supreme-court-of-india-election-2019-1876028/

निवडणूक रोखे हवेत, पण..


324   15-Apr-2019, Mon

निवडणूक रोख्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची बाजू काही प्रमाणात नाकारताना, या मूळ संकल्पनेला मात्र अभय दिलेले दिसून येते. पारदर्शकता आणि समन्यायीतेचा अभाव असल्याचे कारण देत यंदाच्या निवडणुकीपुरती तरी या निवडणूक रोख्यांना स्थगिती द्यावी, अशी विनंती करणाऱ्या याचिका ‘कॉमन कॉजम्’ आणि ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक राइट्स’ या स्वयंसेवी संघटना, तसेच मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष यांनी दाखल केल्या होत्या. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची दखल घेतानाच, सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांना सरसकट स्थगिती देण्यास नकार दिला. परंतु हा निर्णय अंतरिम आणि सशर्त आहे. आता निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांना झालेल्या निधी पुरवठय़ाचा आणि तो करणाऱ्यांचा तपशील या पक्षांनी निवडणूक आयोगाकडे ३० मेपूर्वी बंद लिफाफ्यात सादर करणे आवश्यक आहे. राजकीय पक्षांना या मुद्दय़ावर अधिक चर्चा करण्यासाठी उद्युक्त करतानाच सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने सरकारच्या भूमिकेवरही ताशेरे ओढले आहेत. ते कशासाठी हे समजून घेण्यापूर्वी निवडणूक रोख्यांची गुंतागुंत पडताळणे समयोचित ठरते.

नरेंद्र मोदी सरकारने सन २०१७च्या वित्त विधेयकाद्वारे निवडणूक रोखे किंवा इलेक्टोरल बाँड्स योजनेची संकल्पना मांडली. यानुसार, कोणत्याही भारतीय व्यक्तीला किंवा व्यक्तिसमूहाला किंवा कंपनीला निवडणूक रोखे विकत घेण्याची परवानगी आहे. हे रोखे केवळ स्टेट बँक ऑफ इंडिया ही  बँकच वर्षांतील पूर्वनिर्धारित दिवसांमध्ये जारी करू शकते आणि त्यांचे स्वरूप वचनपत्रांप्रमाणे (प्रॉमिसरी नोट) असते. एक हजार रुपये ते एक कोटी रुपयांपर्यंत मूल्य-वर्ग असलेले हे रोखे संबंधित व्यक्ती किंवा उद्योगसमूह विकत घेऊन त्यांच्या पसंतीच्या राजकीय पक्षाला देणगीदाखल देऊ शकतात. हे रोखे वटवण्याची मुभा राजकीय पक्षांना असते. राजकीय पक्षांना आजवर बहुतेकदा काळा पैसा पांढरा करण्याच्या हेतूनेच देणग्या दिल्या जायच्या. यातून व्यवस्थेतील काळ्या पैशाला अप्रत्यक्षरीत्या राजकीय अधिष्ठानही प्राप्त व्हायचे. हे प्रकार रोखण्यासाठीच निवडणूक रोख्यांची संकल्पना मांडली अशी भाजपप्रणीत सरकारची भूमिका आहे. या सगळ्यात एक मोठी मेख म्हणजे, देणगीदाराची ओळख गोपनीय राहणार! म्हणजे बेहिशेबी देणग्यांना आळा घालण्यासाठी जी हिशेबी आणि कागदोपत्री व्यवस्था आणणार, तिचा केंद्रबिंदूच अनामिक राहणार? याच मुद्दय़ावरून निवडणूक आयोगाने मे २०१७मध्ये आक्षेप घेतला होता. रोखे खरेदीचा व्यवहार गोपनीय ठेवण्याची मुभाही खरेदीदाराला आहे. मग यात पारदर्शकता ती काय राहिली? नागरिक आणि मतदारांना निवडणूक प्रक्रियेसंबंधी- राजकीय उमेदवारांची पाश्र्वभूमी, त्यांची आर्थिक स्थिती, त्यांना दिल्या जाणाऱ्या देणग्यांचा तपशील – पूर्ण माहिती मिळण्याचा अधिकार घटनादत्त आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीही स्पष्ट केले होते.  मात्र मतदारांना राजकीय पक्षांच्या देणगीदारांविषयी आणि देणग्यांविषयी काहीही ठाऊक असण्याची गरज नाही, असा काहीसा उद्दाम युक्तिवाद महान्यायवादी (अ‍ॅटर्नी जनरल) के. के. वेणुगोपाळ यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर केला. त्याच्या समर्थनार्थ वेणुगोपाळ यांनी गोपनीयतेच्या हक्काचा (राइट टू प्रायव्हसी) मुद्दा उपस्थित केला. शिवाय देणगीदाराचे नाव जाहीर झाल्यास आणि त्याने देणगी दिलेला पक्ष निवडणुकीनंतर सत्तेवर न आल्यास, अशा व्यक्तीची किंवा उद्योजकाची त्याने देणगी न दिलेल्या आणि सत्तेवर आलेल्या पक्षाकडून नाकेबंदी होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. वास्तविक स्टेट बँकेसारख्या सरकारी बँकेकडे निवडणूक रोख्यांच्या व्यवहाराचा मक्ता असल्यामुळे देणगीदाराची माहिती सरकारला तरी विविध भल्याबुऱ्या मार्गानी उपलब्ध होणारच आहे. मग अनामिक देणगीदाराविषयी इतका आग्रह कशासाठी, असा प्रश्ननिर्माण होतोच.

या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे राजकीय पक्षांना दिल्या जाणाऱ्या राजकीय देणग्यांचा कळीचा मुद्दा. अमेरिकेसारख्या प्रगत लोकशाही देशांमध्ये उद्योगपतींमार्फत दिल्या जाणाऱ्या मोठाल्या देणगीभोजनांमधून राजकीय पक्षांना जाहीर मदत करण्याची परंपरा आहे. तिथे मुळात पक्षच कमी असल्यामुळे विशिष्ट पक्षाशी बांधिलकी असणे आणि ती जाहीर करणे याला समाजमान्यता आणि राजमान्यता असते. भारतीय लोकशाही अजून तितकी परिपक्व बनलेली नाही. ती तशी होत नाही, तोवर राजकीय पक्षांना दिल्या जाणाऱ्या देणग्यांविषयी काहीतरी स्वीकारार्ह मध्यममार्ग शोधणे आवश्यक आहे. या मुद्दय़ावर न्यायालयच नव्हे, तर निवडणूक आयोग, राजकीय पक्ष, उद्योग क्षेत्र, विश्लेषक, विचारवंत अशा सर्वानी अधिक खोलात जाऊन विचार करणे आवश्यक आहे.

julian-assange-wont-be-given-special-treatment-australian-prime-minister-1876030/

असांजचे काय होणार?


1333   15-Apr-2019, Mon

‘‘त्याला अशा पद्धतीने खेचत नेणे योग्य नव्हते. मी ७४ आणि तो ४७ वर्षांचा आहे. पण, मी त्याच्यापेक्षा चांगला दिसतो. त्याला असे पाहणे अतिशय धक्कादायक आहे’’, जॉन शिप्टन हताशपणे माध्यमांशी बोलत होते. अमेरिकेसह अनेक देशांची गुपिते फोडणारा सायबरयोद्धा ज्युलियन असांजचे ते वडील. परदेशात अटकेत असलेला आपला मुलगा मायदेशी परतावा, अशी कोणत्याही पित्याप्रमाणे त्यांचीही इच्छा. तशी मागणीही त्यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्याकडे केली. मात्र, अद्याप तरी त्यांनी तसे आश्वासन दिले नाही. कारण असांजचे काय होणार, हे कोणालाही छातीठोकपणे सांगता येणे अवघड बनले आहे.

गेल्या आठवडय़ात इक्वेडोरच्या ब्रिटनमधील दूतावासातून असांजला अटक करण्यात आल्यानंतर या साऱ्या घडामोडींचे माध्यमांनी वेगवेगळे अन्वयार्थ लावले आहेत. इक्वेडोरने आपल्या लंडनमधील दूतावासात असांजला सात वर्षे आश्रय दिला. मग, आता आश्रय संपुष्टात आणण्यामागे नेमके काय कारण असेल, असा प्रश्न कोणालाही पडणे स्वाभाविकच. ‘व्हाय डीड इक्वेडोर गिव्ह अप असांज आफ्टर सेव्हन इयर्स’ या शीर्षकाच्या लेखात ‘सीएनएन’ने काही उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात निवासाच्या नियमभंगाबरोबरच अनेक कारणांचा उल्लेख आहे. ‘कॅटलान स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा देऊन असांजने इक्वेडोरचा रोष ओढवून घेतला होता. स्पेनसह इतर देशांसोबतचे संबंध बिघडतील, असे वर्तन न करण्याची ताकीद इक्वेडोरने दिली होती. त्यातच २५ मार्च रोजी ‘विकिलीक्स’ने इक्वेडोरचे अध्यक्ष लेनिन मोरेने यांच्याविरोधातील भ्रष्टाचार प्रकरणाबाबत ट्वीट केले. दूतावासात इक्वेडोरकडून असांजवर हेरगिरी करण्यात येत असल्याचा दावा ‘विकिलीक्स’ने केला आणि हे संबंध विकोपाला गेले’, असे या लेखात म्हटले आहे.

माध्यम स्वातंत्र्याचा नायक म्हणून ज्युलियन असांजचे जगभर समर्थक आहेत. मात्र, असांज हा माध्यम स्वातंत्र्याचा नायक नाही, असे मत ‘द वॉशिंग्टन पोस्ट’मधील एका लेखात नोंदवण्यात आले आहे. ‘न्यू यॉर्क टाइम्स’मधील लेखात मात्र वेगळा सूर लावण्यात आला आहे. ‘असांज हा पारंपरिक दृष्टिकोनातून पत्रकार नाही. मात्र, जनहितासाठी गुप्त माहिती फोडण्याचे ‘न्यू यॉर्क टाइम्स’सारखी वृत्तपत्रे करत असलेले काम आणि ‘विकिलीक्स’चे काम यांना कायदेशीरदृष्टय़ा वेगळी मोजपट्टी लावणे कठीण आहे’, याकडे हा लेख लक्ष वेधतो.

दुसरीकडे काही अमेरिकी माध्यमे असांजला रशियाशी जोडू पाहतात. असांजसोबत जे व्हायला हवे होते तेच झाले, असे ‘द अटलांटिक’च्या संकेतस्थळावरील एका लेखात म्हटले आहे. ‘असांजचे रशियाच्या हॅकरशी आणि तेथील गुप्तचर संस्थेशी संबंध आहेत. असांजला इक्वेडोरच्या दूतावासातून बाहेर काढून रशियात आश्रय देण्याचा कट रचण्यात येत होता’, असा दावाही या लेखात करण्यात आला आहे. असांजच्या अटकेची चित्रफीत रशियाशी संबंधित वृत्तसंस्थेलाच कशी मिळाली, असा सवालही केला जाऊ लागला आहे.

असांजला अमेरिकेकडे प्रत्यार्पण करण्याच्या खटल्याला सामोरे जावे लागणार आहे. मात्र, ही प्रक्रिया मोठी आणि किचकट आहे, असे ‘न्यू यॉर्क टाइम्स’च्या एका लेखात म्हटले आहे. ‘इराक आणि अफगाणिस्तानातील अत्याचाराचे पुरावे उघड करणाऱ्या असांजचे अमेरिकेकडे प्रत्यार्पण ब्रिटन सरकारने रोखले पाहिजे’, या ब्रिटनच्या मजूर पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बिन यांच्या ट्वीटचा दाखला देत या लेखात प्रत्यार्पणातील अडथळे दाखवण्यात आले आहेत. हा खटला लढण्यासाठी असांजने ब्रिटनसह अमेरिकेतील नावाजलेल्या वकिलांचे एक पथक नेमले असून, त्यासाठी कोटय़वधी पौंड खर्च करण्यात येणार असल्याचे वृत्त ब्रिटनच्या ‘डेली मेल’ने दिले आहे. असांजविरोधातील प्रत्यार्पणाचा खटला किमान दोन वर्षे चालेल, असा अंदाज वर्तवत ‘सिडनी मॉर्निग हेराल्ड’ने ‘व्हॉट हॅपन्स नेक्स्ट’ या शीर्षकाखाली या प्रकरणाचा सविस्तर घटनाक्रम दिला आहे.

