शब्दबोध : लसूण

article-on-garlic-1877732/

71  

लसूण

कांदा आणि लसूण हे मराठी माणसाच्या जेवणातील दोन अविभाज्य घटक आहेत. लसणाचा ठेचा हा तर बहात्तर रोगांवर इलाज आहे. पुलंनी ‘माझे खाद्यजीवन’ या लेखात या लसणाच्या ठेच्याचे वर्णन करताना म्हटले आहे, ‘लसणाचा ठेचा ठेवलेल्या भांडय़ावरचे झाकण निघाले की ओसरीवर वासाची वर्दी गेली पाहिजे, की धुवा हात पाय’ अर्थात लसूण ही चवीलाच छान लागते असे नव्हे तर एक औषधी वनस्पतीही आहे. हृदयरोगासाठी तिचा प्रभावी उपयोग होऊ शकतो, असे वैद्य सांगतात. आता शब्दाच्या उत्पत्तीकडे जाऊ.

लसणामधे मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय या सहा रसांपकी फक्त लवण रस नसतो. खरं म्हणजे लवण रस कुठल्याच वनस्पतीत नसतो. आपण आहारात मिठाचा वापर करून लवण रस मिळवतो. मीठ म्हणजेच लवण. सर्वच प्राण्यांना मीठ आवश्यक असते. अगदी जंगलातील प्राण्यांनाही. मग शाकाहारी प्राणी रानातील ज्या जमिनीत क्षाराचे प्रमाण जास्त असते, अशा ठिकाणची माती चाटतात आणि लवण रस मिळवतात. अशा क्षारपड भागाला चाटण किंवा सॉल्ट लिक असे म्हणतात.

हत्ती, गवा, हरीण, सांबर अशा शाकाहारी प्राण्यांच्या चाटणाच्या जागा ठरलेल्या असतात. काही अभयारण्यात वन विभागातर्फे रानात ठिकठिकाणी मिठाचे ढीग रचलेले असतात ते याचसाठी. मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांना मारून खातात तेव्हा त्यांना त्या प्राण्यांच्या शरीरातील क्षारही मिळतात. तर सहा रसांपकी एक रस कमी म्हणजे उणा म्हणून लसणाला संस्कृतमधे रसोन असे म्हणतात. (जसे एक उणा वीस म्हणजे एकोणावीस तसेच.). मराठीत येताना या ‘र’चा ‘ल’ झाला.

ते स्वाभाविकही असते. पाहा, लहान मुलं राम रामच्या ऐवजी लाम लाम असे बोबडे बोलतात. अर्थात याचा अर्थ आपण मराठी माणसे बोबडे बोलतो असा नाही. तर ‘र’ आणि ‘ल’ हे सवर्ण आहेत.  पाणिनीच्या लघुसिद्धांत कौमुदीच्या टीकेमधे ऋ ल्रृयोर्मिथा सावर्ण्य वाच्यम्। सूत्र आहे. म्हणजेच ऋ आणि ल्रृ हे सवर्ण आहेत. व्यवहारात ऋ आणि ल्रृचे शब्द फारसे आढळत नाहीत म्हणून र आणि ल हे सवर्ण मानले आहेत. संस्कृतमध्येदेखील रोम आणि लोम, रोहित आणि लोहित असे समानार्थी शब्द आहेत. अशा तऱ्हेने रसोनचा लसूण झाला. रसोन म्हणा किंवा लसूण म्हणा, पण आहारातून लसूण उणा करून चालणार नाही.

स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण - वर्णविचार

competition-examination-marathi-grammar-characters/article varn vichar

554  

भाषा वाक्यांनी बनते, वाक्ये शब्दांनी बनतात आणि शब्द वर्णांनी बनतात. त्यामुळे व्याकरणाचे वर्णविचार, शब्दविचार आणि वाक्यविचार असे तीन घटक पडतात. या लेखामध्ये आपण वर्णविचार या घटकातील काही महत्त्वाचे मुद्दे पाहू. मागील लेखात लिहिल्याप्रमाणे व्याकरणाच्या संकल्पना, नियम किंवा व्याख्या व या संदर्भात विधाने यावर गुंतागुंतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे व्याख्या समजून घेणे व लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. 

वाक्य, पद, शब्द, मूलध्वनी, वर्ण, अक्षर या संकल्पना समजून घेऊन व्याख्या लक्षात ठेवायला हव्यात. 
शासन निर्णय २००९नुसार वर्णमालेमध्ये ‘अ‍ॅ’ आणि ‘ऑ’ या स्वरांचा समावेश. यामुळे आधुनिक वर्णमालेमध्ये १४ स्वर आणि ५० वर्ण. 
‘क्ष्’ आणि ‘ज्ञ्’ ही विशेष संयुक्त व्यंजने, तर ‘क्ष’ आणि ‘ज्ञ’ ही जोडाक्षरे. 
वर्णमालेतील स्वर, स्वरादी व व्यंजने ही संकल्पना समजून घेऊन त्यांची व्याख्या व संपूर्ण वर्णमाला वर्गीकरणानुसार लक्षात ठेवणे. 
स्वरांचे प्रकार, व्यंजनांचे प्रकार, उच्चारस्थानांनुसार वर्गीकरण यांचे तक्ते करून ते लक्षात ठेवल्यास सोपे जाईल; कारण परीक्षेच्या दृष्टीने ही वर्गीकरणे अत्यंत महत्त्वाची आहेत. 
च्, छ्, ज्, झ् यांचे तालव्य आणि दन्ततालव्य उच्चार असलेले शब्द यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. 
अकारविल्हे मांडणी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. 
जोडाक्षरांचे प्रकार, उभी व आडवी जोडणी, स्वरांची उच्चारपद्धती हे सुद्धा महत्त्वाचे घटक आहेत. 
याचबरोबर व्याकरणाची व्याख्या, भाषेचे स्वरूप, देवनागरी लिपी याबाबत विधानांवर प्रश्न विचारला जाऊ शकतो.
आता २०१८च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतील एक प्रश्न पाहू या. 
पुढील विधाने वाचा 

a) वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय. b) वाक्यातील शब्दांना पद असे म्हणतात. 
c) वाक्य म्हणजे शब्दांची मांडणी होय. 

