विज्ञान व तंत्रज्ञान विकास

Science and Technology Development

1237   17-Aug-2019, Sat

अर्थव्यवस्थेच्या विकासाचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाशी जवळून संबंध असल्याने ‘विज्ञान-तंत्रज्ञान’ हा घटक अर्थशास्त्राशी संबंधित एमपीएससीच्या मुख्य परीक्षेच्या पेपर ४ मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. या घटकाची तयारी कशी करावी, याविषयी..

अर्थव्यवस्थेचा विकास हा बव्हंशी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासावर अवलंबून असतो. उमेदवारांनी पूर्व परीक्षेसाठी ‘सामान्य विज्ञान’ समजून घ्यायला हवे. मुख्य परीक्षेसाठी सामान्य विज्ञान विषयाचे उपयोजन म्हणजेच तंत्रज्ञान हे वेगवेगळ्या ‘आíथक’ बाबींशी संबंध जोडून अभ्यासायला हवे अशी आयोगाची अपेक्षा आहे. मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पाहिल्यानंतर लक्षात येते की, तंत्रज्ञान व त्याचा मानवी कल्याणासाठी उपयोग या अनुषंगाने सर्व घटक अभ्यासणे आयोगाला अभिप्रेत आहे. या घटकाचा पद्धतशीर अभ्यास कशा प्रकारे करायचा ते पाहू या.

ऊर्जा


या घटकातील ऊर्जा साधने व त्यांचे प्रकार, स्वरूप, ऊर्जा निर्मिती या घटकांमधील वैज्ञानिक संकल्पना व्यवस्थित समजावून घेणे आवश्यक आहे. ऊर्जा निर्मितीमध्ये उपयोगात आणल्या जाणाऱ्या साधनांमागची तत्त्वे, प्रक्रिया तसेच तंत्रज्ञानाची मूलभूत माहिती करून घ्यायला हवी. ऊर्जेची गरज, वेगवेगळ्या क्षेत्रांतील वापर, मागणी, ऊर्जा निर्मिती, पुरवठा इत्यादी आकडेवारी (टक्केवारी) देशस्तरीय व राज्यस्तरीय आíथक पाहणी अहवालातून अभ्यासायला हवी. याबाबतच्या देशस्तरीय आकडेवारीमध्ये महाराष्ट्राचे असलेले स्थान माहीत असणे आवश्यक आहे. ऊर्जा निर्मिती, मागणी, वापर व पुरवठा इत्यादींबाबत महाराष्ट्राचा इतर राज्यांच्या तुलनेत असलेला क्रमांक माहीत करून घ्यावा. ऊर्जा निर्मिती प्रकल्पांचे प्रकार व त्यांचा ऊर्जा निर्मितीमधील वाटा समजून घ्यायला हवा. ऊर्जा निर्मितीसाठीच्या विविध योजनांचा अभ्यास तक्तयामध्ये करता येईल. वेगवेगळ्या योजनांबाबत त्यांची उद्दिष्टे, त्यासाठी विहित कार्यपद्धती, खर्चाचे वितरण, अंमलबजावणी यंत्रणा, यशापयश अशा मुद्दय़ांवर आधारित तक्ता तयार करून अभ्यास करावा. याबाबत संबंधित महत्त्वाच्या संस्था, व्यक्ती, राजकीय पलू इत्यादींचा आढावा घेणे आवश्यक आहे. भारत व महाराष्ट्राचा आíथक पाहणी अहवाल व इंडिया ईयर बुक या स्रोतांमधून आपली माहिती अद्ययावत करायला हवी.

संगणक व माहिती तंत्रज्ञान


संगणक कार्यपद्धती, नेटवìकग, वेब तंत्रज्ञान या बाबींचा अभ्यास मूलभूत आणि उपयोजित संकल्पनांच्या आधारे करायला हवा. सायबर कायद्याचा अभ्यास पेपर- २ मधील विधी घटकामध्ये पूर्ण होईल. माहिती-तंत्रज्ञान उद्योगाचे आíथक महत्त्व वेगवेगळ्या पलूंच्या आधारे अभ्यासायला हवे. रोजगार निर्मिती, आयात-निर्यात, परकीय गुंतवणूक व ॅऊढ मधील या उद्योगाचा वाटा नेमका किती आहे हे आíथक पाहणी अहवालातून अभ्यासायला हवे. माहिती तंत्रज्ञान उद्योगातील समस्यांचे स्वरूप, कारणे, उपाय या बाबींचा अभ्यास इंडिया ईयर बुक व दैनंदिन घडामोडी यांद्वारे करावा. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रासंबंधित शासकीय धोरणे व विविध शासकीय उपक्रमांचा अभ्यास हा त्यांचे उद्दिष्ट, स्वरूप, अंमलबजावणी, खर्चाची विभागणी इत्यादी मुद्दय़ांच्या अनुषंगाने
करायला हवा.

अवकाश तंत्रज्ञान


या घटकाचे कालानुक्रमांवर आधारित तक्ते अनेक संदर्भ साहित्यात सापडतात. या तक्त्यामध्ये उपक्रमाची ठळक वैशिष्टय़े, उपयोजन व आनुषंगिक माहिती हे तीन मुद्दे समाविष्ट केल्यास विविध कृत्रिम उपग्रह, अवकाशयाने, क्षेपणास्त्रे व विविध अवकाश प्रकल्प याविषयी अभ्यास होऊ शकेल. यातून या तंत्रज्ञानाचा विकास कसा झाला हे तुलनात्मकदृष्टय़ा अभ्यासता येईल. कृत्रिम उपग्रह, क्षेपणास्त्र, सुदूर संवेदन व जीआयएस या तंत्रज्ञानामागची वैज्ञानिक तत्त्वे, त्यांची कार्यपद्धती व उपयोग या बाबी विज्ञानविषयक संदर्भ साहित्याद्वारे अभ्यासायला हव्यात. सुदूर संवेदनासाठी भूगोलविषयक पुस्तक उपयुक्त ठरते. मात्र, इंटरनेटच्या माध्यमातून माहिती जमवणे, नव्या संकल्पना समजून घेणेही
आवश्यक आहे.

जैव तंत्रज्ञान, आण्विक धोरण व आपत्ती व्यवस्थापन


या तिन्ही घटकांचे अभ्यासक्रमात सविस्तर विवेचन केलेले आहे. त्यामुळे अभ्यासक्रमात नमूद केलेल्या प्रत्येक मुद्दय़ाच्या अनुषंगाने अभ्यास करणे आवश्यक आहे. हे मुद्दे या प्रत्येक घटकाचे विविध पलू आहेत आणि त्यांचा अभ्यास म्हणजेच त्या त्या घटकाचा तार्किक व संकल्पनात्मक अभ्यास आहे. या तिन्ही घटकांबाबत ‘चालू घडामोडी’ हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी इंडिया ईयर बुक व आíथक पाहणी अहवाल इत्यादींमधील संबंधित प्रकरणे बारकाईने अभ्यासावी लागतील.
‘भारताचे आण्विक धोरण’ असा घटक असला तरी आण्विक तंत्रज्ञानाच्या मूलभूत संकल्पना माहीत असणे आवश्यक आहे. ‘आपत्ती’ या फक्त अभ्यासक्रमात नमूद केलेल्या संकटांपुरत्याच मर्यादित नाहीत. याबाबत उमेदवार ‘चालू घडामोडीं’बाबत जागरूक असणे अपेक्षित आहे.


या घटकासाठी पक्का संकल्पनात्मक अभ्यास आणि त्यावर आधारित उपयोजित मुद्दय़ांचा अभ्यास असे दुहेरी अभ्यासतंत्र आवश्यक आहे. संकल्पनात्मक अभ्यासासाठी मूलभूत विज्ञानाची पुस्तके व उपयोजित मुद्दय़ांसाठी ‘इंडिया ईयर बुक’चा उपयोग केल्यास अभ्यास योग्य पद्धतीने होईल. संदर्भ साहित्यामध्ये ‘योजना’ व ‘सायन्स रिपोर्टर’ यांचा समावेश केल्यास या अभ्यासाला पुरेशी खोली प्राप्त होईल.

ओपन सोर्स आणि भारत

what-is-open-source-software-11-

3378   25-Dec-2018, Tue

ओपन सोर्समधील आपल्या सुमार कामगिरीबद्दल आता विचार करायची वेळ आली आहे. माहिती तंत्रज्ञानातील महासत्ता आहोत अशा आपण बढाया मारल्या तरी सेवा क्षेत्र वगळता आपली कामगिरी फारशी उल्लेखनीय नाही..

ओपन सोर्स चळवळ ऐंशीच्या दशकात सुरू होऊन नव्वदच्या दशकात फोफावली असली तरीही तिची व्याप्ती प्रामुख्याने अमेरिकेत आणि काही प्रमाणात युरोपपुरतीच होती. ही गोष्ट एका अर्थाने अपेक्षितच म्हणावी लागेल. कारण संगणकशास्त्राची सुरुवात व विकास हा जवळपास सगळा एकटय़ा अमेरिकेतच झाला. अमेरिकेतली सुबत्ता, सरकारचं तंत्रज्ञानाभिमुख धोरण व संगणक क्षेत्रात संशोधन करणाऱ्या विद्यापीठांच्या मागे असलेलं भक्कम आर्थिक बळ, स्वत:च्या संरक्षणसिद्धतेसाठी दळणवळण क्षेत्रात घडवलेली क्रांती, कृती व संशोधनावर आधारित असलेली मानसिकता आणि तिचं शालेय जीवनापासून जोपासलेलं महत्त्व अशांसारख्या अनेक गोष्टी यासाठी कारणीभूत आहेत. त्यामुळे एकंदरच संगणकशास्त्र व त्यावर आधारलेल्या संगणक उद्योगाची तिथं प्रचंड भरभराट झाली.

ओपन सोर्सबद्दल मात्र हे गृहीतक संपूर्णपणे लागू होत नाही. ओपन सोर्स सॉफ्टवेअर बनवायला मुळात मोठय़ा भांडवलाची गरज नसते. एखाद्या कंपनी कार्यालयातल्या चार भिंतींच्या आड हे सॉफ्टवेअर बनत नाही. त्याचबरोबर कॉपीराइटसारख्या बौद्धिक संपदा नियमांच्या अदृश्य भिंतीदेखील ओपन सोर्स सॉफ्टवेअर निर्मिती तसेच वितरणाला अडवू शकत नाहीत.

ही ज्ञानावर आधारित व्यवस्था असल्यामुळे हिला जात, पात, लिंग, वय, शिक्षण आणि भौगोलिक सीमा या कसल्याचेच बंधन नाही. त्यामुळे भारतासारख्या विकसनशील देशात, जिथं या सॉफ्टवेअरची अधिक गरज आहे, किमान संगणक आणि दळणवळण क्षेत्रातल्या क्रांतीनंतर ओपन सोर्स सॉफ्टवेअर चळवळीची व्याप्ती वाढायला काहीच हरकत नाही. ओपन सोर्सच्या या अंगाचा आपण या लेखात भारतापुरता विचार करणार आहोत.

या विषयाला मुख्यत्वे तीन पैलूंनी अभ्यासता येईल. सर्वात पहिलं म्हणजे नव्या ओपन सोर्स सॉफ्टवेअरच्या निर्मितीमध्ये तसेच लिनक्ससारख्या इतर आघाडीच्या ओपन सोर्स प्रकल्पांमध्ये भारतीयांचा सहभाग! दुर्दैवाने यात अभिमानाने सांगण्यासारखं विशेष काही नाही. एक तर आपल्याकडे ओपन सोर्स सॉफ्टवेअरबद्दलची जागृती अंमळ उशिरानेच झाली. विसाव्या शतकाच्या अंतापर्यंत आपण बऱ्याच अंशी ओपन सोर्सबद्दल अनभिज्ञ होतो. काही विद्यापीठांत तसेच थोडय़ा हौशी तंत्रज्ञांचे समुदाय तयार झाले होते व ते काही प्रमाणात आपला सहभाग देत होते, पण त्यांच्यात फारसा समन्वय नव्हता.

२००० साली जेव्हा लिनक्स प्रकल्प ऐन भरात होता तेव्हा लिनक्समध्ये असलेल्या विविध देशांच्या तंत्रज्ञ व प्रोग्रामर्सच्या सहभागावर अमेरिकेत एक सर्वेक्षण झालं होतं. यात पहिल्या पन्नास देशांच्या यादीतही भारताला स्थान नव्हतं. आपल्यासाठी लाजिरवाणी बाब म्हणजे या यादीत बेल्जियम, क्रोएशिया, हाँगकाँग यांसारखे पिटुकले तर अर्जेन्टिनासारखे भारताहूनही मागास देश होते.

२००१ साली पहिल्यांदा भारतात ओपन सोर्सप्रति जागृती वाढवण्यासाठी तसेच विस्कळीतपणे अस्तित्वात असणाऱ्या सर्व समुदायांना एका छत्राखाली आणण्यासाठी समन्वयक म्हणून केरळात थिरुवनंतपुरम येथे स्टॉलमनच्या फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशनच्या भारतीय शाखेची अधिकृतपणे पायाभरणी झाली. २००३ साली या संस्थेच्या वर्धापनदिनी खुद्द रिचर्ड स्टॉलमनने भारतात येऊन आपल्या त्या वेळच्या राष्ट्रपतींची- डॉ. एपीजे अब्दुल कलामांची घेतलेली भेट गाजली. त्याच व्यासपीठावरून  वैज्ञानिक असलेल्या आपल्या राष्ट्रपतींनी सर्व भारतीयांना ओपन सोर्सचा अधिकाधिक वापर करण्याचे व या प्रकल्पांमध्ये सहभाग देण्याचे आवाहन केले. यानंतर ओपन सोर्स चळवळीला भारतात काही प्रमाणात बळकटी आली.

भारतात ओपन सोर्समध्ये झालेलं आजवरचं सर्वात उल्लेखनीय काम म्हणजे शासनाच्या सी-डॅक या संगणक विज्ञान संशोधन केंद्राने २००७ मध्ये आयआयटी बॉम्बे व मद्रासच्या सहकार्याने बनवलेली ‘बॉस लिनक्स’ (इडरर – भारत ऑपरेटिंग सिस्टीम सोल्युशन्सचं लघुरूप) ही डेस्कटॉप ऑपरेटिंग प्रणाली! भारतातील सर्व व्यक्तींना त्यांच्या भाषेत संगणकावर काम करता यावं या हेतूने बॉसची निर्मिती करण्यात आली. डेबियन लिनक्सवर आधारलेली ही प्रणाली आज १८ प्रमुख भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.

बॉस लिनक्सच्या निर्मितीचा उद्देश चांगला असला आणि काही शासकीय आस्थापनांमध्ये तसेच शालेय संस्थांमध्ये तिचा वापर होत असला तरीही या प्रकल्पाला यशस्वी ओपन सोर्स प्रकल्प म्हणणं जरा धाडसाचंच ठरेल. लिनक्सच्या विविध आवृत्त्या (डेबियन, उबुंटू, काली लिनक्स वगैरे) आधीच उपलब्ध असताना एका तत्सम नव्या लिनक्स वितरणाची गरज होती असं नाही. सरकारी प्रकल्पाचं स्वरूप असल्यामुळे असेल कदाचित, पण याला तंत्रज्ञांचा भरभक्कम पाठिंबा मिळाला नाही व या प्रकल्पाची ‘कम्युनिटी’ तशी कमकुवतच राहिली.