असांजने स्वीडनमध्ये दोन तरुणींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. मात्र, राजकीय खेळात महिलांच्या हक्कांना नेहमीच दुय्यम स्थान मिळते, असे निरीक्षण ‘द गार्डियन’च्या एका लेखात नोंदवण्यात आले आहे. ‘असांजचे अमेरिकेकडे प्रत्यार्पण करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन देताना ब्रिटनच्या काही लोकप्रतिनिधींनी स्वीडनचा उल्लेखही केला नाही. असांजला अटक करण्याच्या कारवाईआधी स्वीडनला माहितीही देण्यात आलेली नाही, याकडे हा लेख लक्ष वेधतो.

private-sector-experts-in-central-government-services-1876031/

खासगी ‘प्रधान’ सेवक


361   15-Apr-2019, Mon

खासगी क्षेत्रांतील तज्ज्ञांना थेट सरकारी सेवेत सहसचिव म्हणून नियुक्त करण्याचा मोदी सरकारचा निर्णय अभिनंदनीय आहे..

खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांना केंद्र सरकारी सेवेत थेट भरती करणे ही काळाची गरज होती आणि ती ओळखून पावले टाकल्याबद्दल नरेंद्र मोदी सरकारचे अभिनंदन. अशा प्रकारे विविध क्षेत्रांत सेवेत असणाऱ्या नऊ जणांना सहसचिव पदावर नेमण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून महिनाभरात हे अधिकारी केंद्रीय सेवेत रुजू होतील. सरकारी सेवेतील विविध अशी १० पदे खासगी नियुक्तीसाठी खुली करण्यात आली होती. त्यासाठी सहा हजारांहून अधिक अर्ज आले. त्यातून या नऊ जणांची नियुक्ती केली गेली. आतापर्यंत ही सहसचिव दर्जाची पदे भारतीय प्रशासकीय सेवेतून, म्हणजे आयएएस, निवडून आलेल्यांसाठीच खुली होती. ती खासगी क्षेत्रासाठीही खुली करावीत अशा प्रकारची चर्चा गेली काही वर्षे आपल्याकडे सुरू आहे. गतसाली निती आयोगाने या संदर्भात काही ठोस प्रक्रिया ठरवली आणि आता त्यानुसार ही पदे भरली गेली. कोणकोणत्या पदांवर कोणाकोणाच्या नियुक्त्या केल्या गेल्या त्याचा तपशील जाहीर झालाच आहे. त्याच्या पुनरुक्तीची गरज नाही. गरज आहे ती या निर्णयाचे महत्त्व अधोरेखित करण्याची. त्याची प्रमुख कारणे दोन.

पहिले म्हणजे खासगी क्षेत्रातील गुणवत्ता, कार्यक्षमता यांची सांगड सरकारी गरजांशी घालणे. आपल्याकडे अजूनही या प्रशासकीय सेवेचे महत्त्व कमी झालेले नाही. आजही ही परीक्षा देणाऱ्यांची संख्या पाहिली तरी ही बाब स्पष्ट होईल. तीत गुणवत्ता यादीत येणारे हे आयआयटी वा आयआयएम अशा उच्च मानांकित संस्थांचे विद्यार्थी असतात. या मंडळींना खासगी क्षेत्रात गलेलठ्ठ वेतनावर नेमणुका मिळू शकतात. मिळतातही. तरीही या विद्यार्थ्यांना सरकारी सेवेची ओढ असते. याचे कारण या सेवेद्वारे व्यापक जनहित साधता येण्याची शक्यता. ती आपल्याकडे अजूनही कमी झालेली नाही. ही बाब आपले तिसऱ्या जगातील अस्तित्व दाखवून देणारी ठरते. पुरेशा प्रशासकीय सुधारणांअभावी एकविसाव्या शतकातही आपल्याकडे सरकारी अधिकाऱ्यांहाती अतोनात अधिकार आहेत. त्यामुळे या सेवेचे आकर्षण अजूनही कायम आहे.

पण तरीही या सेवांत सहभागी होण्याची संधी तितक्या सहजपणे उपलब्ध नाही. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या प्रशासकीय सेवा परीक्षा हा एकमेव मार्ग. त्याच्याही काही मर्यादा आहेत. त्यामुळे त्या परीक्षांचा दर्जा उत्तम असला तरी अनेकांना काही ना काही कारणाने हा मार्ग स्वीकारता येत नाही वा तो चुकतो. त्यामुळे त्यांना सरकारी सेवेचे दरवाजे कायमचे बंद होतात. ते उघडण्याची लवचीकता आपल्याकडे नव्हती. ती पहिल्यांदा राजीव गांधी यांनी दाखवली. त्यांच्या काळात सॅम पित्रोदा यांच्यासारख्यास दूरसंचार खात्यात सल्लागार म्हणून नेमले गेले. क्षुद्र राजकीय कारणांसाठी पित्रोदा हे आता एका वर्गाच्या टीकेचा विषय झालेले असले तरी या देशातील दूरसंचार क्रांती त्यांच्यामुळे घडली हे अमान्य करता येणारे नाही. त्यावेळी राजीव गांधी हे देखील मध्यमवर्गाच्या टीकेचे धनी झाले. परंतु त्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान, दूरसंचार आदी क्षेत्रांस मोठी गती दिली. त्यासाठी पित्रोदा यांच्यासारख्यांना सरकारी सेवेत घेतले आणि स्वतंत्र दूरसंचार आयोगाची निर्मिती करून ते त्यांच्या हाती सोपवले. परंतु या अशा पद्धतीस संस्थात्मक व्यवस्था ते तयार करू शकले नाहीत. त्यामुळे असा खासगी सेवेतून सरकारी सेवेत येण्याचा मार्ग चिंचोळाच राहिला.

त्यावरून पुढे आलेली दुसरी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे नंदन नीलेकणी. इन्फोसिससारख्या संपूर्ण भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अत्यंत यशस्वी कंपनीचे ते संस्थापक. त्यांचे कार्य आणि गुणवत्ता यांचे महत्त्व पहिल्यांदा ओळखले मनमोहन सिंग यांनी. राजीव गांधी यांच्याप्रमाणे ते देखील काँग्रेसचेच. पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यावर सिंग यांनी त्यांच्याहाती आधार योजनेची सूत्रे दिली. आज आधार हा मोदी सरकारच्या मिरवण्याचा भाग असला तरी त्यावेळी त्यांनी या योजनेस विरोध केला होता, हा इतिहास. आधारचे प्रचंड महाजाल उभे राहिले ते नीलेकणी यांच्यासारख्यांमुळे. पुढे त्यांच्या सरकारातील अस्तित्वास राजमान्यता मिळावी यासाठी त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा आचरटपणा काँग्रेसने केला आणि नीलेकणी यांनीही त्यासाठी होकार दिला, ही बाब अलाहिदा. बंगळूरु दक्षिण मतदारसंघातून अनंतकुमार यांनी त्यांना पराभूत केले. म्हणजे अशा प्रकारची व्यक्ती निवडणुकीय राजकारणात अयोग्यच ठरते हे पुन्हा दिसून आले. वास्तविक आधारचे महत्त्व लक्षात घेता त्यावेळी भाजपने त्यांच्या विरोधात उमेदवार उभा केला नसता तर ते अधिक गौरवास्पद ठरले असते. परंतु अशा प्रकारच्या उदारमतवादाची अपेक्षा आपल्याकडे कोणत्याच राजकीय पक्षाकडून करता येणार नाही. तथापि त्यावेळी आधारला विरोध करणाऱ्या भाजपने नीलेकणी यांचा आधार घेतला आणि आधार योजना राबवली. त्यातून पुन्हा खासगी क्षेत्रास सरकारी सेवेत सामावून घेण्याची गरजच सिद्ध झाली.

ती पूर्ण करण्याचे दुसरे कारण म्हणजे नव्या व्यवस्थेची आवश्यकता. विद्यमान भारतीय प्रशासकीय सेवा जन्मास घातली ब्रिटिशांनी. त्या काळी दुय्यम अधिकारी नेटिव्ह असत आणि त्यांचे नेतृत्व करीत या सेवेतील गोरे. इंडियन सिव्हिल सव्‍‌र्हिस असे या सेवेचे नाव. स्वातंत्र्यानंतर या व्यवस्थेच्या पुनर्रचनेची गरज होती. त्याकडे लक्ष दिले गेले नाही. फक्त आयसीएस या नावात आयएएस असा बदल केला गेला. पण या प्रशासकीय अधिकाऱ्यांची व्यवस्थेवरील पकड ब्रिटिशांसारखीच कायम राहिली. उलट ती अधिकच घट्ट झाली. राजकीय पक्ष येतात/जातात. पण हे सरकारी अधिकारी कायम असतात. ते तसेच असायला हवे हे मान्य. परंतु अशक्त राजकीय नेत्यांमुळे या अधिकाऱ्यांनाच महत्त्व प्राप्त होते. सरकारी नियमांच्या जंजाळातून राजकीय नेत्यास अलगद बाहेर काढण्यासाठी त्यांना या अधिकाऱ्यांवरच अवलंबून राहावे लागते. म्हणून या अधिकाऱ्यांचेच महत्त्व वाढते. लोकशाही व्यवस्थेचा हा वास्तविक तिसरा स्तंभ. पण तो राजकीय स्तंभाचा आधार होण्यातच धन्यता मानू लागला. परिणामी राजकारण्यांच्या भ्रष्टाचारापेक्षा या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार वा त्यांची भ्रष्टाचार क्षमता हा अधिक चिंतेचा विषय. या अधिकाऱ्यांनी संघटना बांधून आपापल्या हितसंबंधांची बेगमी केली. यातून ही मंडळी इतकी निर्ढावली की सरकारी सेवाकाळात खासगी क्षेत्राशी संधान बांधून निवृत्त्योत्तर चाकरीची व्यवस्था त्यांच्याकडून सर्रास होऊ लागली.

हे मोडायचे तर त्यासाठी दोन उपायांची गरज होती आणि आहे. एक म्हणजे खासगी क्षेत्रातील कार्यक्षमांना सरकारी सेवेत सामावून घेण्याचा मार्ग शोधणे. आणि दुसरे म्हणजे प्रशासकीय सुधारणा. शास्त्रीय विचार करता यातील दुसऱ्याची व्यवस्था झाल्यानंतरच पहिल्याचा अंगीकार करणे आवश्यक होते. परंतु या सुधारणांची आपल्याकडे सुरुवात देखील झालेली नाही आणि राजकीय पक्षांचा लोकानुनयाचा कल पाहता ती होणारही नाही. या सुधारणा करणे म्हणजे अधिकारांचे विकेंद्रीकरण. ते करण्याची मानसिकता आपल्या राजकारण्यांची नाही. त्यामुळे स्वत:च्या अधिकारांच्या विकेंद्रीकरणापेक्षा त्यांनी अधिकाऱ्यांच्या अधिकार विकेंद्रीकरणाचा मार्ग निवडला आणि ते खासगी क्षेत्रास खुले केले. हा सर्वोत्तम मार्ग नाही. पण सर्वोत्तमानंतरचा दुसरा चांगला पर्याय मात्र नक्कीच आहे. तो स्वीकारला म्हणून मोदी सरकारचे अभिनंदन. हा मार्ग आता काही एक पद्धतीने शास्त्रीय तसेच अधिक रुंद व्हायला हवा.

how-does-google-search-engine-work-1876033/

‘गुगल सर्च’चे अंतरंग


1494   15-Apr-2019, Mon

गुगलचा वापर सगळेच करतात. त्याचे सर्च इंजिन नक्की कसे काम करते, हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. काही दशकांपूर्वी, खासकरून परीक्षांच्या हंगामात सर्रास आढळून येणारे दृश्य म्हणजे शाळा-कॉलेजची लायब्ररी, टेबलावर पुस्तकांचा ढीग, अभ्यासू मुले, त्यांचे तासन्तास बसून वाचन, नोट्स काढणे चाललंय. शोधनिबंध लिहायचा म्हटला तर बघायलाच नको, अगदी गट करून मग लायब्रऱ्या, वर्तमानपत्रांतील कात्रणे, बरीच दगदग करून मिळविलेली एखाद्या तज्ज्ञ, प्राध्यापक किंवा शास्त्रज्ञाची भेट व मुलाखत असे बरेचशे ‘भौतिक’ व्यवहार पार पाडत शेवटी काही पानांचा तो ‘रिसर्च पेपर’ मग शैक्षणिक प्रकल्प म्हणून सादर केला जायचा आणि परीक्षा झाल्यावर नकळतपणे तोच ‘कागदी रिपोर्ट’ घरच्या किंवा कॉलेजच्या कुठल्या तरी कपाटात धूळ खात पडून राहायचा. तीच परिस्थिती व्यावसायिक तज्ज्ञ, प्राध्यापक, शास्त्रज्ञ वा कॉर्पोरेट्स यांची. त्यांचे ज्ञान फक्त त्यांच्या व्यावसायिक परिघापर्यंत मर्यादित राहायचे. छापील वृत्तपत्रे, मासिके व अर्थातच पुस्तकांमधून विद्येचा प्रसार सुरूच होता वा आहे म्हणा. पण उपलब्धता, आर्थिक गणित, विशेषाधिकार असल्या मर्यादांमुळे जनसामान्यांच्या नशिबाला जगातील उपलब्ध माहिती-ज्ञान-विज्ञान नक्कीच नव्हते. ‘डिजिटल’ विश्वाची निर्मिती व प्रसार झाल्यापासून वरील परिस्थिती आमूलाग्र बदलली. बरीच जुनी व नवीन माहिती ‘डिजिटल’ स्वरूपात आज उपलब्ध होते आणि त्यात प्रचंड प्रमाणात भर पडलीय ती समाज माध्यमांचा उदय झाल्यापासून सामान्यांनी निर्माण केलेल्या माहितीने. कोणीही ज्ञान द्यावे- ज्याला हवे त्याने ते घ्यावे. यालाच म्हणतात ‘इन्फॉर्मेशन डेमोकट्राझेशन’ म्हणजे ‘माहितीचे लोकशाहीकरण’. पण इंटरनेटवर उपलब्ध असलेली सर्व माहिती सहजासहजी, अचूकपणे व हवी तेव्हा शोधताच नाही आली तर?

