भारताची स्वातंत्र्य चळवळ

independence movement of india

5772   05-Jun-2018, Tue

आजच्या लेखामध्ये आपण आधुनिक भारताअंतर्गत येणारी भारतीय स्वातंत्र्य चळवळ या विषयाची पूर्वपरीक्षेसाठी तयारी कशी करावी, याची चर्चा करणार आहोत. या विषयावर २०११ ते २०१७ मध्ये एकूण ३६ प्रश्न विचारण्यात आलेले होते.

भारतीय स्वातंत्र्य चळवळ या विषयाची तयारी करताना प्रामुख्याने भारतीय राष्ट्रवाद आणि त्याच्या उदयाची कारणे, विविध प्रादेशिक राजकीय संघटना, १८८५ मधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आणि येथून पुढे स्वातंत्र्यप्राप्तीसाठी संघटित पद्धतीने सुरू झालेला लढा, त्याचबरोबर राष्ट्रीय चळवळीची सर्वसाधारणपणे तीन टप्प्यांतील विभागणी अभ्यासणार आहोत.

मवाळ अथवा नेमस्त कालखंड (१८८५-१९०५), जहालवादी कालखंड (१९०५-१९१९) आणि गांधी युग (१९२० -१९४७) तसेच याला समांतर असणारे भारतीय स्वातंत्र्य चळवळीमधील इतर प्रवाह. या प्रवाहांमध्ये कामगार चळवळ, क्रांतिकारी चळवळ इत्यादींचा समावेश होतो. याचबरोबर स्वराज पार्टी, आझाद िहद सेना, भारतीय स्वातंत्र्य चळवळीमधील महिलांचे योगदान, भारतीय सांप्रदायिकतेचा उदय, मुस्लीम लीग, हिंदू महासभा, भारतीय संस्थाने व संस्थानामधील प्रजेच्या चळवळी, खालच्या ज्ञातीतील चळवळी, आधुनिक भारताच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण व्यक्ती तसेच गव्हर्नर जनरल (व्हाइसरॉय) आणि भारतमंत्री, १८५७च्या नंतरचे ब्रिटिश संसदेने पारित केलेले कायदे- १८५८, १८६१, १८९१, १९०९, १९१९, १९३५ व १९४७ ज्यांना आपण ब्रिटिशकालीन भारतातील घटनात्मक विकास म्हणून पाहतो तसेच सायमन कमिशन, गोलमेज परिषद, ऑगस्ट ऑफर, क्रिप्स मिशन, वॉवेल प्लॅन, कॅबिनेट मिशन इत्यादीशी संबंधित मूलभूत माहिती असणे गैरजेचे आहे.

गतवर्षीय परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न व त्यांचे स्वरूप

२०११ मध्ये, १९४२ च्या चले जाव चळवळीचे कोणते निरीक्षण सत्य नाही? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यासाठी पर्याय होते

१) ही एक हिंसक चळवळ होती, २) याचे नेतृत्व महात्मा गांधीजींनी केले होते, ३) ही एक उत्स्फूर्त चळवळ होती आणि ४) कामगारांना आकर्षति करून घेता आले नाही असे चार पर्याय दिलेले होते, यातील अचूक निरीक्षण ओळखून योग्य पर्याय निवडायचा होता.

२०१२ मध्ये, भारतीय राष्ट्रीय चळवळीमध्ये दादाभाई नौरोजींचे सर्वात महत्त्वाचे योगदान कोणते होते? हा प्रश्न विचारण्यात आला होता. यासाठी

१) ब्रिटिशांकडून भारतीयांची होणारी आर्थिक पिळवणूक उघड केली, २) प्राचीन भारतीय साहित्याचा अर्थ स्पष्ट करून भारतीयांचा आत्मविश्वास वाढविला आणि ३) काही करण्यापूर्वी सामाजिकदृष्टय़ा दुष्ट प्रवृत्तीचे उच्चाटन करण्याच्या गैरजेवर भर दिला. अशी तीन विधाने देण्यात आलेली होती. यापैकी योग्य विधान/विधाने कोणती हे निवडायचे होते.

२०१३ मध्ये, इलबर्ट बिल कशाशी संबंधित होते? त्यासाठी

१) भारतीयांना शस्त्र बाळगण्यासाठी निश्चित स्वरूपाचे निर्बंध लादणे, २) भारतीय भाषांमध्ये प्रकाशित होणारी वृत्तमानपत्रे आणि मासिकावर निर्बंध लादणे, ३) युरोपियन लोकांवर खटला चालविण्यासाठी भारतीयांना घातलेली अपात्रता काढून टाकणे आणि ४) आयात केलेल्या सुती कपडय़ांवरील कर काढून टाकणे. असे चार पर्याय देण्यात आलेले होते. यातील योग्य पर्याय कोणता असे विचारण्यात आलेले होते.

२०१४ मध्ये, १९२९ चे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन भारतीय इतिहासामध्ये का महत्त्व पूर्ण मानले जाते? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यासाठी

१) स्व-सरकार मिळविणे हे काँग्रेसचे उद्दिष्ट आहे ही घोषणा केली, २) पूर्ण स्वराज मिळविणे हा काँग्रेसचा उद्देश आहे, याची घोषणा केली,

३) असहकार चळवळ सुरू करण्यात आली आणि ४) लंडनमध्ये होणाऱ्या गोलमेज परिषदेत सहभाग घेण्याचा निर्णय घेण्यात आला. असे चार पर्याय देण्यात आलेले होते आणि यातील योग्य पर्याय निवडायचा होता.

२०१५ मध्ये, खालीलपैकी कोणत्या चळवळीमुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विभाजन होऊन मवाळवादी आणि जहालवादी गटांचा उदय झाला? असा प्रश्न होता. त्यासाठी

१) स्वदेशी चळवळ, २) चले जाव चळवळ, ३) असहकार चळवळ आणि ४) सविनय कायदेभंग चळवळ हे चार पर्याय देण्यात आलेले होते. यातून योग्य पर्याय निवडायचा होता.

२०१६ मध्ये, मोत्तेगु चेम्सफोर्ड प्रस्ताव कशाशी संबंधित होता? हा प्रश्न होता. यासाठी १)सामजिक सुधारणा, २) शैक्षणिक सुधारणा, ३) पोलीस प्रशासनातील सुधारणा आणि ४) घटनात्मक सुधारणा असे पर्याय देण्यात आलेले होते. यातील योग्य पर्याय निवडायचा होता.

२०१७मध्ये, बट्लर समिती, १९२९ चा ट्रेड डिस्पुट कायदा, १८८१ चा फॅक्टरी कायदा, तसेच द्विदलशासन पद्धती (ऊ८ं१ूँ८)  इत्यादीवर प्रश्न विचारण्यात आलेले होते.

या विषयाचा अभ्यास करताना आपणाला वस्तुनिष्ठ माहितीचे संकलन, तसेच व्यक्तिविशेष माहिती, विविध चळवळी आणि संबंधित घडामोडी, इत्यादी पलूंच्या आधारे या विषयाचे आकलन करणे गैरजेचे आहे. पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टीने त्या विषयांचे सखोल आणि व्यापक पलू लक्षात घेऊन तयारी करावी लागते. या विषयाची मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी बिपीन चंद्र लिखित आधुनिक भारतावरील जुने एनसीईआरटीचे पुस्तक अभ्यासावे. त्यानंतर या विषयाचा अधिक सखोल अभ्यास करण्यासाठी बिपीन चंद्र लिखित इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स, बी. एल. ग्रोवर आणि बी. एस. ग्रोवर लिखित आधुनिक भारताचा इतिहास, सुमित सरकार लिखित आधुनिक भारत इत्यादी संदर्भग्रंथ वाचावेत. या संदर्भग्रंथांवर आधारित स्वतच्या नोट्स तयार कराव्यात, जेणेकरून हा विषय कमीतकमी वेळेमध्ये अभ्यासला जाऊ शकतो.

भारताचा सांस्कृतिक वारसा - २

India's cultural heritag-2

3038   25-Jan-2018, Thu

आधीच्या लेखात आपण प्रजासत्ताक दिनी प्रदर्शित करण्यात आलेल्या काही चित्ररथांची माहिती घेतली. २०१७ साली प्रदर्शित केलेले आणखी काही चित्ररथ आपण बघू.

त्रिपुराची होजागिरी

होजागिरी हा त्रिपुरातील रिआंग जमातीचा (त्यांनाच ब्रु असेही म्हणतात) नृत्यप्रकार आहे. हे नृत्य महिला व तरुण मुलींकडून सादर केले जाते. यात प्रत्येक टीममध्ये ४ ते ६ सदस्य असतात. त्या गायन करतात व त्याचवेळी डोक्यावर दिवा तेवणारी बाटली, हातात फिरत्या पराती यांचा तोल साधतात.

होजागिरी सणाच्या वेळी हे नृत्य केले जाते व त्याला पूरक म्हणून बासरी, झाज यांचे वादन केले जाते. होजागिरी पौर्णिमेच्या दिवशी नवरात्रात साजरा केला जातो. त्याला लक्ष्मीपूजा असेही म्हणतात.

पश्चिम बंगालचा शारदोत्सव

शरद ऋतूच्या सुरुवातीला ग्रामीण बंगालमध्ये पांढरेशुभ्र काशफुल नावाचे गवत हिरव्यागार पार्श्वभूमीवर दिसू लागले, तर समजून जा दुर्गापूजेचा उत्सव जवळ आला आहे. (त्यालाच शरद उत्सव असे म्हणतात) शारदोत्सव फक्त धार्मिक न राहता त्याला आता लोकमहोत्सवाचे रूप प्राप्त झाले आहे. हा एक जगातील मोठा महोत्सव ठरला आहे. कलेची अभिव्यक्ती पूजा मंडपाचा अंतर्भाग व बाह्यभागात सगळीकडे दिसून येते. प्रशिक्षित कलाकारांनी शैलीदार पद्धतीने केलेले हे त्यांच्या कलेचे व पर्यायाने संस्कृतीचे प्रदर्शन असते.

पंजाबचे जागो आईया

शेकडो वर्षांपूर्वी विवाहाचे आमंत्रण निमंत्रणपत्रिकांनी दिले जात नसे. पंजाबी विवाहाच्या आदल्या रात्री 'जागो' हा ऊर्जेने सळसळता व साजसंगीताने नटलेला उत्सवी नाच त्यासाठी केला जाई. एक तेलदिव्याने सजवलेली घागर डोक्यावर घेऊन नृत्य केले जाई व जागो गीते म्हटली जात. वधूवराकडचे नातेवाईक घरोघरी जाऊन लोकांना जागे करत व समारंभात भाग घ्यायचा आग्रह धरत.

हिमाचलचा छम्बा रुमाल

हिमाचल प्रदेशच्या छम्बा नगरात अठराव्या शतकात विकसित झालेला छम्बा रुमाल हा पहाडी कलेचा सर्वोत्तम नमुना आहे. हातशिवणीच्या सॅटीन कापडावर रेशमाची दुहेरी शिवण घातली जाते. ती दोन्ही बाजूला सारखीच दिसते. त्याला 'दोरुखा' असे म्हणतात. या रुमालावर सहसा रासलीला, अष्टनायिका दाखवल्या जातात.

महाराष्ट्रात टिळकजयंती
२०१७ वर्ष हे लोकमान्य टिळकांच्या १६० व्या जयंतीचे वर्ष. राजकारणी, गणिती, पत्रकार, प्राध्यापक, लेखक, वक्ता अशा अनेक जबाबदाऱ्या लोकमान्यांनी लीलया पार पाडल्या. त्यांनी सुरू केले ल्या गणेशोत्सवाला आता १२५ वर्षे पूर्ण होतील.

गुजरातची जीवनशैली

कच्छ हा प्रचंड जिल्हा आपल्या कला व जीवनशैलीबद्दल अवघ्या जगात प्रसिद्ध आहे. १६ विविध प्रकारची कलाकुसर येथे केली जाते. त्यातही रोगण

कला (रोगण म्हणजे तिळाचे तेल वापरून तयार केलेले रंग, या रंगांनी कापडावर सुंदर चित्र काढली जातात), मातीकाम, भुंगा निर्मितीची कला

(भुंगा म्हणजे कच्छच्या वाळवंटात उभारलेली गोल घरे, त्यांच्या आतून व बाहेरून सुंदर नक्षीकाम केले जाते ज्याला भुंगा कला असे म्हणतात) येथली खासियत आहे.


