शब्दबोध : हातखंडा

mpsc mains exam marathi article-about-word-sense-5

300  

हातखंडा

एखादे काम हमखास पार पाडण्याचे कौशल्य अंगी असणे, म्हणजे हातखंडा. तर हातखंड म्हणजे मधून मधून सोडवणूक करणारा, मदतनीस (मूल, मित्र, शेजारी) तसेच अडल्यावेळी उपयोगी पडणारी अशी व्यक्ती.

एखादा कारागीर त्याच्या कलेत अतिशय निष्णात असेल, त्या कलेत त्याचा हात धरणारा दुसरा कुणी नसेल तर त्याच्या कामाचे वर्णन हातखंडा काम असे केले जाते. गालिच्यांवर नाजूक कलाकुसर करणारे, दगडी शिल्पांमधे सजीवतेचा आभास निर्माण करणारे, ताजमहालसारख्या कलाकृतीमधे संगमरवरावर सुंदर नक्षीकाम करणारे अशा विविध कलांमधे श्रेष्ठ असणाऱ्या कलावंतांचे कार्य हे हातखंडा काम म्हणून ओळखले जाते. एवढेच काय रोजच्या व्यवहारातही, स्वयंपाकातला पुरणपोळीसारखा पदार्थ करण्यात एखादी गृहिणी वाक्बगार असेल तर पुरणपोळी म्हणजे तिचे हातखंडा काम असे अभिमानाने सांगितले जाते.

पण हे सगळे असे असले तरी हातखंडा काम या वाक्प्रचारामागे एक कटू सत्य आणि भीषण वास्तवता दडली आहे, हे आपल्याला कदाचित माहितीही नसेल. पूर्वीच्या काळी राजे-महाराजे, सुलतान, जहागीरदार यांसारखे राज्यकर्ते आपल्या राज्यातील, संस्थानातील कुशल कारागिरांकडून एखादे अलौकिक शिल्प, वास्तू किंवा स्वत:चे चित्र तयार करून घेत. पण त्यानंतर भविष्यात या कारागिरांनी इतरत्र कुठेही अशा तऱ्हेचे किंवा याहून चांगलं काम करू नये म्हणून त्यांना एक आगळेवेगळे बक्षीस देत. त्यांचे हात छाटून टाकत. त्यावरून हातखंडा काम हा वाक्प्रचार तयार झाला असावा.

चि. वि. जोशींच्या ओसाडवाडीच्या देव या छोटय़ा, पण अतिशय सुंदर पुस्तकात सुरुवातीलाच ओसाडवाडीतील गणपतीच्या मंदिरातील गणपतीच्या मूर्तीचे वर्णन आपल्या वाचनात येते. ते असे, ‘ही गणपतीची मूर्ती इतकी सुंदर आहे की, ती तयार करणाऱ्या कारागिराचे हात तोडून राजाने त्याला जहागीर बक्षीस दिली होती. याला म्हणतात हातखंडा काम! पूर्वीचे राजेलोक कलेला अशा प्रकारचे उत्तेजन देत असत.’

हातखंडा काम या वाक्प्रचारामागचे हे सत्य माहीत झाल्यावर एखाद्या कलाकाराच्या कामाचे वर्णन करताना हातखंडा काम हा शब्दप्रयोग करण्यापूर्वी आपण दहादा विचार करू. नाही का?

शब्दबोध

article-about-word-sense-3

768  

सुकाणू

‘ज्याच्या हाती संपूर्ण जहाजाचा सुकाणू आहे तो ते जहाज कसे बरे भरकटू देईल?’ सुकाणू म्हणजे गलबत विशिष्ट दिशेस वळविण्याचे त्याच्याच मागच्या बाजूस पाण्यात असलेले एक साधन. साधारणत: गोल, चक्राकार असे हे सुकाणू असते किंवा एक मोठा दांडा असतो जो वर्तुळाकार, कुठल्याही दिशेला फिरवता येतो. समुद्रातून ये-जा करणाऱ्या मोठय़ा जहाजाला हा सुकाणू असतो जेणेकरून समुद्रप्रवासाची दिशा निश्चित करून त्यानुसार जहाज वळविता येते.

