freedom of news papers

वृत्तपत्रांचे स्वांतत्र


1137   06-May-2018, Sun

वृत्तपत्रस्वातंत्र्याच्या क्रमवारीतील आपल्या देशाचा क्रमांक घसरला अशा ‘नकारात्मक’ वास्तवाकडे लक्ष न दिलेलेच बरे..

गेल्या गुरुवारी जगभरात वृत्तपत्रस्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्रांपासून विविध राष्ट्रप्रमुखांपर्यंत अनेकांनी हे स्वातंत्र्य झिंदाबाद राहो अशी मनोकामना व्यक्त केली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश होता. स्वतंत्र माध्यमांमुळेच लोकशाही भक्कम होते असे ते म्हणाले. ते नेहमीप्रमाणे खरेच बोलले. वृत्तपत्रस्वातंत्र्याच्या जागतिक क्रमवारीत आपल्या देशाचा क्रमांक या वर्षी दोन अंकांनी घसरला. तो १३८व्या स्थानी आला म्हणून काय झाले? पाकिस्तान तर आपल्याखालीच आहे. एका क्रमांकाने. आणि बांगलादेश? तो १४६व्या क्रमांकावर आहे. तेव्हा आपण घसरलो म्हणून एवढे बिचकून जाण्याचे कारण नाही.

पंतप्रधानांनी वृत्तपत्रस्वातंत्र्याची आवश्यकता व्यक्त करतानाच त्याचे रक्षण करण्यासाठी समाजमाध्यमांतील असंख्य व्यक्तींच्या भरीव योगदानाची भरभरून दखल घेतली. मोठीच गोष्ट ही. तिचेही स्वागत केले पाहिजे. अर्थात वृत्तपत्रस्वातंत्र्याबाबत बांधिलकी व्यक्त करणाऱ्यांत केवळ त्यांचाच समावेश होता असे नव्हे. पृथ्वीगोलावरील असे एकही राष्ट्र नाही, की ज्याच्या प्रमुखांचे याबाबत दुमत आहे.

तेव्हा त्यांच्या संदेशांवर सर्वानीच संतोष व्यक्त केला पाहिजे. अशा प्रकारे समाधानी राहणे ही एक साधना आहे. ती ज्यांना साधते ते नेहमीच आनंदी राहू शकतात. तो आनंद महत्त्वाचा. मात्र त्याकरिता काही गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागते, काही बाबी विसराव्या लागतात. उदाहरणार्थ वृत्तपत्रस्वातंत्र्य दिनाच्या तीनच दिवस आधी काबूलमध्ये झालेला बॉम्बहल्ला.

अफगाणिस्तानसारख्या देशातील बॉम्बहल्ले, हत्या, तेथील धर्मप्रधान व्यवस्थेकडून नागरिकांवर घालण्यात आलेली बंधने, त्यांचे पालन न केल्यास देव, देश अन् धर्मासाठी लढत असलेल्या वीरांकडून केले जाणारे अत्याचार या गोष्टींकडे आपण एरवीही दुर्लक्षच करतो. एकदा देशात तालिबानसारख्या धर्मनिष्ठांची चलती असल्यानंतर अशा गोष्टी या स्वाभाविकच असतात.

तेव्हा गेल्या सोमवारी तेथे झालेल्या बॉम्बहल्ल्याची फारशी दखल घेण्याची गरज नाही. आयसिस आणि तालिबान या दोन दहशतवादी संघटनांनी त्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या संघटनांचे वैशिष्टय़ हे की त्यांना विरोध करणाऱ्या अनेकांची महत्त्वाकांक्षा मात्र त्यांच्यासारखेच बनणे ही असते. तर अशा या संघटनांनी काबूलमध्ये ते दोन स्फोट घडवून आणले.

पहिला स्फोट होताच त्याचे वार्ताकन करण्यासाठी तेथे तातडीने पत्रकार आणि वृत्तछायाचित्रकार धावले. त्यांच्या घोळक्यात, बहुधा छायाचित्रकाराच्या वेशात एक मानवी बॉम्ब घुसला. पुरेसे पत्रकार जमा झाल्याचे पाहून त्याने स्वत:स उडवून दिले. नऊ  पत्रकार मारले गेले त्यात. त्याच दिवशी काबूलमध्ये अन्यत्र बीबीसीच्या एका पत्रकाराला गोळ्या घालून ठार मारण्यात आले.

एका दिवशी एका शहरात दहा पत्रकारांची हत्या करण्यात आली. ही घटना आपल्याला विसरावीच लागेल. भारतात यंदा आतापर्यंत तीन पत्रकारांना ठार मारण्यात आले. गतवर्षी ही संख्या ११ होती. हे सारे आपण जसे कानाआड केले, तसेच याकडेही काणाडोळा करावा लागेल. अन्यथा त्यातून काही भलतेच प्रश्न निर्माण होतील. उदाहरणार्थ पत्रकारांना का मारण्यात येते? वृत्तपत्रस्वातंत्र्य नको असते का त्या मारेकऱ्यांना?

तर ते तसे नाही. वृत्तपत्रस्वातंत्र्याला आपला, आपल्या नेत्यांचा, त्यांच्या संघटनांचा.. सर्वाचाच बिनशर्त पाठिंबा असतो. पण अट एकच असते, की वृत्तपत्रांनी या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेता कामा नये. त्यांनी नि:पक्षपाती आणि सकारात्मक असले पाहिजे. समाजाच्या हिताचे तेवढे सांगितले पाहिजे. योग्यच आहे ते. आपल्या मराठी पत्रकारितेपुरते बोलायचे झाल्यास, तत्कालीन सत्तेविरोधात ठाम उभे राहण्याची देदीप्यमान परंपरा आहे तिला. परंतु आजची पत्रे अगदीच परंपराहीन झाली आहेत. त्यातील काही पत्रे तशी रुळावर आणण्यात आली आहेत.

परंतु काहींनी अगदीच ताळतंत्र सोडलेले दिसते. लोकांचा पक्ष घेतानाच नि:पक्षपातीपणा जपणे हे त्यांना जमतच नाही. परिणामी ही पत्रे थेट व्यवस्थेच्या विरोधात उभी राहतात. त्या-त्या वेळी सत्तेवर जो असेल, त्याला प्रश्न विचारतात. वस्तुत: जेव्हा ‘आपले’ सरकार सत्तेवर असते, तेव्हा त्याला प्रश्न विचारायचे नसतात. प्रश्न विचारले तर त्याला नकारात्मकता म्हणतात.

वृत्तपत्रांनी सतत सकारात्मकतेची लालीपावडर लावून सजले पाहिजे. सत्तेला आरसा दाखविणे याला काही सकारात्मकता म्हणत नाहीत. त्याला बकवास बातम्या पेरणे म्हणतात आणि ते पेरणाऱ्यांना वृत्तवारांगना. फार त्रास होतो लोकशाहीला याचा. फार काय, हिटलरलासुद्धा या बकवास बातम्यांचा त्रास सहन करावा लागला होता.

आपल्या सरकारविरोधात नकारात्मक बातम्या देणाऱ्या पत्रांना त्याने छान नाव ठेवले होते – ‘ल्युगनप्रेस’. म्हणजे खोटे बोलणारी माध्यमे. ती सरकार वा व्यवस्था जे सांगत असते, त्याविषयी सातत्याने सवाल निर्माण करण्याचे काम करतात. परिणामी लोकमानसात नाना शंका-कुशंका निर्माण होतात. ज्या देशात सत्ताधीश आणि राष्ट्र यांतील द्वंद्व संपलेले असते, तेथे तर अशाने बिकटच परिस्थिती निर्माण होते. हे टाळायचे असेल, तर बकवास बातम्या आणि वृत्तवारांगना यांना संपवावेच लागते.

किमान त्यांना लेखनलकवा येईल अशी परिस्थिती निर्माण करावी लागते. त्यासाठी त्यांच्या अंगावर जल्पक अर्थात ट्रोल्सनामक शब्दमारेकरी सोडावे लागतात. असे केले, की ही पत्रे लगेच वृत्तपत्रस्वातंत्र्यावर घाला असा बकवा करू लागतात. परंतु वृत्तपत्रस्वातंत्र्याच्या रक्षणासाठी त्याकडे आपण लक्ष न दिलेलेच बरे. लक्ष दिले तर भलतेच प्रश्न पडू शकतात, की नकारात्मक खोटय़ा बातम्या म्हणजे काय?

त्याची साधी कसोटी आहे. आपला प्रिय विचार, नेता, पक्ष, संघटना, धर्म, जात, पंथ यांच्या विरोधात जे जे वृत्त प्रसिद्ध होते ते ते सारे ‘फेक’. नाण्याला असलेली दुसरी बाजू ‘फेक’. सरकारी सत्याच्या विरोधात जाते ते सारे ‘फेक’. एकदा का बकवास बातमी म्हणजे काय हे अशा रीतीने सुस्पष्ट झाले की मग वृत्तपत्रस्वातंत्र्याचा प्रश्नच कुठे उरतो? अशी ‘बनावट वृत्ते’ देणारी माध्यमे स्वातंत्र्याची हक्कदार असूच शकत नाहीत.

शासकीय वरवंटा, जल्पकांची शिवीगाळ, त्यानेही भागले नाही तर बंदुकीची गोळी हेच त्यांचे भागधेय उरते. काबूलमध्ये आयसिसच्या धर्मनिष्ठांनी आणि राष्ट्रवीरांनी तेच केले. त्यांनी पत्रकारांना संपविले. विरोधी विचार संपवून, आपल्या सत्याची प्रतिष्ठापना करण्याचा हाच उत्तम मार्ग. तो त्यांनी चोखाळला. तो सर्वत्र चोखाळला जातो. परंतु आपण त्याचा विचारही न करणे हेच उत्तम. विचार केल्यास प्रश्न पडू लागतील, की अशाने लोकांपर्यंत खरी माहिती कशी पोचेल?

पण लोकांनी माहितीची उठाठेव करावीच कशाला? त्यांनी सरकारी व्यवस्थेवर विश्वासच ठेवायचा असतो. ‘वृत्तपत्रस्वातंत्र्याचे रक्षण करणारे’ समाजमाध्यमवीर त्यासाठीच नेमलेले असतातच. शिवाय सरकारी-नि:पक्षपाती माध्यमे असतातच. ती सकारात्मक बातम्या देतात. बकवास बातम्या छापणाऱ्यांविरुद्ध तुटून पडतात. सरकारच्या मांडीवर बसून असा स्वतंत्र बाणा जपणे हे काही सोपे नसते. सतीचे वाणच ते. तथ्यांचा, विवेकाचा, सभ्यतेचा, पत्रकारितेचा बळी देऊनच ही स्वातंत्र्यदेवता प्रसन्न करवून घेतलेली असते त्यांनी. एकदा ती प्रसन्न झाली, की मग मात्र प्रसाद-पंचामृताला तोटा नसतो. त्यात सामान्य नागरिकांचाही फायदाच असतो. त्यांना ‘आवश्यक’ आणि ‘बिन-फेक’ तेवढीच माहिती छान गाळून, चमकदार कागदात गुंडाळून मिळते. त्यांनी ती पचवावी आणि सकारात्मक ढेकर द्यावा.