आसामचे कामाख्या मंदिर

गुवाहाटीजवळील नीलांचल टेकड्यांवर वसलेले कामाख्या मंदिर देशातील प्रमुख शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. अंबूबाची यात्रेच्या काळात येथे भाविकांची गर्दी उसळते. येथे देवीची कुठलीही मूर्ती नाही. त्याऐवजी स्त्रीच्या योनिमार्गासारखी दिसणारी दगडामध्ये गुलाबी झाक असलेली नैसर्गिक चीर आहे. गुहेच्या अंतर्भागातून वाहणारे पाणी त्यातून झिरपत असते. ते स्त्रीच्या रजस्रावासारखे दिसते. असे मानतात की पेरणीच्या वेळी होणारा तो रजस्राव आहे. म्हणूनच जागेचे नाव 'का-माई-खा' म्हणजे रजस्राव होणारी माता असा आहे.

भारताचा लढाऊ वारसा

India's Battlefield Heritage

2302   04-Jun-2018, Mon

स्पर्धा परीक्षांमध्ये भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाबाबत आवर्जून प्रश्न विचारला जातो. युद्ध परंपरेतून आलेल्या सादरीकरणाच्या कला या वारशाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत.
 

पार्श्वभूमी

प्राचीन काळापासून युद्धात वापरली जाणारी तंत्रे आता मात्र सादरीकरण, विधीनाट्य, तंदुरुस्ती किंवा स्वसंरक्षण या कारणांसाठी वापरली जातात. या लढाऊ परंपरा नृत्य, योग आणि कला सादरीकरणाशीही जवळून जोडल्या गेल्या आहेत. यातील काही परंपरांवर ब्रिटिश काळात बंदी आली होती उदा. कलरीपयट्टू, सिलंबम, थांग टा इत्यादी. पण स्वातंत्र्योत्तर काळात त्या पुन्हा दृश्य झाल्या व लोकप्रिय ठरल्या.

कलरीपयट्टू

शोव्हलिन मास्टर्स, जॅकी चॅन यांचे स्वसंरक्षणपटूत्व (मार्शल आर्ट) आपल्याला चकीत करून टाकते. पण आपल्याला ही कल्पना नसते की, ही कला दक्षिण भारतातून पूर्व आशियात प्रसार पावली. कलरीपयट्टू भारतातील अत्यंत जुन्या अशा लढाऊ परंपरेतील एक आहे.

इ.स.नंतर चौथ्या शतकात केरळमध्ये तिचा उगम झाला. संगम साहित्यात त्याचा उल्लेख आहे. मल्याळम भाषेत कलरी म्हणजे या कलेचे प्रशिक्षण केंद्र. यात द्वंद्व खेळले जाते. (शस्त्रांनी किंवा नुसत्या हातांनी) या शैलीमध्ये लढा देण्यावर इतका भर आहे की, त्याला नगारा किंवा गाण्यांची साथ लागत नाही. कलरीपयट्टूचा भर वेगवान हालचाली व पदलालित्यावर असतो. त्यात लाथा, प्रहार यांचा समावेश असतो. 'अशोका' चित्रपटात याचे दर्शन घडले होते. स्त्रियासुद्धा या लढाऊ कलेत भाग घेतात.

थांग टा आणि सरित सारक

मणिपूरमधील मैतेई जमातीचा हा लढाऊ प्रकार आहे. (शर्मिला चानूपण मैतेईच आहे) थांग टा शस्त्रांनी लढले जाते, तर सरित सारकमध्ये फक्त हातांचा वापर केला जातो. सतराव्या शतकात ब्रिटिशांशी लढण्यासाठी मणिपूरच्या राजांनी या कलेचा वापर करून घेतला होता.

'थांग' म्हणजे तलवार, तर 'टा' म्हणजे भाला. थोडक्यात, तलवार व भाला ही थांग टाची अविभाज्य अंग आहेत. कधीकधी कुऱ्हाड व ढाल यांचाही वापर केला जातो. ढालीवर 'S' आकारातील साप रंगवलेला असतो. यालाच 'हुयेन लांगलोन' असेही म्हटले जाते. (म्हणजे युद्धकला) हे द्वंद्व प्रकाराने लढता येते किंवा एक योद्धा विरुद्ध अनेक किंवा एकाच वेळी अनेक जण यात भाग घेतात. स्त्रियाही यात सहभागी असतात.

चैईबी गड-गा

तलवार व ढाल यांचा वापर करून सादरी केली जाणारी चैईबी गड-गा ही मणिपूरमधील प्राचीन युद्धकला प्रसिद्ध आहे. आता मात्र चामड्याचे आवरण असलेली काठी व ढाल वापरली जाते. सपाट पृष्ठभागावर सात मीटरच्या वर्तुळात ही स्पर्धा भरवली जाते.

घटका

ही पंजाबमधील शिखांनी जोपासलेली शस्त्रसज्ज युद्धकला आहे. सादरीकरणाच्या वेळी दोन योद्धे मोठ्या लाकडी काठ्या घेऊन एकमेकांशी लढतात. मोठमोठी गोल चक्रे फिरवणे हा ही कौशल्याचा एक भाग असतो. आखाड्यांनी ही कला जिवंत ठेवली.

आज होला मोहल्ला या लष्करी कौशल्य दाखवणाऱ्या उत्सवाच्या वेळी याचे सर्वोत्तम सादरीकरण केले जाते. (रंग दे बसंती चित्रपटात त्याची झलक दाखवली होती) बाकी मग लग्नसमारंभ, बैसाखी, स्वातंत्र्यदिन अशा दिवशीही सादरीकरण केले जाते. सादरकर्त्यांना घटकेबाज म्हणतात.

पारी खांडा

राजपुतांनी तयार केलेली ही बिहारमधली युद्धकला आहे. ढाल तलवारीने ही लढाई खेळली जाते. यातील पदचापल्य व तंत्र छाऊ नृत्यातही वापरले जाते. 'पारी' म्हणजे ढाल तर 'खांडा' म्हणजे तलवार.

भारताचा सांस्कृतिक वारसा-१
 

India's cultural heritage1

6318   25-Jan-2018, Thu

भारताचा सांस्कृतिक वारसा या विषयाने स्पर्धा परीक्षांमध्ये महत्त्वाचे स्थान पटकावले आहे. मात्र तो इतका वैविध्यपूर्ण आहे की त्यातील कोणता भाग लक्षात ठेवायचा हे ठरवणे कठीण जाते. यावर एक युक्ती आहे.
 

चित्ररथ प्रदर्शन
दरवर्षी विविध राज्य चित्ररथाच्या माध्यमातून दिल्लीत आपल्या समृद्ध वारशाचे प्रदर्शन करतात. ६८व्या गणराज्य दिनी राजपथावरील परेडमध्ये १७ राज्ये व केंद्र सरकारच्या सहा मंत्रालयांनी आपले चित्ररथ सजवून सहभाग घेतला. त्यात त्यांनी भारताचा संपन्न सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक-आर्थिक विकास यांची दृश्य मांडणी केली. प्रमुख पाहुणे म्हणून अबुधाबीचे अमीर शेख महंमद बिन झायेद अल नहयान उपस्थित होते. ६८व्या गणराज्य दिनीच्या  चित्ररथांची आपण दोन लेखातून थोडक्यात माहिती घेऊ.

ओडिशाची ढोलजत्रा

ढोल जात्रा हा ओडिशा राज्यातील एक लोकप्रिय सण आहे. तो राधा देवी व भगवान कृष्ण यांच्या भक्ती संप्रदायातील संमेलनाचे प्रतीक आहे. हा सण होळीबरोबरच फाल्गुन-दशमीला साजरा केला जातो. सहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात राधा व कृष्ण यांचे गुणगान केंद्रस्थानी असते. फाल्गुन-दशमीला ग्रामदेवतांची विशेषतः कृष्णाच्या प्रतिमेची मिरवणूक 'विमान' नावाच्या रथातून घरोघरी नेली जाते. अबीराने माखलेला लोकसमूह गायन-नृत्य करत घरोघरी फिरतो.

अरुणाचलचे याक नृत्य

अरुणाचल मधल्या महायान बौद्ध पंथाचे याक नृत्य हे प्रसिद्ध मूकनाट्य आहे. शेकडो वर्षांपूर्वी एका जादुई पक्षाच्या मदतीने याकचा शोध लागला अशी आख्यायिका आहे. मुखवटा घातलेले नर्तक त्या शोध लावणाऱ्या घराण्याचे प्रतिनिधी असतात. याक ज्याला हिमालयातील उंट म्हटले जाते, तो बहुउपयोगी प्राणी असतो. असे म्हटले जाते की याकच्या शोधामुळे घराघरातील मालमत्तेची अंतर्गत भांडणे सुटली व याकमुळे संपूर्ण समाजासाठी चिरकालीन समृद्धीचा स्रोत निर्माण झाला. या नृत्यामुळे आपल्या आयुष्यातील अस्वस्थता व गुंतागुंत दूर होईल अशी आदिवासींची धारणा आहे. या चित्ररथाला यावर्षीचे (२०१७) सर्वोत्तम चित्ररथाचे बक्षीस मिळाले.

मणिपूर - लोई हारोबा

मणिपूरमधील मैतेई समूहाने प्राणप्रिय जपलेले लोई हारोबा हे जगातील एक जुने विधिनाट्य आहे. या पवित्र नाट्यात संपूर्ण समुदाय पूर्ण भक्तिभावाने सामील होतो. यात स्थानिक देवतांना देश व रहिवाशांना समृद्धी व शांती देण्यासाठी आवाहन केले जाते. या देवता झाडींमध्ये राहतात. या पवित्र समारंभाचे नेतृत्व नृत्य व विधींची तंत्रे अवगत असणाऱ्या मैईबी नावाच्या पुजारीणी करतात. त्या देवतांना झोपेतून जागे करतात. लोकसमूहदेखील या नृत्यात पारंपरिक तंतुवाद्य (पेना) आणि नगारा (लँगडेंग पुंग) घेऊन सहभागी होतात.

तामिळनाडू - काराकट्टम

तामिळनाडूच्या ग्रामीण भागात अम्मान (देवी) मंदिर उत्सवाचा 'काराकट्टम' हे लोकनृत्य अविभाज्य भाग आहे. यात नर्तक डोक्यावर ब्रासचे भांडे घेऊन नृत्य करतात. भांड्याला कोनाच्या आकारात सजवले असते. त्यावर रंगीत फुले व हलक्या लाकडाचा पोपट बसवला असतो. नगाऱ्याच्या तालात भांडे न पाडता लयबद्ध नृत्य हा नजारा दर्शनीय असतो.

कर्नाटक - लोकनृत्य

लोकपरंपरांनी समृद्ध अशा कर्नाटकातील गोरावा नृत्याचे कुरुबा समुदायाकडून सादरीकरण चित्ररथात केले गेले. गोरावा विधिनृत्याने शिवाची उपासना करतात. नर्तक अस्वलाच्या केसांची टोपी घालतात. नगारा व बासरीच्या वादनाने हे नृत्य संपन्न होते. मग तलवारधारी योद्धे नाचात सहभागी होतात.

काश्मीर - हिवाळी खेळ

हिवाळ्यात बर्फाने झाकलेले २६५० मीटर उंचीवर वसलेले गुलमर्ग जागे होते. येथील बर्फातील खेळात भाग घ्यायला सर्व जगातून लोक येतात.

मोहेंजोदारो

mohonjodaro

9073   04-Jun-2018, Mon

'मोहेंजोदारो' म्हणजे मृतांचे शहर. आजच्या पाकिस्तानातील सिंधचे रहिवासी या शहराला मृतांचे शहर म्हणतात. 


पूर्वजांचे देणे

भारतीय इतिहास हा सलग आहे. अगदी सिंधू सभ्यताही त्या अर्थाने आपल्यामधून वाहते आहे. त्यांचा लगोरी हा आवडता खेळ, तंदुरी रोटी, मेंदी व ती लावायचा कोन, लिंगपूजा, योनीपूजा, पक्षपूजा, वृक्षपूजा, स्वस्तिक, सप्तमातृका, पशुपतीसारखा देव, एक्का हे वाहन, त्यांच्या लोककथा (कावळा व कावळ्याच्या तोंडातील मासा हवा असलेला कोल्हा), वळूचे महत्त्व, मोजमापाची पद्धती, व्यापारी कौशल्य हे सगळेच टिकून आहे.

