शब्दबोध : लवथवती

article-about-word-sense-9

161  

हा शब्द ‘लवथवणे’ या क्रियापदापासून तयार झालेला आहे. काही काही शब्दांना त्यांची स्वत:ची लय असते. सळसळ, झुळझुळ, थुईथुई असे शब्द नुसते वाचले तरी ती लय आपल्याला जाणवते. लवथवती हा शब्ददेखील असाच. शंकराच्या आरतीत तो आपल्याला भेटतो. या आरतीची सुरुवातच मुळी लवथवतीने होते.

शंकराची ही आरती रामदासांनी लिहिली आहे. समाजात चतन्य निर्माण करण्यासाठी रामदासांनी अनेक आरत्या लिहिल्या. मारुतीची आरतीसुद्धा त्यांनीच लिहिली. त्या आरतीचा नादच असा आहे की ती म्हणताना अंगात बळ संचारते. शंकराच्या आरतीतही त्यांनी शंकराचे असेच वर्णन केले आहे.

सृष्टीच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय अशा तीन अवस्था मानल्या जातात. शंकर ही या तीन अवस्थांपकी लयाची देवता मानली जाते. शंकराने रुद्रावतार धारण केला की सृष्टीचा लय होतो असा समज आहे. या ब्रह्मांडाच्या अक्राळविक्राळ माळा त्याच्या नियंत्रणाखाली लवथवतात, डोलतात हे ‘लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा’ या ओळीत वर्णिले आहे.

परंतु या लवथवती शब्दाबद्दल पुलंनी एक वेगळी तक्रार केली आहे. आपल्या ‘मी नाही विसरलो’ या लेखात पुलं म्हणतात, ‘लवथवती विक्राळातला लवथवती फक्त गणपतीच्या दिवसात भेटतो. लवथवतीला त्या आरतीखेरीज लवथवायला का मिळाले नाही? का ही उपेक्षा?’

पण खरं म्हणजे शंकराच्या आरतीखेरीज आणखी एका काव्यात लवथवती लवथवला आहे. तेही साध्यासुध्या नव्हे तर अनिलांसारख्या श्रेष्ठ कवीच्या काव्यात. त्यांची सर्वात शेवटची कलाकृती मानली जाणारी म्हणजे ‘दशपदी’ हा कवितासंग्रह. त्यातील ‘तुझ्याविना’मध्ये हा शब्द भेटतो.!

हा काव्यप्रकार अनिलांनी मराठीत रूढ केला. त्यांच्या ‘दशपदी’ या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसं पाहिलं तर दशपदी काव्यसंग्रहात एकूण चाळीस दशपदींचा समावेश आहे. परंतु चाळिसावी ‘हा आनंदाचा दिस’ ही दशपदी अपूर्ण आहे. त्यामध्ये नऊ पदे आहेत. त्यामुळे एकूण उरलेल्या दशपदी एकोणचाळीस. त्यातील ही एकोणचाळिसावी दशपदी आहे ‘तुझ्याविना.’

कवी अनिल म्हणजेच आ. रा. देशपांडे. त्यांची पत्नी कुसुमावती यासुद्धा मोठय़ा साहित्यिक. प्रत्यक्ष जीवनात हे दाम्पत्य एकमेकांशी अगदी एकरूप झाले होते. मराठी साहित्यात कुसुमावती आणि अनिल यांचं सुंदर सहजीवन अजोड समजलं जातं.

कुसुमावतींच्या निधनानंतर अनिल एकटेपणामुळे कोळपत गेले. त्यातूनच त्यांना ‘तुझ्याविना’ ही दशपदी सुचली. यातील एकेक ओळ म्हणजे अगदी खणखणीत नाणं आहे. या दशपदीत ‘लवथवती’ हा शब्द कसा आला आहे पाहा –

लवथवत्या पानावर गहिवरते भर दुपार

ज्वर भरला दिवस ढळे कसा तुझ्याविना

या ओळींबद्दल अनिल लिहितात,  ‘ही दुपार पानांना लवथवती करणारी. हा शब्द लवथवती विक्राळा या आरतीतला- पण तीच तेव्हा गहिवरते. तिच्या तोडीची दुसरी ओळ सुचणं कठीण वाटलं. पण ती गळाला लागली. ज्वर का? तर these were days of feverish activity.. दिवस ढळला अंधार आला.’

हे वाचल्यानंतर एक विचार डोक्यात आला. पुलंनी मांडलेली लवथवती शब्दाची कैफियत तर अनिलांच्या कानांवर गेली नसेल? कुणास ठाऊक. म्हणजे हा काही दावा नाही, सहज एक विचार आहे. पण एक नक्की तसे झाले असो वा नसो या कवितेमुळे ‘लवथवती’ या शब्दाचे आणि पर्यायाने वाचक म्हणून आपलेही भाग्य मात्र निश्चितच उजळले.