डेस्कटॉपसाठीची सर्वोत्कृष्ट लिनक्स ऑपरेटिंग प्रणाली म्हणून नावलौकिक मिळवलेल्या उबुंटूच्या यशानंतर (जी आज दहापेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे) बॉस लिनक्स प्रकल्प मागे पडला. २०१५-१६ नंतर बॉस लिनक्सची एकही नवी आवृत्ती प्रकाशित झाली नाहीए यावरूनच या गोष्टीची कल्पना येईल.

ओपन सोर्सच्या प्रभावी वापरासाठी जगाला दखल घ्यायला लावणारा अजून एक प्रकल्प म्हणजे केरळ राज्य शासनाने चालू केलेला आयटी-अ‍ॅट-स्कूल प्रकल्प! यात शालेय विद्यार्थ्यांसाठी  परिणामकारक, पण त्याचबरोबर खेळीमेळीचं व्हावं म्हणून तंत्रज्ञानाच्या वापरासंदर्भात अनेक घटक अंतर्भूत होते. यातला एक प्रमुख घटक ओपन सोर्सचा अधिकाधिक वापर हा होता.

या प्रकल्पात सामील झालेल्या जवळपास १२००० शाळांसाठी म्हणून खास जीएनयू/ लिनक्सवर आधारित एक नवं लिनक्स वितरण बनविण्यात आलं. आज तंत्रज्ञानाच्या शालेय जीवनातील योग्य वापरासाठी आयटी-अ‍ॅट-स्कूल प्रकल्प आदर्श मानला जातो. केवळ भारतातल्या इतर राज्यांनीच नव्हे तर मध्य-पूर्वेतल्या अनेक देशांनीसुद्धा या प्रकल्पाचे अनुकरण केले आहे.

ओपन सोर्स आणि भारत या विषयाचा दुसरा पैलू म्हणजे भारतामध्ये वैयक्तिक, व्यावसायिक, शैक्षणिक तसेच संशोधन कार्यासाठी होणारा ओपन सोर्सचा वापर. या बाबतीत मात्र आपली कामगिरी समाधानकारक आहे असे म्हणता येईल.

आज एलआयसी, न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स, भारतीय रेल्वे अशा सरकारी आस्थापनांबरोबरच प्रचंड मोठे वित्तव्यवहार करणाऱ्या बँका, स्टॉक एक्स्चेंज व इतर शेकडो खासगी कंपन्या आज किमान रेड हॅट लिनक्सचा वापर आपल्या महत्त्वपूर्ण प्रणालींसाठी करत आहेत. केरळ, तमिळनाडूसारख्या राज्यांनी तर आपल्याकडील सर्व शाळा व महाविद्यालयांना जिथं शक्य असेल तिथं ओपन सोर्स वापरणं बंधनकारक केलंय. २००९-१० मध्ये आयआयएम बंगलोरतर्फे हाती घेतलेल्या संशोधन प्रकल्पातूनही भारतात वैयक्तिक आणि व्यावसायिक स्तरावर ओपन सोर्सप्रति वाढलेली जागरूकता स्पष्टपणे समोर आली होती.

ओपन सोर्सच्या अधिकाधिक वापरासाठी भारत सरकारने राबवलेली धोरणं हा या विषयाचा तिसरा पैलू आहे. या बाबतीतही आपली कामगिरी यथातथाच आहे. सरकारी अनास्थेमुळे असेल किंवा मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांच्या कॉर्पोरेट लॉबीमुळे असेल, एकविसाव्या शतकाचं पहिलं दशक संपल्यानंतरदेखील केंद्र शासनाने आपल्या माहिती तंत्रज्ञान धोरणात ओपन सोर्ससंदर्भात कोणतीही ठोस भूमिका घेतली नव्हती.

२०१२ मध्ये नव्याने प्रसिद्ध केलेल्या ‘राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान’ धोरणात प्रथमच ओपन सोर्सच्या सरकारी आणि शैक्षणिक स्तरावरील वापराचा स्पष्टपणे पुरस्कार करण्यात आला होता. २०१५ साली मात्र आपण आपल्या माहिती तंत्रज्ञान धोरणात स्वतंत्रपणे ओपन सोर्स धोरणाचा समावेश केला. यामुळे एखाद्या प्रणालीसाठी जेव्हा ओपन सोर्स सॉफ्टवेअरचा पर्याय उपलब्ध असेल तेव्हा ते वापरणे सरकारी आस्थापनांसाठी बंधनकारक झाले आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी ‘डिजिटल इंडिया’ अभियान प्रभावीपणे राबवण्यामध्ये असलेलं ओपन सोर्सचं महत्त्व या धोरणामध्ये मुद्देसूदपणे अधोरेखित केलं आहे.

असो. ओपन सोर्समधल्या आपल्या सुमार कामगिरीबद्दल आज अंतर्मुख होऊन विचार करायची वेळ आली आहे. आपण माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महासत्ता आहोत अशा आपण कितीही बढाया मारल्या तरीही एक सेवा क्षेत्र वगळता आपली कामगिरी फारशी उल्लेखनीय नाही हे खेदाने नमूद करावेच लागेल. नावीन्यतेच्या अभावामुळे भारतात आज या क्षेत्रातही एक साचलेपण आले आहे. ओपन सोर्स आघाडीवर तर आपली आता कुठे थोडी सुरुवात होते आहे. त्यामुळे ओपन सोर्ससंदर्भात भारतासाठी पुढील दशक कसं असेल ते पाहणं औत्सुक्यपूर्ण असणार आहे.

ओपन सोर्स – विस्तारणारी क्षितिजं (२)

what-is-open-source-software-9

1188   03-Dec-2018, Mon

ज्ञानकोश निर्मिती, संशोधनपर लेखन असलेल्यानियतकालिकांचं प्रकाशन, जैवविज्ञान व औषध निर्माण यांसारख्या क्षेत्रांबरोबर इतरही काही क्षेत्रांत ओपन सोर्स तत्त्वांवर आधारित प्रयोग केले गेले.

२००१ साल हे ओपन सोर्स व्यवस्थेच्या विस्तारणाऱ्या क्षितिजासंदर्भातलं एक ‘माइलस्टोन’ वर्ष म्हणून ओळखलं जातं. या वर्षी मुक्त स्वरूपातल्या ज्ञाननिर्मितीच्या तीन महत्त्वपूर्ण प्रकल्पांची मुहूर्तमेढ स्वतंत्रपणे रोवली गेली. पहिला म्हणजे डिजिटल स्वरूपातल्या ज्ञानकोशाची निर्मिती सहयोगात्मक पद्धतीने करणारा विकिपीडिया प्रकल्प, दुसरा म्हणजे संशोधनात्मक साहित्याला विनामूल्य व कॉपीराइटसारख्या बंधनांपासून संपूर्णत: मुक्त असा प्रवेश देणारा ‘ओपन अ‍ॅक्सेस’ प्रकल्प तर तिसरा म्हणजे कोणत्याही स्वरूपातल्या सर्जनशील कामाच्या बंधमुक्त वापर व पुनर्वितरणासाठी एक औपचारिक व्यवस्थेची पायाभरणी करणारा ‘क्रिएटिव्ह कॉमन्स’ प्रकल्प!

ओपन सोर्स सॉफ्टवेअर निर्मिती प्रक्रियेची तत्त्वं व संकल्पना मुक्त स्वरूपातल्या ज्ञानकोशाच्या निर्मितीसाठी चपखलपणे उपयोगात आणणारा एक प्रमुख आणि आत्यंतिक यशस्वी प्रकल्प म्हणून वादातीतपणे विकिपीडियाचं नाव घ्यावं लागेल. आज आंतरजालावर कोणत्याही विषयाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी गुगलनंतर विकिपीडियाचाच वापर केला जातो; किंबहुना एखाद्या विषयाचा गुगलवर शोध घेतला असता बऱ्याच वेळेला गुगलसुद्धा विकिपीडियाच्याच संकेतस्थळाचा पत्ता त्याचं उत्तर म्हणून देतो.

विसाव्या शतकाच्या अखेरीस इंटरनेट व डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना विविध प्रकारची माहिती तसेच सेवा पुरवणाऱ्या संकेतस्थळांची निर्मिती वेगाने होत होती. डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित बिझनेस मॉडेल्सचा प्रभावी वापर करणारी नवउद्योजकांची पिढी उदयाला येत होती. जिमी वेल्स हा याच पिढीचा प्रतिनिधी होता. इंटरनेटवर अफाट माहिती साठवण्याची क्षमता आहे व ती अविरतपणे अद्ययावत ठेवली जाऊ  शकते, मग असे असताना एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकासारख्या छापील ज्ञानकोशांची गरजच काय, हा प्रश्न त्याला सतावत होता.

त्याच्या कल्पनेतला इंटरनेटवरचा ऑनलाइन ज्ञानकोश बनविण्यासाठी त्याने न्यूपीडिया या प्रकल्पाची सुरुवात केली. न्यूपीडिया प्रकल्पासाठी त्याने अशी प्रणाली विकसित केली ज्यामुळे ज्ञानकोश निर्मितीत सहभाग असणाऱ्या एका तज्ज्ञाच्या कामाचं दुसऱ्या तज्ज्ञाकडून पुनरावलोकन करणं (पीअर रिव्ह्यू) खूप सोपं झालं. पण यात एक अडचण अशी होती, अजूनही ज्ञानकोशाच्या निर्मितीचं काम त्या त्या विषयातली तज्ज्ञ मंडळीच करत होती. यामुळे ज्ञानकोशात नव्या लेखांची भर घालणे, विद्यमान लेखांमध्ये सुधारणा करणे वगैरेसारखी कामं अत्यंत कूर्मगतीने होत होती.

ही मर्यादा दूर करण्यासाठी व ज्ञानकोश निर्मितीचे काम गतिमान पद्धतीने करण्यासाठी जिमी वेल्सने त्या वेळेला न्यूपीडियाच्या संपादकाचं काम करणाऱ्या लॅरी सँगरबरोबर विविध उपायांची चाचपणी करण्यास सुरुवात केली. त्या काळात काही संकेतस्थळं आपल्या वेबसाइटमधला एक विभाग केवळ तिला भेट देणाऱ्या अभ्यागतांसाठी राखून ठेवत असत. त्यात तयार होणाऱ्या माहितीचं संपूर्ण व्यवस्थापन (निर्मितीपासून, संपादनापर्यंत) वेबसाइटला भेट देणारी मंडळीच करत असत. सहयोगात्मक पद्धतीने माहितीचे आदानप्रदान करण्याची ही ‘विकी’ पद्धत लोकप्रिय होत होती.

न्यूपीडिया प्रकल्पाला अधिक मुक्त, सहयोगात्मक, गतिमान व काही प्रमाणात अनौपचारिक बनविण्यासाठी सँगरला ही ‘विकी’ पद्धत सर्वार्थाने योग्य वाटली. त्याने ही कल्पना वेल्सच्या गळी उतरवली व एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला १० जानेवारी २००१ला न्यूपीडियामध्ये ‘विकी’ विभाग अंतर्भूत करण्यात आला. न्यूपीडियात काम करणाऱ्या सर्व वरिष्ठ तज्ज्ञ व संपादकांकडून या निर्णयाला कडाडून विरोध झाला. त्यामुळे केवळ पाचच दिवसांत, १५ जानेवारी २००१ला वेल्सने ‘विकिपीडिया’ या केवळ लोकसहभागाच्या माध्यमातून ज्ञानकोशाची निर्मिती करणाऱ्या स्वतंत्र प्रकल्पाचा शुभारंभ केला.

या प्रकल्पामध्ये विकिपीडियाला भेट देणाऱ्या कोणत्याही वाचकाला तेथे उपलब्ध असलेल्या माहितीत बदल करण्याचा अधिकार बहाल केला गेला होता. आणि हे सर्व त्याची जात, पात, वय, लिंग वा शैक्षणिक पात्रता न बघता! जन्मल्यानंतर केवळ ३ वर्षांच्या आत विकिपीडियाचा ज्ञानसाठा हा एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका आणि एनकार्टाच्या (जे त्या वेळचे जगातले सर्वात मोठे ज्ञानकोश होते) एकत्रित ज्ञानसाठय़ापेक्षा जास्त झाला. आज विकिपीडिया हा ३०१ भाषांमधल्या जवळपास ५ कोटी लेखांचा समावेश असलेला (ज्यात केवळ इंग्रजी भाषेत ५७ लाखांवर लेख उपलब्ध आहेत) जगातील एकमेव ज्ञानकोश आहे.

विकिपीडियाला समांतरपणे सुरू झालेली मुक्त ज्ञाननिर्मितीची ‘ओपन अ‍ॅक्सेस’ चळवळ कॉपीराइट नियमांच्या अधीन राहून शोधनिबंध प्रकाशित करणाऱ्या अकादमिक व संशोधन पत्रिकांच्या पारंपरिक पद्धतीला मुक्त स्वरूपातला एक समर्थ पर्याय म्हणून आज उदयास आली आहे. या पद्धतीने तयार होणारं साहित्य हे कोणत्याही रॉयल्टी शुल्काशिवाय डिजिटल स्वरूपात ऑनलाइन उपलब्ध तर असतंच, पण त्याचबरोबर ही पद्धत आपल्या वाचकाला हे साहित्य वाचण्याचं, त्याची प्रत डाऊनलोड करण्याचं, त्याचं पुनरावलोकन तसेच वितरण करण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य बहाल करते.

ज्ञान निर्मिती व संवर्धनाची ही मुक्त पद्धत अल्पावधीतच लोकप्रिय झाली व आपल्या साहित्याला मुक्त प्रवेश देणाऱ्या विविध जर्नल्सची एक रिपॉजिटरी तयार करण्याची निकड जाणवायला लागली. २००३ सालात अशा जगभरातल्या सर्व ओपन अ‍ॅक्सेस जर्नल्सची नोंद ठेवून त्यांना थेट प्रवेश देणाऱ्या डिरेक्टरी ऑफ ओपन अ‍ॅक्सेस जर्नल्स (डीओएजे) या मध्यवर्ती संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली. आज डीओएजे संकेतस्थळावर विविध देशांत डिजिटल स्वरूपात प्रकाशित होणाऱ्या अकरा हजारांच्या वर ओपन अ‍ॅक्सेस जर्नल्सची यादी समाविष्ट आहे, ज्यावरून या व्यवस्थेच्या उत्तरोत्तर वाढत असलेल्या लोकमान्यतेचा अदमास येऊ  शकेल.

२००१ सालीच सुरू झालेल्या क्रिएटिव्ह कॉमन्स प्रकल्पाची सुरुवात लॉरेन्स लेसिग या अमेरिकेतल्या हार्वर्ड विद्यापीठात कायदा शिकवणाऱ्या प्राध्यापकाने केली. पहिल्यापासूनच लेसिग ओपन सोर्स चळवळीचा, विशेषकरून स्टॉलमनच्या फ्री सॉफ्टवेअर फाउंडेशनचा खंदा पुरस्कर्ता होता. कॉपीराइटचे नियम निर्मात्याच्या तसेच वापरकर्त्यांच्या सर्जनशील अभिव्यक्तीवर प्रचंड मर्यादा आणतात हे त्याचं ठाम मत होतं. कॉपीराइट नियमांमध्ये लवचीकता यावी या हेतूने त्याने हा प्रकल्प चालू केला.