मेलुहाचे चिरंजीव

मिथककथा या उलटसुलट झालेल्या आठवणीच असतात. 'मेलुहाचे चिरंजीव' या अमिश त्रिपाठी यांच्या पहिल्याच कादंबरीने खळबळ उडवली होती. सिंधू सभ्यतेला विषय करत ही कादंबरी नायक शिवाशी जोडते. सिंधूतील लोक स्वतःला काय म्हणत ते माहीत नाही, पण पश्चिम आशियातील लोक त्यांना 'मेलुहा' असे संबोधित. या कादंबरीतील शिवा हा एक व्यक्ती असतो जो पुढे परंपरेत देव म्हणून पूजला जातो. तो तिबेटमधून येतो. सरस्वती नदी आटल्यामुळे व आक्रमणांमुळे मेलुहाचे लोक त्रस्त असतात. शिवा (नीलकंठ) त्यांचा रक्षणकर्ता ठरतो.

चित्रपट की इतिहास

चित्रपट म्हणजे इतिहासावरील माहितीपट नव्हे. कथेला इतिहासाची पार्श्वभूमी वापरली जाते. पण इतिहासाचा तोल सांभाळून कथा उलगडून दाखवण्याचे आव्हान यात असते. 'बाहुबली' ही पूर्ण कल्पित कथा होती, तिथे हे आव्हान नव्हते. लगान, जोधा-अकबर दिग्दर्शित करणाऱ्या आशुतोष गोवारीकरकडून तर जास्तच अपेक्षा असतात. आशुतोषने मेलुहा कादंबरीचा आधार न घेता चित्रपटाने स्वतंत्र कथा निर्माण केली आहे. पण बाहुबली, मेलुहा व स्वतःचीच मोठी प्रतिमा यांच्या पलीकडे जाण्याचे आव्हान चित्रपटाला पेलवलेले नाही. भव्य पार्श्वभूमीवरील हा एक सामान्य चित्रपट आहे.

सिंधू की सरस्वती

चित्रपटात जास्त जोर लोकप्रिय सिंधू प्रतिमेवर दिला असला तरी जास्त शहरे ही सरस्वती नदीच्या काठावर आढळली आहेत. सरस्वतीला आज भारतात घग्गर व पाकिस्तानात हाक्रा असे म्हणतात. मूळच्या विशाल स्वरूपात ही नदी उपलब्ध नाही. पण तिचे अवशेष आहेत. जसे सांबर तलाव, पुष्कर तलाव किंवा भारतातील एकमेव अंतर्गत नदी (जी समुद्राला मिळत नाही) ती म्हणजे राजस्थानातील लुनी. सुरुवातीचे उत्खनन सिंधूवर झाल्याने सिंधू किंवा हडप्पा हे नाव प्रचलित झाले. नुकतेच मोहंजोदारोहून मोठे शहर हरियाणा राज्यात सापडले आहे, ज्याला आज 'राखीगढी' असे म्हणतात.

प्राग इतिहास

चित्रपटाच्या पहिल्याच दृश्यात पूर्व इतिहास अशी माहिती दिली आहे. लेखनकला अवगत नसल्याने लिखित पुरावे सापडत नाहीत अशा काळाला पूर्व इतिहास म्हणतात. अगदी वैदिक संस्कृतीही पूर्व इतिहासात मोडते. कारण आर्य निरक्षर होते. पण सिंधू सभ्यतेतील लोकांकडे लिपी होती. फक्त ती आपल्याला अजून उलगडलेली नाही. अशा काळाला प्राग इतिहास म्हणतात. सिंधू प्राग इतिहास आहे. ती लिपी उलगडली, तर सिंधू सभ्यताही इतिहासाचा भाग बनेल.

प्राथमिक साधनांवर अवलंबन

लिपी वाचन अजून न जमल्याने प्राथमिक साधनांवर (उत्खनन) आपल्याला भर द्यावा लागतो. व्दितीय साधने (साहित्य) उपलब्ध नाही. लिपी मर्यादित अक्षरांची आहे. ती प्रामुख्याने त्यांच्या मुद्रिकांवर आहे व त्या लिपीत मोठ्या लांबीची वर्णने मिळालेली नाहीत. कदाचित ही व्यापारी लोकांनी त्यांच्या व्यवहारांची नोंद ठेवण्याकरता निर्माण केलेली असावी. 

प्राचीन व मध्ययुगीन इतिहास

Ancient and medieval history

16931   24-Jan-2018, Wed

आपण प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी कोणते अभ्यासस्त्रोत वापरावेत? त्यांचा कशा प्रकारे उपयोग करून घ्यावा, या संदर्भात माहिती पाहूयात.

महत्त्वाचे घटक व अभ्यासस्त्रोत

१.  प्राचीन इतिहास –

या विभागावर आतापर्यंत महाजनपदे आणि त्यांच्या आधुनिक नावांच्या जोडय़ा, सिंधू संस्कृतीचे शोधकत्रे आणि त्यांनी शोधलेली नगरे यांच्या जोडय़ा, सिंधू संस्कृतीतील मुद्रांसाठी वापरल्या गेलेल्या दगडाचा प्रकार, महाजनपदे आणि त्यांचे राजे, बौद्ध ग्रंथ आणि त्यातील महाजनपदांचा उल्लेख, संगम साहित्यातील कवी, अश्म युग, लोह युग आणि ताम्र युगाचे अस्तित्व आढळलेले प्रदेश, प्राचीन काळातील भारतीय नाणी आणि त्यावरील ग्रीकांचा प्रभाव, अलेक्झांडरचा मृत्यू आणि त्याचा भारतीय राजकारणावरील प्रभाव, चाणक्याची विविध नावे, प्राचीन भारतातील लेखक (विशाखदत्त, अश्वघोष, भास, कालिदास, हर्षवर्धन) आणि त्यांची नाटके, अजातशत्रू आणि त्याच्या काळातील महत्त्वाच्या घटना, मेगास्थिनीस आणि त्याच्या इंडिका ग्रंथातील वर्णने, प्राचीन नद्या व त्यांची आधुनिक नावे यांच्या जोडय़ा या घटकांवर प्रश्न विचारले गेले आहेत. तर या विश्लेषणावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे या विभागामधील घटकांवर संपूर्णपणे वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि ही वस्तुनिष्ठ  माहिती स्टेट बोर्डाची प्राचीन  इतिहासाची पुस्तके आणि NCERT चे प्राचीन भारत हे पुस्तक यामधून मिळू शकते.

२. मध्ययुगीन इतिहास –

या विभागावर आतापर्यंत मध्ययुगाच्या सुरुवातीला भारतीय इतिहासात दिसणारे प्रवाह

(अद्वैत, वेदांत अशा तत्त्वज्ञानाचा विस्तार आणि चिदम्बरम मदुराई अशा मंदिरकेंद्री नगरांचा विकास), मध्य आशियायी आक्रमणे आणि भारतीय राजसत्ता, विविध मुस्लीम राजसत्ता आणि त्यांची प्रमुख केंद्रे यांच्या जोडय़ा, मध्ययुगीन कालखंडातील हिंदू राजे आणि त्यांची वैशिष्टय़े, महम्मद बिन तुघलक आणि अल्लाउद्दिन खिलजी यांच्या दरबारातील राजकीय व्यवहार, मुघल सम्राटांचा कार्यकाळानुसार क्रम, मराठय़ांची करवसुली पद्धती, अब्दुल रझाक आणि त्याच्या प्रवास वर्णनातील संदर्भ, कुतुबउद्दीन ऐबकचे राजगादीवर येण्यापूर्वीचे आयुष्य या घटकांवर प्रश्न विचारले गेले आहेत. तर या विश्लेषणावरून आपल्याला असे दिसून येते की या मध्ययुगीन कालखंडातील राजसत्ता; त्यांच्या दरबारातील घटना, राज्यकारभाराच्या पद्धती, कला, प्रदेश, प्रवास वर्णने यासंदर्भात अधिकाधिक प्रश्न विचारले जातात. यासाठी स्टेट बोर्डाची मध्ययुगीन इतिहासाची पुस्तके आणि NCERT चे मध्ययुगीन भारत हे पुस्तक वापरणे सयुक्तिक ठरेल.

३.  प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाच्या अभ्यासाची रणनीती

प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाच्या अभ्यासाची रणनीती ठरविताना खालील गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे:

१. ठरावीक कालखंड ठरवून त्या काळातील उत्खननात सापडलेल्या वस्तू, त्यांची वैशिष्टे, उत्खननकरते, इतिहासाच्या अभ्यासाचे स्रोत, महत्त्वपूर्ण राजे, त्यांच्या दरबारात आलेले कलाकार, परकीय प्रवासी आणि त्यांची प्रवासवर्णने, झालेल्या लढाया आणि त्यांचे परिणाम, त्या कालखंडात घडलेल्या जगभरातील घटना आणि त्यांचा भारतावरील परिणाम हे मुद्दे असणारे तक्ते तयार करावेत.

२.     या घटकांवर विचारले जाणारे प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचेच असल्यामुळे आपण तयार केलेल्या नोट्स शेवटच्या घटकेपर्यंत पुन:पुन्हा वाचणे आणि त्यांची उजळणी करणे अनिवार्य असल्याची खुणगाठ बांधून त्यांच्या उजळणीचे योग्य ते नियोजन करावे.

३.     प्राचीन व मध्ययुगीन भारताचा अभ्यास करताना प्रादेशिक किंवा विविध संस्कृतींच्या राजकीय सीमा लक्षात घेणे अनिवार्य ठरते यासाठी नकाशांचा वापर करून त्या नकाशांमध्ये त्या त्या राज्याची वैशिष्टे भरून असे नकाशे दररोज नजरेखालून घातल्यास जातायेता उजळणी करणे सोपे ठरते.

या विभागांचा कालखंड खूप मोठा असल्यामुळे बऱ्याचदा विद्यार्थी या घटकांच्या अभ्यासाच्या बाबतीत संभ्रमात असतात आणि बऱ्याचदा या अभ्यासाकडे कानाडोळा करतात; परंतु आजपर्यंत आलेल्या प्रश्नांचे जर योग्य ते विश्लेषण करून आयोगाच्या प्रत्येक प्रश्नाकडून असणाऱ्या अपेक्षा समजून घेतल्यास नक्कीच या घटकांचा अभ्यास करणे सोपे होऊ शकते. 

स्तूप कला व कृष्णदेवराय

Stupa Kala and Krishnadevaraya

5873   04-Jun-2018, Mon

प्रारंभिक बौद्ध स्तूपकला, लोकचिन्हे, लोककथा यांचा वापर करत यशस्वीरित्या बौद्ध आदर्शांची मांडणी करते. विषद करा. (साडेबारा गुणांसाठी सुमारे दोनशे शब्दांत)
प्रारंभिक बौध्द स्तूपकला ही भारहूत,गया व सांची या तीन ठिकाणी विकसित झालेली दिसते. भारहूत येथील स्तूप अस्तित्वात नाही. मात्र त्याच्या वेदिकेचे कठडे तत्कालीन समाज-संस्कृतीविषयी आपल्या शिल्पातून माहिती पुरवतात.

भारहूत स्तूपातील कठड्यांच्या अवशेषांमध्ये वर्तळाकार रचनेच्या माध्यमातून मृगजातक,महाकपिजातक, मायादेवीचे स्वप्न अशा जातक कथा मांडल्या आहेत.
भारहूत स्तंभावरील यक्षिणी शालभांजिका ही भूलोकातील देवता म्हणून प्रसिध्द आहे. तिच्या शिल्पावरून स्त्री देहाची तत्कालीन संकल्पना, वृक्षपूजा व शालवृक्षाला स्त्रीने आलिंगन दिल्यास त्याला बहर येतो यासारखे प्रचलित समज दिसून येतात.

 

यक्षयक्षिणी, नाग व इतर देवता दाखवल्यामुळे स्तूपाचे रक्षण होते हा समज शिल्पांमधून दिसून येतो. बुद्धाचे दैवतीकरण करण्यास विरोध असल्याने बुद्धांची मानवस्वरूप मूर्ती प्रारंभिक स्तूपांमध्ये कुठेही दिसत नाही. फक्त प्रतीक रूपाने बुध्द जीवनातील प्रसंग वर्णन केले आहेत. बुद्धाच्या जन्मासाठी हत्ती, महानिष्क्रमण दाखवण्यासाठी कंठक हा घोडा, ज्ञानप्राप्ती दाखवण्यासाठी बोधीवृक्ष, पहिले प्रवचन धम्मचक्र तर महापरिनिर्वाण स्तूपातून दाखवले आहे.
 

युध्दाचे वा संघर्षाचे शिल्प दिसत नाही त्यातून बौध्द अहिंसेचे तत्त्वज्ञान दिसून येते.
 

भारहूतप्रमाणेच सांची येथील स्तूपामध्ये देखील लोकमानसात प्रभाव असणाऱ्या जातककथांचे चित्रण जास्त आढळते.
 