शब्दबोध : भारूड

article-about-word-sense-bharud

121  

सामान्य लोकांना सोप्या भाषेत अध्यात्माची शिकवण देण्यासाठी संतांनी ओवी, अभंग,भारूड अशा वेगवेगळ्या काव्यरचना केल्या. त्यातील जनसमुदायासमोर नाटय़मय रीतीने सादर केली जाणारी रूपकात्मक रचना म्हणजे भारूड. एकनाथपूर्व कालात ज्ञानेश्वर आणि नामदेव यांनी तर एकनाथांच्या पश्चात तुकाराम आणि रामदास यांनीही भारुडे रचली. असे असलं तरी एकनाथांचीच भारुडे सर्वात लोकप्रिय झालेली आढळतात. त्यामुळेच ‘ओवी ज्ञानेशाची’ , ‘अभंग तुकयाचा’ तसं ‘भारूड नाथांचं’ असं म्हटलं जातं.

‘भारूड’ या शब्दाची निश्चित उत्पत्ती सांगणं कठीण आहे. काहींच्या मते ‘बहुरूढ’ या शब्दापासून भारूड शब्द तयार झाला असावा. भारुडांचे विषय जोशी, पिंगळा, सन्यासी, माळी, जंगम अशा विविध समाजरूढींवर आधारलेले आहेत म्हणून ते बहुरूढ समजले जाते. याशिवाय ‘भा’ म्हणजे तेज त्यावर आरूढ झालेले ते भारूड किंवा भिरूंड नावाच्या द्विमुखी काल्पनिक पक्ष्याप्रमाणे एकाच वेळी दोन भिन्न अर्थ अभिव्यक्त करणारे म्हणून भारूड अशीही व्युत्पत्ती मानली जाते. यासोबतच भराडी जमातीत परंपरेने रूढ झालेले गीत म्हणजे भारूड असाही एक समज प्रचलित आहे.

एकनाथांच्या भारुडाचे वर्णन ‘आध्यात्मिक आणि नतिक शिक्षण देणारे मराठीतील रूपकात्मक नाटय़-गीत’ असे केले जाते. नाथांच्या भारुडांची संख्या जशी विपुल आहे तसेच त्यांचे विषयही विविध आहेत. बायला, दादला, भुत्या, वाघ्या, विंचू, कुत्रा, एडका इत्यादी विविध विषयांचे एकनाथ जे अचूक वर्णन करतात त्यावरून त्यांच्या सूक्ष्म आणि चौफेर निरीक्षणाची कल्पना येते. शिवाय अशा साध्या साध्या विषयांतून अध्यात्माचा गहन आशय ते ज्या प्रकारे व्यक्त करतात त्यातून त्यांची अलौकिक कल्पनाशक्ती आणि बुद्धिमत्ता प्रकट होते.

विंचू, दादला अशा बहुतेक भारुडांना विनोदाची झालर आहे. त्यामुळे भारुडाचे सादरीकरण लोकांना नेहमीच मनोरंजक वाटते. पण त्यातील आध्यात्मिक आशय साऱ्यांनाच उलगडतोच असे नाही. त्या दृष्टीने ‘कोडे’ हे भारूड बघा –

नाथाच्या घरची उलटी खूण। पाण्याला मोठी लागली तहान।

आत घागर बाहेर पाणी। पाण्याला पाणी आले मिळोनी।

यातील ‘पाण्याला मोठी लागली तहान’ याचा अर्थ आहे, ‘नाथांच्या आत्म्याला लागलेली परमात्म्याची ओढ.’ आता हा अर्थ साऱ्यांनाच सहज समजेल असे नव्हे. तरीही एकंदरीत नाथांची भारुडे रंजक आणि उद्बोधक आहेत, यात शंका नाही. या भारूड शब्दावरून आणखी एक वाक्प्रचार रूढ आहे. एखाद्या कार्यक्रमात एखादा माणूस फार वेळ कंटाळवाणे बोलू लागला की त्याला म्हणतात, काय भारूड लावलंय. आता ही अर्थछटा या शब्दाला नक्की कोणाच्या भारूड लावण्यामुळे मिळाली, ते काही माहिती नाही. पण आता या शब्दाबद्दल बोलणे इथेच थांबवायला हवे, नाहीतर वाचक हो, तुम्हीच म्हणाल, काय भारूड लावलंय!