आज जगभरात अशीच ‘स्वतंत्र माध्यमे’ भलतीच वाढत आहेत. अशा वेळी वृत्तपत्रस्वातंत्र्याच्या क्रमवारीतील आपल्या देशाचा क्रमांक घसरला, पत्रकारांचे खून पडले, काबूलसारख्या ठिकाणी स्फोटात पत्रकार मारले गेले.. या ‘नकारात्मक’ बातम्यांना खरोखरच काही अर्थ राहात नाही. सकारात्मक ढेकर देण्यात उलट त्याचा अडथळाच.

ajit wadekar

वाडेकरांचा वारसा


86   18-Aug-2018, Sat

स्थितप्रज्ञ धीरोदात्तपणा अंगी बाणवलेले वाडेकर अभिनिवेशविरहित, तरीही परिणामकारक ठरले.. ही सुसंस्कृततेची मूल्ये त्यांचा आत्मविश्वास वाढविणारी ठरली..

इंग्लंडच्या दौऱ्यावर कसोटी मालिका खेळण्यासाठी गेलेल्या भारतीय संघासाठी सध्या पळता भुई थोडी झालेली आहे. मुळात अजूनही इंग्लंडमध्ये भारतीय क्रिकेट संघाला फारशा कसोटी मालिका जिंकता येत नाहीत. अशा चाचपडलेल्या स्थितीत आपला संघ असताना, इंग्लिश भूमीवर भारताला पहिली कसोटी मालिका जिंकून देणारे कर्णधार अजित वाडेकर यांचे जाणे मन अधिकच खंतावणारे ठरते. वाडेकर यांचे जाणे हा इतरही अर्थानी युगान्त ठरतो. क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे, हे विधान हास्यास्पदच ठरविणारी सध्याची स्थिती.

‘स्वॅगर’च्या नावाखाली भावनांचे उघडेवागडे प्रदर्शन मांडणे हे फॅशन स्टेटमेंट वगैरे बनले आहे. पण वाडेकर यांनी मात्र अंगभूत सभ्यता, शालीनता क्रिकेटमध्येही रुजवली. त्यांचे व्यक्तिमत्त्व क्रिकेटच्या मैदानावर आणि मैदानाबाहेर; क्रिकेटपटू, कर्णधार, व्यवस्थापक, निवड समिती अध्यक्ष अशा विविध रूपांमध्ये वावरत असताना आणि अगदी अखेपर्यंत तसेच राहिले. त्यांनी क्रिकेटला सामावून घेतले. अनेक जबाबदाऱ्या यथार्थ पार पाडल्या. पण क्रिकेटमुळे ते झाकोळले गेले नाहीत. क्रिकेट हेच सुख-दुख होऊन बसते आणि क्रिकेटला सोडू शकत नाहीत असे अनेक लहान-महान क्रिकेटपटू आपल्या आजूबाजूला वावरत असताना, वाडेकर यांनी मात्र एक सन्मान्य अलिप्तपणा जपला.

यशाची चव चाखल्यानंतर असा अलिप्तपणा सोपा नसतो. १९६०च्या दशकात अजित वाडेकर एक क्रिकेटपटू आणि नंतर कर्णधार म्हणून उदयाला आले. १९६७च्या न्यूझीलंड दौऱ्यात मन्सूर अली खान पतौडी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशी पहिला विजय मिळवला, त्या वेळी त्या सामन्यात वाडेकरांनी शतक झळकावले. ते त्यांचे एकमेव शतक. म्हणजे परदेशी भूमीवरील पहिल्या विजयामध्ये वाडेकर यांचेही योगदान होतेच. पण ती त्यांची सर्वपरिचित ओळख नाही. ते घराघरांमध्ये पोहोचले ते भारतीय संघाने त्यांच्या नेतृत्वाखाली प्रथम वेस्ट इंडिजला वेस्ट इंडिजमध्ये आणि नंतर इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरवल्यानंतर. हे दोन्ही संघ त्या वेळी बलाढय़ होते आणि मायदेशी खेळत होते. त्यांच्या तुलनेत भारतीय खेळाडू हौशे-नवशेच गणले जात. बरेचसे सधन कुटुंबांची पाश्र्वभूमी असलेले देखणे क्रिकेटपटू, सामन्यातले काही तास (पण पूर्ण सामना नव्हे) मनोरंजन करीत आणि खुल्या दिलाने पराभवाला सामोरे जात, अशी भारतीय क्रिकेटपटूंची गोंडस प्रतिमा होती. तिला तडे देण्याची जबाबदारी भारतीय क्रिकेटपटूंची होती आणि पतौडीच्या संघाने ते थोडय़ाफार प्रमाणात करूनही दाखवले होते. पण न्यूझीलंडचा संघ म्हणजे इंग्लंड-वेस्ट इंडीज-ऑस्ट्रेलियाचा संघ नव्हता. त्यामुळे वाडेकरांच्या भारतीय संघाने इंग्लंड आणि वेस्ट इंडिज जिंकल्यानंतरच भारतीय क्रिकेटला जगात गांभीर्याने घेतले जाऊ लागले.

वाडेकर यांची भारतीय संघाचे कर्णधार म्हणून ज्या वेळी तत्कालीन निवड समितीप्रमुख विजय र्मचट यांनी निवड केली, तेव्हा ते उत्तम फलंदाज होते. पण सर्वोत्कृष्ट नव्हते. मुंबईचे नेतृत्व उत्तम प्रकारे करायचे. मात्र त्यांच्याहीपेक्षा अधिक चांगले नेतृत्वगुण दाखवलेले कर्णधार (उदा. पतौडी) भारतीय क्रिकेटमध्ये खेळतच होते. शिवाय खुद्द र्मचट यांच्याच मते (याविषयी त्यांनी नंतर सांगितले) वाडेकर धावा जमवण्याच्या बाबतीत पुरेसे महत्त्वाकांक्षी नव्हते. र्मचट यांना भावला वाडेकर यांचा स्थितप्रज्ञ धीरोदात्तपणा. वाडेकर यांनी मैदानावर कधीच भावनांचे प्रदर्शन केले नाही.

यशापयशाला ते सारख्याच स्थितप्रज्ञपणे सामोरे जायचे. कोणत्याही परिस्थितीत विचलित व्हायचे नाहीत. पतौडी यांच्याभोवती वलय होते. त्या वेळच्या भारतीय संघातील बहुतेक खेळाडूंवर त्यांचा पगडा होता. पतौडी यांनी न्यूझीलंड दौऱ्यात विजय मिळवून दिल्यानंतर त्यांच्या महत्त्वाकांक्षेला नवाबी वर्चस्ववादाची जोड मिळाली होती. त्यामुळे वाडेकर यांच्याविषयी त्यांचे मत फारसे चांगले नव्हते. वाडेकर यांनी सुसंस्कृतपणा दाखवत पतौडी यांच्याशी तरीही दोस्ती जमवण्याचा प्रयत्न केला, तो यशस्वी होऊ शकला नाही. पण त्यामुळे निष्कारण उदास न होता वाडेकर यांनी वेस्ट इंडीज आणि इंग्लंड या दौऱ्यांवर लक्ष केंद्रित केले. भारतीय संघात त्या वेळी मोठय़ा प्रमाणावर गटबाजी होती. अनेक चांगले खेळाडू होते. तरी एक संघ म्हणून कुणीही एकत्रपणे चांगले खेळून दाखवत नव्हते. वाडेकर यांनी पतौडींचे खास मित्र एम. एल. जयसिंहा यांना उपकर्णधार बनवले. दिलीप सरदेसाई यांना र्मचट यांचा विरोध डावलून आग्रहाने दोन्ही दौऱ्यांवर नेले. सुनील गावस्करांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. वाडेकर यांच्या नावावर नशीबवान कर्णधार असा शिक्का मारला जातो. मात्र त्यांनी केलेली संघनिवड कल्पक आणि वेगळी होती. वैयक्तिक गुणवत्तेपेक्षा त्यांची पसंती उपयुक्ततेला होती. यातूनच त्यांनी इरापल्ली प्रसन्ना यांच्याऐवजी त्यांनी भागवत चंद्रशेखर यांच्यावर अधिक विश्वास दाखवला. इंग्लंडमधील ओव्हल कसोटीतील निर्णायक विजयात चंद्रशेखर यांचे मोलाचे योगदान राहिले. सलीम दुर्राणी, अब्बास अली बेग, फारुख इंजिनीयर यांना त्यांनी वेगवेगळ्या सामन्यांमध्ये संधी दिली आणि त्यांचे बहुतेक निर्णय यशस्वी ठरले. ‘नशीबवान कर्णधारा’ची ही लक्षणे नव्हेत! एकदा इंग्लंड दौऱ्यात एका सामन्याच्या आधी भारतीय संघाला एका अत्यंत सुमार हॉटेलात उतरवण्यात आले. त्याविरुद्ध वाडेकर आणि तत्कालीन व्यवस्थापक हेमू अधिकारी यांनी आवाज उठवला आणि अधिक चांगल्या हॉटेलात भारतीय संघाची रवानगी झाली! फार थोडय़ा भारतीय कर्णधारांनी अशा प्रकारचा खमकेपणा त्यापूर्वी दाखवला होता.

एक फलंदाज म्हणून वाडेकर डावखुरे होते आणि शैलीदार, आक्रमक खेळायचे. त्यांची आकडेवारी चांगली असली, तरी असामान्य नाही. कसोटीमध्ये एकापेक्षा अधिक शतके झळकवण्याची त्यांची योग्यता होती. कर्णधारपदाची जबाबदारी घेतल्यानंतर त्यांचा धावांचा ओघ आटला असे सांगितले जाते. पण सभ्य, सुसंस्कृत, शालीन असले, तरी वाडेकर एक चिवट, कणखर फलंदाज होते. वेस्ली हॉल, जॉन स्नो, चार्ली ग्रिफिथ यांच्यासमोर उभे राहून, अनेकदा उसळत्या चेंडूचा मारा सहन करत त्यांनी प्रतिहल्ले चढवलेले आहेत.

पण वाडेकरांचे विश्लेषण क्रिकेटच्या पलीकडे जाऊन करावे लागेल. वाडेकर हे मध्यमवर्गीय, सुसंस्कृत मराठी ‘आयकॉन’ होते. शाळेत कधी क्रिकेट खेळले नाहीत. कारण चांगले शिकून कारकीर्द बनवण्याच्या मानसिकतेचा पगडा त्यांच्या घरावरही होता. एका परीक्षेत चांगले गुण मिळाल्याबद्दल बक्षीस म्हणून वाडेकरांच्या हातात पहिल्यांदा बॅट दिली गेली. क्रिकेटपटू म्हणून कारकीर्द घडण्यास सुरुवात झाल्यानंतरही बँकिंगसारखी सुरक्षित नोकरी त्यांनी पत्करली. मूल्यांवर विश्वास होता, त्यातून आत्मविश्वासाला बळ मिळाले. त्यामुळेच पूर्वीचे अनेक बडे बडे कर्णधार करू शकले नाहीत, अशी कामगिरी त्यांनी करून दाखवली. महत्त्वाकांक्षेच्या राक्षसाने कधी त्यांच्यावर गारूड केले नाही. याच मूल्याधिष्ठित आणि अभिमानी मानसिकतेतून सुनील गावस्कर उदयाला आले. सचिन तेंडुलकर जन्माला आला. मुंबई क्रिकेटला ‘खडूस’ म्हणून हिणवणाऱ्यांना हे गुण कळलेच नाहीत. प्राप्त परिस्थितीत हे गुण यशस्वितेची शाश्वती देऊ शकत नाहीत, असे कॉर्पोरेटीकरणाची झिंग चढलेले विद्वान छातीठोकपणे सांगतात.

