार करण्यात आल्याची माहिती पहिल्यांदा अधिकृत सूत्रांनी दिली आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी अधिकृतपणे हा आकडा २५० केला. ही माहिती सरकारला कोठून आणि कशी मिळाली याचे स्पष्टीकरण अद्याप तरी देण्यात आलेले नाही. ते असो. तथापि अलीकडे एका मुलाखतीत या संदर्भात पुरावे कधी दिले जाणार असे विचारले गेले असता, पंतप्रधान मोदी म्हणाले : पुरावे आपण देण्याची गरजच नाही. या हल्ल्यांची माहिती देऊन पाकिस्ताननेच ते दिले आहेत.

पंतप्रधानांचे विधान खरे आहे. कारण भारताने बालाकोटवर मारा केल्याचे वृत्त आपल्याआधी पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनीच दिले. पण खरे असले तरी हे विधान फसवे ठरते. याचे कारण पुढे जाऊन पाक लष्करी प्रवक्त्याने भारतीय बॉम्बफेक निरुपयोगी ठरल्याचाही दावा केला आणि पाकिस्तानी हवाई दलाने हस्तक्षेप केल्याने भारतीय विमानांना घाईघाईत पळून जावे लागले, म्हणून त्यांनी आपल्याकडची स्फोटके मध्येच टाकून दिली, असेही पाक लष्कर म्हणाले. पाकिस्तानच्या दाव्यावर विश्वास ठेवायचा तर या मुद्दय़ाचाही विचार करावा लागणार. पंतप्रधान तो करण्यास तयार आहेत असे दिसत नाही. हे सर्व तपशील वास्तविक आता उगाळण्याचे कारण नाही. यावर जे काही वाग्युद्ध व्हायचे होते ते झाले. तथापि या विषयास पुन्हा स्पर्श करावा लागतो. कारण अमेरिकी दैनिकाशी बातचीत करताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेली विधाने. त्यातील दोन मुद्दे दखलपात्र ठरतात.

एक म्हणजे ‘‘बालाकोटवर हल्ला करून भारताने आमची काही झाडे पाडली आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही भारतीय भूमीतील काही दगड उडवले’’ असे इम्रान खान म्हणतात. म्हणजे या साऱ्यास द्यायला हवे तितके महत्त्व  अजिबात देण्यास पाकिस्तानचे पंतप्रधान तयार नाहीत. त्यांच्या मते झाले ते इतकेच. त्यांचे दुसरे विधान आहे ते भारत, पाकिस्तान आणि काश्मीरसंदर्भात. सध्या सुरू असलेल्या निवडणुकांत पुन्हा मोदी सरकारला बहुमत मिळून ते सत्तेवर आले तर काश्मीर समस्या सोडवण्यासाठी ते जास्त चांगले ठरेल, असे इम्रान खान म्हणतात. म्हणजे काँग्रेस वा अन्य कोणत्याही आघाडी सरकारपेक्षा भारतात काश्मीर आदी समस्यांसाठी भाजपच सत्तेवर आलेला चांगला, असा त्यांच्या विधानाचा अर्थ. हे त्यांचे विधान बुचकळ्यात पाडणारे ठरते.

याचे कारण आपण पाकिस्तानला कसा ठाम धडा शिकवला असा दावा सरकार करणार आणि आपल्या राष्ट्रप्रेमी सरकारने तो केलेला असल्याने आपल्याला त्यावर विश्वास ठेवावा लागणार. ते ठीकच. पण आपण जर पाकिस्तानला धडा शिकवला असेल तर पाकिस्तान सरकारला या धडा शिकविणाऱ्याचेच प्रेम कसे, असा प्रश्न उपस्थित होतो. आपण जर बालाकोट हल्ल्यातून पाकिस्तानचे नाक कापले असे आपले म्हणणे असेल आणि पाकिस्तान आपण म्हणतो त्याप्रमाणे खरोखरच जर त्यातून रक्तबंबाळ झालेला असेल तर प्रत्यक्षात  पाकिस्तानला आपला राग यायला हवा. कारण एका गालावर श्रीमुखात ठेवून दिल्यावर दुसरा गाल पुढे करायला पाकिस्तान काही गांधीवादी नाही. याबाबत कोणाचे दुमत असणार नाही. आणि ते जर नसेल तर हेच सरकार पुन्हा सत्तेवर येण्यात पाकिस्तानला इतका रस कसा?