‘जस्ट गुगल’, ‘गुगल कर’ म्हणजेच इंटरनेटवर शोध घे अशी वाक्ये हल्ली सर्रास वापरली जातात. ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीने २००६ मध्ये गुगल शब्दाला आपल्या अधिकृत शब्दकोशात स्थान दिले आणि एक ‘सर्च इंजिन’ संज्ञेवरून त्यांचा एका क्रियापदापर्यंतचा आश्चर्यकारक प्रवास पूर्ण झाला. इतर कंपन्यादेखील आहेतच सर्च इंजिन व्यवसायात- जसे मायक्रोसॉफ्ट बिंग, चीनमधील बैदु वगैरे. पण नक्की काय आहे इंटरनेट सर्च? क्लिक केल्याक्षणी क्षणार्धात विषयाशी संबंधित लिंक्स कशा काय सादर होतात? पेड जाहिराती, डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? आणि या सगळ्यात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ कोठून आली? या मागील विज्ञान आपण जाणून घेऊ  या लेखात ‘गुगल सर्च’चे उदाहरण घेऊन.

संपूर्ण इंटरनेट जर कागदावर छापायचं ठरवलं तर कमीतकमी १३६ अब्ज ‘ए ४’ आकाराची पाने लागतील. हादेखील २०१५चा ‘विकिपीडिया’वर आधारित अहवाल. असे म्हणतात की प्रत्येक मिनिटात इंटरनेटवर सरासरी ३०० ते ५०० नवीन वेब-पेजेस निर्माण केली जातायेत. हा फक्त २० टक्के डेटा झाला. उर्वरित ८० टक्के व्हिडीओ, फोटो, ऑडिओ क्लिप्स इत्यादी. फक्त ‘इंटरनेट मिनट्स’ म्हणून सर्च केलंत तर तुम्हाला एका मिनिटाला इंटरनेट जगात काय काय घडते याचा सविस्तर आलेख बघायला मिळतो. त्यात गुगल वापरून एका मिनिटात सरासरी ३८ लाख सर्च होतात. तसेच फेसबुकवर अडीच लाख नवीन फोटो, यूटय़ूबवर ४०० तासांचे नवीन व्हिडीओ, १५०० लाख ईमेल वगैरे.

गुगलने सुरुवात केली १९९७ मध्ये. तेव्हा इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या वेब पेजेसमधील ‘टेक्स्ट’ स्वरूपातील माहितीच फक्त शोधता यायची. २०११ मध्ये त्यात अनेक सुधारणा होऊन ‘व्हॉइस’ सर्च फीचर आले. मग २०१६ पासून ‘डीप नुएरल नेटवर्क्‍स’ नावाची अद्ययावत एआय प्रणाली त्यात समाविष्ट केली गेली, ज्यामुळे नॅचरल लँग्वेज स्वरूपातील माहिती, व्हिडीओ, फोटो, ऑडिओ आणि सर्च संबधित ‘संदर्भ’देखील सर्चच्या कक्षेत आणले गेले. आता बघू सर्च इंजिन नक्की कसे काम करते आणि त्याविषयी विविध संकल्पना.

१) वेब-क्रॉलिंग : सर्वप्रथम गुगलचे ‘स्पायडर्स’ नामक रोबोटिक सॉफ्टवेअर प्रोग्राम्स सतत इंटरनेटवरील नवनवीन माहितीचा शोध घेत राहतात. नवीन वेबसाइट्स, वेब-पेजेस, मजकूर, टाइटल्स, कीवर्ड्स, टॅग्स, नेव्हिगेशन थोडक्यात तुमची सर्व माहिती व हा मजकूर कोणाला उपयुक्त होईल याबद्दल माहिती त्यांच्या ‘डेटाबेस’मध्ये साठवली जाते.

२) माहितीचे सादरीकरण : पुढची पायरी वापरकर्त्यांने टाइप केलेली सर्चसंबंधित माहिती, वरील ‘डेटाबेस’मध्ये शोधणे व योग्य प्रकारे सादर करणे. यात सध्या पाच प्रकारची माहिती आपल्याला एकाच स्क्रीनमध्ये दाखविली जाते. १) गुगल सर्च-बारच्या बरोबर खाली असतात ‘पेड’ जाहिराती. २) त्या खाली असते ‘ओर्गेनिक’ म्हणजे सामान्य माहिती. ३) त्याखाली असतात सर्चसंबंधित बातम्या, व्हिडीओ लिंक्स इत्यादी. ४) शेवटी असतात सर्चसंबंधित समाज माध्यमांवरील लिंक्स. ५) हल्ली स्क्रीनच्या उजवीकडे ‘नॉलेज ग्राफ’ नामक सर्चसंबंधित माहिती येऊ  लागलीय. उदाहरणार्थ समजा मी सर्च केले ‘गोवा’ तर ‘नॉलेज ग्राफ’मध्ये गोव्याची राजधानी, मॅप, फोटो, प्रवास मार्गदर्शन, प्रमुख स्थळे अशी माहिती दिसते.

३) पेज-रँक : माहिती सादरीकरणासाठी वरील ‘डेटाबेस’मधून समजा सर्चसंबंधित चाळीस वेबसाइटस गुगलला योग्य वाटल्या तरी त्यांची एका ओळीत कुठल्या क्रमाने वा नियमानुसार मांडणी करायची? पेज-रँक नियमावलीमध्ये त्या चाळीस वेबसाइट्सना याआधी किती क्लिक्स मिळाल्या, कोणाकडून व कुठल्या साइट्सवरून मिळाल्या त्यावरून त्या केलेल्या सर्चशी किती योग्यप्रकारे संबंधित असाव्यात याचे मूल्यांकन केले जाते. त्यावरून त्यांना १ ते ४० असा ‘रीयल-टाइम’ रँक दिला जातो आणि त्याच रँकनुसार सर्च निकाल क्रमाने सादर केले जातात, ज्याला नाव पडलेय ‘एसईआरपी’- सर्च इंजिन रिझल्ट्स पेज. वेबसाइट सर्वात वरच्या क्रमात दिसावी म्हणून त्यात योग्य प्रकारे टायटल्स, कीवर्ड्स, टॅग्स वापरणे वा बदलणे या कामाला ‘एसईओ’- ‘सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन’ म्हणतात.

४) पेड जाहिराती व डिजिटल मार्केटिंग : गुगलचा जवळजवळ नव्वद टक्के महसूल ‘पेड’ जाहिरातींमधून येतो. आपण काही सर्च करावे, उदाहरणार्थ ‘केस गळण्यावरती उपाय’ आणि बरेच दिवस आपल्या वेब ब्राऊजर, ईमेल विण्डोमध्ये, इतर वेबसाइट्सच्या आत सतत केस गळण्यावरती औषधे, क्लिनिक्स, हेयर-ट्रान्सप्लांट ट्रीटमेंट वगैरे जाहिरातींचा भडिमार आपण अनुभवलाच असेल. हल्लीच्या डिजिटल युगात गमतीने एक म्हण पडलीय, ‘तुम्हाला एखादी सेवा जर विनामूल्य दिली जात असेल नक्कीच समजा की तुम्ही त्या कंपनीचे ग्राहक नसून त्यांचे प्रॉडक्ट आहात’!

५) रँक-ब्रेन अल्गॉरिथम : २०१६ पासून ‘डीप नुएरल नेटवर्क्‍स’ नावाची अद्ययावत कृत्रिम बुद्धिमत्ता वापरात आणून गुगलने ‘सर्च’ अतिशय वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवलाय म्हणायला हरकत नाही. यापूर्वी सर्च रिझल्ट्स सादर करण्यासाठी वरील बघितल्याप्रमाणे रँकिंग वापरले जायचे, ज्यात वेबसाइटचा मजकूर आणि मिळालेले क्लिक्स इथपर्यंतच मजल होती. सर्चसंबंधित संदर्भ, मागचा इतिहास, एखादा सर्च का केला जातोय, कोण करतोय, पूर्वी काय सर्च केले होते जे या विषयाशी निगडित आहे? असे काही शास्त्र नव्हते.

‘विचारण्याआधीच’ पुढे ‘काय विचारू शकेल’ किंवा ‘खरेच काय विचारायचे असावे’ याचा अंदाज व त्यानुसार उत्तरे, अशी जबरदस्त क्षमता रँक-ब्रेन नामक एआय अल्गॉरिथममुळे गुगल सर्चमध्ये आणली गेलीय. एक उदाहरण घेऊ  या. समजा तुम्ही ‘इंजिनीअरचे वार्षिक वेतन’ असे सर्च केले तरी गुगल तुमच्या आयपी लोकेशनवरून तुम्ही पुण्यात राहता, तुम्ही कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग पुणेमध्ये शिकताय किंवा शिकविताय. कारण तुम्ही त्या कॅम्पसला रोज ये-जा करता जे गुगल मॅपला माहीत असणार. अधिक गुगलला तुम्ही कॉम्प्युटर शाखेला असावेत असे वाटते, कारण तुम्ही सॉफ्टवेअरबद्दल बरीच माहिती सर्च करता, बातम्या वाचता, पुस्तके मागवता, वगैरे बरीच वैयक्तिक माहिती रीयल टाइम मिळवली जाते. अक्षरश: तुमची ‘कुंडली’ काढल्यासारखी. मग त्यावर योग्य व सूचक उत्तर म्हणून न विचारताही सर्च रिझल्ट्समध्ये तुम्हाला ‘पुण्यातील कॉम्प्युटर इंजिनीअरचे ‘वार्षिक सरासरी वेतन’बद्दल माहिती दिसते. त्यासोबत तुमच्या सर्चसंब्ांधित सध्याची टॉप प्रश्नोत्तरे, व्हिडीओ लिंक्स, इतर बरीच माहिती जी तुम्ही पुढे विचारू शकाल असा गुगलला अंदाज आल्यामुळे आधीच सादर केली जाते.

एआयच्या (कृत्रिम प्रज्ञा) प्रमुख संकल्पनेप्रमाणे जितकी उदाहरणे वा वापर तितकीच जास्त स्वसुधारणा व लर्निग, म्हणजे कालांतराने सर्च प्रत्येक वापरासोबत अजून प्रगत, प्रगल्भ होत जाणार. आहे ना अफलातून संकल्पना. पण एक दिवस मनातलेदेखील सर्च नाही केले म्हणजे मिळवले.. नाही तर पंचाईत!

india-and-pakistan-by-prof-stanley-wolpert-jinnah-of-pakistan-book-author-1875285/

ग्रंथमानव : इतिहासलेखनाच्या अनवट वाटेवर..


3238   14-Apr-2019, Sun

लो. टिळक व ना. गोखले यांच्या तुलनात्मक अभ्यासाने आपल्या इतिहासलेखनाचा प्रारंभ करणारे, भारत-पाकिस्तानच्या इतिहासाचे अभ्यासक प्रा. स्टॅनले वोल्पर्ट यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्या लेखनाविषयचे हे टिपण..

भारत आणि पाकिस्तानच्या इतिहासाचे अभ्यासक प्रा. स्टॅनले वोल्पर्ट यांचे अलीकडेच (१९ फेब्रुवारी) निधन झाले. ते कॅलिफोर्निया विद्यापीठात इतिहास विषयाचे प्राध्यापक होते. भारतीय व पाकिस्तानी लोकनेत्यांचा चरित्रात्मक इतिहास त्यांनी लिहिला.