सांची स्तूपाचा विकास शुंग, कुषाण आणि गुप्त काळापर्यंत झाल्याने त्या काळातील बदलत्या समाजभावनांचे चित्रण येथील पाठोपाठ विकसित झालेल्या तोरणद्वारातून दिसते.
 

प्रारंभिक स्तूपांमध्ये जातककथा आणि बुध्दजीवनातील प्रसंगाचा आधार घेऊन प्रारंभिक हीनयान वा परंपरावादी बौध्द तत्त्वज्ञान व सामाजिक संदेश कथांच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडला आहे.
 

विजयनगरचा राजा कृष्णदेवराया हा स्वतः मोठा विद्वान तर होताच पण त्याचबरोबर तो विद्या व वाङ्मयाचा मोठा आश्रयदाता होता.
 

कृष्णदेवराय हे विजयनगर साम्राज्याच्या सर्वश्रेष्ठ आणि भारतीय इतिहासातील महानतम शासकांपैकी एक होते. त्यांना आंध्रभोज , आभिनव भोज या नावांनी ओळखले जाते.
 

तुलुव वंशातील कृष्णदेवराय हे स्वतः उच्च कोटीचे विद्वान होते. त्यांनी आमुक्तमाल्यदा या तेलुगु भाषेतील राजकीय व प्रशासकीय विचारांचे विवेचन करणारा ग्रंथ लिहिला. त्यांचा कालखंड हा तेलुगु साहित्याचे अभिजात युग मानले जाते.
 

उषापरिणय जांबवती कल्याणम या संस्कृत भाषेतील ग्रंथनिर्मितीचे आणि रसमंजिरी नामक ग्रंथाच्या निर्मितीचे श्रेय त्यांना जाते.
 

त्यांच्या दरबारी आठ महान विद्वान होते जे अष्टदिग्गज म्हणून ओळखले जात. त्यापैकी सर्वात प्रसिध्द व महान विद्वान म्हणजे अल्लासी पेडण्णा होय. राजकवी असलेले पेडण्णा यांना आंध्रकवी पितामह म्हणून ओळखले जाते. त्यांच्या प्रमुख रचनांमध्ये मनुचरित आणि हरिकथासारम यांचा समावेश होतो.
 

इतर विद्वानांमध्ये पिंगली सुरण्णा , तेनाली रामकृष्ण , नन्दी थिमण्णा , भट्टू मूर्थी , पुना वीरभद्र , मल्लना , धुर्जथी आणि पानजी सुरणा यांचा समावेश होतो.
 

तेलुगुसोबतच तामिळ, संस्कृतसह इतर भाषांनादेखील प्रोत्साहन मिळले. प्रसिध्द तामिळ कवी तिरूमलनाथ आणि त्यांचा पुत्र परनजोय्यार यांनाही दरबारात आश्रय होता.
 

वीरभद्र कवी यांनी आदिशांकुतल चा अनुवाद केला, तर श्रीनाथ यांनी श्रीहर्षलिखित ग्रंथ नैषिधियचरितम चा तेलुगु अनुवाद केला.
 

या काळात धर्मातील विभिन्न विषयांवर अनेक भाष्य वा टीका लिहिल्या गेल्या. त्यात सर्वाधिक महत्त्वपूर्ण सायण यांनी लिहिलेली वेदांवरील टीका आहे.
 

स्वतः कृष्णदेवराय बुद्धिबळपटू होते, मल्ल होते, नृत्य, कला यांचे जाणकार होते.

मोहोलेश ते महाराष्ट्र

Summaries History of Maharashtra

5331   16-Jan-2018, Tue

मोहोलेश ते महाराष्ट्र
ह्यू एनत्संग या चिनी प्रवाशाने इ.स. ६४०-४१ च्या सुमारास महाराष्ट्रास भेट दिली होती. या देशाची संपत्ती, येथील प्रशासकीय कुशलता, आणि लोकांचे स्वभावविशेष यामुळे तो प्रभावित झाला होता. महाराष्ट्राला तो `मोहोलेश' म्हणतो, आणि या देशाच्या लोकस्थितीचे वर्णन करणारा कदाचित तो पहिलाच परदेशी प्रवासी असावा. तो म्हणतो, `महाराष्ट्राची भूमी सुपीक असून ते धनधान्याने समृद्ध आहे. तेथील लोक साधे, प्रामाणिक पण तापट आहेत. त्यांच्या जे उपयोगी पडतात त्यांशी ते कृतज्ञ असतात. पण त्यांना कोणी दुखविले तर ते सूड घेतल्याखेरीज राहात नाहीत. लढाईत पळपुट्यांचा ते पाठलाग करतात; पण शरण आलेल्यांना ते मारीत नाहीत. राजाजवळ हजारो शूर शिपायांचे सैन्य नित्य खडे असते. या प्रदेशाला `दंडकारण्य' असेही म्हणत आणि या प्रदेशाचे नाग, मुंड, भिल्ल इत्यादी आदिवासी समाज हे मूळ रहिवाशी होते. नंतरच्या काळांत उत्तरेकडून आर्य, शक, हूण लोक आले; दक्षिणेकडून द्रविडी लोक आणि सागरे मार्गाने परदेशी लोक आले. या सर्वांनी मिळून महाराष्ट्राची वसाहत केली, आणि महाराष्ट्राच्या रहिवाशांना `महारट्ट' म्हणून ओळखले जाऊं लागले.
महाराष्ट्राची प्राचीनता साधारणपणे इ.स.पू. तिसऱ्या शतकापर्यंत नेता येईल. कारण संस्कृत भाषेपासून उदयाला आलेली महाराष्ट्री भाषा ही इ.स.पू. चवथ्या अथवा तिसऱ्या शतकांत प्रचारात होती असे तज्ज्ञांचे मत आहे. आजची या प्रदेशाची मराठी भाषा या महाराष्ट्री-प्राकृत भाषेपासून विकसित झाली असून इ.स. च्या १०व्या शतकापासून ती प्रचलित झाली असावी. महाराष्ट्र हे नांव देखील या भाषेवरूनच पडले असावे. कालौघात या नांवाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशात अपरान्त, विदर्भ, कुंतल, मूलक व अश्मक यांचा अंतर्भाव झालेला दिसतो.


मौर्य ते यादव (इ.स.पू. ते स. १३१० सुमारे २२०)
महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्रज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) अंतर्गत होता. या काळात महाराष्ट्राने भरभरटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.
सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराण होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतेचा मानला जातो. अर्थात्‌ या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरूष. महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा महत्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.
वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळांत महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत राजाश्रयामुळे उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळांतील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.
वाकाटकांनंतर कलचुरी राजघराणे इ.स. च्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.
वाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणी इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमान होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती.
दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्रकूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे कृष्ण पहिला या राष्ट्रकूट राजाने बांधले.
महाराष्ट्राच्या कांहीं भागावर कल्याणीच्या चालुक्यांनी सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवानी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१० पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता सपुष्टात आणली.
यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्ती सांप्रदायाचे उद्‌गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.
मुसलमानांची राजवट
इ,स, १२९६ मध्ये अल्ला‍उद्दिन खिलजी या उत्तरेतील सुलतानाने प्रथम दख्खन प्रांतात प्रवेश करून यादवांचा पराभव केला. आणि त्यांची संपत्ती लुटून त्यांना प्रायः दरिद्री बनवले. सेनापती मलीक कफूर याने अल्ला‍उद्दिनाच्या कार्याची पूर्ती केली. आणि इ.स. १३१० मध्ये यादवांची सत्ता लयाला गेली.
अल्ला‍उद्दिनाचे अनुकरण मुहम्मद तुघलक (इ. स. १३२४-१३५०) या दिल्लीच्या सुलतानाने करून आपली सत्ता दक्षिणेतील मदुराईपर्यंत प्रस्थापित केली. मात्र दिल्लीहून आपली राजधानी दौलताबादेस आणण्याचा त्याचा प्रयत्न असफल झाला. तुघलकांची सत्ता क्षीण झाल्यावर अल्ला‍उद्दीन हसन बहमनी याच्या धुरीणत्वाखाली दक्षिणेत इ.स. १३४७ साली बहमनी घराण्याची स्थापना झाली ती सुमारे १५० वर्षे टिकली. देवगिरी अथवा दौलताबाद ही बहमनींची काही काळ राजधानी होती. सोळाव्या शतकात बहमनी राज्याचे गोवळकोंड्याची कुत्बशाही, अहमदनगरची निजामशाही, वऱ्हाडची इमादशाही, विजापूरची आदिलशाही आणि बिदरची बरीदशाही अशा पाच स्वतंत्र राज्यांत विभाजन झाले. आपली सत्ता टिकविण्याकरिता या दख्खनी सुलतानांना प्रशासनासाठी स्थानिक मराठी लोकांचे मोठ्या प्रमाणावर सहाय्य घ्यावे लागले. सनदी सेवा, लष्करी चाकरी आणि राजनैतिक व्यवहार यासाठी प्रामुख्याने त्यांना मराठी माणसांचीच नेमणूक करावी लागली. सतराव्या शतकाच्या अंतापर्यंत या पाच शाह्या मोगल साम्राज्यांत विलीन झाल्या.


मराठे
सतराव्या शतकाच्या मध्यापासून महाराष्ट्रावर मराठ्यांची सत्ता प्रस्थापित होण्यास प्रारंभ झाला `मराठा' हा शब्द इतिहासाच्या दृष्टीने जातिवाचक नसून त्यांत महाराष्ट्रातील मराठी भाषिकांचा प्रामुख्याने समावेश होतो. असे असले तरी महाराष्ट्रावर राजकीय सत्ता ही मुख्यत्वेकरून `मराठा' जातीने प्रस्थापित केली होती. हे मराठी भाषिक मराठे मूळचे कोण हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे. मराठा हे नामाभिधान महाराष्ट्र देशापासून आले आहे, का मराठे या येथील रहिवाश्यांमुळे या देशाला महाराष्ट्र हे नांव मिळाले आहे हे सांगणे कठिण आहे. रिस्ले या प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञाने शक-द्रविडांच्या मिश्र जमातीपासून मराठे उदयाला आले असा सिद्धांत मांडला होता. पण तो आता त्याज्य ठरला आहे. अर्थात महाराष्ट्रातील अनेक आदिवासी जमातींचा मराठ्यांच्या उत्पत्तीशी संबंध असावा हे सर्वस्वी नाकारता येणार नाही. मराठ्यांच्या अनेक कुळी देवक अथवा वंशचिन्ह मानणाऱ्या आहेत. खंडोबा आणि भवानी या मराठ्यांच्या प्रमुख देवता या आदिवासी स्वरूपाच्या आहेत.
मराठे आणि महाराष्ट्र यासंबंधीचे संदर्भ कांही परदेशी प्रवाशांच्या वृत्तांत आढळतात. यात अल्‌बेरुनी (इ.स. १०३०) फ्रायर जॉर्डनस (इ.स. १३२६ च्या आसपास), इब्न बतूता (इ,स, १३४०) यांच्या लिखाणारून असे उल्लेख आले आहेत. परंतु राजकीय क्षेत्रावर मराठ्यांच्या उदय खऱ्या अर्थाने सतराव्या शतकातच झाला. मराठ्यांच्या उदयाची कारणे इतिहासकारांनी निरनिराळी दिली आहेत. मराठ्यांच्या प्रसिद्ध इंग्रज इतिहासकार ग्रॅंट डफ यांच्या मते हा उदय सह्याद्री पर्वतात वणवा पेटावा तसा, अगदी दैवघटित परिस्थितीमुळे झाला. न्यायमूर्ती रानड्यांना मात्र प्रामाणिक प्रयत्न करून मराठ्यांनी आपला उदय करून घेतला असे वाटते. राजवाडे यांच्या मते परदेशी आणि दख्खनी मुसलमानांचे वर्चस्व रोखण्याकरता अहमदनरच्या निजामशहाने मराठ्यांना आपल्या दरबारांत हेतुपूर्वक उत्तेजन देऊन एक `मराठा पक्ष' निर्माण केला, आणि त्यातूनच मराठ्यांचा उदय झाला. भोसले, जाधव, निंबाळकर, मोरे, घोरपडे, माने, घाटगे, डफळे, सावंत, शिर्के, महाडिक, मोहिते इत्यादी मराठे सरदार निजमाशाही अथवा आदिलशाहीच्या चाकरीत असल्याने लष्करी आणि मुलकी प्रशासनाचे त्यांना उत्तम शिक्षण मिळाले होते. मालोजी भोसले (अंदाजे इ.स. १५५२ ते १६०६) हा निजामशाहीत एक छोटासा शिलेदार म्हणून नोकरीस लागला. त्याचा पुत्र शहाजी (१५९९ ते १६६४) याने तर निजामशाही, मुघल आणि आदिलशाही यांच्याकडे नोकरी करून बरेच श्रेष्ठत्व मिळविले होते. मराठ्यांच्या उदयास प्रारंभ मालोजी-शहाजीपासून झाला असे मानण्यास हरकत नाही.