या अर्थावरून पुढे मराठीत ‘सुकाणू’ हा शब्द वाङ्मयविश्वातही लक्षाणार्थाने वापरला जाऊ  लागला. बा.सी.मर्ढेकर यांच्या कवितेतून हे स्पष्ट होते. –

त्वत्स्मृतीचे ओळखू दे

माझिया हाता सुकाणू

थोर- यत्न शांति दे गा

माझिया वृत्तीत बाणू

ईश्वराला उद्देशून मर्ढेकर म्हणत आहेत की, माझ्या हातातील आयुष्यरूपी सुकाणूला तुझ्या स्मरणाची कायमच ओळख असू दे जेणेकरून माझ्या जीवनाला योग्य दिशा मिळेल.

असा हा सुकाणू शब्द मूळ अरबी आणि संस्कृत पण आहे अशी दोन्ही मते आहेत. अरबीत मूळ ‘सुक्कान्’ यावरून सुकाणू तयार झाला आहे. ज्याचा अर्थ गलबत वळविण्याचे एक साधन असाच आहे. मराठीत मात्र हा सुकाणू शब्द चांगलाच स्थिर झाला आहे. आणि तो विविध अर्थव्याप्तीने वापरलाही जातो.

हुबेहूब

अमुक ती विविध पक्ष्यांचे हुबेहूब आवाज

काढते. बालगंधर्व चित्रपटात सुबोध भावे

हुबेहूब बालगंधर्वच दिसतो. दिसणे, वागणे, बोलणे, करणे, हसणे अशा कितीतरी लकबींसाठी, क्रियांसाठी हुबेहूब हे क्रियाविशेषण वापरतो. मूळ फारसी ‘ऊ – ब- ऊ / हु – ब – हु ’ वरून हुबेहूब हा शब्द तयार झाला. फारसी हु – ब – हु चा अर्थ जसेच्या तसे, एकसारखे, एक प्रकारचे, संपूर्ण सादृश्यता असलेले असा आहे. हाच अर्थ मराठीत पण आहे फक्त शब्दाच्या रूपात बदल झाला.

शब्दबोध

article-about-word-sense-2

135  

अश्राप

‘अपहरण करून एका अश्राप जिवाची हत्या’ किंवा एखाद्या कथा- कादंबरीत हमखास वाचनात येणारे वाक्य म्हणजे ‘त्या अश्राप जिवाचे तळतळाट लागतील तुला.’ मराठीत ज्या प्रकारे हा शब्द वापरला जातो त्यावरून अश्राप म्हणजे निरागस, निर्वैर अशी व्यक्ती. हा अर्थ काही अंशी बरोबर आहे. किंबहुना काहींचा असापण समज असेल की अश्राप म्हणजे ‘अ-श्राप’ – शापरहित असा कोणी. पण अर्थातच या शब्दाची अ-श्राप अशी संधीही नाही आणि हा अर्थही नाही.

मूळ अरबी ‘अश्रफ्’ यावरून हा शब्द तयार झाला आहे अश्राफ / अश्राप. अरबीमधे अश्रफ म्हणजे अत्यंत अभिजात. अरबी- फारसीमध्ये ‘शरीफ्’चे अनेकवचन अश्राफ् वापरतात. म्हणजेच मूळ अरबी- फारसीतील अश्राफ/ अश्राप हे अनेकवचनी नाम मराठीत एकवचनी म्हणून वापरतात. अश्राप म्हणजे सभ्य, सविनय, अभिजात, निरुपद्रवी, स्वभावाने गरीब व्यक्ती. केवळ निरागस हा एकच अर्थ अभिप्रेत नसून कुणालाही उगाच त्रास न देणारा, शत्रुता न करणारा परंतु वृत्तीने, वागण्याने खानदानी, सभ्य, कोणाचेही वाईट न करणारा असा अर्थ अभिप्रेत आहे.