न्यू यॉर्कमध्ये १९२७च्या २३ डिसेंबर रोजी एक रशियन ज्यू कुटुंबात जन्मलेल्या वोल्पर्ट यांनी मरिन इंजिनीअिरगचे शिक्षण घेतले. या शिक्षणामुळे आपल्याला जगभर प्रवास करायला आणि वेगवेगळ्या देशांबद्दल लेखनही करायला मिळेल, अशी त्यांची धारणा होती. तसे झालेही. १९४७ ते १९५१ या काळात आशियाई, युरोपीय आणि लॅटिन अमेरिकी देशांचा प्रवास त्यांनी केला. या प्रवासात १९४८च्या फेब्रुवारीत त्यांचे जहाज मुंबई बंदरावर आले. योगायोग असा की, वोल्पर्ट मुंबई बंदरावर उतरले त्या दिवशी महात्मा गांधींची रक्षा विसर्जित करण्याचा कार्यक्रम सुरू होता. श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रचंड मोठय़ा संख्येने उपस्थित राहिलेल्या जनसमुदायाला पाहून त्यांना आश्चर्य वाटले. तोवर वोल्पर्ट यांनी म. गांधींबद्दल फारसे ऐकलेले नव्हते. त्यामुळे गांधीजींसाठी शोकाकुल झालेल्या सामान्य जनांच्या महासागराला पाहून त्यांना कुतूहल वाटले. त्याआधी त्यांनी असा जनसमुदाय कधीच पाहिलेला नव्हता. वोल्पर्ट भारतात जवळपास तीनेक महिने राहिले. या काळात त्यांनी भारताचा इतिहास आणि इथली संस्कृती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पुढे प्रवास संपवून ते १९५१ मध्ये अमेरिकेला परतले आणि त्यांनी मरिन इंजिनीअिरगचा व्यवसाय सोडून दिला. याचे कारण त्यांच्यात भारतीय इतिहासाबद्दल प्रचंड जिज्ञासा निर्माण झाली होती. त्यातून त्यांनी मग इतिहास अभ्यासण्याचा निर्णय घेतला. त्या काळात पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठात दक्षिण आशियाई देशांचा अभ्यास करण्यासाठीचे केंद्र स्थापन झाले होते. ‘भारतीय इतिहास’ या विषयात पदवी देणारे अमेरिकेमधील हे एकमेव अभ्यासकेंद्र होते. वोल्पर्ट तिथे दाखल झाले. भारतीय इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी संस्कृत आणि मराठी भाषाही शिकून घेतल्या.

वोल्पर्ट यांना आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये रुची निर्माण झाली होती. लोकमान्य टिळक आणि नामदार गोखले यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाने त्यांना आकर्षित केले होते. वोल्पर्ट यांनी आपल्या पीएच.डी. पदवीसाठी लो. टिळक आणि ना. गोखले यांच्या सामाजिक आणि राजकीय विचारांचा तुलनात्मक अभ्यास केला. यासाठी १९५७ साली वोल्पर्ट पुण्याला आले. त्यांनी टिळकांच्या ‘केसरी’ आणि ‘मराठा’ या वृत्तपत्रांचा सखोल अभ्यास केला. ना. गोखलेंच्या ‘सव्‍‌र्हण्ट्स ऑफ इंडिया सोसायटी’ची कागदपत्रे त्यांनी बारकाईने वाचली. वोल्पर्ट पुण्यामध्ये जवळपास एक वर्ष राहिले. टिळक व गोखले यांच्याबरोबर संबंध आलेल्या अनेकांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या. पुढे १९६२ मध्ये हाच पीएच.डी. प्रबंध वोल्पर्ट यांनी ग्रंथ स्वरूपात प्रकाशित केला. ब्रिटिश राजवटीला टिळक आणि गोखलेंनी वेगवेगळा प्रतिसाद का दिला, या प्रश्नाचा वेध घेण्याचा प्रयत्न त्यांनी या ग्रंथात केला आहे. हा ग्रंथ म्हणजे दुहेरी चरित्र लेखनाचा एक उत्कृष्ट नमुना ठरावा. वोल्पर्ट यांनी त्यात टिळकांनी क्रांती आणि गोखलेंनी सुधारणेसाठी कसे प्रयत्न केले होते, हे दाखवून दिले आहे. क्रांती आणि सुधारणा या दोन विचारधारांचे प्रतिनिधित्व करीत टिळक आणि गोखले यांनी भारताची राजकीय विचारधारा समृद्ध केली. वोल्पर्ट यांच्या मते, पुढील काळात म. गांधी यांनी क्रांती आणि सुधारणेच्या परस्परभिन्न परंपरांना एकत्रित आणले, तर जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचे एकत्व टिकवून ठेवले.

महापुरुषांच्या भावना, संवेदना आणि मानस त्यांच्या कार्यकर्तृत्वावर कसा परिणाम करीत असातात, या गोष्टीचा उलगडा करण्यात वोल्पर्ट यांना सुरुवातीपासूनच रुची होती. एखाद्या व्यक्तीच्या चरित्राचा अभ्यास करताना निर्माण होणाऱ्या आव्हानांची त्यांना पूर्ण जाणीव असायची. आपल्या अभ्यास पद्धतीचे वर्णन करताना त्यांनी व्यक्तीची निर्णायक भूमिका मान्य केली आहे. मात्र काळ व अवकाश व्यक्तीवर अनेक बंधने निर्माण करीत असतो, हेही त्यांना मान्य होते. थोर नेत्यांचा चरित्रात्मक इतिहास म्हणजे इतिहास केवळ त्यांनीच घडवला हे सांगणे नसते, तर त्यांच्या विचार-कृतीवर परिस्थिती आणि विविध सामाजिक संस्थांचा प्रभाव कसा पडतो, हेही सांगणे आवश्यक असते.

वास्तविक एखाद्या महापुरुषाने आपल्या जीवनातील प्रसंगांना दिलेला प्रतिसाद कशा प्रकारे तर्कसंगत होता, हे सांगण्यावर इतिहासकारांचा भर असतो. व्यक्तीच्या भावना, संवेदना, आवेश आणि वासना यांनी तिच्या कृतीवर कसा परिणाम केला, या प्रश्नाला इतिहासकार फार महत्त्व देत नाहीत. तथापि, इतिहासकाराला याची जाणीव असते की, व्यक्तीने आपल्या जीवनात केलेल्या अनेक गोष्टी या तर्कविसंगत असतात. व्यक्तीच्या अहंभाव व भावनिक संवेदनांवर समाजामध्ये प्रचलित चालीरीती, रीतिरिवाज आणि परंपरा यांचा ठसा उमटत असतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या कृत्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी फक्त त्याच्या मानसिकतेचे अथवा तत्कालीन समाजाचे विश्लेषण करणे पुरेसे ठरत नाही. वोल्पर्ट यांच्या मते, या दोन्ही गोष्टी एकत्रित आणल्या तरच कोणत्याही महापुरुषाच्या जीवनाचा योग्य इतिहास लिहिला जाऊ शकतो. वोल्पर्ट यांनी हा मनोवैज्ञानिक दृष्टिकोन वापरलेला दिसतो. कॅलिफोर्निया विद्यापीठातील त्यांचे सहकारी आणि मनोविश्लेषणात्मक इतिहासकार पीटर लोवेनबर्ग यांच्या विचारांची त्यांच्यावर मोठी छाप होती.

लो. टिळक आणि ना. गोखले यांची कागदपत्रे वाचताना वोल्पर्ट यांना जॉन मोर्ले यांचा संदर्भ वारंवार आलेला दिसला. जॉन मोर्ले हे सन १९०५ ते १९१० या काळात ब्रिटिश प्रशासनात ‘भारत मंत्री’ या पदावर कार्यरत होते. वोल्पर्ट यांच्या लक्षात आले की, ना. गोखलेंनी आपल्या लिखाणात मोर्ले यांची नेहमीच स्तुती केली, तर लो. टिळकांनी मात्र त्यांच्यावर कडक टीका केली. भारताच्या दोन लोकप्रिय नेत्यांनी मोर्ले यांच्याबद्दल घेतलेल्या परस्परविरोधी भूमिकांमुळे वोल्पर्ट यांचे कुतूहल चाळवले. मग त्यांनी लंडन येथील इंडिया ऑफिस रेकॉर्ड्समधील मोर्लेशी संबंधित सर्व कागदपत्रे अभ्यासली. त्याचे फलित म्हणजे ‘मोर्ले अ‍ॅण्ड इंडिया, १९०६-१९१०’ हा १९६७ सालचा ग्रंथ!

वोल्पर्ट यांनी लिहिलेली महंमदअली जिना आणि जवाहरलाल नेहरू यांची चरित्रे वादग्रस्त ठरली. ‘जिना ऑफ पाकिस्तान’ (१९८४) या चरित्रावर पाकिस्तानचे तत्कालीन कट्टरपंथीय राष्ट्राध्यक्ष झिया उल हक यांनी बंदी घातली. वोल्पर्ट यांनी या पुस्तकात जिना यांना डुकराचे मांस आणि विदेशी मद्य प्रिय असल्याचा उल्लेख केला होता. त्यावर पाकिस्तानातील कट्टरपंथीयांनी आक्षेप घेतला. परंतु पुढे १९८९ साली बेनझीर भुत्तो यांनी या पुस्तकावरची बंदी उठवली. जिना यांच्यावर संशोधन करीत असताना वोल्पर्ट यांना झुल्फिकार अली भुत्तोंविषयीही कुतूहल निर्माण झाले. कराची येथे ठेवलेली झुल्फिकार अलींची कागदपत्रे वोल्पर्ट यांना अभ्यासण्यास बेनझीर भुत्तोंनी खुली केली. ती अभ्यासून वोल्पर्ट यांनी ‘झुल्फी भुत्तो ऑफ पाकिस्तान : हिज लाइफ अ‍ॅण्ड टाइम्स’ हे चरित्र १९९३ साली प्रसिद्ध केले.

वोल्पर्ट यांनी लिहिलेल्या नेहरू चरित्राचीही खूप चर्चा झाली. ‘नेहरू : अ ट्रीस्ट विथ डेस्टिनी’ (१९९६) हे ते चरित्र! या पुस्तकात त्यांनी काही विवादास्पद विधाने केली. नेहरू हे इंग्रजांचे प्रशंसक होते, इंग्लंडमध्ये शिकत असताना त्यांचे एका तरुणाबरोबर समलिंगी संबंध होते.. अशी कोणताही पुरावा नसलेली विधाने त्यांनी या पुस्तकात केली आहेत. नेहरू आणि एडविना माऊंटबॅटन यांच्या संबंधांविषयीही त्यांनी निराधार दावे केले होते. या वादग्रस्त विधानांमुळे हे पुस्तक काही काळ चर्चेचा विषय बनले. वोल्पर्ट यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले होते की, त्यांना नेहरू आणि एडविना यांच्यामधील पत्रव्यवहार वाचायला मिळाला नाही. वास्तविक या पत्रव्यवहाराच्या दोन पूर्ण प्रती अस्तित्वात होत्या. एक प्रत लॉर्ड माऊंटबॅटन यांचे नातू लॉर्ड रॉमसे यांच्याकडे व दुसरी प्रत सोनिया गांधींकडे होती. परंतु दोघांनीही वोल्पर्ट यांना पत्रे देण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे तो पत्रव्यवहार त्यांना अभ्यासता आला नाही.

वोल्पर्ट यांनी इतिहासलेखन केले तसे ऐतिहासिक कादंबऱ्याही लिहिल्या. त्यांची ‘नाइन आवर्स टु रामा’ (१९६२) ही कादंबरी बरीच वादग्रस्त ठरली. ३० जानेवारी, १९४८ रोजी नथुराम गोडसेने महात्मा गांधीजींची हत्या केली. ही कादंबरी या घटनेचा एक काल्पनिक वृत्तांत होता. कादंबरीत वोल्पर्ट यांनी नथुराम गोडसेसंबंधी अनेक काल्पनिक गोष्टींचा अंतर्भाव केल्याने भारत सरकारने या कादंबरीवरही बंदी घातली. पुढे १९७० मध्ये त्यांनी ‘अ‍ॅन एरर ऑफ जजमेंट’ ही जालियानवाला बाग हत्याकांडावर आधारित कादंबरी लिहिली होती.