ही त्या देशाची राजकीय लबाडी आहे, अपरिहार्यता आहे. मोदी सरकारने त्या सरकारला असा काही धडा शिकवला आहे की दुसरे काही बोलण्याची त्या सरकारची शक्यताच नाही, असे काही खुलासे या संदर्भात होतात. पण तर्काच्या कसोटीवर तपासून पाहिल्यास ते फोल ठरतात. ज्याच्या हातून मार खाल्ला त्याचेच कौतुक पाकिस्तान कशाला करेल? हा बुद्धिभेदाचा प्रकार आहे असे मानले तरी मोदी सरकारचे गोडवे गाऊन पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांना मिळणार काय, हा प्रश्न आहे.

आणि त्यातच खरी मेख आहे. ती शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय मंचाचा विचार करावा लागेल. तो केल्यास असे दिसेल की भारतीय पंतप्रधान निवडणुकीच्या हंगामात पाकिस्तानच्या नावे खडे फोडत असताना पाकिस्तान मात्र भारत सरकारचे गुणगान करतो. तेव्हा आंतरराष्ट्रीय प्रतिमासंवर्धनात पाकिस्तानने आपल्यावर मात केल्याचा निष्कर्ष निघू शकेल. दुसरा मुद्दा पाकिस्तानला यामुळे भारताचे बालाकोट दावे फोल ठरवण्याची संधी मिळेल.

अशा वेळी महत्त्वाचा प्रश्न असा की ती संधी आपण आपल्या हातांनीच दिली किंवा काय. हा प्रश्न विद्यमान वातावरणात चर्चिला जाणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. ते अशासाठी की या निवडणुकांत पाकिस्तानचा मुद्दा हा आपल्याकडून काढला गेल्यामुळे पाकिस्तानला भारतीय निवडणुकींविषयी भाष्य करण्याची संधी मिळाली. तेव्हा मोदी सरकारने आपल्या पाच वर्षांतील कामगिरीवरच प्रचारात भर ठेवला असता तर ते अधिक उपयुक्त ठरले असते. तसे करण्यासाठी मोदी सरकारकडे मुद्दे नाहीत असे नाही. उज्ज्वला गॅस योजना ते दिवाळखोरीची सनद अशा अनेक आघाडय़ांवर सरकारने गेल्या पाच वर्षांत काही महत्त्वाचे निर्णय धडाडीने घेतले. त्याखेरीज शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना आणि गरीब रुग्णांसाठी आरोग्य योजनादेखील सरकारच्या नावावर आहेत. तेव्हा हे इतके भांडवल असतानाही सरकारने पाकिस्तानचा मुद्दा प्रचारात घेण्याचीच गरज नव्हती. अलीकडे एका सभेत पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा हा मुद्दा छेडला आणि तरुण मतदारांनी लष्करी शौर्य दाखवणाऱ्यांना पहिले मत अर्पण करण्याचे आवाहन केले. तसे ते शब्दश: करावयाचे तर निवडणुकीच्या रिंगणात संबंधित लष्करी अधिकारी असायला हवेत. कारण हे शौर्य त्यांचे आहे. पण लष्कर तर या सगळ्या राजकारणापासून सुदैवाने चार हात लांब असते.

ते तसेच असायला हवे आणि ते तसेच राहील याची खबरदारी संबंधितांनी घ्यायला हवी. पण सांप्रत काळात ती घेतली गेली असे म्हणता येणार नाही. पाकिस्तानला लाखोली वाहणे आकर्षक असेल. पण ही आकर्षकता अस्वलाच्या गुदगुल्यांसारखी आहे. वरकरणी अस्वलाची क्रिया साधी वाटली तरी अंतिमत ती जीवघेणी ठरू शकते. या सरकारला मिठी मारून ती तशीच आहे हे पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी दाखवून दिले आहे. झाले ते झाले. उर्वरित निवडणूक हंगामात तरी हे टाळायला हवे.

alibaba-chief-jack-ma-sparks-working-hours-debate-in-china-1879184/

परवलीचे शब्द हरवले


3443   21-Apr-2019, Sun

खासगी आयुष्याचा तोल सांभाळण्यासाठी जर आपण या स्पर्धेत हातपाय मारत असू, पण त्यातच सारी क्षमता खर्च होत असेल तर?