पर्यायी उत्तरे : 

1) a) व b) बरोबर, c) चूक 2) फक्त a) बरोबर, b) व c) चूक 
3) a), b) व c) बरोबर 4) ब) व c) बरोबर, a) चूक 

वरवर पाहता हे तिन्ही पर्याय बरोबर वाटू शकतात. आपण सर्व पर्याय तपासून पाहू. पर्याय a) वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय - हे बरोबरच आहे; कारण विचार पूर्ण अर्थाने व्यक्त होत असले तर त्यास वाक्य म्हणतात. b) वाक्यातील शब्दांना पद असे म्हणतात - वाक्य ही शब्दांची किंवा पदांची बनलेली असतात. त्यामुळे हे विधानही बरोबर आहे. c) वाक्य म्हणजे शब्दांची मांडणी होय - केवळ शब्दांची मांडणी करून वाक्य तयार होत नाही तर शब्दांची अर्थपूर्ण मांडणी करून वाक्य तयार होते, म्हणून पर्याय क्र. 1) a) व b) बरोबर, c) चूक हाच पर्याय योग्य आहे. 

संधी - महत्त्वाचे मुद्दे 
वर्णविचारातील संधी हा एक महत्त्वाचा घटक आहे. 
संधी हा विषय संस्कृत व्याकरणातून मराठीत आल्यामुळे संधी झालेल्या शब्दाचा विग्रह व एकत्र येणारे वर्ण यामधील ऱ्हस्व - दीर्घ बारकाईने लक्षात ठेवावे लागतात. 
स्वरसंधी, व्यंजनसंधी आणि विसर्गसंधी असे संधींचे मुख्य तीन प्रकार, त्यांचे उपप्रकार आणि मराठीचे विशेष संधी यांचा अभ्यास या घटकामध्ये आहे. 
संधींचे नियम लक्षात ठेवून त्यानुसार तयार होणारे शब्द लक्षात ठेवणे आणि उलट पद्धतीने प्रत्येक शब्द विचारात घेऊन तो कोणत्या संधिनियमाने तयार झाला असेल, याचा सराव करणे ही पद्धत जास्त उपयुक्त ठरेल. 
जास्तीत जास्त संधियुक्त शब्दांच्या विग्रहाचा सराव करणे आवश्यक आहे. 
मराठीचे विशेष संधियुक्त शब्द वगळता इतर सर्व संधियुक्त शब्द आणि त्यांच्या विग्रहातील शब्द मूळ संस्कृत असल्याने मराठीत तत्सम शब्द म्हणून गणले जातात हेही लक्षात घ्या. 
संधी घटकाचा अभ्यास उत्तमप्रकारे केला की ‘नियमानुसार शब्दलेखन’ या घटकाचाही बहुतांश अभ्यास होऊन जातो. अशा प्रकारे मुख्यत: वस्तुनिष्ठ माहितीवर आधारित वर्णविचार हा घटक तुम्हाला संपूर्ण गुण मिळवून देऊ शकतो. 

अभ्यासाची पद्धत 
कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना, विशेषतः स्वयंअध्ययन करताना पुढील पद्धत वापरावी. सर्वप्रथम संदर्भपुस्तकातील एक प्रकरण वाचून संकल्पना समजून घ्यावी, महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करावेत, त्यांचे वहीत स्वत: टिपण काढावे, पुन्हा समजून घ्यावे आणि नंतर त्या प्रकरणावरील मागील परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न आणि काही सराव प्रश्न सोडवावेत. प्रश्न सोडवितानाच आपल्याला किती समजले आहे, याचा अंदाज येईल. त्यानुसार पुन्हा एकदा त्या दृष्टिकोनातून प्रकरणाचे पुनर्वाचन करावे. व्याकरण व शब्दसंग्रहाच्या संपूर्ण अभ्यासासाठी मो. रा. वाळंबे लिखित ’सुगम 
मराठी व्याकरण व लेखन’ हे पुस्तक उत्तम संदर्भ आहे. 

शब्दबोध : घट्टकुटी प्रभात न्याय

article-on-word-sense-1869399/

122  

संस्कृतमध्ये जे अनेक मजेशीर न्याय आहेत त्यातलाच एक म्हणजे घट्टकुटी प्रभात न्याय. हे नाव ऐकून ‘हे नेमके काय?’ असा प्रश्न अनेकांना पडेल. हा फार जुना आणि संस्कृत साहित्यातील न्याय आहे.