सन १९९८ मध्ये वोल्पर्ट पुन्हा भारतात आले. ज्या दिवशी ते भारतामध्ये उतरले, त्याच दिवशी भारताने अणुचाचणी केली होती. भारत आणि पाकिस्तानमध्ये अणुचाचणीमुळे तणाव निर्माण झाला. अणुचाचणीस भारतातील कोणत्याही व्यक्तीने ठोस विरोध केला नसल्याचे पाहून वोल्पर्ट चकित झाले, कारण त्यांनी गांधीजींचा प्रभावही पाहिला होता आणि ही घटना गांधीजींच्या विचाराला पूर्णपणे विरोधाभास दर्शवणारी होती. त्यांनी भारतीय समाजात हा विरोधाभास का निर्माण झाला, या प्रश्नाचा शोध घेण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी गांधीजींच्या चरित्राचा सखोल अभ्यास केला. त्यातून ‘गांधीज् पॅशन : द लाइफ अ‍ॅण्ड द लीगसी ऑफ महात्मा गांधी’ हे पुस्तक लिहिले. २००३ साली ते प्रसिद्ध झाले. तसेच ‘शेमफूल फ्लाइट’ (२००६) हे भारताच्या फाळणीवरील किंवा ‘इंडिया अ‍ॅण्ड पाकिस्तान’ (२०१०) हे भारत-पाकिस्तान संबंधांवरचे वोल्पर्ट यांचे पुस्तक असो, इतिहासलेखनाची अनवट वाट चोखाळणारा इतिहासकार म्हणून ते नेहमीच स्मरणात राहतील.

100-years-of-jallianwala-bagh-massacre-book-on-jallianwala-bagh-1875290/

काही उत्तरे, नवे प्रश्न..


1057   14-Apr-2019, Sun

जालियनवाला बाग म्हटले की जे हत्याकांड आठवते, ते घडल्याला आजच्या बैसाखीला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. आज ती घटना आठवताना तीन पुस्तकांचा परिचय करून घेणे आवश्यक आहे.

पहिले पुस्तक तसे जुने आहे. निगेल कोलेट या एका माजी लष्करी अधिकाऱ्याने लिहिलेले. मदोन्मत्त, क्रूरकर्मा जनरल रेजिनाल्ड डायर याचे चरित्र : ‘द बुचर ऑफ अमृतसर’ (रूपा पब्लिकेशन्स, पृष्ठे- ६१२, किंमत- २९५ रुपये)!  हे पुस्तक जालियानवाला बाग समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

दुसरे पुस्तक आहे- गेल्या वर्षी उत्तरार्धात प्रसिद्ध झालेले. एका भारतीय महिला इतिहासकाराने लिहिलेले. नाटककार, कादंबरीकार किश्वर देसाई या अमृतसरला स्थापन झालेल्या ‘विभाजनविषयक संग्रहालया’च्या मुख्य विश्वस्त म्हणून इतिहासाच्या अभ्यासकांना बऱ्यापैकी ठाऊक आहेत. आपल्या आजीकडून ज्या दुर्घटनेबद्दलचे असंख्य हुंदके ऐकून आपण लहानाच्या मोठय़ा झालो आणि ज्या दहशतीच्या राज्याबद्दलचे करुणरौद्र मौन असंख्य आप्तेष्टांनी आपल्यापर्यंत पोचवले, त्याबद्दलची वस्तुस्थिती सगळ्यांना कळावी या हेतूने प्रेरित होऊन किश्वरजींनी लिहिलेले ‘जालियानवाला बाग, १९१९ : द रीअल स्टोरी’ (कॉन्टेक्स्ट/ वेस्टलॅण्ड बुक्स, पृष्ठे- २८६, किंमत- ६९९ रुपये)  हे पुस्तक अनेक अर्थानी वैशिष्टय़पूर्ण आहे.

तिसरे पुस्तक आहे- लंडनच्या क्वीन मेरी विद्यापीठात भारतीय इतिहासाचे अध्यापन करणाऱ्या किम ए. व्ॉग्नर यांनी लिहिलेले. व्ॉग्नर लिखित ‘जालियनवाला बाग’ या पुस्तकाचे उपशीर्षक आहे- ‘अ‍ॅन एम्पायर ऑफ फीअर अ‍ॅण्ड द मेकिंग ऑफ द अमृतसर मॅसॅकर’ (पेंग्विन/ व्हायकिंग, पृष्ठे- ३७२, किंमत- ५९९ रुपये)!

पहिल्या महायुद्धाच्या काळात भारतीयांनी ब्रिटनच्या युद्धमोहिमेला जे सहकार्य देऊ केले होते, त्याची जाणीव ठेवून ब्रिटिश राज्यकर्ते आपल्याला स्वराज्य देऊ करतील, निदान त्या दिशेने थोडी तरी पावले उचलतील, अशी भारतीय जनतेची अपेक्षा होती. परंत तिची दखल न घेता रौलट कायदा लागू करून ब्रिटिशांनी दडपशाहीचे धोरणच दामटायला सुरुवात केली. मग सरकारी धोरणाविरुद्ध जनतेचा असंतोष या ना त्या प्रकारे व्यक्त होऊ लागला.

तशाच एका निषेध सभेसाठी १३ एप्रिल १९१९ रोजी अमृतसरमध्ये लोक प्रचंड संख्येने जालियनवाला बागेत एकत्र जमले होते. शहरात लष्करी कायद्याचा अंमल होता, जमावबंदीचा हुकूम काढण्यात आला होता. तरीही लोक त्या सभेसाठी एकत्र जमले. योगायोगाने त्या दिवशी बैसाखीचा सण होता. त्या निमित्ताने अमृतसर शहरात यात्रेसाठी आलेले बाहेरगावचे स्त्री-पुरुषही त्या ठिकाणी मोठय़ा संख्येने जमले. त्या वेळी अमृतसर शहर ज्याच्या ताब्यात होते, त्या जनरल डायर या ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्याने त्या जमावाला कोणतीही पूर्वसूचना न देता अंदाधुंद गोळीबार केला. मैदानातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग अडवून तो गोळीबार करण्यात आला. लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावत सुटले. अनेकांनी मैदानातल्या विहिरीत उडय़ा टाकल्या. बायका-मुलांसह शेकडो लोकांची अशी विनाकारण हत्या करण्यात आली. असंख्य जखमींना कोणतीही वैद्यकीय मदत दिली गेली नाही. त्यानंतरही कित्येक दिवस लष्करी कायदा वापरून जनसामान्यांवर अत्याचार करण्यात आले.

पुढे या साऱ्या अत्याचारांना वाचा फुटली, तेव्हा सरकारने लॉर्ड हंटर यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनेसुद्धा समांतर चौकशी आरंभली. त्या दोन चौकशांमधून वेगवेगळी माहिती मांडली गेली. एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली, की जनरल डायरला -एका व्यक्तीला- दोषी ठरवून आपण नामानिराळे राहण्याची ब्रिटिश प्रशासनाची प्रवृत्ती बदलण्याची आशा व्यर्थ आहे. हंटर समितीसमोर साक्ष देताना खुद्द डायरने आपल्या निर्णयाचे व हिंसक कृत्याचे केलेले समर्थन आणि कालांतराने ब्रिटिश पार्लमेंटमध्ये झालेल्या चर्चेमध्ये विन्स्टन चर्चिलसारख्या नेत्यांनी घडवलेले साम्राज्यवादी मानसिकतेचे दर्शन अत्यंत स्पष्ट होते.

या घटनेच्या पाश्र्वभूमीपासून परिणामांपर्यंतचा विस्तृत पट नजरेसमोर आणल्यास वरील विवेचनात अनेक जागा मोकळ्याच सोडून दिलेल्या जाणवतील. त्या जागा भरण्याचे काम कोलेट- देसाई- व्ॉग्नर यांची पुस्तके करतात.

निगेल कोलेट यांचे पुस्तक जनरल डायरबद्दलच्या धक्कादायक तपशिलांनी भरलेले आहे. ब्रिटन आणि भारत या दोन्ही देशांमधील लष्करी अभिलेखागारांमधील असंख्य कागदपत्रे अभ्यासून, डायरच्या कुटुंबीयांच्या व अन्य सहकाऱ्यांच्या प्रदीर्घ मुलाखतीही घेऊन कोलेट यांनी हे चरित्र लिहिले. वरवर पाहता त्यांनी डायरची विधिनिषेधशून्य कत्तलखोर म्हणून निंदानालस्ती केली आहे. ‘बुचर’ असेच शीर्षकात स्पष्टपणे म्हटले आहे, पण बारकाईने वाचल्यानंतर हे स्पष्ट होते की डायरला व्यक्तिगत स्तरावर दोषी वा गुन्हेगार ठरवण्याऐवजी परिस्थितीलाच दोषी मानण्याकडे त्यांचा कल आहे. एक प्रकारे डायरचे मनोविश्लेषण करण्याचाच त्यांचा प्रयत्न आहे.

डायरचा जन्म भारतात मरी येथे झालेला. भारतीयांमध्येच तो वाढलेला. इंग्रजांपेक्षा तो भारतीयांमध्येच मिसळणारा. तोतरे बोलणाऱ्या आईमधले ते वैगुण्य आनुवंशिकतेमुळे त्याच्यातही आलेले. मद्यनिर्मितीच्या क्षेत्रात चांगले यश कमावणाऱ्या वडिलांकडून श्रमप्रतिष्ठेचा संस्कार मिळालेला आणि त्याचबरोबर उपयोजित गणित व दृष्टिशास्त्र याबद्दलचे कुतूहलजन्य प्रेमही वारशाने चालत आलेले. लहानपणापासूनच मानी, करारी, समोरच्या प्रतिस्पध्र्याशी चार हात करायला नेहमीच सज्ज राहण्याचा स्वभाव. ऐन किशोरवयात आई-वडिलांपासून दूर राहावे लागल्यामुळे काहीसा एकलकोंडा, एककल्ली झालेला.. असे तपशील देता देता त्याच्या हातून पुढे घडलेल्या दुष्कृत्याची स्वाभाविक वाटणारी पाश्र्वभूमी तयार करण्याचा कोलेट यांचा हेतू चाणाक्ष वाचकाच्या लक्षात आल्यावाचून राहत नाही.

डायरचे सॅण्डहर्स्टच्या लष्करी प्रशिक्षण केंद्रात असताना सैद्धांतिक अध्ययनापेक्षा प्रात्यक्षिकांमधील प्रावीण्य संपादनाकडे अधिक लक्ष होते. बंदुकीने गोळीबार करताना लांबवरचा लक्ष्यभेद नेमकेपणाने करता यावा म्हणून त्याने रेंजफाइंडरसारख्या उपकरणाचा शोध लावून त्याचे पेटंटसुद्धा मिळवले होते. ब्रह्मदेशापासून हाँगकाँगपर्यंत वेगवेगळ्या वसाहतींमध्ये कमी-अधिक कालावधीसाठी निरनिराळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर १९१५ च्या प्रारंभी डायरच्या रेजिमेंटची रावळपिंडीत नियुक्ती झाल्यामुळे त्याला आनंद झाला होता.

त्याच सुमारास पंजाबमध्ये ‘गदर’ पार्टीच्या प्रोत्साहनाने ‘क्रांतिकारकांचा सुळसुळाट’ झाला होता. युद्धकाळात त्या तशा कारवायांना पायबंद घालण्यासाठी ब्रिटिश प्रशासनाने योजलेल्या अनेक उपायांमुळे सर्वसामान्य जनतेत असंतोष पसरत चालला होता. जनतेच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करून तिला टप्प्याटप्प्याने तरी अधिकार प्रदान करण्याऐवजी ओडवायरसारखे पंजाबचे लेफ्टनंट गव्हर्नर रौलट कायद्यासारख्या जुलमी हत्याराचाच अवलंब करीत होते. आफ्रिकेतून मायदेशी परतलेले गांधी काँग्रेससारख्या संघटनेचे सदस्य झाले नसले, तरी सत्याग्रहासारखे अनोखे अस्त्र परजून अहिंसक मार्गाने ब्रिटिश सरकारकडून हक्क मिळवण्याच्या प्रयत्नात होते. डॉ. सैफुदिन किचलू आणि डॉ. सत्यपाल यांच्यासारखे स्थानिक नेते सत्याग्रहाच्या त्या मोहिमेत सहभागी झाल्यामुळे प्रशासनाच्या रोषाला पात्र ठरले होते. जनतेमधील असंतोष फक्त निदर्शनांपुरताच मर्यादित न राहता अमृतसर रेल्वे स्थानकावरचे व आजूबाजूचे रूळ उखडून टाकण्यापर्यंत आणि विजेच्या तारा तोडून प्रशासनाला एकटे पाडण्यापर्यंतही तो पोचला होता.

