गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा मराठी आणि इंग्रजी प्रश्नविश्लेषण

347 30-Sep-2019, Mon
लिपिक टंकलेखक, कर सहायक आणि दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क या पदांसाठी गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा संयुक्त आणि पदनिहाय पेपर अशा पद्धतीने पहिली परीक्षा मागील वर्षी झाली. या पॅटर्नमध्ये पेपर क्र. १ हा संयुक्त पेपर असतो आणि पेपर क्र. २ हा प्रत्येक पदासाठी वेगळा घेण्यात येतो. संयुक्त पेपरमध्ये मराठी व इंग्रजी हे घटकविषय समाविष्ट आहेत. सन २०१८च्या पेपरचे विश्लेषण या लेखामध्ये करण्यात येत आहे.
मराठी भाषेसाठी ६० गुणांसाठी ६० प्रश्न तर इंग्रजी भाषेसाठी ४० गुणांसाठी ४० प्रश्न विचारण्यात आले आहेत. दोन्ही भाषांमध्ये उताऱ्यावरील प्रश्नांची संख्या आहे प्रत्येकी पाच. यापुढील परीक्षांमध्ये अशीच रचना असणे अपेक्षित आहे. या पेपरसाठी २५% नकारात्मक गुणपद्धती लागू आहे. हे पाहता सर्वच्या सर्व प्रश्न सोडविण्याचा अट्टहास करून चालणार नाही. ८५ ते ९० प्रश्न सोडविण्याचे उद्दिष्ट ठरवून पेपर सोडविणे व्यवहार्य ठरेल. या सगळ्याचा विचार केला तर मराठीवर भर देऊन तयारी केल्यास चांगल्या गुणांची अपेक्षा करता येईल.
व्याकरणावरील प्रश्न
दोन्ही भाषांमधील व्याकरणावरील प्रश्नांमध्ये बहुविधानी प्रश्नांचे प्रमाण बरेच जास्त आहे. प्रत्येक प्रकारच्या नियमावर किमान एक तरी प्रश्न विचारण्यात आलेला आहे.
- दोन्ही भाषांमधील व्याकरणावरील प्रश्न हे उदाहरणे देऊन आणि प्रत्यक्ष( direct / straight forward) दोन्ही पद्धतींनी विचारण्यात आले आहेत. त्यामुळे नियमांची नेमकी माहिती असणे आणि त्यांचा वापर करता येणे दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत.
- इंग्रजी शब्द रचना, स्पेलिंग, शब्दांचे प्रकार यांवर सरळ व विश्लेषणात्मक अशा दोन्ही प्रकारे प्रश्न विचारण्यात आले आहेत. रेन अँड मार्टिन किंवा कोणत्याही इंग्रजी व्याकरणाच्या प्रमाणित संदर्भग्रंथाचा वापर करावा.
- इंग्रजी वाक्यरचनेचे प्रकार व त्याचे नियम बारकाईने समजून घेणे आवश्यक आहे. [प्रयोग, काळ आणि तुलनांचे स्तर (Degrees of Comparison)]. या घटकाचा अभ्यास कसा करावा, यासाठी सिव्हिल्स महाराष्ट्र-राज्य लोकसेवा आयोग परीक्षा माहिती कोश हे पुस्तक उपयोगी ठरेल.
- मराठीच्या प्रश्नांमध्ये व्याकरणाचे प्रत्यक्ष नियम विचारण्यापेक्षा नियमांचे उपयोजन करून उदाहरणे सोडविण्याच्या प्रश्नांचा समावेश जास्त आहे. त्यामुळे अर्थ समजून घेऊन नियमांचा वापर करण्याचा सराव आवश्यक आहे. यासाठी के सागर प्रकाशनचे डॉ. लीला गोविलकर यांचे मराठी व्याकरणाचे पुस्तक वापरावे.
- म्हणी आणि वाक्प्रचार यांवरील प्रश्नांची तयारी जास्तीत जास्त सराव करूनच होऊ शकणार आहे, हे लक्षात घ्यावे.
- समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार व म्हणी यांबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी रोजचे इंग्रजी वाचन व त्याचे आकलन याचा सराव आवश्यक आहे. वाक्प्रचार, म्हणी व अनेक शब्दांसाठी एका शब्दाचे उपयोजन यांची तयारी कशी करावी यासाठीही सिव्हिल्स महाराष्ट्र वाचावे.ल्ल शब्दांचे अर्थ आणि मूलभूत व्याकरण नियम यांची सांगड घालणारे प्रश्नही विश्लेषणात्मक प्रश्नांमध्ये समाविष्ट आहेत.
- दोन्ही भाषांमधील शब्दसंग्रह, वाक्प्रचार व म्हणी यांचा संग्रह वारंवार वाचत राहणे आणि शक्य असेल तर रोजच्या रोज ठरावीक वेळी अवांतर वाचन करणे हा या घटकाच्या तयारीचा गाभा आहे.
- उताऱ्यावरील प्रश्नांच्या विश्लेषणातून लक्षात येते की चर्चाविषय नीट समजून घेतला तर सगळेच प्रश्न आत्मविश्वासाने सोडविता येतात. त्यामुळे उतारा
- घाई न करता शांतपणे व समजून घेत वाचला तर प्रश्नांचे उत्तर नेमके कुठे शोधायचे ते लगेच लक्षात येईल.
यासाठी दोन्ही उताऱ्यांना मिळून किमान १० ते १२ मिनिटे दिलीत तर १० पकी ८ गुण तर नक्कीच मिळवता येतील.मराठी आणि इंग्रजी या भाषांचे व्याकरण ढोबळ नियमांच्या समान रचनेमध्ये दर्शवता येत असले तरी त्यांच्यामध्ये मूलभूत फरक आहे. किंबहुना प्रत्येक भाषेची शब्दयोजना, वाक्यरचना इत्यादी बाबी इतरांपेक्षा वेगळ्याच असतात. हा मुद्दा लक्षात घेऊन दोन्ही भाषांच्या अभ्यासासाठी स्वतंत्र पण समांतर अशी योजना करता आल्यास कमी वेळेत चांगली तयारी होते. भाषेचा अर्थ व व्याकरणाचे नियम समजून घेणे आणि त्यांच्या वापराचा सराव करणे ही फक्त या परीक्षेतील यशाचीच नव्हे तर भाषेवर मजबूत पकड निर्माण करायची गुरुकिल्ली आहे.