वाकबगार

‘वयाने लहान असूनही बोलण्यात किती वाकबगार होता.’

वादविवादपटूकडे जेवढे वाक्चातुर्य असायला हवे तेवढाच तो वाकबगारही असणे आवश्यक आहे. वाकबगार म्हणजे हुशार हे आपल्याला माहीतच आहे. पण वाकबगार हा शब्द कसा तयार झाला? वाक् – वाणीने हुशार म्हणून वाकबगार का? नाही; हा अर्थही नाही व या पद्धतीने हा शब्दही तयार झालेला नाही. मूळ अरबी शब्द आहे ‘वाकफ/ वाकीफ.’ म्हणजे जाणता, हुशार, तज्ज्ञ, माहीत, ठाऊक. या ‘वाकफ’चे वाकब् झाले व त्याला ‘गार’ हा उत्तरप्रत्यय लागून तयार झाला ‘वाकबगार.’ जे विशेषण म्हणून वापरले जाऊ लागले. ज्याप्रमाणे किमयागार, गुन्हेगार, माहीतगार, जादूगार त्याप्रमाणेच. वाकफ/ वाकबवरूनच वाकफीयत, वाकबगारी, तर विरुद्धार्थी- नावाकब (जाणता नसलेला) अशी विशेषणे अरबीत तयार झालीत. वाकबगार या शब्दाचा उच्चार वाकब-गार असा आहे. वाक-बगार असा नाही हे यावरून स्पष्टच होते.

शब्दबोध

article-about-word-sense

649  

कयास

अटीतटीच्या सामन्यात कोणता चमू जिंकणार याचा कयास लावणे कठीण असते किंवा एखादी व्यक्ती विशिष्ट परिस्थितीत कशी बोलेल, वागेल याचा कयास लावता येत नाही, असे म्हटले जाते. एकूणच कयास लावणे तसे आपण कायमच करत असतो. आपल्याशी संबंधित असलेल्या नसलेल्या सर्व गोष्टींचा कयास आपण लावतच असतो. आता जरा या शब्दाबाबत. मूळ अरबी ‘कियास्’वरून तयार झाला कयास किंवा कियास. तर्क, अनुमान, अंदाज, मत, निर्णय, विचार इत्यादी याचे अर्थ आहेत. इतिहासाचार्य राजवाडे यांनी ‘त्याजवरून कियास करावा की’ असा उल्लेख केला आहे. तर ऐतिहासिक लेख संग्रहात ‘कयास पुरता करून आम्हांकडे किमपि अन्तर नाही ऐसे समजोन’ असा उल्लेख आहे. म्हणजे शिवकाळात कयास/ कियास अशी दोन्ही रूपे वापरात होती. कालांतराने मात्र ‘कयास’ हाच शब्द अधिक रूढ झाला.

हलगर्जी

शासकीय कामाच्या अंमलबजावणीत हलगर्जी किंवा रुग्णालयाकडून अमुक-तमुक बाबतीत झालेली हलगर्जी ही वाक्ये आपण कायमच वृत्तपत्रांतून वाचत असतो. कोणत्याही कामात केलेला बेशिस्तपणा, निष्काळजी, बेजबाबदारी यासाठी हा शब्द वापरला जातो. मूळ फारसी शब्द ‘अहल- इ- गरझ्’ यापासून तयार झाला हलगर्जी. उच्चारसुलभतेसाठी कालौघात ‘अहल’मधला अ गळून पडला आणि उरला केवळ ‘हल’ आणि ‘गरझ्’चा झाला गर्जी. फारसीमध्ये ‘गरझ्’ म्हणजे स्वार्थीपणाने वागणारा किंवा स्वार्थासाठी निष्काळजीपणे वागणारा. म्हणजेच कुठल्याही कामात स्वत:ला कुठल्याही प्रकारचा त्रास, कष्ट पडता कामा नये असा स्वार्थी विचार करणारा तो हलगर्जी. असा विचार करून जो निष्काळजीपणे, बेजबाबदारपणे वागतो त्याला आपण हलगर्जी म्हणायला लागलो. हा शब्द हलगर्जी/ हल्गर्जी अशा दोन्ही पद्धतीने लिहितात.