शब्दबोध : अक्षता

article-about-word-sense-7

1977  

अक्षता हा शब्द आपल्या अगदी चांगला परिचयाचा. लग्नाच्या वयाचा तरुण मुलगा किंवा मुलगी घरात असेल तर यांच्या डोक्यावर कधी एकदा अक्षता पडतात, अशी काळजी बहुतांश माता-पित्यांना लागलेली दिसते. लग्नाच्या हंगामात तर कधी कधी एकाच तिथीची दोन आमंत्रणं येतात. अशा वेळी एका लग्नाच्या पहिल्या मंगलाष्टकाला अक्षता टाकून मंडळी दुसऱ्या लग्नाचं शेवटचं मंगलाष्टक गाठण्याची चतुराई दाखवतात. ही झाली गमतीची बाब पण लग्न आणि अक्षता यांचे नाते असे अतूट.

अक्षता या शक्यतो अखंड तांदळाच्याच घेण्याची एक पद्धत आहे. तुकडा तांदूळ त्याला चालत नाही, कारण अक्षत म्हणजे जे क्षत किंवा भंगलेले नाही ते. अक्षता हे प्रतीक आहे. काहींच्या मते त्यातून वधूचे कौमार्य सूचित होते. म्हणून अक्षतांचे तांदूळ अखंड असतात. गीर्वाणलघुकोशात याचा अर्थ पुरुषसंबंधरहित स्त्री असा दिलेला आहे. या शब्दाला अक्षतयोनि: असा पर्यायी शब्दही दिला आहे. काही मान्यतांच्या आधारे, यातून वधूच्या घरची सुबत्ता सूचित होते. तांदूळ हे भारतीयांचे मुख्य अन्न. लग्नाला उपस्थित असलेले नातेवाईक, आप्त, मित्र-परिवार तांदळाच्या अक्षता वधू-वरांच्या डोक्यावर टाकतात. वधूच्या घरी अन्नाची कमतरता नाही, म्हणून ते अशा अक्षता टाकू शकतात. पण याहीपुढे जाऊन एक वेगळाच विचारही आहे, अक्षतांचे तांदूळ हे एकप्रकारे बीजच असते. हे बीज रुजले की तांदळाचे रोप तयार होते. तांदळाच्या एका दाण्यापासून असे अनेक दाणे, पर्यायाने अनेक रोपे तयार होतात. म्हणजेच वंशवृद्धी होते. जैवसातत्य राखले जाते. लग्नात वधू-वरांच्या संसारवेलीलाही अशीच फलधारणा होऊन वंशवृद्धी व्हावी, असा भावही या अक्षतांमागे असावा असे वाटते.

निसर्गातही अक्षतांचा एक सोहळा चालू असतो. खरं म्हणजे निसर्ग स्वत:च अशी अक्षतांची उधळण दर वर्षी करत असतो. वसंत ऋतूत रानातील विविध प्रजातींच्या झाडांना फुलोरा येतो. त्यांना शेंगा, फळे लगडतात. पावसाळ्याच्या आधी काहींमधून कापसाच्या म्हाताऱ्या तयार होतात. वाऱ्यासवे त्या दूरवर पोहोचतात. पशू-पक्षी काही फळे खातात. त्यांच्या विष्ठेतून या फळांच्या बियांचा प्रसार होतो. निसर्ग अशा प्रकारे लक्षावधी अक्षता ग्रीष्मात उधळत असतो. त्यानंतर वर्षां ऋतू येतो आणि सृष्टीचा सृजनकाळ सुरू होतो.

जाता जाता एक छोटीशी गंमत म्हणजे, निसर्गाचा अक्षता उधळण्याचा काळ एप्रिल-मे महिन्यात असतो. आणि लग्नसराईचा म्हणजेच अक्षता उधळण्याचा आपला हंगामही तेव्हाच असतो. आहे की नाही गंमत!

शब्दबोध : आपोआप

article-about-word-sense-6 mpsc mains exam 2019

501  

आपोआप

आपल्या शरीरात काही क्रिया आपल्या नकळत, सहज आणि सतत घडत असतात. त्यासाठी आपल्याला खास काही करावे लागत नसते. जसे की ह्रदयाचे ठोके, अन्नपचन होण्यासाठी आतडय़ांची हालचाल, श्वासोच्छवास, पापण्यांची हालचाल वगैरे. या क्रिया आपोआप घडत असतात.

आता हा आपोआप हा शब्द कसा आला असेल यावर विचार करताना एक शक्यता अशी वाटली की, तो हिंदीतील ‘अपने आप’वरून आला असेल. परंतु नंतर ज्ञानेश्वरीमध्ये आठव्या अध्यायात ही ओळ वाचनात आली.