घट्ट म्हणजे जकात. कुटी म्हणजे झोपडी. घट्टकुटी म्हणजे जकात नाका. प्रभात म्हणजे पहाट हे आपल्याला माहीतच आहे. सध्या अनेक शहरांतील जकात रद्द झाली आहे, पण काही वर्षांपूर्वी सर्व नगरांत आणि शहरांत प्रवेश करताना मालावर जकात द्यावी लागे. त्या वेळी ‘इतक्या लाखांची जकात चुकवलेला मालट्रक पकडला’ अशा तऱ्हेच्या बातम्या वर्तमानपत्रांत वाचायला मिळत. जकात चुकविण्याची प्रवृत्ती त्यातून दिसून येई. पण गंमत म्हणजे ही प्रवृत्ती आजकालचीच नाही तर फार पुरातन आहे. कारण जकातीची परंपराही तितकीच जुनी आहे.

जकात चुकविण्यासाठी हल्ली जशा युक्त्या योजल्या जातात, तशाच पूर्वीही योजल्या जात.

पूर्वी व्यापारी आपला माल बैलगाडय़ांतून वाहून नेत. जकात नाका टाळण्यासाठी सहसा रात्री प्रवास करत, तेदेखील आडमार्गाने. पण कित्येकदा गंमत काय व्हायची की, आडमार्गाचा रस्ता चुकायचा. मग रात्रभर अंधारात भरपूर हिंडल्यावर पहाटेच्या प्रकाशात गाडी हमरस्त्याला लागायची आणि नेमका जकात नाकाच समोर दृष्टीस पडायचा. हाच तो घट्टकुटी प्रभात न्याय. मूळ उद्देश फसणे, असफल होणे हा या न्यायाचा अर्थ.

शब्दबोध : हळदिवी

word-sense-article-2-1865251/

294  

आपल्यापैकी अनेकांना बोलताना एखादा विशिष्ट शब्द किंवा शब्दप्रयोग वारंवार वापरण्याची सवय असते. काही कवींचेही असे लाडके शब्द असतात. म्हणजे त्या कवीच्या कवितांमध्ये एखादा विशिष्ट शब्द वारंवार भेटतो. ‘हळदिवी’ या शब्दाबाबत असं म्हणता येईल. हळदिवा किंवा हळदिवी याचा शब्दकोशातील अर्थ आहे हळदीच्या रंगाचा, पिवळा.

हा शब्द आरती प्रभूंच्या कवितांमधे अनेकदा आपल्याला भेटतो. प्रामुख्याने ‘जोगवा’ या काव्यसंग्रहातील कवितांमध्ये. हळदिवी हा शब्द किती वेगवेगळ्या संदर्भात आणि तरीही चपखलपणे या कवितांमध्ये आलाय ते पाहा.

‘हिरव्याशा गवतांत हळदिवीं फुलें

हलकेच केसरांत दूध भरूं आले’ (गंध)

तर ‘मिळालेले खूळ’ या कवितेत पिकून पिवळ्या झालेल्या फळाचं वर्णन करताना तो असा आलाय,

‘फळा हळदिव्या झाकी हिरवासा पंख

रस गळे.. करी चोंच लालसर डंख’.

मात्र कधी कधी अर्थ आकळत नाही जसे..

‘धुकें फेसाळ पांढरे दर्वळून दवे

शून्य शृंगारते आता होत हळदिवें’

(शून्य शृंगारते) या शब्दाची नशा आपल्याला चढते. पण सर्वात भन्नाट म्हणजे

‘हळदीची पाने हळदिवी झाली,

कुठे कोण जाणे पिंगाळी पळाली’ (हिरव्या चुका)

हळदीच्या सुकलेल्या पिवळ्या पानांना हळदिवीची उपमा देणे म्हणजे थोरच. या कविता वाचल्यावर वाटते की, हळदिवी हा शब्द आरती प्रभूंचाच. त्यांनीच तो वापरावा. मात्र आणखीही एका कवयित्रीने हा शब्द फार सुंदर वापरला आहे. कविता महाजन यांच्या ‘कुहू’मध्ये.  त्या आता आपल्यात नाहीत पण त्यांनी वापरलेला हा शब्द मात्र नक्की लक्षात राहण्याजोगाच.

मृदु मंद हळदिवी उन्हे जांभळा गर्द गारवा

अशा क्षणी झाडावर का पक्षी नवा उतरावा.

शब्दबोध : केळवण

article-about-word-sense-8-1836531/

279  

घरात एखादे लग्नकार्य किंवा मंगलकार्य असेल की हमखास केळवणाची आमंत्रणे मिळतात. मंगलकार्यापूर्वी घरच्या सदस्यांना आप्तस्वकीयांकडून जेवायला, मेजवानीला बोलावले जाते. हेच ते केळवण. यासाठी गडगनेर असा दुसरा शब्दही आहे. याचा उच्चार गडंगनेर किंवा गडंगणेर असाही होतो. हा बरोबर की चूक हे ठरवण्यापेक्षा त्याच्या अर्थाकडे जरा जाऊ या. गडू आणि नीर यापासून हा शब्द बनला आहे. गडू म्हणजे पाण्याचा तांब्या आणि नीर म्हणजे पाणी. गडगनेर म्हणजे नुसतेच तांब्याभर पाणी नव्हे तर पाहुण्यांसाठी मेजवानी, अशा अर्थाने तो वापरला जातो.