त्यामुळेच डायरने शहरात १९ ठिकाणी दवंडी पिटून जमावबंदीची सूचना दिली होती आणि तरीही जालियनवाला बागेत हजारो लोक सभेसाठी एकत्र जमल्याचे वृत्त समजल्यामुळे तो बिथरला. त्याने जमावाला धडा शिकवायचा निर्णय घेतला आणि गुरखा रेजिमेंटच्या व फ्राँटियर फोर्सच्या बरोबर असणाऱ्या सैनिकांना बागेत शिरून गोळीबार करण्याच्या पवित्र्यात उभे राहण्यास सांगितले. हवेत गोळीबार करून लोकांना पांगवण्याचा प्रयत्नसुद्धा त्याने केला नाही, कारण जमावबंदीचा आपला आदेश न जुमानणाऱ्यांना धडा शिकवण्याचाच त्याने अवघ्या तीन सेकंदांत निर्णय घेतला होता.

आधी प्रशासनाने हे सारे प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न केला, पण तो यशस्वी होणे कठीणच होते. प्रशासनाला आपली प्रतिष्ठा टिकवण्यासाठी चौकशी समिती नेमावीच लागली. त्या हंटर समितीसमोर साक्ष देताना डायरने बिनदिक्कतपणे त्या कृतीचे समर्थनच केले. तथापि, समितीने मृतांची संख्या ३७९ असल्याचे निश्चित केले व त्याची जबाबदारी डायरवर टाकून त्याची लष्करी चौकशी केली जावी, अशी शिफारस केली.

त्या चौकशीअंती डायरला दोषी मानण्यात आले. त्याला सैन्यातून बडतर्फ करण्यात येऊन कोणतेही आर्थिक लाभ दिले जाणार नाहीत, असेही निश्चित करण्यात आले. पुढे ब्रिटिश पार्लमेंटमध्येही यावर चर्चा झाली. ब्रिटनच्या अंतर्गत राजकारणातील पक्षोपपक्षांमधील सत्तास्पर्धेचेही प्रतिबिंब त्या चर्चेत पडले. परंतु एकंदर कल साम्राज्यवादी अभिनिवेशानेच प्रभावित झालेला होता.

कोलेट यांच्या या पुस्तकात अशा असंख्य लहान-मोठय़ा बाबींबद्दल तपशील आढळतात. त्यामुळे ‘द बुचर ऑफ अमृतसर’ लक्षवेधी आणि प्रभावी ठरले आहे. तथापि, हा सारा खटाटोप डायर हा बळीचा बकरा ठरवला गेल्याची भावना निर्माण करण्यासाठी तर नाही ना, असा संशय पुस्तक वाचताना वारंवार येतो.

किश्वर देसाई यांचे पुस्तक हे कोलेट यांच्या पुस्तकाच्या पाश्र्वभूमीवर भारतीय दृष्टिकोनातून लिहिलेले म्हणून अधिकच उठून दिसते. भारतीय संदर्भ साहित्याला त्यांनी अधिक प्रमाण मानले आहे. शिवाय डायरचे कृत्य हे एखाद् दुसऱ्या अधिकाऱ्याच्या हातून क्षणिक अविचारातून घडलेले कृत्य नव्हते, ते ब्रिटिश प्रशासनाच्या गुर्मीचे प्रातिनिधिक कृत्य होते, हे सिद्ध करण्याच्या हेतूने उपलब्ध पुराव्यांची त्यांनी तर्कशुद्ध पद्धतीने मांडणी केली आहे. महायुद्धकाळात रासबिहारी बोस यांच्या प्रयत्नांमुळे पंजाबमध्ये क्रांतिकारक उठावाला अनुकूल वातावरण कसे तयार झाले होते आणि त्याची चाहूल लागताच ब्रिटिश प्रशासनाने कशी दडपशाही आरंभली होती, याचे असंख्य पुरावे या पुस्तकामुळे अभ्यासकांना उपलब्ध झाले आहेत. ब्रिटिश अधिकाऱ्यांची ‘त्या’ घटनेपूर्वीची तयारी आणि बंदोबस्तासाठी विमानांचीसुद्धा मागवलेली कुमक तत्कालीन कागदपत्रांतून स्पष्ट होते. जनतेविरुद्ध युद्ध पुकारण्याची मन:स्थिती तयार झालेली असताना तिला चिरडण्याची संधी आपल्याला भाग्यानेच मिळते आहे, अशी भावना डायरच्या मनात कशी उद्भवली असेल आणि जालियनवाला बागेत हजारोंच्या संख्येने एकत्र आलेले नि:शस्त्र लोक ठार मारण्यात त्याला कसा आसुरी आनंद झाला असेल, याचे ‘अ गिफ्ट ऑफ फॉच्र्युन’ आणि ‘काऊंटिंग द कॉप्र्सेस’ या दोन प्रकरणांच्या ६५ पानांमध्ये केलेले विवेचन मुळातून वाचावे इतके महत्त्वपूर्ण आहे.

हत्याकांडानंतरच्या दडपशाहीचे वर्णन करणारे ‘द फॅन्सी पनिशमेंट्स’ हे ७५ पानी प्रकरण म्हणजे ब्रिटिश राज्य यंत्रणेच्या तथाकथित न्यायप्रियतेचे आणि विवेकबुद्धीचे काढलेले वाभाडे आहेत. ब्रिटिश प्रशासन सूड घ्यायला कसे उतावीळ झाले होते, हत्याकांडानंतरही पंजाबच्या ग्रामीण भागातून सैन्यभरती सुरूच राहावी म्हणून विमानांतून बॉम्बफेक करवून दहशत कशी माजवली जात होती, हेसुद्धा या प्रकरणात दाखवून देण्यात आले आहे. नंतरच्या प्रकरणात ब्रिटिश प्रशासन फक्त वंशवादी होते की फॅसिस्ट होते की दोन्ही अवगुणांचे धनी होते, असा प्रश्न उपस्थित करून त्याचा साधकबाधक ऊहापोह करण्यात आला आहे. ‘यू कॅन नॉट किल अ टायगर जंटली’ या समारोपाच्या प्रकरणात हत्याकांडाबद्दल ब्रिटिश पार्लमेंटमध्ये झालेल्या चर्चेचा आढावा आहे.

बाह्य़ स्वरूपात यत्किंचितही वाचकस्नेही नसलेले किम ए. व्ॉग्नर यांचे पुस्तक जालियनवाला बाग हत्याकांडाचे यथोचित आकलन होण्याच्या दृष्टीने ते अत्यंत महत्त्वाचे आहे. या घटनेच्या पाश्र्वभूमीबद्दल वा नंतरच्या घडामोडींबद्दल फारसे काही विवेचन करण्याच्या फंदात न पडता केवळ एप्रिल १९१९ मधील अमृतसरवरच लक्ष केंद्रित केल्याचे व जागतिक इतिहासातील एका महत्त्वाच्या घटनेकडे अतिसूक्ष्म दृष्टिकोनातून पाहण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी प्रस्तावनेत स्पष्ट केले आहे.

१८५७ साली झालेल्या सशस्त्र उठावाचे आव्हान मोडून काढण्यात त्या वेळी ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना जरी यश मिळाले होते, तरी या देशाची सूत्रे कंपनीकडून आपल्या हातात घेणाऱ्या ब्रिटिश राज्यकर्त्यांना त्या प्रकाराच्या पुनरावृत्तीची शक्यता पुढे कायमच भेडसावत राहिली होती. १९१९ मध्ये एका बाजूने महायुद्ध संपल्यानंतरचा थकवा वातावरणात जाणवू लागला होता, तर दुसऱ्या बाजूने हातात काहीही न पडल्यामुळे सामान्य भारतीयांच्या मनात असंतोष खदखदू लागला होता. त्या असंतोषाला रौलट कायद्याविरुद्ध सुरू झालेल्या सत्याग्रहामुळे वाढती धार प्राप्त होऊ लागली होती. कोणते तरी मोठे कटकारस्थान शिजते आहे अशा संशयाने पंजाबमधील सर्व प्रशासन कसे पछाडले होते. प्रशासनाला ‘सत्याग्रही’ म्हणजे बंडखोर सैनिकच कसे भासू लागले होते, गांधीजी किंवा लाला लजपतराय यांच्यासारख्या बडय़ा नेत्यांप्रमाणेच डॉ. किचलू-डॉ. सत्यपाल यांच्यासारखे स्थानिक नेतेसुद्धा बडय़ा कटाचे सूत्रधार असावेत अशी शंका येऊन प्रशासन दडपशाहीची योजना कशी अमलात आणत होते, याचे असंख्य तपशील व्ॉग्नर यांनी पुस्तकात दिले आहेत. प्रत्यक्ष हत्याकांडाचा दिवस उजाडण्यापूर्वीच्या घटना व त्यांच्यामागचे विविध संदर्भ उलगडून दाखवण्यासाठी त्यांनी केलेले तारीखवार विवेचन ‘सूक्ष्म इतिहास लेखना’चा वस्तुपाठ ठरावे, इतके प्रभावी झाले आहे.

जालियनवाला बागेतील हत्याकांडावरील या तिन्ही पुस्तकांमध्ये तेच तेच काही तपशील पुन:पुन्हा वाचावे लागतात; त्याला इलाज नाही. परंतु प्रत्येक पुस्तकात वेगळेसुद्धा बरेच काही सापडते. भावनांचा प्रक्षोभ होतो, तसेच बुद्धीला खाद्यही मिळते. विचारांना चालना मिळते. जुन्या प्रश्नांना उत्तरे सापडतात, तोच नवे प्रश्नही समोर उभे राहतात.

book-reviews-coming-out-as-dalit-by-yashica-dutt-1875284/

बुकबातमी : दलित जाणीवशोध


140   14-Apr-2019, Sun

याशिका दत्त यांचं ‘कमिंग आउट अ‍ॅज अ दलित’ हे पुस्तक २० फेब्रुवारीला, म्हणजे आंबेडकर जयंतीच्या सुमारे दोन महिने आधीच प्रकाशित झालं. या दोन महिन्यांत पुस्तकाला भरपूर प्रसिद्धी मिळालेली आहे. गांभीर्यानं भारतीय पुस्तकांकडे पाहणाऱ्या जवळपास साऱ्याच इंग्रजी वृत्तपत्रांनी, काही वृत्त-वाहिन्यांनी आणि वृत्त-संस्थळांनी या पुस्तकाची सकारात्मक दखल घेतली आहे. मात्र ‘दलित असल्याचं सांगायला एवढा उशीर? का बरं?’ अशी प्रतिक्रियाही उमटते आहे.. ‘प्रसारमाध्यमांचं तोंड नेहमी एकाच बाजूला असतं आणि म्हणून त्यांना या प्रतिक्रिया दिसतच नाहीत,’ हे समजा मान्य केलं तरी या प्रतिक्रियांचा प्रतिवाद आवश्यक होता. तसा तो होताना दिसत नाही. कदाचित ‘माझं पुस्तक आणि माझं कामच टीकेला उत्तर देईल’ असं म्हणून याशिका दत्त विषय संपवू शकतात. खरोखरच आहे का काम तसं? पुस्तकातल्या १२ पैकी आठ लेख आत्मपर आहेत, त्यात स्वत: वा कुटुंबीयांबद्दल तटस्थपणा दिसून येतो. नंतरचे तीन लेख हे दलित चळवळीबद्दल, दलितत्वाबद्दल आणि अखेरचा लेख ‘दलित-बिगरदलित’ अशा दुहीच्या तोटय़ांबद्दल आहे.

लेखिका शिक्षणाच्या संधी मिळवत, दिल्लीच्या ‘सेंट स्टीफन्स कॉलेज’मध्ये असतानापासून फॅशनविषयक लिखाण करून, पुढे कोलंबिया विद्यापीठात पत्रकारिता कशी शिकली आणि या सर्व काळात दलितांविषयी उच्चवर्णीयांची मतं काय आहेत हे दिसत असूनही दलितत्व तिनं कसं लपवलं, याविषयीचं हे आत्मकथन. रोहित वेमुला प्रकरणानंतर, २१ जानेवारी २०१६ रोजी तिनं ‘होय, मी दलित आहे’ असा लेख लिहिला. कथित ‘समरसतावादा’ची जबाबदारी दलितांवरच का ढकलली जाते, हा प्रश्न हे पुस्तक वाचणाऱ्यांना पडेल. लेखिकेचं काम (सर्व) तरुणांमध्ये जाणीवजागृतीचं आहे आणि एका पुस्तकापुरतं ते मर्यादित न ठेवता, ‘डॉक्युमेंट्स ऑफ दलित डिस्क्रिमिनेशन’ या ब्लॉगद्वारे तिनं ते सुरू ठेवलं आहे.