स्वराज्य संस्थापक शिवाजी राजा
शिवाजी राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर १९.२.१६३० (जुनी तारीख ६.४.१६२७) रोजी झाला. मराठी राष्ट्र हे शिवाजी राजांची निर्मिती होय. शहाजीने आपली पुणे, सुपे येथील जहागीर, जी प्रायः स्वतंत्र होती. ती शिवाजी राजांना बहाल केली. त्यांनी मावल, कोकण, आणि देश या प्रदेशातील लोकांच्या समोर स्वराज्याचे, महाराष्ट्र धर्माचे ध्येय ठेवून त्यांना संघटित केले, आणि परकी सत्तांना परभूत करून स्वराज्य स्थापन केले. या नूतन महाराष्ट्र राज्याला कार्यक्षम लष्करी आणि सनदी प्रशासन देऊन त्यांनी ते भक्कम पायावर उभे केले. आर्थिक दृष्ट्या देखील ते स्वावलंबी बनविले. सर्वधर्मसमभावाचे तत्व आचरून सर्व धर्म पंथांना आपल्या राज्यांत सामावून घेतले. आपल्या राज्याभिषेक प्रंसंगी (१६७४) राजशक सुरू करणारा, आणि स्वतःची शिवराई आणि होन' ही सोन्याची नाणी चालू करणारा शिवाजी राजा हा पहिला मराठी छत्रपती होय. त्याच्या अकाली मृत्यूमुळे-वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षी (५ एप्रिल १६८०) महाराष्ट्रांत एक पोकळी निर्माण झाली. मध्ययुगाच्या इतिहांसातील शिवाजी महाराजांचे स्थान सुप्रसिद्ध वंग इतिहासकार, यदुनाथ सरकार यांनी आपल्या शिवचरित्रांत विशद केले आहे. ते म्हणतात,`शिवजी राजा हा केवल मराठी राष्ट्राचा निर्माता नव्हता, तर तो मध्ययुगांतील एक सर्वश्रेष्ठ रचनाकार, लोकोत्तर पुरुष होता. राज्ये नष्ट होतात, साम्राज्याचे विघटन होते, राजघराणी नेस्तनाबूत होतात, परंतु `लोकनायक राजा' अशा शिवाजी राजाची स्मृती म्हणजे मानवजातीला मिळालेला एक अक्षय ऐतिहासिक वारसा होय.
शिवाजी राजांचा पुत्र संभाजी (इ.स. १६५७-८९) याची कारकीर्द अवघे नऊ वर्षांची झाली. या छोट्या काळांत त्याला अंतर्गत कलह आणि शिद्दी, पोर्तुगीज, मुघल यासारखे शत्रू यांच्याशी मुकाबला करावा लागला. मुघलांच्या हातून त्याचा १६८९ साली जो अमानुष वध झाला त्यामुळे मराठी लोकामध्ये देशप्रेमाची जाज्वल्य भावना निर्माण झाली, आणि शिवाजी महाराजांचा कनिष्ठ पुत्र राजाराम (१६७०-१७००) याच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी औरंगजेबाच्या सत्तेविरुद्ध स्वातंत्र्य युद्ध पुकारले. आपला बलाढ्य फौजफाटा घेऊन औरंगजेब बादशहाने मरेपर्यंत (१७०७) मराठी सत्ता नेस्तनाबूत करण्याचा निष्फळ प्रयत्न केला. राजारामाच्या मृत्युनंतर त्याची पत्नी ताराबाई हिने स्वातंत्र्ययुद्धाची सुत्रे आपल्या हाती घेतली, आणि आपला पुत्र दुसरा शिवाजी यास छत्रपती म्हणून घोषित केले. परंतु औरंगजेबाच्या नजरकैदेत असलेला संभाजीचा पुत्र शाहू याची जेव्हा १७०७ साली सुटका झाली तेव्हा शाहूपक्ष आणि ताराबाई पक्ष असे दोन तट मराठी राज्यात पडले आणि त्यांच्यात यादवी युद्धाला सुरवात झाली. शाहूने साताऱ्यास तर ताराबाईने पन्हाळ्यास आपली स्वंतत्र गादी स्थापन केली. या दुसऱ्या गादीच्या संदर्भात १७१४ साली एक राजवाड्यांतच छोटीशी राज्यक्रांती कोल्हापुरात झाली. आणि राजारामाचा दुसरा पुत्र संभाजी (इ.स. १६९८ ते १७६०) यास कोल्हापूरची गादी मिळाली. शाहूने वारणेच्या तहान्वये (१७३१) संभाजीस कोल्हापूरचा छत्रपती म्हणून मान्यता दिली.


पेशवे
शाहूच्या आमदानीत रायगड जिल्ह्यांतील भट घराणे मराठ्यांच्या इतिहासात प्रसिद्धीस आले. बाळाजी विश्वनाथ भट याने शाहूला त्याचे स्थान बळकट करण्यास मदत केल्याने त्यास पेशवे पद (१७१३-१७२०) प्राप्त झाले. मुघलांच्याकडून त्याने स्वराज्य, चौथाई आणि सरदेशमुखीच्या सनदा आणल्या. त्याचा मुलगा पहिला बाजीराव ( पेशवा १७२० ते १७४०) याने पेशवाईची वस्त्रे स्वीकारल्यावर आक्रमक धोरणाचा अवलंब केला आणि महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून उतरंडीस लागलेल्या मुघल साम्राज्याच्या विनाशातून मराठी सत्तेची वाढ करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली. त्याने मराठी सरदारांना उत्तरेचे दालन उघडून दिले, आणि यातूनच पुढे मराठ्यांनी छोटी छोटी राज्ये तिकडे निर्माण झाली. गुजरात, माळवा, बुंदेलखंड इत्यादी प्रदेश मराठ्यांच्या वर्चस्वाखाली आले, आणि शिंदे, होळकर, गायकवाड, पवार यांच्यासारखे नवे मराठे सरदार उदयास आले. यदुनाथ सरकारांच्या मते बाजीरावाने बृहन-महाराष्ट्राची निर्मिती केली, आणि पुणे हा भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू बनला. बाजीराव पेशवा हा संपूर्णतया शिपाई गडी, एक देवजात शिलेदार होता. आपल्या छोट्याशा कारकीर्दीत त्याने दख्खन प्रदेशात मराठ्यांचे श्रेष्ठत्व आणि उत्तरेस मराठ्यांचे धुरीणत्व प्रस्थापित केले.
बाजीरावानंतर पेशवेपद हे भट घराण्यांत जवळजवळ वंशपरंपरा बनले. बाजीरावाचा पुत्र बालाजी तथा नानासाहेब (पेशवा १७४०-१७६१) याने मराठ्यांचे झेंडे अटकेपार फडकाविले. शाहूचा मृत्यू १७४९ साली झाला. त्याचा दत्तक पुत्र रामराजा हा कर्तृत्ववान नसल्याने नामधारी छत्रपती राहिला व सर्व सत्ता पेशव्यांकडे केंद्रीत झाली. १७६१ साली अहमदशहा अब्दालीकडून पानिपतच्या रणसंग्रामात मराठ्यांचा दारुण पराभव झाला. मराठी सत्तेला शह मिळाला पण ती नेस्तनाबूत झाली नाही. नानासाहेबाचा पुत्र पेशवा पहिला माधवराव ( पेशवा १७६१-१७७२) याने शत्रूंचा बीमोड करून आणि उत्तम प्रशासन करून मराठ्यांचे वर्चस्व पुनश्च प्रस्थापित केले. पण त्याचा अकाली मृत्यू हा मराठी सत्तेला शाप ठरला. ग्रॅण्ट डफ म्हणतो, या गुणवंत पेशव्याचा अकाली मृत्यू हा मराठी साम्राज्याला पानिपतापेक्षा फार हानिकारक ठरला. गृहकलहाने त्याचा भाऊ पेशवा नारायणराव (१७७३) याचा अमानुष वध केला. नारायणरावाच्या मरणोत्तर जन्माला आलेला त्याचा पुत्र पेशवा माधवराव दुसरा (पेशवा १७७३-१७९५) याने कारभाऱ्यांच्या सहाय्याने ( ज्यांना बारभाई म्हणत ) मराठी राज्याची धुरा सांभाळली. यात महादजी शिंदे आणि नाना फडणवीस या दोन कारभाऱ्यांचा मोठा वाटा होता. छत्रपतीकडून पेशव्यांकडे आलेली सत्ता आता कारभाऱ्यांकडे गेली. याच सुमारास पश्चिम किनाऱ्यावर ठाण मांडून बसलेले इंग्रज हळूहळू मराठ्यांच्या राजकारणांत प्रवेश करू लागले होते. वस्तुतः १७८१ साली, पहिल्या इंग्रज-मराठे युद्धात, मराठ्यांनी त्यांना नमविले होते; परंतु शेवटचा पेशवा दुसरा बाजीराव ( पेशवा १७७५-१८१८ ) हा संपूर्णतः त्यांच्या आहारी गेला आणि १८१८ साली मराठी सत्ता संपुष्टात आली. मराठी राज्याची वासलात लावणाऱ्या माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टनने मराठ्यांची सहानुभूती मिळविण्याच्या हेतूने साताऱ्याचे छोटेसे राज्य निर्माण केले आणि त्यावर प्रतापसिंह (१७९३-१८७४) या एका छत्रपतीच्या वंशजाची `राजा' दुय्यम प्रतीचा किताब देऊन नेमणूक केली. पुढे १८३९ साली त्याला पदच्युत करून त्याचा भाऊ शहाजी उर्फ आप्पासाहेब यास साताऱ्याची गादी देण्यात आली, आणि पुढे १८४९ सालीं हे साताऱ्याचे राज्य खालसा करण्यात आले. अशा रीतीने सुमारे दोनशे वर्षे भारताच्या राजकीय इतिहासावर प्रभाव टाकणाऱ्या मराठ्यांची सत्ता नामशेष झाली.
मराठ्यांची परंपरा आणि इतिहास हा असा उज्वल आहे. यदुनाथ सरकार यांनी मराठ्यांची भारतीय इतिहासांतील कामगिरी समर्पक शब्दांत व्यक्त केली आहे. ते म्हणतात, `आजच्या भारतात त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे, मराठ्यांना एक अनन्यसाधारण असे स्थान प्राप्त झाले आहे. त्यांच्या अगदी नजीकच्या पूर्वजांनी अनेक समरांगणावर आपले देह अर्पण केले आहेत; त्यांनी सेनापतीपदे भूषविली, राजनीतीक्षेत्रांत भाग घेतला, राज्याची आर्थिक बाजू सांभाळली, साम्राज्याच्या समस्यांशी सामना केला, आणि स्मृतिआड न झालेल्या नजीकच्या काळातील भारताच्या इतिहासाच्या घडणीस हातभार लावला. या सर्व गोष्टींच्या स्मृती म्हणजे या जमातीचा अमूल्य ठेवा होय'