खरं सांगायचं तर क्रिएटिव्ह कॉमन्स पद्धत कॉपीराइट नियमांच्या विरोधात नाहीए. ती पारंपरिक कॉपीराइट नियमांमुळे निर्मात्याला मिळणाऱ्या अधिकारांतले काही अधिकार वापरकर्त्यांच्या झोळीत टाकते. म्हणूनच कॉपीराइट पद्धतीत वापरलं जाणारं ‘सर्वाधिकार सुरक्षित’ (All Rights Reserved) हे कलम क्रिएटिव्ह कॉमन्स पद्धतीत ‘काही अधिकार सुरक्षित’ (Some Rights Reserved) असं बदललं आहे. क्रिएटिव्ह कॉमन्स पद्धतीत वापरकर्त्यांला कुठले अधिकार द्यायचे याचा निर्णय तो सर्जनशील दस्तऐवज बनवणारा निर्माता घेऊ  शकतो. मग त्यात त्याची नक्कल करून ती प्रत (व्यावसायिक किंवा गैरव्यावसायिक कारणांसाठी) वापरण्याचा, त्यात बदल वा सुधारणा करून पुनर्वितरण करण्याचा, मूळ निर्मितीसाठी वापरल्या गेलेल्या कॉपीराइटच्या किंवा लायसन्सिंगच्या शर्तीमध्ये बदल करण्याच्या अशा विविध अधिकारांपैकी काही निवडक अधिकार वापरकर्त्यांला बहाल करता येतात.

ओपन सोर्स सॉफ्टवेअर व्यवस्थेप्रमाणेच क्रिएटिव्ह कॉमन्स प्रकल्पालाही आज एका चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. विविध क्षेत्रांत निर्माण होणारा सर्जनशील दस्तऐवज आज क्रिएटिव्ह कॉमन्स पद्धतीने वितरित केला जातो. वर उल्लेखलेल्या विकिपीडिया व डीओएजे प्रकल्पात लिहिला जाणारा प्रत्येक लेख क्रिएटिव्ह कॉमन्स पद्धतीनेच वितरित होतो. त्याचबरोबर डिजिटल युगातील आघाडीची पोर्टल्स जसे यूटय़ूब (दृक्-श्राव्य साहित्य), फ्लिकर (छायाचित्र आणि इतर प्रतिमा), डिव्हायन्टआर्ट (कलात्मक दस्तऐवज), आज स्वत:कडे तयार होणारं साहित्य क्रिएटिव्ह कॉमन्स पद्धतीने वितरित करतात, यावरूनच या प्रकल्पाच्या व्यापकतेचा अंदाज येईल.

ज्ञानकोश निर्मिती, संशोधनपर लेखन असलेल्या नियतकालिकांचं प्रकाशन, जैवविज्ञान व औषध निर्माण यांसारख्या क्षेत्रांबरोबर इतरही काही क्षेत्रांत ओपन सोर्स तत्त्वांवर आधारित प्रयोग केले गेले. हार्वर्ड विद्यापीठाने सहयोगात्मक पद्धतीने कायदेशीर युक्तिवाद तयार करण्यासाठी सुरू केलेला ‘ओपन लॉ’ प्रकल्प, पेप्सी व कोकाकोलासारख्या शीतपेयांची ‘जेनरिक’ आवृत्ती तयार करण्यासाठी सुरू झालेला ‘ओपन कोला’ प्रकल्प किंवा सिटिझन जर्नलिजम या अभिनव संकल्पनेची पायाभरणी करणारा ‘ओहमायन्यूज’ प्रकल्प अशी या प्रयोगांची न संपणारी यादी बनवता येईल. असो. 

ओपन सोर्स – विस्तारणारी क्षितिजं

what-is-open-source-software-8

1103   26-Nov-2018, Mon

माध्यम, ज्ञानकोश निर्मिती, जैवविज्ञान, औषध निर्माण, सार्वजनिक क्षेत्र, शैक्षणिक व संशोधन यांसारख्या क्षेत्रांमध्ये ओपन सोर्स संकल्पनेवर वैविध्यपूर्ण प्रयोग राबवले गेले. ते मग यशस्वीही ठरले..

या लेखमालेच्या सुरुवातीपासून मागील आठवडय़ातल्या लेखापर्यंत आपण ओपन सोर्स व्यवस्थेला ऐतिहासिक, तात्त्विक, मानसशास्त्रीय, आर्थिक, सामाजिक व्यवस्थापकीय अशा अनेक अंगांनी अभ्यासण्याचा प्रयत्न केला.

ओपन सोर्स संकल्पनेचा उगम जरी सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये झाला असला तरीही ओपन सोर्सच्या मुळाशी असलेली तत्त्वं या व्यवस्थेला अधिक व्यापक बनवतात. म्हणूनच जसजशी ओपन सोर्स व्यवस्थेची लोकप्रियता वाढत गेली तसतसे सॉफ्टवेअर व्यतिरिक्त इतर क्षेत्रांतदेखील ओपन सोर्स तत्त्वांवर आधारित काही प्रयोग, विशेषत: एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात केले गेले.

ओपन सोर्सच्या या विस्तारणाऱ्या क्षितिजाचा आढावा घेण्यापूर्वी या व्यवस्थेला व्यापक परिमाण देणाऱ्या काही वैशिष्टय़ांचं विश्लेषण करणं उद्बोधक ठरेल. ज्या निर्मिती व्यवस्थेत खाली नमूद केलेली ओपन सोर्ससदृश वैशिष्टय़े आहेत तिथे ओपन सोर्स निर्मितीपद्धत प्रभावी ठरण्याची बरीच शक्यता असते.

१) जिथे कोणत्याही स्वरूपातल्या ज्ञानाची किंवा वस्तूची निर्मिती भौगोलिकदृष्टय़ा विखुरलेल्या व्यक्तींच्या ऐच्छिक सहभागामुळे होऊ  शकते. जिथे प्रत्येक सहयोगी व्यक्तीने दिलेला लहानातील लहान सहभाग उपयुक्त ठरू शकतो.

२) अशा प्रकारे निर्माण झालेल्या ज्ञानाचं एक सार्वजनिक ठेव म्हणून संवर्धन केलं जातं. त्यामुळेच ते मिळवण्यासाठी, तसेच तिचे उपयोजन करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा भेदभाव (वय, लिंग, शिक्षण, देश वगैरे) केला जात नाही किंवा कसल्याही प्रकारचं (कॉपीराइट, बौद्धिक संपदा वगैरे) बंधन लादलं जात नाही.

३) जिथे मर्यादित संसाधनं व जुजबी तांत्रिक ज्ञान असलेली व्यक्तीदेखील कमीत कमी खर्चात आपलं अर्थपूर्ण योगदान त्या वस्तूच्या निर्मितीत देऊ  शकते.

४) जिथे प्रकल्पामधले अंतर्गत व्यवहार, चर्चा, वाटाघाटी अत्यंत खुल्या व पारदर्शक पद्धतीने पार पडतात. जिथे प्रकल्पातल्या इतर सहयोगींनी वस्तुनिष्ठ पद्धतीने केलेल्या पुनरावलोकनाला व त्यांनी दिलेल्या प्रतिसादाला प्रचंड महत्त्व असते.

५) जिथे एखाद्या व्यक्तीच्या प्रकल्पातल्या सक्रिय सहभागासाठी बिगर-आर्थिक स्वरूपातल्या काही प्रबळ प्रेरणा आहेत.

आज माध्यम क्षेत्र, ज्ञानकोश निर्मिती, जैवविज्ञान, औषध निर्माण, सार्वजनिक क्षेत्र, शैक्षणिक व संशोधन क्षेत्र यांसारख्या क्षेत्रांमध्ये ओपन सोर्स संकल्पनेवर वैविध्यपूर्ण प्रयोग यशस्वीपणे राबवले गेले, ज्यातल्या काही ठळक प्रयोगांचा परामर्श आपण या आणि पुढील लेखात घेणार आहोत.

जैवविज्ञान व त्यातील संशोधनाची परिणिती म्हणून आकार घेणारे औषध निर्माण क्षेत्र जरी अनेक बाबतींत सॉफ्टवेअर क्षेत्राहून संपूर्णपणे भिन्न असले तरी एका बाबतीत मात्र त्यांच्यात बरेच साम्य आहे.

दोनही क्षेत्रांमध्ये निर्माण होणारे ज्ञान हे बौद्धिक संपदा हक्कांच्या अखत्यारीत येते. सॉफ्टवेअर क्षेत्रात कॉपीराइट नियमांच्या आधारे किंवा जैवविज्ञान क्षेत्रात पेटंट्सच्या आधारे बौद्धिक संपदा हक्कांच्या कृत्रिम भिंती उभारून, ज्ञानसाठय़ापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारी किल्ली ही फक्त ठरावीक विशेषाधिकार असणाऱ्या लोकांकडेच सुरक्षित ठेवता येते. या तात्त्विक साधम्र्यामुळे विसाव्या शतकाच्या अंतापासूनच ओपन सोर्स तत्त्वांशी जवळीक साधणारे अनेक प्रयोग या क्षेत्रात केले गेले आहेत.

यातला सर्वात वैशिष्टय़पूर्ण, यशस्वी आणि या क्षेत्रातला आजपर्यंतचा सर्वात मोठा सहयोगात्मक प्रकल्प म्हणून ज्याचं यथार्थपणे वर्णन करता येईल, तो प्रकल्प म्हणजे ‘ह्य़ूमन जीनोम’ प्रकल्प अर्थात मानवी जनुकीय आराखडय़ाला योग्य क्रम लावण्याचा प्रकल्प! अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थतर्फे नव्वदच्या दशकात हा प्रकल्प सुरू करण्यात आला.

सुरुवातीपासूनच या प्रकल्पात सहयोगावर प्रचंड भर देण्यात आला होता. त्यामुळेच प्रकल्प व्यवस्थापनाने विविध सहयोगींच्या सहकार्याने तयार होणारा जनुकीय डेटा व माहितीच फक्त खुली केली नाही तर त्यापुढे जाऊन या तयार झालेल्या माहितीचा दर्जा सुधारणे, चुका दुरुस्त करणे वगैरे कार्य सुलभतेने करता यावीत (ज्याला जीवशास्त्रीय भाषेत अ‍ॅनोटेशन असं म्हटलं जातं) म्हणून ‘डिस्ट्रिब्युटेड अ‍ॅनोटेशन सिस्टिम’ नामक एका ओपन सोर्स सॉफ्टवेअर प्रणालीची निर्मिती केली.

या प्रणालीमध्ये प्रकल्पात काम करणाऱ्या एका सहयोगी टीमकडून पूर्ण केलेल्या कामाचं दुसऱ्या टीमकडून पुनरावलोकन करणं (पीअर रिव्ह्य़ू) तसेच दोन गटांकडून एकाच प्रकारच्या जनुकीय आराखडय़ावर झालेल्या कामाचा तुलनात्मक अभ्यास करणं खूप सोपं झालं. १९९८ पासून या प्रकल्पाने खऱ्या अर्थाने वेग घेतला आणि मानवी जनुकांना क्रम लावून त्यांचा एकत्रित डेटाबेस तयार करण्याचं आव्हानात्मक, किचकट आणि वेळकाढू काम अवघ्या पाच वर्षांत पूर्ण केलं.

इंटरनॅशनल हॅपलोटाइप मॅपिंग प्रोजेक्ट (‘हॅपमॅप’ प्रकल्प) हा ह्य़ूमन जीनोम प्रकल्पाची पुढची पायरी होता. यात जनुकांमध्ये आनुवंशिकतेमुळे निर्माण होणाऱ्या तफावतीचा एक आकृतिबंध तयार करण्याचं (ज्याला हॅपलोटाइप असं म्हटलं जातं) आणि त्यांचा विविध आजारांसोबत असलेला परस्परसंबंध तपासण्याचं काम हाती घेतलं होतं.

अलायन्स फॉर सेल सिग्नलिंग (‘एएफसीएस’) प्रकल्पात अमेरिकेतल्या जैवविज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या आघाडीच्या नऊ  शैक्षणिक संस्था एकत्र आल्या होत्या. शरीरात घडणाऱ्या विविध रासायनिक प्रक्रियांचा मानवी पेशींवर होणारा परिणाम अभ्यासून त्यांचा रोगांशी असणारा संबंध तपासण्याचं अत्यंत किचकट काम या प्रकल्पात हाती घेतलं होतं.

प्रकल्पात निर्माण होणारा डेटाबेस (एखाद्या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाल्यानंतर) संशोधकांसाठी खुला ठेवण्याचं बंधन या प्रकल्पात होतं. विविध सरकारी, शैक्षणिक तसेच व्यावसायिक अशा हजार एक आस्थापनांचं सहकार्य या प्रकल्पाला मिळत आहे.

वरील तीनही प्रकल्पांत मुख्यत: जैववैज्ञानिक डेटाबेसच्या निर्मितीचं काम ओपन सोर्स पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला गेला होता. यापुढील टप्पा म्हणजे ओपन सोर्स पद्धतीने एखादं नवं औषध किंवा उपचारपद्धतीची निर्मिती करणं! हे महत्त्वाकांक्षी काम ‘द ड्रग्स फॉर निग्लेक्टेड डिसीजेस इनिशिएटिव्ह’ (डीएनडीआय) या प्रकल्पात हाती घेतलं गेलं.

गेली दोन दशकं आरोग्य व्यवस्थापनामध्ये जागतिक स्तरावर काही महत्त्वाची आव्हानं भेडसावत आहेत. एक म्हणजे तिसऱ्या जगाला ग्रासणाऱ्या काही प्रमुख रोगांना (जसे क्षयरोग, मलेरिया किंवा आफ्रिकेत आढळणारे काही दुर्मीळ आजार) अटकाव करण्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या औषध निर्मितीकडे झालेले संपूर्ण दुर्लक्ष! या रोगांना बळी पडणाऱ्या रुग्णांची क्रयशक्ती मर्यादित असल्याने बाजार नियमाप्रमाणे जगभरातल्या आघाडीच्या औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या अशा रोगांवरच्या लसी किंवा औषधाच्या निर्मितीसाठी संशोधन करण्यास फारशा अनुकूल नसतात.

त्यांना मुख्यत: जीवनशैलीशी निगडित आजारांवर (जसे हृदयरोग किंवा मधुमेह) संशोधन करणं नफा कमावण्याच्या दृष्टीने फायद्याचं असतं. त्याचबरोबर जरी अशा ‘उपेक्षित’ आजारांवर काही औषध उपलब्ध असलेच तरीही जिथे अशा औषधाची खरीच गरज आहे त्या देशातल्या रुग्णांना ते वाजवी किमतीत मिळण्याची सुतराम शक्यता नसते. कारण या कंपन्या पेटंटच्या नियमांमुळे मिळणाऱ्या विशेषाधिकाराचा फायदा घेत अशा औषधांच्या ‘जेनरिक’ पद्धतीच्या निर्मितीला अटकाव करतात.