वाडेकर यांनी कधी त्यांचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला नाही. सुनील गावस्कर आघाडीवीर म्हणून फलंदाजीस जाताना ‘सी यू स्किपर’ या शब्दांत वाडेकरांचा निरोप घेत. ‘नॉट फॉर अ लाँग टाइम’ असे त्यावर वाडेकर बजावत. आपल्या हाताखालील खेळाडूंनी काय करावे, याचा हा खास वाडेकरी शैलीतला सल्ला. नेमका आणि अभिनिवेशविरहित, तरीही परिणामकारक! नेमके हेच गुण गाण्यात असलेल्या हिराबाई बडोदेकरांनी जसा महाराष्ट्रीय मध्यमवर्गीय महिलेला रंगमंच मिळवून दिला, तसे वाडेकरांनी सुशिक्षित मध्यमवर्गीय मराठी तरुणांना अव्वल क्रिकेटचे मैदान मिळवून दिले. वाडेकरांचा हा वारसा नाकारता येणारा नाही.

chemmanam chako

चेम्मनम चाको


9   18-Aug-2018, Sat

समाजाकडे तटस्थ दृष्टिकोनातून बघून आरसा दाखवण्याचे काम कलाकार, साहित्यिक नेहमीच करीत असतात, पण ते समजून घेण्याची सहनशक्ती समाजाकडे असणेही आवश्यक असते, जी अलीकडच्या काळात कमी होत चालली आहे. केरळमधील कवी चेम्मनम चाको यांनी त्यांच्या कवितांतून अशाच पद्धतीने तेथील समाजातील अनिष्ट रूढी, परंपरांवर टीका केली होती. त्यांच्या निधनाने एक सर्जनशील मार्गदर्शक गमावला आहे.

७ मार्च १९२६ रोजी कोट्टायम जिल्ह्य़ात मुलाकुलम या वैकोमजवळच्या गावात शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. पमबाकुडा सरकारी शाळा, पिरावोम माध्यमिक शाळा, अलुवा यू. सी. स्कूल, तिरुअनंतपूरम युनिव्हर्सिटी कॉलेज येथे त्यांचे शिक्षण झाले. शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांच्या घरात कुणीच लेखनाकडे वळलेले नव्हते, अशा परिस्थितीत ते लेखणी हाती घेऊन सरस्वतीचे उपासक बनले. सात भावंडांपैकी ते सहावे.

घरातल्या लोकांना तर त्यांनी शेतात काम करावे असे वाटत होते, पण त्यांनी पुस्तकांची वाट धरली. शेतातले काम टाळण्यासाठी ते पुस्तके वाचण्याचा बहाणा करीत असत. लहानपणापासून त्यांचे प्रचंड वाचन होते. पिरावोम येथील शाळेत जाताना त्यांना भाताच्या शेतातून वाट काढत जावे लागे. त्या वेळी स्वातंत्र्यलढा सुरू होताच त्यात त्यांनी उडी घेतली नसती तरच नवल!

स्वातंत्र्याच्या प्रेरणेतूनच त्यांनी ‘प्रवचनम’ ही पहिली कविता लिहिली. त्यानंतर त्यांचा ‘विलाम्बरम’ हा काव्यसंग्रह १९४७ मध्ये प्रसिद्ध झाला. शाळा व कॉलेजात त्यांनी मल्याळम भाषा शिकवण्याचे काम केले. केरळ विद्यापीठाचा शब्दकोश विभाग व प्रकाशन विभागात त्यांनी नोकरी केली. १९८६ मध्ये ते निवृत्त झाले. केरळ साहित्यात कवितेतून विनोद व टीकात्मकता या दोन्ही गोष्टी साध्य करणाऱ्या कुंजन नंबियार यांच्याही ते एक पाऊल पुढे होते. विशेष म्हणजे त्यांनी मुलांसाठीही कथा-कविता लिहिल्या होत्या. ‘नेल्लू’ या काव्याने त्यांचे नाव झाले. तो काळ होता १९६७ मधला. त्या वेळी राज्यात दुष्काळ पडलेला असताना लोक रबरासारखी नगदी पिके घेत होते. त्यामुळे लोकांना पुढे गहू व इतर धान्यांसाठी रेशन दुकानांवर अवलंबून राहण्याची वेळ आली, तो या कवितेचा विषय बनला. त्यांच्या त्या काव्याला अशी सामाजिक पाश्र्वभूमी होती. त्यांच्या कवितांची भाषांतरे इंग्रजीत करण्यात आली. ती भारतीय कवितांच्या ऑक्सफर्ड संग्रहात समाविष्ट आहेत. केरळ साहित्य अकादमी व केरळ चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे ते सदस्य होते. १९७७ मध्ये त्यांच्या राजपथ काव्यसंग्रहास केरळ साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला, तर २००६ मध्ये त्यांना केरळ साहित्य परिषदेने जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले होते.

कुंजन नंबियार पुरस्कार, महाकवी उल्लूर पुरस्कार, कुरुप्पन पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले. लेखनातून केरळच्या समाजजीवनावर परखड भाष्य त्यांनी केले, जीवनाच्या जवळपास प्रत्येक क्षेत्रास स्पर्श करणारे असेच त्यांचे लेखन होते. त्यांच्या निधनाने एक संवेदनशील कवी व सामाजिक घडामोडींचा सर्जनशील भाष्यकार आपण गमावला आहे.

Thomas abraham

थॉमस अब्राहम


253   16-Aug-2018, Thu

सनदी अधिकाऱ्यांबद्दल, राजनैतिक अधिकाऱ्यांबद्दल सामान्यांचे काही अपेक्षावजा समज असतात. ‘आयएएस’ या सेवेतील माणसाने प्रधान सचिवपदी जाणे, ही कारकीर्दीची परमावधी समजली जाते किंवा ‘इंडियन फॉरेन सव्‍‌र्हिस’- आयएफएस- मधील व्यक्तीने अमेरिकेत किंवा संयुक्त राष्ट्रांत काम करणे, हे कारकीर्दीची शान मानले जाते. प्रत्यक्षात या साऱ्या सनदी सेवा स्वत:च्या कारकीर्दीसाठी नसून देशसेवेसाठी असतात. त्यामुळेच ‘आयएएस’मधले एखादे महापालिका आयुक्तही लक्षात राहील असा बदल घडवून लोकांचा दुवा घेतात, आठवणीत राहतात.

ऐन नेहरूकाळात, देश स्वतंत्र्य झाला त्यास उणीपुरी तीन-चार वर्षेच झाली असताना ‘आयएफएस’मध्ये जाऊन राजनैतिक अधिकारी झालेले थॉमस अब्राहम हे श्रीलंकेतील कामासाठी- भारत आणि भारतीय वंशाच्या लोकांचे जे हितरक्षण त्यांनी केले त्यासाठी- नेहमी स्मरणात राहतील. राजदूत (श्रीलंका हा राष्ट्रकुल देश, म्हणून तेथील भारतीय ‘उच्चायुक्त’) पदावरून निवृत्त झालेल्या थॉमस अब्राहम यांचे रविवारी, वयाच्या ९१ व्या वर्षी केरळमधील कडापरा या त्यांच्या मूळ गावी निधन झाले.

‘जगण्यासाठी, पोटासाठी भारतातून १०० वर्षांपूर्वी श्रीलंकेत आलेल्या तमिळींना एवढय़ा-तेवढय़ा कारणावरून बेकायदा रहिवासी ठरवले जाते. हे प्रकार नेहरू असताना घडत नव्हते.

शास्त्रीजींनी १९६४ साली सिरिमाओ भंडारनायकेंशी केलेल्या परतपाठवणी कराराचा गैरफायदा श्रीलंका घेते आहे. असे होऊ नये, तमिळींना श्रीलंकेतच- त्यांच्या कर्मभूमीत- राहता यावे, यासाठी या कराराचा गाभा समजून घेण्याची गरज आहे’ असे म्हणणे अब्राहम यांनी १९७८ ते ८२ या काळात प्रथम मोरारजी आणि नंतर इंदिरा गांधींपुढे मांडले, तमिळींची परतपाठवणी ‘नैसर्गिक’ होत नसून त्यामागे वांशिक दुस्वास हेही कारण असू शकते हेही ओळखले आणि १९६४च्या कराराचा योग्य अर्थ तत्कालीन श्रीलंकन सत्ताधाऱ्यांना मान्य करावयास लावला. पुढे तमिळ-प्रश्न पेटला, ही निराळी गोष्ट. पण हिंसाचाराआधीच तमिळींना ‘बाहेरचे’ आणि ‘घुसखोर’ ठरवून, सुरक्षेची मोघम कारणे देऊन जो अन्याय होत होता, त्याचे निराकरण अब्राहम यांच्या कार्यनिष्ठेमुळे झाले.

बर्न (स्वित्र्झलड) येथे तसेच पूर्व युरोपातही काही काळ काम केलेल्या अब्राहम यांना, दक्षिण आणि आग्नेय आशियातच खरा रस होता. त्या देशांच्या इतिहासात त्यांना, त्यांच्या इतिहासकार पत्नी मीरा यांच्याप्रमाणेच, रस होता. भेटलेल्या व्यक्तींवर त्यांची सहज छाप पडे, म्हणूनच सिंगापूरचे ली क्वान यू किंवा पी. एन. हक्सर यांच्या आत्मचरित्रांतही थॉमस अब्राहम यांचे उल्लेख आढळतात.

 

seema nanda

सीमा नंदा


80   15-Aug-2018, Wed

जगातील जुनी लोकशाही असलेल्या देशांपैकी एक असलेल्या अमेरिकेत सध्या ट्रम्प प्रशासनाची सत्ता आहे, पण अध्यक्षपदाचे एक वर्ष उलटून गेल्यानंतर ट्रम्प यांची लहरी वक्तव्ये व तशीच धोरणे यांचा फायदा घेण्याची पुरेपूर संधी आज सत्तेबाहेर असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाला आहे. या अतिशय मोक्याच्या वेळी डेमोक्रॅटिक पक्षाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक सीमा नंदा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय समितीचे उपाध्यक्षपदही त्यांनी यापूर्वी सांभाळले आहे. डेमोक्रॅ टिक पक्षाच्या अत्यंत बुद्धिमान पदाधिकाऱ्यांपैकी त्या एक आहेत. आता डेमोक्रॅटिक पक्षांच्या दैनंदिन कारभाराचे सूत्रसंचालन त्या करणार आहेत.

डेमोक्रॅटिक पक्ष व रिपब्लिकन पक्ष यांच्या विचारसरणीत मुळात फरक आहे. त्यातूनच दोन्ही राजवटीतील फरक आपण अनुभवतो आहोत. या काळात मूल्याधिष्ठित राजकारण करण्याची हमी नंदा यांनी दिली आहे. विविध पाश्र्वभूमीच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची समावेशक भूमिका त्यांनी मांडली आहे. नंदा यांचे बालपण कनेक्टिकट येथे गेले. त्यांचे आईवडील दंतरोगतज्ज्ञ आहेत. बोस्टन लॉ स्कूल व ब्राऊन विद्यापीठात त्यांचे शिक्षण झाले. यापूर्वीही त्यांनी ‘लीडरशिप कॉन्फरन्स ऑन सिव्हिल अ‍ॅण्ड ह्य़ूमन राइट्स’ या संस्थेच्या कार्यकारी उपाध्यक्ष व मुख्य संचालन अधिकारी म्हणून काम केले आहे.