इंग्रज
शिवाजी महाराजांचा उदय होत असतानाच इंग्रज आपली व्यापारी मक्तेदारी पश्चिम किनाऱ्यावर मिळविण्याच्या प्रयत्नांत होते. शिवाजी राजांची वाढती सत्ता ही त्यांना धोकादायक वाटत होती. शिवाजी महाराजांनी त्यांना व्यापाराच्या सवलती दिल्या, पण मराठी भूमीवर ते पाय रोवून उभे राहणार नाहींत याची दक्षता ठेवली. कारण व्यापाराचे निमित्त करुन प्रदेश बळकावयाचा ही त्यांची सुप्त इच्छा महाराजांना उमजली होती. पण इंग्रजांची ही कुटिल नीती पेशव्यांच्या ध्यानी न आल्याने नानासाहेब पेशव्याने त्यांना मराठ्यांच्या राजकारणात हस्तक्षेप करण्याची संधी उपलब्ध करून दिली, आणि १७५४ साली कुलाब्याच्या आंगऱ्यांच्या आरमाराचा धुव्वा उडविला. मराठेच स्वतःचे संहारक आहेत हे आतापवेतो इंग्रजांनी ओळखले होते. मद्रासच्या लष्करी पत्रसंग्रहातील १७ एप्रिल १७७० च्या एका पत्रात म्हटले आहे की आपापसातील कलहामुळे मराठे आपला विनाश ओढवून घेतील हे आता लक्षात आले आहे, आणि त्याला तशी सबळ कारणे आहेत. मराठे सरदार हे एकमेकाविरुद्ध मिळणारी एकही संधी दवडणार नाही हे हिंदुस्थानांतील इतर सत्तांना लाभदायकच ठरणार आहे.
परंतु मराठ्यांना मुळासकट उखडून काढणारा यशस्वी मुत्सद्दी म्हणजे माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन हा होय. १८११ साली तो प्रथम पुण्यांत रेसिडेंट म्हणून आला. मराठ्यांची सत्ता नष्ट करण्याचे मनसुबे त्याने रचले. १८१७ साली अखेरच्या इंग्रज-मराठे युद्धाला तोंड फुटले, आणि शेवटी ३ जून १८१८ रोजी दुसरा बाजीराव हा माल्कमला शरण गेला; आणि मराठी राज्याचे वैभव नष्ट झाले. पेशव्यांपासून जिंकून घेतलेल्या प्रदेशावर १८१९ साली कमिशनर आणि नंतर मुंबई प्रांताचा गव्हर्नर बनला. महाराष्ट्रात ब्रिटिश राजवटीची पायाभरणी एलफिन्स्टनने केली. प्रशासनांत त्याने विशेष बदल काही केले नाहीत, पण जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था लावणे, शैक्षणिक धोरण अवलंबिणे, पेशव्यांच्या दक्षिणा फंडातून संस्कृत कॉलेज ( जे पुढे डेक्कन कॉलेज बनले ) स्थापन करणे इत्यादी महत्त्वाची कामे त्याने केली.इंग्रज सत्तेविरुद्ध बंडावा
मराठ्यांना इंग्रजांची राजवट केव्हांच रुचली नाही. इंग्रज अधिकाऱ्यांविरुद्ध ते सतत बंडावा करीत. उमाजी नाईकाच्या नेतृत्वाखाली १८२६ सालीं पुणे जिल्ह्यांतील रामोशांनी बंड करून इंग्रजांना सतावून सोडले, आणि शेवटी त्यांना समझोता करावयास लावला. सरकारने रामोश्यांचे गुन्हे माफ केले, त्यांना सरकारी नोकरीत प्रवेश दिला आणि इनाम जमिनीही दिल्या. नाशिकचा राघु भांग्‌ऱ्या, नगरचा रामजी आणि त्याचा साथीदार रतनगडचा किल्लेदार गोविंदराव खारी यांना इंग्रज सत्तेला शह दिला. पुणे आणि नगर जिल्ह्यांतील कोळीही संघटित झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या साऱ्या अशिक्षित आणि दऱ्याखोऱ्यांत राहणाऱ्या निःशस्त्र लोकांनी इंग्रज सत्तेला विद्वानांच्या स्वातंंत्र्य लढ्यापूर्वी कितीतरी आधी आव्हान दिले होते.
१८५७ च्या उठावात महाराष्ट्राचा फारसा वाटा नव्हता. पण या उठावाचे पुढारी नानासाहेब, तात्या टोपे, झांशीची महाराणी लक्ष्मीबाई ही सारी मंडळी होती.
१८५७साली पुणे, सातारा, नगर येथील शेतकऱ्यांनी जुलमी सावकारांच्या विरुद्ध उठाव केला. ब्रिटिशांच्या पाठिंब्यामुळे हे सावकार जुलूम करीत होते. शेतकऱ्याचे दंगे या नावांने ही घटना ओळखली जाते. न्यायमूर्ती रानडे आणि सार्वजनिक काका यांनी रयतेची बाजू मांडली. सरकारने नंतर १८७९ साली डेक्कन ऍग्रिकल्चरल रिलिफ ऍक्ट पास करून शेतकऱ्यांना संरक्षण दिले.
वासुदेव बलवंत फडके याने सशस्त्र प्रतिकाराच्या धोरणाचा अवलंब करून इंग्रजांना हुसकावून भारतीय गणराज्याची स्थापना करण्याची मोहीम १८७९ साली सुरू केली. पण त्याला यश आले नाही. त्याला अटक करून एडन येथे कारावासात ठेवले. तेथेच तो १८८३ सालीं मरण पावला. पुढे चाफेकर बंधूंनी २२ जून १८९७ साली पुणे येथे रॅंड आणि लेफ्टनंट आयर्स्ट यांचे खून केले, आणि फाशीची शिक्षा स्वीकारली. मराठ्यांचा इंग्रजांना सतत विरोध राहिला याचे कारण त्यांनी आपल्या सर्वस्वाचे अपहरण केले आहे याचे त्यांना कधीच विस्मरण पडले नाही. इंग्रजांनी हिंदुस्थान जिंकला तो मराठ्यांच्या पराभव करून, आणि म्हणूनच मराठ्यांचा आपल्याला विरोध राहणार याची त्यांना कल्पना होती जी. डब्ल्यू. स्टीव्हन्सने १८९९ साली प्रसिद्ध झालेल्या इंडिया ऑफ यस्टर इयर्स या पुस्तकात ती व्यक्त केली आहे.सामाजिक सुधारणा चळवळी
मुंबई, पुणे यासारख्या नगरांतील बुद्धिवादी लोकांवर पाश्चिमात्य शिक्षणाचा जो प्रभाव पडत होता यातूनच एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणेच्या चळवळीचा प्रारंभ झाला. या सुधारकांनी अंतर्मुख होऊन आपली समाजव्यवस्था, धार्मिक रूढी, यांचा चिकित्सकपणे अभ्यास करून राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणांना अग्रक्रम दिला. प्रारंभी या कार्यात त्यांना सनातनी लोकांकडून कडवा विरोध सहन करावा लागला. बाळशास्त्री जांभेकर (१८१२-४६) यांनी सतीची चाल, लहान मुलींची हत्या, या रुढींचा धिःकार तर केलाच, परंतु हिंदू धर्माचा त्याग करून परधर्म स्वीकारलेल्या लोकांना परत स्वधर्मात यावयाचे असेल तर शुद्धीकरणाची मुभा असली पाहिजे यासाठी झगडा केला. गोपाळ हरी देशमुख तथा लोकहितवादी (१८२३-९२) यांनी आपल्या शतपत्रे या संग्रहातून सामाजिक आणि धार्मिक सुधारणांना विरोध करणाऱ्या सनातनी ब्राह्मणांवर कडाडून हल्ला केला. जोतीराव गोविंदराव फुले (१८२७-१८९०) यानी सत्यशोधक समाजाची स्थापना करून जाती व्यवस्थेवर आघात केले, हरिजनांचा पक्ष उचलून धरला, आणि मागासलेल्या समाजांतील स्त्रियांच्या शिक्षणासाठी जीवापाड मेहनत केली. रामकृष्ण गोपाळ भांडारकर (१८३७-१९२५) आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे (१८४२-१९०१) यांनी सामान्य सामाजिक आणि धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रार्थना समाज स्थापण्याच्या कामी पुढाकार घेतला. गोपाळ गणेश आगरकर (१८५६-१८९५) यांनी सामाजिक सुधारणांना अग्रक्रम दिला. धोंडो केशव कर्वे (१८५८-१९६२) यांनी तर आपले सारे जीवन स्त्रीशिक्षणासाठी समर्पित केले. बेहरामजी मलबारी (१८५३-१९१२) या मुंबईच्या पारशी सुधारकाने सर्व जातींच्या स्त्रियांसाठी सेवा सदन ही संस्था काढली. पंडिता रमाबाई (१८५८-१९२२) यांनी शारदा सदन संस्था काढून वरिष्ठ वर्गातील विधवा स्त्रियांना संरक्षण दिले. ऑक्सफर्ड विद्यापीठाची पदवी धारण करणारे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (१८७३-१९४४) यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था काढली. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज (१८७४-१९२२) यांनी जाति संस्थेला विरोध केला, हरिजनांचा पक्ष उचलून धरला, आणि आपल्या संस्थानात शिक्षण प्रसाराचे मोठे कार्य केले. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील (१८८७-१९५९) यांनी महात्मा फुले, महर्षी शिंदे आणि शाहू महाराज यांच्या कार्याची परंपरा चालविली. डॉ. भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर (१८९१-१९५६) यांचा महाराष्ट्राला सतत अभिमान वाटेल. त्यांनी हरिजन जमातीमध्ये सामाजिक आणि राजकीय जागृती निर्माण केली. भारताच्या संविधानाचे ते प्रमुख शिल्पकार होते. हिंदु धर्मातील अनिष्ट आणि जुलमी रूढी आणि परंपराशी ते सतत झगडत राहिले.

महाराष्ट्र आणि स्वातंत्र्य संग्राम
भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन १८८५ साली महाराष्ट्राच्या राजधानीत-मुंबईस-भरले होते. समाजिक, आर्थिक आणि राजकीय समस्यांबद्दल लोकमत बनविण्यासाठी न्यायमूर्ती रानड्यांनी निरनिराळ्या संस्था काढल्या आणि राष्ट्रीय चळवळीला उदारमतवादाची दिशा दाखविली.
दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, दिनशा वाच्छा, ही मुंबईची पारशी मंडळी कॉंग्रेसच्या धुरीणांपैकी होती. १८९० ते १९२० या कालखंडातील महाराष्ट्राचे दोन राजकारण धुरंधर म्हणजे बाळ गंगाधर टिळक (१८५६-१९२०) आणि गोपाळ कृष्ण गोखले (१८६६-१९१५). शिवाजी उत्सव आणि गणेश उत्सव यांच्या माध्यामातून टिळकांनी बहुजन समाजाला देशाच्या राजकारणांत आणले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा मंत्र त्यांनी स्वांतत्र चळवळीला दिला. भारतातील असंतोषाचे जनक अशी त्यांची ओळख इंग्रजांनी करून दिली आहे. न्यायमूर्ती रानड्यांचे शिष्य गोखले हे बुद्धिवाद्यांचे पुढारी होते. समन्वय आणि समझोता हे त्यांच्या राजकीय धोरणाचे मुख्य सूत्र होते. महाराष्ट्र हा लढाऊ वृत्तीच्या लोकांचा देश असल्याने जनमानसावर लोकमान्यांच्या विचारसरणीचा अधिक प्रभाव होता. अभिनव भारत या दहशतवादी विचारसरणीचा विश्वास असणाऱ्या संस्थेचे अध्वर्यू विनायक दामोदर सावरकर हे तरूणांचे लाडके नेते होते. महात्मा गांधी नामदार गोखल्यांना आपले राजकीय गुरू मानीत. महाराष्ट्र हे रचनात्मक कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे, असे ते म्हणत. महाराष्ट्राने त्यांच्या विविध चळवळींना उत्तम प्रतिसाद दिला. याच सुमारास काकासाहेब गाडगीळांच्या आर्जवी प्रयत्नांमुळे केशवराव जेध्यांच्या नेतृत्वाखाली बहुजनसमाज कॉंग्रेसमध्ये सामील झाला. भारत छोडो हा निर्वाणीचा इशारा १९४२ साली इंग्रजाना मुंबई येथे देण्यात आला या इशाऱ्याची परिणती पुढे १९४७ साली राजकीय सत्तांतरात झाली. रावसाहेब आणि अच्युतराव पटवर्धन, नानासाहेब गोरे, एस. एम. जोशी, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि इतर असंख्य राष्ट्रभक्तांनी या शेवटच्या लढ्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. बाळासाहेब खेर हे मूळच्या त्रैभाषिक मुंबई इलाख्याचे पहिले महामंत्री होत. मोरारजी देसाई यानी नंतर त्यांची जागा घेतली.संयुक्त महाराष्ट्र
कॉंग्रेसने भाषावर प्रांतरचनेचे तत्त्व मान्य केले होते. पण १९५६ सालच्या राज्यपुनर्रचना समितीने महाराष्ट्राच्या बाबतीत मात्र ते लागू केले नाही आणि येथे गुजराती व मराठी लोकांचे द्वैभाषिक राज्य निर्माण करून मुंबई राजधानी केली. महाराष्ट्रात यावर तीव्र प्रतिक्रिया झाली. केशवराव जेध्यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे एक सर्वपक्षीयांची सभा होऊन ६ फेब्रूवारी १९५६ साली संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत या समितीला भरघोष यश मिळाले. विधानसभेच्या १३३ पैकी समितीला १०१ जागा मिळाल्या. यात मुंबई शहराच्या १२ जागा होत्या. गुजरात, मराठवाडा आणि विदर्भ यांच्या सहकार्याने कॉंग्रेसला मंत्रिमंडळ बनविता आले. या विशाल द्वैभाषिकाचे यशवंतराव चव्हाण हे पहिले मुख्यमंत्री बनले. एस. एम. जोशी, डांगे, नानासाहेब गोरे, आचार्य अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा तीव्र केला. काही लोकांना आत्मबलिदान करावे लागले. पण कॉंग्रेसचे मतपरिवर्तन करण्यात त्यांना शेवटी यश आले. नेहरूंच्या मंत्रिमंडळातील चिंतामणराव देशमुखांनी आपल्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला. १ मे १९६० रोजी, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा यांचे पंडित जवाहरलाल नेहरूच्या आशीर्वादाने `महाराष्ट्र राज्य' निर्माण झाले. मोहोलोश ते महाराष्ट्र ही ऐतिहासिक वाटचाल १९६० मध्ये पूर्ण झाली. आणि मराठी माणसाचे अनंत वर्षांचे स्वप्न साकार झाले.