कलेसाठी झिजावे, कलेसाठीच जगावे आणि कलेसाठी जगताजगता कलेच्या मंचावरच एका परमोच्च समाधानाच्या क्षणी देहाचे कलेवर होऊन जावे, असे ज्यांच्या बाबतीत घडते, तो खरा कलावंत म्हणून त्याचे नावही अजरामर होते. कलेची काही क्षेत्रे सोडली तर अशी आसक्ती इतरत्र फारशी आढळत नाही. अनेकांच्या बाबतीत तर, नाइलाजाने एखाद्या क्षेत्रात ढकलले गेल्यानंतर गटांगळ्या खात असताना केवळ तरंगते राहण्यापुरते हातपाय मारण्याचीच उमेद शिल्लक राहिलेली दिसते. जीवघेणी गळेकापू स्पर्धा आणि त्यामध्ये तगून राहण्याची क्षमतेपलीकडची तगमग ही या अवस्थेची कारणे असावीत.

आजकाल अशा स्पर्धा वेगवेगळ्या क्षेत्रांत सुरू असल्याने, या स्पर्धेत कोणते क्षेत्र पुढे राहते याचीही एक स्पर्धा सुरू असते आणि या स्पर्धेत आपले क्षेत्र पुढे राहिलेच पाहिजे यासाठी त्या त्या क्षेत्रातील प्रत्येकास कसून तयारी करावीच लागते. तसे झाले नाही, तर जे क्षेत्र मागे पडेल त्या क्षेत्रातील प्रत्येकाचीच ती हार ठरते. शर्यतीतला घोडा धाव घेण्याच्या क्षमतेचा उरला नाही, की त्याची कोणती गत होते, ते सर्वासच ठाऊक असते. या स्पर्धाच्या स्पर्धेत धाव घेणाऱ्या प्रत्येकाचीच अवस्था शर्यतीच्या मदानात धावणाऱ्या घोडय़ासारखीच असते आणि काहीही करून मदानावर उभे असणे ही त्याच्या अस्तित्वाची कसोटी असते. या कसोटीत कधी तरी धाप लागते, कधी जीवही घुसमटतो आणि नको ती स्पर्धा असेही वाटू लागते. तरीही त्याला त्यातून बाहेर पडता येत नाही. कारण तेथून बाहेर पडल्यानंतर ज्या दुसऱ्या मदानात जावे, तर तेथेही तशाच स्पर्धेचा सामना करावा लागणार असतो.

आजकाल कामाच्या प्रत्येक क्षेत्रात हीच स्थिती दिसते. या स्पर्धेत पुढे राहण्यासाठी गतिमान ठरण्यातील गंमतही प्रत्येक जण अनुभवतो आणि स्वत:स सिद्धदेखील करतो. पण कलावंतांच्या कलेसाठी जगण्याच्या आणि कलेसाठी झिजण्याच्या आसक्तीचा लवलेश तेथे फारसा दिसत नाही. कारण या स्पर्धेत, कलेच्या उपासनेपेक्षा, व्यवहाराची किंमत मोठी आहे. अशी किंमत जोवर मिळते, तोवर या व्यवहारात स्वत:स गुरफटवून घेण्यात प्रत्येकास रस असतो. त्याहून मोठी किंमत मिळाली की पहिला व्यवहार गौण होतो आणि नव्या व्यवहाराच्या नव्या स्पर्धेत उतरण्यासाठी क्षमता बांधण्याची तयारी सुरू होते.

अशा व्यवहाराची असंख्य क्षेत्रे आसपास असतात आणि प्रत्येक नव्या क्षेत्रात डोकावल्यावर, अलीबाबाच्या गुहेसारखा, हवे ते सारे देणारा खजिना तेथे खुणावतही असतो. केवळ, ‘तिळा उघड’ हा परवलीचा शब्द त्या क्षणी आठवला की त्या गुहेचे दरवाजे आपोआप खुले होतात. आत प्रवेश करणारा प्रत्येक जण त्या खजिन्यावर हुरळून जातो. असे अनेक जण एकदा त्या गुहेत शिरले, की आपल्या पदरात अधिकाधिक पडावे याची स्पर्धा सुरू होते आणि पुरेसे माप पदरात पडले की परतण्यासाठी मागे फिरताच, गुहेचे दरवाजे बंद झाल्याचे लक्षात येते. तरीही हेच वास्तव आहे आणि या वास्तवाचा सामना करताकरता अशा अनेक गुहांचे बाहेर पडण्याचे दरवाजे बंद झाले आहेत.