नागरी हक्क वकील म्हणून ‘अनफेअर एम्प्लॉयमेंट प्रॅक्टिसेस’ विभागात त्यांनी काम केले आहे. राष्ट्रीय कामगार संबंध मंडळातही वकील म्हणून काम करण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. आता डेमोक्रॅटिक पक्षाचे आधीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेस ओकॉनेल यांची जागा त्या घेत आहेत. मॅसॅच्युसेट्स बार असोसिएशन या प्रतिष्ठेच्या संस्थेत त्या सदस्य असून अनेक ना नफा संस्थांच्या संचालक मंडळावर त्यांनी काम केले.

‘आम्ही अमेरिकेचा हरवलेला आत्मा परत मिळवण्यासाठी लढत आहोत, लोकशाही व संधी याचा पुनशरेध घेण्याची आमची तयारी आहे,’ असे त्या सांगतात. त्यासाठी डेमोक्रॅटिक पक्ष पुन्हा सत्तेवर येणे हाच एक उपाय आहे व त्यासाठीच हे पद स्वीकारल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. या वर्षी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यासाठी पन्नास राज्यांतील पाच कोटी मतदारांना ‘आय विल व्होट’ या मोहिमेद्वारे जागे करण्यात येणार आहे. त्यांना ट्रम्प प्रशासनाने सर्वच आघाडय़ांवर केलेल्या बेदरकारपणाची जाणीव करून दिली जाणार आहे, त्यात सीमा नंदा पक्षाचे संघटन कसे उभे करतात व त्याचा प्रत्यक्ष कसा वापर करतात याची उत्सुकता सर्वानाच आहे.

nasa parker solar probe launched

सूर्यसूक्त-पार्कर हे अवकाशयान सूर्याच्या दिशेने झेपावले


68   14-Aug-2018, Tue

सौरवादळांचे भाकीत वर्तवणे ‘नासा’च्या सौरमोहिमेमुळे शक्य होईल; त्याहीपेक्षा महत्त्वाचे आहे ते आजवर असाध्य वाटलेल्या ध्येयाच्या सिद्धीसाठी पाऊल टाकणे..

प्रगती म्हणजे काय याची काहीही कल्पना नसलेल्या, कंदमुळे खाऊन जगणाऱ्या आदिम अवस्थेतील मानवाने जेव्हा पहिल्या सकाळी पूर्वेकडच्या आकाशात तो तांबडालाल गोळा पाहिला तेव्हा देवत्वाच्या कल्पनेचाही जन्म झाला. देवदैत्यादी भावनांचे वाटे करणे त्या काळी सोपे असावे. जे जे आपल्या जिवावर उठणारे ते ते दैत्यकारी आणि जे तसे नाही आणि आपल्या आवाक्यातही नाही ते दैवी अशी त्याची सोपी मांडणी झाली असणार. अफाट आकाराचे डोंगर, त्यात घुमणारा आणि झाडेमुळे हलवणारा वारा, धबाबा लोटणाऱ्या धारांतून वाहणारे पाणी आणि अग्नीस अंगी वागवणारा सूर्य हे आपोआप देव बनले. ते आवाक्यातले नव्हते. पण अपायकारीही नव्हते. त्यानंतरच्या लाखो वर्षांत प्रगतीच्या पुलांखालून बरेच पाणी वाहून गेले. पण अर्धवैज्ञानिक समाजातील सूर्याविषयीची देवत्वाची भावना काही गेली नाही. सूर्यास अघ्र्य देणे त्यातून आले आणि सूर्यनमस्कारदेखील त्याविषयीच्या देवत्वभावनेतूनच जन्मास आला. वास्तविक या विश्वाच्या पसाऱ्यात अन्य अनेक ताऱ्यांसारखाच एक सूर्य. आपल्यापासून त्यातल्या त्यात जवळ. म्हणजे साधारण १४,९०,००००० किलोमीटर अंतरावर असलेला.

वास्तविक काहींच्या मते या सूर्यापेक्षादेखील अधिक तेजस्वी आणि प्रकाशमान तारे या अवकाशात आहेत. फक्त आपणापासून ते त्याहूनही लांब असल्याने ते दिसत नाहीत, इतकेच. म्हणून देखल्या देवा दंडवत या युक्तीप्रमाणे जो समोर दिसतो त्या सूर्यालाच आपण देव मानत राहिलो. हे असे कोणास देवत्व देणे म्हणजे स्वत:च्या मर्यादांसमोर मान तुकवणे. हे अशक्तपणाचे लक्षण. भावनेपेक्षा बुद्धीवर विसंबून राहणाऱ्यांना हे अशक्तपण मंजूर नाही. भावनाधिष्ठित समाज सूर्यनमस्कार आदींत षोडशोपचारे रममाण होत असताना बुद्धीवर विश्वास असलेले मात्र ज्यास सामान्यजन देव मानतात त्याच्या कथित देवत्वालाच स्पर्श करू पाहतात. अमेरिकेच्या नॅशनल एअरोनॉटिक्स अ‍ॅण्ड स्पेस सेंटर, म्हणजे नासा, या संस्थेचे अवकाशात झेपावलेले पार्कर हे सूर्ययान हा असाच एक महत्त्वाकांक्षी प्रयत्न. त्या कथित देवत्वास स्पर्शू पाहणारा.

अमेरिकेच्या केप कॅनव्हेराल येथील अवकाश प्रक्षेपण तळावरून ही सूर्यमोहीम सुरू होऊन जेमतेम २४ तास उलटले असतील. प्रचंड क्षमतेच्या डेल्टा प्रक्षेपकातून पार्कर हे अवकाशयान सूर्याच्या दिशेने झेपावले. नासाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या अवकाशयानास व्यक्तीचे नाव देण्यात आले असून हे अवकाशयान उड्डाण पाहण्यासाठी ९४ वर्षांचे डॉ. युजीन पार्कर यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. हे असे करण्यामागील खास कारण म्हणजे मुळात सूर्याच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी असे अवकाशयान पाठवण्याची कल्पना डॉ. पार्कर यांची. ती त्यांनी साठ वर्षांपूर्वी पहिल्यांदा मांडली तेव्हा ती फेटाळली गेली. एकदा नव्हे तर दोनदा. सूर्याच्या पृष्ठभागावरून वातावरणात विविध झोत सोडले जातात आणि त्याचा पृथ्वीवरील चुंबकीय क्षेत्रावर परिणाम होत असतो, त्यामुळे त्याचा अभ्यास व्हायला हवा, असे या डॉ. पार्कर यांचे म्हणणे. परंतु तसे म्हणणे मांडणारा त्यांचा प्रबंध त्या वेळी नाकारला गेला. हे असे काही नाही, असे त्या वेळच्या ढुढ्ढाचार्यानी पार्कर यांना सुनावले. परंतु पार्कर निराश झाले नाहीत. त्यांचा स्वत:च्या अभ्यासावर विश्वास होता. त्यास पाठिंबा मिळाला सुब्रमणियन चंद्रशेखर या खगोलीभौतिक शास्त्रज्ञाचा. चंद्रशेखर हे नासातील प्रतिष्ठित शास्त्रज्ञ. नासाच्या संपादकमंडळातही त्यांचा समावेश होता.

डॉ. पार्कर यांचा प्रबंध मूल्यमापनासाठी चंद्रशेखर यांच्यासमोर आला असता त्यांनी त्यातील सिद्धांत पूर्णपणे रास्त ठरवला आणि या अशा संशोधनास पाठिंबाच दिला. त्या वेळी सुरू झालेल्या प्रक्रियेची परिणती म्हणजे ही सूर्यमोहीम. त्या वेळी चंद्रशेखर हे जर डॉ. पार्कर यांच्या पाठीमागे उभे राहिले नसते तर कदाचित असा प्रयत्न त्या वेळी सोडून दिला गेला असता. मात्र तसे झाले नाही. पुढे चंद्रशेखर यांनाही त्यांच्या संशोधनासाठी नोबेल मिळाले आणि अमेरिकेच्या एका अवकाशतळास त्यांचे नाव देऊन गौरवले गेले. त्यानंतर एखाद्या व्यक्तीचे नाव दिलेली ही दुसरी मोहीम.

तीमधील पार्कर हा उपग्रह आतापर्यंत कधीही न घडलेली गोष्ट करेल. तो सूर्याच्या अत्यंत जवळ जाईल. आजपासून १२ आठवडय़ांनी पार्करची सूर्याशी पहिली लगट झालेली असेल. हे त्याचे सूर्याच्या अत्यंत जवळ जाणे किती अंतरावरचे असेल? या दोघांतील अंतर अवघे ६१ लाख किलोमीटर इतके असेल. या इतक्या महाप्रचंड अंतरास जवळ येणे म्हणावे का, हा प्रश्न काहींना पडेल. परंतु सूर्याच्या इतक्या सन्निध जाण्याचा हा विक्रम असेल. कारण याआधी सूर्याच्या जास्तीत जास्त जवळ गेलेले यान चार कोटी ३० लाख किलोमीटर अंतरावरच थांबले होते. त्या तुलनेत ६१ लाख किलोमीटर म्हणजे तसे जवळच. सूर्याच्या इतक्या जवळ जाऊ पाहणारे हे यान जळून खाक होऊ नये म्हणून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

हजारो अंश सेल्सिअस तपमानातही ते तगून राहील असा विश्वास नासाला आहे. पुढील सात वर्षांत हे पार्कर यान सूर्याच्या इतक्या जवळ २२ वेळा जाईल. या काळात त्याचा अवकाशभ्रमणाचा वेग हा काही काळ सहा लाख ९० हजार किमी प्रति तास इतका कल्पनातीत असणार आहे. कोणत्याही मानवनिर्मित वाहनाने गाठलेला हा सर्वाधिक वेग असेल. पृथ्वीवर इतक्या वेगाने या यानास मार्गक्रमण करता आले तर न्यूयॉर्क ते टोकिओ या पृथ्वीच्या दोन टोकाच्या शहरांतील अंतर पार करावयास त्याला एका मिनिटापेक्षाही कमी वेळ लागेल. हे असे अचाट धाडस करणारी अमेरिका एकटी नाही.

पाठोपाठ युरोपीय देशांचे सोलर नावाचे असेच यान अवकाशात झेपावणार असून त्याच्या आवश्यक त्या चाचण्या लंडन येथील प्रयोगशाळेत सुरू झाल्या आहेत. त्या दोन वर्षे चालतील. युरोपीय देशांची संयुक्त मोहीम असलेल्या या प्रकल्पात याननिर्मितीची जबाबदारी एअरबस कंपनीने उचलली आहे. तथापि हे युरोपीय यान अमेरिकेच्या पार्करइतके सूर्याजवळ जाणार नाही. ते साधारण चार कोटी किलोमीटरवरून सूर्यावर नजर ठेवून स्थिर होईल. परंतु त्याचे संशोधन अमेरिकी पार्करला पूरकच असेल. पार्कर सूर्याच्या जास्तीत जास्त जवळ जाईल तर सोलर ते त्याचे जवळ जाणे कॅमेऱ्यात टिपेल. तसेच सूर्याच्या पृष्ठभागाची जास्तीत जास्त निरीक्षणे पार्कर नोंदवेल तर सोलर या सगळ्याची छायाचित्रे टिपत राहील. नासाच्या या मोहिमेसाठी तब्बल १५० कोटी डॉलर हा किमान खर्च अपेक्षित असून यातून सूर्याविषयी अमूल्य माहिती हाती लागण्याची शक्यता आहे. सौरवादळे हा एक चक्रावून टाकणारा प्रकार असून त्यामुळे पृथ्वीवर दळणवळण आदींत व्यत्यय येतो. या सौरवादळांची माहिती उपलब्ध झाल्यास या सौरवादळांचे भाकीत वर्तवणे शक्य होईल.