या आव्हानाचा ओपन सोर्स पद्धत अनुसरून समर्थपणे मुकाबला करण्यासाठी ‘डीएनडीआय’ या ना-नफा तत्त्वावर चालणाऱ्या संस्थेचा जन्म २००३ साली झाला. विविध शैक्षणिक व संशोधन संस्था आणि शासकीय मदतीच्या आधारे तसेच जगभरातल्या तज्ज्ञांच्या सहयोगाने डीएनडीआयने आजवर मलेरिया, काही विशिष्ट जातींच्या कीटकांच्या चावण्यामुळे होणारा शागास रोग यांसारख्या आजारांवर सहा नव्या उपचारपद्धती तयार केल्या आहेत. जैवविज्ञानातील या ओपन सोर्स क्रांतीमध्ये भारताचादेखील सक्रिय सहभाग आहे. भारताने आपल्या सीएसआयआर या शासकीय संशोधन संस्थेच्या माध्यमातून ‘ओपन सोर्स ड्रग डिस्कव्हरी’ हा प्रकल्प चालू करून क्षयरोगाच्या समूळ उच्चाटनासाठी एक आश्वासक पाऊल टाकले आहे.

ओपन सोर्स जैवविज्ञान हा खरं तर स्वतंत्र लेखमालेचा विषय आहे. त्यामुळे एका लेखात या व्यापक विषयाला न्याय देणे निव्वळ अशक्य आहे. पण या निमित्ताने ओपन सोर्सची तत्त्वं ही केवळ सॉफ्टवेअरपुरती मर्यादित नाहीत याची जरी जाणीव झाली तरी या लेखाचा उद्देश सफल होईल.

लोकप्रिय ओपन सोर्स प्रणाली-२

what-is-open-source-software-7

855   25-Nov-2018, Sun

जिम्प, व्हीएलसी, लिब्रि-ऑफिस व थंडरबर्ड या चार प्रकल्पांतून ओपन सोर्स व्यवस्थेची काही वैशिष्टय़े समोर येतात. यांची निर्मिती ही मुख्यत्वेकरून संबंधित क्षेत्रात असलेली ओपन सोर्स प्रणालींची उणीव भरून काढण्यासाठी होती.

प्रतिमा संपादन व हाताळणी तसेच विविध प्रकारचा दृक्श्राव्य स्वरूपातला मल्टिमीडिया चालवण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या अनुक्रमे जिम्प व व्हीएलसी या दोन लोकप्रिय ओपन सोर्स प्रणालींचा आढावा आपण मागील लेखात घेतला.

एखादा सर्वसामान्य संगणक वापरकर्ता आपल्या दैनंदिन कार्यकालीन कामांसाठी (जसे ई-मेल पाठवणे, दस्तऐवज बनवणे, आकडेमोडीसाठी तक्ते बनवणे तसेच सादरीकरण करणे) विविध सॉफ्टवेअर प्रणालींचा सतत उपयोग करत असतो. प्रस्तुत लेखात आपण या कामांसाठी उपयुक्त ठरतील अशा दोन लोकप्रिय ओपन सोर्स प्रणालींबद्दल चर्चा करणार आहोत.

१) लिब्रि-ऑफिस (Libre- Office) : ही आजच्या घडीला दैनंदिन कार्यालीन कामकाज करण्यासाठीची सर्वात लोकप्रिय ओपन सोर्स प्रणाली आहे. तसेच  लिब्रि-ऑफिस प्रकल्प हा सर्वाधिक सक्रिय ओपन सोर्स प्रकल्पांपैकी एक आहे. लिब्रि-ऑफिस प्रकल्प २०१० साली सुरू झाला असला तरी त्याची मुळं ही सन मायक्रोसिस्टिमच्या स्टार ऑफिस प्रणालीमध्ये सापडतात.

नव्वदच्या दशकाखेरीस सन मायक्रोसिस्टिमने ‘ऑफिस’ सॉफ्टवेअर क्षेत्रात आपला जम बसविण्यासाठी व मायक्रोसॉफ्टच्या सुप्रसिद्ध एमएस ऑफिसला शह देण्यासाठी स्टार ऑफिस या एमएस ऑफिसच्या समकक्ष प्रणालीची निर्मिती करणाऱ्या कंपनीला विकत घेतले.

पहिली दोन वर्षे बराच प्रयत्न करून पाहिल्यानंतरही सन मायक्रोसिस्टिमला एमएस ऑफिसचा पाडाव करणं जराही जमलं नाही. त्यामुळे २००० सालच्या उत्तरार्धात सनने सुरुवातीला प्रोप्रायटरी असलेल्या स्टार ऑफिस प्रणालीला ‘ओपन-ऑफिस’ अशा नामकरणासह ओपन सोर्स म्हणून पुनर्वितरित केले.

एमएस ऑफिसला अगदी तुल्यबळ नसला तरीही एक सक्षम ओपन सोर्स पर्याय उपलब्ध झाल्यामुळे जगभरातल्या तंत्रज्ञांनी या प्रकल्पाला आपला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला व त्यातल्या अनेकांनी त्यात योगदान देण्यासही सुरुवात केली. अल्पावधीतच ओपन-ऑफिस प्रणाली ही विविध लिनक्स वितरणांबरोबर मायक्रोसॉफ्टच्या विन्डोज ऑपरेटिंग प्रणालीवरही चालू लागली. २००५ सालानंतर मात्र या प्रकल्पाला ओहोटी लागण्यास सुरुवात झाली.

सन मायक्रोसिस्टिमसाठी ही प्रणाली व्यावसायिकदृष्टय़ा फारशी महत्त्वाची राहिली नव्हती. हा प्रकल्प सांभाळणं दिवसेंदिवस सन मायक्रोसिस्टिमला जिकिरीचं व्हायला लागलं होतं व त्यांचा प्रकल्पातील रस हळूहळू संपायला लागला होता. २००७ सालानंतर तर सनने प्रकल्पात योगदान देणाऱ्या आपल्या तंत्रज्ञांना प्रकल्पातून हळूहळू दूर सारायला सुरुवात केली. त्याचबरोबर प्रकल्पात जगभरातून योगदान देणाऱ्या तंत्रज्ञांनी सुचवलेल्या सूचना, बदल वा सुधारणांवर कोणतीही प्रतिक्रिया देणं किंवा कसलीही कृती करणंसुद्धा बंद केलं.

जसजशी सन ओपन-ऑफिस प्रकल्पात योगदान देणाऱ्या समुदायांच्या अपेक्षांना अपुरी पडू लागली, तसतशी समुदायांमधली बेचैनी वाढायला लागली. पुढे तर सनने ओपन-ऑफिसचा सोर्स कोड आयबीएमला तिच्या प्रोप्रायटरी लोटस ऑफिस प्रणालीमध्ये वापरायला देण्यासाठी आयबीएमबरोबर चक्क करार केला.

एका ओपन सोर्स प्रणालीचा सोर्स कोड असा प्रोप्रायटरी कंपनीला विकणं म्हणजे प्रकल्पातल्या समुदायाचा विश्वासघात होता. ओपन-ऑफिस प्रकल्पात ‘क्रायसिस’ उत्पन्न व्हायला सुरुवात झाली होती. २०१० सालात जेव्हा ओरॅकलने सन मायक्रोसिस्टिमला विकत घेण्याची घोषणा केली तेव्हा  या क्रायसिसची परमावधी गाठली गेली.

ओरॅकल ही १००% प्रोप्रायटरी कंपनी असल्याने ओपन-ऑफिस प्रकल्पाच्या समुदायाला तिच्या ओपन सोर्स तत्त्वांशी असलेल्या बांधिलकीबद्दल कसलीही खात्री नव्हती. ओपन-ऑफिसच्या सोर्स कोडवर आधारित एक नवा ओपन सोर्स प्रकल्प (‘फोर्क’) सुरू करणं हाच ओपन-ऑफिस प्रकल्पातल्या क्रायसिसवर एक तार्किक तोडगा होता आणि झालेही तसेच.

मायकल मीक्स या ओपन-ऑफिस प्रकल्पात मोलाचं योगदान देणाऱ्या तंत्रज्ञाने या कामी पुढाकार घेतला व प्रकल्पातल्या काही समविचारी तंत्रज्ञांना एकत्र करून त्याने ‘द डॉक्युमेंट फाऊंडेशन’ या ना-नफा संस्थेची पायाभरणी केली व सप्टेंबर २०१०मध्ये ओपन-ऑफिसला एका नव्या रूपात सादर केलं.

द डॉक्युमेंट फाऊंडेशनने ओरॅकलला या नव्या प्रकल्पासाठी ‘ओपन-ऑफिस’ हेच नाव वापरू देण्यासाठी विनंती केली होती. अपेक्षितपणे ओरॅकलने ती धुडकावून लावली. मग ‘ओपन’ किंवा मुक्त या शब्दाला समानार्थी असा ‘लिब्रि’ हा फ्रेंच शब्द शोधण्यात आला व या प्रकल्पाचं ‘लिब्रि-ऑफिस’ असं नामकरण करण्यात आलं. एकीकडे ओपन-ऑफिस प्रकल्प संपूर्णपणे बारगळला असताना लिब्रि-ऑफिसने मात्र आजतागायत आपली घोडदौड जोमाने सुरू ठेवलीय.

११५ भाषांत उपलब्ध असलेली, ‘ओपन डॉक्युमेंट फॉरमॅट’च्या बरोबरीने एमएस ऑफिसमध्ये बनलेल्या दस्तऐवजांवरदेखील समर्थपणे काम करू शकणारी अशी ही प्रणाली आहे. म्हणूनच उबुंटू, रेड हॅटसारख्या लिनक्स वितरणांमध्ये लिब्रि-ऑफिसचा अंतर्भाव केलेला असतोच, पण त्याचबरोबर बऱ्याच शैक्षणिक, संशोधन व शासकीय संस्था आज लिब्रि-ऑफिसला पसंती देताना दिसतात. त्यामुळे जरी आजही एमएस ऑफिस हेच पहिल्या क्रमांकाचं ऑफिस सॉफ्टवेअर असलं तरीही लिब्रि-ऑफिसने त्याला एक समर्थ ओपन सोर्स पर्याय उपलब्ध करून दिलाय हे नक्की!

२) थंडरबर्ड (Thunderbird) – थंडरबर्ड ही आपल्या ई-मेल व त्या संदर्भातल्या इतर गोष्टींचं (जसं कामकाजाचं अथवा मीटिंग्सचं वेळापत्रक ठरवणं, सहकाऱ्यांशी चॅटिंग वगैरे) कार्यक्षम व्यवस्थापन करणारी ओपन सोर्स प्रणाली आहे. फायरफॉक्स या विश्वविख्यात ओपन सोर्स ब्राउझरच्या निर्मात्या मोझिला फाऊंडेशननेच थंडरबर्डची निर्मिती केलीय. थंडरबर्डच्या लोकप्रियतेमुळे जिम्प, व्हीएलसी व लिब्रि-ऑफिसप्रमाणे थंडरबर्डचाही समावेश उबुंटूच्या वितरणामध्ये केलेला आहे.

थंडरबर्डची निर्मिती ही काही प्रमाणात फायरफॉक्सशी समांतरपणे झाली आहे. फायरफॉक्सची निर्मिती ही जशी मायक्रोसॉफ्टच्या इंटरनेट एक्सप्लोररच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी झाली होती, त्याचप्रमाणे थंडरबर्डची निर्मिती ही मायक्रोसॉफ्ट आणि आयबीएम या प्रोप्रायटरी सम्राटांच्या ई-मेल व्यवस्थापन क्षेत्रातल्या लोकप्रिय प्रणालींना (अनुक्रमे आउटलूक व लोटस नोट्स) एक समर्थ ओपन सोर्स पर्याय उपलब्ध व्हावा या हेतूने झालीय.

डिसेंबर २००४ साली या प्रणालीची पहिली आवृत्ती मोझिलाने प्रसिद्ध केली. मोझिलाचा फायरफॉक्स ब्राउझर दोन वर्षांपूर्वीच वितरित झाला होता व त्यावर तंत्रज्ञांच्या आणि वापरकर्त्यांच्या अक्षरश: उडय़ा पडल्या होत्या. त्यामुळे थंडरबर्ड ई-मेल व्यवस्थापन प्रणालीबद्दल ओपन सोर्स आणि एकंदरीतच संगणक क्षेत्रात बरीच उत्सुकता होती. त्यामुळे थंडरबर्डची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाल्यानंतरच्या पहिल्या १० दिवसांतच तब्बल १० लाखांहून अधिक प्रती लक्षावधी तंत्रज्ञ व वापरकर्त्यांकडून डाउनलोड करण्यात आल्या.

निर्मितीप्रमाणेच थंडरबर्डमधल्या सुधारणा व विस्तारदेखील फायरफॉक्सशी समांतरपणे करण्यात आला. पुढील काही वर्षांत थंडरबर्डमध्ये नव्या कार्यक्षमतांची (जसे चॅट, कॅलेंडरसारख्या सुविधा, अनेक ऑपरेटिंग प्रणालींवर चालण्यास योग्य बनवणे वगैरे) भर टाकण्यात आली.

आज थंडरबर्ड ५९ भाषांमध्ये उपलब्ध आहे व जवळपास सर्व आघाडीच्या ऑपरेटिंग प्रणालींवर काम करण्यास सक्षम आहे. २०१५ सालानंतर मोझिलाने, फायरफॉक्सच्या वाढीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी, थंडरबर्ड प्रकल्पातील आपला सक्रिय सहभाग कमी केला असला तरीही ई-मेल व्यवस्थापन क्षेत्रातील आघाडीची ओपन सोर्स प्रणाली म्हणून तिचे स्थान अबाधित आहे.

जिम्प, व्हीएलसी, लिब्रि-ऑफिस व थंडरबर्ड या चार प्रकल्पांच्या विश्लेषणातून ओपन सोर्स व्यवस्थेची काही वैशिष्टय़े समोर येतात. या प्रणालींची निर्मिती ही मुख्यत्वेकरून त्या त्या संबंधित क्षेत्रात असलेली ओपन सोर्स प्रणालींची उणीव भरून काढण्यासाठी होती.

काही वेळेला प्रोप्रायटरी व्यवस्थेतल्या संयुक्त शत्रूंचा (मायक्रोसॉफ्ट, आयबीएम, ओरॅकल वगैरे) पाडाव करण्याचाही हेतू त्यामागे असतो. बऱ्याचदा प्रणालीच्या पहिल्या आवृत्तीची निर्मिती ही दोन-तीन तंत्रज्ञांनी एकत्र येऊन केलेली असते. त्यामुळे सुरुवातीच्या आवृत्त्यांमध्ये व्यावसायिक सफाईचा अभाव असला तरीही जर त्यात तांत्रिक श्रेष्ठत्व असेल व नेतृत्वाकडून प्रकल्पाची दिशा सुस्पष्ट दिसत असेल तर समुदायांकडून भरघोस स्वरूपाचं योगदान मिळू शकतं. आणि अखेरीस जर प्रकल्पाचं नियोजन करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेकडून जर समुदायाला योग्य प्रतिसाद मिळत नसेल किंवा ओपन सोर्स तत्त्वांची पायमल्ली होत असेल तर एक नवा प्रकल्प (फोर्क) सुरू होण्याची दाट शक्यता असते.