शब्दबोध

article-about-vocabulary-word-2-1794553

495  

अबर-चबर 

‘दिवाळीमध्ये फराळानिमित्त हमखास इतके अबर-चबर पदार्थ खाण्यात येतात!’ किंवा ‘संध्याकाळी चहासोबत काही तरी अबर-चबर तोंडात टाकायला हवंच असतं.’ समस्त मराठी घरांमधे ‘नमकीन’ प्रकारात मोडणाऱ्या पदार्थाना अबर-चबर संबोधले जाते. हा अबर-चबर शब्द कसा तयार झाला असावा? कारण यावरूनच ‘अर्बट-चर्बट खाणे’ असा वाक्प्रयोगही रूढ झालेला आहे.

मूळ फारसी नपुंसकलिंगी शब्द आहे ‘चर्ब्’ ज्याचा अर्थ आहे रोजच्या जेवणाव्यतिरिक्त तेलकट, तळीव, खुसखुशीत पदार्थ. जरी चर्बचा उच्चार करताना ‘र’ आधी उच्चारला जात असला तरी उच्चारसुलभतेसाठी या चर्बवरून चबर तयार झाला आणि बोलभाषेत जशी सटर-फटर, अटरम-सटरम ही रूपे तयार झाली तसे अबर-चबर हे रूप तयार झाले. काही मराठी शब्दकोशात याचा अर्थ बेचव, नीरस, जाडेभरडे असाही दिला आहे. तरी ज्या उद्देशाने सध्या मराठीत हा वापरला जातो तो अर्थ मूळ फारसी अर्थाच्या अधिक जवळ जाणारा आहे.

महिरप

एखाद्या बंगलावजा इमारतीचे प्रवेशद्वार महिरपी आकाराचे असते. तर एखाद्य मंदिर/ मशिदीचे संपूर्ण स्थापत्यच महिरपी देऊन तयार केलेले असते. तर एखाद्या रांगोळीत महिरपी आकार देऊन ती रांगोळी अधिक आखीव-रेखीव केली जाते. एवढेच काय हा कमानदार महिरप शब्द गणितासारख्या विषयातदेखील ऐटीत जाऊन बसलेला आहे.

लहानपणी साध्या कंसापेक्षा महिरपी कंसातील आकडे प्रत्येकालाच विशेष प्रिय असत. तर हा महिरप शब्द मूळ अरबीतून आला आहे. मूळ स्त्रीलिंगी शब्द आहे ‘मैराप’. मैराप म्हणजे विशिष्ट पद्धतीची कमान. त्याचा पुढे तयार झाला महिराप आणि यावरून पुढे महिरप. सुप्रसिद्ध शाहीर परशराम यांच्या रचनेत त्यांनी सजावटीसंदर्भात पुढील उल्लेख केला आहे- ‘मैरापीच्या सर्जा केल्या जशी दुसरी द्वारका’

शब्दबोध

article-about-vocabulary-words-8

354  

औट घटकेचे राज्य

‘त्याच्या नशिबी औट घटकेचे राज्यच आले!’ किंवा ‘तो तर केवळ औट घटकेच्या राज्याचा राजा ठरला.’

भारतीय राजकारणाच्या इतिहासातदेखील आपल्याला औट घटकेचे राज्य मिळाल्याची काही उदाहरणे मिळतात. पण हा वाक्प्रयोग कुठून तयार झाला असावा? त्यासाठी सर्वप्रथम औट म्हणजे काय ते समजून घेऊ.