जेवणासाठी केळीची पाने वापरण्याची प्रथा फार पूर्वीपासून आहे. केळीचा उगम हा भारतात विशेषत: पश्चिम घाट आणि ईशान्य भारतात मानला जातो. मुसा अ‍ॅक्युमिनाटा आणि मुसा बाल्बिसिआना या प्रजाती, आज आढळणाऱ्या सर्व जातींच्या केळ्यांच्या मूळ जाती समजल्या जातात. त्यापैकी सर्व जातींच्या केळ्यांच्या मूळ जाती समजल्या जातात. त्यापैकी मुसा अ‍ॅक्युमिनाटा या मूळ जातीचा उगम दक्षिण-पूर्व आशियात (भारतातील प.घाट आणि ईशान्य भारत) समजला जातो. सुमारे ८-१० हजार वर्षांपूर्वी मानवाने या दोन जातींपासून विविध संकरित जाती निर्माण केल्या. आज जगातील केळीच्या एकूण उत्पादनातील १८ टक्के उत्पादन भारतात होते. केळ्याला संस्कृतमध्ये रंभा आणि कंदल: असे शब्द आहेत. तर सांगण्याचा उद्देश हा की, आर्याच्या आगमनापूर्वी कित्येक शतके केळ ही वनस्पती आपल्याला माहिती होती. तिच्या पाना, फुलांचा, फळांचा, तंतूंचा वापर आप करत होतो. तर या केळीपुराणावरून पुन्हा केळवणाकडे वळू. केळवण म्हणजे काळजी घेणे किंवा काळजीपूर्वक सांभाळणे, असाही एक अर्थ आहे. केळीची लागवड केल्यास त्या पिकाची नीट मशागत करावी लागते. काळजी घ्यावी लागते. नाहीतर केळीची रोपे सुकून जातात. त्यामुळे लग्न ठरलेल्या वधूची माहेरी ज्याप्रमाणे काळजी घेतली जाते, त्याप्रमाणे ती सासरीही घेतली जावी, हा कदाचित केळवणामागील मूळ उद्देश असावा.

केळवण झालेल्या मुलीला केळवली असे म्हणतात. अशा मुलीला सासरचे वेध लागलेले असतात. इतके दिवस माहेरात गुंतलेले तिचे मन आता सासरी धाव घेऊ लागते. ती माहेराविषयी उदासीन राहू लागते. केळवली नवरीची ही भावावस्था स्वत: ज्ञानेश्वरांनी एका ओवीत टिपली आहे. ज्ञानी व्यक्तीचे वर्णन करताना ते म्हणतात, केळवली नवरी माहेराविषयी जशी उदासीन असते, तसा ज्ञानी माणूस जगण्याविषयी उदासीन असतो. न मरताच तो आपल्या अंत:करणाला मृत्यूची सूचना देतो. ती ओवी अशी –

ना तरी केळवली नोवरी।

कां संन्यासी जियापरी।

तैसा न मरतां जो करी।

मृत्युसूचना।

ज्ञानदेवांच्या अलौकिक उपमांवर आपण सामान्य काय भाष्य करणार? परंतु त्यांच्या काळात किंबहुना त्याही आधी काही शतके केळवण घालण्याची प्रथा महाराष्ट्रात रूढ होती एवढे मात्र त्यातून दिसून येतं. मुख्य म्हणजे केळवण हा काही संस्कृतातून पुढे आलेले किंवा संकरित झालेला शब्द नाही. तो अस्सल मराठी आहे.

शब्दबोध : बुंथ

word-sense-article-1861794

141  

गोविंद पोवळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गायलेलं ‘रात्र काळी घागर काळी’ हे गाणे अनेकदा ऐकलेले असते. ‘रात्र काळी घागर काळी’ या नावाची चिं.त्र्यं.खानोलकरांची कादंबरीही बरीच गाजली होती. तर या गाण्यामध्ये भेटतो, ‘बुंथ’ हा शब्द.

रात्र काळी घागर काळी ही सोळाव्या शतकातील विष्णुदास नामा नावाच्या संत कवीची रचना. रात्र काळी, घागर काळी, यमुनेचे जळ काळे, बुंथ काळी, बिलवर काळी, गळ्यातील मोत्याची एकावळी काळी, काचोळी काळी हे सर्व परिधान केलेली नायिका नखशिखांत काळी आणि तिचा एकलेपणा घालवणारी कृष्णमूर्तीही काळी.

काळा रंग हा आपली दृक्-संवेदना शून्यावर आणतो. जणू काही कृष्णविवर. या गाण्यातील कृष्णभक्तीचे आकर्षण कृष्णविवरासारखे आहे. त्यात शिरले की बाहेर पडणे अशक्य अगदी प्रकाशदेखील. अशी ही सुंदर रचना. त्यातील बुंथ हा शब्द नवखा.

त्याचा अर्थ शब्दकोशात शोधला. बुंथ म्हणजे डोक्यावरून सर्व शरीरभर आच्छादनासाठी घेतलेले वस्त्र, ओढणी, खोळ. तसेच बुरखा किंवा घुंगट. तसेच रूप किंवा वेश या अर्थानेही बुंथ हा शब्द वापरलेला आढळतो.(होतों दाशरथी तुम्ही वसुमती घ्या वानराच्या बुंथी)

विशेष म्हणजे बुंथ हा शब्द ज्ञानेश्वरीतही आच्छादन या अर्थाने आलेला आहे.

सहाव्या अध्यायातील

जैसी आभाळाची बुंथी

करूनि राहे गभस्ती

मग फिटलिया दीप्ति धरूं नये  २५१

किंवा त्याच अध्यायातील

नातरी कर्दळीचा गाभा

बुंथी सांडोनी उभा

कां होता चमत्कार पिंडजनी   २९५

या ओव्यांत बुंथ हा शब्द ‘आच्छादन’ या अर्थाने वापरला आहे. एकंदरीत विष्णुदास नामा यांच्या अजरामर काव्यामुळे बुंथ शब्द विस्मरणात जाण्यापासून वाचला असे म्हणता येईल.