त्याहीपेक्षा महत्त्वाचे आहे ते आतापर्यंत असाध्य वाटलेल्या ध्येयाच्या सिद्धीसाठी पाऊल टाकणे. कालचे असाध्य उद्या सहजसाध्य होत असते. गरज असते ती त्यासाठी विज्ञाननिष्ठा जपण्याची आणि असा विज्ञानाधिष्ठित समाज घडवण्याची. ते झाले नाही; तर आहेच आपले कोणाची तरी सावली कोणावर तरी पडते म्हणून होणाऱ्या ग्रहणांत शुभाशुभ आणि शिवाशिवीची परंपरा पाळणे. अशा वातावरणात सूर्यसूक्ताची खरी साधना होते नासासारख्या संस्थांतूनच. त्यातून काही शिकणे हीच आपल्यासाठी खरी सूर्यपूजा असेल.

prof dr b seshadri

प्रा. डॉ. बी. शेषाद्री


27   14-Aug-2018, Tue

विद्यापीठीय क्षेत्रात कारकीर्द करत असताना अनेक जण समाजाकडे पाहात नाहीत, समाजाच्या उपयोगी पडत नाहीत, म्हणून तर ‘हस्तिदंती मनोऱ्या’त राहिल्याचा आरोप त्यांच्यावर होतो. याला अपवादही असतात. त्यापैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे प्रा. डॉ. बी. शेषाद्री. वैकासिक अर्थशास्त्र या विषयात विद्यापीठीय कारकीर्द करत असताना त्यांनी आपल्या परिसराच्या विकासाचा सातत्याने अभ्यास केला, त्याविषयी निष्कर्ष काढले आणि या परिसराच्या शैक्षणिक विकासात कृतिशील भूमिकाही बजावली.

उत्तर कर्नाटक हा बी. शेषाद्री यांचा प्रांत. स्वातंत्र्यपूर्व काळात निजामी मुलखात असलेले या भागातील जिल्हे मागासच राहिले होते. कर्नाटक राज्यनिर्मितीनंतर थोडेफार औद्योगिकीकरण या जिल्ह्य़ांतही पोहोचले, पण तेवढे पुरेसे असते का? सरकारी सवलतींमुळे झालेले औद्योगिकीकरण आणि औद्योगिकीकरणाला आधुनिक शेतीची जोड देऊन उभी राहणारी विकासाची चळवळ यात फरक असतो की नाही? या प्रश्नांचे प्रतिबिंब, ‘औद्योगिकीकरण आणि विभागीय विकास’ या विषयीच्या त्यांच्या पीएच.डी. प्रबंधातही दिसून आले.

राज्यांतर्गत प्रादेशिक असमतोल जसा महाराष्ट्रात आहे, तसा कर्नाटकातही आहे. त्याचा विशेष अभ्यास डॉ. शेषाद्री यांनी सातत्याने केला. त्यामुळेच, राज्य सरकारने विभागीय असमतोलाच्या अभ्यासासाठी डॉ. डी. एम. नंजुन्दप्पा यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या समितीत शेषाद्री यांचा समावेश होता. असमतोल मोजण्याचे ३८ निकष कोणते असावेत, हे या समितीसाठी शेषाद्री यांनी ठरविले. दोनच वर्षांत या समितीचा अहवाल सादर झाला. हैदराबाद-कर्नाटकी विभागातील सहा जिल्ह्य़ांसाठी वैधानिक विकास मंडळे नेमण्याची तरतूद राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७१ (जे) मध्ये आहेच, पण त्यात बेल्लारी जिल्ह्य़ाचा समावेश शेषाद्री यांच्या अभ्यासामुळे होऊ शकला. शेषाद्री यांनी शैक्षणिक क्षेत्रात एखाद्या कार्यकर्त्यांसारखे काम केले.

धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठातून इंग्रजी आणि अर्थशास्त्र अशा दोन्ही विषयांतून पदव्युत्तर पदवी (एम.ए.) केल्यानंतर १९६९ साली बेल्लारी येथील एएसएम महिला महाविद्यालयात ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले, तेथील अर्थशास्त्र विभाग त्यांनी नावारूपाला आणला, सक्षम केला. ‘सदर्न इकॉनॉमिस्ट’ या संशोधन पत्रिकेत तसेच ‘विचार वाहिनी’ या स्वत: स्थापलेल्या संस्थेच्या अनियतकालिकात लिहिणे, व्याख्याने देणे हा क्रम त्यांनी उतारवयातही सुरू ठेवला होता. अशा या शेषाद्रींना गुरुवारी वयाच्या ८०व्या वर्षी मृत्यूने गाठले, तेव्हा परिसराशी इमान राखणारा अभ्यासक गेल्याची हळहळ अनेकांना वाटली.

vidyadhar s. naypaul

नकाराचा भाष्यकार- नायपॉल


76   13-Aug-2018, Mon

लेखकास मिळालेल्या प्रश्न विचारण्याच्या शापास नायपॉल यांनी कधीही उ:शाप शोधला नाही. म्हणूनच ते फार मोठे ठरतात..

लेखकाचा धर्म काय? प्रचलित मतलबी वाऱ्यांची दिशा ओळखून त्याप्रमाणे लेखन बेतायचे आणि लोकप्रिय व्हायचे की अलौकिकाची आस बाळगायची? लोकप्रिय होणे तसे सोपे. थोडीशी लेखनकला आणि बरेच सारे चातुर्य असले की आयुष्यभर लेखकराव म्हणून मिरवता येते. प्रचलित मूल्यांचे वारे ज्या दिशेने वाहात असतील त्या दिशेचा वारा आपल्या गलबताच्या शिडांत भरून घ्यायचा की झाले. लोकप्रियतेच्या बंदरास मग आपसूक आपले जहाज लागते. त्या तुलनेत अलौकिकत्व तसे अंमळ अवघडच. जखम वाहाती ठेवावी लागते सतत. स्वत:च्या मनास कायम धार लावत राहावे लागते. हे धार लावणे म्हणजे प्रश्न विचारणे. सतत. तेदेखील अपेक्षित प्रश्नसंचात न आढळणारे. पुन्हा ते एकदा आणि एकालाच विचारून चालत नाही. प्रत्येक टप्प्यावर प्रत्येकास ते विचारावे लागतात. पण तेवढय़ाने भागत नाही. अशा प्रश्नांनी ओल्या राहणाऱ्या जखमेच्या वेदना आपल्या वाचकांच्या मनात पोहोचवाव्या लागतात. ते एकदा जमले की उत्कट लेखक म्हणून लोकप्रियतेची साय जमा होऊ लागते आणि लेखकाचा लेखकराव होऊ लागतो. बरेचसे याच टप्प्यावर स्थिरावतात. व्यवस्थेच्या विरोधाची हाळी घालून लक्ष वेधले गेले की मग स्वत:च व्यवस्था होऊ लागतात. अशा अनेक लेखकांचे स्मृतिस्तंभ शेकडय़ांनी आहेत आपल्या आसपास. अशा स्मृतिस्तंभांत स्वत:स थिजवून ठेवणे डोळसपणाने नाकारणारा उत्कट, करकरीत लेखक म्हणजे सर विद्याधर सूरजप्रसाद ऊर्फ विदिआ नायपॉल.

मोठेपणा मोजण्याच्या चतुर मोजमापांत नायपॉल मावणारे नाहीत. म्हणजे त्यांना बुकर पारितोषिक मिळाले, ते नोबेल सन्मानाने गौरविले गेले, चार्ल्स डिकन्स ते टोनी ब्लेअर यांच्यासारख्यांवर यथेच्छ टीका करूनही ब्रिटनने त्यांना ‘सर’की देऊन गौरवले वगैरे मुद्दे तसे गौण. बातमीच्या चौकटीपुरतेच. नायपॉल एवढय़ाच कारणामुळे मोठे नाहीत. ते फार मोठे ठरतात कारण लेखकास मिळालेल्या प्रश्न विचारण्याच्या शापास त्यांनी कधीही उ:शाप शोधला नाही म्हणून. हे प्रश्न त्यांनी मातृभूमी असलेल्या त्रिनिदाद देशास विचारले. अंगात ज्या संस्कृतीचे रक्त होते त्या भारतास विचारले. कर्मभूमी असलेल्या पाश्चात्त्य विश्वास विचारले आणि इस्लामसारख्या वरकरणी प्रश्नविरोधी वाटणाऱ्या संस्कृतीसही विचारले. या प्रत्येकाविषयी नायपॉल यांच्या मनात एक प्रकारची घृणा होती आणि आपल्या करवती लेखणीने ते ती सतत मांडत राहिले. असे करणे व्यावहारिकदृष्टय़ा धोक्याचे असते. कारण बाजारपेठीय मोजमापांत अडकलेले चतुरजन नकारात्मकतेचा शिक्का कपाळावर मारतात. माध्यमेही तोच मिरवतात आणि मग लोकप्रियपण हाती येता येता निसटून जाते की काय, अशी परिस्थिती तयार होते. लेखकांचा एक मोठा वर्ग या टप्प्यावर उसंत घेतो. जसे की सलमान रश्दी किंवा तस्लीमा नसरीन इत्यादी. कोणा संदर्भात प्रश्न उपस्थित केले की आपली लेखननौका आपसूक उचलली जाते हे एव्हाना कळू लागलेले असते. त्यामुळे आपली लेखनकला व्यवस्थित बेतून लोकप्रिय होणे सोपे जाते. नायपॉल यांनी असे लोकप्रिय होणे उत्साहाने आणि निगुतीने टाळले. नकारात्मकतेच्या टीकेस ते घाबरले नाहीत. व्यवस्थाधार्जिण्यांना नेहमीच सकारात्मकता आवडते. काय आहे त्याचा उदात्त गौरव करीत जगाचे कसे उत्तम सुरू आहे यासाठी आपली कला राबवणे म्हणजे जनताजनार्दनाच्या नावे व्यवस्था राबवणाऱ्यांना आवडणारी सकारात्मकता. अशा सकारात्मकतेची चैन  कलावंत आणि खऱ्या लेखकास परवडत नाही. अमृता प्रीतम, साहिर लुधियानवी, चिं त्र्यं खानोलकर आदींसारख्या जीव पिळवटून टाकणाऱ्या आणि वेडावणाऱ्या वैश्विक लेखकांत नीरद चौधरी यांच्यासह नायपॉल यांचा समावेश करावा लागेल.