लोकप्रिय ओपन सोर्स प्रणाली

what-is-open-source-software-6-1

839   25-Nov-2018, Sun

दैनंदिन कामासाठी उपयुक्त ठरू शकतील अशा चार लोकप्रिय ओपन सोर्स प्रणाली आहेत. मुख्य म्हणजे या  प्रणाली वापरण्यासाठी  संगणकावर डेबियन किंवा उबुंटूसारखी ऑपरेटिंग प्रणाली असण्याची काहीच गरज नाही..

ऐंशीच्या दशकात सुरू झालेल्या आणि नव्वदच्या दशकात फोफावलेल्या ओपन सोर्स चळवळीने एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच सॉफ्टवेअर उद्योगाच्या मुख्य धारेत आपलं स्थान बळकट करण्याला प्रारंभ केला होता.

अनेक व्यावसायिक आस्थापनांनी लिनक्ससारख्या ओपन सोर्स प्रणालीचा वापर आपल्या कंपन्यांच्या मध्यवर्ती सॉफ्टवेअर प्रणाली चालवण्यासाठी करण्यास सुरुवात केली होती. मागील अनेक आठवडय़ांत आपण लिनक्ससारख्याच लोकप्रिय व ओपन सोर्स इतिहासात महत्त्वाचं स्थान असलेल्या अपाची वेब सव्‍‌र्हर, मायएसक्यूएल डेटाबेस, पीएचपी, डेबियन, उबुंटू वगैरेसारख्या विविध ओपन सोर्स प्रणालींचा विस्तृत परामर्श घेतला.

उबुंटू व मोझिला फायरफॉक्सचा अपवाद सोडला तर आपण चर्चिलेल्या बाकी जवळपास सर्व ओपन सोर्स प्रणाली या मुख्यत्वेकरून सव्‍‌र्हरवर चालणाऱ्या असल्याने त्या वैयक्तिक वापरासाठी सर्वसामान्य संगणक वापरकर्त्यांकडून तितक्याशा वापरल्या जात नाहीत. प्रस्तुत आणि पुढील लेखात आपण चार अत्यंत लोकप्रिय व दैनंदिन कामकाजासाठी उपयुक्त ठरू शकतील अशा ओपन सोर्स प्रणालींचा आढावा घेणार आहोत.

मुख्य म्हणजे या चारही प्रणाली वापरण्यासाठी आपल्या संगणकावर डेबियन किंवा उबुंटूसारखी लिनक्ससदृश ऑपरेटिंग प्रणाली असण्याची काहीच गरज नाही, कारण या प्रणाली मायक्रोसॉफ्ट विन्डोज व अ‍ॅपल मॅक ओएसवरही तेवढय़ाच व्यवस्थितपणे चालतात. आज या प्रणालींनी आपापल्या कार्यक्षेत्रात समकक्ष प्रोप्रायटरी प्रणालींना समर्थ पर्याय उपलब्ध करून दिलाय म्हणूनच त्यांची इथे नोंद घेणे अनुचित ठरणार नाही.

१) जिम्प (GIMP) – जीएनयू इमेज मॅनिप्युलेशन प्रोग्राम किंवा थोडक्यात जिम्प ही नावाप्रमाणेच डिजिटल स्वरूपातल्या प्रतिमांचं संपादन व हाताळणी करणारी प्रणाली आहे. नव्वदच्या दशकात कॅलिफोर्निया बर्कले विद्यापीठ हे ओपन सोर्स चळवळीचं एक महत्त्वाचं केंद्र होतं. याच विद्यापीठात शिकणाऱ्या स्पेन्सर किंबल व पीटर मॅटिस या दोघा विद्यार्थ्यांनी आपला पदव्युत्तर प्रकल्प म्हणून त्याची निर्मिती १९९५मध्ये केली.

त्या वेळेला अडोबी कंपनीचं फोटोशॉप हे सॉफ्टवेअर डिजिटल प्रतिमेवर प्रक्रिया करण्यासाठी वापरलं जायचं. प्रोप्रायटरी असल्या कारणाने तसेच तुल्यबळ प्रतिस्पर्धी नसल्याने त्याचं लायसन्सिंग शुल्क बरंच जास्त होतं. पण त्याहूनही मुख्य अडचण ही होती की, फोटोशॉप हे त्या काळात नावारूपाला येत असलेल्या लिनक्स प्रणालीवर चालण्यास असमर्थ होतं.

याच अडचणींवर मात करण्यासाठी किंबल आणि मॅटिसने आपल्या प्राध्यापकांचा विरोध असतानाही अशा अनवट प्रकल्पाची निवड केली. चार महिने रात्रंदिवस काम करून या दोघांनी फेब्रुवारी १९९६मध्ये या प्रणालीची पहिली आवृत्ती प्रसिद्ध केली व तिचा सोर्स कोड लिनक्सच्या इंटरनेटवरील समुदायांबरोबर खुला केला.

सुरुवातीला या प्रणालीचं नाव जनरल इमेज मॅनिप्युलेशन प्रोग्राम असं होतं. १९९७मध्ये जेव्हा फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशनचा संस्थापक आणि जीएनयू प्रकल्पाचा संचालक रिचर्ड स्टॉलमनने कॅलिफोर्निया बर्कले विद्यापीठाला भेट दिली, तेव्हा किंबल आणि मॅटिसने त्याची भेट घेतली. त्या काळात जीएनयू प्रकल्पाचा आणि एकंदरच स्टॉलमनचा ओपन सोर्स विश्वात चांगलाच दबदबा होता.

किंबल आणि मॅटिसने स्टॉलमनकडे त्यांची जिम्पला जीएनयू प्रकल्पाचा एक भाग बनविण्याची आपली इच्छा बोलून दाखवली व सोर्स कोडला जीपीएल लायसन्सच्या शर्तीवर वितरित करण्याची सुद्धा तयारी दर्शवली.

स्टॉलमनदेखील जिम्प प्रकल्पाबद्दल ऐकून होताच. अडोबी फोटोशॉपला हा एक समर्थ पर्याय बनू शकेल याची स्टॉलमनला खात्री वाटली. त्याचप्रमाणे यामुळे जीएनयू प्रकल्पाचीही व्याप्ती वाढली असती. स्टॉलमनने किंबल आणि मॅटिसचा प्रस्ताव उचलून धरला व प्रणालीच्या नावाचा पहिला शब्द ‘जनरल’वरून ‘जीएनयू’ असा बदलण्यात आला. अर्थात,  यामुळे सॉफ्टवेअर ज्या ‘जिम्प’ नावाने ओळखले जात होते, त्यात काहीच बदल होणार नव्हता.

जिम्पच्या सुरुवातीच्या अनेक आवृत्त्या वापर सुलभता व युजर इंटरफेसच्या दृष्टीने फोटोशॉपच्या तुलनेत अनेक योजने मागे होत्या. त्यामुळेच सुरुवातीची अनेक वर्षे जिम्प जरी अनेक हौशी डिझायनर्सनी वापरलं असलं, तरी व्यावसायिक स्तरावर फारसं वापरलं जात नव्हतं. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला मात्र ही उणीव दूर करण्याचा जिम्प समुदायाने चंग बांधला व वापर सुलभतेत सुधार करण्यासाठी युजर इंटरफेस विषयामधील तंत्रज्ञांचा एक स्वतंत्र गट स्थापन केला.

यानंतर मात्र जिम्पने मागे वळून पाहिले नाही. तिची तांत्रिक बाजू आधीच भक्कम होती. २०१० नंतर तिच्या दृश्यात्मकतेतदेखील पुष्कळ सुधारणा झाली. गेल्या पाच वर्षांपासून जिम्प ही वैयक्तिकप्रमाणेच व्यावसायिक स्तरावरदेखील मोठय़ा प्रमाणात वापरली जाऊ  लागली आहे.

२०१५ साली निर्मिलेल्या ‘लुकास द गेम’ या सुप्रसिद्ध व्हिडीओगेमचं संपूर्ण डिझाईन हे केवळ जिम्प वापरून करण्यात आलेलं आहे. आज जवळपास सर्व स्वरूपाच्या डिजिटल प्रतिमा (जेपेग, जिफ, पीएनजी वगैरे) जिम्पवर हाताळल्या जाऊ  शकतात. उबुंटू तसेच रेड हॅटनेही आपल्या ऑपरेटिंग प्रणालीच्या डेस्कटॉप पॅकेज वितरणामध्ये जिम्पचा समावेश केलेला आहे, यावरूनच त्याची कार्यक्षमता व लोकप्रियतेचा अंदाज यावा.

२) व्हीएलसी (श्छउ) – व्हीएलसी मीडिया प्लेयर किंवा व्हीएलसी हा ऑडिओ तसेच व्हिडीओस्वरूपाची दृकश्राव्य माहिती (आधीच साठवलेली किंवा थेट प्रक्षेपित केलेली) वापरकर्त्यांला सादर करू शकणारी प्रणाली आहे. जिम्पप्रमाणेच व्हीएलसीची निर्मिती नव्वदच्या दशकाच्या मध्यावर इकॉल सेन्ट्राल या पॅरिसमधील विद्यपीठात संगणकशास्त्राचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या पदवी प्रकल्पासाठी केली. व्हीएलसी हे ‘व्हिडीओलॅन क्लायंट’चं लघुरूप आहे.

व्हीएलसीच्या निर्मात्यांचा मूळ उद्देश हा अशी एक प्रणाली निर्माण करण्याचा होता की, ज्यायोगे विद्यापीठाच्या सव्‍‌र्हरवर उपलब्ध असलेला सर्व प्रकारचा मल्टिमीडिया पाहण्याची सोय त्या सव्‍‌र्हरला लोकल एरिया नेटवर्कद्वारे (लॅन) जोडलेल्या संगणकांवर विनासायास व्हावी. त्यामुळे व्हीएलसी जशी वापरकर्त्यांच्या संगणकावर चालायची तशीच व्हीएलएस (व्हिडीओलॅन सव्‍‌र्हर) नावाची प्रणाली सव्‍‌र्हरवर चालवणं आवश्यक होतं.

ही मर्यादा दूर करण्यासाठी १९९८ साली व्हीएलसीचं पुनर्लेखन करण्यात आलं, ज्यामुळे आता व्हीएलसीला सव्‍‌र्हरवर चालवण्याची गरज नव्हती. असं असलं तरीही व्हीएलसी अजूनही इकॉल सेन्ट्रालपुरतीच सीमित होती. २००१ साली मात्र इकॉल सेन्ट्रालने व्हीएलसीच्या सोर्स कोडला जीपीएल लायसन्स शर्तीवर खुलं केलं आणि व्हीएलसी प्रकल्प खऱ्या अर्थाने ओपन सोर्स झाला.

२००३ साली जॉन-बॅप्टिस्ट केम्पफ् या कुशाग्र बुद्धीच्या विद्यार्थ्यांने इकॉल सेन्ट्राल विद्यापीठात प्रवेश घेतला. वर्षभराच्या अवधीतच तो व्हीएलसी प्रकल्पातील एक प्रमुख तंत्रज्ञ बनला. सुरुवातीपासूनच केम्पफ् ला व्हीएलसीचं इकॉल सेन्ट्रालवरचं अवलंबित्व रुचत नव्हतं. त्याच्या मनात व्हीएलसी आणि मल्टिमीडिया तंत्रज्ञानावर आधारित इतर ओपन सोर्स सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यासाठी एका स्वतंत्र संस्थेची निर्मिती करण्याचे विचार घोळत होते.

२००७ साली व्हीएलसी प्रकल्पप्रमुख बनल्यानंतर त्याने आपल्या स्वप्नाचा त्वरित पाठपुरावा करण्यास सुरुवात केली व २००९ साली व्हिडीओलॅन नावाच्या एका ना नफा तत्त्वावर चालणाऱ्या संस्थेची निर्मिती केली. एवढय़ावरच तो शांत बसला नाही तर व्हीएलसी प्रकल्पाला संपूर्णत: व्हिडीओलॅनच्या छत्राखाली आणण्याची त्याची कल्पना तो इकॉल सेन्ट्राल विद्यापीठातल्या संचालक मंडळाच्या गळी उतरवण्यात यशस्वी झाला.

त्यानंतर मात्र व्हीएलसी प्रकल्पाने व व्हिडीओलॅन संस्थेने गगनभरारी घेतली. आज व्हीएलसी ही ४८ भाषांमध्ये उपलब्ध असलेली आणि सर्वात जास्त प्रकारचे ऑडिओ आणि व्हिडीओ फॉरमॅट्स चालवू शकणारी एकमेव प्रणाली आहे. एवढंच नव्हे तर व्हीएलसी ही केवळ डेस्कटॉप पीसीवर मर्यादित नाहीए तर आज सर्व महत्त्वाच्या मोबाइल ऑपरेटिंग प्रणालींवरसुद्धा (जसं अँड्रॉइड, आय-ओएस, विन्डोज फोन वगैरे) ती वापरली जाऊ  शकते.

व्हिडीओलॅन आज व्हीएलसीच्या बरोबरीने मल्टिमीडिया क्षेत्रातल्या इतर अनेक ओपन सोर्स प्रकल्पांवर काम करते. मायक्रोसॉफ्टच्या विनअ‍ॅम्प मीडिया प्लेयरला एक समर्थ, किंबहुना अनेक बाबतीत त्यांच्याहूनही वरचढ, पर्याय व्हीएलसीने उपलब्ध करून दिलाय हे नक्की! म्हणूनच जिम्पप्रमाणेच उबुंटूने आपल्या ऑपरेटिंग प्रणालीच्या डेस्कटॉप पॅकेज वितरणामध्ये व्हीएलसीचाही समावेश केलेला आहे.

डेटा संरक्षण आणि संबंधित मुद्दे

what-is-data-protection

971   24-Nov-2018, Sat

सर्वोच्च न्यायालयाने खासगीपणा हा व्यक्तीचा मूलभूत हक्क असल्याचा निर्वाळा दिला आहे. याबाबत आधार आणि त्यातील वैयक्तिक माहिती व तिची सुरक्षितता यावर बरीच चर्चा झाली आणि सुरू आहे. याबाबत व्यक्तीचे अधिकार, त्यांचे रक्षण याबाबत मानवी हक्कांच्या संदर्भातील मुद्दे समजून घेणे आवश्यक आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर दोन, तीन आणि चारच्या तयारीसाठी याबाबतची समज असणे उपयोगी ठरतेच. पण मुलाखतीमध्येही याचा उपयोग होऊ शकतो.