या ठिकाणी या काव्यरचनेच्या दुसऱ्या एका वैशिष्टय़ाकडे आपले लक्ष वेधायचे आहे. ‘ळ’ हे अक्षर मराठी भाषेचे वैशिष्टय़ म्हणून ओळखले जाते. मराठीतील अनेक शब्द संस्कृतोद्भव असले किंवा संस्कृत ही मराठीप्रमाणे सर्व भारतीय भाषांची जननी म्हणून ओळखली जात असली तरी ‘ळ’ हे अक्षर संस्कृतमध्ये नाही. तसेच हिंदीमध्येही नाही. अशा या वैशिष्टय़पूर्ण ‘ळ’ अक्षराचा मराठी काव्यात फारसा वापर केलेला आढळत नाही. या संदर्भातील गदिमांचा किस्सा अनेकांना  माहीत असतो. तो असा, एकदा पुलंनी गदिमांजवळ अशी तक्रार केली की ‘ळ’  हे अक्षर मराठी काव्यात फारसे आढळत नाही, कारण त्याचा वापर काव्यात करणे अवघड आहे. तेव्हा गदिमांनी तेथल्या तेथे ‘ळ’चा मुक्त वापर केलेले काव्य रचले आणि ते म्हणजे ‘घननिळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा.’ गंमत म्हणजे विष्णुदास नाम्याच्या या रचनेतही ‘ळ’ अक्षराचा असाच मुक्त वापर केलेला आहे.

काळी, जळी, गळा मोती, एकावळी, काचोळी, सावळी असे अंती ‘ळ’ अक्षर असलेले शब्द या रचनेत आहेत. गदिमांचाही संत वाङ्मयाचा गाढा अभ्यास होता. त्यांची काव्यशैली सुबोध, सुगम आणि अर्थवाही असण्यामागे या अभ्यासाचाही मोठा वाटा होता.

शब्दबोध : भारूड

article-about-word-sense-bharud

200  

सामान्य लोकांना सोप्या भाषेत अध्यात्माची शिकवण देण्यासाठी संतांनी ओवी, अभंग,भारूड अशा वेगवेगळ्या काव्यरचना केल्या. त्यातील जनसमुदायासमोर नाटय़मय रीतीने सादर केली जाणारी रूपकात्मक रचना म्हणजे भारूड. एकनाथपूर्व कालात ज्ञानेश्वर आणि नामदेव यांनी तर एकनाथांच्या पश्चात तुकाराम आणि रामदास यांनीही भारुडे रचली. असे असलं तरी एकनाथांचीच भारुडे सर्वात लोकप्रिय झालेली आढळतात. त्यामुळेच ‘ओवी ज्ञानेशाची’ , ‘अभंग तुकयाचा’ तसं ‘भारूड नाथांचं’ असं म्हटलं जातं.

‘भारूड’ या शब्दाची निश्चित उत्पत्ती सांगणं कठीण आहे. काहींच्या मते ‘बहुरूढ’ या शब्दापासून भारूड शब्द तयार झाला असावा. भारुडांचे विषय जोशी, पिंगळा, सन्यासी, माळी, जंगम अशा विविध समाजरूढींवर आधारलेले आहेत म्हणून ते बहुरूढ समजले जाते. याशिवाय ‘भा’ म्हणजे तेज त्यावर आरूढ झालेले ते भारूड किंवा भिरूंड नावाच्या द्विमुखी काल्पनिक पक्ष्याप्रमाणे एकाच वेळी दोन भिन्न अर्थ अभिव्यक्त करणारे म्हणून भारूड अशीही व्युत्पत्ती मानली जाते. यासोबतच भराडी जमातीत परंपरेने रूढ झालेले गीत म्हणजे भारूड असाही एक समज प्रचलित आहे.

एकनाथांच्या भारुडाचे वर्णन ‘आध्यात्मिक आणि नतिक शिक्षण देणारे मराठीतील रूपकात्मक नाटय़-गीत’ असे केले जाते. नाथांच्या भारुडांची संख्या जशी विपुल आहे तसेच त्यांचे विषयही विविध आहेत. बायला, दादला, भुत्या, वाघ्या, विंचू, कुत्रा, एडका इत्यादी विविध विषयांचे एकनाथ जे अचूक वर्णन करतात त्यावरून त्यांच्या सूक्ष्म आणि चौफेर निरीक्षणाची कल्पना येते. शिवाय अशा साध्या साध्या विषयांतून अध्यात्माचा गहन आशय ते ज्या प्रकारे व्यक्त करतात त्यातून त्यांची अलौकिक कल्पनाशक्ती आणि बुद्धिमत्ता प्रकट होते.

विंचू, दादला अशा बहुतेक भारुडांना विनोदाची झालर आहे. त्यामुळे भारुडाचे सादरीकरण लोकांना नेहमीच मनोरंजक वाटते. पण त्यातील आध्यात्मिक आशय साऱ्यांनाच उलगडतोच असे नाही. त्या दृष्टीने ‘कोडे’ हे भारूड बघा –

नाथाच्या घरची उलटी खूण। पाण्याला मोठी लागली तहान।

आत घागर बाहेर पाणी। पाण्याला पाणी आले मिळोनी।

यातील ‘पाण्याला मोठी लागली तहान’ याचा अर्थ आहे, ‘नाथांच्या आत्म्याला लागलेली परमात्म्याची ओढ.’ आता हा अर्थ साऱ्यांनाच सहज समजेल असे नव्हे. तरीही एकंदरीत नाथांची भारुडे रंजक आणि उद्बोधक आहेत, यात शंका नाही. या भारूड शब्दावरून आणखी एक वाक्प्रचार रूढ आहे. एखाद्या कार्यक्रमात एखादा माणूस फार वेळ कंटाळवाणे बोलू लागला की त्याला म्हणतात, काय भारूड लावलंय. आता ही अर्थछटा या शब्दाला नक्की कोणाच्या भारूड लावण्यामुळे मिळाली, ते काही माहिती नाही. पण आता या शब्दाबद्दल बोलणे इथेच थांबवायला हवे, नाहीतर वाचक हो, तुम्हीच म्हणाल, काय भारूड लावलंय!

