
शुभांगी स्वरूप
168 04-Dec-2019, Wed
काही वर्षांपूर्वी पुदुचेरी येथे आयोजित राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा अंतिम टप्प्यात कमालीची चुरशीची बनली होती. सततच्या सामन्यांमुळे स्पर्धेतील एका युवती खेळाडूचे पाय सुजले होते. इतके होऊनही ती शेवटच्या मिनिटापर्यंत लढत होती. सुजलेल्या पायांनी खेळत तिने स्पर्धेत कांस्य पदक पटकावले; ती युवती होती- शुभांगी स्वरूप! कोणत्याही परिस्थितीत न डगमगता चिकाटीने लढत राहण्याचा हा स्थायीभाव शुभांगीला नौदलातील पहिल्या महिला वैमानिकाचा बहुमान मिळवून देण्यात महत्त्वाचा ठरला. धाडस, साहस हेदेखील ‘करिअर’चा भाग होऊ शकते, हे तिने सिद्ध केले आहे. हवाईदलाच्या पाठोपाठ नौदलाने महिलांवर विमानाचे सारथ्य करण्याची जबाबदारी सोपवली असून भारतीय नौदलाच्या इतिहासात शुभांगी पहिली महिला वैमानिक म्हणून दाखल झाली आहे.
उत्तर प्रदेशातील बरेलीत जन्मलेल्या शुभांगीला नौदल लहानपणापासून खुणावत होते. तिचे वडील ज्ञान स्वरूप हे नौदलात अधिकारी. त्यांच्याकडून तिला प्रेरणा मिळाली. शाळेत अभ्यासाबरोबरच खेळातही आघाडीवर असणाऱ्या शुभांगीचा तायक्वांदो हा आवडता खेळ. त्यातील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत तिने सुवर्णपदकही पटकावले. कोचीन येथील नौदलाच्या शाळेत बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या शुभांगीने वेल्लोर तंत्रशिक्षण संस्थेतून जैवतंत्रज्ञान विषयात पदवी मिळवली. त्यानंतर बंगळूरुमध्ये नोकरीही मिळाली, पण सरधोपट नोकरीत तिचे मन रमणारे नव्हतेच. याच काळात सैन्यदलाच्या सेवेत जाण्यासाठी तिची धडपड सुरू होती. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिने नौदलाची निवड केली. उड्डाण विभागात जाण्यासाठी आणखी एका परीक्षेचा टप्पा पार केला. नौदलाच्या एझीमाला प्रबोधिनीत प्रशिक्षण पूर्ण करत शुभांगीने हे यश मिळवले आहे.
भारतीय लष्कराप्रमाणे नौदलाचाही स्वत:चा हवाई विभाग आहे. तिथे नियंत्रण, विमान पर्यवेक्षणाच्या कामात महिलांनी आधीच स्थान मिळवले आहे. मात्र, नौदलात महिलांना प्रत्यक्ष वैमानिक म्हणून घेण्याचा निर्णय २०१५ मध्ये झाला होता. चार वर्षांनंतर तो निर्णय शुभांगीच्या निवडीतून प्रत्यक्षात आला आहे. शुभांगीखेरीज, आजवर महिला अधिकारी नसलेल्या नौदलाच्या शस्त्रास्त्र निरीक्षण विभागात आस्था सहगल, रूपा ए. आणि शक्तिमाया एस. यांचीही निवड झाली आहे. विमानवाहू नौकेला मार्गस्थ होताना विशिष्ट प्रकारचे संरक्षण कवच दिले जाते. हवाई संरक्षण, टेहळणीचे काम नौदलाच्या विमानाकडून केले जाते. अशा विमानाचे संचालन आता शुभांगी करेल. हवाई दलाच्या हैदराबादस्थित प्रबोधिनीत वर्षभर याचे विशेष प्रशिक्षण दिले जाईल.