आंतु मीनलेनि मनोधर्मे।  स्वरुपप्राप्तीचेनी प्रेमें। आपेंआप संभ्रमें।  मिळावया।।८.९३।।

यामध्ये आपेंआप असा शब्द दिसला.

या ओवीचा, ‘आत सर्व मनोवृत्ती एकरूप झाल्याने, स्वरूपप्राप्तीच्या प्रेमाने, स्वरूपाशी ऐक्य होण्याकरिता आपोआप झालेल्या घाईने’ असा अर्थ दिला आहे. आपेंआप म्हणजे आपोआप हे सरळ दिसतंय. त्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की हिंदीतील अपने आपवरून आपोआप शब्द तयार झाला नाही. कारण ज्ञानेश्वरांच्या काळात हिंदी किंवा फारसी भाषेचा मराठीवर पगडा बसला नव्हता.

मग ज्ञानेश्वरांनी आपेंआप असा शब्दप्रयोग का केला असावा? एक शक्यता अशी की, आप म्हणजे पाणी. आपें हे सप्तमीचे एकवचन. त्याचा अर्थ पाण्यात. पाणी पाण्यात सहज मिसळते. ती पाण्याची सहज प्रवृत्तीच आहे. त्यावरून आपेंआप हा शब्द अस्तित्वात आला आणि नंतरच्या काळात त्याचे आपोआप हे रूप रूढ झाले असावे असे मला वाटते.

आपोआपला इंग्रजीत NEST-2019 असा शब्द आहे. त्यावरून पुलंच्या हसवणूक या पुस्तकातील ‘मी आणि माझा शत्रुपक्ष’ हा लेख आठवला. शिकारी हा पुलंच्या शत्रुपक्षातील आघाडीचा शत्रू. त्याच्यानंतर नवीन घर बांधलेले किंवा बांधकाम चालू असताना साइट दाखवणारे लोक हे शत्रू नंबर दोन. असा हा शत्रू नंबर दोन म्हणजेच एक घरमालक पुलंना त्याने त्याच्या घरात केलेल्या विविध करामती दाखवत होता. त्याच्या घरातील प्रत्येक गोष्ट आपोआप होत असे. ऑटोमॅटिक ग्राइंडर, ऑटोमॅटिक चूल अशा बऱ्याच ऑटोमॅटिक गोष्टी दाखवल्यानंतर तो त्याच्या संडासच्या उंबऱ्यावर उभा राहून, ‘आणि हा संडास’ असे म्हणतो.

तेव्हा, ‘‘काहो येथेही ऑटोमॅटिक होतं का कुंथावं लागतं?’’ असं विचारून पुलंनी त्या शत्रूचा, घरातही नाही आणि परसातही नाही, खोली आहे पण रुंदी नाही अशा स्थळाच्या उंबऱ्यावर हिरण्यकश्यपूसारखा शब्दानं का होईना, कोथळा काढला. पुलंचे विनोद हे मुद्दाम जुळवलेले किंवा ठरवून केलेले नसतात. ते असे उत्स्फूर्त असतात. विनोद ही पुलंची सहजप्रवृत्ती होती. त्यामुळे ते असे आपोआप तयार होतात, जसा आपेंआपपासून आपोआप शब्द तयार झाला.

शब्दबोध : हातखंडा

mpsc mains exam marathi article-about-word-sense-5

681  

हातखंडा

एखादे काम हमखास पार पाडण्याचे कौशल्य अंगी असणे, म्हणजे हातखंडा. तर हातखंड म्हणजे मधून मधून सोडवणूक करणारा, मदतनीस (मूल, मित्र, शेजारी) तसेच अडल्यावेळी उपयोगी पडणारी अशी व्यक्ती.

एखादा कारागीर त्याच्या कलेत अतिशय निष्णात असेल, त्या कलेत त्याचा हात धरणारा दुसरा कुणी नसेल तर त्याच्या कामाचे वर्णन हातखंडा काम असे केले जाते. गालिच्यांवर नाजूक कलाकुसर करणारे, दगडी शिल्पांमधे सजीवतेचा आभास निर्माण करणारे, ताजमहालसारख्या कलाकृतीमधे संगमरवरावर सुंदर नक्षीकाम करणारे अशा विविध कलांमधे श्रेष्ठ असणाऱ्या कलावंतांचे कार्य हे हातखंडा काम म्हणून ओळखले जाते. एवढेच काय रोजच्या व्यवहारातही, स्वयंपाकातला पुरणपोळीसारखा पदार्थ करण्यात एखादी गृहिणी वाक्बगार असेल तर पुरणपोळी म्हणजे तिचे हातखंडा काम असे अभिमानाने सांगितले जाते.