महादेव गोविंद रानडे

Mahadev Govind Ranade

4907   16-Jan-2018, Tue

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे (जानेवारी १६, इ.स. १८४२ - जानेवारी १६, इ.स. १९०१) ऊर्फ माधवराव रानडे हे मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व ब्रिटिश भारतामधील न्यायाधीश होते. इ.स १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे अध्यक्षही होते.

जीवन

महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिकमधील निफाड या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात झाले. त्यांना शालेय आयुष्यात विनायक जनार्दन कीर्तने यांची मैत्री लाभली आणि पुढे ती वाढली. लहानपणी माधवराव अबोल आणि काहीसे संथ होते. मात्र त्यांची तीव्र स्मरणशक्ती, सामाजिक भान इतरांच्या लक्षात आले होते. १८५६नंतर ते आणि कीर्तने मुंबईत शिक्षणासाठी आले, एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये दाखल झाले. त्यांचे इंग्रजी-संस्कृत भाषांमधील वाचन वाढले. लॅटिनचाही त्यांनी अभ्यास केला. मॅट्रिकच्या परीक्षेसाठी त्यांनी 'मराठेशाहीचा उदय आणि उत्कर्ष' या विषयावर निबंध लिहिला. पुढच्या काळात त्यांनी त्याच नावाचे पुस्तक लिहिले. अफाट वाचनाने त्यांची बुद्धी प्रगल्भ झाली होती. त्यामुळे त्यांना शिष्यवृत्ती मिळे; बक्षिसेही मिळत. १८६२(?) साली ते मॅट्रिक तर १८६४ साली एम. ए. झाले. त्या वेळी अलेक्झांडर ग्रॅन्ट यांचा सहवास आणि मार्गदर्शन त्यांना लाभले. या काळात माधवरावांनी विविध विषयांवर निबंधलेखन केले. इतिहास आणि अर्थशास्त्र हे त्यांचे आवडीचे विषय राहिले आणि त्यात त्यांनी अधिकारही प्राप्त केला होता. त्यांनी अध्यापन, परीक्षण, अनुवाद, न्यायदान अशा कामांमध्ये आपल्या बुद्धीची चमक दाखवली. त्यांनी इतिहास हा विषय घेऊन एम. ए. केले. इ.स. १८६६ साली ते कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाले. मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो म्हणून त्यांची निवड झाली.

विवाह

म.गो. रानडे यांचा पहिला विवाह १८५१ साली वयाच्या ११-१२व्या वर्षी वाईतील दांडेकरांच्या रमा नावाच्या मुलीशी झाला. ही पत्नी आजारी पडली आणि तिचे १८७३ साली निधन झाले. माधवरावांचे विधवांच्या पुनर्विवाहासंबंधीचे विचार आणि त्या चळवळीतील त्यांचा सहभाग लक्षात घेता ते एखाद्या विधवेशी लग्न करतील अशी अटकळ त्यांच्या वडिलांनी बांधली आणि त्या सालच्या नोव्हेंबरच्या ३० तारखेला अण्णासाहेब कुर्लेकर यांच्या कन्येशी त्यांनी माधवरावांचा विवाह करून दिला. लग्नानंतर माधवरावांनी या पत्नीचे नावही रमा असेच ठेवले. माधवरावांची त्या काळात 'बोलके सुधारक' म्हणून सनातन्यांकडून संभावनाही झाली. विधवाविवाहाची हाती आलेली संधी आपण दवडली म्हणून ते दु:खी झाले, पण पुढे त्यांनी रमाबाईंना शिकवले.

न्यायाधीशी

काही काळ त्यांनी शिक्षक, संस्थानाचे सचिव, जिल्हा न्यायाधीश म्हणून विविध ठिकाणी काम केले. इ.स. १८९३ साली मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली.[१]

सार्वजनिक कार्य

ज्ञानप्रसारक सभा, परमहंस सभा, प्रार्थना समाज, सार्वजनिक सभा, भारतीय सामाजिक परिषद इत्यादी विविध संस्था स्थापन करण्यात व त्यांचा विस्तार करण्यात त्यांचा प्रमुख सहभाग होता. ‘अनेक क्षेत्रांतील संस्था स्थापन करून त्यांनी भारतात संस्थात्मक जीवनाचा पाया घातला,’ असे त्यांच्याबद्दल गौरवाने म्हटले जाते. रानडे यांनी स्वातंत्र्यासाठी व सामाजिक सुधारणांसाठी कायम घटनात्मक व सनदशीर मार्गांचा पुरस्कार केला. स्वातंत्र्यपूर्व काळातील ‘मवाळ’ प्रवाहाचे ते नेते होते. त्यांनी भारतीय राजकारणात अर्थशास्त्रीय विचार आणला. स्वदेशीच्या कल्पनेला त्यांनी शास्त्रशुद्ध व व्यावहारिक स्वरूप दिले. त्यांनी भारतातील दारिद्ऱ्याच्या प्रश्नाचे मूलभूत विवेचन करून येथील दारिद्ऱ्याची कारणे व ते दूर करण्याचे उपाय यासंबंधी अभ्यासपूर्ण विचार मांडले.
भारतीय समाजात संकुचित वृत्ती; जातिभेदांचे पालन; भौतिक सुखे, व्यावसायिकता व व्यावहारिकता यांविषयाचे गैरसमज यांसारखे दोष निर्माण झाल्यामुळे समाजाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. हे दोष दूर करूनच आपल्या समाजाची प्रगती साधता येईल असे त्यांचे ठाम मत होते. समाजाची राजकीय किंवा आर्थिक उन्नती घडवून आणायची असेल, तर सामाजिक सुधारणेकडे लक्ष पुरविले पाहिजे. "ज्याप्रमाणे गुलाबाचे सौंदर्य व सुगंध हे जसे वेगळे करता येत नाहीत, त्याप्रमाणे राजकारण व सामाजिक सुधारणा यांची फारकत करता येत नाही" असे त्यांचे मत होते. हे विचार त्यांनी समाजसुधारणा चळवळीच्या अगदी सुरुवातीच्या काळात मांडल्यामुळे त्यांना ‘भारतीय उदारमतवादाचे उद्गाते’, असेही म्हटले जाते.

 

संस्था

दिनांक ३१ मार्च, इ.स. १८७६ रोजी न्यायमूर्ती रानडे, डॉ. आत्माराम पांडुरंग, डॉ. रा. गो. भांडारकर, वामन आबाजी मोडक इत्यादी मंडळींनी पुढाकार घेऊन मुंबईत ‘प्रार्थना समाजा’ची स्थापना केली. त्याआधी इ.स. १८७१ साली रानडे यांचा सार्वजनिक सभेच्या स्थापनेशी व कार्याशी संबंध आला होताच. सामाजिक प्रश्नांचे महत्त्व लक्षात घेऊन, समाजसुधारणांसाठी रानडे यांनी पुढाकार घेऊन ‘भारतीय सामाजिक परिषदेची' स्थापना केली. या परिषदेचे ते १४ वर्षे महासचिव होते. जातिप्रथेचे उच्चाटन, आंतरजातीय विवाहांस परवानगी, विवाहाच्या वयोमर्यादेत वाढ, बहुपत्नीकत्वाच्या प्रथेस आळा, विधवा पुनर्विवाह, स्त्री-शिक्षण, तथाकथित जाति-बहिष्कृत लोकांच्या स्थितीत सुधारणा, हिंदू-मुसलमानांच्या धार्मिक मतभेदांचे निराकरण अशा या संस्थेच्या मागण्या होत्या. भारताच्या स्वातंत्र्यात पुढे मध्यवर्ती भूमिका बजावणाऱ्या ‘राष्ट्रीय काँग्रेस’ या संघटनेच्या स्थापनेतही (इ.स. १८८५) न्यायमूर्ती रानडे यांचा मोठा सहभाग होता.
न्यायमूर्ती रानडे यांनी वक्तृत्वोत्तेजक सभा (हीच संस्था पुणे शहरात दरवर्षी, वसंत व्याख्यानमालाआयोजित करते), नेटिव्ह जनरल लायब्ररी, फीमेल हायस्कूल, मुलींच्या शिक्षणासाठी हुजूरपागा शाळा, इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया, इत्यादी अनेक संस्था पुढाकार घेऊन स्थापन केल्या. मराठी ग्रंथकार संमेलन सर्वप्रथम त्यांच्याच प्रयत्नांमुळे यशस्वी ठरले होते. त्यातूनच पुढे साहित्य संमेलन योजण्याची प्रथा सुरू झाली. न्यायमूर्ती रानडे हे स्वतः उत्तम संशोधक, विश्लेषक होते हे त्यांच्या द राइझ ऑफ मराठा पॉवर (मराठी सत्तेचा उदय) या ग्रंथावरून दिसून येते. त्यांच्या व्याख्यानांचे संग्रहही पुढील काळात प्रकाशित झाले.

लोकांचा रोष

विष्णुबुवा ब्रह्मचारी, करसनदास मुलजी, भाऊ दाजी, रावसाहेब मंडलिक, विष्णुशास्त्री पंडित, सार्वजनिक काका आणि पंडिता रमाबाई यांच्या बरोबरीने आणि सहकार्याने माधवरावांनी विधवांच्या पुनर्विवाहाचा प्रश्न, संमतीवयाचा कायदा यांसारख्या अनेक समाजसुधारणांकरिता अथक प्रयत्न केले. परंतु स्वामी दयानंद सरस्वती, वासुदेव बळवंत फडके, पंचहौद मिशन, रखमाबाई खटला या व्यक्ती वा घटनांच्या संदर्भांत त्यांना टीका सहन करावी लागली. त्या काळात समाजसुधारकांना फार विरोध होई. माधवरावांच्या या समाजसुधारकी कामालाही सनातनी वर्गाकडून सतत विरोध झाला. माधवरावांनी तो विरोध सहनशीलतेने आणि समजुतीने हाताळला.

सरकारी रोष

माधवरावांच्या समाजकारणाच्या प्रारंभी अलेक्झांडर ग्रॅन्ट, सर बार्टल फ्रियर, बेडरबर्न यांच्या काळातील सरकारचा विश्वास त्यांनी अनुभवला. पण पुढे क्रांतिकारकांचे, पेंढाऱ्यांचे बंड, दुष्काळ आणि तत्कालीन सरकारविरोधी घटनांत माधवरावांचा हात असल्याचा संशय सरकारला येऊ लागला. त्याचा परिणाम म्हणून त्यांची बदली १८७९ साली धुळे येथे झाली आणि त्याचबरोबर त्यांच्या टपालावर नजर ठेवण्यात येऊ लागली. म्हणून गणेशशास्त्री लेले या मित्राने त्यांना नोकरीतून निवृत्ती स्वीकारण्याचा सल्ला दिला. माधवरांवांनी हा सल्ला मानला नाही, आणि पुढे यथावकाश सरकारचा संशय दूर झाला.

राजर्षी शाहू महाराज

Rajarshi Shahu Maharaj

6064   15-Jan-2018, Mon

                          (२६ जून १८७४– ६ मे १९२२). महाराष्ट्रातील करवीर तथा कोल्हापूर छत्रपती राजर्षी शाहू महाराजसंस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक. प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण इ. सुधारणांचे पुरस्कर्ते. त्यांचा जन्म कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई ह्या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंतराव. चौथ्या शिवाजींच्या अकाली निधनानंतर ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले (१७ मार्च १८८४). राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले. सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांसारखे गुरू त्यांना मिळाले. विद्यार्थिदशेत त्यांनी इंग्रजी, संस्कृत, इतिहास, राज्यशास्त्र इ. विषयांचा अभ्यास केला. त्यांना राज्याधिकार (२ एप्रिल १८९४) प्राप्त झाला. तत्पूर्वी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या कन्येबरोबर त्यांचा विवाह झाला (१८९१). त्यांना राजाराम व शिवाजी हे दोन मुलगे आणि राधाबाई (आक्कासाहेब) व आऊबाई या दोन कन्या झाल्या. 