इस्लामचे ते कडवे टीकाकार होते. एके काळी पाश्चात्त्य जीवनाचे त्यांना आकर्षण होते. पण ते जीवन जगू लागल्यावर त्यांनी त्यावरही कठोर टीका केली. इंग्लंडचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची संभावना तर त्यांनी चाचा (पायरेट) अशी केली. (पण म्हणून त्यांना इंग्लंडने राष्ट्रविरोधी ठरवले नाही की देशातून हाकलून द्या अशी मागणीही तेथे कोणी केली नाही. असो.) ई एम फॉर्स्टर, चार्ल्स डिकन्स यांनाही त्यांनी सोडले नाही. पाश्चात्त्य नजरेतून भारत वा आशियाई देशांकडे पाहणाऱ्यांची तर त्यांना घृणाच होती. तसे पाहणारे या देशांतील कथित उच्च, उदात्त आध्यात्मिकादी परंपरांचे गोडवे गातात. नायपॉल यांना ते मंजूर नव्हते. म्हणूनच आपल्या भारतभेटीनंतरच्या लेखनात त्यांनी तुडुंब वाहणारी गटारे, त्या आसपासच्या खुराडय़ात राहणाऱ्यांचे जगणे, आत्यंतिक बकालपणा आणि हातापायांच्या काडय़ा आणि फुगलेली पोटे घेऊन हिंडणारी लहान मुले यांना आणणे टाळले नाही. ‘अ हाऊस फॉर मि. बिस्वास’ या त्यांच्या अत्यंत लोकप्रिय कादंबरीच्या लेखनाने आलेल्या मनाच्या रिकामेपणात ते भारतात आले होते. त्यानंतरही ते अनेकदा आले. ऐंशीच्या दशकात मुंबईतल्या भेटीत ते नामदेव ढसाळसमवेत मुंबई पालथी घालती झाले. वंचितांचे जगणे त्यांना अनुभवायचे होते. या भेटीत ते काही समाजकारण्यांच्या घरीही गेले. त्यांतील दोघे एका पक्षाशी संबंधित होते. एक दीड खोलीचे आयुष्य जगणारा आणि दुसरा बंडखोरीतून स्थिरावलेला. त्या दीड खोलीत जगणाऱ्याकडे नायपॉल यांनी वैवाहिक सुखासाठी आवश्यक एकांत मिळतो का, अशी विचारणा केली होती तर दुसऱ्याकडे, त्याची ओढूनताणून पाहुणचार करण्याची हौस पाहून नायपॉल यांनी त्यास तुम्ही इतरांच्या समाधानासाठी का इतके झटता असे विचारले होते. पहिल्याने आपल्या वैवाहिक सुखाचे उदात्तीकरण केले आणि दुसऱ्याने भारतीयांसाठी पाहुणा कसा देवासमान असतो वगैरे पोपटपंची ऐकवली. नायपॉल यांच्या लेखनात वेगळ्या रूपात हे सर्व आले. ते खरे होते. कारण पुढे वैवाहिक सुखाची बढाई मारणाऱ्याने आपल्या पत्नीस मनोरुग्ण ठरवून दुसरा घरोबा केला आणि दुसरा संशयास्पद मार्गाने मिळवलेल्या संपत्तीसंचयाने मोठा होत गेला. एक खरा कलात्मक लेखक म्हणून नायपॉल या अशा संस्कृतीचे भाष्यकार होते. कॅरेबियनमध्ये त्यांचा जन्म झाला. पण कृष्णवर्णीयांविषयी त्यांना कणव नव्हती. त्यांच्या जगण्याचेही ते टीकाकार होते. त्यांचे वडील पत्रकार. आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत या हेतूने ते शेक्सपियरच्या उत्तम कलाकृतींचे मोठय़ांदा वाचन करीत. त्यामुळे नायपॉल यांच्यावर लहान वयातच उत्तम वाङ्मयीन संस्कार होत गेले. आपण मोठेपणी लेखक व्हावे असे तेव्हाच त्यांच्या मनाने घेतले. पुढे इंग्लंडातील ऑक्स्फर्ड आदी अभिजनी विद्यापीठांत त्यांना शिक्षण घेता आले आणि अत्यंत वेगळी पाश्र्वभूमी लाभलेल्या संवेदनशील तरुणांची अशा वातावरणात वावरताना कशी घुसमट होते हेदेखील त्यांना अनुभवता आले. ही घुसमट थेट त्यांना आत्महत्येच्या टोकापर्यंत घेऊन गेली होती.

कलाकाराच्या मनाचा गुंता पूर्णपणे सुटणे अवघडच असते. अगदी निकटवर्तीयांनाही ते जमत नाही. नायपॉल यांच्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांनाही ते साध्य झाले नाही. काही काळ तर प्रेयसीस मारहाण केल्याचीदेखील टीका त्यांच्यावर झाली. ते समर्थनीय नव्हतेच. अमेरिकी कादंबरीकार पॉल थेरॉ हा त्यांचा अत्यंत जवळचा मित्र. नायपॉल यांच्या अनेक प्रवासांत तो त्यांचा साथीदार होता. पण त्याच्याशीही त्यांचे तीव्र मतभेद झाले. एकदा एका जुन्या पुस्तकाच्या दुकानात पॉल यांना त्यांनी नायपॉल यांना स्वाक्षरीसह दिलेले पुस्तक आढळले. म्हणजे आपल्या जिवलग मित्राने दिलेल्या पुस्तकालाच नायपॉल यांनी बाहेरची वाट दाखवली. तेव्हा पॉल चिडणेही स्वाभाविक होते. दोघांतील दुरावा पंधरा वर्षे टिकला. पण नंतर ते पुन्हा जवळ आले. नायपॉल यांच्या निधनानंतर रविवारीच त्यांना पॉल यांनी वाहिलेली श्रद्धांजली अत्यंत उत्कट आहे. ‘नायपॉल आजच्या इंग्रजीतील सवरेत्कृष्ट लेखक ठरतात कारण ते खरे होते आणि त्यांचे लेखनही तसेच खरे होते. शब्दजंजाळात खरेपण दडवणाऱ्यांचा त्यांना कायम तिटकारा होता.’

या खरेपणामुळे त्यांनी आपल्या बोलण्यावरील, लिखाणावरील प्रतिक्रियेची तमा बाळगली नाही. १९९२ साली अयोध्येत बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर काही वर्तमानपत्रांनी जागतिक भारतीय लेखकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. त्यात नीरद चौधरी आणि नायपॉल यांची प्रतिक्रिया तेवढी वेगळी होती. इस्लाम समजून घेताना जो खोटा निधर्मीवाद अंगीकारला गेला त्याची प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे बाबरी पाडणे, असे मत नायपॉल यांनी उच्चभ्रू निधर्मीवादय़ांची तमा न बाळगता निर्भीडपणे नोंदवले. विद्यमान सत्ताधारी भाजपस मिळालेल्या जनमताचा कौल हा त्याचाच निदर्शक असल्याचे त्यांचे मत होते. तसे त्यांनी बोलून दाखवले. भाजपने तेवढय़ाच मुद्दय़ाचा गवगवा करून नायपॉल यांना आंबेडकर, गांधी, सरदार पटेल यांच्याप्रमाणे ‘आपले’ मानण्याचा प्रयत्न केला. पण नायपॉल यांनी त्याच वेळी भाजपस ‘इतिहासात रमू नका, पुढे जा. नपेक्षा देश पाच हजार वर्षे मागे न्याल,’ असेही सुनावले होते. नकारात्मकतेच्या भाष्यकाराचे हे भाकीत खरे ठरले तर नायपॉल किती द्रष्टे होते ते कळेल आणि खोटे ठरल्यास आपण भाग्यवान ठरू. काहीही झाले तरी तो नायपॉल यांचाच विजय असेल.

israel declared jewish state

तेजातुनी तिमिराकडे


209   12-Aug-2018, Sun

अस्मितांचे अंगार फुलवून, इतिहासाचे चक्र उलटे फिरवण्यातच अलीकडे अनेकांना रस दिसतो..

‘‘हे विश्व आणि माणसाचा मूर्खपणा अनंत आहेत. परंतु या दोहोंतील विश्वाविषयी काही अंदाज तरी बांधता येईल, दुसऱ्याबाबत मात्र तसे करणे अशक्य आहे’’,  असे द्रष्टा शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांचे विधान आहे. याचा अर्थ विश्वाचा आकार एकवेळ मोजता येईल, पण माणसाचा मूर्खपणा नाही. सांप्रत काळी यातील मूर्खपणाची जागा संकुचितपणा घेऊ शकेल. किंवा खरे तर मूर्खपणास संकुचितपणाची जोड मिळेल. आइन्स्टाईन यांच्याशीच संबंधित दोन देशांनी घेतलेले निर्णय याचे प्रतीक आहेत. यापैकी एक आहे इस्रायल आणि दुसरा जर्मनी. इस्रायल या देशाने स्वतची ओळख एक यहुदी देश अशी करण्याचा निर्णय घेतला तर जर्मनीचा विख्यात फुटबॉल खेळाडू मेसुत ओझील याने देशातील वाढत्या वंशवादामुळे राष्ट्रीय संघातून स्वेच्छानिवृत्ती जाहीर केली. या दोन्ही देशांत जे काही घडत आहे त्यातील बळी हे मुसलमान आहेत, ही बाब विशेष लक्षात घेण्यासारखी. प्रथम इस्रायल या देशातील घटनांविषयी.

आजमितीस इस्रायल हे लोकशाही राष्ट्र आहे आणि त्या देशातील सर्व धर्मीय नागरिकांना समानाधिकार आहेत. प्राय: हा देश यहुदी धर्मीयांचा आहे हे जरी मान्य केले तरी या देशातील अरबांची संख्याही लक्षणीय आहे. सरकारची सूत्रे यहुदी धर्मीयांच्या हाती असली तरी अरबांना काहीच किंमत नाही, असे वातावरण त्या देशात नाही. अनेक पदांवर अरबदेखील नेमले जातात. अशा वेळी या देशाच्या सरकारने टोकाचा निर्णय घेतला असून देशासंदर्भातील धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार यापुढे फक्त यहुदींनाच राहणार आहेत. याचा थोडक्यात अर्थ असा की त्या देशातील अरब, पॅलेस्टिनी वा अन्य अल्पसंख्याकांना त्या देशात कोणतेही स्थान असणार नाही. असलेच तर ते केवळ दुय्यम नागरिकाचेच असेल. याचाच अर्थ स्वातंत्र्य हे एक मूल्य सोडले तर त्या देशातील नागरिक समान दर्जाचे राहणार नाहीत.

हे भयंकर आहे. इस्रायलसारख्या प्रगतिशील, आधुनिक देशाने शेजारील अरबांइतका मागास निर्णय घ्यावा हे सध्याच्या जागतिक वातावरणास साजेसे असले तरी उद्विग्न करणारे आहे. त्या देशाने आधीच बळजबरी करून पॅलेस्टिनींना त्यांची न्याय्य भूमी देण्यास नकार दिला आहे. विद्यमान पंतप्रधान बेन्यामिन नेतान्याहू हे इस्रायली राष्ट्रवादाचा अर्क म्हणता येतील असे. नेत्यान्याहू कमालीचे युद्धखोरदेखील आहेत. जागतिक मताची कोणतीही पर्वा न करता त्यांनी शेजारील पॅलेस्टिनी भूमी बळकावणे बिनदिक्कत सुरू ठेवले. सध्या जगात ठिकठिकाणी बहुसंख्याकवादाने अभद्र आणि विकृत स्वरूप धारण केल्याचे दिसते. इस्रायल हा त्याचाच एक नमुना. वास्तविक नेतान्याहू यांच्यासारखे नेते सामान्य जनतेस राष्ट्रवाद या एकाच भावनेभोवती प्रक्षुब्ध ठेवून आपलीच पोळी भाजून घेत असतात. या अशा नेत्यांसाठी देशप्रेम वगैरे केवळ बोलायच्या गोष्टी. देशप्रेम म्हटले की सामान्य नागरिकाची विचारशक्ती रजा घेते. इस्रायलमधे त्याचेच प्रत्यंतर येत असून या देशप्रेमी म्हणवणाऱ्या पंतप्रधानावरच अमाप संपत्ती केल्याचा आरोप आहे. नेतान्याहू यांच्या पत्नीचे अनेक उद्योग वादग्रस्त ठरले आहेत. तेव्हा या सगळ्यावरून सामान्य नागरिकाचे लक्ष विचलित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून असेल परंतु त्यांनी इस्रायल हा यहुदी देश म्हणून जाहीर करण्याचा निर्णय घेतला.

