spardha parikhsha

 सनदी अधिकारी म्हणून बिरूद मिरवणे सोपे असते


431   07-Jan-2018, Sun

काटेरी मुकूट
नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन सनदी अधिकारी म्हणून बिरूद मिरवणे सोपे असते, पण प्रत्यक्षात काम करणे हे तितकेच आव्हानात्मक असते. केंद्र आणि राज्य सरकारचे मूल्यमापन दर पाच वर्षांनी जनता करत असते. म्हणून सत्ताधारी जरी बदलत असले, तरी सनदी अधिकारी हे मोठ्या काळासाठी सरकारच्या सेवेत कार्यरत असतात. तेव्हा सतत बदलत असलेल्या सरकारच्या योजनांशी जुळवून घेऊन नागरी कल्याणासाठीची कर्तव्ये पार पाडण्यासाठी मुळातच एक सेवाभाव असावा लागतो. तो असला की, मग प्रशासन, पोलिस, महसूल कुठल्याही सेवेत अधिकारी असला, तरी त्याची उद्दिष्टे स्पष्ट असतात आणि म्हणूनच धोरणे राबवताना त्याला फारसा त्रास होत नाही.

सेवाभाव
कोणत्याही देशातील प्रशासनाचा दर्जा आणि कार्यक्षमता नागरी सेवक वर्गाच्या कौशल्यावर, सचोटीवर कार्यक्षमतेवर आणि प्रशिक्षणावर अवलंबून असते. या गोष्टींना सेवाभावाची जोड मिळाली, तर अधिकाराच्या कामाचा एक वेगळा ठसा उमटतो. सेवाभाव हा एक वैशिष्ट्यपूर्ण गुण असतो.
तो सगळ्यांच्या ठायी थोडाफार असतो. तो नसेल, तर अभ्यासाच्या काळापासून तो अंगी बाणवावा. कारण कोरड्या मनाने नागरी सेवा करणे केवळ अशक्य असते. सेवा करणे म्हणजे प्रत्येक माणसाचे अश्रू पुसणे नव्हे, तर आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या लोकांच्या विविध समस्या सरकारी नियमावलीचा योग्य उपयोग करून सोडवणे होय.


सेवाभाव हाच धर्म
भारतात विविध सेवांमध्ये आज हजारो अधिकारी कार्यरत आहे. काही अधिकारी कार्यक्षमतेच्या नावाखाली फक्त लोकांना निलंबित करणे, धडाकेबाज कारवाई करून लक्ष वेधून घेणे, मग दहा वर्षांत आठ बदल्या अशी बिरूदे लावण्यात धन्यता मानतात. पण असे केल्याने मनात काम करण्याची इच्छा असूनही पद्धत चुकीच्या असल्याकारणाने ती पूर्ण होत नाही. खरा सेवाभाव असलेले अधिकारी आपल्या कामातून जास्त बोलतात. पुण्याजवळ काही वर्षांपूर्वी माळीण गाव उद्ध्वस्त झाल्यावर पुनर्वसनाच्या कामासाठी तेथील जिल्हाधिकारी सतत तिथे हजर होते. हे काम करताना इतर कामांवर त्याचा परिणाम होऊ नये, म्हणून पुण्याहून फायलींचा गठ्ठा घेऊन ते जात असत, इतर सूचना ते फोनवरून देत असत. अकोल्याचे सध्याचे जिल्हाधिकारी आपल्या वैविध्यपूर्ण उपक्रमामुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांचा ड्रायव्हर निवृत्त झाल्यावर ते स्वतः कार चालवत त्यांना कार्यालयापर्यंत घेऊन गेले. अशा प्रकारे आपल्या हाताखालच्या लोकांप्रती कृतज्ञताभाव दाखवून त्यांनी एक वेगळे उदाहरण
जनतेसमोर आणि सरकारसमोरदेखील प्रस्थापित केले. अशा अधिकाऱ्यांना ना सरकार बदलल्याची चिंता असते, ना बदलीची. जेथे जाणार तेथे आपल्या कामातून ते ठसा उमटवत असतात. म्हणूनच सरकारलादेखील ते महत्त्वाच्या कामांसाठी हवे असतात. काही सनदी अधिकाऱ्यांनी तर निवृत्तीनंतरदेखील हा सेवाभाव कायम ठेवला. शरद जोशी हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.

अनामिकत्वाचे तत्व (principle of anonymity)
समाजमाध्यमांच्या प्रभावामुळे सध्याच्या काळात शिंक जरी आली, तरी साऱ्या जगाला ओरडून सांगतात. पण हे अधिकारी महत्तम कार्य करूनदेखील फारसे प्रसिद्धीझोतात नसतात. त्यांनी केलेला विकास, सेवा या सगळ्या गोष्टी त्यांच्या कार्यक्षेत्रात झालेल्या विकासातून दिसून येतात. तेव्हा असे अधिकारी होणे हे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे ध्येय आणि असे अधिकारी जपून ठेवणे हे सरकारचे कर्तव्य आहे. कारण आदेश देणारा फक्त नोकरशहा, पण सेवाभाव जपणारा हा खरा अधिकारी असतो.