न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्णा यांच्या अध्यक्षतेखालील भारतासाठी डेटा संरक्षण आराखडय़ावरील तज्ज्ञ समितीने आपला अहवाल केंद्र शासनाकडे सादर केला आहे. डेटा संरक्षणाशी संबंधित समस्यांच्या निराकरणासाठी उपाय सुचविणे आणि डेटा संरक्षण विधेयकाचा मसुदा तयार करणे ही या समितीची कार्यकक्षा होती. या समितीने नोंदविलेली निरीक्षणे आणि सुचविलेल्या उपाययोजना यांबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

विश्वासाधारित संबंध

नियामक प्राधिकरणाने नागरिकांची वैयक्तिक माहिती आणि ज्यांच्याकडे ती उपलब्ध असते अशा डेटाच्या प्रदात्यासारखे सेवा प्रदाते यांच्या हितसंबंधांमध्ये संतुलन साधणे आवश्यक आहे. व्यक्तीच्या हितसंबंधांविषयी वैयक्तिक हितसंबंधांचे संतुलन राखणे आवश्यक आहे.

ग्राहक आणि सेवा प्रदाता यांमधील संबंध हे विश्वासाधारित संबंध असतात. ते परस्पर विश्वासावर अवलंबून असतात. कोणतीही व्यक्ती ही कसल्याही प्रकारची सेवा प्राप्त करण्यासाठी सेवा प्रदात्यावर अवलंबून असते. म्हणूनच, डेटा प्रसंस्करण करणाऱ्या डेटा प्रदात्याने ग्राहकांची वैयक्तिक माहिती (डेटा) प्रामाणिकपणे हाताळणे आणि तिचा केवळ अधिकृत हेतूंसाठी वापर करणे ही त्याची नतिक जबाबदारी आहे.

विश्वस्तांचे दायित्व 

सेवा प्रदात्यांद्वारे त्यांना मिळालेल्या महितीचा गरवापर रोखण्यासाठी, कायद्याने त्यांचे मूलभूत दायित्व स्थापित करणे आवश्यक आहे. यामध्ये पुढील बाबी समाविष्ट असाव्यात.

  • माहितीचा वापर प्रामाणिकपणे आणि वाजवीपणे करण्याची जबाबदारी.
  • माहिती जमविताना संबंधित व्यक्तीस त्याबाबत वेळोवेळी सूचना देणे बंधनकारक करणे.

वैयक्तिक माहितीची व्याख्या

वैयक्तिक माहिती या संज्ञेमध्ये कोणत्या बाबी येतातत ते परिभाषित करणे आवश्यक असल्याचे मत समितीने नोंदविले आहे. ज्या माहितीवरून एखादी व्यक्ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वैयक्तिकरीत्या ओळखता येईल अशा सर्व प्रकारच्या माहितीचा समावेश त्यात होतो.

संवेदनशील वैयक्तिक डेटा संरक्षण सर्वसाधारण वैयक्तिक डेटा संरक्षणापेक्षा वेगळे विचारात घेतले जाणे आवश्यक असल्याचे समितीने नमूद केले आहे. संवेदनशील डेटा हा गोपनीय बाबींशी संबंधित असतो (उदा. जात, धर्म आणि व्यक्तीची लैंगिक अभिमुखता) आणि त्याबाबत गोपनीयता बाळगण्याची आवश्यकता जास्त प्रमाणात असते. संवेदनशील माहितीच्या गरवापरातून एखाद्या व्यक्तीला होणारा अपाय व नुकसान हे गंभीर स्वरूपाचे असू शकते याचा विचार करून अशा वर्गीकरणाची आवश्यकता मांडण्यात आली आहे.

मंजुरी-आधारित प्रक्रिया

वैयक्तिक डेटावर प्रक्रिया करण्यासाठी संबंधितांची संमती आवश्यक आहे. संवेदनशील वैयक्तिक डेटाच्या परवानगीबाबत लहान मुले किंवा तत्सम संवेदनशील गटांसाठी त्यांच्याबाबतची अतिरिक्त संवेदनशीलता आणि जोखीमप्रवणता पाहता त्यांच्या हितसंबंधांचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने होण्यासाठी सक्षम कायदा करण्याची आवश्यकता समितीकडून मांडण्यात आली आहे.

संमतीरहित प्रक्रिया 

  • प्रत्येक वेळी माहितीचा वापर करण्यासाठी व्यक्तीची संमती घेणे शक्य होत नाही. त्यामुळे पुढील चार बाबींमध्ये अशा संमतीची अट नसावी अशी शिफारस समिती करते.
  • जेथे कल्याणकारी काय्रे पार पाडण्यासाठी शासनाची माहिती प्रक्रिया संबंधित आहे.
  • कायद्याचे पालन करणे किंवा भारतातील न्यायालयीन आदेशांची पूर्तता करणे.
  • जेव्हा तत्काळ कार्यवाहीची आवश्यकता असेल (उदा. जीव वाचवणे)
  • मर्यादित परिस्थितीत रोजगाराच्या करारांमध्ये

व्यक्तींचे हक्क

व्यक्तीचा वैयक्तिकरीत्या त्यांच्या डेटावर नियंत्रण ठेवण्याचा हक्क हा स्वायत्तता, आत्मनिर्णय, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व या मूल्यांवर आधारित आहे. या आधारे समितीने व्यक्तीचे अधिकार पुढीलप्रमाणे वर्गीकृत केलेले आहेत.

  • डेटाचा प्रवेश, पुष्टीकरण आणि सुधारणा करण्याचा अधिकार,
  • माहिती प्रसंस्करण, थेट निर्णयप्रक्रिया, थेट विपणन आणि माहिती प्रसारण (Data portability) याबाबत आक्षेप घेण्याचा व विरोध करण्याचा अधिकार
  • माहिती हटविण्याचा अधिकार (Right to be forgotten)

वरील चच्रेच्या अनुषंगाने समितीने वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयकाचा मसुदा तयार केला आहे. विधेयकास मान्यता मिळून त्याचे कायद्यात रूपांतर झाल्यावर त्या तरतुदी समजून घेणे आवश्यक ठरेल. मात्र सध्या एकूणच वैयक्तिक माहिती आणि तिच्यावरील संबंधितांचा अधिकार हा विषय समजून घेण्यासाठी समितीच्या वरील चच्रेचा नक्कीच उपयोग होईल.

ओपन सोर्स बिजनेस मॉडेल्स

business-models-for-open-source-software1

699   14-Nov-2018, Wed

वापरकर्त्यांभोवती केंद्रित झालेली व निर्मात्याऐवजी वापरकर्त्यांचं हित जपणारी व्यवस्था असल्याने ओपन सोर्स सॉफ्टवेअरभोवती बिजनेस मॉडेल्स तयार करणं आव्हानात्मक काम आहे. मूळ सॉफ्टवेअरच एक ‘कमॉडिटी’ झाल्याने ओपन सोर्स कंपन्यांना निरंतर पद्धतीने आर्थिक परतावा मिळवण्याचे नवे मार्ग शोधणं भाग आहे.

नव्वदच्या दशकाच्या मध्यावर लिनक्सला शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्राबरोबरच व्यावसायिक परिघातदेखील गांभीर्याने घेण्यास सुरुवात झाली होती. लिनक्सची तांत्रिक कामगिरी व कार्यक्षमता अत्यंत उच्च दर्जाची असल्याकारणाने अनेक व्यावसायिक आस्थापना लिनक्सला त्यांच्या मध्यवर्ती प्रणालींसाठी वापरण्यास उत्सुक होत्या.

सोर्स कोड जरी हाताशी असला तरी शेवटी लिनक्स ही हॅकर संप्रदायाने हॅकर संप्रदायासाठी बनवलेली प्रणाली असल्याने वापरकर्त्यांची तांत्रिक कुवत गृहीत धरली गेली होती. त्यामुळेच वापर सुलभतेच्या दृष्टीने लिनक्स संगणकावर चढवून वापरण्यासाठी काहीशी किचकट होती.

अशा वेळेला व्यावसायिक स्तरावर लिनक्सच्या वापरासाठी कंपन्यांना अशा भागीदाराची गरज होती जो लिनक्सच्या विविध भागांच्या (जसं कर्नल, शेल, एडिटर वगैरे) नवीनतम आवृत्त्या एकत्रित करेल, त्यांची विशिष्ट हार्डवेअर संचांवरची योग्यता तपासेल व अखेरीस कंपन्यांना त्यांच्या सव्‍‌र्हरवर विनासायास चढू शकेल असं लिनक्स सॉफ्टवेअर एकात्मिक (इंटिग्रेटेड) स्वरूपात उपलब्ध करून देईल. या संधीचा सर्वात प्रथम फायदा उठवला इगड्रासिल कॉम्पुटिंग या कंपनीने! तिने प्रथमच लिनक्सला केवळ ९९ अमेरिकी डॉलरच्या मोबदल्यात वापरकर्त्यांला अत्यंत सुलभपणे आपल्या संगणकावर चढवता येईल अशा स्वरूपात, त्याकाळात प्रसिद्ध पावत असलेल्या कॉम्पॅक्ट डिस्कवर (उऊ फडट) उपलब्ध करून दिलं.

पुढील काळात उदयास आलेल्या ओपन सोर्स सॉफ्टवेअरभोवती सेवा प्रदान करण्याच्या विविध बिझनेस मॉडेल्सची ही नांदी होती. ९०च्या दशकाच्या अखेरीस उदयास आलेल्या रेड हॅट, व्हीए लिनक्स, बिटकीपर, माय एसक्यूएलसारख्या कंपन्यांनी तर एकविसाव्या शतकातल्या कॅनोनिकल, झिम्ब्रा, पेन्टाहोसारख्या कंपन्यांनी ओपन सोर्स चळवळीला व्यावसायिक स्तरावर यशस्वी करून दाखवलं.

प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर कंपन्या वापरकर्त्यांला आपलं सॉफ्टवेअर वापरण्याचं लायसन्स विकून मुख्यत्वेकरून महसूल कमावत असतात. सोर्स कोड खुला नसल्याने वापरकर्ता ते सॉफ्टवेअर केवळ वापरू शकतो. त्यात सुधारणा किंवा त्याचे पुनर्वितरण करू शकत नाही. आपण आपल्या वैयक्तिक संगणकावर जी विन्डोज ऑपरेटिंग प्रणाली अथवा एमएस ऑफिससारखी सॉफ्टवेअर वापरतो, ती वापरण्याची लायसन्स (जर ती पायरेटेड नसतील तर) आपण काही हजार रुपये खर्च करून घेतलेली असतात. या लायसन्सची किंमत प्रति यूजर पद्धतीने आकारली जाते व बऱ्याचदा तर या लायसन्सची कालमर्यादासुद्धा ठरलेली (जसे एक, तीन किंवा पाच वर्षे) असते. अशा ठरवलेल्या कालावधीनंतर जर वापरकर्त्यांला ते सॉफ्टवेअर वापरायचं असेल तर त्याला पुन्हा त्याचा लायसन्स विकत घेणं भाग असतं.

मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, आयबीएमसारख्या प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर विकणाऱ्या दिग्गज कंपन्यांचे आपल्या सॉफ्टवेअरचं लायसन्स अशा आवर्ती पद्धतीने विकण्याचं बिजनेस मॉडेल अत्यंत यशस्वी ठरलं झालं आहे.

ओपन सोर्स व्यवस्थेत सॉफ्टवेअर अशा पारंपरिक पद्धतीने विकण्याच्या मानसिकतेला सोडचिठ्ठी द्यावी लागते. ओपन सोर्स व्यवस्थेत सोर्स कोड खुला असल्याने, ओपन सोर्स सॉफ्टवेअर पुरवठादार कंपनी सॉफ्टवेअरच्या प्रती विकून महसूल कमावू शकत नाही, तसेच प्रोप्रायटरी कंपन्यांसारखे ‘व्हेंडर लॉक-इन’ पद्धतीनेसुद्धा वापरकर्त्यांला आपल्याकडे अनंतकाळ टिकवून ठेवणं शक्य नसतं. सोर्स कोड हाताशी असल्याने एकाच कंपनीवर असलेलं अवलंबित्व बऱ्याच अंशी कमी होतं.

अशी वापरकर्त्यांभोवती केंद्रित झालेली व निर्मात्याऐवजी वापरकर्त्यांचं हित जपणारी व्यवस्था असल्याने ओपन सोर्स सॉफ्टवेअरभोवती बिजनेस मॉडेल्स तयार करणं आव्हानात्मक काम आहे. मूळ सॉफ्टवेअरच एक ‘कमॉडिटी’ झाल्याने ओपन सोर्स कंपन्यांना निरंतर पद्धतीने आर्थिक परतावा मिळवण्याचे नवे मार्ग शोधणं भाग आहे.

रेड हॅटच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या रॉबर्ट यंगने, नेटस्केप आणि मोझिला ब्राउझरच्या निर्मितीत मोलाचा वाटा असलेल्या फ्रँक हेकरसमवेत ओपन सोर्स बिजनेस मॉडेल्सबद्दल व्यापक स्वरूपाचं विचारमंथन केलं आहे. आज अस्तित्वात असलेल्या जवळपास सर्व ओपन सोर्स सॉफ्टवेअर पुरवठादार कंपन्यांच्या बिजनेस मॉडेल्समध्ये या दोघांनी विशद केलेल्या पद्धतींचंच मिश्रण पाहावयास मिळतं.

सर्वात पहिलं आणि सर्वाधिक वापरलं जाणारं बिजनेस मॉडेल म्हणजे ‘सपोर्ट सेलर’, थोडक्यात ओपन सोर्स सॉफ्टवेअरसंदर्भातील विविध सेवा पुरवणं. सॉफ्टवेअर हा एक अत्यंत गुंतागुंतीचा दस्तऐवज असल्याने केवळ सोर्सकोड हाताशी आहे म्हणून एखादं सॉफ्टवेअर लगेच वापरण्यायोग्य बनत नाही. त्यासाठी अनेक पूर्वप्रक्रिया त्या सॉफ्टवेअरसंदर्भातल्या सेवा पुरवणाऱ्या कंपनीला कराव्या लागतात, तसंच ग्राहक ते सॉफ्टवेअर वापरात असताना अनेक प्रकारच्या सेवा निरंतर पद्धतीने पुरवाव्या लागतात.

उदाहरणार्थ सॉफ्टवेअरच्या विविध भागांच्या उपलब्ध असलेल्या आवृत्त्या एकत्र करून, यथायोग्य तपासून, त्यातील चुका किंवा उणिवा शक्य तितक्या दूर करून सॉफ्टवेअरची एक स्थिर आवृत्ती प्रसिद्ध करणं, ज्या ठिकाणी हे सॉफ्टवेअर वापरलं जाणार आहे तिथल्या तांत्रिक संरचनेचं विश्लेषण करून सॉफ्टवेअरला त्यानुसार सुसंगत बनवणं, ठरावीक कालावधीनंतर अधिक कार्यक्षम अशा सॉफ्टवेअरच्या आवृत्त्या प्रसिद्ध करत राहणं, ग्राहकाला सॉफ्टवेअरसंदर्भातला संपूर्ण तांत्रिक सपोर्ट देणं मग त्यात त्याच्या शंकांचं निरसन, सॉफ्टवेअर हे सव्‍‌र्हर वा संगणकावर चढवण्यासाठीची संपूर्ण मदत व मार्गदर्शन, सुधारित सॉफ्टवेअरची आवृत्ती ग्राहकाला देऊन त्याच्याकडचं सॉफ्टवेअर अद्ययावत करणं अशा अनेक गोष्टींचा समावेश अशी सपोर्ट सेलर कंपनी आपल्या बिजनेस मॉडेलमध्ये करत असते.