शब्दबोध : लवथवती

article-about-word-sense-9

238  

हा शब्द ‘लवथवणे’ या क्रियापदापासून तयार झालेला आहे. काही काही शब्दांना त्यांची स्वत:ची लय असते. सळसळ, झुळझुळ, थुईथुई असे शब्द नुसते वाचले तरी ती लय आपल्याला जाणवते. लवथवती हा शब्ददेखील असाच. शंकराच्या आरतीत तो आपल्याला भेटतो. या आरतीची सुरुवातच मुळी लवथवतीने होते.

शंकराची ही आरती रामदासांनी लिहिली आहे. समाजात चतन्य निर्माण करण्यासाठी रामदासांनी अनेक आरत्या लिहिल्या. मारुतीची आरतीसुद्धा त्यांनीच लिहिली. त्या आरतीचा नादच असा आहे की ती म्हणताना अंगात बळ संचारते. शंकराच्या आरतीतही त्यांनी शंकराचे असेच वर्णन केले आहे.

सृष्टीच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय अशा तीन अवस्था मानल्या जातात. शंकर ही या तीन अवस्थांपकी लयाची देवता मानली जाते. शंकराने रुद्रावतार धारण केला की सृष्टीचा लय होतो असा समज आहे. या ब्रह्मांडाच्या अक्राळविक्राळ माळा त्याच्या नियंत्रणाखाली लवथवतात, डोलतात हे ‘लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा’ या ओळीत वर्णिले आहे.

परंतु या लवथवती शब्दाबद्दल पुलंनी एक वेगळी तक्रार केली आहे. आपल्या ‘मी नाही विसरलो’ या लेखात पुलं म्हणतात, ‘लवथवती विक्राळातला लवथवती फक्त गणपतीच्या दिवसात भेटतो. लवथवतीला त्या आरतीखेरीज लवथवायला का मिळाले नाही? का ही उपेक्षा?’

पण खरं म्हणजे शंकराच्या आरतीखेरीज आणखी एका काव्यात लवथवती लवथवला आहे. तेही साध्यासुध्या नव्हे तर अनिलांसारख्या श्रेष्ठ कवीच्या काव्यात. त्यांची सर्वात शेवटची कलाकृती मानली जाणारी म्हणजे ‘दशपदी’ हा कवितासंग्रह. त्यातील ‘तुझ्याविना’मध्ये हा शब्द भेटतो.!

हा काव्यप्रकार अनिलांनी मराठीत रूढ केला. त्यांच्या ‘दशपदी’ या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसं पाहिलं तर दशपदी काव्यसंग्रहात एकूण चाळीस दशपदींचा समावेश आहे. परंतु चाळिसावी ‘हा आनंदाचा दिस’ ही दशपदी अपूर्ण आहे. त्यामध्ये नऊ पदे आहेत. त्यामुळे एकूण उरलेल्या दशपदी एकोणचाळीस. त्यातील ही एकोणचाळिसावी दशपदी आहे ‘तुझ्याविना.’

कवी अनिल म्हणजेच आ. रा. देशपांडे. त्यांची पत्नी कुसुमावती यासुद्धा मोठय़ा साहित्यिक. प्रत्यक्ष जीवनात हे दाम्पत्य एकमेकांशी अगदी एकरूप झाले होते. मराठी साहित्यात कुसुमावती आणि अनिल यांचं सुंदर सहजीवन अजोड समजलं जातं.

कुसुमावतींच्या निधनानंतर अनिल एकटेपणामुळे कोळपत गेले. त्यातूनच त्यांना ‘तुझ्याविना’ ही दशपदी सुचली. यातील एकेक ओळ म्हणजे अगदी खणखणीत नाणं आहे. या दशपदीत ‘लवथवती’ हा शब्द कसा आला आहे पाहा –

लवथवत्या पानावर गहिवरते भर दुपार

ज्वर भरला दिवस ढळे कसा तुझ्याविना

या ओळींबद्दल अनिल लिहितात,  ‘ही दुपार पानांना लवथवती करणारी. हा शब्द लवथवती विक्राळा या आरतीतला- पण तीच तेव्हा गहिवरते. तिच्या तोडीची दुसरी ओळ सुचणं कठीण वाटलं. पण ती गळाला लागली. ज्वर का? तर these were days of feverish activity.. दिवस ढळला अंधार आला.’

हे वाचल्यानंतर एक विचार डोक्यात आला. पुलंनी मांडलेली लवथवती शब्दाची कैफियत तर अनिलांच्या कानांवर गेली नसेल? कुणास ठाऊक. म्हणजे हा काही दावा नाही, सहज एक विचार आहे. पण एक नक्की तसे झाले असो वा नसो या कवितेमुळे ‘लवथवती’ या शब्दाचे आणि पर्यायाने वाचक म्हणून आपलेही भाग्य मात्र निश्चितच उजळले.