पण हे सगळे असे असले तरी हातखंडा काम या वाक्प्रचारामागे एक कटू सत्य आणि भीषण वास्तवता दडली आहे, हे आपल्याला कदाचित माहितीही नसेल. पूर्वीच्या काळी राजे-महाराजे, सुलतान, जहागीरदार यांसारखे राज्यकर्ते आपल्या राज्यातील, संस्थानातील कुशल कारागिरांकडून एखादे अलौकिक शिल्प, वास्तू किंवा स्वत:चे चित्र तयार करून घेत. पण त्यानंतर भविष्यात या कारागिरांनी इतरत्र कुठेही अशा तऱ्हेचे किंवा याहून चांगलं काम करू नये म्हणून त्यांना एक आगळेवेगळे बक्षीस देत. त्यांचे हात छाटून टाकत. त्यावरून हातखंडा काम हा वाक्प्रचार तयार झाला असावा.

चि. वि. जोशींच्या ओसाडवाडीच्या देव या छोटय़ा, पण अतिशय सुंदर पुस्तकात सुरुवातीलाच ओसाडवाडीतील गणपतीच्या मंदिरातील गणपतीच्या मूर्तीचे वर्णन आपल्या वाचनात येते. ते असे, ‘ही गणपतीची मूर्ती इतकी सुंदर आहे की, ती तयार करणाऱ्या कारागिराचे हात तोडून राजाने त्याला जहागीर बक्षीस दिली होती. याला म्हणतात हातखंडा काम! पूर्वीचे राजेलोक कलेला अशा प्रकारचे उत्तेजन देत असत.’

हातखंडा काम या वाक्प्रचारामागचे हे सत्य माहीत झाल्यावर एखाद्या कलाकाराच्या कामाचे वर्णन करताना हातखंडा काम हा शब्दप्रयोग करण्यापूर्वी आपण दहादा विचार करू. नाही का?

शब्दबोध

article-about-word-sense-3

1057  

सुकाणू

‘ज्याच्या हाती संपूर्ण जहाजाचा सुकाणू आहे तो ते जहाज कसे बरे भरकटू देईल?’ सुकाणू म्हणजे गलबत विशिष्ट दिशेस वळविण्याचे त्याच्याच मागच्या बाजूस पाण्यात असलेले एक साधन. साधारणत: गोल, चक्राकार असे हे सुकाणू असते किंवा एक मोठा दांडा असतो जो वर्तुळाकार, कुठल्याही दिशेला फिरवता येतो. समुद्रातून ये-जा करणाऱ्या मोठय़ा जहाजाला हा सुकाणू असतो जेणेकरून समुद्रप्रवासाची दिशा निश्चित करून त्यानुसार जहाज वळविता येते.

या अर्थावरून पुढे मराठीत ‘सुकाणू’ हा शब्द वाङ्मयविश्वातही लक्षाणार्थाने वापरला जाऊ  लागला. बा.सी.मर्ढेकर यांच्या कवितेतून हे स्पष्ट होते. –

त्वत्स्मृतीचे ओळखू दे

माझिया हाता सुकाणू

थोर- यत्न शांति दे गा

माझिया वृत्तीत बाणू

ईश्वराला उद्देशून मर्ढेकर म्हणत आहेत की, माझ्या हातातील आयुष्यरूपी सुकाणूला तुझ्या स्मरणाची कायमच ओळख असू दे जेणेकरून माझ्या जीवनाला योग्य दिशा मिळेल.

असा हा सुकाणू शब्द मूळ अरबी आणि संस्कृत पण आहे अशी दोन्ही मते आहेत. अरबीत मूळ ‘सुक्कान्’ यावरून सुकाणू तयार झाला आहे. ज्याचा अर्थ गलबत वळविण्याचे एक साधन असाच आहे. मराठीत मात्र हा सुकाणू शब्द चांगलाच स्थिर झाला आहे. आणि तो विविध अर्थव्याप्तीने वापरलाही जातो.

हुबेहूब

अमुक ती विविध पक्ष्यांचे हुबेहूब आवाज

काढते. बालगंधर्व चित्रपटात सुबोध भावे

हुबेहूब बालगंधर्वच दिसतो. दिसणे, वागणे, बोलणे, करणे, हसणे अशा कितीतरी लकबींसाठी, क्रियांसाठी हुबेहूब हे क्रियाविशेषण वापरतो. मूळ फारसी ‘ऊ – ब- ऊ / हु – ब – हु ’ वरून हुबेहूब हा शब्द तयार झाला. फारसी हु – ब – हु चा अर्थ जसेच्या तसे, एकसारखे, एक प्रकारचे, संपूर्ण सादृश्यता असलेले असा आहे. हाच अर्थ मराठीत पण आहे फक्त शब्दाच्या रूपात बदल झाला.