एक + अर्धा = दीड आणि दोन +अर्धा = अडीच हे आपल्याला माहीतच आहे. त्यापुढची मोजणी आपण तीन + अर्धा = साडेतीन अशी करतो. पण साडेतीन म्हणजेच औट. पूर्वी पावकी, निमकी, दीडकी, अडीचकी असे पाढे शिकवत त्यात औटकीचा पाढाही असे. एक ते शंभपर्यंत प्रत्येक संख्येची साडेतीन पट किती होते हे या औटकीमुळे सहज कळत असे. आता ‘घटकेचे’ म्हणजे काय? तर पूर्वी कालमापनासाठी तास, मिनिटे असे न मोजता घटका, पळे या प्रमाणात मोजले जात असे. बारीक छिद्र असलेले विशिष्ट आकाराचे वाडग्यासारखे भांडे म्हणजे ‘घटिका’. ही घटिका पाण्याच्या घंगाळात तरंगत ठेवत. मोठा तो घट व आणि लहान भांडे म्हणून ‘घटिका’.

तळाशी असलेल्या बारीक छिद्रातून पाणी येत येत ते भांडे भरले म्हणजे एक घटिका भरली असे समजण्यात येत असे. पुढे या घटिका शब्दाचे घटका झाले. औट घटकेचे राज्य या वाक्प्रयोगाच्या मुळाशी एक लोककथा आहे. पूर्वी शिराळशेट नावाच्या एका व्यापाऱ्याने एका मुसलमान राजासाठी चांगली कामगिरी बजावली. त्याचे पारितोषिक म्हणून त्याने मागितले की मला फक्त औट घटकेचे राज्य द्या. मात्र त्या कार्यकाळात मी जी आज्ञापत्रे काढेन ती सर्व पुढेही अबाधित राहिली पाहिजेत. हे वरदान त्याला मिळाल्यावर त्याने स्वत:चा काहीही लाभ करून घेतला नाही, परंतु त्या राजवटीत ज्या ज्या देवळांची उत्पन्ने खालसा करण्यात आली होती, ती सर्व परत चालू करण्याची आज्ञापत्रे त्याने काढली.

राजानेही ती मानली आणि पुढे चालू ठेवली. म्हणजे शिराळशेटच्या वाटय़ाला अल्पकाळ टिकणारे औट घटकेचे राज्य येऊनही त्याने स्वहितापेक्षा समाजहिताला प्राधान्य दिले, अशी त्याची कहाणी आणि म्हणून त्याची खासियतही.

बेमुर्वत

‘आजपर्यंत इतका बेमुर्वतखोर माणूस बघितला नाही.’ एखादी व्यक्ती अत्यंत निर्लज्ज असल्याचे सांगण्यासाठी हा शब्द वापरला जातो. पण या शब्दाचा केवळ हा एकच शब्द नाही. मूळ अरबी आणि फारसीमध्ये ‘मुरूवत्’ या शब्दाचा अर्थ होतो, माणुसकी. अरबी, फारसीमध्ये ‘ब’ हा पूर्वप्रत्यय त्याच्यासहीत या अर्थाने वापरला जातो. म्हणजे ‘ब-मुरूवत’ म्हणजे माणुसकी अनुसरून, माणुसकीसहित.  अगदी याचप्रमाणे जेव्हा ‘बे’ हा पूर्वप्रत्यय एखाद्या शब्दाला लागतो तेव्हा त्याच्या विरुद्ध अर्थासाठी तो वापरला जातो. अर्थातच ‘बे-मुरूवत’ म्हणजेच ‘बेमुर्वत’ या शब्दाचा अर्थ माणुसकी नसलेला, कठोर, निर्दय, कुणाचीही तमा न बाळगणारा अशा प्रकारे होतो.

इतिहासाचार्य राजवाडे यांनी नमूद केल्याप्रमाणे पुढील उदा. मिळतात -‘कौल सादर असे, सुखे किर्दीमामूर बे-मुर्वत होऊन करणे’ आणि ‘पुत्रांसी बेमुर्वत होऊन दौलतीस ज्या गोष्टी राखण्याच्या त्या करवत नाहीत.’ किंवा बखरींमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी ‘बेमुर्वत पारिपत्य करणे’ असाही उल्लेख येतो.