शब्दबोध : अक्षता

article-about-word-sense-7

2180  

अक्षता हा शब्द आपल्या अगदी चांगला परिचयाचा. लग्नाच्या वयाचा तरुण मुलगा किंवा मुलगी घरात असेल तर यांच्या डोक्यावर कधी एकदा अक्षता पडतात, अशी काळजी बहुतांश माता-पित्यांना लागलेली दिसते. लग्नाच्या हंगामात तर कधी कधी एकाच तिथीची दोन आमंत्रणं येतात. अशा वेळी एका लग्नाच्या पहिल्या मंगलाष्टकाला अक्षता टाकून मंडळी दुसऱ्या लग्नाचं शेवटचं मंगलाष्टक गाठण्याची चतुराई दाखवतात. ही झाली गमतीची बाब पण लग्न आणि अक्षता यांचे नाते असे अतूट.

अक्षता या शक्यतो अखंड तांदळाच्याच घेण्याची एक पद्धत आहे. तुकडा तांदूळ त्याला चालत नाही, कारण अक्षत म्हणजे जे क्षत किंवा भंगलेले नाही ते. अक्षता हे प्रतीक आहे. काहींच्या मते त्यातून वधूचे कौमार्य सूचित होते. म्हणून अक्षतांचे तांदूळ अखंड असतात. गीर्वाणलघुकोशात याचा अर्थ पुरुषसंबंधरहित स्त्री असा दिलेला आहे. या शब्दाला अक्षतयोनि: असा पर्यायी शब्दही दिला आहे. काही मान्यतांच्या आधारे, यातून वधूच्या घरची सुबत्ता सूचित होते. तांदूळ हे भारतीयांचे मुख्य अन्न. लग्नाला उपस्थित असलेले नातेवाईक, आप्त, मित्र-परिवार तांदळाच्या अक्षता वधू-वरांच्या डोक्यावर टाकतात. वधूच्या घरी अन्नाची कमतरता नाही, म्हणून ते अशा अक्षता टाकू शकतात. पण याहीपुढे जाऊन एक वेगळाच विचारही आहे, अक्षतांचे तांदूळ हे एकप्रकारे बीजच असते. हे बीज रुजले की तांदळाचे रोप तयार होते. तांदळाच्या एका दाण्यापासून असे अनेक दाणे, पर्यायाने अनेक रोपे तयार होतात. म्हणजेच वंशवृद्धी होते. जैवसातत्य राखले जाते. लग्नात वधू-वरांच्या संसारवेलीलाही अशीच फलधारणा होऊन वंशवृद्धी व्हावी, असा भावही या अक्षतांमागे असावा असे वाटते.

निसर्गातही अक्षतांचा एक सोहळा चालू असतो. खरं म्हणजे निसर्ग स्वत:च अशी अक्षतांची उधळण दर वर्षी करत असतो. वसंत ऋतूत रानातील विविध प्रजातींच्या झाडांना फुलोरा येतो. त्यांना शेंगा, फळे लगडतात. पावसाळ्याच्या आधी काहींमधून कापसाच्या म्हाताऱ्या तयार होतात. वाऱ्यासवे त्या दूरवर पोहोचतात. पशू-पक्षी काही फळे खातात. त्यांच्या विष्ठेतून या फळांच्या बियांचा प्रसार होतो. निसर्ग अशा प्रकारे लक्षावधी अक्षता ग्रीष्मात उधळत असतो. त्यानंतर वर्षां ऋतू येतो आणि सृष्टीचा सृजनकाळ सुरू होतो.

जाता जाता एक छोटीशी गंमत म्हणजे, निसर्गाचा अक्षता उधळण्याचा काळ एप्रिल-मे महिन्यात असतो. आणि लग्नसराईचा म्हणजेच अक्षता उधळण्याचा आपला हंगामही तेव्हाच असतो. आहे की नाही गंमत!

मराठी व्याकरण : वाक्यविचार

marathi-grammar-preparation-for-competitive-exam/articleshow/vakya prachar

58  

वाक्य म्हणजे पूर्ण विधान करणारा एक किंवा अनेक शब्दांचा समूह हे आपल्याला माहीत आहेच. आपल्या आजच्या वाक्यविचार या घटकासंदर्भात ज्येष्ठ कोशकार वि. वा. भिडे यांचा एक विचार इथे सारांशाने उद्धृत करावासा वाटतो. ते लिहितात, 'भाषेतील मूळ शब्दांची रूपे तयार करणे, रूपे तयार झाल्यावर ती वाक्यात मांडणे आणि मनात आलेला विचार मांडण्याची धाटणी या तीन बाबींसंदर्भात भाषेचा जो विशेष असतो तो त्या भाषेचा स्वभाव असतो. व्याकरणाच्या अभ्यासाने भाषेचा बाह्य स्वभाव कळतो, तर नवीन शब्द तयार करण्याची आणि ते सामावून घेण्याची धाटणी यातून तिचा गूढ स्वभाव समजून घेता येतो. यानुसार व्याकरणाच्या अभ्यासातून आणि श्रवण, संभाषण, भाषण, वाचन, आणि लेखन या भाषाविषयक कौशल्यांच्या अंगिकारातून भाषेच्या दोन्ही स्वभावांची बऱ्याच अंशी उकल होते, असे मला वाटते. 

आजच्या वाक्यविचारामध्ये आपण मुख्यतः विभक्ती, प्रयोग, वाक्यांचे प्रकार, वाक्य पृथक्करण, वाक्यरुपांतर अशा विविध घटकांची थोडक्यात माहिती पाहणार आहोत. 