शब्दबोध

article-about-word-sense-2

377  

अश्राप

‘अपहरण करून एका अश्राप जिवाची हत्या’ किंवा एखाद्या कथा- कादंबरीत हमखास वाचनात येणारे वाक्य म्हणजे ‘त्या अश्राप जिवाचे तळतळाट लागतील तुला.’ मराठीत ज्या प्रकारे हा शब्द वापरला जातो त्यावरून अश्राप म्हणजे निरागस, निर्वैर अशी व्यक्ती. हा अर्थ काही अंशी बरोबर आहे. किंबहुना काहींचा असापण समज असेल की अश्राप म्हणजे ‘अ-श्राप’ – शापरहित असा कोणी. पण अर्थातच या शब्दाची अ-श्राप अशी संधीही नाही आणि हा अर्थही नाही.

मूळ अरबी ‘अश्रफ्’ यावरून हा शब्द तयार झाला आहे अश्राफ / अश्राप. अरबीमधे अश्रफ म्हणजे अत्यंत अभिजात. अरबी- फारसीमध्ये ‘शरीफ्’चे अनेकवचन अश्राफ् वापरतात. म्हणजेच मूळ अरबी- फारसीतील अश्राफ/ अश्राप हे अनेकवचनी नाम मराठीत एकवचनी म्हणून वापरतात. अश्राप म्हणजे सभ्य, सविनय, अभिजात, निरुपद्रवी, स्वभावाने गरीब व्यक्ती. केवळ निरागस हा एकच अर्थ अभिप्रेत नसून कुणालाही उगाच त्रास न देणारा, शत्रुता न करणारा परंतु वृत्तीने, वागण्याने खानदानी, सभ्य, कोणाचेही वाईट न करणारा असा अर्थ अभिप्रेत आहे.

वाकबगार

‘वयाने लहान असूनही बोलण्यात किती वाकबगार होता.’

वादविवादपटूकडे जेवढे वाक्चातुर्य असायला हवे तेवढाच तो वाकबगारही असणे आवश्यक आहे. वाकबगार म्हणजे हुशार हे आपल्याला माहीतच आहे. पण वाकबगार हा शब्द कसा तयार झाला? वाक् – वाणीने हुशार म्हणून वाकबगार का? नाही; हा अर्थही नाही व या पद्धतीने हा शब्दही तयार झालेला नाही. मूळ अरबी शब्द आहे ‘वाकफ/ वाकीफ.’ म्हणजे जाणता, हुशार, तज्ज्ञ, माहीत, ठाऊक. या ‘वाकफ’चे वाकब् झाले व त्याला ‘गार’ हा उत्तरप्रत्यय लागून तयार झाला ‘वाकबगार.’ जे विशेषण म्हणून वापरले जाऊ लागले. ज्याप्रमाणे किमयागार, गुन्हेगार, माहीतगार, जादूगार त्याप्रमाणेच. वाकफ/ वाकबवरूनच वाकफीयत, वाकबगारी, तर विरुद्धार्थी- नावाकब (जाणता नसलेला) अशी विशेषणे अरबीत तयार झालीत. वाकबगार या शब्दाचा उच्चार वाकब-गार असा आहे. वाक-बगार असा नाही हे यावरून स्पष्टच होते.

शब्दबोध

article-about-word-sense

926  

कयास

अटीतटीच्या सामन्यात कोणता चमू जिंकणार याचा कयास लावणे कठीण असते किंवा एखादी व्यक्ती विशिष्ट परिस्थितीत कशी बोलेल, वागेल याचा कयास लावता येत नाही, असे म्हटले जाते. एकूणच कयास लावणे तसे आपण कायमच करत असतो. आपल्याशी संबंधित असलेल्या नसलेल्या सर्व गोष्टींचा कयास आपण लावतच असतो. आता जरा या शब्दाबाबत. मूळ अरबी ‘कियास्’वरून तयार झाला कयास किंवा कियास. तर्क, अनुमान, अंदाज, मत, निर्णय, विचार इत्यादी याचे अर्थ आहेत. इतिहासाचार्य राजवाडे यांनी ‘त्याजवरून कियास करावा की’ असा उल्लेख केला आहे. तर ऐतिहासिक लेख संग्रहात ‘कयास पुरता करून आम्हांकडे किमपि अन्तर नाही ऐसे समजोन’ असा उल्लेख आहे. म्हणजे शिवकाळात कयास/ कियास अशी दोन्ही रूपे वापरात होती. कालांतराने मात्र ‘कयास’ हाच शब्द अधिक रूढ झाला.