याचे अनेक गंभीर परिणाम संभवतात. यामुळे त्या देशातील अरब आदी अल्पसंख्याकांत नाराजीची लाट निर्माण झाली नाही तरच नवल. दुसऱ्याची भूमी जबरदस्तीने बळकावून ठेवायची आणि आपल्या भूमीतही त्याला स्थान द्यायचे नाही, असे हे राजकारण आहे. त्यामुळे पश्चिम आशियात पुन्हा एकदा दहशतवादाचे थमान सुरू झाले तर आश्चर्याचे कारण नाही. या संदर्भात या देशाचे संस्थापक डेव्हिड बेन गुरियन यांनी दिलेला इशारा लक्षात घ्यायला हवा. १९६७ साली अरबांविरोधातील महत्त्वाचे युद्ध जिंकल्यानंतर इस्रायलमधे जो राष्ट्रवादाचा उन्माद निर्माण झाला त्याची दखल घेत गुरियन यांनी आपल्या देशाच्या नेत्यांना अरबांची बळकावलेली भूमी परत देण्याची सूचना केली. ‘तसे न करणे हे स्वहस्ते आत्मनाशाची बीजे पेरण्यासारखे आहे’, असे गुरियन यांचे शब्द होते. आपल्या देशातील अल्पसंख्यांना दुय्यम दर्जाचे नागरिक ठरवून इस्रायल सरकारने गुरियन यांचा इशारा खरा ठरेल अशीच व्यवस्था केली, असे म्हणता येईल. आता त्या देशाच्या पावलावर पाऊल टाकून अन्य अनेक देशांत अशीच खोटय़ा राष्ट्रवादाची उबळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इस्रायलप्रमाणेच जर्मनीतील काही मूठभरांनीही अशाच राष्ट्रवादाचे प्रदर्शन केले. परिणामी ओझीलसारख्या अव्वल दर्जाच्या फुटबॉलपटूवर राष्ट्रीय संघातून निवृत्ती घेण्याची वेळ आली. जर्मन संघातून ९२ सामने खेळलेल्या, विश्वचषक मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावलेल्या या खेळाडूवर अशी वेळ आली, त्यामागे जर्मनीतील वाढता वंशवाद कारणीभूत आहे. गेल्या काही वर्षांत जर्मनीत नव नाझी म्हणवून घेणाऱ्यांची चळवळ जोम धरत असून स्थलांतरित, अल्पसंख्य, अन्य वंशीय अशांना जर्मनीतून हाकलायला हवे, अशी त्यांची भूमिका आहे. ओझील याच्याबाबत असेच काहीसे घडले.

हा खेळाडू वंशाने तुर्क आणि धर्माने मुसलमान. जन्म जर्मनीतला आणि पुढचे सारे कर्मही जर्मनीतच घडलेले. इतके दिवस सारे काही सुरळीत होते. प्रश्न निर्माण झाला तो नुकत्याच संपलेल्या विश्वचषक स्पर्धेत जर्मनीस दारुण पराभव सहन करावा लागल्यानंतर. या स्पर्धेआधी ओझील याने तुर्कस्तानचे वादग्रस्त अध्यक्ष एर्दोगान यांची भेट घेतली. त्यावेळी तुर्कस्तानात निवडणुकीची हवा होती आणि एर्दोगान यांना आव्हान उभे राहील अशी अटकळ होती. तसे काही झाले नाही. सत्ता एर्दोगान यांच्याकडेच राहिली. अशा वेळी ओझील आणि एर्दोगान भेटीचा मुद्दा विस्मरणात गेला असता. परंतु तसे झाले नाही. कारण जर्मनीचा या स्पर्धेतला पराभव.

त्यासाठी जर्मन फुटबॉल संघटनेतील काहींनी ओझील यांच्यासारख्या खेळाडूस दोष देण्यास सुरुवात केली आणि त्याचा उल्लेख ‘तुर्कवंशीय जर्मन खेळाडू’ असा वारंवार केला जाऊ लागला. वास्तविक जर्मन संघात पोलंड आदी देशांतील खेळाडूदेखील आहेत. परंतु त्यांचा उल्लेख कधी ‘पोलिश वंशाचे जर्मन’ अशा तऱ्हेने केला गेला नाही. परंतु ओझील याच्याबाबत मात्र तसे वारंवार झाले. ‘‘आपण मुसलमान आहोत म्हणून आपली अशा तऱ्हेने हेटाळणी होते’’,  असे ओझील याचे म्हणणे. ते सहजपणे खोडून काढता येण्यासारखे नाही. कारण जर्मन फुटबॉल संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी ओझील याच्या जर्मन निष्ठांविषयीदेखील प्रश्न निर्माण केला. ‘‘संघ जिंकतो तेव्हा माझा उल्लेख जर्मन असाच केला जातो आणि पराभूत झाला की मात्र मला स्थलांतरित म्हणून हिणवले जाते,’’ अशा शब्दांत ओझील याने आपल्या वेदना व्यक्त केल्या आणि संघाचा निरोप घेतला.

या दोन्ही घटना कमालीच्या दुर्दैवी आणि प्रतीकात्मक आहेत. अनेक देशांत सध्या अशीच परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. प्रत्येक समूहास आता केवळ आपल्या अस्मितांचे अंगार फुलवण्यातच रस असून किमान मानवी मूल्यांनादेखील पायदळी तुडवण्यात कोणास काही वाटत नाही. काही शहाण्या, सुसंस्कृत नेत्यांनी हे जग राहण्यायोग्य बनवण्यासाठी प्रयत्न केले. आता हे इतिहासाचे चक्र उलटे फिरवण्यातच अनेकांना रस दिसतो. हा तेजातुनी तिमिराकडे असा प्रवास अंतिमत: सर्वाचेच नुकसान करणारा असेल.

m karunanidhi

करुणानिधींचे कर्तृत्व


41   12-Aug-2018, Sun

प्रादेशिक अस्मिता हा करुणानिधी यांच्या राजकारणाचा प्राण होता.. या अस्मितावादाचा अतिरेकही झाला, पण राजकीय महत्त्व वाढले..

प्रभू राम हा काय बांधकाम अभियंता होता का, असा प्रश्न जाहीरपणे विचारण्याची हिंमत असलेला किंवा वयपरत्वे आलेल्या व्याधींनी दीर्घकाळ अंथरुणावर पडून राहावे लागले असता कपाळावर लावलेला अंगारा अर्धग्लानी अवस्थेतही पुसून टाकण्याएवढी बुद्धिनिष्ठा दाखवणारा आणि तरीही यशस्वी नेता भारतीय राजकारणात तसा अवघडच. नास्तिक म्हणता येतील असे नेते आपल्याकडे आहेत आणि राजकारणात यशस्वी तर खूपच आहेत. परंतु या दोन्हींचे संधान बांधणारा आणि ही बुद्धिवादी भूमिका आयुष्यभर पाळणारा नेता म्हणून मुथुवेल करुणानिधी महत्त्वाचे ठरतात. ते आता निवर्तले. ज्या राज्यात धार्मिक कर्मकांडाचे कमालीचे अवडंबर माजवले जाते आणि शास्त्रीय संगीतासारख्या अलौकिक कलेसही धर्मकांडाशी जोडले जाते त्या प्रदेशात करुणानिधी प्रचंड लोकप्रिय नेते होते ही बाब चांगलीच कौतुकास्पद ठरते. त्या नेत्यासाठी आणि त्या प्रदेशासाठीही. हा पेरियार रामस्वामी यांनी द्रविड चळवळीस दिलेला वसा. तो करुणानिधी यांनी शेवटपर्यंत जोपासला. परंतु ते उतले नाहीत अथवा मातले नाहीत, असे मात्र म्हणता येणार नाही.

आयुष्यभर राज्यस्तरीय राहूनसुद्धा, प्रादेशिक स्तरावरच काम करूनसुद्धा राष्ट्रीय नेते म्हणून गणता येते हे आपल्या देशात काही मोजक्याच नेत्यांनी दाखवून दिले. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्योती बसू आणि द्रविड मुन्नेत्र कळहमचे करुणानिधी. बसू यांचा पक्ष निदान कागदोपत्री का असेना पण राष्ट्रीय होता. करुणानिधी यांचे तसेही नाही. ते सर्वार्थाने तमिळनाडू प्रांतापुरतेच मर्यादित होते. पण तरीही करुणानिधी कोणत्या दिशेला आहेत हे पाहणे राष्ट्रीय म्हणवून घेणारे पक्ष अणि त्यांच्या उत्तरभारतकेंद्री नेत्यांसाठी आवश्यक असे. ही बाब आपल्या देशात अत्यंत महत्त्वाची. त्यामागील आणखी एक कारण म्हणजे करुणानिधी यांनी दाखवलेले राजकीय कर्तृत्व.. आणि नंतर त्यांचे सहकारी आणि पुढे स्पर्धक एम जी रामचंद्रन यांचे त्यास वेगळ्या अर्थी मिळालेले सहकार्य. ते असे की हयात असेपर्यंत करुणानिधी यांनी आपल्या राज्यात राष्ट्रीय म्हणवून घेणाऱ्या पक्षांना पाय रोवू दिला नाही. या वास्तवाच्या गुणावगुणांची चर्चा होऊ शकेल. परंतु ती नाकारता मात्र कोणालाही येणार नाही. या वास्तवामुळे प्रभू रामचंद्रास आराध्य दैवत मानणाऱ्या भारतीय जनता पक्षास करुणानिधी यांचे लांगूलचालन करावे लागले आणि सर्वानाच तोंडदेखले मानणाऱ्या काँग्रेसवरही करुणानिधी यांच्यापुढे लोटांगण घालण्याची वेळ आली. एकदा नव्हे अनेकदा. म्हणजे अटलबिहारी वाजपेयी यांच्या सहिष्णू, उदारमतवादी काळातही करुणानिधी आपल्या बाजूला हवेत असे भाजपला वाटले आणि आताच्या धर्माधिष्ठित आणि आमचे आम्ही मानणाऱ्या भाजपलाही करुणानिधींना जिंकावेसे वाटते. म्हणूनच ज्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात आपण रान उठवले, ज्यांचा भ्रष्टाचार हा आपल्या राजकारणाचा पाया होता त्या दूरसंचारी ए राजा यांना निर्दोष सोडल्यानंतर करुणानिधी यांचे अभिनंदन करावयास पहिले गेले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी. ही करुणानिधी यांच्या राजकारणाची ताकद. ती करुणानिधी पूर्ण ओळखून होते. म्हणूनच एकाच वेळी काँग्रेस आणि नंतर लगेच भाजप किंवा उलटही, अशी स्वप्रदेशकेंद्रित समीकरणे करुणानिधी हवी तशी बांधू शकले.