शब्दबोध

article-about-vocabulary-words-7

836  

शिक्का

एक क्षणभर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की, जगातील प्रत्येक माणसाचे दैनंदिन जीवन या शिक्क्याने किती घेरलेले आहे. हा शिक्का नसता तर आपले शैक्षणिक, शासकीय, आíथक, वैद्यकीय व्यवहार पूर्णत्वास गेले असते का? अगदी ग्रंथालयातील ग्रंथावरचा शिक्का, जन्म दाखल्यापासून तर पारपत्रापर्यंत ते थेट मृत्यू दाखल्यावरचा शिक्का, बँकेच्या व्यवहारासाठी आवश्यक शिक्का, शालेय स्तरापासून ते संपूर्ण शिक्षण, नोकरी येथे प्रवेश, अर्ज, नेमणूक यांवर लागणारा शिक्का, निवडणुकीतील ‘विचार पक्का- मारा शिक्का’ वगरे, यावरही कळस म्हणजे खेडेगावात सणासुदीला आपल्या गायी- म्हशींना रंगीत शिक्के मारून कौतुकाने सजविणारे गावकरीही.. असा हा शिक्का मूळ फारसी शब्द आहे.

शिक्का हा शब्द एकाच अर्थाची विविध रूपे घेऊन आपल्या अवतीभवती वावरत असतो. नाण्यावरील छापाला फारसीत सिक्का म्हणतात. शिवाय चिन्ह, मुद्रा, ठसा, ठप्पा, राजमुद्रा, सरकारी मुद्रा, मोहोर, कापडावरील, शरीरावरील खूण, छाप, व्रण, व्यक्तीच्या नावाचा पदासह असलेला शिक्का इत्यादी रूपांनी हा शिक्का सर्वत्र वापरला जातो.

यासंदर्भात ऐतिहासिक सनदांमधे पुढील उल्लेख येतो ‘बादशाहची चाल अशी आहे की शिक्क्यात नाव भरावयाचे ते आपले नावाची अक्षरे ज्या आयतेत (कुराणवचन) किंवा हदीसात (पगंबरवचन) निघतील ते हदीस किंवा आयते त्या शिक्क्यात भरावी म्हणजे तो शिक्का आपले नावचा जाहला.’

शेखी

‘वर्गात पहिला आल्यापासून हा जास्तच शेखी मिरवायला लागला’ किंवा ‘त्या हिरोसोबत फोटो काय छापून आला तर ती जास्तच शेखी मिरवतेय आता.’ शेखी मिरवणे म्हणजे गर्वाची वागणूक, प्रौढी, बढाई, ऐट. मूळ फारसी ‘शैखी’ यापासून शेखी तयार झाला.

फारसीमधे शेखी/ शोखी असे दोन्ही शब्द आहेत. पण शोखी हा शब्द कौतुकपूर्ण गुणवर्णनासाठी देखील वापरतात, जसे िहदीत ‘शोखियों में घोला जाये फूलों का शबाब.’ ऐतिहासिक लेखसंग्रहात पुढील उल्लेख येतो, ‘मिरजेस फौज गुंतली, यामुळे हैदर नाइकाने शेखी- शोखी केली आहे.’

शब्दबोध

article-about-vocabulary-words-6

790  

बडतर्फ

‘अमक्या-अमक्या कारणाने एखाद्याला बडतर्फ केले’ अशा पद्धतीची वाक्ये आपण वर्तमानपत्रात अनेकदा वाचतो. मूळ फारसी शब्द ‘बर्तरफ्’. ज्याचा अर्थ आहे कामावरून, पदावरून पदच्यूत करणे, काढून टाकणे, बाजूस करणे. ऐतिहासिक लेख संग्रहांमधे ‘मुरादखान याची फौज अगदी बर्तर्फ केली’ असा उल्लेख आहे. शिवाय दिल्ली येथील मराठय़ांची राजकारणे या लेखसंग्रहामधे ‘जन्रेल इष्टवरिस यास हिंदुस्थानचे फौजेचा बहालीबर्तर्फीचा मुख्त्यार केला आहे.’ म्हणजे जन्रेलला कुणाला बहाली द्यायची व कुणाला बर्तर्फी द्यायची त्यासाठी नेमला आहे.