रेड हॅटसारख्या कंपनीने (जरी काही दिवसांपूर्वीच आयबीएमने रेड हॅट विकत घेण्याचा आपला मनसुबा जाहीर केला असला) तर हेच बिजनेस मॉडेल अंगीकारून पुढील काळात आपल्या सेवेचा एक ‘ब्रॅण्ड’ तयार केला.

‘सेल इट -फ्री इट’ (सुरुवातीला विका आणि नंतर मोफत उपलब्ध करून द्या) पद्धतीचं बिजनेस मॉडेल काही ओपन सोर्स कंपन्या वापरतात. नेटस्केप, मायएसक्यूएल ही यातील काही ठळक उदाहरणं! यात कंपनी आपलं सॉफ्टवेअर पहिली काही र्वष प्रोप्रायटरी पद्धतीने विकते आणि नंतर त्याचा सोर्स कोड खुला करून सॉफ्टवेअरला ओपन सोर्स बनवते.

वेळ जर अचूकपणे साधता आली तर या बिजनेस मॉडेलमुळे कंपनीला दुहेरी फायदा होऊ  शकतो. एक तर सुरुवातीला प्रोप्रायटरी पद्धतीने सॉफ्टवेअर विकल्याने एक हक्काचा ग्राहकवर्ग तयार झालेला असतो जो पुढे ओपन सोर्स झाल्यावरही कायम राहण्याची पुष्कळ शक्यता असते. त्याचबरोबर ओपन सोर्स केल्यानंतर जगभरातल्या तांत्रिक समुदायाचा भरघोस सहभाग मिळू शकतो ज्यामुळे सॉफ्टवेअरच्या वाढीला चांगलंच पाठबळ मिळते.

यंग आणि हेकरच्या मताप्रमाणे तिसरं ओपन सोर्स बिजनेस मॉडेल हे ‘सव्‍‌र्हिस एनेब्लर’ आहे. यात कंपनीने आपल्या सॉफ्टवेअरला ओपन सोर्स करण्यामागचा मूळ उद्देश हा तिच्या एखाद्य चांगल्यापैकी महसूल मिळवून देणाऱ्या सेवा अथवा वस्तूची मागणी वाढवण्याचा असतो. एचपीने (ह्य़ुलेट-पॅकार्ड) २००० सालात जेव्हा आपलं ई-स्पीक हे ई-कॉमर्ससंदर्भातल्या सेवा पुरवणारं सॉफ्टवेअर ओपन सोर्स केलं तेव्हा एचपीला हे सॉफ्टवेअर ज्या एचपी सव्‍‌र्हरवर सर्वाधिक कार्यक्षम पद्धतीने चाललं असतं त्याची मागणी तर वाढवायची होतीच पण त्याचबरोबर उभरत्या डिजिटल क्षेत्रात आपला जम अधिक मजबूतपणे बसवायचा होता, ज्याला हे सॉफ्टवेअर ओपन सोर्स केल्याने हातभारच लागला असता.

अखेरचं बिजनेस मॉडेल हे ओपन सोर्स सॉफ्टवेअरबद्दलच्या अत्यावश्यक नसलेल्या पण उपयुक्त वस्तू विकण्याचं आहे, ज्याला यंग आणि हेकरने ‘अ‍ॅक्सेसरायजिंग’ असं संबोधलं आहे. ओरायली पब्लिकेशन हे याचं एक उत्तम उदाहरण आहे. विविध लोकप्रिय ओपन सोर्स सॉफ्टवेअर वापरण्यासाठी उपयुक्त ठरतील अशी तांत्रिक प्रशिक्षण देणारी अनेक पुस्तकं आणि मॅन्युअल्सचं प्रकाशन ते करतात. एखाद्या ओपन सोर्स सॉफ्टवेअरचा लोकाश्रय ज्या प्रमाणात वाढतो तशी ओरायलीची त्या सॉफ्टवेअरसंदर्भातील पुस्तकंसुद्धा चांगल्या प्रमाणात विकली जातात.

ओपन सोर्स लायसन्स आणि व्यवस्थापन 

open-source-security-and-license-management

613   13-Nov-2018, Tue

ओपन सोर्सच्या पटावरील विविध लायसन्सिंग पद्धतींच्या व्याख्यांमध्ये तसेच प्रत्येक लायसन्सिंग पद्धतीत काहीसा फरक असला तरीही मुख्यत: या लायसन्सिंग पद्धतींची दोन पंथांमध्ये विभागणी करता येईल. एक म्हणजे बीएसडी लायसन्सिंग पद्धतीची शैली अनुसरणारा पंथ आणि दुसरा जीपीएल लायसन्सिंग पद्धतीची शैली अनुसरणारा..

कोणत्याही (ओपन सोर्स अथवा प्रोप्रायटरी) सॉफ्टवेअरच्या जीवनचक्रात त्याची लायसन्सिंग पद्धत अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. सॉफ्टवेअरचा वैयक्तिक तसेच व्यावसायिक स्तरावरील वापर, त्याचे वितरण, विक्री तसेच त्यात बदल किंवा सुधारणा करण्यासाठीचे सर्व नियम सॉफ्टवेअरच्या लायसन्समध्ये समाविष्ट असतात. किंबहुना सॉफ्टवेअर लायसन्स हा एक कायदेशीर दस्तावेजच असतो ज्यात सॉफ्टवेअर वापरण्यासंदर्भातल्या वरील सर्व अटी व शर्ती तपशीलवारपणे नमूद केलेल्या असतात.

ओपन सोर्स प्रकल्पात सॉफ्टवेअरच्या लायसन्सचे महत्त्व एवढय़ापुरतेच सीमित नसते. कोणत्याही प्रकारच्या संस्थात्मक संरचनेच्या (निदान औपचारिक स्तरावरील) अभावामुळे ओपन सोर्स प्रकल्प आणि त्यात काम करणाऱ्या तंत्रज्ञांच्या समुदायासाठी सॉफ्टवेअरचे लायसन्स प्रकल्पातल्या देवाणघेवाणीची तसेच गुंतागुंतीच्या व्यवस्थापनाची एक सामाजिक स्तरावरील व्यवस्था निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य बजावते. प्रकल्पात सहयोग देणाऱ्या तंत्रज्ञांच्या वर्तणुकीचे नियम विशद करतानाच या तंत्रज्ञांना प्रकल्पात एकत्र धरून ठेवण्याचेही काम ओपन सोर्स लायसन्स करत असते.

ओपन सोर्स विश्वात आज विविध संस्था अथवा व्यावसायिक कंपन्यांकडून निर्मिलेले कमीतकमी दोन डझन लायसन्स अधिकृतपणे उपलब्ध आहेत, जे विविध ओपन सोर्स प्रकल्पांत वापरले जातात. सर्वसाधारणपणे कोणत्याही सॉफ्टवेअरसाठी लागू होईल अशा लायसन्सपासून (उदा. जनरल पब्लिक लायसन्स किंवा जीपीएल) काही संस्था अथवा कंपन्यांनी आपल्या विशिष्ट उद्देशांसाठी निर्मिलेल्या लायसन्सपर्यंत (उदा. नेटस्केपचा नेटस्केप पब्लिक लायसन्स किंवा नासा आपल्या सॉफ्टवेअरसाठी वापरात असलेला ओपन सोर्स लायसन्स) विविध प्रकारचे लायसन्स अस्तित्वात आहेत.

कोणत्याही ओपन सोर्स लायसन्समध्ये सॉफ्टवेअरसंदर्भातल्या मुख्यत्वेकरून तीन तत्त्वांबद्दलची भूमिका स्पष्ट केलेली असते, ज्यांचे विश्लेषण खालील परिच्छेदांत केले आहे.

१) स्वातंत्र्य (फ्रीडम) – सॉफ्टवेअर स्वत:च्या गरजेनुसार वापरण्याचे, त्यात आवश्यकतेनुसार बदल वा सुधारणा करण्याचे आणि सुधारित आवृत्तीचे पुनर्वितरण करण्याचे स्वातंत्र्य इथे अभिप्रेत आहे. विविध ओपन सोर्स लायसन्सिंग पद्धतीत हे स्वातंत्र्य कमी अधिक प्रमाणात वापरकर्त्यांला बहाल केलेले असते.

२) समानता (नॉन-डिस्क्रिमिनेशन) – कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्थेविरुद्ध भेदभावाचे वर्तन न करणे. उदाहरणार्थ एखादे ओपन सोर्स सॉफ्टवेअर वापरण्याचा जेवढा हक्क एखाद्या अमेरिकन व्यक्तीला आहे तेवढाच तो आफ्रिकन माणसाला किंवा संस्थेलादेखील आहे. अशा प्रकारच्या समानतेची तजवीज ओपन सोर्स लायसन्सच्या अटींमध्ये कटाक्षाने केलेली असते.

३) व्यवहारवाद (प्रॅगमॅटिज्म) – वापरकर्त्यांला ओपन सोर्स सॉफ्टवेअरसोबत प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर वापरण्याची गरज जाणवू शकते. ओपन सोर्स सॉफ्टवेअर लायसन्स वापरकर्त्यांला अशी मुभा देतो का यावर त्या लायसन्सिंग पद्धतीची व्यावहारिकता अवलंबून असते.

ओपन सोर्सच्या पटावर अस्तित्वात असलेल्या विविध लायसन्सिंग पद्धतींच्या व्याख्यांमध्ये तसेच वरील तीन तत्त्वांचे अनुसरण करण्यामध्ये प्रत्येक लायसन्सिंग पद्धतीत काही प्रमाणात फरक असला तरीही मुख्यत: या लायसन्सिंग पद्धतींची दोन पंथांमध्ये विभागणी करता येईल. एक म्हणजे बीएसडी लायसन्सिंग पद्धतीची शैली अनुसरणारा पंथ तर दुसरा म्हणजे जीपीएल लायसन्सिंग पद्धतीची शैली अनुसरणारा पंथ!

बीएसडी लायसन्सिंग पद्धती सॉफ्टवेअर वापरकर्त्यांला सर्व प्रकारची स्वातंत्र्ये व मुभा तर देतेच पण त्याचबरोबर त्याच्यावर कसल्याही प्रकारचे र्निबध किंवा जबाबदारी टाकत नाही. खरे सांगायचे तर बीएसडी लायसन्स हा केवळ एक पानी दस्तऐवज आहे ज्याच्यात तीन प्राथमिक स्वरूपाच्या तरतुदी केल्या आहेत.

एक म्हणजे त्यात वापरकर्त्यांला सॉफ्टवेअरच्या (आहे त्या किंवा सुधारित स्वरूपात) अमर्याद वापराचा व वितरणाचा अधिकार बहाल केला आहे. महत्त्वाचे म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा करून त्याचे वितरण करताना सॉफ्टवेअरला ओपन सोर्स ठेवण्याचे कसलेच बंधन वापरकर्त्यांवर घातलेले नाही. अशा अमर्याद अधिकाराच्या बदल्यात वापरकर्त्यांकडून निव्वळ एक माफक अपेक्षा ठेवली आहे ती म्हणजे त्याने सॉफ्टवेअरच्या सोर्स कोडमध्ये समाविष्ट असलेली मूळ कॉपीराइट सूचना न बदलण्याची! आणि शेवटचे म्हणजे सॉफ्टवेअरच्या निर्मितीत सहयोग दिलेल्या प्रोग्रामर्सना व त्याच्या निर्मितीस कारणीभूत असलेल्या संस्थेला (जसे बीएसडीच्या बाबतीत कॅलिफोर्निया बर्कले विद्यापीठ!) सर्व प्रकारच्या कायदेशीर भानगडींतून वाचवण्यासाठी, सॉफ्टवेअरबाबतीत कसलीही हमी न घेणारे ‘नो वॉरंटी’ कलम अंतर्भूत केले आहे.

बीएसडीला विद्यापीठीय संशोधनाची पार्श्वभूमी असल्याने या लायसन्सच्या अटी बऱ्याच अंशी बंधनरहित आहेत. याचा सॉफ्टवेअरच्या प्रसारासाठी जसा मोठय़ा प्रमाणात हातभार लागू शकतो तसेच काही वेगळ्या गुंतागुंतीसुद्धा निर्माण होऊ  शकतात. जेव्हा बिल जॉयने कॅलिफोर्निया बर्कले विद्यापीठातील आपल्या पदाचा राजीनामा दिला व बीएसडीचा सोर्स कोड घेऊन सन मायक्रोसिस्टीमच्या निर्मितीमध्ये गुंतला तेव्हा तो कोणतेही बेकायदेशीर काम करत नव्हता. पुढे सन मायक्रोसिस्टीमने डीईसीच्या वॅक्स लघुसंगणकांवर चालवण्यासाठी बीएसडीच्या एका नव्या आवृत्तीची निर्मिती केली जी ओपन सोर्स नव्हती. विशेष म्हणजे ही आवृत्ती मूळ ओपन सोर्स असलेल्या बीएसडीच्या सोर्स कोडचा आधार घेऊन बनवली होती.

इथे सन मायक्रोसिस्टीम बीएसडी लायसन्समध्ये असलेल्या तरतुदींचाच (किंवा मर्यादांचा) पुरेपूर वापर करत होती. सन मायक्रोसिस्टीमच्या पुढील काळात झालेल्या भरभराटीनंतर बीएसडी प्रकल्पात सहभागी असलेल्या इतर तंत्रज्ञांचा बिल जॉयने बीएसडीचा व्यावसायिक पद्धतीने वापर करण्यावर सुरुवातीला सौम्य प्रमाणात असलेला विरोध पुष्कळ पटीने वाढला तरीही कायदेशीररीत्या ते सनविरोधात कसलीही कारवाई करू शकले नाहीत.

बीएसडीच्या तुलनेत वापरकर्त्यांवर बऱ्याच जास्त प्रमाणात र्निबध घालणारा असला तरीही जनरल पब्लिक लायसन्स (किंवा जीपीएल) हा एखादे सॉफ्टवेअर आणि त्याच्या सर्व सुधारित आवृत्त्या या कायमस्वरूपी ओपन सोर्स राहण्याची संपूर्ण खात्री देतो. बीएसडीप्रमाणेच जीपीएल आपल्या वापरकर्त्यांना सॉफ्टवेअरचा वापर, सुधारणा व वितरण करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य देत असला तरीही आपल्या ‘वायरल क्लॉज’द्वारे सॉफ्टवेअरला सदैव ओपन सोर्स ठेवण्याचे बंधन घालतो. जीपीएलचा रचनाकार रिचर्ड स्टॉलमनच्या म्हणण्यानुसार जे सॉफ्टवेअर तिचे निर्माते ओपन सोर्स म्हणून उपलब्ध करून देत असतील, अशा सॉफ्टवेअरचा सोर्स कोड वापरून तिला प्रोप्रायटरी बनवणे हे अनैतिक आहे आणि सॉफ्टवेअरच्या लायसन्सने अशा वर्तणुकीला पायबंद घालणे जरुरी आहे.