हलगर्जी

शासकीय कामाच्या अंमलबजावणीत हलगर्जी किंवा रुग्णालयाकडून अमुक-तमुक बाबतीत झालेली हलगर्जी ही वाक्ये आपण कायमच वृत्तपत्रांतून वाचत असतो. कोणत्याही कामात केलेला बेशिस्तपणा, निष्काळजी, बेजबाबदारी यासाठी हा शब्द वापरला जातो. मूळ फारसी शब्द ‘अहल- इ- गरझ्’ यापासून तयार झाला हलगर्जी. उच्चारसुलभतेसाठी कालौघात ‘अहल’मधला अ गळून पडला आणि उरला केवळ ‘हल’ आणि ‘गरझ्’चा झाला गर्जी. फारसीमध्ये ‘गरझ्’ म्हणजे स्वार्थीपणाने वागणारा किंवा स्वार्थासाठी निष्काळजीपणे वागणारा. म्हणजेच कुठल्याही कामात स्वत:ला कुठल्याही प्रकारचा त्रास, कष्ट पडता कामा नये असा स्वार्थी विचार करणारा तो हलगर्जी. असा विचार करून जो निष्काळजीपणे, बेजबाबदारपणे वागतो त्याला आपण हलगर्जी म्हणायला लागलो. हा शब्द हलगर्जी/ हल्गर्जी अशा दोन्ही पद्धतीने लिहितात.

शब्दबोध

article-about-vocabulary-word-2-1794553

752  

अबर-चबर 

‘दिवाळीमध्ये फराळानिमित्त हमखास इतके अबर-चबर पदार्थ खाण्यात येतात!’ किंवा ‘संध्याकाळी चहासोबत काही तरी अबर-चबर तोंडात टाकायला हवंच असतं.’ समस्त मराठी घरांमधे ‘नमकीन’ प्रकारात मोडणाऱ्या पदार्थाना अबर-चबर संबोधले जाते. हा अबर-चबर शब्द कसा तयार झाला असावा? कारण यावरूनच ‘अर्बट-चर्बट खाणे’ असा वाक्प्रयोगही रूढ झालेला आहे.

मूळ फारसी नपुंसकलिंगी शब्द आहे ‘चर्ब्’ ज्याचा अर्थ आहे रोजच्या जेवणाव्यतिरिक्त तेलकट, तळीव, खुसखुशीत पदार्थ. जरी चर्बचा उच्चार करताना ‘र’ आधी उच्चारला जात असला तरी उच्चारसुलभतेसाठी या चर्बवरून चबर तयार झाला आणि बोलभाषेत जशी सटर-फटर, अटरम-सटरम ही रूपे तयार झाली तसे अबर-चबर हे रूप तयार झाले. काही मराठी शब्दकोशात याचा अर्थ बेचव, नीरस, जाडेभरडे असाही दिला आहे. तरी ज्या उद्देशाने सध्या मराठीत हा वापरला जातो तो अर्थ मूळ फारसी अर्थाच्या अधिक जवळ जाणारा आहे.

महिरप

एखाद्या बंगलावजा इमारतीचे प्रवेशद्वार महिरपी आकाराचे असते. तर एखाद्य मंदिर/ मशिदीचे संपूर्ण स्थापत्यच महिरपी देऊन तयार केलेले असते. तर एखाद्या रांगोळीत महिरपी आकार देऊन ती रांगोळी अधिक आखीव-रेखीव केली जाते. एवढेच काय हा कमानदार महिरप शब्द गणितासारख्या विषयातदेखील ऐटीत जाऊन बसलेला आहे.

लहानपणी साध्या कंसापेक्षा महिरपी कंसातील आकडे प्रत्येकालाच विशेष प्रिय असत. तर हा महिरप शब्द मूळ अरबीतून आला आहे. मूळ स्त्रीलिंगी शब्द आहे ‘मैराप’. मैराप म्हणजे विशिष्ट पद्धतीची कमान. त्याचा पुढे तयार झाला महिराप आणि यावरून पुढे महिरप. सुप्रसिद्ध शाहीर परशराम यांच्या रचनेत त्यांनी सजावटीसंदर्भात पुढील उल्लेख केला आहे- ‘मैरापीच्या सर्जा केल्या जशी दुसरी द्वारका’

शब्दबोध

article-about-vocabulary-words-8

636  

औट घटकेचे राज्य

‘त्याच्या नशिबी औट घटकेचे राज्यच आले!’ किंवा ‘तो तर केवळ औट घटकेच्या राज्याचा राजा ठरला.’