पाखर

एखाद्यावर मायेची पाखर घालणे असा वाक्प्रयोग आपण नेहमीच करतो. पाखर घालणेचा संबंध पक्ष्याच्या पंखांशी जोडून हा वाक्प्रयोग तयार झाला. पाखर हा शब्द मूळ कोणत्या भाषेतून आला याबाबत निश्चिती नाही. संस्कृत, प्राकृत, िहदी यांमधून आला असावा असे भाषा अभ्यासकांचे मत आहे.

कारण हिंदीत ‘पांखी’ म्हणजे पक्षी. पक्षी रात्रीच्या वेळी आपल्या पिलांना पंखाखाली घेतात किंवा कोंबडी संरक्षणासाठी म्हणून पिलांना पंखाखाली घेते त्यावरून पंख – पाखरू – पाखर असा संबंध जोडता जोडता पाखर घालणे शब्दप्रयोग रूढ झाला. ‘पाखर’चा दुसरा अर्थ आहे;  हत्तीचे किंवा घोडय़ाचे चिलखत. युद्धामध्ये हत्ती, घोडे यांच्या शरीराला इजा होऊ नये म्हणून संरक्षणार्थ जे लोखंडी चिलखत, झूल घालतात त्याला देखील पाखर म्हणतात. दोन्ही अर्थामधे संरक्षण करणे हा समान अर्थ दिसतो त्यामुळे त्याच अर्थावरून पाखर घालणे हा वाक्प्रयोग मराठीत रूढ झाला हे निश्चित.

शब्दबोध

/article-about-vocabulary-words marathi

669  

इंगा दाखवणे

‘थांब तुला चांगलाच इंगा दाखवते’ किंवा ‘असा इंगा दाखवेन ना की सरळच होईल तो एकदम’. अशी वाक्ये आपण कायमच ऐकतो. खेडेगावापासून तर अगदी शहरापर्यंत मराठी लोकांच्या तोंडी आजही सहज ऐकू येणारा वाक्प्रयोग म्हणजे इंगा दाखवणे. आपले सामर्थ्य दाखवून एखाद्याचा पुरता माज उतरवणे आणि त्याला ताळ्यावर आणणे, यासाठी इंगा दाखवणे असे म्हणतात. इंगा हा शब्द नेमका आला तरी कुठून?

चामडे जेव्हा मूळ स्वरूपात असते, तेव्हा ते अत्यंत कडक, खरखरीत आणि आक्रसलेले असते. मग जेव्हा या चामडय़ाचा एखाद्या वस्तूसाठी वापर करायचा असतो, तेव्हा त्याला आधी नरम करावे लागते. ते ज्या अवजाराने मऊ करतात त्याला इंगा असं म्हणतात. आधी दोन्ही टोकांकडून चामडे ओढून धरावे लागते, मग त्यावरून ताकदीने इंगा फिरवावा लागतो. जेवढा अधिक हा इंगा चामडय़ावरून फिरेल तेवढे ते चामडे नरम पडते. यावरूनच आपले सामथ्र्य दाखवून एखाद्या माणसाचा माज उतरवल्यावर म्हणजेच त्याला नरम पाडल्यावर त्याला चांगलाच इंगा दाखवला, असं म्हणतात.