२००४ साली वाजपेयी सरकारचा नि:पात होण्यामागच्या दोन प्रमुख कारणांतील एक होते द्रमुकने त्या निवडणुकीत भाजपशी घेतलेला काडीमोड. ती नौबत न ओढवता भाजपने संसार टिकवला असता तर २००४ साली काँग्रेस विजयी होती ना. २००४ पर्यंत भाजपबरोबर सत्तेत असलेल्या करुणानिधी यांनी त्या निवडणुकीनंतर कूस बदलली आणि काँग्रेसशी सत्तासोबत करून ए राजा, दयानिधी मारन यांना केंद्रात मनमोहन सिंग सरकारात मंत्रिपद देववले.

ही प्रादेशिक अस्मिता हा करुणानिधी यांच्या राजकारणाचा प्राण होता. अस्मितेचा अतिरेक -मग ती भाषेची असो की धर्माची- हा विवेकाच्या मुळावर उठतो. करुणानिधी यांच्याबाबतही असे झाले. केवळ तमिळ प्रेम वा असोशी यामुळे त्यांनी भारतीय भूमीत आकारात येत असलेल्या तमिळ वाघांच्या भस्मासुराकडे काणाडोळा केला. किंबहुना श्रीलंकेतील या फुटीरतावाद्यांना केवळ भाषक अस्मितेपोटी करुणानिधी यांनी पोसले. त्यातून पुढे काय झाले हा इतिहास ताजा आहे. तो उगाळण्याचे हे स्थळ आणि प्रसंगही नव्हे. भारतासारख्या खंडप्राय आणि अगडबंब देशाचे नेतृत्व करणाऱ्यांना या प्रादेशिक अस्मितांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असा धडा करुणानिधी यांच्या राजकारणात आहे. तो समजून घ्यायला हवा. नपेक्षा प्रत्येक राज्यात जाऊन तेथील प्रादेशिक पक्षांच्या जिवावर उठलेल्या भाजप वा अमित शहा यांना तमिळनाडूत द्रमुकमुक्त तमिळनाडू अशी हाक देण्याची हिंमत का झाली नाही, हे कळणार नाही. अमित शहा बंगालात जाऊन तृणमूलमुक्त बंगाल करायला हवे, असे म्हणू शकले. पण तमिळनाडूत ते शक्य झाले नाही. हे करुणानिधी यांच्या राजकारणाचे मोठेपण.

पेरियार रामस्वामी आणि नंतर पुढे अण्णा दुराई यांच्याकडून ते करुणानिधी यांनी आत्मसात केले. भाषेवर कमालीची हुकूमत, खरे तर तमिळ भाषेचा अभिजात आविष्कारी, उत्तम लेखक, अद्भुत म्हणावी अशी स्मरणशक्ती, हजरजबाबी आणि वाक्पटू आणि प्रसंगी निष्ठुर म्हणता येईल इतके टोकाचे राजकारण करण्याची क्षमता ही करुणानिधी यांची वैशिष्टय़े. ती पहिल्यांदा पेरियार रामस्वामी यांनी ओळखली त्या वेळी करुणानिधी विशीतदेखील नव्हते. तरीही पेरियार यांनी या तरुणास जवळ केले. पुढे त्यांच्यानंतर तेच द्रमुकचे उत्तराधिकारी बनले आणि नंतर पक्षप्रमुखही झाले. १९६९ साली ते पहिल्यांदा तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर पाच वेळा त्यांनी हे पद भूषवले. ही मुख्यमंत्रिपदाची त्यांची कारकीर्द साधारण दोन दशकांची आहे. तमिळनाडू राज्यास उद्योग आणि व्यापारस्नेही बनवण्याचे श्रेय निर्विवाद त्यांचे. पुढे पक्षातून फुटल्यानंर एम जी रामचंद्रन आणि नंतर त्यांच्या उत्तराधिकारी जयललिता यांनी जी धोरणे राबवली त्यांचा प्रारंभ हा करुणानिधी यांच्या काळात झालेला आहे. तमिळनाडू त्याचमुळे अन्य राज्यांच्या तुलनेत श्रीमंत राहिले. करुणानिधी आधी कूदन्कुलमच्या अणुकेंद्राविरोधात होते. तशी जाहीर भूमिका त्यांनी घेतली. परंतु हे केंद्र तमिळनाडूत उभे राहिल्यास दहाएक हजार तरुणांच्या नोकऱ्यांचा प्रश्न मिटेल असे ज्या क्षणास त्यांना कळले त्या वेळी त्यांनी लगेच या केंद्राचा पाठपुरावा सुरू केला. आपल्याच भूमिकेचे वजन त्यांनी कधी स्वत:वर येऊ दिले नाही. चेन्नईजवळ वाहन उद्योगाचे केंद्र सुरू झाले ते करुणानिधी यांच्या धोरणीपणामुळेच.

हा धोरणीपणा हे त्यांचे महत्त्वाचे राजकीय वैशिष्टय़. त्यामुळे कोणत्याही आरोपांना त्यांनी कधीही भीक घातली नाही. घराणेशाही, नातेवाईकशाही यांचे ते प्रच्छन्न प्रतीक होते. सर्व सत्ता आपल्या वा आपल्या आप्तेष्टांच्या हातीच कशी केंद्रित राहील हे त्यांनी सातत्याने पाहिले. पण त्यात एक विचित्र वाटेल असा विसंवाद होता. तो नेते तयार करण्याच्या त्यांच्या वृत्तीत. द्रमुकचे जिल्हय़ाजिल्हय़ांत नेतृत्व तयार होईल असा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला. अमर्याद सत्ता आली की भ्रष्टाचार संधीही अमर्याद येतात. करुणानिधी यांनी त्या साधल्या नाहीत, असे म्हणता येणार नाही. भारतीय राजकारणातील सर्व पारंपरिक गुणदोषांनी त्यांची राजकीय कारकीर्द परिपूर्ण अशीच होती. परंतु त्यांचे मूल्यमापन होईल ते त्यांनी मागे काय ठेवले आहे, यावर.

देशात सर्व सत्ता केंद्राकडेच असावी आणि केंद्रातही सत्ताकेंद्र एकच असावे असा विचार आणि कृती बळावत असल्याच्या काळात करुणानिधी यांचा वारसा महत्त्वाचा ठरतो. तो प्रजासत्ताकवादी आणि संघराज्यवादी आहे. धार्मिक, संघकेंद्रित राजकारणाचा प्रभाव वाढत असताना निधर्मी, संघराज्यवादी करुणानिधी आणि त्यांचे राजकारण म्हणूनच महत्त्वाचे, दखलपात्र आणि काही अंशी अनुकरणीय ठरते.

umesh choubey

उमेशबाबू चौबे


64   11-Aug-2018, Sat

पीडित हा केवळ पीडित असतो. तो कोणत्याही जाती-धर्माचा नसतो. हा एकच ध्यास घेऊन अख्खे आयुष्य जनसामान्यांच्या वेदनेशी जोडून घेणारे उमेश चौबे उपराजधानीतील ‘सजग प्रहरी’ होते. मनात कसलीही लालसा न ठेवता सार्वजनिक जीवनात वावरणे तसे कठीण, पण लढवय्या चौबे यांनी अखेपर्यंत पद, पैशाचा मोह टाळला. मूळचे उत्तर प्रदेशातील, पण स्वातंत्र्यपूर्व काळात नागपुरात येऊन स्थायिक झालेल्या चौबेंनी स्वातंत्र्यलढय़ात भाग घेतला, पण स्वातंत्र्यसैनिक म्हणून कधी मिरवले नाही. त्यांचा पिंड पत्रकारितेचा. सामान्य लोकांवरील अन्यायाला वाचा फुटावी म्हणून त्यांनी ‘नया खून’ नावाचे एक साप्ताहिक काढले. अखेपर्यंत ते निष्ठेने चालवले.

चौबे यांची कौटुंबिक पाश्र्वभूमी धार्मिक, पण त्यांना कर्मकांडाचा तिटकारा होता. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम सुरू होण्याच्या आधीच त्यांनी येथे भोंदूबाबांच्या विरोधात लढा देण्यासाठी पाखंड पोलखोल समिती स्थापन केली. नंतर अंनिसची स्थापना झाल्यावर ते या संघटनेचे बराच काळ राष्ट्रीय अध्यक्ष होते. काही दशकांपूर्वी मध्य प्रदेशातील झाबुआ या आदिवासीबहुल जिल्ह्यात अंधश्रद्धेतून खुनाचे सत्र देशभर गाजले होते. तेव्हा चौबे प्रबोधनासाठी महिनाभर तेथे तळ ठोकून होते. आरंभापासून त्यांची नाळ लोहियांच्या विचाराशी जुळलेली.

नंतर ते जॉर्ज फर्नाडिसांचे समर्थक म्हणून ओळखले जाऊ लागले. कट्टर विदर्भवादी अशी ओळख असलेल्या चौबेंचा सर्व स्तरांतील संघटनांत सक्रिय सहभाग असायचा. हमाल पंचायत असो की कष्टकऱ्यांची परिषद. ते त्यात हिरिरीने सहभागी व्हायचे. केवळ नागपूरच नाही तर विदर्भात कुठेही अन्याय, अत्याचाराची घटना घडली की कुठल्याही निमंत्रणाची वाट न बघता चौबे तिथे जातीने हजेरी लावायचे व न्याय मिळेपर्यंत लढा देत राहायचे. त्यांची आंदोलनेही मोठी मजेशीर, पण वर्मावर बोट ठेवणारी असायची. मजुरांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर पिपा पिटो आंदोलन, महिलांच्या छेडखानीच्या विरोधात चाटा मारो आंदोलन, अशी अनेक ‘हटके’ आंदोलने त्यांनी केली.

उपराजधानीला तीनशे वर्षांचा इतिहास आहे, त्यामुळे त्रिशताब्दी साजरी व्हायला हवी हे सर्वप्रथम साऱ्यांच्या लक्षात आणून देणारे चौबेच होते. ते उत्तम नाटककार व कथालेखक होते. हिंदी साहित्याच्या वर्तुळात त्यांचा नेहमी वावर असायचा. नागरी प्रश्नावर आंदोलने करून जनतेला न्याय मिळवून देणारे चौबे काही काळ महापालिकेच्या राजकारणात सक्रिय होते. नगरसेवक, उपमहापौर, स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या चौबेंचा प्रशासनात कमालीचा दरारा होता. कायम लोकांसाठी झटणारे, अन्यायग्रस्त व पीडितांना प्रसंगी वर्गणी गोळा करून मदत करणारे उमेश चौबे आयुष्यभर कफल्लकच राहिले. अलीकडच्या काळात त्यांचा मधुमेहाचा आजार बळावला होता, पण उपचारांकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केले. रुग्णालयात दाखल होण्याच्या आधीपर्यंत प्रत्येक आंदोलनात हिरिरीने सहभाग नोंदवणाऱ्या चौबे यांच्या निधनाने उपराजधानीतील वंचितांचा आधारवडच हिरावला गेला आहे.


Top