भारतीय राजकारणाच्या इतिहासातदेखील आपल्याला औट घटकेचे राज्य मिळाल्याची काही उदाहरणे मिळतात. पण हा वाक्प्रयोग कुठून तयार झाला असावा? त्यासाठी सर्वप्रथम औट म्हणजे काय ते समजून घेऊ.

एक + अर्धा = दीड आणि दोन +अर्धा = अडीच हे आपल्याला माहीतच आहे. त्यापुढची मोजणी आपण तीन + अर्धा = साडेतीन अशी करतो. पण साडेतीन म्हणजेच औट. पूर्वी पावकी, निमकी, दीडकी, अडीचकी असे पाढे शिकवत त्यात औटकीचा पाढाही असे. एक ते शंभपर्यंत प्रत्येक संख्येची साडेतीन पट किती होते हे या औटकीमुळे सहज कळत असे. आता ‘घटकेचे’ म्हणजे काय? तर पूर्वी कालमापनासाठी तास, मिनिटे असे न मोजता घटका, पळे या प्रमाणात मोजले जात असे. बारीक छिद्र असलेले विशिष्ट आकाराचे वाडग्यासारखे भांडे म्हणजे ‘घटिका’. ही घटिका पाण्याच्या घंगाळात तरंगत ठेवत. मोठा तो घट व आणि लहान भांडे म्हणून ‘घटिका’.

तळाशी असलेल्या बारीक छिद्रातून पाणी येत येत ते भांडे भरले म्हणजे एक घटिका भरली असे समजण्यात येत असे. पुढे या घटिका शब्दाचे घटका झाले. औट घटकेचे राज्य या वाक्प्रयोगाच्या मुळाशी एक लोककथा आहे. पूर्वी शिराळशेट नावाच्या एका व्यापाऱ्याने एका मुसलमान राजासाठी चांगली कामगिरी बजावली. त्याचे पारितोषिक म्हणून त्याने मागितले की मला फक्त औट घटकेचे राज्य द्या. मात्र त्या कार्यकाळात मी जी आज्ञापत्रे काढेन ती सर्व पुढेही अबाधित राहिली पाहिजेत. हे वरदान त्याला मिळाल्यावर त्याने स्वत:चा काहीही लाभ करून घेतला नाही, परंतु त्या राजवटीत ज्या ज्या देवळांची उत्पन्ने खालसा करण्यात आली होती, ती सर्व परत चालू करण्याची आज्ञापत्रे त्याने काढली.

राजानेही ती मानली आणि पुढे चालू ठेवली. म्हणजे शिराळशेटच्या वाटय़ाला अल्पकाळ टिकणारे औट घटकेचे राज्य येऊनही त्याने स्वहितापेक्षा समाजहिताला प्राधान्य दिले, अशी त्याची कहाणी आणि म्हणून त्याची खासियतही.

बेमुर्वत

‘आजपर्यंत इतका बेमुर्वतखोर माणूस बघितला नाही.’ एखादी व्यक्ती अत्यंत निर्लज्ज असल्याचे सांगण्यासाठी हा शब्द वापरला जातो. पण या शब्दाचा केवळ हा एकच शब्द नाही. मूळ अरबी आणि फारसीमध्ये ‘मुरूवत्’ या शब्दाचा अर्थ होतो, माणुसकी. अरबी, फारसीमध्ये ‘ब’ हा पूर्वप्रत्यय त्याच्यासहीत या अर्थाने वापरला जातो. म्हणजे ‘ब-मुरूवत’ म्हणजे माणुसकी अनुसरून, माणुसकीसहित.  अगदी याचप्रमाणे जेव्हा ‘बे’ हा पूर्वप्रत्यय एखाद्या शब्दाला लागतो तेव्हा त्याच्या विरुद्ध अर्थासाठी तो वापरला जातो. अर्थातच ‘बे-मुरूवत’ म्हणजेच ‘बेमुर्वत’ या शब्दाचा अर्थ माणुसकी नसलेला, कठोर, निर्दय, कुणाचीही तमा न बाळगणारा अशा प्रकारे होतो.

इतिहासाचार्य राजवाडे यांनी नमूद केल्याप्रमाणे पुढील उदा. मिळतात -‘कौल सादर असे, सुखे किर्दीमामूर बे-मुर्वत होऊन करणे’ आणि ‘पुत्रांसी बेमुर्वत होऊन दौलतीस ज्या गोष्टी राखण्याच्या त्या करवत नाहीत.’ किंवा बखरींमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी ‘बेमुर्वत पारिपत्य करणे’ असाही उल्लेख येतो.


Top