तात्त्विक अंगाने स्टॉलमनचा तर्क बिनतोड वाटत असला आणि यामुळे ओपन सोर्स सॉफ्टवेअरच्या अर्निबध वापरावर वचक बसत असला तरीही काही व्यावहारिक अडचणी निर्माण होतात. सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे ओपन सोर्स सॉफ्टवेअरसोबत प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर वापरणे अशक्य होऊन बसते, कारण जे प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर एखाद्या जीपीएल स्वरूपाची लायसन्सिंग पद्धती वापरत असलेल्या ओपन सोर्स सॉफ्टवेअरचा वापर करत असेल तर जीपीएल अशा प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरचा सोर्स कोड खुला करण्याचे बंधन घालतो. या काहीशा अव्यावहारिक मागणीमुळे जीपीएलच्या आहे त्या स्वरूपातल्या वापरावर मर्यादा पडतात.

जीपीएल आणि बीएसडी या दोन विरुद्ध टोकाच्या लायसन्सिंग पद्धतींमधल्या शक्तिस्थळांचा वापर करून ओपन सोर्स तत्त्वांशी एकनिष्ठ राहणारी व तसेच व्यावहारिक निकषांवर पात्र ठरणारी लायसन्सिंग पद्धती डेबियन प्रकल्पात वापरली गेली. डेबियन सोशल कॉन्ट्रॅक्ट लिहिणाऱ्या ब्रूस पेरेन्ससाठी सॉफ्टवेअर वापरकर्त्यांचे स्वातंत्र्य जेवढे महत्त्वाचे होते तेवढेच ओपन सोर्स सॉफ्टवेअरचा प्रसार होणे गरजेचे होते ज्यासाठी त्याने असा मध्यममार्ग स्वीकारला. डेबियन लायसन्सिंगची पद्धत एवढी लोकप्रिय झाली की, पुढे स्टॉलमनलादेखील जीपीएलमध्ये व्यावहारिकतेला अनुसरून काही बदल करणे भाग पडले. आज बहुतेक ओपन सोर्स प्रकल्पांमध्ये डेबियनशी मिळतीजुळती लायसन्सिंग पद्धती वापरण्यात येते.

ओपन सोर्स – गुंतागुंतीचे नियोजन

what-is-open-source-software-5

1153   23-Oct-2018, Tue

तांत्रिक आरेखनामुळे तंत्रज्ञांना ओपन सोर्स सॉफ्टवेअरमध्ये आपले ऐच्छिक योगदान देणे सोयीचे होते. त्यामुळे प्रकल्पाची व्यवस्थापकीय क्लिष्टता एका बाजूने कमी होत असली तरीही इतर काही बाबी अनुत्तरितच राहतात..

सॉफ्टवेअर ही एक विलक्षण गुंतागुंतीची आणि क्लिष्ट अशी गोष्ट आहे. लिनक्सच्या नव्या आवृत्तीत त्याच्या कर्नलमध्ये (ऑपरेटिंग प्रणालीचा मध्यवर्ती भाग) सोर्स कोडच्या अडीच कोटींहून अधिक ओळी आहेत (ज्याला संगणकीय भाषेत ‘लाइन्स ऑफ कोड’ असे म्हणतात.) आणि साठ हजारांवर छोटय़ा-मोठय़ा प्रोग्राम्सच्या फाइल्स आहेत ज्यावरून सॉफ्टवेअर व्यवस्थापनाच्या क्लिष्टतेचा अंदाज येऊ  शकेल. ओपन सोर्स प्रकल्पांच्या काही विशेष गुणधर्मामुळे ही गुंतागुंत अजूनच वाढते.

एक तर ओपन सोर्स प्रकल्पात योगदान देणारे तंत्रज्ञ भौगोलिकदृष्टय़ा विखुरलेले असतात, त्यामुळे ते प्रत्यक्षात एकमेकांना भेटणे शक्य नसते. त्याचबरोबर त्यांच्या काम करण्याच्या वेळादेखील भिन्न असू शकतात. योगदान ऐच्छिक स्वरूपाचे असल्याने प्रत्येक जण त्याच्या पसंतीनुसार हवे तेव्हा आणि सॉफ्टवेअरच्या हव्या त्या भागावर काम करण्यास स्वतंत्र असतो. त्याचबरोबर प्रकल्पातून कधीही आपल्या मर्जीनुसार बाहेर पडण्याची, तसेच सोर्स कोड खुला असल्याने त्याचा वापर करून एक स्वतंत्र प्रकल्प सुरू करण्याचीदेखील मुभा समुदायातल्या प्रत्येक तंत्रज्ञाला असते. यामुळे केवळ प्रकल्पाचे नेतृत्व किंवा व्यवस्थापन समिती अशा गुंतागुंतीचे नियोजन करून प्रकल्प एकसंध ठेवण्यासाठी पुरी पडू शकत नाही.

सॉफ्टवेअरचे तांत्रिक आरेखन ओपन सोर्स प्रकल्पातल्या क्लिष्टतेचे व्यवस्थापन करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. ओपन सोर्स सॉफ्टवेअर निर्माण करताना ‘मॉडय़ुलरायझेशन’ किंवा विभाजनीकरणाच्या संकल्पनेचा पुष्कळ उपयोग केला जातो. मॉडय़ुलरायझेशन म्हणजे एका सॉफ्टवेअर आज्ञावलीचे छोटय़ा व स्वतंत्र भागांमध्ये विभाजन करणे. छोटय़ा आकारामुळे सॉफ्टवेअरच्या विविध भागांचे व्यवस्थापन करणे सोयीचे जाते तर स्वतंत्र व्याप्तीमुळे या भागांचे परस्परावलंबित्व कमी होते, ज्यामुळे तंत्रज्ञ सॉफ्टवेअरच्या विविध भागांवर समांतरपणे काम करू शकतात. संगणकीय भाषेत याला ‘लूज कपलिंग’ असेही म्हटले जाते.

लिनक्स कर्नलच्या आरेखनासाठी सुरुवातीला टॉरवल्ड्सने मोठय़ा आकाराच्या, अखंड व एकात्मिक स्वरूपाच्या मोनोलिथिक कर्नलचा वापर केला होता. लघू आकाराच्या मायक्रो कर्नलकडे संगणक तंत्रज्ञांचा वाढत कल असूनही टॉरवल्ड्सने लिनक्सच्या निर्मितीत मायक्रो कर्नलची विभाजणीकरणाची पद्धत स्वीकारली नाही. लिनक्सचा वापर हा मुख्यत्वेकरून शैक्षणिक व संशोधन कामापुरताच मर्यादित राहील अशी टॉरवल्ड्सची अटकळ होती. त्यामुळे व्यवस्थापनाच्या दृष्टीने मोनोलिथिक कर्नल हाताळणे सोयीचे जाईल, असे त्याला वाटत होते. लिनक्सच्या पहिल्या अधिकृत आवृत्तीत (लिनक्स १.०) मोनोलिथिक कर्नलचाच वापर झाला होता.

जरी सुरुवातीच्या काळात टॉरवल्ड्सने मोनोलिथिक कर्नल वापरण्याच्या आपल्या निर्णयाचे जाहीरपणे समर्थन केले होते तरी जसजसा लिनक्स प्रकल्पाचा आकार व व्याप्ती वाढत गेली व त्यात हजारो संगणक तंत्रज्ञ आपले योगदान द्यायला लागले तेव्हा आपला निर्णय तांत्रिकदृष्टय़ा चुकीचा आहे याची टॉरवल्ड्सला जाणीव व्हायला लागली.

आपला निर्णय आपल्याच प्रकल्पाच्या वाढीच्या विरोधात जाईल याची जाण झाल्यावर मात्र टॉरवल्ड्सने आपला मोनोलिथिक कर्नलचा हेका सोडून कर्नलचे छोटय़ा व स्वतंत्र भागांमध्ये विभाजन करण्याचा आपला मनसुबा जाहीर केला. लिनक्सच्या दुसऱ्या अधिकृत आवृत्तीमध्ये (लिनक्स २.०) अखेरीस कर्नलच्या विभाजणीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. सॉफ्टवेअरच्या तांत्रिक आरेखनाची ओपन सोर्स प्रकल्पांच्या व्यवस्थापनातली कळीची भूमिका या उदाहरणातून स्पष्ट होईल.

तांत्रिक आरेखनामुळे जगभरातल्या तंत्रज्ञांना ओपन सोर्स सॉफ्टवेअरमध्ये आपले ऐच्छिक योगदान देणे सोयीचे होत असल्यामुळे प्रकल्पाची व्यवस्थापकीय क्लिष्टता एका बाजूने कमी होत असली तरीही इतर काही बाबी अनुत्तरितच राहतात.

सोर्स कोड खुला असल्याने व सॉफ्टवेअरची लायसन्सिंग पद्धती सोर्स कोडच्या वितरणाचे पूर्ण समर्थन करत असल्यामुळे, कोणाही तंत्रज्ञाने प्रकल्पापासून वेगळे होऊन व खुल्या सोर्स कोडचा वापर करून एक नवा प्रकल्प (‘फोर्क’) सुरू  करण्याची, तसेच सॉफ्टवेअरची लायसन्सिंग पद्धतीच बदलायची शक्यता नाकारता येत नाही.

प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर व्यवस्थेत अशी क्लिष्टता फारशी उद्भवत नाही. कारण सॉफ्टवेअरची लायसन्सिंग पद्धतीच अशा पद्धतीच्या वर्तणुकीला अटकाव करते. त्याचबरोबर प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरची निर्मिती कंपनीच्या आत होत असल्याने कंपनीच्या धोरणानुसार अशा नियमबा वागणाऱ्या व्यक्तीवर त्वरित कारवाईदेखील करता येते. ओपन सोर्स व्यवस्थेत अशी कारवाई करणे अधिकृतपणे अशक्य असले तरीही समुदायानेच निर्मिलेले काही उपाय अप्रत्यक्षपणे अशा वर्तनावर अंकुश आणतात.

विविध ओपन सोर्स प्रकल्पांत दोन उपाय मुख्यत्वेकरून वापरले गेले आहेत. एक म्हणजे सार्वजनिक निर्भर्त्सना, ज्याला ओपन सोर्स परिभाषेमध्ये ‘फ्लेमिंग’ (Flaming) असे म्हटले जाते. यात समुदायातील तंत्रज्ञांकडून नियम तोडणाऱ्या व्यक्तीचा जाहीरपणे (इंटरनेट, ई-मेल लिस्ट किंवा ऑनलाइन चर्चामंचांवर) धिक्कार करण्यात येतो. व्यक्तीच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचत असल्याने या उपायामुळे नियमबाह्य़ वर्तनावर काही प्रमाणात र्निबध आणता येतात.

जर फ्लेमिंग फारसे प्रभावी ठरले नाही तर काही ओपन सोर्स प्रकल्पांत याहून अधिक तीव्र व टोकाचा पर्याय समुदायाकडून वापरण्यात येतो, जो म्हणजे नियम तोडणाऱ्या व्यक्तीला, व्यक्तींच्या समूहाला किंवा अगदी एखाद्या कंपनीला प्रकल्पातून संपूर्णपणे बहिष्कृत करणे. ओपन सोर्स परिभाषेमध्ये याला ‘शनिंग’ (Shunning) असे म्हणतात.

हा भौतिक बहिष्कार नसून सामाजिक आहे कारण यात त्या व्यक्ती किंवा संस्थेला प्रकल्पात योगदान देणारा समुदाय आपल्यापासून पूर्णत: विलग करतो. त्याचबरोबर ती व्यक्ती वा संस्था समुदायाकडून कसल्याही सहकार्याची अपेक्षा ठेवू शकत नाही. आपल्या स्वार्थी, बेजबाबदार आणि नियमबाह्य वर्तनाची ही खूप मोठी किंमत चुकवावी लागत असल्यामुळे अशा वर्तणुकीला बऱ्याच प्रमाणात लगाम बसू शकतो.

एसएसएच प्रकल्प हे शनिंगचे एक ठळक उदाहरण आहे. एसएसएच (SSH) प्रणाली ही वापरकर्त्यांचा ब्राऊझर आणि सव्‍‌र्हर यात देवाणघेवाण होणाऱ्या माहितीची गोपनीयता टिकवण्यासाठी तिला सांकेतिक भाषेत बदलण्याचे (एन्क्रिप्शन) काम करते.

टाटु यॉनन या तंत्रज्ञाने नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला सुरू केलेल्या या ओपन सोर्स प्रकल्पाला अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळाली व तंत्रज्ञांचा एक विस्तृत समुदाय या प्रणालीवर काम करू लागला. १९९४ सालच्या अखेपर्यंत एसएसएच प्रणालीची ओपन सोर्स लायसन्सिंग पद्धती असलेली पहिली अधिकृत आवृत्ती प्रसिद्ध झाली.

असे सगळे आदर्शवत चालू असताना यॉननच्या एका कृतीमुळे प्रकल्पात अस्थिरतेचे वातावरण तयार झाले. यॉननने १९९५च्या मध्यावर, स्वत:च्या नेतृत्वपदाचा गैरफायदा घेत, एसएसएच प्रणालीची लायसन्सिंग पद्धती, प्रकल्पात योगदान देणाऱ्या समुदायाला अंधारात ठेवून बदलली. नव्या लायसन्सिंग अटींप्रमाणे यापुढे एसएसएच प्रणालीचे व्यावसायिक वितरण करण्यावर त्याने र्निबध आणले होते.

यापुढे जाऊन त्याने एसएसएच कम्युनिकेशन नावाची कंपनी स्थापन केली व भविष्यात एसएसएच प्रणालीला केवळ ही कंपनीच व्यावसायिकरीत्या विकू शकेल अशी सोय केली व त्याचबरोबर ‘एसएसएच’ या तीन अक्षरांवर या कंपनीद्वारे ट्रेडमार्क हक्क आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एसएसएच हे नाव यापुढे केवळ एसएसएच कम्युनिकेशन ही कंपनीच वापरू शकली असती.

या प्रकल्पात काम करणाऱ्या समुदायाचा हा थेट विश्वासघात होता. समुदायाचा आक्षेप प्रणालीच्या व्यावसायिक विक्रीतून यॉननने पैसे कमावण्यावर नव्हता, तर असे पैसे कमावण्याचा अधिकार फक्त स्वत:च्या कंपनीपुरता मर्यादित ठेवण्यावर होता. सॉफ्टवेअर व्यावसायिक पद्धतीने वितरण करण्याच्या समुदायाच्या स्वातंत्र्यावर यॉननने र्निबध आणले होते.

लगेचच एसएसएच ओपन सोर्स प्रकल्पात काम करणाऱ्या तंत्रज्ञांनी, एसएसएचच्या संपूर्णत: ओपन सोर्स असलेल्या एका आवृत्तीचा वापर करून एक नवा ‘ओपनएसएसएच’ (OpenSSH) नामक प्रकल्प सुरू केला. एका फटक्यात एसएसएच प्रकल्पात काम करणाऱ्या संपूर्ण समुदायाने एसएसएच कम्युनिकेशन कंपनीला बहिष्कृत केले होते. यामुळे यॉनन ओपन सोर्स समुदायाकडून मिळणारा सहयोग तर गमावून बसलाच पण पुढील अनेक वर्षे कायदेशीर मार्गाचा अवलंब करूनदेखील तो ओपनएसएसएच प्रकल्पाची वाढ थांबवू शकला नाही.


Top