याचेच संकेत चीनमध्ये मिळू लागले आहेत. तेथेही एका ‘अलीबाबा’ने आपल्या गुहेचे दरवाजे खुले केले आणि आतील खजिन्याच्या मोहाने अनेकांनी त्या गुहेसमोर गर्दी केली. मग परवलीचा शब्द उच्चारला गेला आणि गुहाभर गर्दी आतमध्ये जमा होताच, गुहेचे दरवाजे बंद झाले. खजिन्याच्या झगमगाटाने हुरळून गेलेल्या गर्दीला बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाल्याचे भान उरले नाही. इथला खजिना आपल्यासाठी आहे आणि जास्तीत जास्त वाटा आपल्यास मिळावा याकरिता स्पर्धा सुरू झाली. मग अलीबाबाने या स्पर्धेला शिस्त लावण्याचे काम हाती घेतले. आता तेथील स्पर्धेला नव्या कार्यसंस्कृतीचा मुलामा चढविण्याची तयारी सुरू झाली आहे. ‘बारा तास गुणिले सहा दिवस’ या कार्यसंस्कृतीच्या विळख्यात आपण पुरते गुरफटले जाणार आणि यातून बाहेर पडण्याचे फारसे मार्ग नाहीत, हे गुहेतील गर्दीस आता जाणवू लागले आहे.

‘सकाळी नऊ ते रात्री नऊ’ या कार्यसंस्कृतीची तेथील तरुणाईच्या विश्वास फारशी ओळख नाही. कारण, कमी वेळातही भरपूर काम करून आपली क्षमता सिद्ध करता येते हे या तरुणाईने दाखवून दिल्याने, पाच दिवसांचा आठवडा, कमीत कमी कामाच्या वेळा आणि खासगी आयुष्यासाठी भरपूर सुविधा या कार्यसंस्कृतीने या पिढीवर सुरुवातीस घातलेले गारूड उतरणार याचीच चुणूक अलीबाबाने दाखविली आहे. चीनमधील तंत्रज्ञान क्षेत्रातील बडी असामी म्हणून – याच क्षेत्रातील स्पर्धेसाठी सळसळणाऱ्या तरुणाईच्या जोरावर- स्वत:स सिद्ध केलेल्या जॅक मा नावाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या धनवंताच्या अलीबाबा नावाच्या बडय़ा कंपनीची ही कहाणी तरुण पिढीच्या भवितव्याची अंधूकशी चाहूल देणारी ठरणार आहे. कारण, जॅक मा याने चीनमध्ये आपल्या अलीबाबाद्वारे नव्या कार्यसंस्कृतीची बीजे रोवण्याची मोहीम हाती घेतली आहे आणि ‘बारा तास गुणिले सहा दिवस काम’ ही आजवर केवळ चच्रेत असलेली कार्यसंस्कृती आपल्या उंबरठय़ावर येऊन ठेपल्याची जाणीव या क्षेत्रातील स्पर्धेत उतरण्यास सज्ज असलेल्या प्रत्येकास होऊ लागली आहे.

आठवडय़ाचे सहा दिवस, दररोज बारा तास काम करा आणि भरपूर कमवा या सिद्धान्ताचा जॅक मा याने पुरस्कार केला आणि याची तयारी असलेल्यांनाच अलीबाबाच्या गुहेचे दरवाजे खुले राहतील असेही त्याने बजावले. तंत्रज्ञान क्षेत्रात जेवढे अधिक तास काम करावे तेवढा कंपनीचा फायदा होतो, हे सिद्ध झाले असले तरी तरुणाईचे मन मोकळे करण्याची एकमेव आभासी जागा असलेल्या समाजमाध्यमांवर मात्र या कार्यसंस्कृतीविषयी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. असे झाले, तर खासगी आयुष्याला वेळ कधी देणार हा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. कारण, खासगी आयुष्याचा तोल सांभाळण्यासाठी जर आपण या स्पर्धेत हातपाय मारत असू, पण त्यातच सारी क्षमता खर्च होत असेल, तर खासगी आयुष्याचे क्षण वाटय़ालाच येणार नाहीत, या भयाण वास्तवाचे भूत आता अनेकांसमोर उभे राहिले आहे.

जॅक मा यांच्या नव्या कार्यसंस्कृतीमुळे जगभरातील कार्यसंस्कृतीचा व्यापक पट आपोआप उलगडला जाऊ लागला आहे. अनेक देशांत कमी तास काम करूनही अधिकाधिक उत्पादनक्षमता सिद्ध झाल्याची उदाहरणे समोर येऊ लागली. कार्यालयांत किती तास बसता यावर नव्हे, तर किती क्षमतेने काम करता यावर देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचे आकडे अवलंबून असतात, असा युक्तिवाद पुढे येऊ लागला आहे.