विभक्ती : आठ विभक्ती आणि त्यांचे प्रत्यय, प्रत्ययांमुळे क्रियापदाशी येणारे संबंध यावरून ठरणारे कारकार्थ आणि इतर शब्दांशी येणाऱ्या संबंधांवरून ठरणारे उपपदार्थ ही संकल्पना समजून घ्यावी. प्रत्ययांचा तक्ता पाठच करायला हवा. 

प्रयोग : वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या परस्परसंबंधाला प्रयोग असे म्हणतात. प्रयोगाचे मुख्य प्रकार तीन : कर्तरी, कर्मणी आणि भावे. क्रियापदाच्या रूपावर कर्ता किंवा कर्म यांपैकी ज्याचा प्रभाव असतो, त्याला धातुरुपेश (धातु + रूप + ईश) म्हणतात. या धातुरूपेशावर प्रयोगाचा प्रकार ठरतो. 

प्रयोगासंबंधी महत्त्वाचे 

प्रयोगात प्रथमान्त पदाला महत्त्व असते. त्यामुळे ज्या पदाला प्रत्यय लागला आहे ते पद प्रयोग ठरविते. 

कर्ता प्रथमेत तर कर्तरी प्रयोग असतो. कर्ता प्रथमेत नसेल आणि कर्म प्रथमेत (किंवा अप्रत्ययी द्वितीयेत) असेल तर कर्मणी प्रयोग. 

उदा. शेतकरी शेती करतो. (कर्तरी प्रयोग) 

शेतकऱ्याने शेती केली. (कर्मणी प्रयोग) 

कर्ता व कर्म यांपैकी एकही पद प्रथमेत नसेल तर तो फक्त भावे प्रयोग. 

उदा. मुलाने मांजराला गोंजारले. 

तिन्ही प्रयोगात जेव्हा प्रथमपुरुषी (मी, आम्ही ) व द्वितीय पुरुषी (तू, तुम्ही) सर्वनामे कर्ता म्हणून येतात तेव्हा विभक्ती ओळखण्याची खूण म्हणजे या सर्वनामांच्या जागी तो, ती, ते, त्या अशा तृतीयपुरुषी सर्वनामांचा उपयोग करून पाहावा. जर त्या जागी त्याने, तिने, त्यांनी अशी रूपे आली तर तिथे तृतीया विभक्ती. 

उदा. मी वाचन करते - ती वाचन करते - प्रथमा - कर्तरी 

मी वाचन केले - (ती) तिने वाचन केले - तृतीया - कर्मणी 

वाक्यांचे प्रकार : वाक्यांच्या अर्थानुरोधाने मुख्य तीन प्रकार : १. माझे वडील परगावी राहतात. 

(विधानार्थी) २. तू मुंबईला केव्हा जाणार? (प्रश्नार्थी) ३. बापरे ! केवढी ही गर्दी ! (उद्गारार्थी) 

वाक्यरुपांतराच्या दृष्टीने दोन प्रकार - १. पुढारी भाषणे देतात. (होकारार्थी किंवा करणरूपी) 

२. गावात स्वच्छता नव्हती. (नकारार्थी किंवा अकरणरूपी) 

क्रियापदाच्या रूपावरून चार प्रकार - १. मुले घरी गेली. (स्वार्थी) २. मुलांनो चांगला अभ्यास करा. 

(आज्ञार्थी) ३. माझी परीक्षेत निवड व्हावी (विध्यर्थी) ४. पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता. (संकेतार्थी) 

वाक्यशास्त्रानुसार तीन प्रकार - १. पाऊस सुरू झाल्यावर तळी वाहू लागली. (केवल) २. जेव्हा पाऊस सुरू झाला तेव्हा तळी वाहू लागली. (मिश्र) ३. पाऊस सुरू झाला आणि तळी वाहू लागली (संयुक्त) 

वाक्यरुपांतर : वाक्यरूपांतरात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाक्याचा अर्थ न बदलता प्रकार बदलणे. 

उदा. अपमान केल्यावर कोणाला राग येत नाही ? (नकारार्थी, प्रश्नार्थी) 

अपमान केल्यावर प्रत्येकाला राग येतोच ( होकारार्थी, विधानार्थी) 

वाक्य पृथक्करण : वाक्यातील विविध शब्दांचा परस्परांशी कोणता संबंध आहे हे विशद करणे यालाच वाक्यपृथक्करण म्हणतात. वाक्यामध्ये बोलणारा ज्याच्याबद्दल बोलतो तो उद्देश्य (कर्ता) आणि उद्देश्याविषयी जे बोलतो ते विधेय (क्रियापद) अशी ढोबळ विभागणी करता येते. त्यानंतर या उद्देश्य आणि विधेयाबाबत अधिक माहिती सांगणारे वाक्यातील जे शब्द असतात त्यांचे उद्देश्यविस्तार, कर्म, कर्मविस्तार, विधानपूरक, विधेयविस्तार अशा अनेक गटांमध्ये वर्गीकरण होते. 

एकूणच वाक्यविचार हा घटक वरवर पाहता काहीसा क्लिष्ट वाटला तरी समजून घेतल्यावर सोपा जातो. परीक्षेच्या दृष्टीने विविध प्रकारातील वाक्यांचा अभ्यास करून परस्पररुपांतर करण्याचा सराव करावा. यातून सर्व प्रकारांचे बारकावे लक्षात येतात. 


Top