 

त्यांनी प्रशासन-यंत्रणेनची पुनर्ररचना करून भास्करराव जाधव, दाजीराव विचारे, आ. ब. लठ्ठे यांसारख्या बहुजन समाजातील कर्तबगार व गुणी व्यक्तींना अधिकारावर नेमण्यास सुरुवात केली. १८९७-९८ साली प्रथम दुष्काळ व नंतर प्लेग अशी संकटे कोसळली. तरुण शाहूंनी धैर्याने त्यांवर मात केली. १९०२ साली सातव्या एडवर्डच्या राज्यारोहणानिमित्त त्यांनी युरोपचा दौरा केला. तेथील भौतिक प्रगतीचा मोठा प्रभाव त्यांच्यावर पडला; त्यामुळे त्यांचे अनुभवविश्व समृद्ध झाले.

 

कोल्हापुरात वेदोक्त प्रकरणाचा स्फोट झाला (१८९९). कोल्हापुरातील ब्रह्मवर्गाने शाहूंचे क्षत्रियत्व नाकारून त्यांना शूद्र म्हटले आणि त्यांना वेदमंत्राचा अधिकार नाकारला. यातून वेदोक्ताच्या संघर्षाचे पडसाद सर्व महाराष्ट्रभर उमटले. लो. टिळकांनी ब्रह्मवर्गाची बाजू घेतल्याने प्रकरण इरेस पडले. शाहूंनी वेदोक्ताचा अधिकार नाकारणाऱ्या राजोपाध्यांची व शंकराचार्यांची वतने जप्त केली. ब्रह्मवर्गाने हे प्रकरण व्हाइसरॉयपर्यंत नेले; पण शेवटी शाहूंचीच सरशी झाली. कोल्हापुरातील ब्रह्मवर्गास त्यांच्याशी समेट करावा लागला, पण महाराष्ट्रातील ब्रह्मवर्ग शेवटपर्यंत त्यांच्या विरोधातच राहिला. कुलकर्णी-वतन बरखास्ती, सत्यशोधक जलशांना शाहूंचा पाठिंबा या बाबींमुळे तर हा विरोध वाढतच गेला.

 

वेदोक्त प्रकरणातील अनुभवावरून, भिक्षुकशाहीच्या जाळ्यातून मुक्त झाल्याशिवाय उच्चवर्णियांची धार्मिक व सामाजिक मक्तेदारी नष्ट होणार नाही, अशी शाहूंची धारणा झाली होती. परिणामी ते म. फुल्यांच्या सत्यशोधक विचारसरणीकडे आकृष्ट झाले. त्यांनी उघडपणे त्यांचे अनुयायीत्व स्वीकारले नसले, तरी सत्यशोधक तत्त्वांना त्यांचा पाठिंबा होता. त्यांच्या प्रोत्साहनामुळे महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाचे पुनरुज्जीवन झाले. पारंपरिक भिक्षुकशाहीच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी त्यांनी कोल्हापुरात ब्राह्मणेतर पुरोहितांची निर्मिती करण्यासाठी ‘श्री शिवाजी वैदिक स्कूल' ची स्थापना केली आणि मराठ्यांसाठी स्वतंत्र ‘क्षात्रजगद्‌गुरू' पद निर्माण करून त्यावर सदाशिवराव पाटील या उच्चविद्याविभूषित तरुणास नेमले (१९२०). धार्मिक व सामाजिक क्षेत्रांत हा एक अभिनव प्रयोग होता.

 

शाहूंनी आर्यसमाज व थिऑसॉफिकल सोसायटी या संस्थांनाही आश्रय दिला. वेदांवरील श्रद्धा व जातिभेदाला विरोध, या आर्यसमाजाच्या तत्त्वांमुळे त्यांनी स्वत:ला ‘आर्यसमाजी' म्हणून घोषित केले; तथापि त्याच्या ते आहारी गेले नाहीत. अर्यसमाजाच्या गुरुकुलाची स्थापना झाली. पुढे राजाराम कॉलेज आर्यसमाजाकडे चालविण्यासाठी दिले गेले.

 

बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत, हे जाणून शाहूंनी शिक्षणाच्या, विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अमलात आणला (१९१७). प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. प्राथमिक शिक्षणावर या संस्थानात होणारा खर्च मोठा होता.

 

खेड्यापाड्यांतील मुलांना उच्चशिक्षणाची सुविधा मिळावी, म्हणून शाहूंनी कोल्हापुरात मराठा, जैन, लिंगायत, मुस्लीम, सुतार, नाभिक, महार, चांभार-ढोर इ. जातिजमातींसाठी वसतिगृहे स्थापन केली. शिवाय नासिक, पुणे, नगर, नागपूर इ. अन्य ठिकाणी त्यांच्या प्रेरणेने व साहाय्याने अनेक वसतिगृहे सुरू झाली. त्यांच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील अनेक पिढ्या शिकून तयार झाल्या.

 

मागासलेल्या जातींत शिक्षणाबद्दल फारशी आस्था नसल्याने व त्याचे कारण शिक्षण घेऊनही सरकारी नोकरी लाभण्याची शक्यता नसल्याने शाहूंनी २६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानातील ५०% शासकीय नोकऱ्या मागासलेल्या वर्गासाठी राखीव ठेवल्याचा जाहीरनामा काढला. राखीव जागांचे धोरण अमलात आणणारे शाहू हे हिंदुस्थानातील पहिले राज्यकर्ते ठरले. अस्पृश्यतेचे उच्चाटन हे शाहूंनी आपले जीवितकर्तव्य मानले. संस्थानातील शाळा, पाणवठे, विहिरी, दवाखाने, कचेऱ्या इ. सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यास त्यांनी कायद्याने प्रतिबंध केला. त्यासाठी अनेक वटहुकूम जारी केले (१९१८-१९). त्यांनी अस्पृश्यांना सरकारी नोकरीत घेतले. समाजातील तलाठ्यासारख्या प्रतिष्ठेच्या जागा दिल्या. त्यांच्यापैकी अनेकांना माहूत, हूलस्वार, पोलीस, स्वत:चे मोटारचालक म्हणून नेमले. महार-वतन खालसा करून महारांची वेठबिगारीतून आणि गुन्हेगार मानल्या गेलेल्या जातींची ‘हजेरी' पद्धतीतून मुक्तता केली. फासेपारधी, कोरवी, माकडवाले यांसारख्या भटक्या व विमुक्त जातींना जवळ करून त्यांचे जीवन स्थिर केले. त्यांना आपले रक्षक म्हणून नेमले. खेड्यापाड्यांतील बलुतेदारांनाही त्यांच्या बलुतेपद्धतीतून मुक्त करून त्यांना समाजातील सर्व उद्योगधंदे खुले केले (१९१८). जोगिणी व देवदासी प्रथेस प्रतिबंध करणार कायदा जारी केला (१९२०).

 

याच सुमारास शाहूंची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट झाली (१९१९). बाबासाहेबांच्या मूकनायक या वृत्तपत्रास व पुढे त्यांच्या इंग्लंडमधील उच्चशिक्षणास त्यांनी अर्थसाहाय्य केले. माणगाव व नागपूर येथील अस्पृश्यता निवारण परिषदांत बाबासाहेबांबरोबर सहभागी होऊन अस्पृश्यांना त्यांचा ‘खरा पुढारी' मिळाल्याबद्दल त्यांनी त्यांचा गौरव केला.

अस्पृश्यतेबरोबरच जातिभेदाशी शाहूंनी अखेरपर्यंत संघर्ष केला. आंतरजातीय विवाह हा जातिभेदावर रामबाण उपाय वाटून त्यांनी आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली (१९१८). स्वत: पुढाकार घेऊन अनेक आंतरजातीय (धनगर-मराठा) विवाह घडवून आणले. तसेच बालविवाहास प्रतिबंध करून नोंदणी विवाहाचा कायदा जारी केला. घटस्फोटास व विधवापुनर्विवाहास कायदेशीर मान्यता दिली. कुटुंबात होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळांपासून स्त्रीला संरक्षण देणारा कायदाही त्यांनी मंजूर केला (१९१९). मागासलेल्या वर्गांतील मुलींना व स्त्रियांना मोफत शिक्षणाची सुविधा निर्माण केली.

 

सामाजिक सुधारणांबरोबरच शाहूंनी शेतीस व उद्योगधंद्यांस प्रोत्साहन दिले. अनेक कृषी व औद्योगिक प्रदर्शने भरविली. पन्हाळ्यावर चहा, कॉफी, रबर यांच्या लागवडींचे प्रयोग केले. कृषी उत्पादनासाठी शाहूपुरी, जयसिंगपूर यांसारख्या बाजारपेठा वसविल्या. त्यामुळे कोल्हापूर ही गुळाची बाजारपेठ म्हणून देशात प्रसिद्ध पावली. शाहूंनी कोल्हापुरात कारखानदारीचा पाया रचला. ‘शाहू मिल' ची स्थापना करून आधुनिक वस्त्रोद्योगास त्यांनी चालना दिली. शाहूंनी बांधलेले राधानगरीचे धरण कृषी क्षेत्रात संस्थानचा कायापालट करणार उपक्रम ठरला. संस्थानी मुलखातील हे सर्वांत मोठे धरण बांधून त्यांनी आपले संस्थान सुजलाम्‌-सुफलाम्‌ करून टाकले. शाहूंनी ‘सहकारी संस्थांचा कायदा' करून सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली (१९१३).

 

शाहूंनी संगीत, नाट्य, चित्रकला, मल्लविद्या आदी कलांना राजाश्रय देऊन महाराष्ट्रात कलेच्या क्षेत्रात स्पृहणीय कामगिरी केली. अल्दियाखॉं, हैदरबक्षखॉं, भूर्जीखॉं, सुरश्री केसरबाई, गानचंद्रिका अंजनीबाई मालपेकर अशा अनेक गायक-गायिकांनी शाहूंच्या आश्रयाने अखिल भारतीय कीर्ती संपादन केली. त्यांनी अनेक नाटक कंपन्यांना व गुणी कलावंतांना आश्रय दिला. बालगंधर्व व संगीतसूर्य केशवराव भोसले हे थोर कलावंत शहूंनीच महाराष्ट्राला दिले. संगीत व नाट्यकलेच्या जोपासनेसाठी त्यांनी कोल्हापुरात भव्य पॅलेस थिएटर (केशवराव भोसले नाट्यगृह) बांधले. त्याच्या शेजारीच खुल्या नाट्यगृहाचीही सोय केली. शाहूंच्या दरबारात आबालाल रहिमानसारखा महान चित्रकार कलावंत होऊन गेला. बाबूराव पेंटर, दत्तोबा दळवी प्रभृती चित्रकारांना त्यांचे प्रोत्साहन मिळाले. मल्लविद्येच्या प्रांतात शाहूंनी संस्थानासह सर्व देशांतील मल्लांना उदार आश्रय दिला. रोमच्या आखाड्याच्या धर्तीवर कोल्हापुरात कुस्तीचे मैदान बांधले. त्यांच्या कारकीर्दीत कोल्हापूर ही ‘मल्लविद्येची पंढरी' बनली. खुद्द शाहू हे मल्लांचे मल्ल म्हणून प्रसिद्ध होते. यांशिवाय त्यांनी कोल्हापुरात साठमारी हा हत्तीचा खेळ सुरू केला. शिकार तर त्यांचा आवडीचा छंद होता. पट्टीचा शिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता.

 

शाहूंच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना ‘राजर्षी' पदवी बहाल केली (१९१९). त्यांच्या कार्यामुळे दलित-पतितांचा उद्धारक, रयतेचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा जनसामान्यात निर्माण झाली. या राजाने अज्ञानी बहुजन समाजाला जागृत करण्याचे व्रत अखेरपर्यंत सांभाळले. अखेरच्या दिवसांत द्वितीय चिरंजीव शिवाजी यांच्या अपघाती निधनाने (१९१८) ते खचून गेले, तशातच मधुमेहाने ते ग्रासले होते. अखेर मुंबई येथे त्यांचे वयाच्या अवघ्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र राजाराम महाराज कोल्हापूरच्या गादीवर आले.


Top