/event-horizon-telescope-releases-first-black-hole-image-1875282/

अंधाराची आभा


86   14-Apr-2019, Sun

मानवी लोभ, लालसेच्या पलीकडची जिज्ञासा म्हणजे काय, हे ‘इव्हेन्ट होरायझन’ प्रयोगातून कृष्णविवराच्या आकारशोधाने सिद्ध केले.

अविश्वास आणि विश्वास यांचा सहप्रवास विज्ञानाच्या क्षेत्रात जितका दिसतो, तितका अन्य कोठे दिसेल? कदाचित कवितेत. तत्त्वज्ञान आणि अध्यात्माच्या सीमारेषा जेथे पुसट झाल्या, अशा काव्यामध्ये तर खासच. सावळ्या, कानडय़ा विठ्ठलाच्या कांतीचे ‘दिव्य तेज झळकती, रत्नकीळ फांकती प्रभा’ असे वर्णन करणारे ज्ञानेश्वर ‘दृष्टिचा डोळा पाहू गेले तंव, भीतरि पालटु झाला’ यासारख्या ओळीतून विश्वास-अविश्वासाचा हा संबंध परमावधीला नेतात. तर ‘सृष्टि से पहले सत नहीं था, असत भी नहीं था’ हे वसंत देव यांनी केलेले नासदीय सूक्ताचे – म्हणजे ऋ ग्वेदाच्या दहाव्या मंडलातल्या १२९ व्या ऋ चेचे- केलेले हिंदी रूपांतरही भारतीयांना वेदकाळापासून माहीत असलेल्या याच अविश्वास-विश्वासाच्या द्वंद्वाला अनुवादातून न्याय देते. या नासदीय सूक्ताच्या साऱ्या ऋ चांचे पहिले पठण झाल्यानंतर वेदकालीन माणसांना ज्ञानप्राप्तीचा जितका आनंद झाला असेल, तितकाच १० एप्रिल रोजी जगभरच्या खगोलशास्त्रज्ञांनाही झाला असणार. केवळ खगोलशास्त्रच का? जे एरवी स्वत:ला सामान्य माणूस म्हणवत बऱ्याच गोष्टींपासून दूर राहतात, त्यांनाही आनंदच व्हावा अशी बातमी परवाच्या १० एप्रिल रोजी आली. ज्याबद्दल आजवर केवळ ऐकले आणि कल्पना केली, त्या कृष्णविवराचे पहिले छायाचित्र प्रसृत झाल्याचा हा आनंद जगभर पसरू लागला. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे ती प्रतिमा एकमेकांना पाठवण्यापासून ते कृष्णविवर म्हणजे काय याची आपल्याला समजणाऱ्या भाषेतील माहिती देणारी संकेतस्थळे धुंडाळण्यापर्यंत, आजच्या माहिती-तंत्रज्ञानयुगात जे जे शक्य, ते सारे करण्यापर्यंत कृष्णविवराच्या प्रतिमेविषयीची जिज्ञासा जगभरच्या कोटय़वधी माणसांना घेऊन गेली.

कृष्णविवराच्या प्रतिमेचे स्वागतच. पण तितकेच स्वागत करायला हवे, ते या जिज्ञासेचे. ती आजची नव्हे. सृष्टीच्या, अंतराळाच्या आधी काय होते याची वेदकालीन जिज्ञासा असो की ‘दृष्टीचा डोळा’ पाहू जाणाऱ्या ज्ञानेश्वरांची असो. अनेक आधुनिक तत्त्वज्ञांची, कवींची असो की शास्त्रज्ञांची, संशोधकांची असो. अविश्वास म्हणजे तिरस्कार नव्हे, हे ज्यांना उमगते ते सारे जिज्ञासू. या जिज्ञासेतून प्रश्न येतात. आयझ्ॉक न्यूटनच्या गुरुत्वभेदी त्वरण अर्थात एस्केप व्हेलॉसिटी या संकल्पनेची फेरतपासणी करून अल्बर्ट आइनस्टाइनने १९१५ साली सापेक्षतावादाचा पहिला सिद्धान्त मांडला. त्याआधी कृष्णविवराच्या अस्तित्वाबद्दल केवळ अंदाज बांधले गेले होते, त्याला या सापेक्षतावादामुळे आधार मिळाला. पण सापेक्षतावादाचे आणि पुंजभौतिकीचे सिद्धान्त पोथीबद्ध न राहता त्यावर वैज्ञानिकांनी काम सुरू केले. स्टीफन हॉकिंगने ते आणखी पुढे नेले. या सिद्धान्तांच्या पडताळ्यासाठी विविध शंका घेतल्या गेल्या. या वाढत्या जिज्ञासेचे एक फलित म्हणजे एकविसाव्या शतकात, विश्वाविषयीच्या दोन प्रमुख सिद्धान्तांची तपासणी प्रत्यक्ष प्रयोगातूनच करण्यासाठी जगभरचे शास्त्रज्ञ एकत्र आले.

यापैकी पहिला सिद्धान्त महाविस्फोटातून विश्व-निर्मितीचा. दुसरा कृष्णविवराचा. महाविस्फोटाची पडताळणी ‘सर्न’ प्रयोगशाळेच्या ‘देवकण’ किंवा ‘गॉड पार्टिकल’ प्रयोगाने स्वित्र्झलडमधून केली. कृष्णविवराचा आकार नेमका कसा, हे मापण्याचा प्रयोग मात्र जगभरच्या आठ ठिकाणांहून झाला. कृष्णविवर एकाच दुर्बिणीतून निरखायचे, तर ती दुर्बीण पृथ्वीच्या व्यासाएवढी मोठी असावी लागली असती. त्याऐवजी आठ दुर्बिणींचे अष्टावधान कामी आले. संगणकीय नियतरीती – अल्गोरिदम- वापरून या प्रतिमेचे खंड जोडण्याच्या कामाला गती मिळाली. त्यातून जी प्रतिमा तयार झाली, तिचे अनावरण करताना ‘या प्रयोगाला कोणीही नायक नाही’ असे आवर्जून सांगण्यात आले. नायकत्ववादाची बाधा विज्ञानाला कधी होतच नसते असे नव्हे. पण पार पलीकडचे काही पाहायचे, अशक्य ते शक्य करायचे तर नायक नसलेलाच बरा हे सामान्यज्ञान आहे आणि इतर अनेक क्षेत्रांप्रमाणे विज्ञानातही ते स्वीकारले जाते इतकाच याचा अर्थ. तेव्हा श्रेयापेक्षा या साऱ्यांना तसेच आणखीही अनेकांना आता यापुढे काय करायचे याची आस लागली आहे, हे महत्त्वाचे. कृष्णविवराची प्रतिमा टिपण्याच्या ‘इव्हेन्ट होरायझन’ या प्रयोगामधूनच आणखी किमान एका कृष्णविवराचीही प्रतिमा मिळणार आहे. पण पहिल्या यशाइतके कौतुक दुसऱ्या खेपेस होणारही नाही. ते साहजिकच. तरीही आणखी काही कृष्णविवरे शोधणे, त्यांच्या एकाच आकाराच्या प्रतिमेवर समाधान न मानता ठरावीक कालावधीने किंवा प्रसंगी दुर्बिणींचे स्थान बदलून कृष्णविवरांच्या आकारांतील फरक टिपणे, अशी ही शोधयात्रा सुरू राहील. काय मिळेल त्यातून? मानवी लालसेसाठी विज्ञानाचा केवढा वापर होतो हे आपण पाहतो आहोतच. तसे कृष्णविवराबद्दल कसे काय होणार? चंद्रावरून खनिजे आणावीत किंवा चंद्रासह जमल्यास मंगळावरही वस्तीच करावी, यासारख्या लोभी कल्पनांचा स्पर्शदेखील होऊ शकणार नाही, इतकी ही कृष्णविवरे दूर आहेत. मग काय करायचे या संशोधनाचे?

सिद्धान्त आणि त्यांची खातरजमा, यांविषयी हे प्रश्न नेहमीच उपस्थित केले जातात. कृष्णविवरावरील संशोधनासाठी किमान १०९.३८ कोटी रुपये खर्च झाले आहेत. तेही कुणा एका देशाची मान उंचावल्याविनाच. सामाजिक शास्त्रे किंवा मानव्यविद्यांमधील संशोधनास कमी महत्त्व मिळते तेही मान उंचावण्याचे खर्चाशी गुणोत्तर पाहूनच. तरीही ‘इव्हेन्ट होरायझन’ प्रयोग झाला, याचे श्रेय मानवी जिज्ञासेलाच द्यायला हवे. कृष्णविवर हे तेजाने पुंजाळलेले असल्यामुळे त्याच्या आकाराबाबत ‘समोरा की पाठीमोरा, नकळे नकळे’ अशीच अवस्था असते. गुरुत्वाकर्षण इतके की, प्रकाशसुद्धा बाहेर पडू शकत नाही आणि दिसतो तो अंधारच. मग कृष्णविवराची, काळ्या कढईत मधूनच प्रकाशमान झालेल्या मेदूवडय़ासारखी जी प्रतिमा ‘इव्हेन्ट होरायझन’ने टिपली, ती कशी झाली? तर कृष्णविवराच्या हलत्या तेजपुंजांच्या कडेकडेने गुरुत्वाकर्षण थोडे कमी, म्हणून तिथे थोडासा प्रकाश दिसू शकतो. हा प्रकाशाचा सोहळा किंवा ‘इव्हेन्ट’ क्षणिक आणि तो जेथे दिसणे शक्य झाले ती कडा किंवा ते क्षितिजसुद्धा क्षणिकच. पण ‘इव्हेन्ट होरायझन’च्या प्रयोगातून प्रकाशाइतकाच अंधारही टिपला गेला आहे. ‘प्रकाशाचा शोध म्हणजेच अंधाराचाही शोध,’ हे ऐकताना कुणाला जॉर्ज ऑर्वेलच्या १९८४ या कादंबरीतील ‘युद्ध म्हणजेच शांतता’ या वचनासारखे वाटेल; पण युद्ध-शांततेचे मानवी लोभ-लिप्ताळे आणि विश्वात सूर्यापासून साडेसहाशे कोटी पटीने मोठे असलेल्या, मात्र साडेपाच कोटी प्रकाशवर्षे दूर असल्यामुळे न दिसणाऱ्या ‘एम- ८७’ आकाशगंगेतील कृष्णविवराच्या शोधामागची आस यांची तुलनाच होऊ शकत नाही. मानवी लोभ, लालसेच्या पलीकडची जिज्ञासा म्हणजे काय, हे या कृष्णविवराच्या आकारशोधाने सिद्ध केले आहे.

अविश्वासाचे पंख झेपावून पुन्हा नव्या विश्वासावर विसावणारी ही जिज्ञासा अंधारालाही आपलेच मानते. प्रकाश बरा, अंधार नको- अशा भुक्कड समजांच्या पलीकडे जाते. अंधाराची आभा पाहायची, तर पलीकडे जायलाच हवे.

human-creations-psychology-of-human-behavior-and-nature-1875283/

विरोधांची एकात्मता


1370   14-Apr-2019, Sun

आपल्या रोजच्या अनुभवांमध्ये किती तरी गोष्टींचे विरोधाभास आपल्याला नजरेस येत असतात. यात प्रामुख्याने निसर्ग, मानवनिर्मित कल्पक वस्तू व मानसिक व्यवहार दिसतात. कसे ते पाहू या..

‘‘मी समुद्रकिनाऱ्यावर बसले आहे. समुद्राची अव्याहत गाज मला ऐकू येते, एकामागून एक फेसाळत्या समुद्राच्या लाटा पाहता पाहता मी हरवून जाते. एक लाट आली, मागून दुसरी आली व पहिली कधी फेसाळत फुटून गेली ते ध्यानातच आलं नाही. आता माझं मन एका वेगळ्याच असीम शांततेत जाऊ लागले आहे. आता माझं लक्ष उडालं आणि कदाचित बारावी लाट परत पहिली झाली. आता लाटा मोजणं मी सोडून दिलं. मी आता दूर नजर भिरकावली आणि लाटांची वरखाली होणारी सरळ प्रतलातली उलघाल बघितली. हे बघणे जरा जास्त बरे होते, कारण लाटा इथे एकात्म पावलेल्या होत्या; एकाच समुद्राच्या एकाच तळखोल पाण्याच्या प्रतलाकडे आकर्षति होऊन मी आता समुद्राकडे चालायला लागते. माझी चाल जलद होते. तळपायावर होणारा मऊ वाळूचा स्पर्श, गडद होत जाणाऱ्या लाटांच्या प्रखरतेबरोबरच मवाळ वाटू लागतो. पायघोळ कपडे वर करून आता मी ओल्या वाळूवर स्थिर उभी राहते. पायाचे तळवे आता वाळूत माझ्या वजनाला तोलून ठेवतात; वाळूवरचा दाब मला आवडतो. आली, आली, लाट जवळ आली, माझी नजर फिरली, आजूबाजूचे अवकाश फिरले, मी जणू काही समुद्रात ओढली गेले, बाप रे आता मी बुडणार? डोक्यात थोडय़ा झिणझिण्या आल्या; आता वेगाने माझ्यावरून माझ्या मागे गेलेले फेसाळते पाणी परत माझ्या मागून पुढे ओसरत चालले आहे. आता जशी मी समुद्रात ओढली गेले होते आणि तोल जाऊन भय वाटले होते, त्याविरुद्ध आता मी परत मागे ओढले गेल्यासारखे झाले. आता लक्षात आले की, माझे पाय वाळूत रुतले आहेत व खाली खाली जात आहेत. परत लाट येते व पुन्हा तेच.. अशा अनुभवात मी स्वत:ला विसरते!’’