ते काहीही असले, तरी नव्या कार्यसंस्कृतीचा जन्म होऊ घातला, हेच वास्तव असल्याने आणि त्या कार्यसंस्कृतीस सामोरे जाण्याखेरीज पर्याय नसल्याने, ती अंगी रुजविण्याची क्षमता स्वत:च्या अंगी निर्माण करण्याचे आव्हान यापुढच्या पिढीस स्वीकारावे लागणार आहे. काम करत असतानाच देह झिजावा, असे वाटो वा  न वाटो, तसे घडण्याच्या शक्यता बळावतील, हेही एक वास्तव आहे. पण असे झालेच, तर त्याची इतिहासात नोंद होईलच, असे मात्र नाही.

sydney-brenner-

सिडनी ब्रेनर


6906   20-Apr-2019, Sat

दारिद्रय़ाचा शाप, त्यात दक्षिण आफ्रिकेतील हलाखीचे जीवन यातून बाहेर पडून वैद्यकातील नोबेलपर्यंत मजल मारता येऊ  शकते, असे क्वचितच कुणी मान्य करील; पण सिडनी ब्रेनर यांनी हे करून दाखवले होते. एवढेच नव्हे, तर स्वत: त्या दुष्टचक्रातून बाहेर पडल्यानंतरही त्यांनी मागच्यांचा विचार करून वर्णद्वेषाविरोधातील लढाई सुरू ठेवत कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांसाठी कायम निधी देऊ न आपण ज्या परिस्थितीतून आलो त्याची सदैव जाण ठेवली. रेणवीय जीवशास्त्राच्या सुवर्णकाळातील एक आघाडीचे शिलेदार म्हणजे ब्रेनर. सिंगापूरमध्ये त्यांचे नुकतेच निधन झाले.

त्यांच्या संशोधनातून अल्झायमर (स्मृतिभ्रंश) व एड्स या रोगांची मानवाला असलेली समज वाढण्यात मदत झाली होती हे तर खरेच, पण १९५२ मध्ये जेम्स वॉटसन व फ्रान्सिस क्रिक यांनी डीएनएच्या चक्राकार रचनेचा शोध लावल्यानंतर त्याचा प्रत्यक्ष उपयोग करून जनुकीय संकेतावलीची संकल्पना मांडण्यात ब्रेनर आघाडीवर होते. या संकेतावलीनुसारच पेशीतील प्रथिनांना संदेश मिळत असतात व त्यावर आपल्याला कुठले रोग होणार हे ठरत असते.

केंब्रिजमध्ये त्यांनी १९६०च्या सुमारास सी इलेगन्स या एक मिलिमीटर लांब गोल कृमीवर संशोधन केले. हा कृमी पारदर्शक असतो. त्यासाठीच त्यांना २००२ मध्ये जॉन सुल्सटन व एच. रॉबर्ट हॉरवित्झ यांच्यासमवेत नोबेल मिळाले. अनेक रोगांच्या निदानात त्यांच्या संशोधनामुळे आमूलाग्र बदल झाले. आपल्या पेशींचे जीवनचक्र ठरवणाऱ्या आज्ञावलीचे काम कसे चालते हे त्यांनी दाखवून दिले होते. सी इलेगन्स हा जनुकीय क्रमवारी उलगडलेला पहिला प्राणी होता. आमच्या तिघांबरोबर नोबेलचा चौथा मानकरी हा सी इलेगन्स आहे, असे ते त्या वेळी गमतीने म्हणाले होते. ब्रेनर यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेतला. ज्यू आई-वडिलांचे ते पुत्र. त्या वेळी एक वाचनालय ब्रेनर यांच्या मदतीस आले. तेथे त्यांनी ‘दी सायन्स ऑफ लाइफ’ या एच. जी. वेल्स यांच्या पुस्तकाचे तीन खंड वाचले, तेव्हापासून त्यांना जीवशास्त्राची गोडी लागली. जोहान्सबर्ग येथे विद्यापीठातील शिक्षणानंतर त्यांनी सिरील हिन्सशेलवूड या ऑक्सफर्डमधील नोबेल विजेत्याच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. केली. १९५३ मध्ये केंब्रिज येथे कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत वॉटसन व क्रिक यांनी उलडगलेल्या डीएनए रचनेचे प्रारूप पाहायला ते गेले. तो त्यांच्या आयुष्यातील कलाटणी देणारा क्षण होता.  १९५७ मध्ये त्या प्रयोगशाळेत त्यांनी क्रिक यांच्यासमवेत काम सुरू केले. डीएनए व प्रथिने यांच्यात निरोप्याचे काम करणाऱ्या आरएनएचा शोध त्या वेळी त्यांनी फ्रान्स्वा जेकब व मॅथ्यू मेसेलसन यांच्यासमवेत लावला. केंब्रिज येथे त्यांनी वैद्यकीय संशोधन मंडळाचे नेतृत्व केले. नंतर कॅलिफोर्नियातील बर्कले येथे रेणवीय विज्ञान संस्था स्थापन केली. त्याचे ते संचालक होते. नंतर तेथील साल्क जैवअभ्यास संस्थेत ते काम करीत होते. नंतर सिंगापूर येथे त्यांनी रेणवीय व पेशी जीवशास्त्र संस्था सुरू केली. ‘करंट बायॉलॉजी’ या नियतकालिकात त्यांनी लिहिलेला ‘लूज एंड्स’ हा स्तंभ बराच गाजला होता.

