पंतप्रधान संशोधन फेलोशिप योजना

1817 05-Jun-2018, Tue
केंद्र सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयातर्फे देशांतील हुशार विद्यार्थ्यांमध्ये संशोधनपर जाणीव आणि आवड निर्माण करण्यासाठी पंतप्रधान संशोधन फेलोशिप योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
योजनेचा उद्देश
पंतप्रधान संशोधन फेलोशिप योजनेचा मुख्य उद्देश विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील पदवीधर व पदव्युत्तर पात्रताधारकांना इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अथवा इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी यांसारख्या प्रथितयश संस्थांमध्ये संशोधनपर पीएचडी करण्याची संधी उपलब्ध करून त्यांच्या संबंधित विषय वा क्षेत्रातील संशोधनपर प्रयत्नांना चालना देणे हा आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
अर्जदार बीटेक पदवीधर असावेत अथवा त्यांनी पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांची परीक्षा दिलेली असावी किंवा त्यांनी एमटेक/ एमएससी यासारखी पात्रता पूर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.
निवड प्रक्रिया
अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची चाळणी ३० एप्रिल २०१८ पर्यंत करण्यात येईल. त्यापैकी पात्रताधारक उमेदवारांना मे २०१८ मध्ये इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी वा इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सतर्फे मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांना संबंधित आयआयटी/ आयआयएससीमध्ये संबंधित विषयातील संशोधनपर पीएचडी करण्यासाठी नामवंत संशोधक/ मार्गदर्शकांच्या हाताखाली प्रवेश देण्यात येईल.
फेलोशिपची रक्कम व तपशील
योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या संशोधन कालावधी दरमहा ६०,००० ते ८०,००० रु. ची मासिक संसोधन फेलोशिप व २ लाख रुपयांची एकत्रित राशी देण्यात येईल.
संशोधनपर काम यशस्वी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधनपर पीएचडी प्रदान करण्यात येईल.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क
वरील योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली पंतप्रधान फेलोशिप योजनेची जाहिरात पहावी अथवा योजनेच्या http://pmrf.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.