गाशा गुंडाळणे

हा वाक्प्रचारही आपण बरेचदा वापरतो. अमुक तमुक आपला गाशा गुंडाळून परत गेला वगैरे वगैरे. हा मूळ अरबी शब्द आहे. ‘घाशिया’ यावरून गाशा तयार झाला आहे. घोडय़ावरती जे खोगीर घातले जाते त्यावरील मऊ  कापडाचे जे आच्छादन असते त्याला गाशा म्हणतात. जुन्या काळात युद्धाच्या वेळी घोडय़ांवरती कायमच हा गाशा टाकलेला असायचा. एक तर युद्ध संपल्यावर हा गाशा गुंडाळला जायचा नाहीतर युद्धातून पळून जायची वेळ आली तर गुंडाळला जायचा. या प्रक्रियेवरून आटोपते घेणे, संपुष्टात येणे, पळ काढणे इत्यादींसाठी हा वाक्प्रयोग रूढ झाला आहे.

शब्दबोध

article-about-marathi vocabulary-words

1607  

बेफाम

‘चालकाने बेफामपणे गाडी चालवत दोघांना चिरडले.’ हे वाक्य अपघाताच्या बातम्यांमध्ये हटकून वाचायला मिळते. आपल्या रोजच्या वाचण्या-बोलण्यातला हा शब्द अरबी, फारसी दोन्हींमध्ये प्रचलित आहे. 

मूळ शब्द आहे  ‘फहम्/ फाम’ म्हणजे समजूत, अक्कल, चित्तस्थिरता. यावरूनच जो अक्कलवन्त असतो त्यासाठी फामिन्दा हा शब्द वापरतात. अशी चित्तस्थिरता ज्याच्यामध्ये नाही, अक्कल नाही, समजूतदारपणा नाही त्यासाठी या ‘फाम’ ला ‘बे’ हा पूर्वप्रत्यय लागला.

अरबी, फारसीमध्ये ‘बे’ हा पूर्वप्रत्यय लागून तयार होणारे शेकडय़ाने शब्द आहेत. त्यावरून तयार झाला ‘बेफाम.’ जो गाफिल, बेसावध, निश्चिन्त, अनावर, शुद्ध नसलेला आहे तो म्हणजे बेफाम.

खरे यांच्या ऐतिहासिक लेखसंग्रहामध्ये ‘शत्रू माघारा गेला म्हणून बेफाम नाही, सावधच आहो’ असा उल्लेख आहे. तर चित्रगुप्ताच्या बखरीत ‘लोक बेफाम पाहून शहर मारिले’ असा शब्द आहे. यावरून गाफिल असल्याचे बघून आक्रमण करून शहर मारले या अर्थाचा उल्लेख आढळतो.  वर्तमान मराठीत मात्र गाफिल या अर्थापेक्षाही बेजबाबदार, बेछूट वागणे या अर्थासाठी बेफाम शब्द वापरला जातो.

मातब्बर

एखादे व्यक्तिमत्त्व मातब्बर आहे, म्हणजे वजनदार आहे. (किलोचे वजन नव्हे.)ज्याच्या शब्दाला वजन, किंमत आहे, ज्याच्याकडे एक सकारात्मक सत्ता आहे.

उदा. खेडेगावातील सरपंच, पोलीस पाटील इ.  याचा मूळ अरबी शब्द आहे, मुअतबर. याचा अर्थ विश्वसनीय, थोर, श्रीमंत, प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व. ज्याची त्या गावात, प्रदेशात मातब्बरी चालते. अरबीमध्येसुद्धा मुअतबरी म्हणजे मातब्बरी असे स्त्रीलिंग विशेषण आहे. 

खरे यांच्या ऐतिहासिक लेखसंग्रहामध्ये याचा उल्लेख आहे – ‘जे कर्तव्य ते सलाबतीने मातबरीने आपली इभ्रत शह याजवरी पडोन नक्ष होय ते करावे.’ म्हणजेच आपली पत, प्रतिष्ठा, महत्त्व, थोरवी याला शोभेल असे कर्तव्य करावे असे सुचविले आहे. हा शब्द मातबर / मातब्बर किंवा  मातबरी/ मातब्बरी अशा दोन्ही पद्धतीने लिहिला जातो.


Top