athour-mapia-news/livre-paris-paris-book-fair-1879188/

बुकबातमी : फ्रान्स आणि भारताचं (असंही) साटंलोटं!


2789   20-Apr-2019, Sat

जैतापूर किंवा राफेलसारख्या विषयांत फ्रान्स-भारत सहकार्याबद्दल फार बरं बोललं गेलं नसेलही; पण ग्रंथव्यवहारात मात्र हे सहकार्य सर्वार्थानं ‘साजरं’ होणार आहे! पॅरिसमध्ये पुढल्या वर्षी, २० ते २३ मे २०२० असे चारही दिवस भरणाऱ्या प्रचंड पुस्तक-मेळ्यात भारत हा ‘अतिथी देश’ असणार आहे. फ्रेंचमध्ये या ग्रंथमेळ्याला ‘सलाँ दु लिव्रे’ म्हटलं जातं. किमान ४५ देशांमधले १२०० तरी प्रकाशक यात भाग घेतात, शिवाय ८०० परिसंवाद किंवा साहित्य-आधारित कार्यक्रम आणि ३०० लेखकांचे स्वाक्षरी-सोहळेही दरवर्षी या मेळ्यात होत असतात. गेल्याच महिन्यात २०१९ मधलं ‘सलाँ दु लिव्रे’ पार पडलं, तेव्हा ओमानला पाहुण्या देशाचा मान मिळाला होता. ओमानपेक्षा भारताचा सहभाग कैकपटींनी सशक्त असू शकतो!

त्यापुढली बातमी अशी की, २०२२ च्या जानेवारीत नवी दिल्लीत होणाऱ्या ‘विश्व पुस्तक मेळ्या’चा अतिथी देश फ्रान्स असेल. हे साटंलोटं- किंवा राजनैतिकदृष्टय़ा योग्य शब्द वापरायचे तर, ‘द्विपक्षीय सहकार्य’ ग्रंथव्यवहाराला कसं बळ देणार, अशी शंका असलेल्यांना काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे. भारतीय भाषांपैकी एकटय़ा मराठीचा विचार केला, तरी ‘बलुतं’पासून ‘आमचा बाप आन आम्ही’पर्यंत अनेक पुस्तकं फ्रेंच भाषेत उपलब्ध आहेत. पुण्यातून फ्रेंच पुस्तकांचे थेट मराठी अनुवाद प्रकाशित होताहेत.. अशा किमान २३ भारतीय भाषा, शिवाय इंग्रजी.. असा पसारा असलेल्या भारताशी ग्रंथसहकार्य करणं कोण नाकारू शकेल! नॅशनल बुक ट्रस्ट ही भारताच्या ग्रंथव्यवहाराचा आंतरराष्ट्रीय समन्वय साधणारी संस्था त्यामुळेच महत्त्वाची ठरते.

अर्थात, भारतीय पुस्तकांपैकी इंग्रजीचा खप देशव्यापी मानला जात असला तरी, सरासरीनं इंग्रजी पुस्तकांच्याही फार तर ३००० प्रती खपतात, हा दोष प्रकाशकांचा नसून वाचकांचाही आहे.


Top