‘ज्या ज्या क्षणी आपण स्वत:ला हरवतो (विसरतो) त्या त्या क्षणी आपण स्वत:ला नव्याने सापडण्याची शक्यता निर्माण होते’

या, किंवा अशासारख्या अनेक अनुभवांत विरुद्धाच्या किती जोडय़ा आपण एकाच वेळी अनुभवत असतो! असा विरोधाभास काळाचा परिणाम असतो. आपण आपल्या आकलनात झपाटय़ाने ‘अ’पासून ‘ज्ञ’पर्यंत गेलेले असतो, विरुद्धांचे मीलन होते. जसे की जमिनीचा टणकपणा ७ भुसभुशीतपणा, लाटेचे उंच आवर्तन ७ सपाट वहन, समुद्राचे सरळ ओबडधोबड प्रतल ७ असीम खोलीची जाणीव, पाण्यात उभे राहण्याचा आनंद ७ त्यात ओढले जाऊन गटांगळ्या खाण्याची भीती इत्यादी. मुळात आनंद व भीती या विरुद्ध जोडीचेच हे दिव्य दर्शन असते. ‘भीती आनंदाची भूमी असते’ यासारख्या उक्तीची महती पटते.

‘द्वंद्ववादाचा सिद्धांत’ (डायलेक्टिक्स) या पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या शाखेत वास्तवाला बदलाच्या रूपात बघितले जाते, त्यामुळेच परस्परविरोधी तत्त्वे व घटनांचा मेळ वा सहअस्तित्व इथे ग्राह्य़ मानले जाते. भारतीय अद्वैतवाद व बुद्धांचे तत्त्वज्ञान यांतदेखील अशा विरोधी तत्त्वांचा मेळ दिसतोच. हेराक्लिटस या सॉक्रेटिसच्याही आधीच्या तत्त्वज्ञाने विरोधी तत्त्वांच्या एकात्मतेचा विचार केलेला होता. निसर्गाशी संवाद करताना आपल्याला असे अनुभव नेहमी येतात.

‘चढाचा रस्ता व उताराचा रस्ता हे दोन्ही एकाच गोष्टीशी संलग्न आहेत’ – हिपोलीटस.

पुढे आधुनिक तत्त्वज्ञानात कांट व हेगेल या तत्त्वज्ञांनी याच संकल्पनेचा पाठपुरावा केला. ‘आधिभौतिक तत्त्वज्ञान’ शाखेचा हा विस्तार होता.

हेगेलच्या मते भौतिक वस्तू (मॅटर) आणि मन (माइंड) असे द्वैत दिसत असले तरी ते एकात्म आहेत. तत्त्वज्ञान त्यांची एकता प्रस्थापित करते. सर्व मनोव्यापारच आत्मिक (स्पिरिच्युअल) आहेत. जे अस्तित्वात आहे त्याच्याकडून जे अस्तित्वात नाही त्याच्याकडे जाण्याची मानवाची प्रवृत्ती असते. मानवाचे कल्पक, क्रियाशील सर्जक मनच याला कारणीभूत असते. हे मन म्हणजे विश्वचेतनेचा आविष्कार असते. माणसाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने स्वत:च्या जाणिवेने व इच्छाशक्तीने होत असते. त्यामुळे ‘विरोधात्मकता’देखील याचा भाग होणारच. तसेही या विश्वाच्या निर्मितीमागे धन व ऋण या विरुद्ध तत्त्वांचे मीलन कारणीभूत आहेच.

संकल्पनांच्या व सर्जनाच्या क्षेत्रात परस्परविरोधी घटकांच्या एकात्मतेचे अनेक दाखले मिळतात. खरं तर या विषयाची प्रेरणा मिळाली सिनेमागृहात, ‘डंबो’ हा सिनेमा बघताना. वॉल्ट डिस्नेकृत १९४१च्या चित्रपटात ‘टू-डी अ‍ॅनिमेशन’द्वारे उडणाऱ्या हत्तीच्या पिल्लाचे हे पात्र साकारते, पण या वर्षी आलेला डिस्ने प्रॉडक्शन्सचाच ‘थ्री-डी डंबो’ याच पात्रावर बेतलेला आहे (मूळ कथा हेलेन अेबर्सन व हॅरॉल्ड पर्ल यांची). या पात्राच्या संकल्पनेचे विश्लेषण बघू. हत्ती हा बोजड प्राणी, जमिनीवरच वावरणार, म्हणजे डोंगरावरही नाही. याविरुद्ध कुठलाही पक्षी, उडणारा; कसा? कारण असतो हलका! आता या दोहोंचा काय संबंध? दोघांचे अस्तित्वच मुळी एकमेकांचे ‘उणे’! आता या दोहोंच्या एकीची कल्पना करायची म्हणजे महाकठीण; पण सारखेपणाचा शोध घेण्याची माणसाची वृत्ती काम करते. पक्ष्याचे पंख व हत्तीचे कान सारखे दिसतात म्हणून मोठय़ा कानांचा हत्ती कल्पिला व कल्पना अधिक ठसावी म्हणून पिल्लू घेतले. आणखी एक : याला उडण्यासाठी पक्ष्याचे एक पीस सोंडेने शोषून घ्यावे लागते, तरच तो उडू शकतो. मूळ गोष्टीत अजून विरोधी कल्पना वापरल्या. हा लांबकान्या जन्मला म्हणून त्याला मुलं हिणवतात, त्यातून ‘डंबो’ (बुद्धू या अर्थी) हे नाव या विरुद्ध त्याला उडण्याची अतींद्रिय शक्ती. दुसरा कथाविस्तार म्हणजे, याची आहे उंदराशी मत्री- पुन्हा एक विरुद्ध जोडी. या सगळ्याशी आपल्या गणपतीच्या संकल्पनेशी साधर्म्य दिसते आणि यातून संस्कृती किती सर्जनशील असते हेही अधोरेखित होते.

डेमियन हर्स्ट या ब्रिटिश समकालीन कलाकाराने एक शिल्प बनवले- ‘देवाच्या प्रेमासाठी’ (फॉर द लव्ह ऑफ गॉड) हे २००७ मध्ये तयार केलेले एक शिल्प आहे. अठराव्या शतकातील एका खऱ्या माणसाची कवटी हर्स्टने विकत घेतली आणि तिच्याच आकाराबरहुकूम प्लॅटिनम धातूची कवटी बनवून घेऊन त्यावर ८६०१ इतके खरे हिरे मढवले. यात मधोमध कपाळावर मोठय़ा पदकाच्या आकाराचा गुलाबी हिरा समाविष्ट आहे. या शिल्पातले दात मूळच्या कवटीचे आहेत. हे शिल्प तयार करण्याचा खर्च १४० लाख ब्रिटिश पौंड एवढा होता, तर त्याची विक्री-किंमत पाच कोटी पौंड एवढी होती. जिवंत कलाकाराच्या कलाकृतीसाठी एवढे मानधन मिळवण्याचा हा विक्रमच ठरला. तपशील अलाहिदा, यांतील परस्परविरोधी कल्पनांकडे बघणे रंजक आहे. मृत्यू व जीवनाच्या शाश्वततेची मानवाची आस व उपभोगाची लालसा सरमिसळ होऊन या ‘दिव्य’ कवटीच्या रूपाने सामोरे येतात व दुसरीकडे देवत्वाशी जोडलेला याचा संबंध दिङ्मूढ करून जातो.

अशा प्रकारच्या संकल्पनांचे पूर्ण मूर्तरूप पाहिल्यानंतर अचंबा वाटतो, की परस्परविरोधी गोष्टींची सरमिसळ किती बेमालूम पद्धतीने झाली आहे. आपल्या जगण्यातदेखील किती तरी विरोधात्मक गोष्टींची सरमिसळ झाली आहे! नाही का?

डेमियन हर्स्ट या ब्रिटिश समकालीन कलाकाराने बनवलेले ‘फॉर द लव्ह ऑफ गॉड’ हे शिल्प लेखक दृश्य कला व क्रयवस्तू विश्लेषक असून ‘नीफ्ट’ येथे अध्यापन करतात.

dr-vijay-prahlad-dev

डॉ. विजय देव


6038   12-Apr-2019, Fri

लौकिक अर्थाने ते एक शिक्षक, राज्यशास्त्र विषयाचे गाढे अभ्यासक. पण या विषयाचे अध्ययन आणि अध्यापन करता करता ते समाजाच्या विविध अंतरंगात कधी शिरले आणि त्यातून त्यांनी विविध कार्याचे बंध कधी विणले हे त्यांनाही ठाऊक नसेल. शिक्षक, लेखक, व्याख्याते, साहित्य अभिवाचनाची संस्कृती रुजवणारे कलाकार, योगविद्येचे पुरस्कर्ते, संवेदनशील मन असलेले निसर्गभटके आणि उत्तम समाज संघटक अशी चतुरस्र ओळख असलेल्या डॉ. विजय प्रल्हाद देव यांचे काल निधन झाले. त्यांचे निधन हे त्यांच्या शेकडो विद्यार्थ्यांपासून ते त्यांनी जोडलेल्या सर्वदूर समाजापर्यंत साऱ्यांना चटका लावून गेले, ते त्यांच्या या बहुविध गुणवैशिष्टय़ांमुळे.

राज्यशास्त्र विषयात डॉ. देव यांचे नाव आदराने घेतले जाते. विद्यार्थी आणि समाजाभिमुख शिक्षणाच्या त्यांच्या हातोटीतून तयार झालेले शेकडो विद्यार्थी आज भारतीय प्रशासकीय सेवांमधील उच्च पदांपासून ते राजकीय पटलावरील चारित्र्यसंपन्न नेतृत्वापर्यंत आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत. राज्यशास्त्राचा शोध घेतानाच त्यांनी लिहिलेले सुबोध राज्यशास्त्र, पाश्चात्त्य राजकीय विचारवंत, राजकीय विश्लेषण कोश, राजकीय संकल्पना व सिद्धान्त, आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत हे ग्रंथ आज या विषयात मैलाचे दगड ठरले आहेत. त्यांनी लिहिलेला ‘राज्यजिज्ञासा’ हा संशोधनात्मक ग्रंथ तर आजच्या राजकीय इतिहासापासून ते वर्तमानातील वाटचालीपर्यंत असा विस्तृत पटाचा वेध घेतो. त्यांनी नुकताच लिहिलेला ‘कौटिल्याच्या यथार्थ तुलनेत मॅकिएव्हेली’ हा ग्रंथ दोन थोर राजकीय विचारवंतांच्या विचारांमधील साम्य आणि फरकावरील चर्चा घडवतो.

गेल्या काही वर्षांपासून सह्य़ाद्री आणि छत्रपती शिवराय हे त्यांचे अभ्यासाचे आणि कुतूहलाचे विषय बनले होते. त्यांचे सासरे आणि ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांनी रुजवलेल्या दुर्गभ्रमण चळवळीला अधिक व्यापक रूप देण्यासाठी डॉ. देव यांच्या पुढाकारातून गोनिदा दुर्गप्रेमी मंडळाची स्थापना झाली. आमच्याकडे वाचन संस्कृती मोठय़ा प्रमाणात रुजलेली आहे. पण हे कसदार साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी डॉ. देव यांनी त्यांच्या कुटुंबीयांसमवेत विविध साहित्यकृतींच्या अभिवाचनाची नवसंस्कृती या मातीत रुजवली. देव हे हाडाचे योगविद्येचे विद्यार्थी. या कलेच्या प्रसारासाठीही त्यांनी मोठे काम केले. विविध सामाजिक संस्था आणि कार्याचे ते आधारस्तंभ होते. सतत नावीन्याचा शोध घेण्याची, त्यातून माणसे जोडण्याची अंगी वृत्ती. त्यांचा कामाचा हा झपाटा एखाद्या तरुणाला लाजवेल असा होता.


Top